This Site Content Administered by
राष्ट्रपती

मावळत्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाला संबोधन

नवी दिल्ली, 24-7-2017

प्रिय नागरिकांनो,

1.      पदमुक्त होण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता, त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी माझ्‍यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी सद्‌गतीत झालो आहे. मी त्यांच्या विनम्रता आणि प्रेमाने सन्मानित झालो आहे. मी देशाला जितके दिले आहे त्याच्यापेक्षा अधिक मला प्राप्त झाले आहे. यासाठी मी भारताच्या नागरिकांचा मी सदैव ऋणी राहीन.

2.     मी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच येणाऱ्या वर्षांमध्ये त्यांना यश आणि आनंद लाभो अशा शुभेच्छा देतो.

प्रिय नागरिकांनो,

3.     आपल्या संस्थापकांनी राज्यघटनेला स्विकारण्यासोबतच लिंग, जात, समुदायाच्या बेड्या झुगारुन लावण्याची शक्ती देखील प्रदान केली. तसेच प्रदीर्घ काळापासून बांधून ठेवलेल्या इतर बेड्यांपासून ही मुक्ती मिळवून दिली. यामुळे एक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची प्रेरणा मिळाली. ज्याने भारतीय समाजाला आधुनिकेतच्या मार्गावर नेले.

4.     एका आधुनिक राष्ट्राची निर्मिती ही काही आवश्यक मूलभूत तत्वांवर जसे प्रत्येक नागरिकाला लोकशाही अथवा समान हक्क, प्रत्येक प्रदेशाला समानता आणि आर्थिक समानतेवर अवलंबून असते. वास्तविक विकासासाठी देशातल्या गरिबातील गरीब व्यक्तीला देखील असे वाटले पाहिजे की, ते या देशाच्या विकासाचा एक भाग आहेत.

प्रिय नागरिकांनो,

5.     पाच वर्षांपूर्वी जेव्ही मी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, तेव्हा केवळ शाब्दीक नाही तर मनापासून आपल्या राज्यघटनेच्या संवर्धन, रक्षण आणि संरक्षणाचे वचन घेतले. या पाच वर्षांमध्ये मला माझ्या जबाबदारीची जाणीव होती. मी देशातील विविध राज्यातल्या दौऱ्यांमधून बोध घेतला. मी महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील तरुण आणि प्रतिभासंपन्न लोकं, वैज्ञानिक, विद्वान, कायदे तज्ञ, लेखक, कलाकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. हा संवाद मला एकाग्रता आणि प्रेरणा प्रदान करतो. मी खूप प्रयत्न केलेत. मी माझ्या जबाबदाऱ्या किती यशस्वीपणे पार पाडल्या याची दखल इतिहास घेईल.

प्रिय नागरिकांनो,

6.     जसे-जसे माणसाचे वय वाढते त्याची उपदेश देण्याची सवय वाढत जाते. परंतु माझ्याकडे कोणताच उपदेश नाही. मागील 50 वर्षांच्या सार्वजनिक आयुष्याच्या दरम्यान -

भारताची राज्यघटना माझ्यासाठी पवित्र ग्रंथ होता,

भारताचे संसद माझे मंदिर ठरले आणि

भारताच्या जनतेचा सेवा करणे ही माझी अभिलाषा होती

7.     या कालावधीमध्ये मी जे सत्य आत्मसात केले आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो.

8.     भारताचा आत्मा बहुत्ववाद आणि सहिष्णुतेमध्ये वसतो. भारत केवळ भौगोलिक सत्ता नाही. यामध्ये विचार, तत्त्वज्ञान, बौद्धिकता, औद्योगिक प्रतिभा, हस्तव्यवसाय, नवउन्मेष आणि अनुभवाचा इतिहास समाविष्ट आहे. शतकांपासून विचार आत्मसात करून आपल्या समाजाचा बहुलवाद निर्माण झाला. संस्कृती, पंथ आणि भाषेमधील विविधताच भारताला विशेष बनवतात. सहिष्णुतेपासून आपल्या शक्ती मिळते. शतकांपासून ही अपल्या सामूहिक चेतेनेचे अविभाज्य अंग आहे. जन संवादाचे विविध पैलू आहेत. आपण तर्क-वितर्क करू शकतो, आपण सहमत असू शकतो किंवा असहमत. परंतु आपण विविध विचारांच्या महत्त्वपूर्ण आवश्यक अस्तित्वाला नाकारू शकत नाही. नाहीतर आपल्या विचार प्रक्रियेचे मूळ वैशिष्ट्यच लुप्त होईल.

9.     अनुकंपा आणि सहानुभूतीची क्षमता आपल्या संस्कृतीचा खरा पाया आहे. परंतु दररोज, आपण आपल्या आजूबाजूला हिंसाचार वाढत असलेला पाहतो. या हिंसाचाराच्या मुळाशी अज्ञान, भय आणि अविश्वास आहे. आपण आपला सार्वजनिक संवाद सर्व प्रकारच्या, शारीरिक आणि मौखिक हिंसाचारापासून मुक्त करायला हवा. केवळ अहिंसक समाजच लोकशाहीच्या प्रक्रियेत सर्व घटकांतील लोकांचे, विशेषतः दुर्लक्षित आणि वंचित लोकांचा सहभाग सुनिश्चित करू शकतो. सहानुभूतीपूर्ण आणि जबाबदार समाजाची निर्मिती करण्यासाठी अहिंसेची ताकद पुनर्जागृत करायला हवी.

10.  पर्यावरणाचे संरक्षण आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. निसर्ग आपल्याप्रती खूपच उदार राहिला आहे. मात्र, जेव्हा लालसा गरजेची सीमा ओलांडते, तेव्हा निसर्ग आपला प्रकोप दाखवतो. आपण नेहमी पाहतो की भारतातील काही भाग विनाशकारी पुरामुळे प्रभावित होतो, तर अन्य भाग भीषण दुष्काळाच्या गर्तेत आहे. हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर भीषण परिणाम झाला आहे. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील जाणकारांना आपल्या मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी, पाण्याची पातळी कमी होण्यापासून रोखण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन सुधारण्यासाठी लाखो शेतकरी आणि कामगारांसह काम करावे लागेल. आपल्याला सर्वाना आता एकत्रितपणे काम करावे लागेल कारण भविष्यात आपल्याला दुसरी संधी मिळणार नाही.

11.  राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारतांना मी म्हटले होते की शिक्षण हे असे माध्यम आहे जे भारताला पुढील सुवर्णयुगात घेऊन जाऊ शकते. शिक्षणाच्या परिवर्तनकारी सामर्थ्याने समाजाची पुनर्रचना करणे शक्य आहे. त्यासाठी, आपल्याला आपल्या उच्च शिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या बनवाव्या लागतील. आपल्या शिक्षण व्यवस्थेने व्यत्यय हा नियम म्हणून स्वीकारायला हवा आणि आपल्या विद्यार्थ्यांना व्यत्ययांचा सामना करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी तयार करायला हवे. आपली विद्यापीठे रट्टा मारून पाठांतर करणारे स्थान नाही तर जिज्ञासू मुलांचे सभा स्थळ बनायला हवीत. आपल्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सृजनात्मक विचार, नाविन्यपूर्ण संशोधन आणि वैज्ञानिक प्रवृत्तीला प्रोत्साहन द्यायला हवे. यासाठी चर्चा, वाद-विवाद आणि विश्लेषणाच्या माध्यमातून तर्कसंगत प्रयोगाची गरज आहे. असे गुण निर्माण करायला हवेत आणि मानसिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन द्यायला हवे.

12.  आपल्यासाठी, सर्वसमावेशक समाजाची निर्मिती विश्वासाचा एक विषय असायला हवा. गांधीजी भारताला अशा एका सर्वसमावेशक राष्ट्राच्या रूपात पाहायचे, जिथे आपल्या लोकसंख्येतील प्रत्येक घटक समानतेने नांदत आहे आणि सर्वाना समान संधी मिळत आहेत. त्यांची इच्छा होती की आपल्या लोकांनी एकजूट होऊन निरंतर व्यापक होत असलेल्या विचार अन कार्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे. वित्तीय समावेशकता न्यायसंगत समाजाच्या केंद्रस्थानी आहे. आपल्याला गरीबातील गरीब व्यक्तीला सशक्त करावे लागेल आणि आपल्या धोरणांचे लाभ रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचतील याकडे लक्ष द्यावे लागेल.

13.  निरोगी, आनंदी आणि सार्थक जीवन जगणे हा आपल्या नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. आयुष्याच्या मानवी अनुभवासाठी आनंद मौलिक आहे. आनंद हा आर्थिक आणि बिगर आर्थिक मापदंडांचा समान परिणाम आहे. सुखाचा शोध सातत्यपूर्ण विकासाच्या शोधाशी जोडलेला आहे, जो मानवी कल्याण, सामाजिक समावेशकता  आणि पर्यावरणीय स्थिरता यांचे मिश्रण आहे. दारिद्र्य निर्मूलनामुळे आनंदाला मोठे प्रोत्साहन मिळेल. शाश्वत पर्यावरणामुळे वसुंधरेच्या साधनसंपत्तीची हानी थांबेल. सामाजिक समावेशकतेमुळे प्रगतीची फळे सर्वांपर्यंत पोहचतील. सुशासन पारदर्शी, उत्तरदायी आणि सहभागी राजकीय संस्थांद्वारे लोकांना स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याची क्षमता प्रदान करेल.

माझ्या देशबांधवांनो,

14. राष्ट्रपती भवनातील माझ्या पाच वर्षांच्या काळात, आम्ही मानवी आणि आनंदी शहर बांधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सुख दिसले जे आनंद आणि अभिमानहसूं सुदृढ आरोग्य, सुरक्षिततेची भावना आणि सकारात्मक कृतींशी निगडित  आहे. आम्ही नेहमी हसतमुख राहायला शिकलो; आयुष्यावर हसणे, निसर्गाशी जोडणे आणि समुदायात सहभागी व्हायला शिकलो.  आणि मग, आम्ही आपला अनुभव परिसरांतील काही खेड्यांमध्ये विस्तारित केला. प्रवास सुरूच आहे.

माझ्या देशबांधवांनो,

15.  आता निरोप घेण्यासाठी मी तयार होत असताना, मला पुन्हा सांगायचे आहे जे मी २०१२ मध्ये  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या माझ्या पहिल्या भाषणात म्हटले होते. " या सर्वोच्च पदाचा सन्मान प्रदान करण्यासाठी, देशवासीय आणि त्यांच्या प्रतिनिधींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत, मात्र तरीही मला या गोष्टीची जाणीव आहे कि लोकशाहीमध्ये सर्वात मोठा सन्मान कुठल्याही पदात नाही तर आपल्या मातृभूमीचा, भारताचा नागरिक असण्यात आहे. आपल्या मातेसमोर  आपण सर्व मुले एकसमान आहोत आणि भारत आपल्यातील प्रत्येकाकडून ही अपेक्षा ठेवतो की राष्ट्र निर्माणच्या या कठीण कामात आपण जी भूमिका पार पाडत आहोत ती प्रामाणिकपणे, समर्पित वृत्तीने आणि आपल्या राज्य घटनेतील स्थापित मूल्यांप्रति दृढ निष्ठा कायम ठेवून असायला हवी.

16.  उद्या जेव्हा मी तुमच्याशी बोलेन, तेव्हा राष्ट्रपती म्हणून नव्हे तर तुमच्याप्रमाणेच एक सामान्य नागरिक म्हणून बोलेन, जो महानतेच्या दिशेने भारताच्या प्रगतीच्या मार्गातील तुमच्यासारखाच एक प्रवासी राहील.

धन्यवाद,

जय हिंद!

 

B.Gokhale/S.Mhatre, S.Kane/P.Kor

 
PIB Release/DL/1178
बीजी -म्हात्रे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau