This Site Content Administered by
पंतप्रधान

"शाश्वत विकासासाठी २०३० च्या धोरणाची अंमलबजावणी करा; विकासासाठी व्यापक भागीदारी आवश्यक –झियामेन इथल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानाचे प्रतिपादन (५ सप्टेंबर २०१७) 

नवी दिल्ली, 5-9-2017

सन्माननीय महोदय,

 राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग,

बिक्र्समधले माझे मान्यवर सहकारी आणि नेते

आज इथे आपल्यासोबत या परिषदेत सहभागी होतांना मला अतिशय आनंद होत आहे. तुम्ही सगळे देश भारताच्या जवळचे आणि महत्वाचे भागीदार देश आहात. सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या आपल्या समान प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने आमचा दृष्टीकोन आपल्यासमोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे. या संवादासाठी आपल्या सर्वांना एका व्यासपीठावर आणल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचेही आभार मानतो.

मान्यवर,

संयुक्त राष्ट्रांचा २०३० चा अजेंडा आपण सर्वांनी दोन वर्षांपूर्वी स्वीकारला आणि शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे गाठण्याच्या दृष्टीने आपण आता एकत्रित कृती करण्याची गरज आहे हे मला अधोरेखित करायचे आहे. जुलै महिन्यात भारताने शाश्वत विकासाच्या उद्दिष्टसंदर्भात राष्ट्रीय पातळीवर एक सर्वेक्षण पूर्ण केले. आमच्या विकासाच्या अजेंड्याचे ध्येय्य ‘आमच्या सबका साथ, सबका विकास या घोषणेतून स्पष्ट होईल. याचा अर्थ- सर्वांचे प्रयत्न, सर्वसमावेशक विकास... शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या कल्याणकारी योजनांशी त्याची सांगड घातली आहे.केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या सर्व योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास गाठण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शाश्वत विकासाच्या धोरणांवर आमच्या संसदेतही साधकबाधक चर्चा झाली. प्राधान्यक्रमाने ठरवण्यात आलेली आमची उद्दिष्टे गाठण्यासाठी, आम्ही आमच्या योजना कालबद्धरीत्या पूर्ण करण्यावर भर देत आहोत. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, बँकिग व्यवस्थेत नसलेल्या नागरिकांना खाते उघडण्याची संधी देणे, प्रत्येकाला बायोमेट्रिक ओळखपत्र देणे आणि त्याच्याशी  मोबाईल क्रमांक जोडून, लाभार्थ्यांना योजनेचे लाभ मिळतील अशी व्यवस्था करणारी त्रिसूत्री योजना आम्ही सुरु केली. या योजनेच्या मदतीने, पहिल्यांदाच, ३६ कोटी लोकांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून योजनेचे थेट लाभ पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो. 

मान्यवर ,

भक्कम जागतिक भागीदारीमुळे आमच्या या प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळाले आहे. आणि त्यासाठी आमच्या बाजूने असलेली जबाबदारी पार पाडण्यास आम्ही तयार आहोत. आपल्या देशाच्या विकासाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतांनाच, इतर विकसनशील राष्ट्रांसोबत भागीदारीची भारताला दीर्घ परंपरा आहे. प्रत्येक पावलावर आम्ही विविध क्षेत्रातले आमचे अनुभव आणि स्त्रोत, इतर भागीदारांना दिले आहेत. मग ते लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करण्यापासून ते जनकल्याणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यापर्यंत कुठलीही मदत असो, आम्ही आमच्या भागीदार राष्ट्रांना अशी सर्व मदत केली. याच वर्षाच्या सुरुवातीला आम्ही एक दक्षिण आशियाई उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. आमच्या शेजारच्या राष्ट्रांना, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी या उपग्रहाची मदत होईल. गेल्या अर्ध्या शतकापासून भारताच्या पथदर्शी उपक्रमांमध्ये- भारतीय तंत्रज्ञान आणि वित्तीय सहकार्य, आय टीईसीने आशिया, आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका, करेबियन आणि प्रशांत महासागरातील बेटांवरच्या राष्ट्रांसह १६१ राष्ट्रांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी मदत केली आहे. आयटीईसीने एकट्या आफ्रिकेतल्या २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. २०१५ साली झालेल्या तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत,५४ आफ्रिकन देशांसोबत, आम्ही ही शिष्यवृत्ती पुढच्या पाच वर्षात दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला, आणि ती संख्या ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात प्रशिक्षण घेतलेले आफ्रिकेतील सोलर मामास आफ्रिका खंडातल्या हजारो घरांमध्ये वीजपुरवठा करून  प्रकाश देत आहेत. आफ्रिकी देशांसोबत अधिक दृढ झालेल्या आमच्या संबंधांची परिणीती म्हणजे, आफ्रिकन विकास बँकेची यावर्षीची सर्वसाधारण सभा इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिका खंडाच्या बाहेर, भारतात झाली. भागीदारीतून उभारण्यात आलेल्या आपल्या विकास प्रकल्पांमुळे जगभरातल्या डझनाहून जास्त देशांमध्ये पाणी, वीज रस्ते , आरोग्य, टेली-मेडिसिन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. या सगळ्याच्या पलीकडे, आमच्या विनाअट सहकार्याच्या धोरणानुसार, आम्ही केवळ आमच्या भागीदार राष्ट्राच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाला महत्व दिले आहे.

मान्यवर,

आज इथे उपस्थित देश जगातल्या अर्ध्याहून जास्त मानवतेचे प्रतिनिधित्व करत आहेत.आपण जे काही करू, त्याचा जगावर निश्चित परिणाम जाणवेल. त्यामुळेच हे जग अधिक सुंदर, सुखकर बनवणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य असायला हवे. ब्रिक्सच्या माध्यमातून एकेक वीट रचत या सुंदर जगाची उभारणी आपण करायला हवी. ब्रिक्सच्या मदतीने येत्या दहा वर्षात जागतिक परिवर्तन घडवण्याचे उद्दिष्ट आपण ठरवायला हवे, असे मी काल बोललो होतो. त्यादृष्टीने, हे दशक आपल्यासाठी ‘सुवर्ण दशक ठरू शकेल. या दिशेने आपण एक कृतीशील प्रतिसाद, धोरणे आणि कृती आराखडा ठरवायला हवा, मी त्यासाठी दहा शिफारसी करु इच्छितो, त्या पुढीलप्रमाणे: 

१. एक सुरक्षित जग निर्माण करणे :यासाठी दहशतवाद विरोधी धोरण, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या तीन क्षेत्रात संघटीत आणि समन्वय कृती करणे.

२ एक हरित जग निर्माण करणे : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक ठोस कृती करणे, ज्यात आंतरराष्ट्रीय सौर उर्जा सहकार्य सारख्या गोष्टींचा समावेश असेल.

३. एक आधुनिक, सज्ज जग निर्माण करणे : जागतिक कार्यक्षमता, अर्थव्यवस्था आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी परस्पर सहकार्य आणि आवश्यक त्या तंत्रज्ञानाची मदत एकमेकांना करणे.

४. एक सर्वसमावेशक जग निर्माण करणे: बँकिंग आणि इतर वित्त व्यवस्थांमध्ये अधिकाधिक लोकांना समाविष्ट करून हे उद्दिष्ट साध्य करता येईल.

५. डिजिटल जगाची निर्मिती करणे : अर्थव्यवस्थेच्या आत आणि बाहेरही असलेली डिजिटल दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे.

६. कुशल जगाची निर्मिती करणे : जगातल्या लक्षावधी युवकांना, भविष्यात उपयोगी ठरतील अशी कौशल्ये शिकवून, कुशल मनुष्यबळ तयार करणे.

७. निरोगी जागा निर्माण करणे: आजारांचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी तसेच, सर्वांना परवडणारी आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी संशोधन आणि विकास क्षेत्रात सहकार्य वाढवणे.

८. एका समान जगाची निर्मिती करणे : सर्वाना समान संधी देणे, लैंगिक भेदभाव दूर करणे

९. एकमेकांशी जोडलेले जग निर्माण करणे : सगळीकडे माल, व्यक्ती आणि सेवांचा मुक्त पुरवठा होईल, अशी व्यवस्था निर्माण करणे.

१०. एक सौहार्दपूर्ण जग निर्माण करणे : विचारसरणी, पद्धती आणि परंपरा हा जगात परस्पर सहवास आणि शांततापूर्ण सहकार्य नांदण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या आधारावर एक सौहार्दपूर्ण जग निर्माण करणे.

हा दहा कलमी कार्यक्रम आणि, त्यावरची कृतीशील वाटचाल, यामुळे आपण जागतिक समुदायाच्या कल्याणासाठी भरीव योगदान देऊ शकतो. आणि या कार्यात भारत इतर देशांच्या प्रयत्नांत कृतीशील प्रतिसाद आणि सहकार्य करण्यास कायमच तत्पर राहील. या परिषदेचे प्रभावी आयोजन केल्याबद्दल तसेच, २०१७ या वर्षात ब्रिक्सचे अध्यक्षपद समर्थपणे भूषवल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आभार मानतो. चीनमधल्या झियामेन या सुंदर शहरात, आमचं हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दलहि मी त्यांना धन्यवाद देतो. मी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचेही स्वागत करतो आणि पुढच्या वर्षी जोहान्सबर्ग इथे होणाऱ्या शिखर  परिषदेत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देतो.

धन्यवाद ! 

 
PIB Release/DL/1425
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau