This Site Content Administered by
राष्ट्रपती

देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री रामनाथ कोविंद यांचे भाषण

नवी दिल्ली, 25-7-2017

आदरणीय श्री प्रणव मुखर्जी, श्री हामिद अंसारी, श्री नरेन्द्र मोदी, श्रीमती सुमित्रा महाजन, न्यायमूर्ति श्री जे.एस. खेहर, मान्यवर, संसदेचे सन्माननीय सदस्य ,

बंधू-भगिनीनो आणि माझ्या देशबांधवानो,

भारताचा राष्ट्रपती म्हणून मला तुम्ही जी जबाबदारी दिली आहे त्यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. मी पूर्ण विनम्रतेने हे पद स्वीकारतो आहे. इथे, या मध्यवर्ती सभागृहात आल्यावर माझ्या अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी संसदेचा सदस्य होतो, आणि त्यावेळी तुमच्यापैकी अनेक लोकांसोबत मी अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली आहे. खूपदा आपण अनेक मुद्द्यांवर सहमत व्हायचो, तर कित्येकदा असहमत व्हायचो. मात्र असे असले तरी आपण एकमेकांच्या विचारांचा सन्मान करायला शिकलो. आणि हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे.

मी एका छोट्याशा गावात साध्या मातीच्या घरात वाढलो आहे. माझा हा प्रवास खूप मोठा आहे. मात्र हा प्रवास माझ्या एकट्याचा नाही, आपला देश आणि समाजाचीही हीच गाथा आहे. अनेक आव्हानांनंतरही आपल्या देशात, संविधानाच्या प्रस्तावात उल्लेख केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांचे पालन केले जाते. आणि मीही या मूलमंत्राचे सदैव पालन करत आलो आहे.

या महान राष्ट्रातील १२५ कोटी नागरिकांना मी वंदन करतो, आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आहे, तो मी सार्थ करुन दाखवेन असे मी वचन देतो. मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की मी डॉक्टर राजेन्द्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माझ्या आधीचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्यांना आपण सगळे प्रेमाने प्रणबदाम्हणतो, त्यांच्यासारख्या महान नेत्यांच्या पाउलखुणावर वाटचाल करतो आहे.

मित्रानो,

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या दीर्घ लढ्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यानंतर सरदार पटेल यांनी एकीकरणातून हा देश एकसंध केला. आपल्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार, बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांमध्ये मानवाची प्रतिष्ठा आणि लोकशाही मूल्ये रुजवलीत.

केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून ते समाधानी नव्हते तर त्यांच्यासाठी, आपल्या कोट्यवधी लोकांना आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे, हे उद्दिष्ट अधिक महत्वाचे होते. 

आता देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आहेत. आपण २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात पोहोचलो आहे. आणि हे शतक भारताचे शतक असेल असा आपल्या सर्वाना विश्वास आहे. भारताची यशस्वी वाटचाल, या शतकाची दिशा आणि स्वरूप निश्चित करेल. आम्हाला एक असा भारत घडवायचा आहे, जो आर्थिक नेतृत्वासोबतच, जगासमोर नैतिक आदर्शही प्रस्थापित करेल. आपल्यासाठी हे दोन निकष कधीच वेगळे असू शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत आणि जोडलेल्याच राहतील.

मित्रानो,

आपल्या देशाच्या यशाचा मंत्र, त्याची विविधता हा आहे. विविधता हाच आम्हाला अद्वितीय बनवणारा आधार आहे. या देशात आपल्याला, राज्य आणि प्रदेश, पंथ, भाषा, संस्कृती, जीवनशैली या सगळ्या वैविध्यांचे मिश्रण बघायला मिळते. आपण खूप वेगवेगळे आहोत, मात्र तरीही आपण एक आहोत, एकत्र आहोत.

एकविसाव्या शतकातला भारत, एक असा भारत असेल, जो आपल्या प्राचीन मूल्यांची कास धरून चौथ्या औद्योगिक क्रांतीचा विस्तार करेल. यात कुठलाही विरोधाभास नाही आणि ना कुठल्या शंका-कुशंका उपस्थित होत आहेत. आपल्याला आपल्या परंपरा आणि तंत्रज्ञान, प्राचीन भारताचे ज्ञान आणि आताच्या भारताचे विज्ञान हे सोबत घेऊन चालायचे आहे.

एकीकडे, ग्रामपंचायत पातळीवर सामुदायिक भावनेतून चर्चा आणि संवादातून समस्या सोडवल्या जातील. त्याचवेळी दुसरीकडे, डिजिटल राष्ट्र आपल्याला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचण्यास मदत करेल. आपल्या राष्ट्रीय प्रयत्नांचे हे दोन महत्वाचे स्तंभ आहेत.

कोणतेही सरकार एकटे राष्ट्रनिर्मिती करू शकत नाही. सरकार आपल्याला सहायक, पूरक असू शकते, समाजातील उद्योगी आणि सृजनात्मक प्रवृतीना दिशा देण्याचे, प्रेरणा देण्याचे काम सरकार करू शकते, मात्र राष्ट्रनिर्मितीचा खरा आधार आहे राष्ट्रीय गौरव:

- आम्हाला अभिमान आहे -भारताची माती आणि पाण्याचा;

- आम्हाला अभिमान आहे -भारताच्या विविधतेचा, सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक विचरसरणीचा;

- आम्हाला अभिमान आहे - भारताची संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा;

- आम्हाला अभिमान आहे- देशातल्या प्रत्येक नागरिकचा;

- आम्हाला अभिमान आहे - आमच्या कर्तव्यपालनाचा, आणि

-आम्हाला अभिमान आहे - आपण दररोज करत असलेल्या प्रत्येक छोट्या- छोट्या कामाचा. 

मित्रानो,

देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माता आहे.आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती भारतीय परंपरा आणि मूल्यांचा रक्षणकर्ता आहे. आणि हाच वारसा आपण येणाऱ्या पिढ्यांकडे सोपवणार आहे.

- देशाच्या सीमांचे रक्षण करणारी आणि आपल्याला सुरक्षित ठेवणारी सशस्त्र सैन्य दले, राष्ट्रनिर्माता आहेत

- दहशतवाद आणि गुन्हेगारीशी लढणारे पोलीस आणि निमलष्करी जवान राष्ट्रनिर्माता आहेत.

- तळपत्या उन्हात घाम गाळून देशातल्या जनतेसाठी अन्न पिकवणारा शेतकरी राष्ट्रानिर्माता आहे. आणि आपण हे कधीच विसरू नये की शेतात खूप मोठ्या संख्येने स्त्रियाही काम करतात.

- जे वैज्ञानिक चोवीस तास अखंड परिश्रम करतात आहेत, जे आपल्या अंतराळ मोहिमेला मंगळापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहेत किंवा कुठल्या लसीचा शोध लावत आहेत, ते राष्ट्रनिर्माता आहेत.  

-ज्या परिचारिका किंवा डॉक्टर, दुर्गम भागातल्या एखाद्या गावात दुर्धर आजाराने ग्रस्त अशा रुग्णांची सेवा करून त्यांच्यावर उपचार करत आहेत, ते राष्ट्रनिर्माता आहेत. 

-ज्या तरुणाने स्वतःचा छोटासा स्टार्ट अप व्यवसाय सुरु केला आहे आणि जो आता इतरांना रोजगार देतो आहे, तो राष्ट्रनिर्माता आहे. हे स्टार्ट- अप काहीही असू शकते. आंब्याच्या एखाद्या छोट्या शेतात लोणचे बनवण्याचा उद्योग असो, विणकरांच्या एखाद्या गावात गालीचा बनवण्याचे काम असो, किंवा मग एखाद्या प्रयोगशाळेत सुरु असलेले नवनवीन प्रयोग असोत. 

- हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जे आदिवासी किंवा सर्वसामान्य नागरिक आपले पर्यावरण, आपली जंगले, वन्यजीवांचे रक्षण करत आहेत, जे लोक अक्षय उर्जेच्या वापराला, महत्वाला प्रोत्साहन देत आहेत ते सगळे राष्ट्रनिर्माता आहेत.

-जे वचनबद्ध लोकप्रतिनिधी आणि प्रशासक पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्यपालन करत आहेत, मग कुठे पाणी साठलेल्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित करणारे, तर कुठे एखाद्या टेबलवर फाईलींचे कामा करणारे, ते ही राष्ट्रनिर्माता आहेत.

-जे शिक्षक निस्वार्थ भावनेने युवकांना दिशा देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे, त्यांचे भविष्य घडवण्याचे काम करत आहेत,ते राष्ट्रनिर्माते आहेत.

-ज्या असंख्य स्त्रिया, घरी आणि बाहेर, सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडत आपल्या कुटुंबाचीही काळजी घेता आहेत, मुलांना देशाचे भावी आदर्श नागरिक बनवण्यासाठी झटत आहेत, त्या सगळ्या स्त्रिया राष्ट्रनिर्मात्या आहेत.

मित्रानो,

-देशाचे नागरिक ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आपले प्रतिनिधी निवडतात. या प्रतीनिधीच्या मार्फत आपल्या आस्था आणि अपेक्षा पूर्ण होण्याची शा करतात. नागरिकांच्या अपेक्षा, आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हेच लोकप्रतिनिधी आपले आयुष्य राष्ट्राच्या सेवेत घालवतात.

-मात्र आपले हे प्रयत्न केवळ आपल्यापुरते मर्यादित नाहीत. शतकानुशतके भारताने वसुधैव कुटुंबकम, म्हणजे, ‘हे विश्वचि माझे घर या विचारांवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे भगवान बुद्धांच्या या भूमीने आता शांतीची स्थापना आणि पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणे यथोचित ठरेल.

आज संपूर्ण जगात भारताच्या दृष्टीकोनाला महत्व आहे. सगळे जग भारतीय संस्कृती आणि परंपरांकडे आकर्षित झाले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जागतिक समुदायाचे भारताकडे लक्ष आहे. मग तो दहशतवाद असो की काळ्या पैशांचे व्यवहार किंवा मग हवामान बदलाच्या समस्या असोत. जागतिक संदर्भात आपल्या या जबाबदाऱ्या देखील जागतिक झाल्या आहेत.

हीच भावना आपल्याला आपल्या जागतिक कुटुंबाशी, परदेशात राहणाऱ्या आपल्या स्नेह्यांशी, सहकाऱ्यांशी आणि जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात राहून आपला ठसा उमटवणाऱ्या अनिवासी भारतीयांशी जोडते.हीच भावना आपल्याला इतर देशांना मदत करण्यासाठी प्रेरित करते, आंतरराष्ट्रीय सौरउर्जा सहकार्य विस्तारण्याचा मुद्दा असो किंवा मग नैसर्गिक संकटांच्या वेळी, सर्वात आधी आपण मदतीला पुढे जातो.

एक राष्ट्र म्हणून आपण आतापर्यंत खूप काही साध्य केले आहे. मात्र यापेक्षाही अधिकाधिक मिळवण्याचे प्रयत्न, या प्रयत्नांना गती देण्याची इच्छाशक्ती आणि हे प्रयत्न पुढेही निरंतर सुरु रहायला हवेत. २०२२ साली भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या दृष्टीनेही आपले हे निरंतर प्रयत्न महत्वाचे आहेत.  आपल्याला याचे नेहमीच भान ठेवावे लागेल की आपल्या या प्रयत्नांचे लाभ समाजरचनेत शेवटच्या रांगेत उभे असलेल्या व्यक्तीपर्यंत, त्याच्या गरीब कुटुंबांपर्यंत, त्यातल्या सर्वात शेवटच्या मुलीपर्यंत पोहोचतील. या विकासातून त्यांच्यासाठी नव्या संधी आणि अपेक्षांची दारे खुली होतील. आपले हे प्रयत्न शेवटच्या गावातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचायला हवेत. यात न्यायव्यवस्थेच्या प्रत्येक पातळीवर, वेगाने आणि माफक खर्चात न्याय देणारी व्यवस्था पण सामावली जायला हवी

मित्रानो,

या देशाचा नागरिक हाच आमच्यासाठी उर्जेचा मूळ स्त्रोत आहे. राष्ट्रसेवा करण्यासाठी मला याच सर्वसामान्य नागरिकांकडून प्रेरणा मिळत राहील अशी मला खात्री आहे.

आपल्याला वेगाने विकसित होणारी एक मजबूत अर्थव्यवस्था, एक सुशिक्षित, नीतीमान आणि एकत्रित समुदाय, समान मूल्ये असलेला आणि समान संधी देणारा समाज निर्माण करायचा आहे. एक असा समाज, ज्याचे स्वप्न महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पहिले होते. हे आपल्या मानवी मूल्यांसाठी देखील महत्वाचे आहे. हा आपल्या स्वप्नातला भारत असेल. एक असा भारत, जो सर्वाना निश्चितपणे समान संधी देईल. एकविसाव्या शतकातला भारत हा असाच भारत असेल.  

तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !!

जय हिंद ! वंदे मातरम् !!

 
PIB Release/DL/1182
बीजी -राधिका -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau