This Site Content Administered by
पंतप्रधान

इस्त्रायल दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन (5, जुलै 2017)

नवी दिल्ली, 5-7-2017

सन्माननीय महोदय पंतप्रधान नेतन्याहू, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ,

सन्माननीय पंतप्रधान, तुम्ही आपुलकीने केलेले स्वागत आणि आदरातिथ्याविषयी मी आभार व्यक्त करतो. तुम्ही मला दिलेला वेळ आणि मैत्रीबद्दलही मी कृतज्ञ आहे. आपण आणि श्रीमती नेतन्याहू यांनी काल रात्री माझ्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीच्या समारंभाच्या स्मृती माझ्या मनात कायमच राहतील. विशेषतः काल आपल्यामध्ये झालेला संवाद, श्रीमती नेतन्याहू यांची भेट आणि तुमच्या पिताश्रींविषयी तुम्ही दिलेली माहिती, यामुळे,तुमच्या या सुंदर देशातला माझा अनुभव एक वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून विकास करण्यात तुम्हाला मिळालेल्या यशाचं भारताला अतिशय कौतुक आहे.नवनवीन संशोधनांच्या जोरावर, सर्व अडचणींवर मात करून, तुम्ही समृद्ध झाला आहात. इस्त्रायलला हा अनन्यसाधारण दौरा करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सद्‌भाग्य समजतो. या आधुनिकतेच्या प्रवासात, आपले मार्ग जरी भिन्न होते तरी, लोकशाही मूल्यांवरचा आपला विश्वास आणि आर्थिक प्रगतीचे ध्येय समानच आहे.

मित्रांनो,

ही भेट म्हणजे अनेक बाबींसाठीची संधी आहे-जसे,

आपल्या मैत्रीचा धागा पुनरुज्जीवित करण्याची ,

आपल्या संबंधांचा एक नवा अध्याय लिहिण्याची,

आणि,

परस्परसंबंधांचे नवे क्षितिज पार करण्याची ही संधी आहे.  

पंतप्रधान नेतन्याहू आणि माझ्यात जवळपास सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यात केवळ द्वीपक्षीय संधीचे मुद्देच नाही, तर आमच्या परस्पर सहकार्यातून जागतिक शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी काय मदत होईल, यावरही आम्ही चर्चा केली. दोन्ही देशांचे प्राधान्य आणि नागरिकांमधले दृढ बंध याचे प्रतिबिंब असलेले एक नाते प्रस्थपित करण्याचे आमचे सामाईक उद्दिष्ट आहे.

मित्रांनो,

नवनवीन संशोधन, जल आणि कृषीक्षेत्रात इस्त्रायल हा जगातल्या आघाडीच्या देशांपैकी एक आहे. भारताच्या विकासात ही सगळी क्षेत्रे माझ्या प्राधान्यस्थानी आहेत. जलक्षमता वाढवणे आणि जलस्रोतांचा वापर, जलसंवर्धन आणि जल शुद्धीकरण, कृषीक्षेत्राचे उत्पादन वाढवणे ह्या क्षेत्रांवर आमच्या द्वीपक्षीय संबंधांचा मुख्य भर असून त्यासंदर्भात उभय देशातले संबंध अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन्ही देशातले शास्त्रज्ञ आणि संशोधक  या क्षेत्रात दोन्ही देशांना लाभदायक अशा उपाययोजना विकसित करुन त्यांची अंमलबजावणी करतील, असा आमचा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही द्वीपक्षीय तंत्रज्ञान संशोधन निधी म्हणून 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निधी तयार करणार आहोत, हा निधी औद्योगिक क्षेत्रातील संशोधनासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यातून हे उद्दिष्ट गाठता येईल. या भक्कम भागीदारीमुळे,दोन्ही देशात परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढेल ,असा आम्हाला विश्वास वाटतो. याच दिशेने अधिक काम करण्याबाबत पंतप्रधान नेत्यनाहू आणि माझ्यात सहमती झाली आहे.दोन्ही देशातील उद्योजकांनीही या क्षेत्रात पुढाकार घेत परस्पर व्यापार वाढवण्याची गरज आहे . उद्या उद्योग कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत आम्ही हाच विषय प्रामुख्याने मांडणार आहोत. 

मित्रांनो,

भारत आणि इस्त्रायल दोन्ही देशांची भौगोलिक परिस्थिती अतिशय किचकट आहे. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला असलेल्या धोक्याची आम्हाला जाणीव आहे. दहशतवादामुळे पसरत असलेल्या द्वेष आणि हिंसाचाराचा भारताला वारंवार सामना करावा लागला आहे, तसाच तो इस्त्रायललाही करावा लागला आहे. दोन्ही देशांच्या राजनैतिक हितसंबंधांचे रक्षण करणे तसेच वाढता दहशतवाद, कट्टरतावाद आणि सायबर हल्ल्यांचा सामना करताना एकत्रित रणनीती आखणे, यावर पंतप्रधान नेतन्याहू आणि माझ्यात सहमती झाली आहे. पश्चिम आशिया आणि आजूबाजूच्या प्रदेशातील परिस्थितीवरही आम्ही चर्चा केली. या प्रदेशात शांतता, संवाद आणि संयम कायम राहील अशी भारताला आशा आहे.

मित्रांनो,  

दोन्ही देशांमधील जनतेत एक नैसर्गिक स्नेह आणि आपुलकीची भावना आहे. भारतीय वंशाचे ज्यू समुदायाचे लोक आम्हाला सतत हा बंध जाणवून देत असतात. हा समुदाय दोन्ही देशांच्या एकत्रित भविष्याचा धागा आहे. अलीकडच्या काही वर्षात, भारतात अनेक इस्त्रायली पर्यटक येत असतात. तर दुसरीकडे अनेक भारतीय युवक उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी इस्त्रायलमधील उत्तमोत्तम विद्यापीठांची निवड करतात. मला विश्वास आहे की दोन्ही देशांमधील हे प्राचीन तसेच नव्यानेच प्रस्थापित झालेले बंध एकविसाव्या षटकात उभय देशांच्या भागीदारीला एका धाग्यात गुंफून अधिक मजबूत बनवतील

मित्रांनो,

या जागेपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर, हैफा शहर आहे. या शहराच्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास आमच्यासाठी अतिशय जवळचा आहे. पहिल्या जागतिक युद्धादरम्यान या शहराच्या मुक्तीसाठी वीरमरण पत्करलेले ४४ भारतीय जवान आजही येथे चिरनिद्रा घेत आहेत. या शूर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी उद्या हैफा येथे जाणार आहे.

सन्माननीय पंतप्रधान नेतन्याहू ,  

इस्त्रायलमधील हे २४ तास माझ्यासाठी अतिशय फलदायी आणि संस्मरणीय ठरले आहेत. माझा इथला पुढचा वेळही असाच जाईल,याची मला खात्री आहे. याचवेळी मी तुम्हाला, श्रीमती नेतन्याहू आणि आपल्या कुटुंबाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो. आपण केलेले स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. 

धन्यवाद !

खूप खूप धन्यवाद ! शालोम !

 
PIB Release/DL/1057
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau