This Site Content Administered by
राष्ट्रपती

भारतीय प्रजासत्ताक दिन 2017 च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली, 25-1-2017

प्रिय देशबांधवांनो,

·         आपल्या देशाच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला, मी भारतातील आणि  परदेशात वास्तव्य करत असलेल्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा  देतो. मी सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि आंतरिक सुरक्षा दलांना विशेष शुभेच्छा देतो. भारताच्या सार्वभौत्वाच्या रक्षणासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपल्या  प्राणांची आहुती दिली त्या सर्व शूर सैनिक आणि सुरक्षा रक्षकांना मी श्रध्दांजली अर्पित करतो.

बंधू आणि भगिनींनो,

·         15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कोणतेही शासकीय दस्तावेज नव्हते.  आम्ही 27 जानेवारी 1950 पर्यंत प्रतिक्षा  केली, जेव्हा भारतीय जनतेने त्याच्या सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वतंत्रता, समानता तसेच लैंगिक आणि आर्थिक समानतेसाठी स्वत:ला एक संविधान सुपूर्द केले. आम्ही बंधुभाव, व्यक्ती स्वातंत्र्य आणि देशाची एकता आणि अखंडतेला प्रोत्साहित करण्याचे वचन दिले.

त्या दिवशी आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयाला आलो.

·         लोकांचा विश्वास आणि वचनबध्दतेने आपल्या संविधानाला जीवन प्रदान केले आणि आपल्या देशातील प्रादेशिक असंतुलन आणि पायाभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या एका मोठया  वर्गातील  एक गरीब  अर्थव्यवस्थेच्या सर्व समस्यांना सामोरे जात आपल्या देशाच्या संस्थांपकांनी बुध्दिचातुर्याने  एका नवीन राष्ट्राला जन्म दिला.

·         मागील साडे सहा दशकांपासून भारतीय लोकशाहीमधील अशांत क्षेत्रांमध्ये स्थैर्याचे मरुद्‌यान फुलवण्याचे श्रेय आपल्या संस्थांपकांनी लोकशाहीच्या मजबूतीसाठी स्थापन केलेल्या संस्थांना जाते. 1951 च्या 36 कोटी  लोकसंख्येच्या तुलनेत  आता आपला देश 1.3 अब्ज लोकसंख्येचे मजबूत राष्ट्र झाले आहे. याव्यतिरिक्त, आपल्या दरडोई उत्पनात 10 पटीने वृध्दी झाली आहे. गरिबीच्या प्रमाणात दोन तृतीयांशाने घट झाली आहे, सरासरी आयुष्यमान  दुपटीहून अधिक झाले आहे आणि साक्षरता दरात चार पटीने वाढ झाली आहे. आज आपण जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहोत. आपण वैज्ञानिक आणि तांत्रिक जनशक्तीचे दुसरे सर्वात मोठे स्रोत आहोत तर तिसरे सर्वात मोठे लष्कर, अण्वस्त्र समूहाचे  सहावे सदस्य, अंतराळ मोहिमांच्या शर्यतीत  दाखल झालेले सहावे सदस्य आणि दहावी सर्वात मोठी औद्योगिक शक्ती आहोत. भारत अन्नधान्य आयात करणाऱ्या एका देशापासून आता खाद्य वस्तूंचा  एक मोठा निर्यातक बनला आहे.  आतापर्यंतचा हा प्रवास अनेक घडामोडींनी भरलेला आहे कधी तो त्रासदायक होता तर अधिकांश वेळा तो आनंददायकच होता.

·         आपण जसा आतापर्यंतचा यशस्वी  प्रवास केला तसाच तो  यापुढे ही सुरुच ठेवू, पंरतू आपल्याला काळानुरुप तत्परतेने आणि काळजीपूर्वक आपल्या व्यवहारात परिवर्तन करायला शिकले पाहिजे. प्रगतीशील आणि वृध्दिंगत विकासात  विज्ञान तंत्रज्ञानामुळे आलेल्या मोठया  अडचणींवर मात केली पाहिजे. मनुष्य  आणि यंत्रे या दोहोंच्या शर्यतीत जिंकणाऱ्याने  रोजगार निर्मिती  केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा   अवलंब करताना आपल्याला अशा काम करणाऱ्या लोकांची आवश्कता आहे जे नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वत:मध्ये  त्याप्रमाणे बदल घडवून आणण्यास इच्छूक असतील. आपल्या शिक्षण प्रणालीने  नाविन्यासोबत हातमिळवणी केली पाहिजे जेणेकरुन आपला युवा वर्ग आयुष्यभर  शिकण्यासाठी  तयार राहिल.

प्रिय देशबांधवांनो,

·         जागतिक आर्थिक स्थिती  आव्हानात्मक असतानाही आपली अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. 2016-17 च्या सहामाहीमध्ये मागील वर्षाप्रमाणेच अर्थव्यवस्थेच्या विकास दरात वृध्दी  होऊन तो 7.2 टक्के  झाला आहे. आणि यात निरंतर विकास दिसत आहे. आर्थिक दृढतेच्या  पथावर आपण मजबूतीने  मार्गक्रमण करत असून आपला चलनफुगवटयाचा दर योग्य स्थितीत आहे. असे असले तरीही, आपल्या निर्यातीमध्ये अजून गती यायला वेळ आहे, परंतु मोठया परकीय गंगाजळीसह एक स्थिर बाहय क्षेत्र कायम ठेवले आहे.

·         काळा पैसा  आणि भ्रष्टाचाराविरुध्दच्या लढयामध्ये घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळासाठी आर्थिक व्यवहारांमध्ये मंदी येऊ शकते. अधिकाधिक आर्थिक व्यवहार रोकड विरहित  झाले तर अर्थव्यवस्थेतील  पारदर्शकता वाढेल.

बंधू आणि भगिनींनो,

·         स्वतंत्र भारतात जन्मलेल्या  तीन पिढयांकडे वसाहतवादाच्या इतिहासातील वाईट अनुभव नाहीत. या पिढयांना या स्वतंत्र देशात शिक्षण प्राप्त करण्याचे  संधींचा लाभ घेण्याचे आणि एका स्वतंत्र देशात आपली स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य मिळाले आहे. यामुळे कधी कधी स्वातंत्र्याला  महत्व न देणे, असामान्य पुरुष आणि महिलांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेले बलिदान  विसरणे आणि स्वातंत्र्याच्या या वृक्षाची नेहमी देखरेख आणि  पोषण करणे या सर्व बाबी विसरणे त्यांच्यासाठी खूप सहज आहे. लोकशाहीने  आपल्या सर्वांना अधिकार दिले आहेत. परंतू या अधिकारांसोबत जबाबदारी देखील येते जी पार पाडायची असते. गांधीजींनी सांगितले होते, स्वातंत्र्याच्या सर्वोच्च पातळीसोबत कठोर शिस्त आणि विनम्रता  येते. शिस्त आणि विनम्रतेसोबत येणाऱ्या स्वातंत्र्याला आपण नाकारु शकत नाही, अनियंत्रित स्वच्छंदीपणा हे असभ्यतेचे लक्षण आहे,  जे आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी तितकेच हानिकारक आहे.

प्रिय देशबांधवांनो,

·         आजच्या युवकांमध्ये आशा आणि आकांक्षा ओतप्रोत भरल्या आहेत. ते त्यांच्‍या आयुष्यातील उद्दिष्टांचा समर्पित भावनेने पाठपुरावा करतात, त्यांच्याबाबत त्यांना वाटते की, ती प्रसिध्दी, यश आणि आनंद घेऊन येतील. ते आनंदाला अस्तित्वाचा उद्देश मानतात, जे स्वाभाविक आहे. ते रोजच्या आयुष्यातील  भावनांच्या  चढ-उतारात  आणि त्यांच्यासाठी त्यांनी निश्चित केलेल्या  उद्दिष्टांच्या पूर्तीमध्ये आनंद शोधतात. ते नोकरीबरोबरच जीवनाचा उद्देशदेखील शोधतात. संधींच्या कमतरतेमुळे ते निराश आणि दु:खी होतात, ज्यामुळे त्यांच्या वागणुकीत, संताप, चिंता, तणाव, विचलितपणा निर्माण होतो. लाभदायक रोजगार, समाजाबरोबर सक्रीय संबंध पालकांचे मार्गदर्शन आणि जबाबदार समाजाकडून सहानुभूतिपूर्वक प्रतिसादाच्या माध्यमातून, त्यांच्यात समाजाभिमुख वृत्ती निर्माण करुन त्याचा समाना करता येईल.

बंधू आणि भगिनींनो,

·         माझ्यापूर्वी येथे काम करणाऱ्यांपैकी एकाने माझ्या टेबलवर एक वाक्य  फ्रेम करुन ठेवलेले आहे, त्यात लिहिले आहे, शाांतता आणि युध्दात सरकारचा उद्देश सत्ताधारी आणि जातींचा महिमा नव्हे तर सामान्य माणसाचा आनंद आहे. आनंद हा जीवनाच्या मानवी अनुभवाचा आधार आहे. आनंद आर्थिक आणि बिगर-आर्थिक निकषांचा समान परिणाम आहे. सुखाचा शोध शाश्वत विकासाशी घट्ट  जोडलेला आहे, ज्यामध्ये मानव कल्याण, सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समावेश आहे. आपल्या लोकांचा आनंद आणि कल्याण यांना आपण आपल्या सार्वजनिक धोरणाचा आधार बनवायला हवे.

·         समाजाच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने   सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश गांधीजींच्या 150 व्या जयंतीपर्यंत  2 ऑक्टोबर 2019 पर्यंत  भारताला स्वच्छ बनवणे हा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी मनरेगा सारख्या कार्यक्रमांवरील वाढीव खर्चामुळे रोजगार निर्मितीत वाढ होत आहे. 110 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलेल्या आधारामुळे थेट लाभ हस्तांतरण, गळती रोखणे आणि पारदर्शकता  सुधारायला मदत होत आहे. डिजिटल आराखडयाची  सार्वत्रिक तरतूद आणि रोकड विरहित आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून ज्ञानपूर्ण अर्थव्यवस्था निर्माण करत आहे.  स्टार्ट-अप इंडिया आणि अटल नाविन्यता अभियानसारखे उपक्रम नाविन्यता आणि नवीन युगाच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देत आहेत. कौशल्य भारत उपक्रमांतर्गंत,  राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान 2022 पर्यंत 30 कोटी युवकांना कुशल बनवण्याचे काम करत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

·         भारताचा बहुवाद आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक वैविध्य आपली सर्वात मोठी ताकद आहे, असा मला ठाम विश्वास आहे. आपल्या परंपरेने नेहमीच असहिष्णु भारतीया ऐवजी तर्कवादी भारतीयांची प्रशंसा केली आहे.  आपल्या देशात शतकानुशतके विविध मते, विचार आणि तत्वज्ञानाने परस्परांशी शांततापूर्ण स्पर्धा केली आहे. लोकशाही बहरण्यासाठी बुध्दिमान आणि  विवेकपूर्ण मानसिकतेची गरज आहे. एका सुदृढ  लोकशाहीसाठी, विचारांच्या एकतेपेक्षाही, सहिष्णुता, धैर्य आणि दुसऱ्यांचा  आदर या मूल्यांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. ही मूल्ये प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि मनात असायला हवीत, ज्यामुळे त्यांच्यात सामंजस्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होईल.

प्रिय देशबांधवांनो,

·         आपली  लोकशाही कोलाहलपूर्ण आहे. तरीही आपल्याला, अधिक लोकशाही हवी आहे, कमी नाही. आपल्या लोकशाहीची ताकद या तथ्यातून दिसून येते, की 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक  निवडणुकांमध्ये एकूण 83 कोटी 40 लाख मतदारांपैकी, 66 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले  आपल्या लोकशाहीचा विशाल आकार आपल्या पंचायती राज संस्थांमध्ये होत  असलेल्या नियमित निवडणुकांमधून झळकतो. आणि तरीही, आपल्या विधीमंडळांना व्यत्ययामुळे अधिवेशनांचे नुकसान सोसावे  लागते, त्याउलट त्यांनी महत्वपूर्ण मुद्दयांवर चर्चा करायला हवी आणि महत्वपूर्ण कायदे करायला हवेत. वाद, चर्चा आणि निर्णय प्रक्रियेवर पुन्हा भर देण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत.

·         आपला प्रजासत्ताक 68 व्या वर्षात प्रवेश करत असताना, आपली व्यवस्था योग्य नसल्याचे आपण स्वीकारायला हवे. त्रुटी ओळखून त्या सुधारायला हव्यात. स्थायी  आत्म समाधानावर  प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवे. विश्वासाचा पाया मजबूत करायला हवा. निवडणूक सुधारणांवर रचनात्मक वाद-विवाद करणे आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमधील परंपरेकडे पुन्हा वळण्याची वेळ आली आहे, जेव्हा लोकसभा आणि राज्य विधान सभांच्या निवडणुका एकाचवेळी आयोजित केल्या जायच्या. राजकीय पक्षांबरोबर सल्ला-मसलत  करुन हे काम पुढे नेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.

प्रिय देशबांधवांनो,

·         काटयाची स्पर्धा असलेल्या जगात, आपण आपल्या  जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी  पूर्वीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल.

·         आपल्याला अधिक परिश्रम घ्यावे लागतील कारण गरीबी विरोधातील युध्द अद्याप संपलेले नाही. आपल्या अर्थव्यवस्थेला अजूनही गरीबीवर जोरदार घाला घालण्यासाठी दीर्घकाळ 10 टक्क्यांहून अधिक दराने विकास करावा लागेल. आपल्या देशबांधवांपैकी एक-पंचमांश अजूनही दारिद्रयरेषेखाली आहेत.  प्रत्येकाच्या डोळयांमधील अश्रूचा प्रत्येक थेंब पुसण्याचे गांधीजींचे अभियान अजूनही अपूर्णच आहे.

·         आपल्या जनतेला अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी निसर्गाच्या लहरीपणानुसार कृषी क्षेत्राला लवचिक बनवण्यासाठी, आपल्याला अधिक परिश्रम करावे लागणार आहेत.  आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी चांगल्या दर्जाचे जीवनमान सुनिश्चित  करण्यासाठी त्यांना उत्तम सुविधा आणि संधी पुरवाव्या लागतील.

·         जागतिक दर्जाच्या निर्माण  आणि सेवा क्षेत्रांच्या निर्मितीच्या माध्यमातून आपल्या युवकांना रोजगाराच्या अधिक संधी पुरवण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करायचे आहेत. दर्जा, उत्पादकता आणि कार्यक्षमता यावर भर देऊन देशांतर्गत उद्योगाची स्पर्धात्मकता सुधारावी लागले.

·         आपल्या महिलांना आणि मुलांना संरक्षण आणि  सुरक्षा पुरवण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करायचे आहेत. महिलांना सन्मानाने आणि आदराने जीवन  जगण्यासाठी  सक्षम बनवायला हवे. मुलांना त्यांचे बालपण मजेत घालवता यायला हवे.

·         पर्यावरणीय आणि परिसंस्थेतील प्रदूषण  वाढवणाऱ्या आपल्या उपभोगाच्या पध्दती बदलण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करायचे आहेत. पूर, भूस्खलन आणि दुष्काळ स्वरुपातील प्रकोप रोखण्यासाठी आपल्याला निसर्गाला शांत करावे लागेल.

·         अजूनही काही स्वार्थी  तत्व आपल्या बहुविध संस्कृती आणि सहिष्णुतेची परिक्षा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला अधिक परिश्रम केले पाहिजेत. अशा परिस्थितींचा सामना करताना तर्क आणि संयम आपले मार्गदर्शक असले पाहिजेत.

·         दहशतवादासारख्या वाईट शक्तींना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम केले पाहिजेत.  या शक्तींचा दृढ आणि निर्णायक पध्दतीने सामना केला पाहिजे. आपल्या विरोधात असणाऱ्या या शक्तींचा विस्तार रोखला पाहिजे.

·         आंतरिक आणि बाहय धोक्यांपासून आपले संरक्षण करणाऱ्या आपल्या सैनिक आणि सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाची आपण खात्री दिली पाहिजे.

·         आपल्याला अजून परिश्रम करायचे आहे. कारण, आपण सर्व आपल्या आईची समान मुले आहोत  आणि आपली मातृभूमी आपल्या प्रत्येकाला मग आपण कोणतीही भूमिका बजावत असलो तरीही, आपल्या संविधानातील मूल्यांनुसार, निष्ठा, समर्पण आणि खरेपणासह आपले कर्तव्य बजावायला सांगते.

जय हिंद !

 

 

B.Gokhale/S.Kane/S.Mhatre/Anagha

 
PIB Release/DL/131
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau