This Site Content Administered by

आरोग्यसेवेत सर्वांसाठी नवीन दृष्टी 

*के.व्ही. वेंकटसुब्रमणियम


नवी दिल्ली, 4-5-2017

भारताने आरोग्यसेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असून आज तो बराच सुदृढ झाला आहे. पोलिओ, देवी, प्लेग यांसारख्या रोगांचे यशस्वी उच्चाटन केले. याशिवाय बालमृत्यूदर, माता मृत्यूदर यात मोठी घसरण झाली असून एचआयव्ही लागण आणि एड्ससंबंधी मृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले आहे.

आरोग्य सेवांची वाढती व्याप्ती आणि सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कल आणि वाढत्या शहरीकरणामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यासारखे असंसर्गजन्य रोग झपाट्याने वाढत आहेत. 2025 मध्ये वयोवृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 11 टक्के असेल. दर्जेदार आरोग्यसेवेची मागणी होत आहे. मात्र विमा न काढलेल्या नागरिकांना महागड्या उपचारांमुळे दर्जेदार सेवा परवडत नाहीत.

आरोग्यसेवेतील असमानता कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने अलिकडेच राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 आणले. सर्वांना सामावून घेणे आणि सर्वांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे हा याचा मूळ उद्देश आहे. आरोग्य क्षेत्र विस्तारण्यात खासगी क्षेत्राची भूमिका या धोरणात अधोरेखित केली आहे.

हे धोरण सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा पुरवणार असून यात असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य, वृद्धांवर उपचार, पुनर्वसन आदींचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य सेवांना दोन तृतीयांश महसूल मिळेल.

2025 पर्यंत आरोग्यावरील सार्वजनिक खर्च स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 2.5 टक्क्यांपर्यंत (सध्याच्या 1.15 % वरून) वाढवला जाईल. रोगांचा वाढता भार आणि मनुष्यबळाची उपलब्धता यासारख्या आव्हानांचा सामनाही केला जाईल.

विविध रोग आणि रोगपरिस्थिती विज्ञान यामध्ये गेल्या 15 वर्षात झालेल्या  प्रमुख बदलांबाबत या धोरणात विचार केला आहे.

या धोरणात प्रथमच काही रोगांचे उच्चाटन करण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट आखण्यात आले आहे. 2017 मध्ये काळा आजार, 2018 पर्यंत कुष्ठरोग आणि सर्वात महत्वाकांक्षी उद्दिष्ट 2025 पर्यंत मलेरियाचे भारतीय संक्रमण संपवण्याचा सरकारचा विचार आहे.

भारताचा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम मिशन इंद्रधनुष ही लाभार्थ्यांची संख्या, लशींची संख्या, लसीकरण सत्रांची संख्या, भौगोलिक प्रसार आदींचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक आहे. डिसेंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा उद्देश कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये हा आहे.

सुरुवातीला सहा लशींचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात आता मुलांना 11 जीवघेण्या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.

हा लसीकरण कार्यक्रम सुरु झाल्यापासून 2.14 कोटींहून अधिक मुलांना आणि सुमारे 0.56 दशलक्ष गरोदर महिलांना लस  देण्यात आली आहे. नियमित लसीकरणाची व्याप्ती,गेल्या दशकातील सरासरी 1 टक्क्याच्या तुलनेत गेल्या दोन वर्षात 5-7 टक्क्यांनी वाढली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महिला, नवजात बालके आणि लहान मुलांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे दहा वर्षात आरोग्यकेंद्रांमधील प्रसूतीच्या प्रमाणात 40.2 टक्के वाढ झाली आहे.

यात जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आदींचा समावेश आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सरकारी आरोग्य केंद्रात प्रसूत झालेल्या प्रत्येक महिलेला मोफत आणि रोकडरहित आरोग्यसेवा मिळणार आहेत. नवजात बालकांच्या आरोग्यावरही राष्ट्रीय आरोग्य अभियान भर देत आहे.

रुग्णालयांमध्ये स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना सुरु करत आहे. आरोग्य सुरक्षा पुरवण्यासाठी सरकार लवकरच एक कायदा आणणार असून त्याअंतर्गत डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून द्यावी लागतील जी ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त आहेत.

प्रारंभिक उपाय म्हणून 700 औषधांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यात आले आहे, जेणेकरून गरीबांना दुर्धर आजारांच्या वेळी किफायतशीर दरात औषधे मिळतील. नियम असे तयार करण्यात आले आहेत की, बाजारात जी औषधे 1200 रुपयांना उपलब्ध आहेत, त्यांच्या किमती 70 ते 80  रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. हृदयरोगावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमतीही सरकारने कमी केल्या आहेत.

सरकारने नुकतीच ' टेस्ट अँड ट्रीट पॉलिसी फॉर एचआयव्ही हि योजना सुरु केली आहे ज्यात जो कुणी चाचणीदरम्यान एचआयव्ही-एड्सबाधित आढळेल, त्याला एआरटी (ऍन्टिरेट्रोव्हायरल थेरपी )दिली जाईल. यामुळे त्यांचे आयुष्य वाढेल तसेच भविष्यात क्षयरोगासारख्या संसर्गापासून त्यांना संरक्षण मिळेल.

भारत लवकरच पुढील सात वर्षांसाठी एचआयव्ही साठी राष्ट्रीय धोरणात्मक आराखडा विकसित करेल जो एड्सचे निर्मूलन करण्यासाठी महत्वाचा ठरेल.

कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी सरकारने अलिकडेच एचआयव्ही/एड्स कायदा मंजूर केला. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. कारण खूप कमी देशांमध्ये एचआयव्ही बाधित लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा अशा प्रकारचा कायदा आहे.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला महत्व दिले जात असून, जे याचा अवलंब करतात, त्यांना रुग्णालयात जावे लागत नाही. स्वच्छता अभियानाचा उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आहे. हे सिद्ध झाले आहे कि जर आपण अस्वच्छ वातावरणात राहिलो, तर अनेक रोगांची लागण होऊ शकते.

स्वच्छ परिसर आणि सवय हे आरोग्य राखण्यात आणि आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत करतात. असुरक्षित पाणी, अस्वच्छता यामुळे जगभरात दरवर्षी 1.7 दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. यापैकी ६ लाखांहून अधिक मृत्यू भारतात होतात. मृत्यूचे मोठे कारण असलेल्या अस्वच्छतेचा सामना करण्यासाठी स्वच्छ भारताला गती देण्यात आली आहे.

सार्वत्रिक स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारने 2 ऑक्टोबर 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. याचा उद्देश ऑक्टोबर 2019 पर्यंत शहरी भागाला हागणदारीमुक्त करणे आणि 4041 वैधानिक शहरांमध्ये घनकचऱ्याचे 100 टक्के वैज्ञानिक व्यवस्थापन हा आहे. जनतेमध्ये स्वच्छतेप्रति आणि सार्वजनिक आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश आहे.

 

(लेखक स्वतंत्र पत्रकार आहेत)

(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाची स्वतःची आहेत)

 
PIB Feature/DL/18
बीजी -काणे -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau