This Site Content Administered by
पंतप्रधान

राजस्थानमध्ये विविध महत्वपूर्ण महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 31-8-2017

आपण सर्व आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल मी अंत:करणापासून आपले सर्वांचे आभार मानतो. गेल्या काही दिवसात देशाच्या अनेक भागात पुरामुळे कठीण परिस्थीती उद्भवली. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी हे संकट ओढवले. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले एक निवेदन पाठविले आहे. केंद्र सरकारच्या एका उच्च समितीनेही राजस्थानचा दौरा केला. राजस्थानच्या पूरग्रस्त बंधु-भगिनींना, शेतकऱ्यांना मला सांगावेसे वाटते की संकटाच्या या वेळी केंद्र सरकार ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. या संकटातून बाहेर पडून एका नव्या विश्वासाने आपण पुढची वाटचाल सुरू करू, आपण सर्व मिळून यासाठी प्रयत्न करू. आज एकाच कार्यक्रमात पंधरा हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणे, ही राजस्थानच्या दृष्टीने खरोखरच एक ऐतिहासिक घटना आहे. योजनांची घोषणा करणे, निवडणुकीच्या वेळी तऱ्हेतऱ्हेची आश्वासने देणे, वर्तमानपत्रांमध्ये मोठाल्या बातम्या छापून आणणे, तुम्ही चांगले- आम्ही चांगले, असे खोटे-खोटे वागणे, एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालणे, असले सगळे खेळ गेली अनेक वर्षे आपण पाहतो आहोत, संपूर्ण देश पाहतो आहे. कित्येक वर्षे हेच सुरू आहे. सर्व जुन्या कुप्रथा मोडून काढणे, हेच आजघडीला आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. त्यात आमची किती जास्त शक्ती खर्च होते आहे, याची आपणाला कल्पनाही करता येणार नाही. संपूर्ण यंत्रणेत या कुप्रथांचा शिरकाव झाला आहे. एखादा सामान्य माणूस असता तर घाबरून गेला असता, पण आम्ही वेगळ्या मुशीतून घडले आहोत. आम्हाला आव्हाने झेलण्याची सवय आहे, आव्हानांनाच आव्हान देण्याची सवय आहे आणि आव्हान स्वीकारल्यानंतर योग्य मार्ग स्वीकारून देशाला इच्छित ध्येयाच्या दिशेने नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे धाडसही आमच्यात आहे. आताच नितीनजी एका पुलाचे वर्णन करत होते, २००६ पासून २०१७ पर्यंत, तब्बल ११ वर्षांचा अवधी आणि त्याच्यासाठी तरतूद ३०० कोटी रूपयांपेक्षाही कमी. काय फरक असतो सरकारांमध्ये, काम करणारे सरकार कोणाला म्हणावे, हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. एक लहानसा पुल, ३०० कोटी रूपये खर्च, अगदी नियमितपणे काम झाले तर तो दीड वर्षात तयार होऊ शकतो. अकरा वर्षे उलटली, पाच हजार सहाशे कोटी रूपये खर्च झाले. २०१४ साली दिल्लीत आमचे सरकार आले, विचार केला, योजना तयार केल्या, आराखडे तयार झाले आणि आज तीन वर्षांच्या अवधीत पाच हजार सहाशे कोटी रूपये खर्चाचे प्रकल्प लोकार्पण होत आहेत. ज्या कामाची आम्ही सुरूवात करू, ते आम्हीच पूर्ण करू, अशी संस्कृती रूजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखादी योजना रखडली की काही वेळा एखाद्या निवडणुकीत त्याचा राजकीय लाभही मिळतो. पायाभरणी केली, पुष्पहार गळ्यात घातले, फोटो काढले, वर्तमानपत्रात बातमी आली की एखादी निवडणुक त्या पुण्याईवर काही वेळा जिंकली जात असेल. मात्र नंतर ती योजना रखडली तर त्यावरचा खर्च हजारो कोटी रूपयांनी वाढतो. काम न झाल्यामुळे होणारे नुकसान वेगळे आणि काम रखडल्यामुळे होणारे नुकसान वेगळे आणि अशा रखडलेल्या योजनांमुळे देशाच्या अर्थकारणावर मोठा विपरीत परिणाम होतो. अशा अनेक रखडलेल्या योजना मार्गी लावण्यात सध्या मोठी शक्ती वापरली जाते आहे. याच पुलाचे बघा ना. किती काळ या पुलाचे काम रखडले होते, कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकले होते. धाडसाने, इमानदारीने निर्णय घेतले की त्याचे चांगले परिणामही दिसू लागतात. आज ते चांगले परिणाम आपल्यासमोर आहेत. येत्या काही काळात एकट्या राजस्थानमध्ये नऊ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाची नवी विकासकामे सुरू होणार आहेत. यात प्रामुख्याने रस्त्यांच्या कामंची समावेश आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे रूंदीकरण, काही ठिकाणी मार्गीका वाढविणे तर काही ठिकाणी रस्त्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. एकाच वेळी नऊ हजार कोटी रूपयांची कामे सुरू होणार आहेत. यापैकी पाचशे कोटी रूपये खर्चाची कामे आम्ही आज सुरू केली असती, नंतरच्या काळात आणखी पाचशे कोटी रूपये खर्चाची कामे आणि त्याहीनंतरच्या काळात आणखी पाचशे कोटी रूपये खर्चाची कामे हाती घेतली असती तर राजस्थानमध्ये पुढच्या निवडणुकीपर्यंत आम्ही कामे केल्याचे दाखवत राहू शकलो असतो. मात्र आम्हाला तो मार्ग मान्य नाही. आम्हाला काम करायचे आहे, कालमर्यादेत काम करायचे आहे आणि म्हणूनच एकाच वेळी योजना आखून नऊ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या योजनांची आज पायाभरणी होते आहे. इतक्या जबाबदारीने जेव्हा आम्ही कार्यक्रमांबाबत बोलतो तेव्हा ती पूर्ण करण्याचा संकल्पही आम्ही केलेला असतो.  राजस्थानच्या या भूमीला मला सांगावेसे वाटते की आम्ही बदल घडवून आणणार आणि राजस्थानचा कायापालटही करणार. देशाच्या विकासात पायाभूत सुविधा महत्वाच्या असतात. त्यांचा खर्च जास्त असतो आणि त्या वेळखाऊही असतात. राजकीयदृष्ट्या अनेक लोकांचा धीर सुटतो आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी दीर्घकालीन योजना, बराच काळ चालणाऱ्या कामांपासून चार हात दूर राहात. देशाचा विकास घडवून आणायचा असला तर आपल्या यंत्रणाही आधुनिक असायला हव्यात हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. रेल्वे असो, रस्ते असो, पाणी असो, वीज असो, ऑप्टीकल फायबरचे जाळे असो, जलमार्ग असो किंवा किनारी भागांमधील जोडणी असो, कोणत्याही प्रकारच्या जोडणीत अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात विलंब, भारतासाठी लाभदायक ठरणार नाही. एकदा अशा आधुनिक यंत्रणा विकसित झाल्या की मग प्रगतीचे मार्गही खुले होऊ लागतील. चित्रातल्या रस्त्यावर दिसणारी लांब काळी पट्टी प्रत्यक्षात रस्त्याच्या रूपात साकारेल, तेव्हा ती काळी पट्टीच आपल्या आयुष्यात प्रकाशाचा मार्ग घेऊन येईल. तुम्हीच विचार करा, नऊ हजार कोटी रूपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होईल? त्याला आपल्या पिकाची, फळे, फुले भाज्या यांची वाहतूक सुलभतेने करता येईल. जेव्हा अटल बिहारी वाजपेयीजींनी सुवर्ण चतुष्कोण तयार केला तेव्हा लोक कौतुकाने म्हणत, वा, किती छान रस्ता तयार झाला. पूर्वी असा रस्ता नव्हता. रस्ता तयार झाला आणि त्यावरून प्रवास करायला आनंद वाटू लागला. मला आठवते, राजस्थानचा इथलाच काही भाग गुजरातशी संलग्न आहे. साबरकाठा असो किंवा अहमदाबाद जिल्ह्याचा काही भाग. चांगला रस्ता उपलब्ध असल्यामुळे तेथील शेतकरी आपण पिकवलेली फळे, फुले, भाज्या आणि दुधासारखी उत्पादने दिल्लीच्या बाजारात विकू शकत. त्यामुळे तेथील गावांमधील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडून आला. चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास मोठाच फरक पडतो. जे शेतकरी आपली उत्पादने शहरात सहज नेऊ शकत नाहीत, बाजारापर्यंत पोहोचेपर्यंत ज्यांना विलंब होतो, त्यांची फळे, फुले, भाज्या आणि दुधासारखी उत्पादने खराब होतात. ती खरेदी केली जात नाहीत. जेव्हा रस्त्यांचे चांगले जाळे उपलब्ध असते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही आपल्याला हव्या त्या बाजारापर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त होते. रस्ते तयार झाले की पायाभूत सुविधा प्राप्त होतात. गावातील गरीब स्त्रीची प्रसुतीची वेळ भरत आली असेल, दवाखाना २५-३० किलोमिटर अंतरावर असेल आणि रस्ता चांगला असेल तर माता आणि बाळ, दोघेही सुखरूप राहतील. मात्र रस्ता चांगला नसेल तर त्यांच्या जीवावर बेतू शकते. रस्ते चांगले असल्यास हा फरक पडतो. राजस्थानमधल्या रस्त्यांमध्ये तर पैसे निर्माण करायची क्षमता आहे. देशाच्या इतर भागांच्या तुलनेत राजस्थानला रस्त्यांचा जास्त लाभ मिळतो कारण राजस्थानमध्ये कोणत्याही दोन भागांमधील अंतर फार जास्त आहे. भू भाग विशाल आहे आणि राजस्थानमध्ये पर्यटन व्यवसायाची भरभराट होते आहे. राजस्थान हे जगभरातील पर्यंटकांचे आवडते स्थान आहे. त्यांना पुष्कर मेळाव्याचे आकर्षण असते, झऱ्यांचे शहर असणाऱ्या उदयपूरमध्ये राहण्याची ओढ त्यांना वाटते. जैसलमेरच्या मरूभूमीवर जाऊन एक नवा अनुभव घ्यावा, असे त्यांना वाटते. कोणाला श्रीनाथला जायचे आहे तर कोणाला एकलिंग येथे जायचे आहे. राजस्थानच्या कानाकोपऱ्याबाबत पर्यटकांना उत्सुकता आहे. एक अशी विलक्षण चुंबकीय शक्ती आहे, जी भारताबरोबरच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. जेव्हा पर्यटक येतो, तेव्हा तो आपला खिसा रिकामा करून जातो आणि येथील नागरिकांचे खिसे भरून जातो, हे खरे. पर्यटन हे असे एक क्षेत्र आहे, ज्यात किमान गुंतवणुक करूनही जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. प्रत्येकजण कमावतो. फुल विकणारा कमावतो, प्रसाद विकणारा कमावतो, पुजेचे साहित्य विकणारा कमावतो आणि रिक्षा चालकही कमावतो. विश्राम गृह चालवणारा कमावतो आणि हस्तकलेच्या वस्तू विकणाराही कमावतो, चहा विकणाराही कमावतो. अशी ताकत या राज्यात आहे. मात्र जर येथे वाहतुकीची कोंडी असली, रस्ते खराब असले, योग्य दिशादर्शक नसले, वाहनतळ उपलब्ध नसला, योग्य तेथे इंधन भरायची सोय नसली तर पर्यटक एकदा येईल, पण लवकरात लवकर निघून जाण्याचा विचार करेल. १५००० कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत केवळ जमिनीवर रस्ते तयार होणार नाहीत तर ते राजस्थानचे भविष्य बदलून टाकतील. मला हे दिसते आहे आणि म्हणूनच पायाभूत सुविधाविषयक प्रकल्पांवर भर दिला जात आहे. भारत सरकार या प्रकल्पांचा पूर्ण खर्च करीत आहे, कारण पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारताला सर्वोत्तम बनवायचे आहे. दुर्गम भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे. उदयपूर आणि अजमेरमध्ये असणाऱ्या शाळांमध्ये ज्याप्रकारे दर्जेदार शिक्षण मिळते, तसेच शिक्षण बांसवाडाच्या जंगलात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांच्या मुलांनाही मिळाले पाहिजे. ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारून डिजीटल नेटवर्कच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करत दूरस्थ शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत शिक्षणाचा प्रसार करण्याची ही एक भली मोठी मोहिम आहे. त्याअंतर्गत, लाखो किलोमिटर लांबीचे ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारले जात आहे. ऑप्टिकल फायबरच्या जाळ्यासाठी कोट्यवधी, अब्जावधी रूपये खर्च होतात, ती जेथे टाकली जाते, ते कोणाला दिसत नाही. मात्र मला त्याचे काय? माझ्यासाठी काय केले जात आहे, हे माझ्या लक्षातच येत नाही. जेव्हा ते सक्रिय होईल तेव्हा मुलांच्या शिक्षणात सकारात्मक बदल दिसून येतील, रूग्णांना टेलीमेडीसिन सुविधेचा लाभ घेता येईल. चांगले उपचार शक्य होतील. गावातील लोकांनाही शहरातील सुविधा सहज प्राप्त होतील. भारतातील गावांमध्ये यामुळे किती फरक पडेल, याची कल्पना तुम्ही करू शकता. म्हणूनच पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत आम्ही पुढची वाटचाल करत आहोत.

आत्ताच मुख्यमंत्री उज्वला योजनेबद्दल सांगत होत्या. लक्षावधी गरीब माता भगिनींपर्यंत आज स्वयंपाकाचा गॅस पोहोचला आहे. एक माता जेव्हा चुलीत लाकडे जाळून जेवण तयार करते तेव्हा ४०० सिगरेटइतका धूर तिच्या शरीरात जातो. त्या माता-भगिनींची मुलेबाळेही त्यांच्या जवळपास खेळतात, त्यांच्या आरोग्याची काळजी कोणी घ्यावी? एक काळ असा होता जेव्हा स्वयंपाकाचा गॅस घेणे हे कठीण काम होते. अनेकांची मनधरणी करावी लागे, नेत्यांच्या मागे फिरावे लागत असे. आणि आमचे हे सरकार आहे जे गरीबांच्या घरी जाऊन त्यांना स्वयंपाकासाठीचा गॅस देण्याची मोहिम राबवते आहे, लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ दिलाही आहे.

आधीच्या तुलनेत आज दुप्पट रस्ते तयार केले जात आहेत. आधीच्या तुलनेत आज दुप्पट रेल्वेमार्ग तयार केले जात आहेत. पाणी पोहोचवायचे काम असो किंवा ऑप्टीकल फायबर पोहोचविण्याचे, आम्ही गती वाढवली आहे, प्रमाण वाढविले आहे आणि कौशल्यातही वाढ करून यशस्वीपणे आधुनिकतेची कास धरली आहे.

आताच वस्तु सेवा कर लागू झाला. सुरूवातीला लोकांना वाटत होते, जगाला वाटत होते की हा चमत्कारच आहे. सव्वाशे कोटी लोकांचा विशालकाय देश रातोरात व्यवस्था बदलणार आणि देशातील सर्व सव्वाशे कोटी नागरिक त्या व्यवस्थेशी समायोजन साधणार... यातून भारताच्या क्षमतेचे प्रमाण मिळते. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. माझ्या देशात अगदी गाव-खेड्यातील व्यक्तीसुद्धा तंत्रज्ञान आत्मसात करतो आणि आधुनिकतेचा स्वीकार करतो. लहानात लहान व्यापाऱ्याच्या मनात आज आधुनिक व्हायची इच्छा निर्माण झाली आहे. मला राजस्थानमधील अधिकाऱ्यांना विशेषत: सुचवावेसे वाटते की त्यांनी एक मोहिम राबवावी. व्यापारी लहान असला तरी, २० लाख रूपयांपेक्षा कमी कक्षेतील असला तरी त्याला वस्तु आणि सेवा कराच्या कक्षेत आणा. त्या गरीब आणि लहान व्यापाऱ्यालाही वस्तु आणि सेवा कर प्रणालीचे लाभ मिळाले पाहिजेत. जर तो या यंत्रणेशी जोडला गेला नाही तर विकासाची गाडी अडखळेल, तिथेच थांबेल. विकासाचे लाभ खालच्या स्तरापर्यंत पोहोचणार नाहीत. एखाद्या मोहिमेप्रमाणे काम झाले पाहिजे. आपण विचारही केला नसेल की राजस्थानच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल, परिणामी गरीबांच्या कल्याणासाठीच्या अनेक नव्या योजना सरकार हाती घेऊ शकेल. वस्तु सेवा करामुळे परिवहन क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडून येईल. आमचे नितीनजी, त्या विभागाचे काम पाहतात. आधी वाहनचालक घराबाहेर पडत असे. त्याला समुद्र किनारी सामान पोहोचवायचे असल्यास आपण किलोमिटरचे परिमाण गृहित धरले तर तो ३ दिवसात इच्छित ठिकाणी पोहोचू शके. या प्रवासात त्याला अनेक ठिकाणी पथकर द्यावा लागे. या पथकर नाक्यांवर काय परिस्थिती असते हे आपणा सर्वांना चांगलेच माहिती आहे. त्याला बिचाऱ्याला ३ ऐवजी ५ दिवस लागत. अशा एका ट्रकचे आठवड्यातून २ दिवस वाया गेले तर परिवहन क्षेत्रात देशाच्या अर्थव्यवस्थेचे २५% पेक्षा जास्त नुकसान होते. वस्तु आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर पथकर नाक्यांवर ट्रक उभे राहणे, लाल पास, निळा पास, अशा सर्व भानगडी बंद झाल्या. जिथे पाच दिवस लागत, ते काम आता तीन दिवसात होऊ लागले. तेच ट्रक दोन दिवस जास्त काम करू लागले. त्यामुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी झाला. वाहतुक करणाऱ्यांचे उत्पन्न वाढले. मी तर नितीनजींना सांगतो की वाहतुकीचे नियम रोज बदलले पाहिजे. आज आपल्या देशात काय सुरू आहे? एक ट्रक जातो आणि तो सगळा माल घेऊन येतो. आता ट्रक आणि ट्रॉलीचा वापर करणे ही काळाची गरज आहे. ट्रॅक्टरप्रमाणे ती स्वतंत्र करता यावी. ट्रॉलीमध्ये सर्व सामान भरलेले असेल. जयपूरमध्ये ट्रॉली सोडून द्या, ट्रक घेऊन पुढे जा, दुसरी ट्रॉली लावा, पुढच्या कामाला लागा. वाहनचालकाला रात्री आपल्या घरी पोहोचता यायला हवे, आपल्या कुटुंबासोबत राहता यावेअशी व्यवस्था असली पाहिजे.  आम्ही वाहतुकीत अशा प्रकारचे परिवर्तन घडवून आणू इच्छितो. देशात परिवर्तन घडवून आणायचे असले तर वाहतुकीच्या माध्यमातून ते वेगाने घडवून आणणे शक्य आहे. अशाच प्रकारच्या व्यापक योजनेसह विकासाची नवी शिखरे गाठण्याच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत.  

आपण केलेल्या स्वागताबद्दल, सन्मानाबद्दल, आपल्या प्रेमाबद्दल, आशिर्वादांबद्दल मी आपले अंत:करणापासून पुन्हा एकदा आभार मानतो.

अनेकानेक आभार!!

 
PIB Release/DL/1389
बीजी -माधुरी -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau