This Site Content Administered by

पद्म पुरस्कार 2017
असामान्य क्षमतेचे सर्वसामान्य भारतीय 

नवी दिल्ली, 28-1-2017

-       निवेदिता  खांडेकर  

 

करीमुल हक आणि निवेदिता भिडे यांच्यात काहीच साम्यस्थळे  नाहीत, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, उपलब्ध साधने, अगदी भौगोलिक स्थानातही भिन्नता आहे. मात्र त्यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे त्यांची सेवाभावी वृत्ती. निवेदिता रघुनाथ भिडे, या विवेकानंद केंद्राच्या कन्याकुमारी इथल्या मुख्यालयाशी संबंधित असलेल्या समाज सेविके विषयी आपण वाचले असल्याची किंवा त्यांना भेटल्याची शक्यता अगदी कमी आहे. त्याचप्रमाणे करीमुल हक या पश्चिम बंगालमधल्या चहाच्या मळ्यातल्या कामगाराविषयी आपण ऐकल्याची किंवा त्याला भेटल्याची शक्यता सुध्दा तेवढीच कमी आहे. मात्र सर्वसामान्य भारतियांच्या असामान्य क्षमतेचे ते प्रतिनिधी आहेत."कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर, दारिद्रय आणि उपेक्षित खितपत पडलेले भारतीय पाहिल्यानंतर, मी माझ्या देशासाठी काय करू शकतो?  या प्रश्नाने खऱ्या अर्थपूर्ण आयुष्याला सुरवात होते, अशा निष्कर्षाप्रत स्वामी विवेकानंद आले " असे भिडे यांनी 12 जानेवारी 2013 मधे इंदूर येथील आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना सांगितले. विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या भिडे यांनी, विवेकानंदांची 1892 मधे कन्याकुमारीला पोहोचण्यापूर्वीची संपूर्ण भारत भ्रमणाची गाथा उलगडली आणि आयआयएमच्या संवेदनक्षम विद्यार्थ्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले असे इंदूरच्या हिंदुस्तान टाइम्स ने म्हटले आहे (http://www.vsc.iitm.ac.in/Home/wp-content/uploads/2013/03/VSC_Hindustan_Times_Indore2013-01-12_page4.pdf)

कन्याकुमारी इथे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी त्यांनी  महाराष्ट्रातले आपले घर सोडले आणि स्वामी विवेकानंद संस्थेच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपले आयुष्य समाजसेवेला वाहून घेतले. असामान्य काम करणारी सर्वसामान्य भारतीय व्यक्ती !

15 वर्षांपूर्वी, आईला रुग्णालयात न्यायला वाहन नसल्यामुळे, करीमुल हकच्या आईला जीव गमवावा लागला, ह्या प्रसंगानंतर त्याला आपले ध्येय गवसले. आपल्या डोळ्यासमोर खाली कोसळलेल्या सहकाऱ्याला, हकने तत्परतेनेदुचाकीवरून 50 किलोमीटरवरच्या  जलपायगुडी इथल्या रुग्णालयात पोहोचवले. हकच्या मदतीमुळे त्या मजुराचे प्राण वाचले. पश्चिम बंगालमधल्या त्या जिल्ह्यातल्या धालबारी आणि आसपासच्या 20 खेड्यांसाठी हकची दुचाकी ही एकमेव जीवनवाहिनी होती. हिंदुस्थान टाइम्सच्या अहवालानुसार, (http://www.hindustantimes.com/kolkata/how-north-bengal-s-bike-ambulance-dada-is-saving-lives/story-66aVHiLbElBP46hKVMovNJ.html) आरोग्याच्या मूलभत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागात, रुग्णवाहिकेतून  रुग्णाला दवाखान्यात नेणे ही बऱ्याच भागात चैनीची बाब मानली जायची. स्थानिक डॉक्टरांकडून अत्यावश्यक प्रशिक्षण घेतल्यानंतर हकने जनतेला त्यांच्या घरी प्राथमिक सेवा द्यायला सुरवात केली. आपल्या या एकहाती अभियानात त्याने 3000 जणांचे प्राण वाचवले. चहाच्या मळ्यातील एका साध्यासुध्या मजुराची केवढी मोठी कामगिरी !

 जनसेवा, सर्वोत्कृष्टतेचे दर्शन

यामुळेच हक आणि भिडे हे इतरांपेक्षा वैशिष्टयपूर्ण ठरतात. लाखो-करोडो भारतीयांच्या गर्दीत ते वेगळे ठरतात. म्हणूनच पद्म पुरस्कारांसाठीच्या 18,000 नामांकनातून त्यांची निवड होते. गृहमंत्रालयाने नमूद केल्याप्रमाणे,

(http://www.padmaawards.gov.in/SelectionGuidelines.aspx) पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्याकरिता, पद्म पुरस्कार समितीकडून कोणताही ताठर निकष अथवा कठोर आराखडा लावला जात नाही. पुरस्कारांसाठी व्यक्तीची निवड करताना, त्या व्यक्तीची जीवनभरातली कामगिरी पहिली जाते. ज्या व्यक्तीची निवड करायची आहे, त्या व्यक्तीच्या कामगिरीत जनसेवा हा घटक अनिवार्य आहे. केवळ प्रदीर्घ सेवेसाठी नव्हे तर विशेष सेवेसाठी हे पुरस्कार दिले जातात. विशिष्ट क्षेत्रात केवळ उत्कृष्ट नव्हे तर अतिउत्कृष्ट सेवा हा निकष लावला जातो. हक आणि भिडे यांच्यासारख्या, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या अनेक व्यक्तींना यावर्षी गौरवण्यात आले. उदाहरणार्थ 1925 मधे जन्मलेल्या कोटेस्वरम्मा. एका लहानसे खेडे ते शैक्षणिक संस्था चालवणारी प्रख्यात व्यक्ती असा त्यांचा अविश्वसनीय प्रवास राहिला आहे. त्या अवघ्या दोन वर्षाच्या असताना त्यांची आई वारली. विजयवाडा जवळच्या गोशाला या छोट्याश्या खेड्यातली ही मुलगी, विजयवाडा तालुक्यातली, पहिली महिला पदवीधर ठरली, तिच्या निर्धाराबद्दल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या तिच्या अथक प्रयत्नांबद्दल तिचे कौतुक. हिंदूच्या अहवालानुसार, (http://www.thehindu.com/news/cities/Vijayawada/Hard-work-pays-off-says-Padma-awardee-Koteswaramma/article17094713.ece), शिक्षणाने आपल्याला विकासाची नवी दालने खुली केली त्याप्रमाणे  सर्वांसाठी विकासाची कवाडे उघडतात हे कोटेस्वरम्माने  जाणले होते. "त्या काळात मुली 13  वर्षाच्या झाल्यानंतर घराबाहेर पडू शकत नसत त्यामुळे मुलींनी शिक्षण घेणे हे तेव्हा फारच कठीण असल्याचे त्या हिंदूच्या प्रतिनिधीला सांगतात. म्हणूनच दुसऱ्यांच्या आयुष्यात दर्जेदार बदल घडावा यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त कोटेस्वरम्मानी, मॉंटेसरी कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयाची उभारणी केली, आणि त्यानंतर शिशुवर्गापासून ते पदव्यूत्तर शिक्षण देणाऱ्या मॉंटेसरी शिक्षण महाविद्यालयाची स्थापनाही त्यांनी केली.

 तळागाळापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल

समाजाच्या तळागाळातल्या स्तरापर्यंत निःस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या व्यक्तींचे कार्य ओळखण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. तळागाळातल्या स्तरासाठी काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्यासाठी हे सरकार झटत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. याचे अचूक उदाहरण म्हणजे कर्नाटकमधल्या हलक्की व्होकलिंगा या जमातीच्या नाईटिंगेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकरी बोम्मागौडा. सहा दशके, आदिवासी लोक संगीत गायिका आणि आता सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या व्होकलिंगा यांनी बडिगेरी या लहानशा वाडीत मद्य विक्रीचा निषेध केला. सांस्कृतिक वारशाचे गायनाद्वारे जतन करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. तळागाळात काम करणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे 'इको बाबा' बलबीर सिंग सिचवाल, ज्यांनी पंजाबमधल्या 160 किलोमीटर लांबीच्या काली बेईन नदीचे, स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने पुनरुज्जीवन केले आणि सांडपाण्याच्या भूमिगत व्यवस्थेचे सिचवाल मॉडेल विकसित केले. सांडपाणी नदीत सोडू नये यासाठी स्थानिकांत जनजागृती करण्यासाठी त्यांनी स्वयंसेवक गोळा केले आणि निधीही जमवला, या कार्यामुळे नदीपात्र स्वच्छ झाले आणि नैसर्गिक झरे पुनर्जीवित होऊन नदीला नवजीवन प्राप्त झाले. या कार्याने ते वैशिष्ट्यपूर्ण ठरले. वलयांकित अनुयायी असणारे अनेक गुरु आपल्याला माध्यमात दिसतात, मात्र तळागाळातले आपले कार्य आणि विनम्र पार्श्वभूमी यामुळे सिचवाल या सर्वात वेगळीच उंची गाठतात. शेखर नाईक हेही असेच एक उदाहरण. क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात चाहते असतात मात्र 13 वर्षाच्या कारकिर्दित67 सामन्यात 32 शतके नावावर असणारा हा अंध क्रिकेटपटू, निस्सीम क्रिकेटप्रेमींनाही फारसा माहित नसेल, तर बाकीच्या भारताला माहित असण्याची शक्यताच  नाही. कर्नाटकमधल्या एका खेड्यात गरीब कुटुंबात नाईक जन्मले. क्रिकेट सामन्यांच्या सहवासाने वाढताना बेभरवशाच्या यंत्रणेविरोधात लढा देतानाच सर्वोत्कृष्ट कामगिरी करत राहिले. पण (CABIअर्थात  भारताततल्या अंधासाठीच्या क्रिकेट संघटनेला, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अधिकृत मान्यता नसल्याने नाईक आणि ते खेळत होते त्या क्रिकेटलाही त्याचा अकारण फटका बसला आहे. "13 वर्षे  भारताचे प्रतिनिधित्व करूनही मला क्रिकेट खेळण्यासाठी कोणतेही मानधन मिळत नाही. क्रीडा समन्व्ययक म्हणून काम करत असल्याबद्दल समर्थनम या माझ्या समाजसेवी संस्थेकडून मला मासिक 15,000 रुपये वेतन मिळते" असे नाईक यांनी हिंदुस्थान टाईम्सच्या प्रतिनिधीला सांगितले. (http://www.hindustantimes.com/cricket/world-cup-winning-blind-cricket-captain-who-earns-just-rs-15k-month/story-iIfq9SriRcYkxZ0w1pzQNJ.html). पद्म पुरस्कारामुळे नाईक यांच्यासाठी परिस्थितीत सकारात्मक बदल घडेल अशी आशा करूया.

प्रसिध्दीपासून दूर असलेल्या या व्यक्तींचे कार्य ओळखण्याचा हा प्रघात आता असाच पुढे सुरु राहील अशी आशा बाळगू या    .

*****

 

* लेखिका दिल्लीत पत्रकार असून, पर्यावरण, विकासात्मक आणि सामाजिक प्रश्नांविषयी लेखन करतात. या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते त्यांची वैयक्तिक मते आहेत.

 
PIB Feature/DL/2
बीजी -नि चि -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau