This Site Content Administered by

भारतीय रेल्वे उज्जवल भविष्याच्या उंबरठ्यावर 

* जी श्रीनिवासन


नवी दिल्ली, 10-8-2017

देश स्वातंत्र्याची सात दशके साजरी करण्याची तयारी करत आहे. पण त्याही पूर्वी, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली भारतीय रेल्वे आज भारताने केलेल्या प्रगतीच्या मार्गक्रमणाचे भव्य प्रतिक म्हणून उभी आहे. आज, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कूर्म गतीने वाटचाल करत आहे, प्रगत देशांची आर्थिक प्रगती २ टक्क्यांपेक्षाही कमी दराने होत आहे, त्याच वेळी, भारत ही जगातील सर्वात जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत, भारताने चीनला देखील मागे टाकले आहे. भारताच्या आर्थिक वाढीत अंतर्गत दळणवळणाच्या क्षेत्रात भरतीय रेल्वेचे योगदान उल्लेखनीय आहे. भारतीय रेल्वे भारतासारख्या खंडप्राय आणि वैविध्यपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज लाखो प्रवाश्यांची आणि सामानाची ने -आण करत आहे.  

आज भारतीय रेल्वेच्या ९२१२ माल गाड्या आणि १३,३१३ प्रवासी गाड्या ६६,६८७ मार्ग किमी अंतर कापत वर्षाला एक बिलिअन टन मालाची वाहतूक करतात. तर दिवसाला सुमारे २२ मिलिअन प्रवाशांची ने आण करतात. ह्या गाड्या एकतर डीझेल इंजिन किंवा विजेच्या इंजिनावर चालतात. येथे विशेषत्वे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे २०१६ च्या मार्च अखेरपर्यंत भारतीय रेल्वेच्या एकूण ५८,८२५ ब्रॉड गेज मार्गांपैकी २७,९९९ म्हणजेच ४७% मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. ३१ मार्च २०१६ रोजी भारतीय रेल्वेकडे ५८६९ डीझेल इंजिने आणि ५२१४ विजेची इंजिने आहेत. भारतीय रेल्वेच्या एकूण माल वाहतुकीपैकी ६४.८० टक्के वाहतूक आणि ५१.३ टक्के प्रवासी वाहतूक विजेच्या इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांमधून होते.

विजेच्या इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांचे अनेक फायदे आहेत. डीझेल इंजिनापेक्षा ते अधिक पर्यावरणपूरक असतात. विजेवर चालणाऱ्या इंजिनांमुळे देशाचा जीवाश्म इंधन वापर कमी होण्यास महत्वपूर्ण मदत होते, पेट्रोलियम पदार्थांची आयात मोठ्याप्रमाणात कमी होते आणि त्या योगे कार्बन उत्सर्जन कमी होते. भारतीय रेल्वेसाठी वीज हा इतर स्रोतांच्या  मानाने किफायतशीर स्रोत आहे आणि विजेची अनेक उपकरणे विद्युत निर्मितीच्या कामी येतात. विद्युतीकरणाचे तिहेरी फायदे म्हणजे वाढलेला वेग, संचालनातील सहजता आणि संचालनातील आर्थिक बचत. म्हणूनच भारतीय रेल्वेने स्वबळावर अनेक मार्गांचे/विभागांचे विद्युतीकरण केले यात नवल ते कसले. भारतीय रेल्वेची विद्युतीकरणाची सध्याची क्षमता वाढविण्याची योजना आहे आणि त्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक कृती आराखडा तयार करण्यात आला, त्यानुसार २०१६-१७ ते २०२०-२१ ह्या चार वर्षांत देशातील २४,४०० मार्ग कि.मी. ब्रॉड गेज मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ह्यासाठी सध्या एक मोहीमच उघडण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाचे हे काम आपल्याच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या भारतीय रेल्वे बांधकाम महामंडळ (Indian Railway Construction Corporation - IRCON), भारतीय रेल्वे तांत्रिक आणि आर्थिक सेवा मर्यादित (Rail India Technical and Economic Services Limited  - RITES) यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आणि भारताबाहेर देखील, विद्युत वाहन प्रणाली उभारण्याचा प्रचंड अनुभव असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्या, उर्जा मंत्रालयाच्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देखील ह्या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे.

येथे हे नमूद केले पाहिजे की गेल्या तीन वर्षांत (२०१४-२०१७) च्या स्वतंत्र आणि २०१७-१८ च्या सामान्य अर्थसंकल्पात समाविष्ट केलेल्या अर्थसंकल्पात एकूण ९३ विद्युतीकरण प्रकल्प सुरु करण्यात आले. ह्यात १७,१६५ कोटी रुपयाचे १६,१८५ मार्ग किमी  समाविष्ट आहेत. याचा परिणाम म्हणून, रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा वेग सध्याच्या वार्षिक १७०० मार्ग किमी वरून चालू आर्थिक वर्षांत ४००० मार्ग किमी इतका वाढला आहे.

विद्युतीकरणाशिवाय, भारतीय रेल्वे देशांतर्गत, अर्थव्यवस्थेत एक उत्पादक स्तंभ म्हणून आपली भूमिका आणि  उपयुक्तता टिकवून ठेवण्याचे आव्हान देखील समर्थपणे पेलत आहे. जलदगतीने क्षमता निर्मितीसाठी भारतीय रेल्वेने प्रकल्प राबविण्याची क्षमता वाढविण्याचे महत्व ओळखले आहे. पायाभूत सुविधा क्षमता आणि आधुनिकीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या वर्षांत, म्हणजेच २०१५-१६ मध्ये पुढील पाच वर्षांसाठी ८,५६,०२० कोटी रुपयांचा प्रचंड गुंतुवणूक आराखडा तयार करण्यात आला होता. आधुनिकीकरणात अस्तित्वात असलेल्या रेल्वेच्या जाळ्यातील गर्दी दूर करणे आणि विद्युतीकरणासह विस्तार करणे, राष्ट्रीय प्रकल्प, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधन, रोलिंग स्टॉक, प्रवासी सुविधा, उच्च वेग आणि उन्नत मार्गिका आणि स्थानक पुनर्विकास समाविष्ट आहे. चालू आर्थिक वर्षांत भारतीय रेल्वेने दिवसाला ९.५९ किमीच्या वेगाने ३५०० किमीचे नवीन मार्ग/गेज रूपांतर/दुहेरीकरण उद्दिष्ट ठेवले आहे.

गेल्या तीन वर्षांत भारतीय रेल्वेने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मालवाहतूक पुढाकार, स्रोत एकत्रीकरण मोहीम, आणि हरित पुढाकार असे अनेक उपक्रम राबविले जेणेकरून पर्यावरण सुरक्षा धोक्यात येणार नाही. मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणारा पहिला उच्च वेग मार्ग सुरु करण्यासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय रेल्वेने राष्ट्रीय उच्च वेग  रेल्वे महामंडळ मर्यादित या कंपनीची स्थापना केली. २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते साबरमती/अहमदाबाद पर्यंत प्रस्तावित मार्गाची एकूण लांबी ५०८ किमी आहे.

मालवाहतूकीसाठी रेल्वेने समर्पित मालवाहतूक मार्गिका बनविण्यास मंजुरी दिली आहे. यात १८५६ किमी लांबीची पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका आहे जी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास येथून सुरु होते आणि महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा या राज्यातून जाते आणि उत्तर प्रदेशातील दादरी येथे संपते. पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका पंजाबमधील लुधियाना जवळ सह्नेवाल येथे सुरु होते आणि हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड राज्यातून जाते आणि पश्चिम बंगालमधील दानकुनी येथे संपते. पश्चिम आणि पूर्व समर्पित मार्गिका सुरु करण्यासाठी अंदाजित खर्च ८१,४५९ कोटी रुपये असून ह्या मार्गिका २०१९-२० मधे सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.

भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आणि व्यवसायावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या महाप्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणारे सर्व संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ऑगस्ट २०१४ मध्ये भारतीय रेल्वेच्या अनेक क्षेत्रात थेट विदेशी गुंतुवणूकीला परवानगी दिली. यात इतर अनेक क्षेत्रांबरोबरच खाजगी भागीदारीतून उपनगरीय मार्गिका विकसित करणे, इंजिने/डबे यासह रोलिंग स्टॉक, मालवाहतूक टर्मिनल, रेल्वेचे विद्युतीकरण, सिग्नल प्रणाली, मोठ्या प्रमाणावरील अतिवेगवान  अर्थात मास रॅपिड ट्रान्सपोर्ट प्रणाली आणि प्रवासी टर्मिनल सामील आहेत.

भूतकाळातील दुर्लक्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. ह्या निर्णयांमुळे भारतीय रेल्वे आज ह्या निर्णयाचे फायदे घेण्याच्या परिस्थितीत आली आहे. ह्या निर्णयांमुळे राष्ट्राची सर्वसमावेशक प्रगती देखील होत आहे.

******

लेखक ‘द हिंदू’ समूहाचे माजी उपसंपादक आहेत. लेखक आता दिल्ली येथे स्वतंत्र आर्थिक पत्रकार म्हणून काम करतात.

लेखात व्यक्त केलेली सर्व मते लेखकाची वैयक्तिक आहेत.

 
PIB Feature/DL/28
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau