This Site Content Administered by

पद्म पुरस्कारांचे जन पुरस्कारात रुपांतर

नवी दिल्ली, 27-1-2017

  -       प्रियदर्शी दत्ता  

वर्ष २०१७ च्या पद्म पुरस्कारांच्या नावांची यादी ताज्या हवेची झुळूक यावी तशी आली. देशाचे खरे नायक-नायिका, ज्यांचे नाव आणि कार्य आजवर अंधारात होते, त्यांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली होती. त्यात १) कलारीपट्टू, म्हंजे केरळचा, पारंपारिक तलवारबाजीचा क्रीडाप्रकार, खेळणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिला, मीनाक्षी अम्मा (७६), २)कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशमधल्या गावांमध्ये १०० हून अधिक झुलते पूल बांधणारे गिरीश भारद्वाज(६६), ३)कोलकता येथे गेल्या ४० वर्षांपासून आग लागल्यावर देवदूतासारखे स्वयंस्फूर्तीने मदतीला धावून जाणारे बिपीन गणात्रा(५९), ४) रुग्णांची मोफत तपासणी करणाऱ्या इंदोरच्या वयोवृद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ भक्ती यादव (९१),५)तेलंगणाच्या कोरडवाहू प्रांतात एक कोटीहून अधिक झाडे लावून ती भूमी हिरवीगार करणारे दारीपाल्ली रामेय्या (६८) ६)पोचमपल्ली सिल्क साड्यांच्या विणकामाचा वेळ आणि श्रम कमी करण्यात उपयुक्त अशा लक्ष्मी ए एस यु या मशीनचा शोध लावणारे चीतखांडी मल्लेशाम( ४४), ७) आपल्या मोटारसायकलला रुग्णवाहिकेत रुपांतरीत करून पश्चिम बंगालच्या चहाच्या बागांमध्ये मजुरांची सोय करणारे मजूर, करीम उल हक (५२) ८) महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या वेळी त्वरीत मदत मिळावी यासाठी एकीकृत हेल्पलाईन क्रमांक सुरु करणारे डॉ सुब्रोतो दास(५१) या सगळ्यांचा यंदाच्या ७५ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. यंदाच्या पद्मपुरस्कार यादीत कुठल्याही चित्रपट अभिनेत्याचा समावेश नाही.

हे होऊ शकले कारण ,६२ वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच पद्म पुरस्कार देण्यासाठी जनतेकडूनच  नावे मागवण्यात आली होती. याआधी केवळ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल,खासदार, याआधी पद्म पुरस्काराचे मानकरी ठरलेले आणि समाजातल्या प्रतिष्ठीत, महत्वाच्या व्यक्तीच पद्म पुरस्कारांची शिफारस करू शकायच्या. यातूनच, पुरस्कारांसाठी लॉबिंग करण्याची प्रथा पडल्याचे आरोपही होऊ लागले होते. त्यात ही सर्व प्रक्रिया ऑफलाईन असल्याने तिची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नसे, त्यामुळे शिफारस, त्यासाठी हुजरेगिरी करणे असे आरोप कधी सिद्ध होऊ शकले नाहीत, की खोटेही ठरू शकले नाहीत.  

यावर्षी मात्र पद्मपुरस्कारांच्या नामांकनाची, शिफारसीची तसेच निवडप्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली, जेणेकरून त्यात पारदर्शकता असावी. लॉबिंग प्रकाराला कुठेही थारा देण्यात आला नाही. दिल्लीतल्या फक्त पाचच लोकांची पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या आधी दरवर्षी किमान २० पुरस्कारविजेते तरी राजधानी  दिल्लीतले असत. यंदा ही प्रथा बदलवून देशाच्या इतर भागांचा विचार करण्यात आला.

यावर्षी एकूण ८९ मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. त्यात सात पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री पुस्काराचे मानकरी ठरले. ही यादी तुलनेने छोटी आहे, त्यातून पद्म पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत नीट छाननी झाल्याचे स्पष्ट होते, याआधी ही यादी १०० च्या वर असायची, एका वर्षात जास्तीत जास्त १२० जणांना पुरस्कार देता येऊ शकतो.

१९५५ पासून दरवर्षी हे पद्म पुरस्कार दिले जातात. त्यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा पुरस्कारांचा समावेश आहे. समाजात अतुलनीय कार्य अथवा सेवा देऊन आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीना राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराने गौरवले जाते.

भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार हे देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत.राज्यघटनेच्या कलम १८ नुसार, भारत सरकारने, इंग्रज राजवटीत सुरु असलेले नागरी सन्मान जसे, सरदार, रायबहादूर, खानबहादूर, सरदार खान बहादूर हे सगळे रद्द केले. भारतीय गणराज्यात असा कुठलाही पुरस्कार किंवा पदवी दिली जात नाही/ तिला मान्यता नाही, जी अकादमीय किंवा लष्करी कर्तृत्वाशी संबंधित नाही. गुणवत्ता आणि समाजातील योगदान यावर आधारित असलेले पद्म पुरस्कार प्रदान करण्याची सुरुवात १९५४ साली करण्यात आली. आज त्यांना असलेले नाव पहिल्यांदा १९५५ साली देण्यात आले. मात्र पद्म पुरस्कार ही उपाधी नसल्याने पद्म पुरस्कार मिळालेली कोणीही व्यक्ती स्वतःच्या नावाच्या आधी अथवा नंतर ते लावू शकत नाही.

पद्म पुस्कारासाठी ढोबळमानाने नऊ क्षेत्रातील कार्याचा विचार केला जातो. यात कला, सामाजिक कार्ये, सार्वजनिक जीवन, विज्ञान-अभियांत्रिकी, व्यापार उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, साहित्य आणि शिक्षण, नागरी सेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रांचा समावेश आहे. यापैकी कुठल्याही क्षेत्रात व्यक्तीने अतुलनीय कार्य केले असल्यास त्यांचा पद्म पुरस्कारांसाठी विचार केला जातो. मात्र त्याशिवाय दहाव्या विभागात मानवता, पर्यावरण, वन्यजीवसंवर्धन अशा काही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही पद्म पुरस्कारांसाठी विचार केला जातो. पद्मम पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. मात्र प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळा मार्च/ एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात होतो. परदेशी नागरिक किंवा भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्तीनांही हा सन्मान देता येतो.मात्र त्याने केलेल्या कार्याचा भारतीय नागरिकांना लाभ मिळालेला हवा.

या पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड करण्यासाठी पंतप्रधान दरवर्षी एक समिती स्थापन करतात. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव तसेच विविध क्षेत्रातले चार मान्यवर सदस्य म्हणून असतात. त्यांनी केलेल्या शिफारसी मंजुरीसाठी राष्ट्रपती आणि पतंप्रधानाकडे पाठवल्या जातात आणि त्यात पूर्ण गोपनीयता पाळली जाते. 

साधारणपणे पद्मपुरस्कार मरणोत्तर दिले जात नाहीत. मात्र एखाद्या अतिशय योग्य व्यक्तींविषयी सरकार तसा विचार करू शकते. यावर्षी चार मान्यवरांना मरणोत्तर प्रद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यातल्या एक म्हणजे डॉ सुनीती सोलोमन (१९३८-२०१५). व्यवसायाने डॉक्टर आणि सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ असलेल्या सुनीती यांनी १९८५ साली चेन्नई इथे एड्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, भारतात एड्‌स विषयक संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपायांची चळवळ सुरु केली. भारतात एड्सचा फटका गरीब अशिक्षित कुटुंबाना मोठ्या प्रमाणात बसला आहे. एड्सविषयी भारतात जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवल्याबद्दल देश डॉ सोलोमन यांचा ऋणी आहे. त्यांच्या कार्यकाळातच त्यांचा यथोचित गौरव न होणे ही खेदाची बाब आहे. 

आणखी एक समाजसेवी डॉ म्हणजे दिवंगत डॉ एस व्ही मापुस्कर. त्यांचाही गौरव त्यांच्या जीवनकाळात होऊ शकला नाही. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात होण्याच्या कितीतरी आधीपासून त्यांनी स्वच्छतादूत म्हणून ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि सांडपाणी व्यवस्थापनात खूप मोठे काम केले आहे. त्यांनी सुरुवातीला पुणे जिल्ह्यातल्या  देहू गावात बायोगॅस व्यवस्थेशी जोडलेली शौचालये बांधलीत. त्यातून केवळ गावच स्वच्छ झाले असे नाही तर गावाला स्वच्छ ऊर्जाही मिळाली. मापुस्कर यांच्या स्वयंसेवी संस्थेने एक दशकभर ही मोहीम महाराष्ट्राच्या गावागावात राबवली. त्यांचे हे शौचालयाचे मॉडेल स्वच्छ भारत अभियानासाठी मार्गदर्शक ठरले आहे.

‘पद्म’ शब्दाचा अर्थ आहे कमळ ! अलौकिक सौंदर्याचे फुल. जे चिखलात उगवते मात्र त्या चिखलापासून अस्पर्श्य असते. देशात अनेक कर्तृत्ववान लोक आहेत, ज्यांचे कार्य अंधारातच राहिले आहे. या पद्म पुरस्कारांच्या निमित्ताने यातल्या काही व्यक्तींचा सन्मान झाला, ते सगळे अतिशय सामान्य परीस्थितीतले लोक आहेत. त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये राहत त्यांच्या कल्याणासाठी काम करण्यात आपले आयुष्य वेचले. या त्यांच्या असामान्य कार्यामुळेच ते सर्वसामान्यांमधले असामान्य ठरले आहेत.

 

*         लेखक एक स्तंभलेखक आणि संशोधक आहेत. लेखात व्यक्त झालेली मते त्यांची वैयक्तिक मते आहेत.

 
PIB Feature/DL/1
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau