This Site Content Administered by
राष्ट्रपती

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (14 ऑगस्ट, 2017) माननीय राष्ट्रपतींचा राष्ट्राला उद्देशून संदेश

नवी दिल्ली, 14-8-2017

राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी झालेल्या माझ्या प्रिय देशबांधवांनो,

स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या देश ७0 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. याच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो.

15 ऑगस्ट,1947 रोजी आपला देश स्वतंत्र राष्ट्र बनले होते. सार्वभौमत्व मिळवण्याबरोबरच त्याच दिवसापासून देशाचे भवितव्य ठरवण्याची जबाबदारी देखील ब्रिटिश राजवटीच्या हातातून निघून आपणा भारतवासीयांकडे आली होती. काही लोकांनी या प्रक्रियेला 'सत्तेचे हस्तांतरण' देखील म्हटले होते.

मात्र प्रत्यक्षात ते केवळ सत्तेचे हस्तांतरण नव्हते. तो एका खूप मोठ्या आणि व्यापक बदलाचा क्षण होता. तो आपल्या संपूर्ण देशाचे स्वप्न साकार होण्याचा क्षण होता-ती स्वप्ने जी आपल्या पूर्वजांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिली होती. आता आपण एका नवीन राष्ट्राची कल्पना करण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी स्वतंत्र होतो.

आपल्यासाठी हे समजून घेणे खूप आवश्यक आहे की स्वतंत्र भारताचे त्यांचे स्वप्न आपली गावं, गरीब आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न होते.

स्वातंत्र्यासाठी आपण त्या अगणित स्वातंत्र्य सैनिकांचे ऋणी आहोत ज्यांनी यासाठी बलिदान दिले होते.

कित्तूरची राणी चेन्नमा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारत छोडो आंदोलनातील शहीद मातंगिनी हाजरा यांच्यासारख्या वीरांगनांची अनेक उदाहरणे आहेत.

मातंगिनी हाजरा अंदाजे ७० वर्षाची वृद्ध महिला होती. बंगालमधील तामलुक येथे एका शांततापूर्ण विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व करताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांना गोळी मारली होती. 'वंदे मातरम्' त्यांच्या तोंडून निघालेले शेवटचे शब्द होते आणि भारताचे स्वातंत्र्य त्यांच्या मनात वसलेली अंतिम इच्छा होती.

देशासाठी प्राण पणाला लावणारे सरदार भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, आणि बिरसा मुंडा यांच्यासारख्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांना आपण कधीही विसरू शकत नाही.

स्वातंत्र्याच्या लढाईच्या प्रारंभापासूनच आपण भाग्यवान ठरलो आहोत. कारण देशाला मार्ग दाखवणाऱ्या अनेक महापुरुषांचा आणि क्रांतिकारकांचा आपल्याला आशिर्वाद लाभला आहे.

त्यांचा उद्देश केवळ राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करणे हा नव्हता. महात्मा गांधींनी समाज आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणावर भर दिला होता. गांधीजींनी जी तत्वे स्वीकारण्याबाबत म्हटले होते, ते आपल्यासाठी आजही प्रासंगिक आहे.

राष्ट्रव्यापी सुधारणा आणि संघर्षाच्या या अभियानात गांधीजी एकटे नव्हते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी जेव्हा 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' असे आवाहन केले तेव्हा हजारो-लाखो भारतवासियांनी त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची लढाई लढताना आपले सर्वस्व अर्पण केले.

नेहरूजींनी आपल्याला शिकवले की, शतकांपूर्वीचा वारसा आणि परंपरा, ज्याचा आपल्याला आज देखील अभिमान आहे, या बरोबर जर तंत्रज्ञानाची जोड दिली तर विकासाला पोषक ठरतील  आणि त्या परंपरा आधुनिक  समाजाच्या निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये सहायक ठरू शकतील .

सरदार पटेलांनी आपल्याला राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या महत्वाप्रती जागरूक केले, त्याचबरोबर त्यांनी हे देखील समजावले की शिस्त-युक्त राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे काय?

बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी राज्य घटनेच्या चौकटीत राहून काम करणे आणि ‘कायद्याच्या शासनाच्या’ अनिवार्यतेबाबत समजावले. त्याचबरोबर, त्यांनी शिक्षणाच्या मूलभूत महत्वावर देखील भर दिला.

अशा प्रकारे मी देशाच्या काही महान नेत्यांची उदाहरणे दिली आहेत. मी तुम्हाला आणखी देखील अनेक उदाहरणे देऊ शकतो. आपल्याला ज्या पिढीने स्वातंत्र्य मिळवून दिले, तिची व्याप्ती खूप व्यापक होती, त्यात खूप वैविध्य देखील होते. त्यामध्ये महिला देखील होत्या आणि पुरुष देखील, ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रांचे आणि विविध राजकीय आणि सामाजिक विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व केले होते.

आज देशासाठी आपल्या आयुष्याचे बलिदान देणाऱ्या अशा वीर स्वातंत्र्य सैनिकांपासून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याची वेळ आहे. आज देशासाठी काही तरी करून दाखवण्याच्या त्याच भावनेने राष्ट्र निर्माणात सातत्याने सहभागी होण्याची वेळ आहे.

नैतिकतेवर आधारित धोरणे आणि योजना लागू करण्यावर त्यांचा भर, एकता आणि शिस्त यावर त्यांचा दृढ विश्वास, वारसा आणि विज्ञानाच्या समन्वयात त्यांची आस्था, कायद्यानुसार शासन आणि शिक्षणाला प्रोत्साहन या सर्वांच्या मुळाशी नागरिक आणि सरकार दरम्यान भागीदारीची कल्पना होती.

हीच भागीदारी आपल्या राष्ट्र-निर्माणाचा आधार राहिली आहे- नागरिक आणि सरकार यांच्यातील भागीदारी, व्यक्ती आणि समाज दरम्यान भागीदारी, कुटुंब आणि एका मोठ्या समुदाया दरम्यान भागीदारी.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

माझ्या लहानपणी पाहिलेली गावांची एक परंपरा मला आजही लक्षात आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबात मुलीचे लग्न असायचे, तेव्हा गावातील प्रत्येक कुटुंब आपापली जबाबदारी वाटून घ्यायचे आणि मदत करायचे. जाती किंवा समुदाय कुणीही असो, ती मुलगी त्यावेळी केवळ एका कुटुंबाची मुलगी नव्हे तर संपूर्ण गावाची मुलगी असायची.

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची देखभाल, लग्नातील विविध कामांची जबाबदारी, हे सर्व शेजारी आणि गावातील सारे जण आपापसात ठरवायचे. प्रत्येक कुटुंब काही ना काही मदत नक्की करायचे. एखादे कुटुंब लग्नासाठी धान्य पाठवायचे, कुणी भाजीपाला पाठवायचे, तर कुणी तिसरे कुटुंब गरजेच्या अन्य वस्तू घेऊन पोहचायचे.

त्यावेळी संपूर्ण गावात आपलेपणाची भावना असायची, वाटून घेण्याची भावना असायची, एकमेकांना मदत करण्याची भावना असायची. जर तुम्ही निकडीच्या प्रसंगी आपल्या शेजाऱ्यांना मदत कराल तर स्वाभाविक आहे की ते देखील तुमच्या गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी पुढे येतील.

मात्र आज मोठ्या शहरांमध्ये स्थिती एकदम वेगळी आहे. खूप जणांना अनेक वर्षे हे देखील माहित नसते कि त्यांच्या शेजारी कोण राहते. म्हणूनच गाव असो किंवा शहर, आज समाजात तीच आपलेपणाची आणि भागीदारीची भावना पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे. यातून आपल्याला परस्परांच्या भावना समजून घेण्यात आणि त्यांचा आदर करण्यात तसेच एक संतुलित, संवेदनशील आणि सुखी समाज निर्माण करण्यात मदत मिळेल.

आज देखील परस्परांच्या विचारांचा आदर करण्याची भावना, समाजसेवेची भावना आणि स्वतः पुढाकार घेऊन दुसऱ्यांना मदत करण्याची भावना आपल्या नसानसात भिनलेली आहे. अनेक व्यक्ती आणि संघटना, गरीब आणि वंचितांसाठी कोणताही गाजावाजा न करता आणि तन्मयतेने काम करत आहेत.

यापैकी कुणी अनाथ मुलांसाठी शाळा चालवत आहेत, कुणी लाचार पशु-पक्ष्यांची सेवा करत आहेत, कुणी दूरवरच्या दुर्गम भागात आदिवासींपर्यंत पाणी पोहचवत आहेत, कुणी नद्या आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचे  काम हाती घेतले आहे. आपल्याच कामात गर्क हे सर्वजण राष्ट्र निर्माणात जोडलेले आहेत. आपण या सर्वांपासून प्रेरणा घ्यायला हवी.

राष्ट्र निर्माणासाठी अशा कर्मठ लोकांबरोबर सर्वानी सहभागी व्हायला हवे, त्याचबरोबर सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल यासाठी एकजूट होऊन काम करायला हवे. यासाठी नागरिक आणि सरकार यांच्यात भागीदारी महत्वपूर्ण आहे:

* सरकारने 'स्वच्छ भारत' अभियान सुरु केले आहे मात्र भारताला स्वच्छ बनवणे- आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

*सरकार शौचालये बांधत आहे आणि शौचालयांच्या बांधकामाला प्रोत्साहन देत आहे, मात्र या शौचालयांचा वापर करणे आणि देशाला 'हागणदारीमुक्त’ करणे- आपल्या  प्रत्येकाची जबाबदारी आहे.

* सरकार देशाची दळणवळण यंत्रणा मजबूत बनवत आहे, मात्र इंटरनेटचा योग्य उद्देशासाठी वापर करणे, ज्ञानाच्या पातळीतील असमानता संपवणे, विकासाच्या नव्या संधी निर्माण करणे, शिक्षण आणि माहितीची व्याप्ती वाढवणे- आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

* सरकार बेटी बचाओ - बेटी पढ़ाओ' अभियानाला बळ देत आहे, मात्र हे सुनिश्चित करणे कि आपल्या मुलींबरोबर भेदभाव होऊ नये आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे- आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

* सरकार कायदा बनवू शकते आणि कायदा लागू करण्याची प्रक्रिया मजबूत करू शकते. मात्र कायद्याचे पालन करणारा नागरिक बनणे, कायद्याचे पालन करणारा समाज निर्माण करणे- आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

* सरकार पारदर्शकतेवर भर देत आहे, सरकारी नियुक्त्या आणि सरकारी खरेदीतील भ्रष्टाचार संपवत आहे मात्र रोजच्या आयुष्यात आपले अंतःकरण स्वच्छ ठेवून काम करणे, कार्य संस्कृती पवित्र राखणे- आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

* सरकारने करप्रणाली सुलभ बनवण्यासाठी जीएसटी ची अंमलबजावणी केली आहे, प्रक्रिया सुलभ केल्या आहेत, मात्र आपल्या दैनंदिन कामकाजात आणि आदान -प्रदानात त्यांचा समावेश करणे आणि कर भरण्यात अभिमान बाळगण्याच्या भावनेचा प्रसार करणे-आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

मला आनंद आहे की देशातील जनतेने जीएसटीचा आनंदाने स्वीकार केला आहे. सरकारला जो काही महसूल मिळतो, त्याचा उपयोग राष्ट्र निर्माणाच्या कार्यातच होत असतो. यातून एखाद्या गरीब आणि मागास व्यक्तीला मदत मिळते, गांवे आणि शहरांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होते आणि आपल्या देशाच्या सीमांची सुरक्षा मजबूत होते.

प्रिय देशबांधवांनो,

सन २०२२ मध्ये आपला देश आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करेल. तोपर्यंत 'नवीन भारतासाठी' काही महत्वपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्याचा आपला 'राष्ट्रीय संकल्प' आहे.

जेव्हा आपण 'नवीन भारताबाबत बोलतो, तेव्हा आपणा सर्वांसाठी याचा काय अर्थ असतो? काही अतिशय स्पष्ट मापदंड आहेत, उदा.-प्रत्येक कुटुंबासाठी घर, मागणीनुसार वीज, उत्तम रस्ते आणि दळणवळणाची साधने, आधुनिक रेल्वेचे जाळे, वेगवान आणि शाश्वत विकास.

मात्र एवढेच पुरेसे नाही. हे देखील आवश्यक आहे की 'नवीन भारत' आपल्या डीएनए मध्ये वसलेल्या समग्र मानवतावादी मूल्यांना  स्वीकारेल. ही मानवीय मूल्ये आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख आहे. हा 'नवीन भारत' एक असा समाज असायला हवा, जो भविष्याच्या दिशेने वेगाने पुढे जाण्याबरोबरच संवेदनशील देखील असायला हवा:

* एक असा संवेदनशील समाज, जिथे परंपरागत वंचित लोक, मग ते अनुसूचित जातीतील असतील, जमातीतील असतील किंवा मागास वर्गातील असतील, देशाच्या विकास प्रक्रियेतील सहभागी बनावेत.

* एक असा संवेदनशील समाज, जो त्या सर्व लोकांना आपल्या बंधू भगिनींप्रमाणे मिठी मारेल, जे देशाच्या सीमांत प्रदेशात राहतात आणि कधी कधी  देशापासून विभक्त झाल्यासारखे त्यांना वाटते.

* एक असा संवेदनशील समाज जिथे कुपोषित मुलं, वयस्कर आणि आजारी ज्येष्ठ नागरिक आणि गरीब लोकं, नेहमी आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असतील. आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे आणि हे पाहायचं आहे की त्यांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात इतर नागरिकांप्रमाणे प्रगती करण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळतील.

*एक असा संवेदनशील आणि समानतेवर आधारित समाज, जिथे मुलगा आणि मुलगी मध्ये कोणताही भेदभाव नसेल, धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव नसेल.

*एक असा संवेदनशील समाज जो मनुष्यबळरुपी आपलं भांडवल समृद्ध करेल, जो जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांमध्ये जास्तीत जास्त युवकांना कमीत कमी खर्चात शिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देताना त्यांना समर्थ बनवेल तसंच जिथे उत्तम आरोग्यसुविधा आणि कुपोषण एक आव्हान म्हणून असणार नाही.

'नवीन भारताचा' अभिप्रेत अर्थ आहे की आपण जिथे उभे आहोत तिथून पुढे जाणे. तेव्हाच आपण अशा 'नवीन भारताची' निर्मिती करू शकू ज्याचा आपणा सर्वांना अभिमान वाटेल. असा 'नवीन भारत' जिथे प्रत्येक भारतीय आपल्या क्षमतांचा पूर्णपणे विकास आणि उपयोग करण्यात अशा प्रकारे सक्षम असेल की प्रत्येक भारतवासी सुखी राहील. असा 'नवीन भारत' जिथे प्रत्येक व्यक्तीची पूर्ण क्षमता समोर येईल आणि तो समाज आणि राष्ट्रासाठी आपले योगदान देऊ शकेल.

मला पूर्ण विश्वास आहे की नागरिक आणि सरकार दरम्यान मजबूत भागीदारीच्या बळावर 'नवीन भारताची' ही उद्दिष्टे आपण नक्कीच साध्य करू.

नोटबंदीच्या वेळी ज्याप्रमाणे तुम्ही असीम धैर्याचा परिचय देत काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाईचे समर्थन केलेत, ते एका जबाबदार आणि संवेदनशील समाजाचेच प्रतिबिंब आहे. नोटबंदीनंतर देशात प्रामाणिक वृत्तीला प्रोत्साहन मिळाले आहे. प्रामाणिकपणाची भावना दिवसेंदिवस अधिक मजबूत व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत रहायला हवे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या देशबांधवांना सशक्त बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल, जेणेकरून एकाच पिढीच्या काळात गरीबी मिटविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकेल. 'नवीन भारतात' गरीबीसाठी अजिबात थारा नाही.

आज संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, परस्पर संघर्ष, मानवी संकटे आणि दहशतवाद यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यात जागतिक पटलावर भारत महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.

जागतिक समुदायाच्या दृष्टीने भारताचा सन्मान अधिक वाढवण्याची एक संधी आहे- सन २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी प्रभावशाली बनवणे. आतापासून अंदाजे तीन वर्षात गाठायच्या या उद्दिष्टाला एक राष्ट्रीय मोहीम म्हणून स्वीकारायला हवे. सरकारे, खेळांशी संबंधित संस्था आणि व्यावसायिक संघटना यांनी एकजूट होऊन प्रतिभावंत खेळाडूंना पुढे आणण्यात, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून खेळाडूंना अधिकाधिक यश मिळू शकेल.

आपण देशात असू किंवा परदेशात, देशाचा नागरिक आणि भारताचा सुपुत्र या नात्याने, आपण प्रत्येक क्षणाला स्वतःला हा प्रश्न विचारत राहायला हवे कि आपण आपल्या देशाचा गौरव कसा वाढवू शकतो.

प्रिय देशबांधवांनो,

आपल्या कुटुंबाचा विचार करणे साहजिक आहे, मात्र त्याचबरोबर आपण आपल्या समग्र समाजाबाबत देखील विचार करायला हवा. आपण आपल्या अंतर्मनातील त्या आवाजावर अवश्य ध्यान द्यायला हवे जो आपल्याला थोडे अधिक निःस्वार्थ व्हायला सांगतो, कर्तव्य पालनापासून आणखी पुढे जात आपल्याला अधिक काही करायला सांगतो. आपल्या मुलाचे लालन पालन करणारी माता केवळ आपले कर्तव्य पार पाडत नाही. ती अद्वितीय समर्पण आणि निष्ठेचे असे उदाहरण सादर करते जे शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.

* तळपत्या वाळवंटात आणि थंड पर्वतांच्या शिखरावर आपल्या सीमांचे रक्षण करणारे आपले सैनिक केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करत नाहीत- तर निःस्वार्थ भावनेने देशाची सेवा करतात.

* दहशतवाद आणि गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी मृत्यूला ललकारत आपल्याला सुरक्षित ठेवणारे आपले पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान केवळ आपले कर्तव्य  बजावत नाहीत- तर निःस्वार्थ भावनेने देशाची सेवा करतात.

* आपले शेतकरी, देशाच्या दुसऱ्या कुठल्यातरी कोपऱ्यात राहणाऱ्या आपल्या त्या देशबांधवांचे पोट भरण्यासाठी, ज्यांना त्यांनी कधी पाहिले देखील नाही, अतिशय कठीण परिस्थितीत कठोर परिश्रम करतात. ते शेतकरी, केवळ आपले कामच करत नाहीत-तर  निःस्वार्थ भावनेने देशाची सेवा करतात.

* नैसर्गिक आपत्तीनंतर मदत आणि बचाव कार्यात रात्रंदिवस झटणारे संवेदनशील नागरिक, स्वयंसेवी संस्थांशी निगडित लोक, सरकारी संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी केवळ आपली जबाबदारी पार पाडत नसतात- तर ते निःस्वार्थ भावनेने देशाची सेवा करतात.

आपण सर्वजण देशाची निःस्वार्थपणे सेवा करण्याची भावना आत्मसात करू शकत नाही का? मला खात्री आहे की हे नक्की करू शकतो आणि आपण असे केले देखील आहे.

पंतप्रधानांच्या एका आवाहनानंतर, एक कोटीहून अधिक कुटुंबांनी स्वेच्छेने स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारे अनुदान सोडले. असे त्या कुटुंबांनी अशासाठी केले जेणेकरून एका गरीबाच्या कुटुंबातील स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर पोहचू शकेल आणि त्या कुटुंबातील सुना-मुली मातीच्या चुलीतून निघणाऱ्या धुरापासून होणाऱ्या डोळे आणि फुफ्फुसांच्या आजारांपासून वाचू शकतील.

अनुदानाचा त्याग करणाऱ्या अशा कुटुंबाना मी वंदन करतो. त्यांनी जे केले, ते कुठल्या कायदा किंवा सरकारी आदेशाचे पालन नव्हते. त्यांच्या या निर्णयामागे त्यांच्या अंतर्मनाचा आवाज होता.

आपण अशा कुटुंबांकडून प्रेरणा घ्यायला हवी. आपल्यातील प्रत्येकाने समाजामध्ये योगदान देण्याच्या पद्धती शोधायला हव्यात. आपल्यातील प्रत्येकाने एखादे असे काम निवडायला हवे ज्याद्वारे एखाद्या गरीबाच्या आयुष्यात बदल घडेल.

राष्ट्र निर्माणासाठी सर्वात आवश्यक आहे की आपण आपल्या भावी पिढीकडे पूर्ण लक्ष देणे. आर्थिक किंवा सामाजिक मर्यादांमुळे आपले एकही मूल मागे राहू नये.  म्हणूनच मी राष्ट्र निर्माणात सहभागी तुम्हा सर्वाना समाजातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा आग्रह करतो. आपल्या मुलाबरोबरच दुसऱ्या एखाद्या मुलाच्या शिक्षणात देखील मदत करा. ही मदत एखाद्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देणे असू शकेल, एखाद्या मुलाची फी भरणे असू शकते, किंवा एखाद्या मुलासाठी पुस्तके खरेदी करणे असू शकते. जास्त नाही, केवळ एका मुलासाठी. समाजातील प्रत्येक व्यक्ती निःस्वार्थ भावनेने अशा प्रकारे काम करून राष्ट्र निर्माणात आपली भूमिका अधोरेखित करू शकतात.

आज भारत महान यशाच्या प्रवेशदाराशी उभा आहे. येत्या काही वर्षात, आपण एक संपूर्ण साक्षर समाज बनू. आपल्याला शिक्षणाचे निकष अधिक उंचवायला लागतील, तेव्हा आपण एक पूर्णपणे शिक्षित आणि सुसंस्कृत समाज बनू शकू.

आपण सर्वजण ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नात भागीदार आहोत. जेव्हा आपण ही उद्दिष्टे साध्य करू, तेव्हा आपण आपल्या डोळ्यांदेखत आपल्या देशात होणारा व्यापक बदल पाहू शकू. अशा प्रकारे आपण या बदलाचे वाहक बनू. राष्ट्र निर्माणाच्या दिशेने केलेला हा प्रयत्नच आपणा सर्वांची खरी साधना असेल.

अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने म्हटले होते,'अप्प दीपो भव... म्हणजे आपला दिवा स्वतः बना ...' जर आपण त्यांची शिकवण आत्मसात करत पुढे गेलो तर आपण सर्व मिळून स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान दिसलेला जोश आणि उत्साहाच्या भावनेसह सव्वाशे कोटी दिवे बनू शकतो, असे दिवे जे एकाच वेळी उजळले तर सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तो उजेड सुसंस्कृत आणि विकसित भारताचा मार्ग अधोरेखित करेल.

मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना देशाच्या स्वातंत्र्याच्या ७0 व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा देतो.

जय हिंद.

वंदे मातरम !

 
PIB Release/DL/1304
सप्रे -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau