This Site Content Administered by
पंतप्रधान

नीती आयोगाच्या चॅम्पियन्स ऑफ चेंज ' उपक्रमात युवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी संबोधित केले

नवी दिल्ली, 22-8-2017

तुम्ही सर्वजण, कालपासून तुमचा बहुमूल्य वेळ, देशात काय असायला हवे, का हवे, कसे व्हावे यावर मंथन करत होतात. आपापल्या क्षेत्रातील अनुभवांच्या आधारे तुम्ही देशाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होतात.

तुम्ही पाहिले असेल, इथे एक प्रकारे सरकारचे निर्णय घेणारी जी टीम असते, जे धोरणात्मक निर्णय घेणारे लोक असतात, ते सर्व इथे बसले आहेत. तुमची  प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकण्याचा समजण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला खात्री आहे की हा प्रयत्न यशस्वी होईल. सरकारमध्ये विचार करण्याची जी पद्धत असते, सरकारमध्ये असताना एका गोष्टीचा एखादा पैलू नजरेस पडतो, दुसरा पैलू राहून जातो. या संवादामुळे, या चर्चेमुळे, एक प्रकारे 360 अंशाचा दृष्टिकोन प्रत्येक विषयाच्या संदर्भात, प्रत्येक समस्येच्या संदर्भात किंवा प्रत्येक सूचनेसंदर्भात समोर येतो. आणि म्हणूनच जेव्हा धोरणे आखली जातात, तेव्हा किंवा धोरणांच्या अंमलबजावणीसाठी रूपरेखा तयार केली जाते तेव्हा या गोष्टी उपयुक्त ठरतात. असे तर नाही होऊ शकत की पंतप्रधानांच्या मनात जितके विचार आले, ते सर्वच्या सर्व विचार सरकारमध्ये लागू होतील. नाहीतर देश चालूच शकणार नाही. पंतप्रधानांनाही आपले विचार सोडून द्यावे लागतात. तुम्हाला देखील हे चांगले माहित आहे की तुम्ही जे सांगितले आहे त्यापैकी काही गोष्टी उपयोगी ठरतील, काही ठरणार नाहीत. मात्र ज्या उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे नक्कीच पूर्वीच्या स्थितीत, पूर्वीच्या धोरणांमध्ये, पूर्वीच्या दृष्टिकोनात खूप मोठा बदल होईल. सादरीकरणाची तुमची स्वतःची एक वेगळी पद्धत असते.  तुमचा वेगळ्या प्रकारे विकास झालेला असतो. तुम्ही ज्या जबाबदारीने काम करत आहात, त्यामध्ये परिणामाभिमुख असे तुमचे काम असते. सरकारचे बहुतांश काम कल्याण राज या कल्पनेने चालते. लोकहिताला प्राधान्य असते. जनसुख कार्याला प्राधान्य असते. माझ्या कंपनीने कोणते उद्दिष्ट आखले होते आणि काय साध्य झाले, माझी कंपनी किती पुढे गेलीहे तुमच्या विचारांच्या कक्षेत असते. किती मागे राहिली याच्याशी काही देणेघेणे नसते. आपली कंपनी किती पुढे गेली हे तुमच्यासाठी महत्वाचे असते. आणि खूप स्वाभाविक आहे. मात्र जे सरकारमध्ये आहेत त्यांच्यासाठी सरकार कुठे आहे यापेक्षा देश कुठवर पोहोचला आहे याची अधिक जबाबदारी असते. देशातील सर्वात शेवटच्या टोकाचा माणूस कुठवर पोहोचला ही त्याची जबाबदारी असते.  आम्हाला सगळे माहित आहे, की प्रत्येकाच्या मनात विचार येतो की सरकारला एवढे समजत नाही, आम्ही रोज पाहतो, असे होते, मात्र हे लोक काही काम करत नाहीत. हे प्रत्येक देशवासीयांच्या मनात आहे. मात्र तुम्ही जर ते समस्यांशी जोडलेत तर तुम्ही पाहिले असेल की त्याची  सूचना देण्याची पद्धत देखील बदलते. जर तुम्ही सरकारबरोबर एक क्लायंट म्हणून बसला असता तर तुमची बोलण्याची पद्धत वेगळी असती. मात्र जेव्हा तुम्ही सरकारमध्ये भागीदार म्हणून बसलेले असता, तेव्हा तुम्हाला वाटते की नाही, आपण अशा गोष्टी सांगाव्या ज्या करता येणे शक्य आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा माझा उद्देश हाच आहे की या देशातील प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा देश माझा आहे. या देशाला मला पुढे न्यायचे आहे. समस्या आहेत. अडचणी आहेत. ईश्वराने जेवढी बुद्धी मला दिली आहे तेवढी बहुधा सरकारमध्ये असलेल्याना दिलेली नाही. मात्र तरीही मी जिथे कुठे असेन तिथून मला त्यात काही जोडायचे आहे.

आपल्या देशातील स्वातंत्र्य लढ्याचेच उदाहरण घ्या ना, आपली शेकडो वर्षांची गुलामगिरी पाहिली तर या शेकडो वर्षात एक वर्ष असे गेले नाही की, भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यासाठी आवाज उठलेला नाही. अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न प्रत्येक कालखंडात झालेला आहे. हजारो वर्षांची गुलामगिरी मानली तर हजार वर्षे त्या पूर्ण हजार वर्षात झाली आहेत. मात्र स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांची कमतरता नव्हती. आज एकाला फासावर चढवले तर उद्या दुसरा मैदानात तयार असायचा. दुसऱ्याला फाशी मिळाली तर परवा तिसरा यायचा. एक मालिका चालू असायची देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची. आणि स्वातंत्र्याचे वातावरण बनवण्याचा एक निरंतर प्रयत्न सुरु असायचा. आणि प्रत्येकाला वाटायचे की मी माझे बलिदान देऊन देशाची सेवा करत आहे. महात्मा गांधी यांनी काय परिवर्तन घडवले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर २०१७ ते २०२२ या काळात आपल्याला कुठे जायचे आहे, का जायचे आहे, कुणाच्या भरवशावर जायचे आहे, कुणासाठी जायचे आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.

आणि म्हणूनच गांधींनी काय केले. वैयक्तिकपणे देशासाठी बलिदान देणाऱ्यांची कमी नव्हती, लोकांना फाशीवर चढवले जात होते. अंदमान निकोबार मधील तुरुंगांमध्ये आपले तरुणपण दवडत होते. मात्र गांधीजींनी प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यात सहभागी करून घेतले. एक असे वातावरण निर्माण केले की एखादा शिक्षक शिकवत असताना त्याच्या मनात अशी भावना असेल की देशासाठी मी या मुलांना शिकवत आहे. तुम्ही सफाईचे काम आधीही करत होतात, आजही करता. मात्र तुम्ही सफाईचे काम करत आहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तुम्ही शेतकरी आहात, शेत नांगरता, शेतात काम करता, आधीही करत होतात. आताही करता, मात्र मनात भावना असू द्या की मी देशासाठी शेती करत आहे.

संपूर्ण भारतात प्रत्येकाच्या मनात गांधीजींनी ही भावना निर्माण केली की तो जे काम करत आहे, देशासाठी करत आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी करत आहे. आणि इंग्रजांसाठी हि गोष्ट समजणे खूप कठीण होते. कुणी रस्त्यावरून अचानक समोर उभा राहिला तर गोळी चालवणे इंग्रजांसाठी सहजशक्य होते. कुणी समोर उभे राहिले तर त्याला पकडून तुरुंगात टाकणे सोपे होते. मात्र तो आपल्याच घरात काम करत आहे मात्र तो म्हणतोय मी तर स्वातंत्र्यासाठी हे करतो आहे , त्याला कसे कराल. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला लोक चळवळीचे स्वरूप दिले.  त्यामुळेच एवढा मोठा परिणाम दिसून आला. आज आपल्या देशात पुढे जाण्यासाठी प्रत्येक सरकारने प्रयत्न केले आहेत. ज्याची जिथे जबाबदारी असेल, त्याने प्रयत्न केला आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर विकास... ही लोक चळवळ बनू शकली नाही. आम्ही हे करून दाखवू. जर माझ्या देशात एवढे डॉक्टर असतील, जर डॉक्टरांच्या मनात भावना असेल की कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही मेहनत करू. बालकांच्या आरोग्यसेवेसाठी आमचे हे योगदान असेल. नव्या पिढीला आम्ही असे घेऊन जाऊ. माता मृत्यू दर ... शिशु मृत्यू दर यांना आपण जागतिक दर्जाच्या बरोबरीत आणू. जर ही भावना निर्माण झाली तर कोण म्हणेल की देशात बदल घडू शकत नाही. कोण म्हणेल की सरकारांची गरज आहे. सरकार एक निमित्तमात्र संस्था म्हणून काम करेल. देश स्वतःच मार्गक्रमण करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही आज 2017 मध्ये आहोत, भारत छोडोला 75 वर्षे झाली आहेत आणि स्वातंत्र्याला 70  वर्षे झाली आहेत. 2022 मध्ये  स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील.

देशाला इथून इथे घेऊन जाऊ. असे वातावरण निर्माण करायचे आहे. या मंथनातून मला तुम्हा लोकांची खूप गरज आहे, तुम्ही जिथे आहात, तिथे ज्या लोकांच्या सहवासात आहात, तुम्ही देखील एका आधुनिक भारताचे सैनिक बनू शकता. एका समृद्ध भारताचे सैनिक बनू शकता. जगात आपले नाव उंचावू शकाल, सामर्थ्यवान बनाल अशा भारताचे सैनिक बनू शकता. अशा प्रकारे एकत्रितपणे बसून आपण एकेका गोष्टीला हात लावला तर आपल्याला मार्ग मिळत जातील.

आपल्याला वाटेल, हो, हे मी करू शकतो. या समस्येवर उपाय आहे... मी इथे पाहत होतो की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यासह अनेक विषयांवर तुम्ही चर्चा केलीत आणि खूप छान-छान सादरीकरण देखील तुम्ही केले, खूप चांगल्या पद्धतीने सादर केले. सादरीकरणाचा दर्जा तर चांगला होताच.

मात्र हे मी यासाठी म्हणत नाही, मी यासाठी सांगतो की मला या टीमला... माझ्यासाठी तुम्ही माझी टीम आहात. माझ्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. मी आणि तुम्ही खांद्याला खांदा लावून काम करू या आणि हे तेव्हा होईल जेव्हा आपल्या बैठका होतील. तुमचे विचार माझ्या योजनांचा भाग बनतील, माझे विचार तुमच्या पुरुषार्थाचा आधार बनतील, तुम्ही बघा, कसा मोठा बदल होऊ शकतो.

आता बघा, कृषी क्षेत्रात एक छोटासा विषय आहे. आपण अर्थजगतातील लोक आहोत, आयात निर्यातीची मोठी चर्चा करतो. मला सांगा, जो देश कृषिप्रधान आहे, ज्या देशाचा आत्मा गाव आहे, ज्या देशाची पूर्ण चर्चा गांधीजींच्या जीवनातील गावाशी निगडित आहे, आणि तो देश लाकूड आयात करतो. मला सांगा, कुठून कुठे पोहोचलो. काय कारण आहे की आपण लाकूड आयात करतो. आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, सरकारमधील कायदे बदलले जाऊ शकतात का, त्याच्या शेतात जिथे बांध असतो, तिथे लाकडाची शेती करायची आणि त्याला ते लाकूड कापण्याचा आणि विकण्याचा अधिकार मिळायला हवा. माझ्या देशाची लाकडाची आयात बंद होईल की नाही. माझ्या देशातील शेतकरी, आपल्या देशाचे एक दुर्भाग्य आहे की दोन शेतांच्या मध्ये आपण जितकी जमीन वाया घालवतो कुंपण घालून... म्हणजे अशी झाडे लावतो, काटे लावतो. एक याचे नुकसान होते, एक त्याचे नुकसान होते. मात्र जर तिथेच लाकूड लावले तर मला सांगा देशाची लाकूड आयात कमी होईल. त्याच्या जमिनीचा अधिकाधिक वापर होईल आणि सरकारचे कायदे बदलल्यामुळे किती मोठा बदल घडून येऊ शकतो. सरकारमध्ये चर्चा सुरु आहे.

सांगायचे तात्पर्य हे की, आम्हाला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवायचे आहे. मात्र आम्ही पशुपालनाबाबत विचार करणार नाही, कुक्कुटपालनावर विचार करणार नाही, मत्स्यपालनावर विचार करणार नाही. आम्ही रंगीबेरंगी मत्स्यपालनाबाबत विचार केला नाही तर आपण एक संपूर्ण संरचना जी बनवायची आहे ती बनवू शकणार नाही. आमच्यासाठी आवश्यक आहे मूल्य संवर्धन कसे होईल, जागतिक बाजारपेठेत आपले असे कोणते कृषी उत्पादन आहे जे अमूक एक बाजारपेठ टिकवून ठेवू शकेल. आखाती प्रदेश, तिथे लोकसंख्या वाढत आहे, तेल आहे, पाणी नाही. तेल कितीही असेना का, जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यांना कृषी उत्पादने आयात करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या गरजांचे सर्वेक्षण करून आपण आपल्या शेतकऱ्याचा शेतमाल तिथपर्यंत पोहचवण्यासाठी आपले कृषी तज्ञ किंवा कृषी मूल्यवर्धनाशी संबंधित लोक एकत्रितपणे प्रयत्न करू शकतील का? हा बदल जर आपण केला तर आखाती देशांना आपण एक प्रकारे त्यांच्या ज्या कृषी गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे आणि त्यांनी आपल्या ऊर्जा संबंधित गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे, दोघांनाही लाभ मिळेल या दिशेने पुढे जाऊ शकतो की नाही? आणि म्हणूनच इथे माझ्यासमोर एक अशी टीम आहे जे अशा प्रकारचे नवे प्रयोग करू शकतात. भारत सरकार येत्या नोव्हेंबरमध्ये जागतिक दर्जाचा एक कार्यक्रम करणार आहे ज्यात प्रामुख्याने अन्न प्रक्रियेवर आम्ही भर देणार आहोत. तुम्ही पाहिलेच असेल  अन्न प्रक्रियेत थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून आम्ही १०० टक्के केली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा केवळ नारा नाही. कृषी क्षेत्रात पायाभूत विकासातही आज आपल्याकडे अंदाजे एक लाख कोटी रुपये .. भारतासारख्या देशासाठी हि छोटी रक्कम नाही. एक लाख कोटी रुपयांचा आपला कृषी माल, फळं असतील, फुले असतील, भाज्या असतील, धान्य असतील, त्यांचे नुकसान होते. कारण आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. आता या पायाभूत सुविधांमुळे देखील रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. वित्तीय संस्था, खासगी क्षेत्र, गृह निर्मिती क्षेत्रातील जे लोक आहेत, जर त्यांनी या सुविधा निर्माण केल्या, तर मला सांगा बहुविध लाभ मिळतील की नाही. आणि म्हणूनच आमचा दृष्टिकोन... आमचा दृष्टिकोन काय आहे. आपण देशाच्या गरजा पूर्ण करायला हव्यात. आपण आपल्या व्यापाराचा विस्तार करायला हवा आणि आपल्या देशाचा जीवन स्तर सुधारण्यासाठी मूलभूत गोष्टींचा विकास करत राहायला हवे.

जर या गोष्टी लक्षात घेऊन आपण आपला विकासाचा प्रवास केला तर मला खात्री आहे की आपल्याला हवा असलेला परिणाम आपण साध्य करू शकू. आणि सरकारचे तुम्ही बारकाईने निरीक्षण केले असेल. कालपासून तुम्ही इथे अनेक विषयांवर चर्चा केली असेल. या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या महत्वपूर्ण निर्णयांमुळे मूलभूत गोष्टीत मोठे परिवर्तन घडले आहे.

आता तुम्हाला माहित असेलच पूर्वी आपल्या देशात शेतकरी युरियामुळे चिंताग्रस्त असायचा. वेळेवर युरिया मिळेल की नाही. आणि शेतकऱ्याला वेळेवर युरिया मिळाले नाही तर युरिया मिळणे वाया जाते. आणि म्हणूनच मला आठवतंय जेव्हा मी मुख्यमंत्री होतो मी पंतप्रधानांना पत्र लिहीत असे की माझ्या राज्यात इतक्या वेळेत आणि निरंतर युरिया मिळायला हवा... किती मिळेल...अमुक मिळेल... आणि जेव्हा मी पंतप्रधान बनलो तेव्हा सुरुवातीच्या तीन महिन्यात मला सर्वात जास्त पत्रे आली मुख्यमंत्र्यांची, ती युरियाबाबत. आपल्या देशात युरियासाठी पोलिसांचा लाठीमार व्हायचा.

युरियासाठी शेतकऱ्यांना तीन तीन दिवस रांगेत उभे राहावे लागत असे. विमुद्रीकरणानंतर तीन तीन दिवस बँकांबाहेरची  रांग तुम्ही टीव्हीवर पाहिलीच असेल. माझ्या देशाचे दुर्भाग्य आहे की युरियासाठी उभे असलेले आपले शेतकरी कधी टीव्हीवर दाखवले नाहीत. हा फरक आहे. समस्यांकडे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा. या सरकारने काही बाबतीत पुढाकार  घेतला. एक सर्वात मोठे पाऊल... युरियाच्या कारखान्यासाठी गॅस लागतो. आपल्याकडे गॅसच्या विविधतेचे धोरणे होती. कुणाला एका किमतीवर गॅस मिळायचा.. कुणाला दुसऱ्या... अटीनुसार मिळायचा. आम्ही सगळ्यात सुसूत्रता आणली. एकाच प्रकारचा बॅच बनवला, जेणेकरून सर्वाना सुलभ ठरेल.

दुसरे.. आपल्या देशात मोठा... तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसे झाले असेल? जर तुमची क्षमता आहे १० लाख मेट्रिक टनांची आणि तुम्ही 5 टक्के अधिक उत्पादन घेता, तर सरकार तुम्हाला इतके पैसे द्यायची, जितके तुम्ही उत्पादन घेता. आणि याचा परिणाम असा झाला की एक प्रकारे प्रचंड उत्पादन झाले. आम्ही हे सारे नियम बदलले. आज याचा परिणाम असा आहे की सरकारचे पैसे तर वाचलेच मात्र वीस लाख टन युरियाचे त्याच कारखान्यात अतिरिक्त पैसे झाले. उत्पादन वाढले. केवळ धोरणात्मक हस्तक्षेपामुळे. नंतर आम्ही युरिया निमकोटिंग केले. आता तुमच्यापैकी कुणी रसायनवाले इथे नसतील. असे मी मानून म्हणतो.. दानी तर आहेत इथे. मात्र युरिया शेतात कमी जायचा, रसायने कारखान्यात अधिक जायची. कारण त्यांना अनुदानित युरिया मिळायचे.

आणि मूल्य वर्धन करून उत्पादने बनवून जगभरात विकायचे. आम्ही युरियाला कडूनिम्बाचे आच्छादन दिले. त्यामुळे एक ग्रॅम युरिया देखील कुठल्या अन्य कामात वापरता येणार नाही, तो जमिनीतच टाकावा लागेल. आणि याचा परिणाम असा झाला की जे सायंफेन असायचे , ज्याची चोरी व्हायची, अन्य कामासाठी वापरले जायचे, ते संपुष्टात आले. आज देशात कुठेही युरियाची मागणी नाही. सांगायचे तात्पर्य हे की आम्ही कशा प्रकारे  एकेक गोष्टीच्या वापराबाबत सजग आहोत. मी मुळात तुकड्यातुकड्यांमध्ये गोष्टी करत नाही. मी जेव्हा सांगतो की बघा तुमच्याकडे पैसे जमा आहेत आणि सरकारने योजना आणली आहे, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा करू नका मग 8 नोव्हेंबर तारीख उजाडते आणि म्हणूनच आम्ही कधीच कोणती गोष्ट तुकड्यातुकड्यात सांगत नाही. माझ्या मनात तर स्पष्ट असते की, ही गोष्ट घडल्यानंतर येईल. पण कोणाला किती सांगायचे आहे आणि ते तर मी यासाठी सांगतो की सरकारने अनेक प्रकारे पुढाकार घेतला आहे.

आता मला सांगा की डिजिटल इंडियाच्या दिशेने आपल्याला जायचे आहे की नाही. डिजिटल इंडिया अंतर्गत, आमचे ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम सुरू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा मी आलो होतो तेव्हा कदाचित तीनशे साठ गावे होती, ज्या ठिकाणी ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचले होते. आता आम्ही सुमारे लाखोंपर्यंत पोहोचलो आहोत. तीन वर्षांच्या आत दृष्टिकोन बदलला तर त्याचे परिणाम दिसू लागले. आता आम्हाला कमी रोकडयुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. तुम्ही मला सांगा की तुमच्या कंपन्या 2022 मध्ये देशाला या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एक काम... आमचा संपूर्ण व्यवहार आमच्या कर्मचा-यांचाही संपूर्ण व्यवहार म्हणजे असे नाही की आम्ही त्याला ई-पेमेंट देणार आणि नंतर लोक रोख रक्कम काढून व्यवहार करतील. असे नाही आहे. आम्ही त्यांना देखील शिकवणार आहोत की तुम्ही भीम ॲप डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईल फोनने आणि त्या ठिकाणी लहान मोठे व्यापारी असतील, त्यांना देखील शिकवणार आहोत. तुम्ही भीम ॲप डाऊनलोड करा आणि आमच्याकडे कोणी असा नसेल, जो रोखीचे व्यवहार करेल. मला सांगा ही देशसेवा असेल की नसेल आणि म्हणूनच मला ही भागीदारी हवी आहे. आम्ही कसे करायचे. आता कधी कधी मी पाहात असतो या दिवसात तुम्ही, तुम्ही लोक दिवाळीच्या दिवसात तुमच्या या कंपन्या भेटवस्तू देतात.. त्या द्याव्या लागतात. भले काहीसे उशीराने का होईना पण आपण हा दृष्टिकोन बदलू शकतो का की आपण भेटवस्तू देण्याची सवय लावून घेऊ, ज्यामुळे गरिबाच्या घरात दिवा जळेल. तुम्हा लोकांना खरेदीची कूपन्स देऊ या आणि सांगू या की तुम्ही आमचा 2000 रुपयांचा माल खरेदी करू शकता. तुम्ही खादी का देऊ शकत नाही. तुम्ही भेटवस्तू म्हणून खादीचे गिफ्ट पॅक देऊ शकत नाही का? मी असे म्हणत नाही की ज्याच्या घरी हा गिफ्ट पॅक जाईल तो खादीधारी बनेल म्हणून. खादीधारीच बनले पाहिजे अशी काही गरज नाही. पण जर तुमच्याकडे पन्नास प्रकारचे कापडाचे प्रकार असतील तर त्यात एक खादी देखील असू शकते. सांगायचे तात्पर्य काय तर आमच्या सर्व व्यवहारात मी अशा गोष्टींचा समावेश करत आहे की माझे सर्व कर्मचारी एकत्रितपणे, ज्या कारणामुळे मी देशातील गरिबीच्या समस्येची कशा प्रकारे हाताळणी करत आहे. माझ्या देशाला मी सकारात्मक दृष्टीने हाताळत आहे का? तुम्ही पाहा, आपोआपच बदलाची एक प्रक्रिया सुरू होईल. याचा अर्थ हा नाही की मी दर्जाबाबत कोणतीही तडजोड करेन. माझी सुखे मी कमी करावीत, असा आग्रह मी तुमच्याकडे धरणार नाही. आपण एक असे वातावरण तयार केले पाहिजे की आपण गरिबातील गरीब लोकांना सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे.

आता तुम्हाला हे ऐकून आनंद होईल. सरकारमध्ये काही खरेदी करायचे असेल तर किती प्रकारे कागदावर प्रक्रिया केली जाते. निविदा निघणार.. निविदेच्या अटी आणि शर्ती निघणार मग निविदा भरणारे येणार मग पाहावे लागेल की मंत्रिमहोदयाच्या पुतण्याची निविदा आली की नाही. या सर्व बाबींशी देश चांगल्या प्रकारे परिचित आहे. निविदा उघडायच्या की नाहीत, सध्या स्थिती ठीक नसेल तर मग रिजेक्ट करून टाका. या सर्व गोष्टींशी तुम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहात. देश परिचित आहे. कोणती गोष्ट आपल्या देशात... पारदर्शक आहे हो. अप्रामाणिकपणा देखील सर्वांना ठाऊक आहे. आता एवढ्या मोठ्या सरकारमध्ये एक लहान व्यक्ती आपली उत्पादने पुरवू शकते की नाही. ज्या वेळी इतक्या मोठ्या निविदा प्रक्रियेतून ती व्यक्ती जाईल तेव्हा ती काय करेल. सरकारने एका लहानसा मंच तयार केला जेम(जीईएम) नावाचा... तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की या पोर्टलवर जाऊन तपासून पाहा आणि सरकारचे सर्व विभाग आपली मागणी त्यावर नोंदवत असतात की आम्हाला या वस्तूची गरज आहे. आम्हाला 25 नॅपकीन पाहिजेत, आम्हाला दोन डस्टबीन पाहिजेत, वेस्ट पेपर बास्केट पाहिजेत, 25 झाडू हवेत, जे काही असेल ते 100 खुर्च्या हव्यात अशी आपली मागणी लिहितात. मग मालाचा पुरवठा करणारे पुरवठादारही त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा माल आहे, त्याचा दर्जा काय आहे, प्रत काय आहे, त्याचा तपशील लिहितात.

सरकारने नियम बनवला आहे की त्यामध्ये दर्जाशी तडजोड न करता जे स्वस्त आहे त्याची खरेदी करायची, त्यासाठी निविदा वगैरे काही नसेल, सर्वांना ऑनलाईन उपलब्ध असलेले सर्व काही पाहता येते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा प्रयोग सुरू करून चार-सहा महिने झाले आहेत आणि सरकारमध्येही त्याची माहिती जेवढी पसरायला हवी होती तेवढी पसरलेली नाही. तरीही या जेमच्या माध्यमातून सरकारकडून एक हजार कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. एक हजार कोटी रुपये आणि मालपुरवठादार किती ते ऐकून तुम्ही चकित व्हाल. 28000 पुरवठादारांनी मिळून हे एक हजार कोटी रुपये दिले आहेत. याचा अर्थ एकाच्या नशीबी किती लहान लहान लोक असतील. या लहान लहान लोकांनी आपल्या मालाचा पुरवठा केला आहे आणि हा परिणाम दिसून आला आहे. तेच जर पूर्वीची जुनी निविदा प्रक्रिया असती तर कदाचित याच मालासाठी सरकारने 1700 रुपये चुकते केले असते आणि हजार कोटींमधून काय आले असते ते तर देवालाच ठाऊक. माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे की गोष्टी कशा बदलत चालल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे पारदर्शकता आणली जात आहे. आता तुमच्याही मनात काही लोक असतील. अगदी तुमचा कर्मचारी असेल, त्याचा मुलगा एखादे लहानसे उत्पादन तयार करत असेल. त्याला तुम्ही सांगू शकता की जेम (GeM) मध्ये नोंदणी कर म्हणून. बघा सरकारला तुम्ही लिहा, तुमचा कोणताही माल तिथे जाईल. आपण उद्योजकतेला कशा प्रकारे चालना देऊ शकतो. आपण कसे बदलू शकतो. आता आपल्याकडे पर्यटन, तुमच्या प्रत्येक सादरीकरणामध्ये पर्यटनाचा उल्लेख होत आहे. पर्यटनासमोर सर्वात मोठी समस्या कोणती आहे. माझा प्रश्न खूपच चकित करणारा आहे. आपण कधी तरी विचार केला का की आपली मानसिकता आपली सर्वात मोठी हानी करत आहे. मी हे तुम्हाला ऐकवत नाही आहे आपण सर्व विचारमंथन करत आहोत. मी देखील तुमच्या विचारांसोबत माझ्या विचारांना एका मंथनाच्या स्वरुपात व्यक्त करत आहे. गेल्या एका वर्षात मी माझ्या मनातील विचार सांगत असतो, त्यामध्ये सुटीमध्ये मी मुलांना म्हटले की तुम्ही लोक जाता त्यावेळी तुम्ही जे कुठले ठिकाण पाहायला जाल त्याची छायाचित्रे या हॅशटॅग द्वारे पाठवा. लाखोंच्या संख्येने छायाचित्रे माझ्या संकेतस्थळावर आहेत. लक्षावधी छायाचित्रे पाहून मी चकित झालो. मी काही पाहायचो जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा. आपल्या देशात अशी अशी ठिकाणे आहेत, अशी नैसर्गिक दृश्ये आहेत, जे गेले आहेत त्यांनी छायाचित्रे पाठवली आहेत. लक्षावधी छायाचित्रे आहेत माझ्या संकेतस्थळावर. लक्षावधीतील लक्षावधी अशी छायाचित्रे आणि मी देखील चकित झालो होतो. कधी कधी वेळ मिळाला तर काही छायाचित्रे पाहायचो. आपल्या देशात अशी अशी ठिकाणे आहेत, अशी नैसर्गिक दृश्ये आहेत, जे गेले आहेत त्यांनी छायाचित्रे पाठवली तर ती पाहायला मिळतात आणि लक्षात येते की हॅशटॅगमुळे किती तरी लोकांनी ती पाहिली असतील. पण आपल्या लोकांची मानसिकता काय आहे, कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी जायचे आणि मन प्रसन्न करायचे. त्या वेळी आपल्या तोंडून पहिले वाक्य काय निघते, अरे या ठिकाणी वाटत नाही आपण भारतात आहोत म्हणून. आता मला सांगा पर्यटनाला चालना कशी मिळणार. जर तुम्हीच तुमच्या मुलांवर प्रेम करत नसाल, त्यांना महत्त्व देत नसाल तर तुम्ही राहत असलेल्या परिसरातील, गल्लीबोळातील लोक कसे देतील ते मला सांगा. जर आपल्यालाच आपल्या गोष्टींचा अभिमान नसेल, तुमच्याकडे खरेदीदार येत असतील, विक्रेते येत असतील. जागतिक समुदायाशी तुमचा संबंध असेल. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांनी सांगितले असेल की तुम्ही आला आहात पण तीन दिवस जास्त काढून या. या विकेंडला तर ही जागा पाहून या. पर्यटन तर आपण, आता पाहा पर्यटन काही सरकारच्या जाहिरातबाजीने होत नाही. कोणी एकाने सांगितले की मित्रा मी गेलो होतो त्या ठिकाणी तूही जाऊन ये. मग तुम्ही नक्की गेला असता. कारण पर्यटनामध्ये एक अज्ञाताची भीती आतूनच तयार झालेली असते. अज्ञाताची भीती आतूनच निर्माण झालेली असते पर्यटकाच्या मनामध्ये. पण ज्या दिवशी त्याला कोणी तरी सांगते की मी गेलो होतो त्या ठिकाणी जाऊन काय करायचे आहे, आपोआप निघतो त्या ठिकाणी जाण्यासाठी.आपल्या भारतीयांच्या हे स्वभावातच नाही. आपल्या इथे एखादी औषध कंपनी... कोणी आहे का औषध कंपनीवाले. चला ठीक आहे मी बोलू शकेन... हे औषध कंपनीवाले डॉक्टरांना विशेष पर्यटन सहलींना पाठवतात. तुम्हाला माहित आहे का ते काय करतात. कुठे घेऊन जातात, सिंगापूरला नेतात, दुबईला नेतात. त्यांना वाटत नाही की आपल्या देशात हंपी नावाचे एक ठिकाण आहे. चला तिकडे जाऊया. कर्नाटकमध्ये जाऊया, सहा गोष्टी पाहून येऊया, राजस्थानात जाऊया पाच ठिकाणे पाहून येऊया. आपण आपल्याच गोष्टींना महत्त्व देत नाही. जोपर्यंत आपण आणि आपण हा विचार करत नाही की आपण जगाला तंत्रज्ञानविषयक पर्यटन घडवूया. कृत्रिम मौजमजेच्या वातावरणाऐवजी आपला जो वारसा आहे त्या वारशाची ओळख आपण जगाला करून दिली पाहिजे. हा वारसा पाहण्याची संपूर्ण जगात उत्सुकता आहे. मला अगदी नीट आठवतय गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला असलेले छंद. तेव्हा गुजरातमध्ये मला स्वतःला छंद होता तो जंगलांमध्ये भटकंती करायचा, पण त्या वेळी मी राजकारणात नव्हतो. तर त्या वेळी मी वाळवंटात राहायला गेलो होतो. जेव्हा मी कच्छचे पांढरे रण पाहिले तेव्हा माझ्या मनावर एक वेगळाच प्रभाव पडला. मी साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या काळाविषयी बोलतोय. ज्यावेळी मी मुख्यमंत्री बनलो तेव्हा मी या वाळवंटाला पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला. माझी तुम्हाला विनंती आहे की कधी तरी रणोत्सव या संकेतस्थळावर जा. दिवाळीनंतर तो सुरू होतो. तीन महिने चालतो. संपूर्णपणे टेंट सिटी म्हणजे तंबूंची नगरी तयार होते. तुम्ही कल्पनाही करणार नाही असे सौंदर्य माझ्या देशाच्या वाळवंटात असते. संपूर्ण पांढरे शुभ्र वाळवंट आणि या दिवसात नोंदणी करण्यात खूपच त्रास होतो इतकी गर्दी असते. एक नवा अनुभव असतो. अनेक लोक आपली बोर्ड मिटिंग कंपनीच्या रणोत्सवासोबत ठेवतात. कधी कोणी असा विचार तरी केला असेल का एक वाळवंट, पांढरे वाळवंट कधी तरी पर्यटनाचे केंद्र बनू शकते. या पर्यटनामुळे कच्छची हस्तकला, कच्छच्या आणखी इतर वस्तूंसाठी एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली. मग लोकही आपोआपच व्यावसायिक बनू लागले. पॅकेजिंग शिकू लागले. कशा प्रकारे पर्यटकांसाठी जेवण बनवायचे, त्यांना कशा प्रकारे वाढायचे हे सर्व त्यांना येऊ लागले. आधी कोंबडी की आधी अंडे असे हे पर्यटन आहे. पर्यटक आले तर पर्यटन विकसित होणार, जर पर्यटन केंद्र विकसित झाली तर पर्यटक येतील, हाच वाद सुरू असतो. मी ब-याच वर्षांपूर्वी हिमाचलमध्ये काम करत होतो. हिमाचलमध्ये एक ठिकाण आहे मनाली जवळ... एक खूप मोठे कलाकार होते परदेशातील, मी त्यांचे नाव विसरलो, रॉड्रिक असावे, तर मी त्यांचे ठिकाण पाहायला गेलो. कोणत्या तरी ठिकाणी  बैलगाडीने गेले होते, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता, ते परदेशी होते. ठिकाण तर होते मात्र कोणी पर्यटक येत नव्हते. मी तिथे हिमाचल मध्ये असताना आमच्या पक्षाचे लोक सरकारमध्ये होते. त्यांना मी विनंती केली की तुम्ही नियम तयार करा. शाळांच्या सहलीचा जो कार्यक्रम तयार केला जातो त्यामध्ये या ठिकाणी येणे सक्तीचे करा. शाळांच्या बसेस येऊ लागल्या. त्या जशा येऊ लागल्या तसे चणे विकणारे येऊ लागले, पाणी विकणारे येऊ लागले, चहा विकणारे येऊ लागले, हळूहळू पायाभूत सुविधा विकसित होऊ लागल्या. गरजांना विकसित करणारे तयार झाले. नंतर लोकांसाठी देखील पर्यटन केंद्राच्या नकाशात हे ठिकाण तयार झाले. आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि मला असे वाटते की सरकारकडून जितक्या प्रमाणात पर्यटनाचा विकास होऊ शकतो त्यापेक्षा जास्त पर्यटनाची एक वृत्ती आपण निर्माण केली पाहिजे. याला चालना देण्याचे बळ आपण दिले पाहिजे आणि भारतात वेगवेगळ्या यात्रा काही नवी बाब नाही. सध्या सर्किट टूर आहेत. पर्यटनामध्ये सर्किट ही संकल्पना खूपच लोकप्रिय आहे. आपल्या देशात अनेक वर्षांपासून होत असलेली चारधाम यात्रा म्हणजे तरी काय होते ही सर्किट प्रकारातील यात्रा होती. 12 महादेव ज्योतिर्लिंग काय होते सर्किटच तर होते. नऊ गणेश काय होते, सर्किटच तर होते. आपल्या पूर्वजांना सर्किट पहिल्यापासून माहित होते. पायाभूत सुविधा देखील उपलब्ध होत्या. या गोष्टी सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच रोजगार निर्मिती संदर्भात पर्यटनामध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे या विचाराशी मी सहमत आहे. जर आपण या गोष्टींना एकत्र केले, त्यामध्ये आपले योगदान राहिले तर त्याचे परिणाम देखील खूप मोठे दिसतील. तुमच्याकडून अनेक प्रकारच्या सूचना आल्या आहेत त्यांचा नक्कीच उपयोग होईल. पण हे विचार केवळ या कक्षापुरते मर्यादित राहू नयेत, तुम्ही देखील तुमच्या तुमच्या युनिटमध्ये आपापल्या खरेदीदारांमध्ये- विक्रेत्यांमध्ये आपल्या उद्योजकांच्या वर्तुळामध्ये या गोष्टींना प्रोत्साहन द्यावेत, हा माझा प्रयत्न असेल. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम करू शकता का. तुम्हाला एकत्र आणून देशासाठी आपणही काही करुया. तुमच्या औद्योगिक क्षेत्रात जे आहे, मग मी कितीही स्वच्छता अभियान चालवले. तुम्ही ज्या कक्षात बसता ती अतिशय सुंदर असते, पण तिच्या बाहेर असलेल्या औद्योगिक परिसरात पाय ठेवायलाही आवडणार नाही अशी स्थिती असते त्या भागाची. पण आपण सामूहिक जबाबदारी घेत नाही. म्हणून त्या ठिकाणी साफसफाई होत नाही. टाकाऊतून संपत्ती मध्ये उद्योजकाचा देखील खूप मोठा विकास सामावलेला आहे. आपल्या देशात नवे उद्योजक टाकाऊतून संपत्तीमधून कसे तयार करता येतील. त्यांना आपण कशा प्रकारे प्रोत्साहन द्यायचे. बरेच काही होऊ शकते आणि आपल्या पर्यावरणाच्या समस्येचे देखील निराकरण होऊ शकते. आता नागपूरचा एक युवक पाहा. त्याने एक लहानसे काम केले. त्याने आपल्याकडे.. तुम्ही पाहिले असेल, हरियाणा, पंजाबमध्ये शेती करताना पिके घेतल्यावर पाठीमागे जे टाकाऊ घटक राहतात त्यांना जाळण्यात येते. दिल्लीमध्ये जी पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे त्याबद्दल शिव्याशाप पंजाब आणि हरियाणाच्या शेतक-यांना दिले जातात. नागपूरमधल्या एका तरुणांने याच टाकाऊ घटकांची खरेदी केली, शेण खरेदी केले. त्याचे लहान लहान ठोकळे बनवले आणि अंत्यविधीमध्ये मृतदेहाचे दहन करण्यासाठी या ठोकळ्याची विक्री तो करतो. 20 टक्के लाकडाची गरज लागते, मृतदेहाचे त्यानेच ज्वलन होते आणि जी एकूण गरज होती, त्यापैकी 20 टक्के गरज कमी होते. टाकाऊतून सर्वोत्तम तयार होते. अंत्यविधीमध्ये जो वेळ वाया जायचा तो बंद झाला. पूर्वी दोन तासांत मृतदेहाचे दहन होत असे, आता केवळ एका तासात दहन प्रक्रिया पूर्ण होते आणि कुटुंबीय देखील लवकर मोकळे होतात. एक स्टार्टअप काय करू शकते. माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की आपण या गोष्टींना महत्त्व कशा प्रकारे द्यायचे. आपल्या देशात आपली जी दुसरी समस्या आहे तिचे निराकरण आपण केले पाहिजे. आपली जी जागतिक गरज आहे. आपण जागतिक पातळीवर, जगाला ज्या प्रकारे पाहतो, आपल्याला त्या उत्पादनाच्या दिशेने जायचे आहे. मग आपल्यासाठी समाधान हे असते की बघा त्यांची वस्तू पाच हजारात मिळते, माझी चार हजारात मिळते, तुम्ही माझी वस्तू खरेदी करा. खरोखरच आपला या बाबतीतील दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आपल्या देशात ज्या समस्या आहेत त्यांचे निराकरण करणारे उत्पादन मी तयार करू शकतो का. ज्या दिवशी मला ते उत्पादन तयार करता येईल त्या वेळी बघा तुम्हाला दिसेल की आपल्याकडे त्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. जी आपण काबीज करू शकतो. आपल्या याच सामर्थ्याच्या बळावर आपण जागतिक बाजारपेठेतही प्रवेश करू शकतो.

आपण कधी तरी हा विचार केला आहे का की आपल्या देशाला किती वस्तूंची आयात करावी लागते. 2022 पर्यंत किमान पाच वस्तूंची आयात करण्यापासून देशाला वाचवेन. माझ्या देशात या पाच वस्तूंची आयात होऊ देणार नाही. ही माझी देशभक्ती आहे. पाच वस्तू अशा बनवेन की माझ्या देशाचा पैसा बाहेर जाऊ देणार नाही. का नाही करू शकणार, करू शकतो. तुम्ही मला सांगा की तुमच्यात इलेक्ट्रॉनिक वगैरे आयात करा अशी चर्चा सुरू होती. आरोग्य निगेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना भारतात स्वस्त करायचे असेल तर आपल्या अगदी मूलभूत पातळीवर उपयोगी असलेल्या वस्तू, आता मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त रुग्णांची जी गरज आहे ते यंत्र आपण का नाही बनवू शकत. डायालिसिस यंत्र आपण नाही बनवू शकत. आपले उद्योजक या प्रक्रियेतून बाहेर येऊ शकत नाहीत का. आपल्या देशांच्या समस्यांशी जुळवून घेण्याची वृत्ती नवीन पिढीत जर निर्माण झाली तर बाजारपेठ आपोआपच उभी राहील आणि मला असे वाटते की आपण या दिशेने विचार केला पाहिजे. मला असा विश्वास आहे की तुम्ही लोकांना ज्या शिफारशी मला दिल्या आहेत त्या शिफारशी सरकारला उपयुक्त ठरतील. हळूहळू माझ्या मनात जो विचार सुरू आहे की ही काही एका वेळी करण्याची गुंतवणूक नाही. आम्हाला हे सर्व संस्थात्मक करायचे आहे. तुम्ही आहात, तुमच्या सोबत आणखी लोक त्यात सहभागी होऊ शकतो. त्याची जास्तीतजास्त फलनिष्पत्तीभिमुख रचना देखील करता येऊ शकते. अनेक शिफारशी येऊ शकतात. पण ही एक सुरुवात आहे. वेगवेगळ्या गटांसोबत अशा प्रकारे एकत्र बसून चर्चा करायची आणि हळूहळू सरकारला ज्यात रस असेल त्यांना मी सरकारच्या त्या विभागासोबतही काम करण्यासाठी सहभागी करून घेण्याचा विचार करत आहे. जेणेकरून कायमस्वरुपी संवाद होत राहील आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही व्यापार जगात असूनही मला आनंद वाटत आहे की तुमच्या सादरीकरणात उद्योग किंवा व्यापार जगताच्या हिताच्या कोणत्याही सूचना नव्हत्या. सर्व शिफारशी देशहिताच्या होत्या. 2022 विषयीचे माझे स्वप्न करणारी ही बाब आहे. म्हणूनच या गोष्टींना बळ देण्याची आमची इच्छा आहे.

अनेक प्रकारे परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न करत आहोत कारण जितके तुम्ही त्यात सहभागी व्हाल तितका त्याचा परिणाम दिसून येईल, असे मला वाटते. आमच्या नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया यांचे मी विशेषत्वाने अभिनंदन करत आहे. बघा ते आता, एखाद्या मोहिमेच्या स्वरुपात काम कसे केले जाते ते. ते 45 वर्षे अमेरिकेत राहिले. कधीही भारतात येण्याचा विचार केला नव्हता. त्यांचे कुटुंब देखील तिथेच स्थायिक झाले होते. माझी त्यांच्याशी मैत्री होती. मी म्हटले ठीक आहे, तुम्ही भरपूर कमावले आहे आता काही वेळ आम्हाला द्या. माझ्या एका शब्दाखातर ते आले. तीन वर्षात या नीती आयोगाचे काम त्यांनी चालवले आणि पुढे नेले आणि आज एका प्रकारे पूर्वीच्या नियोजन आयोगात आमूलाग्र बदल केला आहे या नीती आयोगाने. त्यांचे खूप मोठे योगदान होते. यात गमतीची बाब ही आहे की या आठवड्यानंतर ते अमेरिकेला परत जात आहेत सर्व काही सोडून पण आजही हे काम अतिशय मन लावून करत आहेत. आपल्यामध्ये बसले आहेत. ही लहान गोष्ट नाही. नाहीतर जायचे असेल तर एक महिना पॅकिंग करायला लागतो. अमेरिकेत परत जायचे असले तरी काही हरकत नाही अगदी मनापासून ते या कामात गुंतले आहेत. आपल्या देशात अशा लोकांची कमतरता नाही, असे मला वाटते. त्यांच्याच भरवशावर आम्ही 2022 चे स्वप्न बाळगून वाटचाल करत आहोत. अरविंदजी आता जाणार आहेत तर माझ्याकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. उत्तम काम केले आहे त्यांनी. हा देश नेहमीच त्यांची आठवण काढेल. त्यांची सेवा लक्षात ठेवेल आणि या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी अरविंदजी राहिले आहेत. तुमच्या सोबत दोन दिवसांपासून बसले आहेत. अतिशय शांत स्वभावाचे आहेत. कोणाशी लवकर ओळख  होत नाही त्यांची की अरविंदजी कोण आहेत. हा सुद्धा एक गुण आहे. ते नेहमीच स्वतःला मागे ठेवतात. पण मला असे वाटते की एक चांगला प्रयत्न चांगला परिणाम दाखवेल आणि तुम्ही लोक नेहमीच संलग्न असाल. सरकारशी तुमचा थेट संबंध आला पाहिजे. तुमच्या सूचना आल्या पाहिजेत. मी स्वतः तर अगदी सहजतेने उपलब्ध असेन, काल कदाचित तुम्हाला सादरीकरण दिले असेल. मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणाशीही कुठूनही संवाद साधू शकतो. मी यामध्ये सहभागी होत राहतो. मी पुन्हा एकदा तुम्हा लोकांच्या या योगदानाबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.

 
PIB Release/DL/1366
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau