This Site Content Administered by
पंतप्रधान

नीती आयोगाने 17 ऑगस्ट 2017 रोजी आयोजित केलेल्या “चॅम्पियन्स ऑफ चेंज” या कार्यक्रमात तरुण उद्योजकांना पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

नवी दिल्ली, 17-8-2017

मित्रांनो, आज माझे काम आहे तुमचे म्हणणे ऐकायचे, तुम्हाला जाणून घ्यायचे. तुमचे म्हणणे ऐकून घेणे, तुम्हाला जाणून घेणे यासाठी गरजेचे आहे कारण मी हे सार्वजनिक पद्धतीने सांगत राहत असतो आणि माझा याच्याशी संबंध देखील आहे. एवढा मोठा देश आपणच चालवत आहोत या भ्रमात सरकार राहिले तर हा देश कुठे जाईल? हे सांगणे अवघड आहे.

आधीच्या पिढीत एक शैल चतुर्वेदी नावाचे कवी होऊन गेले. त्यांनी एक मजेशीर विडंबन लिहिले होते. त्यांनी त्यात म्हटले होते की एक राजकीय नेता कारमधून जात होते त्यांनी चालकाला सांगितले की आज कार मी चालवणार. तेव्हा चालक म्हणाला की मग मी कारमधून उतरतो. ते ऐकून नेताजींनी त्याला असे का म्हणून विचारले. तेव्हा तो चालक म्हणाला की साहेब ही कार आहे सरकार नाही जे कोणीही चालवेल म्हणूनच आपल्या देशात ही काही नवी कल्पना नाही आहे. थोडेसे मागे जाऊ या आपण, फार जास्त नको साधारण 50 वर्षे. मग आपल्या लक्षात येईल की सरकारची उपस्थिती फारच थोड्या ठिकाणांवर होती. सामाजिक रचनाच अशी होती जी समाज व्यवस्थांना बळ देत होती. आता मला कोणीतरी सांगा की ठिकठिकाणी जी ग्रंथालये तयार झालेली आपण पाहतो, ती कोणत्या सरकारने उभारली होती का? समाजाचे जे नेत होते. त्यांना ज्या कोणत्या गोष्टीत रुची होती त्यांनी ती कामे केली. अगदी शिक्षणच घ्या, आपल्या देशात ज्या वेळी शिक्षण आले आणि त्याच्याशी पैसा, व्यापार आणि व्यवसायाचा संबंध निर्माण झाला त्यावेळी त्याचे रंगरुपच बदलून गेले. पण एक काळ असा होता ज्या काळात समाजात दातृत्वाच्या भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्‍या लोकांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्था विकसित केली होती आणि ही व्यवस्था समर्पित भावनेने निर्माण केली होती. अगदी ज्या भागात पाणी नव्हते त्या भागात पाणी आणण्याची व्यवस्था देखील सामाजिक कार्याच्या भावनेच्या माध्यमातून केली जात होती. गुजरातच्या बाजूला गेलात तर तिथे बावडी दिसते. ही कोणतीही सरकारी योजना नव्हती. सर्वसामान्य लोक ही चळवळ उभारायचे आणि समाजाचे जे नेते होते ते हे सर्व करत असायचे. म्हणूनच आपल्या देशात सरकारांकडून व्यवस्था निर्माण केल्या जात असल्या तरी विकास हा नेहमीच समाजाच्या वेगवेगळ्या रचनांद्वारे, त्यांच्या सामर्थ्याद्वारे, त्यांच्या बळाद्वारे, त्यांच्या समर्पित भावनेद्वारे होत राहिला आहे.

आता काळ बदलला आहे आणि म्हणूनच बदलत्या काळात आपल्याला व्यवस्थांमध्येही बदल करावा लागेल. हा याच दिशेने केलेला प्रयत्न आहे. समाजात अशा प्रकारचे बळ असलेला कोणी धनसंपन्न असेल तर कोणी ज्ञान संपन्न असेल तर कोणी अनुभव संपन्न असेल. या ज्या शक्ती सर्वत्र विखुरलेल्या आहेत त्यांना जर एका धाग्यामध्ये गुंफण्यात आले तर फुलांचा एक असा हार तयार होईल जो पुष्पहार भारतमातेला  आणखी जास्त सुशोभित करू शकेल. तर हा एक असा प्रयत्न आहे ज्यात समाजातील जितक्या शक्ती आहेत त्यांना एकत्र कशा प्रकारे आणता येईल?

जर तुम्ही सरकारच्या कामाचे बारकाईने निरीक्षण करत असाल, जे प्रसार माध्यमांमध्ये दिसत नाही. कारण बऱ्‍याचशा अशा गोष्टी असतात ज्या प्रसार माध्यमांसाठी आवश्यक नसतात. मात्र, तरीही त्या अत्यावश्यक असतात. तुम्ही पाहिले असेल की सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण, हे पद्म पुरस्कार दिले जातात. आपल्या देशात हे पद्म पुरस्कार कसे मिळतात? तुम्ही जर प्रयत्न केला असता तर तुम्हाला त्याचा मार्ग सापडला असता. एखाद्या नेत्याने शिफारस केली, सरकारने शिफारस केली म्हणजे अर्थात तोही राजकारणी असतो आणि तो शिफारस करतो आणि जास्त करून राजकीय नेत्यांचे जे डॉक्टर असतात तेच पद्म पुरस्कारासाठी पात्र ठरतात.

आम्ही लहानशी सुधारणा केली, आम्ही सांगितले की शिफारस करण्यासाठी कोणाची गरज नाही. कोणतीही व्यक्ती स्वतःसाठी किंवा दुसऱ्‍यासाठी ऑनलाइन तपशील पाठवू शकतो. कोणी काही वर्तमानपत्रात वाचले असेल तर त्याचे कात्रण पाठवू शकतो की बघा अशा एखाद्या व्यक्तीविषयी मला माहिती मिळाली होती आणि हजारोंच्या संख्येने लोकांनी अशा प्रकारची माहिती पाठवली. या तरुण चमूला प्रत्यक्षात कोणाचीच ओळख नव्हती, त्यांना चेहरे माहिती नव्हते. जे समोर होते, त्याच्या साहाय्याने त्यांनी शोध सुरू केला आणि त्यातून काही नावे निश्चित केली. त्यानंतर जी समिती स्थापन झाली त्या समितीने काम केले आणि तुम्ही पाहिले असेलच, अशा लोकांना सध्या पद्मश्री दिली जात आहेत जे अज्ञात नायक आहेत.

आता तुम्ही पाहिले असेल की बंगालचा एक मुस्लीम मुलगा, त्याला पद्मश्री का देण्यात आली? तो कोण होता? त्याची स्वतःची आई मरण पावली होती आणि कारण काय होते तर तिच्यावर वैद्यकीय उपचार शक्य नव्हते. त्याचे मन हेलावून गेले आणि त्याने एका मोटरसायकलवरून लोकांना कुठे रुग्ण असेल तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला मदत करायला सुरुवात केली. त्यासाठी तो स्वतःचे पेट्रोल खर्च करायचा. खूप कष्ट करायचा आणि त्या संपूर्ण भागात तो ‘अँब्युलन्स अंकल’ या नावाने ओळखला जाऊ लागला. आता हा स्वतःच लोकांची सेवा करत होता. आसामच्या, बंगालच्या त्या भागामध्ये. सरकारच्या हे लक्षात आले की अशा लोकांना पद्मश्री दिली पाहिजे. सांगायचे तात्पर्य हे आहे की सरकारचा हा प्रयत्न आहे की देशाच्या प्रत्येक कोपऱ्‍यात, प्रत्येक व्यक्तीकडे देण्यासाठी काही तरी आहे. आम्हाला याची जोडणी करायची आहे आणि सरकारला फाईलींमधून बाहेर काढून लोकांच्या आयुष्यात सहभागी करायचे आहे. आमचा हा दुहेरी प्रयत्न आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही एक व्यवस्था निर्माण केली आहे. हे ठीक आहे की हे करत असताना एखाद्याला असे वाटते की यात तो आला असता तर बरे झाले असते, याचा समावेश केला असता तर चांगले झाले असते. अनेक सूचना असतील. पण हा पहिला प्रयत्न होता. पूर्णपणे सरकारी प्रयत्न होता आणि त्यामुळेच त्यात त्रुटीदेखील अनेक असू शकतात. आमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत त्रुटी असू शकतात. पण मला असे वाटते की हा जो प्रयोग आम्ही केला आहे, त्याला संस्थात्मक रूप कसे देता येईल? त्याला वार्षिक कार्यक्रम कशा प्रकारे बनवता येईल? आणि एका प्रकारे सरकारचे विस्तारित रूप म्हणून, ज्या प्रकारे तुम्ही सहा गट बनवले आहेत, सहा गटातही एका गटाने पाच वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे.

आता माझ्या मनात असा विचार येत आहे की हेच गट त्या संबंधित मंत्रालयाशी कायमस्वरुपी संलग्न करता येतील का? ज्यांनी डिजिटल वर काम केले त्यांनीच जर आपला वेळ देऊ केला तर  सरकारमध्ये जे डिजिटल इंडियाचे काम पाहत आहेत, त्या अधिकाऱ्‍यांसोबत, त्या मंत्र्यासोबत एकत्रित अशी त्यांची एक टीम मी बनवेन. दर महिन्याला ते एकत्रित बसतील, नव्या नव्या गोष्टींवर चर्चा करतील, कारण ज्या प्रकारे या ठिकाणी यादीतून सांगितले जात होते की लोकांना, खरेतर मला माहित नाही , मला ठाऊक नाही की डिजिटल काय असते ते. हे केवळ सर्वसामान्य माणसाचे नाही आहे, सरकारमध्येही आहे. सरकारमध्ये डिजिटलचा अर्थ आहे हार्डवेअरची खरेदी. सरकारमध्ये डिजिटलचा अर्थ आहे की पूर्वी जसा फ्लॉवरपॉट ठेवायचे तसा आता खूप छानसा लॅपटॉप ठेवायचा. म्हणजे कोणी अनोळखी आले तर त्यांना वाटले पाहिजे की बघा आम्ही किती आधुनिक आहोत ते. म्हणजे असा विचार करणारे सरकार असते. आता 50-55 नंतर ही भारत सरकारमध्ये लोक येतात आणि आता तुम्ही तिशीच्या आतल्या मेंदूचा वापर करत आहात. मला या दोघांना एकत्र आणायचे आहे. ही त्याची सुरुवात आहे माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की आज सरकारमध्ये माझ्या सोबत जी टीम आहे, सचिवांची, मंत्र्यांची. आता असे मानूया की साधारण 200 लोकांची एक टीम आहे आणि माझा सातत्याने त्यांच्याशी संवाद होत राहतो आणि हा एक पंतप्रधान म्हणून होत नाही. माझे सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबत माझा वेळ घालवत असतो. गेल्या तीन वर्षातील अनुभवानंतर मी हे सांगू शकतो की ज्या प्रकारे शेतकरी त्याचे शेत नांगरतो, त्यावेळी पाऊस येणार नाही येणार याची त्याला शाश्वती नसते, पीक आले तर बाजारात भाव मिळणार की नाही याची खात्री नसते. पण तरीही तो त्याचे शेत नांगरत राहतो.

मी सुद्धा 200 लोकांच्या मेंदूमध्ये हीच प्रक्रिया करण्याचे खूप काम केले आहे आणि माझ्या अनुभवातून हे सांगू शकतो ते आज कोणत्याही प्रकारच्या विचाराच्या बीजांना स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत. मला असे वाटते हा एक खरोखरच एक मोठा बदल आहे. सरकारमधली माझी टीम प्रत्येक नव्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी, अडथळा निर्माण करण्याऐवजी, त्यात संधी शोधण्यासाठी आणखी प्रयत्न करत आहे. याच कारणामुळे तुम्हाला माझ्या सोबत घेण्यासाठी माझा उत्साह वाढला आहे. यात जर अडथळा असता, तर मी केले नसते, त्याचा विचारही केला नसता. कारण आज तुम्ही लोकच या ठिकाणाहून 6 महिन्यांनी नकारात्मकतेचे प्रमुख कारण बनले असता. आता मी तुम्हाला सांगतो, जाऊ द्या ना, सगळे नुसते बोलत असतात, सगळे असेच आहेत. पण आता मी हे धाडस यासाठी करत आहे कारण मला माहित आहे की माझी प्रमुख टीम आहे आणि नव्या गोष्टींचा स्वीकार करण्याचा मोठा उत्साह या टीममध्ये आहे. तुम्ही जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत, काल तुम्ही ज्यांच्याशी या विषयावर चर्चा केली त्यांच्यापैकी काही लोक आज या ठिकाणी बसले आहेत. तर हा प्रयत्न आपल्याला दीर्घ काळ करायचा आहे, पुढे न्यायचा आहे.

माझे तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे की तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे एकमेकांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले असतील, कदाचित ऐकले असेल, वाचले असेल, सोशल मिडियामधून समजले असेल की कोणी एक असे सद्‌गृहस्थ आहेत जे या दिशेने असे काही करत आहेत. आता तुमची ओळख झाली आहे, तुमची एक टीम बनत आहे. कदाचित सर्व 212 लोकांची टीम बनली नसेलही. पण जो काही 30-35चा गट बनला आहे, त्यांची ओळख नक्कीच झाली असेल, विचार करण्याची पद्धत काय आहे समोरच्याची, योगदान काय आहे या सर्वांचे मूल्यमापन तुम्ही केले असेल.

कोणी जास्त वेळ खाल्ला असेल तर ते देखील तुमच्या लक्षात आले असेल. कोण आपल्या व्यवसायासाठी नेटवर्किंगमध्ये वेळ घालवत आहे तर ते देखील तुम्हाला समजले असेल. सर्व काही तुमच्या लक्षात आले असेल आणि म्हणूनच तुम्हाला सर्व सकारात्मक-नकारात्मक बाबी माहित आहेत. मला हा विश्वास आहे की तुम्ही या द्वारे आपल्या पद्धतीने याच विषयांना, विषयाला सोडू नका आणि जगभरात अचानक काही घटना घडली तर त्यात पडू नका. ज्या गोष्टींवर तुम्ही काम केले आहे, तर जसे बदल होतील तसे त्यात तुम्ही बदल करत जाल का? अशा गोष्टींमध्ये बदल करत जा आणि अधिक जास्त बदल करा, जास्त लक्ष केंद्रित करा. आता याबाबतच्या संकल्पना काय आहेत? तुम्ही या संकल्पनांच्या आधारे तुम्ही तुमचा आराखडा तयार करू शकता का? आपल्या साध्यतेसाठी या गोष्टींचे स्रोत साधनसंपत्ती काय असेल. संस्थात्मक व्यवस्था काय असेल, सरकार चालते तर नियमांनी, मग नियम बदलायचे असतील तर ते कसे बदलणार. कोणते नियम असले पाहिजेत. सरकार कागदावर चालते. जोपर्यंत एखादी बाब कागदावर येत नाही तोपर्यंत सरकारमध्ये कोणतेही काम होत नाही. म्हणूनच तुम्ही काय करू शकता? कशा प्रकारे जोडू शकता, तुमच्यातील कोणी नेतृत्व करून  जर एक महिन्यानंतर दुसऱ्‍यांदा चर्चेसाठी चला बसू या असा विचार करणार का? बघा तुम्ही खूप मोठे योगदान देऊ शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने एक डिजिटल मंच तयार करू शकता. तुमच्या टीममधीलच कोणीतरी नेतृत्व करा आणि या डिजिटल मंचावर तुमच्या पद्धतीने तुम्ही नव्या नव्या लोकांना आमंत्रित करा. असेही होऊ शकते की महिन्यातून एकदा तुम्ही गुगल हँगआऊटच्या माध्यमातून एकत्र चर्चा करू शकाल. विचारविनिमय कराल. कधी वर्षातून एक दोनदा भेटण्याचे ठरवाल. जर या गोष्टी तुम्ही केलात आणि हे मंथन सुरूच राहिले तर तुम्हाला सरकारला वेळेवर गोष्टी उपलब्ध करून देण्याचे बळ मिळेल आणि जेव्हा वेळेवर गोष्टी मिळतात तेव्हा खूप मोठे परिवर्तन घडून येते.

कधी कधी सरकारी तंत्राच्या स्वतःच्या अशा अडचणी असतात, आपली वैशिष्ट्ये असतात. या अडचणींमध्ये तुम्ही मदतगार सिद्ध होऊ शकता आणि आपला देश असा नाही फार जास्त काही तरी असामान्य गोष्टींची गरज आहे. लहान लहान  गोष्टी देखील खूप मोठे परिवर्तन आणू शकतात आणि तुमचा हा प्रयत्न असेल. तसे सरकारमधील फार थोडेसेच काम तुम्हाला करावे लागेल. लहान लहान जे बदल झाले आहेत ते सर्व व्यवस्था बदलून टाकतात. आता एक साधा सा व्यवहार, तुम्ही मला सांगा माझ्या देशाचा सामान्य नागरिक आहे, सरकारने त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? अगदी साधे सोपे उत्तर आहे की ठेवला पाहिजे.

मात्र, सरकार निर्वाचित नगरसेवकावर विश्वास ठेवते, निर्वाचित आमदारावर विश्वास ठेवते, सरकार राजपत्रित अधिकाऱ्‍यावर विश्वास ठेवते आणि पूर्वी कायदा काय होता तर जर तुमच्याकडे एखादे प्रमाणपत्र आहे आणि तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर त्याला प्रमाणित करण्यासाठी या सर्वांच्यापैकी एकाच्या घरी जावे लागायचे. तो शिक्का मारणार आणि तो पाहायचा देखील नाही की बाहेर कोणी मुलगा बसला आहे. जो कोणी येईल त्याच्या प्रमाणपत्रावर शिक्के मारण्याचे काम करायचा आणि हेच प्रमाणपत्र तुम्ही सरकारला पाठवत असायचात. मी आल्यावर म्हटले याची गरज काय? स्वयंप्रमाणित करू द्या ना, स्वयं साक्षांकित करू द्या. आधीचा नियम काढून टाकला. अतिशय लहान बाब आहे. पण यातून मिळणारा संदेश खूप मोठा आहे की माझा माझ्या देशवासीयांवर विश्वास आहे. मध्ये मध्ये काही प्रकारच्या व्यवस्थेची गरज नाही. हा जेव्हा तुम्हाला अंतिम मुलाखतीचे बोलावणे आले असेल, किंवा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुमची मूळ प्रमाणपत्रे दाखवा त्या दिवशी. अशा प्रकारच्या हजारो गोष्टी तुम्हाला या तीन वर्षात सरकारमध्ये आढळतील. आता बघा या ठिकाणी आपण भ्रष्टाचाराची चर्चा करत होतो आणि एक जण सांगत होते की आपण न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा केली तर सर्व काही होऊ शकते.

आपल्या घरात जिथे पैसे असतात, दागिने असतात त्या तिजोरीला आपण कुलूप लावतो. हे कुलूप चोरांसाठी असते का? लुटारुंसाठी असते का? ते तर पूर्ण तिजोरी उचलून घेऊन जाऊ शकतात. कुलूप ही त्यांच्यासाठी खूप क्षुल्लक बाब आहे. हे कुलूप त्यांच्यासाठी नसते. आपल्या घरातल्या मुलांना वाईट सवयी लागू नयते, यासाठी असते. आपणहून कुलूप उघडून त्यातले काही उचलून घेऊन, त्याचा वापर करुन त्यांना काही बाहेरच्या वाईट सवयी लागू नयेत, यासाठी आपण ही व्यवस्था करतो. स्वयंशिस्तीसाठी आपण अशा व्यवस्था विकसित करतो. दुर्भाग्याची बाब म्हणजे भ्रष्टाचारही संस्थात्मक झाला आहे. जोपर्यंत प्रतिबंधात्मक संस्थात्मक व्यवस्था होत नाही, तोपर्यंत तुम्ही तो थांबवू शकत नाही.

आपल्या देशात दलालच बघा किती आहेत. का तर त्यांनाही रोजीरोटी हवी ना. तेही एक रोजगाराचे क्षेत्र आहे आणि असे हे लोक जे आज बेकार झाले आहेत ते सध्या रोजगार नाही, रोजगार नाही म्हणून खूप आरडाओरडा करत आहेत. गरीब कुटुंबात हे असे अनेक लोक जातात आणि सांगतात की फक्त 50 हजार रुपये द्या, मुलाला शिपायाची नोकरी मिळवून देतो. फक्त 20 हजार रुपये द्या, या सुट्टीत हंगामी नोकरी मिळवून देतो. असे अनेक दलाल फिरत असतात. सत्तेवर आल्यावर आम्ही ठरवले की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीसाठी मुलाखत नसेल. मला सांगा मुलाखतीमागे काय तर्क आहे का? आणि जगामध्ये असे कोणते मानसशास्त्र तयार झाले आहे की, एखादी व्यक्ती कक्षात प्रवेश करते, तीन लोकांचे पॅनल बसलेले असते, ती व्यक्ती 30 सेकेंदात इकडून तिकडे जाते, कोणाला वेळ असेल, तर ते विचारतात. बरी झाली मुलाखत.

अशा कुठल्या स्कॅनरबाबत मी वाचलेले नाही, ऐकलेले नाही. याचा अर्थ गडबड आहे. या सरकारने सत्तेवर आल्यावर निर्णय घेतला. सरकारमध्ये 65 टक्क्यांहून रोजगार तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचा असतो. मी सगळ्या मुलाखती रद्द करुन टाकल्या. तुमच्या गुणवत्ता यादीवर संगणक निर्णय घेईल. गुणवत्तेतील क्रमवारीनुसार नोकरी मिळेल. यात लायक नसलेले दोन, पाच टक्के येऊ शकतात. पण असेही मुलाखतीत 80 टक्के असे येतात.

सांगण्याचे तात्पर्य हे की हे एक असे सरकार आहे जे अशा संस्थात्मक व्यवस्थेसाठी काम करत आहेत. जेणेकरुन जर व्यक्तीमध्ये थोडीशी जरी गडबड असेल, तर व्यवस्था आपले काम चोख बजावेल आणि कधी कधी व्यक्तीचा पाय घसरण्याची शक्यता असते. परिस्थिती सांभाळण्यात व्यवस्था खूप कामी येतात. आजचे जग, एक प्रकारे जिथे अंतर तिथे ॲप. ॲप सगळीकडे भरुन राहिले आहेत. एक प्रकारे समोरासमोर येणे संपत आहे. अशात असेही लोक घुसत आहेत, ज्यांच्यासाठी फसवणूक करणे सोपे आहे. एका ॲपवर जगभरातले काम करुन दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या ॲपवर टाकून आपली गाडी चालवणे. पण अशा शक्यता असूनही तंत्रज्ञानातल्या क्रांतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत आहे. त्यासाठी स्वीकृती दिसून येत आहे. तंत्रज्ञानासाठी आज कुठलाही अडसर नाही. जे लोक तंत्रज्ञान समजत नाहीत, असे म्हणतात त्यात बहुतांश करुन पुरुष असतात, महिला नसतात. तुम्ही बघा, सर्वात अत्याधुनिक तंत्र साधन जे असेल, ते लगेच बाजारात येते आणि स्वयंपाकघरात पोहोचते महिलांच्या पसंतीनुसार. सर्व महिला म्हणजे अशिक्षित महिलेला सुद्धा, काम करणाऱ्या महिलेला, स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलेला सुद्धा ओव्हन कसा वापरायचा, सर्व तंत्रज्ञान माहित असते.

सुलभ तंत्रज्ञान आल्यामुळे जीवन बदलले आहे. मग प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाज पद्धतीमध्ये सरकार बदल करू शकते का? आपण सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, एक गोष्ट निश्चित आहे की, नवकल्पनेतूनच बदल घडून येत असतात. नवनवीन कल्पना नसतील तर एकप्रकारचे साचलेपण येते आणि जिथे जिथे साचलेपण आहे, तिथे घाण आहे. नवसंकल्पनांमुळेच बदल घडतात. आपण ज्या क्षेत्रात आहात, तिथे आपण नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहात का? जर कोणी एखादा हस्तकला व्यवसायाचे मार्केटिंगचे काम करत असेल तर त्याने कधी हस्तकलेला तंत्रज्ञानाची जोड देवून जागतिक बाजारपेठेची आवश्यकता लक्षात घेवून त्यानुसार, आधुनिक काळाचा विचार करून काही बदल, सुधारणा कशा करता येतील; हे त्या हस्तकलाकाराला शिकवल्या आहेत का? अशा पद्धतीचे प्रशिक्षणही जर मार्केटिंग करण्याबरोबरच दिले गेले तर हस्तकला क्षेत्रात काम करणाऱ्‍या आपल्या सामान्य, गरीब कलाकाराच्या दृष्टीने ते एकप्रकारे व्यावसायिक प्रशिक्षण म्हणा किंवा कौशल्य प्रशिक्षण म्हणा, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण म्हणा, त्याला बाजारपेठेची जाण करून दिल्याने त्याला थोडे अधिक मिळणार आहे. प्रोत्साहन मिळणार आहे. बदलत्या काळानुसार लोकांना काय खरेदी करायला आवडते, लोकांना सुविधा कशामुळे मिळते, याचा विचार करून त्याने वस्तू बनवाव्यात यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. असे केले तर आपोआपच संधी निर्माण होणार आहेत.

आमच्याकडे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आमचे संपूर्ण अर्थशास्त्र फक्त कृषी व्यवसायाशी जोडून चालणार नाही. तर शेती व्यतिरिक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेत खूप काही आहे. आपण या विकेंद्रीत व्यवस्थेला कशा पद्धतीने बदलेले पाहिजे? एक काळ असा होता की, आपल्या देशात गावातला लोहार गावातल्या सगळ्या  गोष्टी करत असायचा. त्यामुळे कोणाला बाहेरगावी जाण्याची गरज पडत नसे. गावातला एक मोची संपूर्ण गावातल्या लोकांची गरज भागवत होता, त्यामुळे कोणी बाहेरगावी जात नसे. आता अर्थव्यवस्था अशी काही बदलली आहे की, सर्वात मोठा लोहार बनले टाटा आणि सर्वात मोठा मोची बनले बाटा. आणि गावाला येवू लागला घाटा. तर आता हा जो काही बदल झाला आहे, तो झाला आहे. बदल होणे काही वाईट गोष्ट नाही. आता ही विकेंद्रीकृत व्यवस्था जोडायची कशी? हे पाहणे गरजेचे आहे. जर आम्ही या गोष्टी एकमेकांना जोडल्या तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होणार आहे. एक ताकदवान व्यवस्था विकसित केली तरच देशाची अर्थव्यवस्था शाश्वत बनणार आहे. आपण सगळ्यांनी स्टार्ट अप, स्टार्ट अप ऐकले असेल. या स्टार्ट अप इतकी फॅशनबेल गोष्ट दुसरी कोणतीच नाही. स्टार्ट अपच्या जगामधून आलेली डिजिटल सॉफ्टवेअरची दुनिया आहे. अनेक स्टार्ट  अपमुळे सामान्यातील सामान्य समस्यांवर तोडगा शोधून काढला आहे. आणि त्याचबरोबर ग्रामीण पाया मजबूत केला आहे.

साधारण एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी सिक्किमला गेलो होतो.  सेंद्रिय राज्य बनण्याचा पहिला मान हिंदुस्थानमध्ये सिक्किमने मिळवला. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. संपूर्ण राज्य सेंद्रिय आहे. आणि हा मान या राज्याने 13-14 वर्षे सातत्याने परिश्रम करून मिळवला आहे. आणि हिमालय पर्वतीय क्षेत्रातल्या आपल्या देशातल्या सगळ्या  राज्यांमध्ये सेंद्रिय राज्य राजधानीबनण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध आहेत. सेंद्रिय महोत्सवाच्या कार्यक्रमाला मी एकदाच सिक्किमला गेलो होतो. त्यावेळी मला तिथे एक युवक आणि एक युवती भेटले. त्यांनी अहमदाबादच्या आय आय एम मधून नुकताच अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पदवी घेवून ते पोहोचले होते. आमचा परिचय झाला. मला वाटले, पर्यटक म्हणून ते तिथे आले असावेत. मी विचारलही. तर म्हणाले, ‘‘नाही, नाही, आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून इथंच राहतोय. काय करता? या प्रश्नावर उत्तरले, ‘‘इथं ज्या सेंद्रिय वस्तू, पिके, धान्य आहे, त्यांना जागतिक बाजारपेठ कशी मिळेल या दिशेने आम्ही काम करतोय. आणि अतिशय कमी कालावधीत आमचा व्यवसाय वाढतोय.’’

आता पाहा, ही नवी दुनिया आहे. म्हणजेच आमच्या स्टार्ट अपस ने या नवीन गोष्टी घेतल्या आहेत. आता याच गोष्टी आपण अधिक सक्षम कशा पद्धतीने करू शकतो? यामध्ये नवनवीन गोष्टी कशा आणू शकतो? टाकावूतून संपत्ती कशी निर्माण होवू शकाते? भारतात आपण  कल्पनाही करू शकत नाही, अशी एक अर्थव्यवस्था आहे. यामध्ये तंत्रज्ञान आहे, यामध्ये नवकल्पना आहे, यामध्ये पुनर्निर्मिती आहे, यामध्ये सगळ्या  गोष्टी आहेत आणि भारतासाठी त्या आवश्यकही आहेत. आपण त्यांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात पुनर्निर्मिती ही काही नवीन गोष्ट नाही. आपल्या देशात फार प्राचीन काळी अशा पुनर्निर्माणाची सवय लोकांना होती. परंतु बदल झाले आणि मधल्या काळात ही साखळी तुटली. आता आपल्याला ही साखळी पुन्हा जोडायची आहे. मात्र सुव्यवस्थित पद्धतीने जोडावी लागेल. आणि आपण जर या गोष्टी केल्या तर परिवर्तन घडवून आणू शकतो.

शिक्षण, आता आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थेमध्ये कॅम्पस प्लेसमेंटहोते, हे बरोबर आहे. एक कोटी, दोन कोटी, तीन कोटी, अशी बोली लावून विद्यार्थ्यांना आपल्याकडे नेतात. मग आपण एक वेगळं स्वप्न पाहू शकतो का ? की जे शिक्षक आहेत, त्यांचेही कॅम्पस प्लेसमेंटव्हावे आणि त्यांनाही एक कोटी, दोन कोटी, तीन कोटी, पाच कोटी असे मिळावेत. हे स्वप्न साकारणे शक्य आहे, नक्कीच हे सत्यामध्ये घडू शकेल. तुम्ही हिंदुस्थानात कोणाही व्यक्तीला भेटा, अगदी श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला भेटा, गरीबातल्या गरीब व्यक्तीला भेटा, सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तीला भेटा, सर्वात अशिक्षित व्यक्तीला भेटा आणि एक प्रश्न विचारा, एकच उत्तर सगळ्यांकडून येईल. त्याला विचारा, ‘‘तुझ्या जीवनाचे ध्येय काय?’’ सगळ्यांकडून उत्तर एकच येईल, ते म्हणजे, ‘‘मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे.’’ आपल्या गाडीचालकाला विचारा, बाबा रे, कसला विचार करतोस? उत्तर येईल, ‘‘काही नाही साहेब, माझ्या मुलांना चांगले  शिक्षण मिळाले पाहिजे. माझे तर आयुष्य गाडी चालवून चालवून गेले, त्याने शिकून खूप चांगले काही बनावे, एवढीच इच्छा आहे!’’

मी अनेक लोकांना विचारतो. गरीब माणूस गाडीचालक असेल, लिफ्टमन असेल, मी विचारतो, अरे भाई, कर्ज-बिर्ज काढलेले नाहीस ना ? तर उत्तर मिळते, ‘‘नाही साहेब, कर्ज आहे. कसले कर्ज? मुलांना चांगल्या शाळेत घालण्यासाठी कर्ज घेतलेले आहे. याचा अर्थ असा की, देशात सर्वात जास्त मागणी जर कोणाला असेल तर ती म्हणजे उत्कृष्ट शिक्षकांना आहे. आपल्याला असे उत्कृष्ट शिक्षक निर्माण करायचे आहेत आणि सामान्य व्यक्तिलाही शिक्षक बनणे म्हणजे एक मोठे आणि अभिमानास्पद कार्य केल्यासारखे वाटले पाहिजे. शिक्षक बनून मी मोठे, मौल्यवान योगदान देवू शकतो, असेही वाटले पाहिजे. आताच्या काळात अनेक नवे मॉडेल आले आहेत. प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये शिकवण्याचे मॉडेलही आले आहे. यामध्ये तंत्रज्ञान खूप मोठी भूमिका बजावू शकते.

आपण इतके उपग्रह अवकाशात सोडतो, त्याचा खूप अभिमान वाटतो. परंतु सगळ्यांचा वापर होतो, झाला असे नाही. अनेक प्रक्षेपक विना वापरताच अवकाशात तरंगत होते. मी आल्यानंतर ही अनिर्णायक अवस्था संपुष्टात आणली. अवकाश क्षेत्र, शिक्षण, तंत्रज्ञान या सगळ्यांना एकत्रित केले. अलिकडेच मी 32 प्रक्षेपक फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरता येतील, अशी व्यवस्था तयार केली. या व्यवस्थेच्या मदतीने तुम्हाला अगदी घरबसल्या अगदी मोफत शिक्षण मिळू शकणार आहे. तुम्ही लहान मुलांनाही घरामध्येच शिक्षण देवू शकणार आहे. याचाच अर्थ कोणत्याही व्यत्ययाशिवाय, कोणत्याही बंधनाशिवाय गुणवत्तापूर्ण शिक्षण सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जावू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने गरीबातल्या गरीबापर्यंत आम्ही शिक्षण पोहोचवू शकतो. आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये आपण कसा बदल घडवून आणू शकतो? जर गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये अगदी तळापासून जर असे परिवर्तन घडून आले तर शिक्षकांवर आपोआपच दबाव येणार आहे. आणि त्यांना बदल करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणूनच आपल्यासारख्या लोकांनी प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहावे, त्यामधील संधी शोधाव्यात, असा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याकडे वेगळी दृष्टी, नजर आहे, उत्साह आहे, नवकल्पना आहेत, नवे विचार आहेत, कल्पना आहेत. या सगळ्या  गोष्टींची आणि सरकारची सांगड कशी घालायची याचा विचार आणि प्रयत्न मी करत आहे आणि या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे.

याच प्रकारे आपण आणि आपल्यासारखे देशवासी, अनेक लोक त्याचबरोबर सरकारच्या योजना यशस्वी करून आपण नव भारत बनवू. हा विचार काही माझा नाही की, सरकारचाही नाही. सव्वाशे कोटी जनता जोपर्यंत नवभारताचा संकल्प करत नाहीत, नवभारतासाठी आपण काय करू शकतो, याचा शोध घेत नाही, ते काम पूर्ण करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत नाहीत, तर मग ते काम अर्धवटच राहणार आहे. आणि म्हणूनच आपला प्रयत्न बदल घडवून आणण्याचा असला पाहिजे. आपण कुठेही कार्यरत असा, माझी एवढीच अपेक्षा आहे की, एका तरी गोष्टीमध्ये, कामामध्ये बदल घडवून आणावा. आपण कितीही जण असा, कुठेही, काहीही काम करीत असा, आपल्याकडे 20 कामगार असतील, 50 असतील, 100 असतील किंवा हजार असतील. एकदा त्यांना बोलावून, बसवून तुम्ही बोलणार, सांगणार, विचारणार? अरे भाई, 2022 मध्ये आपल्याला देशाला या स्थानापर्यंत घेवून जायचे आहे, यासाठी तू काही योगदान देवू शकतोस, काही जबाबदारी स्वीकारू शकतोस? तू काय करू शकतोस? प्रत्येक व्यक्ती खूप काही करू शकते. ही वातावरण निर्मिती आपण करू शकतो.

काही काही वेळेस मला स्मरण होते. मी राजकारणात नव्हतो. एक खूप मोठे उद्योजक होते. ते आपले आयुष्य गांधींजीच्या तत्वानुसार जगत होते. सेवाभाव त्यांच्याठायी होता. त्यांच्या परिवारातील एक व्यक्ती रामकृष्ण मिशनशी संलग्न होते. माझंही रामकृष्ण मिशनबरोबर दृढ संबंध असल्यामुळे माझे या उद्योजक परिवाराशीही संबंध होते. त्यांनी एकदा एक बंद पडत चाललेला, आर्थिक दृष्ट्या अगदी डबघाईला आलेला उद्योग विकत घेतला. आता तो उद्योग बंद का पडला तर, संप आणि त्यामधून संघटना यांच्या कटकटी झाल्या होत्या. म्हणून मी सहजच त्यांना विचारले, तुम्ही हे धाडस कसे काय केले? आता आधी काय झाले होते, त्याचा परिणाम काय झाला होता, आणि त्यानंतर काय झाले, हे सगळे मला ठावूक होते. म्हणून त्याविषयीही मी विचारले. यावर अगदी साधे उत्तर या उद्योजकांनी मला दिले. ‘‘काही नाही. आम्ही डबघाईला आलेला उद्योग घेतला आणि मी अगदी पहिल्या दिवसापासूनच रोज तिथे जायला प्रारंभ केला आणि ठरवले, सहा महिने रोज तिथे नियमित जायचेच. तिथे जे कामगारांचे कॅंटीन होते, तिथे जावून कामगारांनबरोबर जेवायला सुरू केली. बसत होतो, तिथेच जेवत होतो. माझ्या इतक्या छोट्या कृतीमुळे, निर्णयामुळे कामगारांचे माझ्याबद्दलचे मत बदलून गेले. त्यांना मी मालक वाटत नव्हतो की, मला ते कामगार वाटत नव्हते. ते कामगार जे काही खात होते, तेच मीही त्यांच्या टेबलवर बसून खात होतो. आणि यामुळेच मानसिक परिवर्तन घडून आले. ते सगळे माझ्या परिवाराचे सदस्य बनले. आता सगळे एकाच परिवारातले झाले होते. सगळ्यांनी इतकी मेहनत केली, परिश्रम केले की, डबघाईला आलेला कारखाना आता कमावता बच्चा बनला. सांगण्याचा सारांश असा की, तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना सांगा की, आपल्याकडे काम करणाऱ्‍या कामगारांच्या घरी लहान, कुमार वयातली मुले असतील. 12 वर्षांची, 15 वर्षांची, 18 वर्षांची मुले असतील. वर्षांतून एक-दोनदा तरी त्यांना कधी एकत्र बोलावले आहे? कामगारांच्या मुलांना एकत्र करून त्यांना प्रोत्साहन दिले कात्यांना चांगले काही सांगितले का? देशात वाईट कामे करायची नाहीत हे कधी सांगितले का?

आता हे पाहा, एकदा तुम्ही त्यांच्या मुलांशी नाते जोडले ना की खूप फरक जाणवेल. मग त्या कामगाराला पगारवाढ मिळाली किंवा नाही काय, बोनस मिळाला किंवा नाही काय, तो  कामगार अगदी जीवनभर समर्पण भावनेने तुमच्यासाठी काम करतोय, हे तुम्हाला लक्षात येईल. मला असे परिवर्तन घडवून आणायचे आहे. सरकारची विमा योजना आहे. एका दिवसासाठी एक रूपया. अजून एक योजना आहे, त्यामध्ये एका महिन्याचा एक रूपया द्यावा लागतो. भारत सरकारने श्रमजीवींसाठी इतकी छान, स्वस्त योजना तयार केली आहे. तुम्ही आपल्या कामगारांना तिचा फायदा मिळवून देवू शकता. आपल्या कामगारांच्या नावे फक्त 500 रूपये ठेव ठेवली तर या ठेवीच्या व्याजातून त्या कामगाराचा वार्षिक हप्ता जावू शकतो. आणि कामगाराचे भवितव्य सुरक्षित होवू शकते. जर त्याच्या जीवनात दुर्दैवी घटना घडली तर दोन लाख रूपये आणि दोन्ही योजनेतून विमा काढला असेल तर चार लाख रूपये त्या गरीब परिवाराला मिळू शकतात.

सरकारच्या योजना थेट आपल्यासोबत काम करणाऱ्‍या लोकांसाठी आहेत. आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकता? आज सकाळी गौरव यांनी सरकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली असेल. आपल्यापैकी बरेचजण डिजिटल क्षेत्रातील असणार, परंतु या विशिष्ट विभागात आपण कधी प्रवेश केला नसेल. आता यामध्ये प्रवेश करून आणि मोठ्या प्रमाणावर कार्य करून आपण सरकारला पुढे नेवू शकणार का? आपण सरकार चालवण्याच्या कामात भागीदार बनू शकणार का? आम्ही ज्या परिवर्तनाच्या दिशेने जावू इच्छितो, त्यासाठी आपलीही ताकद आम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. तुमच्या सहकार्यामुळे आपल्यामध्ये एक नवे दृढ नाते तयार होणार आहे. आणि आपण कोणीही असलो तरी, या हिंदुस्थानचे  नागरिक आहोत. मग कोणी एखाद्या पदावर आहे, कोणी व्यवस्थापनात आहे. तर कोणी एखादा दुकानावर बसला आहे. कोणी उद्योग चालवतो, परंतु आपण सगळे मिळून एक हिंदुस्थान बनतो. सव्वाशे कोटी देशवासियांमध्ये ही भावना निर्माण करण्याचा मी एक प्रयत्न करतोय. आणि मला आपल्या सगळ्यांचे सहकार्य पाहिजे.

मी ज्या ज्या गोष्टींविषयी विचार करतो, त्या त्या सर्व गोष्टी पंतप्रधान म्हणून केल्या जातात किंवा होतातच असे नाही. मलाही या व्यवस्थेतून जावे लागते. त्यामुळे आपण जर 59 सल्ले दिले तरी त्यापैकी 40 सूचनांचे कदाचित पुढे काही होऊ शकणार नाही. परंतु आपण सुचविलेल्या उपयुक्त 10 गोष्टी जरी चांगल्या पद्धतीने पुढे गेल्या तरी ते देशाच्या दृष्टीने खूप मोठे, बहुमूल्य योगदान ठरणार आहे. मनात ही भावना ठेवूनच आपण प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. निराशेची भावना मनात आणून कधी चालणार नाही. अरे, खूप चर्चा होते, खूप विचार विनिमय होतो. परंतु मी जे म्हणालो, ते काही झाले  नाही, असे मनातून निराशा वाटण्याचे कारण नाही. तुम्ही नाही, हरकत नाही. दुसरा कोणी तरी सांगणारा आहेच. अनेक लोकांनी, अनेक गोष्टी सांगितल्या आणि अनेक गोष्टी झाल्या. या अनेकांमुळे परिवर्तन घडून येत आहे. मात्र हे सगळे आपल्यालाच करायचे आहे. कदाचित सगळे काही चांगले असतानाही एखादी नवी गोष्ट करणे व्यवस्थेच्या क्षमतेबाहेरची असू शकते. परंतु हळूहळू पचनशक्ती नक्कीच वाढेल आणि मग नवनवीन योजनाही येतील. त्याचबरोबर नव्या योजनांचा स्वीकारही होईल. अशा वेळी आपण आमच्याबरोबर आहे असे वाटते.

या योजना अधिक कशा चांगल्या होतील, त्यांचा लाभ सगळ्यांना कसा मिळेल या संदर्भात आपल्याकडून मते मिळावीत आणि त्यांचा वार्षिक आढावा घेता यावा  अशा प्रकारची एक संस्थात्मक यंत्रणा असावी, अशी माझी इच्छा आहे. या संदर्भात आपण ई-मेलच्या माध्यमातूनही अनेक सल्ले, सुधारणांच्या सूचनाही देवू शकता. लोकांच्या समजुतींच्या बाबतीतही सल्ला आपण देवू शकता. त्याचबरोबर अशा प्रकारच्या कार्यक्रमाबाबत आपले विचार, मते मांडू शकता. काल सायंकाळी मी आलो होतो. सगळ्यांबरोबर भेटणे, बोलणे झाले. आजही मला आपले विचार जाणून घेण्याची संधी मिळाली. किती नवनव्या पद्धतीने कोणत्याही गोष्टींचा विचार आपण करता, आणि ते मांडता हे मला यामुळे चांगले समजले.

सरकारमध्ये अनेक नव्या गोष्टी होतात. आता जसे की मी एक छोटासा प्रयोग केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बरोबर घेवून आम्ही हॅकथॉनचा प्रयोग केला. आयआयटी वगैरेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. पहिल्या फेरीमध्ये जवळपास 40 हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सरकारमध्ये मी सांगितले की, जर तुम्हाला काम करताना काही अडचणी येत असतील, काही कामे अवघड वाटत असतील, तर अशा सर्व कामांची तुम्ही एक सूची बनवा. प्रारंभी अशी सूची बनवण्याला विरोध होत होता. विरोध यासाठी होता की, ती सचिव आहे, मी सहसचिव आहे, मी संचालक आहे, माझे प्रश्न मी कसे सांगणार? माझी समस्या आहे, परंतु ती मी सोडवू शकत नाही, हे मी कसे सांगावे, माझी एकप्रकारे बेइज्जत होईल. प्रारंभी अपमान वाटत होता, कसे सांगायचे असा कठीण प्रश्न अनेकांना पडला होता. तरीही आम्ही थांबलो नाहीत. आमच्या कार्यालयाचे लोक सतत पाठपुरावा करत राहिले. अखेरीस त्यांनी छाननी करून 400 समस्या, प्रश्नांची सूची केली. या समस्यांवर कोणताही तोडगा नाही, असे कर्मचारी मानत होते. आता हे 400 प्रश्न आम्ही महाविद्यालयांच्या मुलांना दिले. तुम्ही हॅकथॉन करा आणि समस्या सोडवून द्या. या मुलांनी अगदी विश्रांतीही न घेता, 40-40 तास विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये काम केले. संपूर्ण हिंदुस्थानातल्या 16 ते 18 या वयोगटातल्या मुलांनी आपले बुद्धीकौशल्य पणाला लावले आणि प्रत्येक समस्येवर अतिशय चांगली चांगली उत्तरे शोधून काढली. रेल्वेवाल्यांनी तर लगेच दुसऱ्‍याच दिवशी या मुलांना मिटींगला बोलावले आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकारही केला. त्याचबरोबर रेल्वे नवीन कार्यप्रणाली लागू केली. सर्व विभागांनी या द्वारे सुचविलेले पर्याय, उत्तरे स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे.

आज देशातल्या 16 ते 18 वयोगटातल्या नवयुवकाच्या वडिलांना विचारले, तुमचा मुलगा काय करतो, तर ते आपल्या मुलाला उणे दहा गुण देतील. परंतु याच नवयुवकांनी आज देशासाठी इतके मोठे काम केले आहे. या 40 हजार नवयुवकांना काही तरी वेगळे करण्याची संधी देण्यासाठी मी केलेला हा एक प्रयत्न होता. आपल्यामध्येही असा प्रयत्न करण्याचे सामर्थ्य आहे. तुमच्या आणि माझ्या देशभक्तीमध्ये काही फरक आहे, असे मला अजिबात वाटत नाही. आपल्या सगळ्यांमध्ये अगदी एकसारखी देशभक्ती आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात आपल्या देशाला पुढे प्रगतीपथावर नेण्याची तीव्र इच्छा आहे आणि काम करण्यासाठी उदंड संधी आहेत.

आपण सगळेजण मिळून काम केले तर खूपच चांगले परिणाम दिसतील, असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद देतो. कारण वेळ सर्वात मौल्यवान आहे, तो आपण दिला आहे. इतरांसाठी नाही तर रूपये-पैशांच्या दुनियेत राहणाऱ्‍या लोकांच्या दृष्टीने वेळेचे महत्व अधिक आहे. आपण सर्वांनी आपला अतिशय किंमती वेळ दिल्याबद्दल सरकारच्यावतीने मी आपले अगदी मनापासून खूप, खूप आभार मानतो आणि आपले संबंध असेच दृढ बनतील अशी आशा व्यक्त करतो. काही कारणांनी भेटी होतील, अशीही अपेक्षा आहे. पुन्हा कधीतरी एखादा विषय घेवून किंवा विशिष्ट कारणांनी आपण भेटू शकतो. माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

 

 

 

शैलेश/सुवर्णा

 
PIB Release/DL/1337
बीजी -- -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau