This Site Content Administered by
पंतप्रधान

इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 5-7-2017

७० वर्षांनी भारतीय पंतप्रधान इस्रायलला येणे हे आपल्यासाठी आनंदाचे आहे, मात्र त्याच वेळी मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारेही आहे. हा एक मानवी स्वभाव आहे कि जेव्हा आपण आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला अनेक दिवसांनी भेटतो, तेव्हा आपली प्रतिक्रिया असते की खूप दिवसांनी भेटलास आणि दुसरी प्रतिक्रिया असते, ठीक आहेस ना? कसा आहेसहे जे "कसा आहेस" वाक्य असते, ते संमिश्र भावनांनी व्यक्त होते. आपण त्या व्यक्तीची खुशाली विचारतानांच, हे ही स्वीकार करतो, की खूप दिवसांनी भेटलो आहोत. मी तुमच्याशी संवादाची सुरुवात या संमिश्र भावनेनेंच करू इच्छितो. खरच आपण खूप दिवसांनी भेटतो आहोत. आणि खरतर दिवस म्हणणे पण योग्य नाही, आपल्याला भेटण्यासाठी कित्येक वर्षे लागलीत. १२, २० ५० वर्षे नाही, तब्बल ७० वर्षे लागलीत!

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, तब्बल ७० वर्षांनी कोणी पंतप्रधान आज या इस्रायलच्या भूमीत आपले आशीर्वाद घेण्यासठी आला आहे. आज या क्षणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देखील उपस्थित आहेत. इस्रायलला पोहचल्‍यापासून त्यांनी माझी जी सोबत दिली आहे, जो सन्मान दिला आहे तो सन्मान माझा नसून सव्वाशे कोटी भारतीय जनतेचा सन्मान आहे. असा सन्मान, असे प्रेम अशी आपुलकी जगात कोणी विसरू शकेल काय? आमच्या दोघांमध्ये एक विशेष साम्य आहे की, आम्ही दोघेही आपापल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात जन्मलो आहोत. म्हणजे बेंजामिन स्वतंत्र इस्त्रायलमध्ये तर मी स्वतंत्र भारतात जन्मलो. पंतप्रधान नेतान्याहू यांची एक आवड सर्व भारतीयांना खुश करणारी आहे आणि  ती म्हणजे, भारतीय खाद्यपदार्थांविषयी त्यांना असलेले प्रेम! काल रात्रीच्या मेजवानीत त्यांनी भारतीय भोजनाचा बेत करून माझे जे स्वागत केले, ते मी कधीच  विसरणार नाही.

भारत आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंध जरी केवळ 25 वर्षांपासूनचे असले तरी, सत्य हे आहे की भारत आणि इस्रायल शेकडो वर्षांपासून एकमेकांच्या खूप जवळ आहेत. महान भारतीय सूफी संत बाबा फरीद तेराव्या शतकात जेरुसलेम इथे आले होते, आणि त्यांनी इथल्या गुहेत दीर्घ साधना केली, असे मला सांगण्यात आले आहे. ते स्थान नंतर एक तीर्थस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही ते स्थान, भारत आणि जेरुसलेम दरम्यानच्या आठशे वर्ष जुन्या नात्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. २०११ साली इस्रायलचे केअर टेकर शेख अन्सारी यांना अनिवासी भारतीय पुरस्कार दिला गेला होता, आणि आज मला त्यांची भेट घेण्याची संधीही मिळाली. भारत आणि इस्रायलमधले हे संबंध, परंपरा आणि संस्कृतीचे संबंध आहेत, तसेच हे परस्पर विश्वास आणि मैत्रीचे संबंध आहेत. आपल्या उत्सवांमध्येही विलक्षण साम्य आहे. भारतात होळी साजरी केली जाते तर इथे परिमचा उत्सव होतो. भारतात जशी दिवाळी तसा इथे हनुकाचा सण! मला हे ऐकून अतिशय आनंद झाला की ज्यू लोकांच्या पुनरुत्थानाचे प्रतीक म्हणून मेकायव्हा खेळांचे उद्या उद्धाटन होणार आहे. मी इस्रायलच्या नागरिकांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. या खेळात सहभागी होण्यासाठी भारतातूनही चमू आला आहे, याचा मला विशेष आनंद असून, हे सर्व खेळाडू आज इथे उपस्थित आहेत. मी त्या सर्वानाही खूप खूप शुभेच्छा देतो!!

इस्रायलची ही वीरभूमी अनेक पराक्रमी सुपुत्रांच्या पराक्रमाने पावन झाली आहे. इथे या कार्यक्रमातच अशी अनेक कुटुंबे असतील, ज्यांच्याकडे या संघर्ष आणि बलिदानाच्या आपापल्या गाथा आणि प्रेरक कथा असतील. मी इस्रायलच्या या शौर्याला वंदन करतो. त्यांचे हे शौर्यच इस्रायलच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. कुठल्याही देशाचा विकास त्याच्या आकारावर नाही तर त्या देशातील नागरिकांच्या प्रेरणेवर आणि स्वतःवर असलेल्या विश्वासावर अवलंबून असतो. देशाची लोकसंख्या किंवा आकार महत्वाचा नसतो, हे इस्रायलने सिद्ध केले आहे. या प्रसंगी मी सेकंड लेफ्टनंट एलिस ऍस्टन यांनाही श्रद्धांजली वाहतो. इस्रायल सरकारने राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा शौर्य पुरस्कार देऊन सन्मान केला होता. एलिस ऍस्टन यांना 'द इंडियन' या नावानेही ओळखले जाते. ब्रिटिशकाळात त्यांनी मराठा इन्फट्रीमध्ये काम केले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात इस्रायलमधले हैफा शहराच्या मुक्तीसंग्रामात भारतीय सैनिकांचे योगदान महत्वाचे आहे. माझे हे सद्भाग्य आहे की मी उद्या या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हैफाला जाणार आहे.

काल रात्री मी माझे मित्र पंतप्रधान  नेतन्याहू यांच्याकडे जेवायला गेलो होतो. अतिशय घरगुती वातावरण होतं, आम्ही गप्पा मारत होतो. भारतीय वेळेनुसार सकाळी अडीच वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो आणि निघताना त्यांनी मला एक तसबीर भेट दिली. पहिल्या विश्व युध्दात भारतीय सैनिकांनी जेरुसेलम मुक्त केले त्यावेळचा एक हृदयस्पर्शी प्रसंग दाखवणारी ती तसबीर आहे. मित्रांनो, वीरतेच्या ह्या प्रसंगी मी भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जे एफ आर जेकब यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांचे पूर्वज बगदादहून भारतात आले होते. १९७१ मध्ये जेंव्हा बांग्लादेश पाकिस्तान पासून स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होता, तेंव्हा भारताची रणनीती तयार करण्यात आणि पाकिस्तानच्या ९०,००० सैनिकांचे आत्मसमर्पण करविण्यात लेफ्टनंट जे एफ आर जेकब यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मित्रांनो, भारतात्त ज्यू समुदायाच्या लोकांची संख्या फार कमी आहे. पण ज्याही भागात ते राहतात, तेथे त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. फक्त सैन्यच नाही तर साहित्य, संस्कृती, चित्रपट क्षेत्रात ज्यू समुदायाचे लोक आपल्या मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे आले आहेत आणि स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. मी बघतो आहे, आज ह्या कार्यक्रमाला इस्राइलच्या विविध शहरांचे महापौर देखील आले आहेत. भारत आणि भारतीय लोकांबद्दल असलेल्या प्रेमापोटी ते ह्या कार्यक्रमाला आले आहेत. मला आठवतं की भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे देखील ज्यू समाजाचे एक महापौर होऊन गेले आहेत. ही जवळपास ८० वर्ष जुनी गोष्ट आहे. जेव्हा मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे तेव्हा १९३८ मध्ये डॉ एलिजा मोजेस यांनी बॉंबेचे महापौर म्हणून गौरवपूर्ण जबाबदारी पार पडली होती.

भारतात देखील फार कमी लोकांना हे माहित असेल की आकाशवाणीची सिग्निचर ट्यून देखील श्रीमान वाल्टर कौफमन यांनी बनविली होती. ते १९३५ मध्ये बॉम्बे आकाशवाणीचे संचालक होते. ज्यू लोक भारतात राहिले आणि भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले. पण मनाने इस्राइलशीही त्यांचे बंध कायम राहिले. त्याचप्रमाणे, भारतातून जेंव्हा ते परत इस्रायलला आले, तेव्हा आपल्या सोबत भारतीय संस्कृतीची छाप घेऊन आले आणि त्यांचे आजही भारताशी बंध कायम आहेत.

मला हे ऐकून खूप आनंद झाला की इस्राइल मध्ये ‘माय बोली’ नावाच्या मराठी मासिकाचे प्रकाशन होते. माय बोली...... त्याच प्रमाणे कोचीन येथून आलेले ज्यू लोक ओणमचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. बगदाद मधून येऊन भारतात स्थायिक झालेल्या आणि भारतात पूर्वीपासून राहत असलेल्या बगदादी ज्यू समुदायातील लोकांच्या अथक प्रयत्नांमुळेच मागील वर्षी ज्यू लोकांवरचे पहिले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित होऊ शकले. भारतातून आलेल्या ज्यू समुदायाने इस्राइलच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. ह्याचं मोठं उदाहरण म्हणजे मोशाव नेवातीम. जेव्हा इस्राइलचे पहिले पंतप्रधान डेविड बेन गुरीओन यांनी वाळवंटात हिरवळ फुलविण्याचे स्वप्न बघितले तेव्हा भारतातून आलेल्या माझ्या ज्यू बांधवांनी हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवस रात्र एक केली. ज्यू समुदायाच्या लोकांनी वाळवंटात हिरवळ फुलाविण्याचे स्वप्न साकार करण्यात मदत केली. भारत आणि इस्राइलच्या धरतीवर केलेल्या ह्या अथक प्रयत्नांमुळे आज प्रत्येक भारतीय माणसाला आपल्या सर्वांचा अभिमान आहे. मला आपल्यावर अभिमान आहे. मित्रांनो, मोशाव नेवातीम शिवाय देखील भारतीय समुदायाने इस्राइलच्या कृषी विकासात आपले योगदान दिले आहे. इथे ह्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी इस्राइलचे प्रसिध्द बेझालेल एलिअहु यांना भेटलो. बेझालेल एलिअहु यांना २००५ मध्ये अनिवासी भारतीय समुदायात सन्मानित करण्यात आलं होतं. अशा प्रकारे सन्मानित होणारे ते पहिले इस्रायली व्यक्ती होते. कृषी क्षेत्रा सोबतच आरोग्य क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवला आहे. इस्राइलचे डॉ लाईल बिष्ट माझे गृह राज्य गुजरातचे आहेत. ज्या लोकांना अहमदाबाद बद्दल माहिती आहे, त्यांनी मणीनगर मधल्या वेस्ट हायस्कूलचं नाव ऐकलं असेल. ह्या वर्षी त्यांना अनिवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. डॉ लाईल बिष्ट इथले नावाजलेले हृद्य शल्यचिकित्सक आहेत. आणि त्यांची पूर्ण कारकीर्द मानव सेवेत गेली आहे. त्या बद्दल अनेक कथा आहेत. मला मीनासे समुदायाच्या नीना सांता बद्दल माहिती मिळाली. नीना बघू शकत नाही. पण इच्छाशक्ती तीच! , इस्राइलवाली. ह्या वर्षी इस्राइलच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरवात नीनानेच केली होती. ह्या कार्यक्रमात मशालवाहक पथकात नीना होती. नीना सांताची भविष्यात अशीच प्रगती होत राहो. माझ्या तिला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. आज ह्या प्रसंगी मी इस्राइलचे माजी पंतप्रधान आणि महान नेता श्री शिमोन पेरेज ह्यांना श्रद्धांजली देऊ इच्छितो. त्यांना भेटण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते. श्री शिमोन पेरेज संशोधनाचे अग्रदूत तर होतेच, पण त्याचबरोबर अफाट परिश्रम करणारे राजनीतिज्ञ देखील होते. इस्राइल सुरक्षा दलात संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण फार सुरवातीच्या काळातच दिले जाते. इस्राइल सुरक्षा दलात छोट्या छोट्या समस्यांवर  सृजनात्मक तोडगा काढण्याची पध्दत रूढ झाली आहे. नवनवीन शोध लावण्याला इस्रायल किती प्राधान्य देते ह्याचे द्योतक म्हणजे आजवर १२ इस्रायली संशोधकांना विविध क्षेत्रातील नोबेल पारितोषिके मिळाली आहेत. कुठल्याही राष्ट्राच्या विकासात संशोधनात्मक दृष्टीकोन किती महत्वाचा आहे हे इस्राइलकडे बघितल्यावर समजतं. गेल्या काही दशकांत, जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात संशोधन करून इस्रायलने जगाला अचंबित केले आले आणि आपला दरारा निर्माण केला आहे. भू औष्णिक उर्जा, सौर उर्जा, कृषी जैवतंत्रज्ञान, सुरक्षा क्षेत्र असो, कॅमेरा तंत्रज्ञान असो, कॉम्पुटर प्रोसेसर असो, ह्या सारख्या अनेक क्षेत्रात आपल्या नवनव्या संशोधनाने इस्राइलने जगातील मोठमोठ्या देशांना मागे टाकले आहे. इस्राइलला स्टार्टअप देश उगाचच म्हटलं जात नाही. त्यामागे अनेक वर्षांची तपस्या आहे. भारत आज जगातील वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (काम), ट्रांसफॉर्म (बदल) हा माझ्या सरकारचा मंत्र आहे. आत्ताच ह्या महिन्यात एक जुलैपासून भारतात वस्तू व सेवा कर लागू झाला आहे आणि त्यामुळे, गेल्या एक दशकापासून बघितले जाणारे एक देश, एक कर, एक बाजारपेठ हे स्वप्न साकार झाले आहे. मी जीएसटी ला गुड अंड सिंपल टक्स  म्हणतो. कारण आता भारतात एका वस्तूवर एकच कर लागेल. नाहीतर भारतात याआधी सगळे मिळून ५०० हून अधिक कर अस्तित्वात होते. करप्रणाली किचकट होती. इतकी की, महिन्याला एक लाख रुपयाचा व्यवसाय करणारा व्यापारी आणि महिन्याला एक लाख कोटीचा व्यवसाय करणारी कंपनी, सगळेच त्यामुळे त्रासले होते. जीएसटी मुळे भारताचे आर्थिक एकीकरण झाले आहे. जसे सरदार पटेलांनी भारतातील संस्थाने विलीन करून राजकीय एकीकरण केले, त्याचप्रमाणे, २०१७ मधे देशाची आर्थिक एकीकरण मोहीम सफल झाली आहे.

कोळसा आणि स्पेक्ट्रम यासारख्या नैसर्गिक स्रोतांचा लिलाव.. मला जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीत. कोळशाबद्दल काय काय ऐकलं आहे, स्पेक्ट्रम बद्दल काय काय ऐकलं आहे.... पण ह्या सरकारने संगणकीकृत प्रणालीने लीलावात पारदर्शकता आणली. आज लाखो कोटींचा व्यवसाय करून देखील एकही प्रश्न कुणी उपस्थित करू शकले नाही. आम्ही अर्थव्यवस्थेत पद्धतशीर सुधारणा केल्या आणि अनेक क्षेत्रात १००% पर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीची तरतूद केली आहे. आता इस्राइल मधील संरक्षण उद्योगातील लोक भारतात येऊन आपले नशीब आजमाऊ शकतात. आता संरक्षण उत्पादनात खाजगी कंपन्यांना भागीदार म्हणून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आमच्या देशात बांधकाम क्षेत्रात मध्यमवर्गीय व्यक्ती घर विकत घेत, पण नंतर अनेक तक्रारी असत. आम्ही कायदा आणून खूप मोठा बदल केला आहे. आम्ही बांधकाम क्षेत्रात १००% थेट विदेशी गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. त्याबरोबरच बांधकाम नियंत्रकाची देखील नियुक्ती केली आहे. बांधकाम क्षेत्राला सरकारने उद्योगाचा दर्जा दिला आहे जेणेकरून ह्या क्षेत्रातील कंपन्यांना देखील कमी व्याज दरावर कर्ज मिळू शकेल. माझं स्वप्न आहे की २०२२.....२०२२ आपण विसरता कामा नये. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या लोकांनी जी स्वप्ने बघितली त्यांचे पुनःस्मरण करून, नवे संकल्प करून २०२२ पर्यंत भारताला नव्या उंचीवर न्यायचे आहे. आम्ही एक निर्णय घेतला आहे. २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक गरीब कुटुंबाला स्वतःचे घर असावे. तिथे वीज आणि पाणी पुरवठा असावा, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा देऊन अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत, जेणेकरून गरीब कुटुंबाला स्वतःचे घर मिळू शकेल. विमा योजना सरकारी कंपन्यांची मक्तेदारी होती. त्यात आम्ही खाजगी कंपन्यांची स्पर्धा निर्माण केली. सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात विमा मिळावा म्हणून स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले आहे. विमा क्षेत्रातील सुधारणेअंतर्गत थेट विदेशी गुंतुवणूक २६ टक्क्यांवरून ४९ टक्के करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतला आहे.

देशाच्या बँकिंग क्षेत्रात आम्ही बॅंकांचा विलय करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर देखील सरकारने विशेष भर दिला आहे. बँकिंग क्षेत्रात नियुक्तीसाठी आम्ही वेगळा बँक भरती बोर्ड बनविला आहे. सगळी पदभरती स्वतंत्र संस्थेद्वारे केली  जाते. आम्ही अंतर्गत राजकीय हस्तक्षेप संपविला आहे. आम्ही देशांतर्गत, दोन महत्वाचे कायदे केले. नादारी आणि दिवाळखोरी कायदा यामुळे जगभरातील उद्योजकांना गुंतवणूक करण्यास नवा विश्वास मिळेल आणि बँकांना देखील एक नवी ताकद मिळेल. हा आधुनिक नादारी कायदा आहे, ह्याची गरज अनेक दशकांपासून भासत होती. आम्ही सरकारी नियम सुलभ करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. ‘किमान शासन कमाल प्रशासन’ ह्याअंतर्गत सामान्य जनतेला लालफितीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. गुंतवणूकदारांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी फार वाट बघावी लागू नये ह्या गोष्टी ध्यानात ठेऊन बदल केले जात आहेत.

एक काळ होता जेव्हा भारतात कारखाना सुरु करण्यास पर्यावरण मंजुरी घेण्यास किमान ६०० दिवस लागत असत. आज आम्ही हा वेळ कमी करून सहा महिन्यात पर्यावरण मंजुरी देण्याची सोय केली आहे. याच प्रमाणे २०१४ पूर्वी देशात एक कंपनी सुरु करण्यासाठी १५ दिवस, दोन महिने, तीन महिने लागत होते. आज दोन ते तीन आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होते. आणि आता तर परिस्थिती अशी आहे, की २४ तासात एक कंपनी सुरु होऊ शकेल अशी व्यवस्था निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे.  जर कुणी युवक स्टार्ट अप अंतर्गत आपला व्यवसाय सुरु करणार असेल तर त्याच्या कंपनीची नोंदणी केवळ एका दिवसात होऊ शकते.  दुसऱ्या विश्व युध्दात सर्वस्व गमावलेले देश आपल्या पायावर उभे राहू शकले कारण त्यांनी आपल्या तरुण पिढीच्या कौशल्य विकासावर भर दिला. आता ही सुवर्णसंधी, जगातील सर्वात तरुण देशाकडे आहे. आज भारत एक तरुण देश आहे. ६५% लोक ३५ वर्षाखालील आहेत. ज्या देशात इतके तरुण आहेत, त्या देशाची स्वप्ने देखील तरुण असतात. त्यांचे संकल्प तरुण असतात. आणि त्यांचे प्रयत्न उर्जेने भारलेले असतात. भारतात कौशल्य विकासावर भर देत देशात पहिल्यांदा स्वतंत्र कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करण्यात आले. आणि आधी २१ वेगवेगळ्या विभागात, मंत्रालायांत, ५०-५५ विभागांत ही कौशल्य विकासाची व्यवस्था चालत असे. ह्या सरकारने कौशल्य विकासाच्या विविध कार्यक्रमासाठी एक मंत्रालय बनवून त्या योजना एका मंचावर आणून सर्वसमावेशक दृष्टीकोनातून सर्वव्यापक योजनेच्या रुपात कौशल्य विकासावर भर दिला. देशभरात ६०० पेक्षा जास्त, जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उघडले जात आहेत. एका नव्या कल्पनेतून भारतीय कौशल्य संस्थानाची स्थापना करण्यात आली. भारतीय तरुणांना अंतरराष्ट्रीय स्तराचे प्रशिक्षण देण्यामागे त्यांचा स्तर जागतिक पातळीवर नेण्याचा उद्देश आहे. भारत सरकार देशात ५० भारतीय आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्रांचे जाळे सरकार तयार करणार आहे. ह्या केंद्रांत अंतरराष्ट्रीय पातळी लक्षात घेऊन उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. उद्योगांची सद्यपरिस्थिती आणि गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण मिळणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी सरकारने राष्ट्रीय उमेदवारी विकास योजना सुरु केली आहे. ह्या योजनेअंतर्गत ५० लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठरविले आहे. ह्या योजनेवर सरकार १० हजार कोटी रुपये खर्च करत आहे. कारखान्यात उमेदवारी करणाऱ्या युवकांची संख्या वाढविण्यासोबतच युवकांना उमेदवारी देणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा ह्या योजनेचा उद्देश आहे. ह्यासाठी सरकार नियोक्त्यांना देखील आर्थिक मदत देत आहे. पहिल्यांदा नोकऱ्यांना कर सवलतीशी जोडले आहे. नव्या नोकऱ्या निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांना करात सवलत देण्याची तरतूद केली आहे. युवकांमध्ये संशोधकवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोवेशन मिशन (AIM) सुरु केलं आहे. देशातील शाळांमध्ये संशोधन आणि उद्योजकतेला पोषक वातावरण बनविण्यावर जोर दिला जात आहे. आज इस्राइल इथवर आला आहे ते केवळ संशोधनाच्या बळावरच, हे मान्य करावेच लागेल. जिथे संशोधकता संपते, तिथे जीवनाची वाढ खुंटते. निर्मिती, वाहतूक, उर्जा, कृषी, बोल्टर, मलनि:स्सारण सारख्या अनेक क्षेत्रात संशोधन उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यास अटल इन्कुबेशन सेंटरची स्थापना केली आहे आणि ती उघडली जात आहेत. हे केंद्रे नव्या स्टार्ट अप उद्योगांना आर्थिक मदत देतील आणि योग्य मार्गदर्शन देखील करतील. युवकांना आपला रोजगार स्वतः सुरु करता यावा यासाठी सरकारने मुद्रा योजना सुरु केली आहे. कुठल्याही तारणाशिवाय स्वयंरोजगारासाठी युवकांना बँकेकडून कर्ज देण्याचे मोठे काम, या योजनेअंतर्गत केले जाते.  गेल्या तीन वर्षांत ८ कोटी पेक्षा जास्त खातेधारकांना ३ लाख करोड रुपयांपेक्षा जास्त कर्ज कुठल्याही तारणाशिवाय दिले आहे.

मित्रांनो, जगात कामगार सुधारणांना कधी कधीच कामगार कल्याणाशी जोडले जाते. मोठ्या मोठ्या गप्पा खूप मारल्या जातात. पण ह्या सरकारने कामगारांच्या व्यापक हितासाठी आणि विकास यात्रेला बळ देण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोनातून कामगार सुधारणा केल्या आहेत. व्यापार वाढवायला त्रास होऊ नये म्हणून नियोक्ता, कामगार आणि अनुभव या तिन्हीसाठी एका सर्वव्यापक दृष्टीकोनातून आम्ही काम करीत आहोत. काही महिन्यांपूर्वी एक मोठा बदल करण्यासाठी, कामगार कायद्याअंतर्गत व्यापाऱ्यांना ५६ रजिस्टर ठेवावे लागत. कामगार कायद्यात बदल करत ते ५६ वरून ५ वर आणण्याचा निर्णय घेतला. आता केवळ ५ रजिस्टर मधून ९ कामगार कायद्यांची पूर्तता होत आहे.

ह्याचप्रमाणे सरकारने श्रम सुविधा पोर्टल विकसित केलं आहे. श्रम सुविधा पोर्टल हे असं माध्यम आहे, ज्यात केवळ चार अहवाल देऊन व्यापारी १६ पेक्षा जास्त कामगार कायद्यांची पूर्तता एका क्षणात करू शकतात. सामान्य दुकाने आणि संस्था वर्षाचे ३६५ दिवस सुरु राहू शकतील ह्यासाठी सर्व राज्यांना सूचना देण्यात आली. १९४८ च्या कारखाना कायद्यात बदल करून महिलांना देखील रात्रपाळीत काम करण्याची सुविधा पुरविण्याच्या सूचना  राज्यांना देण्यात आल्या आहेत. भारतात विकास प्रक्रियेत जितक्या जास्त महिला सक्रियतेने सामील होतील तितकी भारताची विकास यात्रा मजबूत होईल. आणि म्हणून महिलांच्या हितासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

जगातल्या प्रगत देशांमध्ये देखील नोकरी करणाऱ्या महिलांना १२ आठवड्यांपेक्षा जास्त प्रसूती रजा मिळत नाही. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी आपल्याला विश्वास देतो की, भारतात पगारी प्रसूती रजा २६ आठवडे केली आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना सहा महिने सुट्टी मिळेल.   

अनेक श्रमिकांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर यासाठी पाणी सोडलं कारणते मिळवण्यासाठी कोण सरकारी कार्यालयात खेटे घालेल. हा पैसा भारतातील श्रमिकांचा होता. म्हणून आता सरकारने त्यांना देशभरात चालणारा एक युनिवर्सल अकाउंट नंबर दिला आहे. एक प्रकारे युनिवर्सल अकाउंट नंबर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, छोटे-छोटे मजूर कारखान्यात काम करत. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. आणि आपले जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा पैसे तिथेच सोडून जात असत. २७ करोड रुपये काहीही व्यवहार न होता, सरकारकडे नुसते पडून होते. आम्ही ही नवीन व्यवस्था निर्माण केली. आता कामगार कुठे ही गेला तरी त्याचं अकाउंट त्याच्या सोबत जाईल. आणि त्याचे पैसे त्याला नंतर मिळतील.

सध्या भारतात सर्वात जास्त विक्रमी विदेशी गुंतवणूक होत आहे. सर्वात जास्त थेट विदेशी गुंतवणूक. परदेशात राहणारे भारतीय देखील खूप परदेशी चलन भारतात पाठवत आहेत. वेगवेगळ्या देशांची क्रमवारी ठरवणाऱ्या संस्था देखील चकित झाल्या आहेत. मेक इन इंडिया हा एक असा ब्रांड बनला आहे, ज्यामुळे सगळं जग आश्चर्यचकीत झालं आहे. आज डिजिटल क्षेत्रात देखील भारत जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. भारत डिजिटल क्रांतीचं केंद्र बनत आहे. मित्रांनो, बदल म्हणजे केवळ नवे कायदे बनविणे नव्हे. देशाच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि ज्या कायद्यांची आवश्यकता नाही ते कायदे रद्द करणे हा देखील एक बदलाचाच भाग आहे. गेल्या तीन वर्षात आम्ही देशातील १२०० कायदे रद्द केले, आणखी ४० कायदे रद्द करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.  

मित्रांनो, भारतातल्या शेतकऱ्यांच्या मनगटात मातीतून सोने निर्माण करण्याची ताकद आहे. हे शेतकऱ्यांच्या श्रमाचेच फलित आहे की यावर्षी देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले. आणि यंदाही स्वतंत्र भारतातील सर्वाधिक कृषी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तम मोसमी पाऊस आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झाले आहे. वर्ष २०२२ पर्यंत देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट मनात ठेवून आमच्या सरकारचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने धोरणे बनवली जात आहेत. बियाणांपासून ते बाजारापर्यंत शेतकऱ्याला येणाऱ्या प्रत्येक समस्येचा आम्ही विचार करतो आहोत. प्रत्येक शेतात पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या ९९ सिंचन योजना निवडून, त्या निश्चित काळात पूर्ण करण्यासाठी खूप मोठा निधी गुंतवण्यात आला आहे. या योजनांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानाचाही वापर आम्ही करतो आहोत. ड्रोनचा वापर करतो आहोत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे शेतीयोग्य जमीनीला सूक्ष्मसिंचनाखाली आणण्याचे प्रमाण आता दुप्पट झाले आहे. शेतकऱ्यांना उत्तम गुणवत्तेची बी-बियाणे मिळावीत, त्यांना मातीचा कस कळावा, यासाठी आम्ही काम करतो आहोत. आतापर्यंत देशातील ८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात आली आहेत. तसेच युरियाला कडूलिंबाचे आवरण करून त्याची क्षमताही वाढवली आहे. धान्याचे उत्पादन वाढले आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला आहे. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी, ई- राष्ट्रीय कृषी बाजारपेठ म्हणजेच ‘ई-नाम’ योजना तयार केली असून तिचा वेगाने विस्तार सुरु आहे. एक राष्ट्रीय बाजारपेठ तयार केली जात आहे, सध्या देशातील ४५० पेक्षा अधिक कृषी बाजार या राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले गेले आहेत. सरकार कृषी व्यवसायातले धोके कमी करण्यासाठी काम करत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत येऊ नये, यासाठी प्रधानमंत्री कृषी विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकारने धोका विम्याची रक्कम  वाढवली आहे आणि विम्याचा हप्ता कमी केला आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे शेतकऱ्याचे उत्पादन वाढेल अशा सर्व पैलूंवर सरकार काम करत आहे.  

अन्नप्रक्रिया उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी गेल्या महिन्यात सरकारने शेतकरी संपदा योजना सुरु केली आहे. कृषीउत्पादन विक्रीसाठी योग्य बाजारपेठ सुविधा आणि पुरवठा साखळी नसल्यामुळे आपल्या देशात आजही सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या मालाचे नुकसान होते. फळे, भाज्या लोकांपर्यंत पोहचेस्तोवर खराब होतात.शेतकरी संपदा योजनेमुळे अन्नप्रक्रिया उद्योग तर मजबूत होईलच, त्यासोबत शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल आणि त्यांची मिळकत वाढेल.  

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इस्रायल आणि भारत खांद्याला खांदा लावून वाटचाल करू शकतात. भारतात दुसरी हरितक्रांती आणण्यासाठी इस्रायलची भूमिका महत्वाची ठरेल. तसेच, संरक्षण तंत्रज्ञानातही भारत आणि इस्रायलचे संबंध अधिक विकसित झाले तर दोन्ही देशांना त्याचा फायदा होईल. त्यामुळेच, शतकानुशतकांचे बंध आणि २१व्या शतकाची गरज लक्षात घेत, दोन्ही देशांनी एकत्र प्रगती साधण्याची आवश्यकता आहे. सध्या इस्रायलमधे सुमारे ६०० भारतीय विद्यार्थी विविध विषयांचा अभ्यास करत आहेत. त्यातले काही विद्यार्थी आज इथे उपस्थितही आहेत.

माझ्या युवा मित्रांनो, तुम्ही भारत आणि इस्रायलमधल्या तंत्रज्ञान आणि संशोधनाचा दुवा आहात. भविष्यात दोन्ही देशांच्या संबंधांचा मुख्य आधार विज्ञान संशोधन हाच असेल या क्वेट सान यांच्या मताशी मी आणि बेंजामिन नेतान्याहू दोघेही सहमत आहोत. त्यामुळेच आज तुम्ही इस्रायलमध्ये जे शिकत आहात, त्याचा भविष्यात भारताच्या प्रगतीसाठी उपयोग होणार आहे. काही वेळापूर्वीच माझी मोशे होत्सेबर्गशी भेट झाली. या भेटीमुळे मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती जाग्या झाल्या. मात्र जगण्याची दुर्दम्य इच्छा दहशतवादासारख्या संकटावर कशी मात करु शकते, याची प्रेरणा मला मोशेला भेटून मिळाली. स्थैर्य, शांतता आणि सद्भावना भारतासाठी जेवढी महत्वाची आहे, तेवढीच ती इस्रायलसाठीही आहे. मित्रांनो, इस्रायल मध्ये राहणारे भारतीय शौर्य आणि सद्भावनेचे प्रतीक आहेत. इथले हजारो भारतीय नागरिक वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित आयुष्य जगतात. बंगरूळू, दार्जीलिंग, आंध्रप्रदेश आणि देशातल्या अनेक भागातून इथे येऊन तुम्ही जे सेवाभावी कार्य करता आहात, त्यामुळे तुम्ही इस्रायलच्या जनतेची मने जिंकली आहेत. मी त्यासाठी तुमचे अभिनंदन करतो.  

मित्रांनो, इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला मी आज एक आनंदाची बातमी सांगणार आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयाना ओ आय सी आणि पी आय ओ कार्ड मिळवताना खूप अडचणी येतात, अशी माहिती मला देण्यात आली. मात्र जे आपल्याशी मनाने जोडलेले असतात, त्यांच्याशी असलेले नाते कुठल्या कागदावर किंवा कार्डावर अवलंबून नसते.भारत तुम्हाला कधीही ओसीआय कार्ड देण्यास मनाई करणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही आनंदाची बातमी देतो आहे. जर भारतीय ज्यू समुदायाला ओ सी आय कार्ड मिळत नसेल , तर हे कार्ड देण्याचा आमचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळेच बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विश्वास देतो की भारतीय समुदायाच्या ज्या नागरिकांनी इस्रायलच्या लष्करी सेवेत नोकरी केली असेल, त्यानाही आता ओसीआय कार्ड  मिळेल. अनिवार्य लष्करी सेवेशी संबंधित काही नियमांमुळे तुम्हाला पीआयओ कार्ड मिळण्यात अडचणी येत होत्या. आता आम्ही हे नियम सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.  

 दुसरी गोष्ट म्हणजे, दोन्ही देशांमधले सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलमध्ये भारतीय सांस्कृतिक केंद्र सुरु करण्याची मागणी होती. आज मी तुमच्यासमोर घोषणा करतो की लवकरच भारत सरकार इस्रायलमधे सांस्कृतिक केंद्र सुरु करणार आहे.  

भारत तुमच्या मनात आहे. आणि आता नव्याने सुरु होणारे भारतीय सांस्कृतिक केंद्र तुम्हाला सदैव भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवेल. आज याच प्रसंगी मी इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायासोबत इस्रायलच्या युवकांनाही आवाहन करतो , की त्यांनी मोठ्या संख्येने भारतात यावे. भारत आणि इस्रायल केवळ इतिहासाने नाही तर संस्कृतीनेही परस्परांशी जोडलेले आहेत. दोन्ही देश मानवी मूल्ये आणि मानवतेचा वारसा सांगणारे आहेत. परंपरा जपणे आणि संकटांमधून मार्ग काढत पुन्हा उभे राहणे दोन्ही देशांना माहिती आहे. याची अनेक प्रतीके भारतात आहेत आणि या ऐतिहासिक यात्रेचे साक्षीदार होण्यासाठी इस्राइलच्या युवकांनी जास्तीत जास्त संख्येने भारतात यायला हवे.   

मला पूर्ण विश्वास आहे की ‘अतिथी देवो भव’ मानणारा आमचा देश तुम्हाला नेहमीसाठी संस्मरणीय ठरतील अशा आठवणी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला प्रेरित करेल.शेवटी पुन्हा एकदा मी ज्यू समुदाय, माझे मित्र बेंजामिन नेतन्याहू आणि संपूर्ण इस्रायलचे मनापासून आभार मानतो. लवकरच दिल्ली आणि मुंबईहून तेल अविव येथे थेट विमानसेवा सुरु केली जाणार आहे. आणि म्हणूनच मी इथल्या युवकांना पुनःपुन्हा भारतात येण्याचे आमंत्रण देतो आहे.  

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !

 
PIB Release/DL/1082
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau