This Site Content Administered by
पंतप्रधान

ब्रिक्स नेत्यांचा शियामेन जाहीरनामा शियामेन, चीन , 4 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली, 4-9-2017

 आम्ही, ब्राझील, रशिया, भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे नेते चीनमधल्या शियामेन इथे नवव्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी एकत्र आलो..''ब्रिक्स :उज्वल भविष्यासाठी दृढ भागीदारी"  ही या परिषदेची संकल्पना आहे.ब्रिक्स राष्ट्रांच्या विकासासाठी, सामाईक दृष्टिकोन ठेवून आम्ही आधी केलेली कामगिरी उंचावण्याचा आमचा प्रयत्न राहील. ब्रिक्स राष्ट्रांसाठी चिंता असणाऱ्या सामाईक आंतरराष्ट्रीय आणि विभागीय मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आणि एकमताने शियामेन जाहीरनाम्याचा स्वीकार केला आहे.

2.     शांतता, सुरक्षा आणि सहकार्याचा आमचा संकल्प आणि उद्दिष्ट यामुळे आम्ही गेली 10 वर्षे एकत्र आहोत याचा आम्ही पुनरुच्चार करतो.तेव्हापासून आपापल्या राष्ट्रीय परिस्थितीलाअनुसरून,अर्थव्यवस्था वृद्धी आणि जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी या राष्ट्रांनी एकमेकांच्या साथीने लक्षणीय प्रवास केला आहे. आमची कटिबद्धता आणि एकत्रित प्रयत्नामुळे तसेच या आधीच्या शिखर परिषदेतल्या  बहुस्तरीय सहकार्यामुळेसर्वच बाबीत, बहू आयामी गती प्राप्त झाली आहे. विकास आणि बहुविध देशाचा सहभाग कायम राखतानाच अधिक न्यायय,प्रामाणिक,लोकशाहीवादी  आणि सर्वाना प्रतिनिधित्व देणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेसाठी आम्ही एकत्र काम करत आहोत.

3.     2006 पासून आमच्या सहकार्यामुळे, परस्पर आदर,समानता, ऐक्य, सर्वसमावेशकता यावर भर असलेले ब्रिक्स ऐक्य जोमदार झाले आहे. हे ऐक्य आणि परस्परांना लाभदायी सहकार्य  ही  आमची मोलाची संपत्ती आणि ब्रिक्स सहकार्याच्या ताकदीचा अक्षय स्रोत आहे.प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या विकासाच्या मार्गाचा आम्ही आदर केला असून एकमेकांचे हित जाणून घेऊन सहकार्यही केले आहे.समानता आणि ऐक्याला आम्ही नेहमीच समर्थन दिले आहे.खुल्या जागतिक अर्थव्यवस्थेला वाव देणाऱ्या सर्वसमावेशकतेचा आणि खुलेपणाचा आम्ही नेहमीच स्वीकार केला आहे.उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील देश ( ई एम डी सी) यासाठीही आम्ही आपले सहकार्य विस्तारले आहे.परस्परांना   लाभदायक फलितासाठी आणि सामाईक विकासासाठी त्याचबरोबर जगासाठी लाभदायी ठरणारे  ब्रिक्स सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्रित कार्य करत आहोत.

4.     नव विकास बँक (एन डी बी ), भविष्यासाठी राखीव व्यवस्था असणारी कॉन्टीजन्ट रिझर्व्ह अरेंजमेंट,ब्रिक्स अर्थव्यवस्थेसाठी धोरण आखणे,सुरक्षेच्या मुद्द्यावर ब्रिक्स उच्च प्रतिनिधी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकांमार्फत राजकीय आणि सुरक्षाविषयक सहकार्य दृढ करणे आणि सदस्य राष्ट्राच्या जनतेमधले मैत्रीचे पारंपरिक संबंध आणखी दृढ करणे   यासारखे अनेक  फलदायी  परिणाम  समाधानकारक  ठरले  आहेत.

5.     उफा आणि गोव्यात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदा स्मरणात ठेवतानाच, आमच्या जनतेच्या कल्याणासाठी ब्रिक्स धोरणात्मक भागीदारी आणखी समृद्ध करण्यासाठी  आम्ही एकत्रित काम करू. याआधीच्या  शिखर परिषदांचे फलित आणि मतैक्य झालेल्या मुद्य्यांना पायाभूत मानून अधिक विकास करण्यासाठी आम्ही ठामपणाने कटिबद्ध आहोत, ज्यायोगे ब्रिक्स सहकार्य आणि ऐक्याच्या दुसऱ्या सोनेरी दशकाची पहाट होईल.

6.     आपल्या देशांच्या विकासाच्या अमाप संधी आणि आपल्या सहकार्याला असलेला वाव यावर विश्वास ठेवत, ब्रिक्सच्या उज्वल भवितव्याविषयी आम्हाला खात्री आहे.सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

--ब्रिक्स देशांच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सध्याच्या सहकार्याला आणखी प्रोत्साहन देऊ. एकमेकांशी जोडलेला विकास साध्य करण्यासाठी आम्ही विकासाविषयी उत्तम प्रथा आणि अनुभवांची देवाण घेवाण,बाजारपेठांची एकमेकांशी  सुलभ जोडणी,.त्याचबरोबर पायाभूत आणि वित्तीय एकात्मतेला प्रोत्साहन देऊ.उदयोन्मुख बाजारपेठाआणि विकसनशील देश या मंचाशी विस्तृत भागीदारीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू.यासंदर्भात समान आणि लवचिक प्रथा, संवादासाठी पुढाकार, ब्रिक्स सदस्य नसलेल्या राष्ट्रांशी सहकार्य यावरही भर देऊ.

 --आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था अधिक न्यायय होण्याला चालना मिळावी यासाठी जागतिक आर्थिक प्रशासन अधिक सुधारण्यासाठी आम्ही दळण वळण आणि सहकार्य वृद्धिगत करू.जागतिक आर्थिक प्रशासनात,ब्रिक्स राष्ट्र आणि उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशाच्या व्यासपीठाचा आवाज आणि प्रतिनिधित्व वाढावे यासाठी आम्ही कार्य करू.खुल्या,सर्वसमावेशक आणि संतुलित आर्थिक जागतिकीकरणाला आम्ही प्रोत्साहन देऊ ज्यायोगे उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशाच्या व्यासपीठाच्या विकासाला आणि उत्तर दक्षिण विकासाचा असमतोल दूर करून जागतिक विकासात  योगदान देता येईल.

--आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आम्ही न्यायय आणि निष्पक्षता यावर भर देऊ. संयुक्त राष्ट्रांची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या उचित आणि न्यायय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी आम्ही सहायय करू.आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखू, लोकशाहीला प्रोत्साहन देऊ आणि सामाईक पारंपरिक आणि बिगर पारंपरिक सुरक्षा आव्हानांची दखल  घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करू ज्यामुळे जागतिक समुदायाच्या उज्वल भविष्याची उभारणी होईल.

 -- सांस्कृतिक विविधता जपण्याबरोबरच जनतेचा परस्पर संबंध वाढण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ.पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध अधिक सखोल करून याद्वारे ब्रिक्स सहकार्याला अधिक वाव  मिळेल.जनतेतले आदान प्रदान  चहू बाजूनी  आम्ही वृद्धिगत करू.सदस्य राष्ट्राच्या संस्कृतीविषयी जाणून  घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ,दळण वळण वृद्धिगत करू,पारंपरिक मैत्री दाट करण्यासाठी प्रयत्न करून ब्रिक्स भागीदारी जनतेला आपलीशी वाटावी यासाठी कार्य करू.

ब्रिक्स वास्तविक आर्थिक सहकार्य

7.     जागतिक आर्थिक वृद्धीत नवनवे घटक पुढे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ब्रिक्स राष्ट्रे, जागतिक विकासाचे इंजिन म्हणून आपलीं भूमिका कायम ठेवतील. अनिश्चितता आणि घसरणीचा धोका लक्षात घेता, दुसऱ्याची दखल न घेण्याचे धोरण आणि जागतिक विकासाच्या संधी आणि बाजारपेठेच्या विश्वासावर भार ठरू शकणाऱ्या प्रवृत्तींविरोधात सतर्क राहण्याच्या गरजेवर आम्ही भर देत आहोत.

8.     ब्रिक्स आर्थिक भागीदारीव्यापार आणि गुंतवणूक,उत्पादन आणि खाण प्रक्रिया,पायाभूत जोडणी, वित्तीय समावेशकता,विज्ञान,तंत्रज्ञान आणि नाविन्यता, माहिती आणि दळण वळण तंत्रज्ञान सहकार्य यासारख्या प्राधान्य क्षेत्रातल्या उपक्रमाच्या  अंमलबजावणीद्वारे वास्तविक आर्थिक सहकार्याने ब्रिक्स सहकार्याचा पाया म्हणून भूमिका बजावली आहे.

ब्रिक्स आर्थिक भागीदारीसाठीच्या धोरणाच्या अंमलबजावणीविषयी पहिल्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो.विभागीय मंत्र्याच्या बैठकीतल्या ठोस फलिताचेही आम्ही स्वागत करतो.बळकट,संतुलित आणि सर्वसमावेशी जागतिक विकासात योगदान देण्यासाठी सर्व म्हणजे वित्तीय आणि रचनात्मक अशा सर्व साधनांचा आणि नवोन्मेषी विकासात्मक धोरणाचा अवलंब करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

9.     ब्रिक्स राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्याच्या भूमिकेवर आम्ही भर देत आहोत.ब्रिक्स अर्थव्यवस्थांचा  विकास होण्याच्या दृष्टीने व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य यंत्रणा आणि या सहकार्याचा वाव विस्तारण्याला आणि सुधारण्याला आम्ही मान्यता आली आहे.सातव्या ब्रिक्स व्यापार मंत्र्याच्या बैठकीत सह्कार्यविषयक ढाचा, त्याचबरोबर दळणवळण आणि माहिती आदान प्रदान वाढवण्यासाठी पथदर्शी आराखडा आखण्याबाबत आलेल्या फलिताचे आम्ही स्वागत करतो.व्यापार आणि गुंतवणूक सुलभ होण्यासाठी संयुक्त प्रयत्न वाढवण्यात येण्याबरोबरच ई कॉमर्स, आयपीआर, आर्थिक आणि तंत्र सहकार्य, लघु आणि मध्यम उद्योजक, आणि महिला सबलीकरणाद्वारे हे साध्य करण्यात येईल.ऐच्छिक तत्वावर चालणाऱ्या  ब्रिक्स  ई पोर्ट नेटवर्क उभारणीचे आणि ब्रिक्स ई वाणिज्य कार्यकारी  गटाच्या उभारणीचे आम्ही स्वागत करतो. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय आयात प्रदर्शनाचे यजमानपद स्वीकारण्यासाठी चीनने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करतानाच आमच्या व्यापारी समुदायाने   त्यामध्ये   सक्रिय सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ.

10.  वास्तव अर्थव्यवस्था आणि ब्रिक्स राष्ट्रांच्या विकासाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने ब्रिक्स वित्तीय सहकार्य विस्तारण्याच्या महत्वावर आम्ही भर दिला आहे.सार्वजनिक खाजगी भागीदारी संदर्भात ब्रिक्स उचित प्रथांचे पालन यासह  सार्वजनिक खाजगी भागीदारीत सहकार्य करण्याबाबत वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँकाच्या गव्हर्नरांनी केलेल्या कराराची आम्ही दखल घेतली आहे. सहकार्याच्या विविध मार्गांची  तंत्रविषयक चर्चा करण्यासाठी हंगामी कृती दल निर्माण करण्याची आम्ही दखल घेतली आहे.यामध्ये नवा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प निर्मिती निधी उभारण्याबाबत शक्यता आजमावण्याचा तसेच एम डी बी च्या सध्याच्या सुविधांचा उपयोग करण्याचा समावेश आहे.आमचे लेखांकन मानक आणि लेखांकन नियामक यांच्या सहकार्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत आणि लेखांकन मानके एककेंद्राभिमुख करण्याच्या शक्यता तसेच रोखे काढण्याच्या क्षेत्रात   लेखापरीक्षण सहकार्य करण्याची चर्चा सुरु ठेवायला  मान्यता देण्यात आली आहे. या कार्यामुळे,राष्ट्रीय धोरण आणि कायद्याचे पालन करत, ब्रिक्स राष्ट्रात रोखे बाजार जोडण्यासाठी पूर्व तयारी होणार आहे.ब्रिक्स राष्ट्रांना भांडवलाचा अखंड पुरवठा करण्याचे साधन म्हणून तसेच ब्रिक्स स्थानिक आणि प्रादेशिक रोखे बाजाराच्या विकासाला चालना म्हणून ब्रिक्स स्थानिक चलन रोखे बाजार आणि सर्वानी मिळून ब्रिक्स स्थानिक चलन रोखे निधीच्या विकासाला चालना देण्याला आम्ही मान्यता दिली आहे.

11.  ब्रिक्स राष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या व्यापार आणि गुंतणुकीतून निर्माण होणाऱ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी, प्रत्येक राष्ट्रांच्या सध्याच्या नियामक तरतुदी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांना अनुसरून, वित्तीय संस्थांचे जाळे उभारण्याला प्रोत्साहन देऊन त्याद्वारे  वित्तीय बाजारपेठ एकीकरण सुलभ करण्यासाठी आम्ही मान्यता दिली आहे.वित्तीय क्षेत्रातल्या नियामकात अधिक संपर्क आणि सहकार्य वाढवण्यालाही मान्यता देण्यात आली आहे.काळा पैसा चलनात पुन्हा आणण्याला आळा घालण्यासंदर्भात आणि दहशतवादाला आर्थिक पाठबळ पुरवण्याला  आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकाची अंमलबजावणी   करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात सक्रिय   सहभागी होण्याला आम्ही मंजूरी दिली आहे.यात ए एम एल/सीएफटी   बाबत  ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रमुखांच्या सहकार्याचा तसेच इतर व्यासपीठाचा उपयोग करण्याचा समावेश आहे.चलन सहकार्य वाढवण्यासाठी,प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत आदेशाशी सुसंगती राखणे, योग्य तिथे स्थानिक चलन थेट गुंतवणूक याबरोबरच चलन सहकार्याच्या आणखी संधीचा शोध घेण्यालाही आम्ही स्वीकृती दिली आहे. ब्रिक्स अर्थव्यवस्था आणि व्यापार सहकार्याला साहाय्यासाठी ब्रिक्स आंतरबँक सहकार्य यंत्रणा महत्वाची भूमिका बजावण्याचे आपले काम सुरूच ठेवेल यासाठी, आम्ही प्रोत्साहन देऊ.ब्रिक्स राष्ट्रांच्या राष्ट्रीय विकास बँकांसाठी,आंतरबँक स्थानिक चलन पतपुरवठा आणि पत मानांकनाविषयी आंतर बँक सहकार्य विषयक सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप देण्यात झालेल्या प्रगतीची, आम्ही प्रशंसा करत आहोत.

12.  मध्यम आणि दीर्घकालीन आर्थिक विकास आणि जागतिक चिरंतन विकासातील महत्वाचा घटक म्हणूनआम्ही नावीन्यतेचे महत्व अधोरेखित करत आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकता याबाबत सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ज्यायोगे आपल्या पाच राष्ट्राच्या विकासाला नवी गती प्राप्त करण्यात सहकार्य  आणि आपल्यापुढे असणाऱ्या विकासात्मक आव्हानांची दखल घेता येईल.ब्रिक्स एस टी आय कार्यक्रमाअंतर्गत ब्रिक्स संशोधन आणि विकासात्मक प्रकल्पाच्या निवडीची आम्ही प्रशंसा करतो. ब्रिक्स एस टी आय सहकार्य सामंजस्य कराराचे आम्ही स्वागत करतो.तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उपयोगाला प्रोत्साहन, विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कसाठी सहकार्य, उद्योजक,संशोधक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची सुलभ ये-जा यांच्यासह कल्पकता आणि उद्योजकतेच्या वाढीव सहकार्याला  आम्ही पाठिंबा देतो.या प्रक्रियेत व्‍यापारी आस्थापने, संस्था आणि संबंधितांच्या वाढलेल्या सहभागाला आम्ही प्रोत्साहन देतो. एस टी आय गुंतवणुकीला प्रोत्साहन, सध्याच्या निधीद्वारे सीमापार गुंतवणुकीला आम्ही समर्थन देतो.कल्पकता आणि उद्योजकता यासाठीच्या मंचासाठी काम करणे सुरु ठेवण्यासाठी आम्ही मान्यता दर्शवली असून ब्रिक्स नाविन्यता सहकार्य कृती आराखडा 2017 -2020 च्या अमलबजावणीला आम्ही पाठिंबा देतो.

13.  ब्रिक्स औद्योगिक सहकार्याप्रति आमची कटिबद्धता असल्याचा आम्ही  पुनरुच्चार करतो.औद्योगिक क्षमता आणि धोरणे,नव्या औद्योगिक पायाभूत सुविधा आणि मानके,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा यात समावेश आहे.याद्वारे नव्या औद्योगिक क्रांतीने आणलेल्या संधीचा  एकत्रित लाभ घेता येईल आणि आपल्या औद्योगिक प्रक्रियेला गतीही देता येईल  भविष्यकालीन जाळे उभारण्यासाठी  ब्रिक्स संस्था उभारण्याच्या शक्यता   आजमावण्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत.संयुक्त ब्रिक्स संशोधन,आय सी टी विकास,क्लाउड कॉम्पुटिंग,बिग डेटा, डेटा अनॅलिटीक्स सूक्ष्म तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता,आपल्या देशात  आय सी टी पायाभूत सुविधा जोडणी उंचावण्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. आय सी टी पायाभूत सुविधा यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यतेचे सुरक्षा नियम तयार करण्याला , डेटा संरक्षण, तसेच व्यापक संमती असणारे इंटरनेट,आणि सुरक्षित संयुक्त जाळे उभारण्याला आमची अनुकूल भूमिका आहे. आय सी टी गुंतवणूक आम्ही वृद्धिंगत करू,आय सी टी संशोधन आणि  विकासात गुंतवणूक वाढवण्याची गरज आम्ही जाणली आहे.स्मार्ट सिटी,आरोग्य सेवा,ऊर्जा बचत करणारी उपकरणे यासंदर्भात अद्ययावत कल्पक कौशल्याबाबत  संस्था,उद्योग यांच्यातली  भागीदारी सुलभ करण्याला आम्ही प्रोत्साहन देऊ.ब्रिक्स आय सी टी विकास कार्यक्रम आणि कृती आराखडा अंमलबजावणीसाठी सक्रिय सहकार्याला आमचा पाठिंबा राहील.,

14. शाश्वत विकासासाठी 2030 च्या कार्यक्रम अंमलबजावणीसाठी आमच्या कटिबध्दतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.आर्थिक,सामाजिक,पर्यावरण   अशा तिन्ही मितींनी,संतुलित एकात्मिक पद्धतीने सर्वागीण, न्यायय आणि कल्पकतेला वाव देणारा  शाश्वत विकास साधावा अशीच आमची भूमिका आहे., 2030 ची कार्यक्रमपत्रिका  जगभरात राबवण्यासाठी आढावा आणि सहकार्य यासाठी शाश्वत विकासासाठीच्या   उच्च स्तरीय राजकीय मंचासह संयुक्त राष्ट्रांच्या महत्वाच्या भूमीकेला आमचे समर्थन आहे. 2030  चा अजंडा राबवण्यासाठी सदस्य राष्ट्राची क्षमता वाढवण्यासाठी, संयुक्त राष्ट्र विकासात्मक यंत्रणेतल्या सुधारणांच्या आवश्यकतेलाही आमचे अनुमोदन आहे.विकसित राष्ट्रांनी, विकसनशील राष्ट्रांना अधिक विकास संसाधने पुरवावीत आणि अधिकृत विकास सहायय कटिबध्दतेचा आदर राखावा असे आवाहन आम्ही करत आहोत.

15.  आर्थिक विकासात ऊर्जेचे धोरणात्मक  महत्व लक्षात घेऊन ऊर्जेबाबत ब्रिक्स सहकार्य बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगाच्या उज्वल भविष्यासाठी अविरत विकास,ऊर्जा उपलब्धता,आणि ऊर्जा सुरक्षितता महत्वाची आहे याची जाणीव आम्हाला आहे.स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध होण्याच्या गरजेची आम्ही दखल घेतली आहे.

ऊर्जा उपकरणे आणि तंत्रज्ञान यासाठी खुली,लवचिक आणि पारदर्शी बाजारपेठ उपलब्ध होण्याला चालना मिळावी यासाठी आम्ही कार्य करू. जीवाष्म इंधन,नैसर्गिक वायू,जल आणि अणू ऊर्जा यांच्या प्रभावी वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू. ज्यायोगे,कमी उत्सर्जन असणारी व्यवस्था, ऊर्जा उपलब्धता आणि शाश्वत विकासाप्रति योगदान राहील.ब्रिक्स देशाच्या शाश्वत विकासासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने नागरी अणू ऊर्जा क्षमता वृद्धिगत करण्यासाठी तंत्रज्ञान आणि वित्त उपलब्ध  होण्याचे महत्व आम्ही अधोरेखित करतो. ब्रिक्स ऊर्जा संशोधन सहकार्य मंच उभारणीसाठी चर्चा सुरु ठेवण्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत त्याचवेळी संबंधितांनी ऊर्जा सहकार्य आणि ऊर्जा क्षमता यावर संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन सुरूच ठेवावे असे आवाहन आम्ही करत आहोत.

16.  शाश्वत विकास आणि दारिद्र्य निर्मूलन यांच्या संदर्भात हरित विकास आणि कार्बन उत्सर्जन कमी असणारी व्यवस्था याना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर हवामान बदलासंदर्भात ब्रिक्स सहकार्य वाढवण्यासाठी    आम्ही कटिबद्ध आहोत, हवामान बदलाविषयी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएनएफसीसीसी) च्या तत्वानुसार अनुसरण्यात आलेल्या सामायिक पण भिन्न जबाबदारी  असणाऱ्या पॅरिस कराराची सर्व देशांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन आम्ही करत आहोत. विकसनशील राष्ट्राची  समतोल राखण्यासाठीची  क्षमता वाढवण्यासाठी, विकसित राष्ट्रांनी वित्तीय, तंत्रविषयक आणि क्षमता वृद्धी विषयक सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

17.  आपल्या देशांच्या शाश्वत विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी पर्यावरणात्मक सहकार्याच्या महत्वावर जोर देत, हवा आणि जल प्रदूषण, घन कचरा व्यवस्थापन, जैव विविधता रक्षण याबाबत ठोस कृती करण्याला आम्ही मान्यता दिली आहे.पर्यावरणविषयक मजबूत तंत्रज्ञानविषयक मंचाचे महत्व जाणून यासंदर्भात ब्रिक्स संयुक्त प्रयत्नांना आम्ही पाठिंबा व्यक्त करत आहोत.2020  मध्ये जैव विविधतेबाबत चीनने आयोजित केलेल्या परिषदेला ब्राझील,रशिया,भारत आणि दक्षिण आफ्रिका  पाठिंबा देत असून चीनची प्रशंसा करत आहेत.

18.  गेल्या काही वर्षातल्या फलदायी कृषी सहकार्याची दखल घेत ब्रिक्स राष्ट्रांच्या आगळ्या वैशिष्ट्याची दखल घेत या क्षेत्रातल्या सहकार्याच्या अमाप संधीकडेही  आमचे लक्ष आहेया संदर्भात अन्न सुरक्षाआणि पोषण, हवामानाशी मिळती जुळती शेती,कृषी तंत्र सहकार्य आणि कल्पकता, कृषी व्यापार आणि गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रात आय सी टीचा वापर या पाच क्षेत्रात   सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. भारतात  ब्रिक्स कृषी संशोधन मंच  उभारण्याचे आम्ही स्वागत करत आहोत, याद्वारे या प्राधान्य देण्यात आलेल्या क्षेत्रासाठी जाळे उभारण्यासाठी मदत होणार आहे.

19.  आफ्रिकी खंडाला, स्वतंत्र आणि शाश्वत विकास साध्य करण्यात आणि वन्य जीव रक्षणात  येणाऱ्या आव्हानांविषयी आम्ही चिंता व्यक्त करतो. आफ्रिकेप्रती सहकार्य करण्याचा आमचा निश्चय आम्ही पुन्हा दृढ करत असून त्यांना वन्य जीवांचा बेकायदा व्यापार थांबवण्यासाठी,रोजगाराला चालना देण्यासाठी, अन्न सुरक्षा,पायाभूत विकास, औद्योगिकीकरण यासाठी आम्ही सहायय करू आफ्रिका खंडासाठीच्या शांतता आणि सामाजिक- आर्थिक विकासासाठीच्या 2063  च्या अजेंड्या अंतर्गत विविध कार्यक्रमांनाही आमचा ठोस पाठिंबा राहील.

20. शाश्वत विकासावर भ्रष्टाचाराचा होणारा  नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन, ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांना आम्ही पुष्टी देत आहोत. ब्रिक्स देशात, भ्रष्टाचार विरोधी मोहिमेसाठी पाठिंबा,अनुभवाचे आदान प्रदान आणि संवाद यांचा वेग वाढवण्यासाठी आम्ही आमची कटिबद्धता दृढ करत आहोत.भ्रष्टाचारामुळे आर्थिक विकास, वित्तीय स्थैर्य यामध्ये अडथळा येतो याची दखल घेत मालमत्ता वसुलीत सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही मान्यता देत आहोत.ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यकारी गटामार्फत भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय सहकार्य दृढ करण्याला आमचे समर्थन आहे.त्याचबरोबर भ्रष्टाचारासंदर्भात सापडलेली व्यक्ती तसेच मालमत्ता वसुलीबतही हे सहकार्य दृढ करण्याला आमचा पाठिंबा आहे. बेकायदा पैशासह भ्रष्टाचार,परदेशात दडवलेली आणि विदेशी कार्यकक्षेत येणारी बेकायदेशीर संपत्ती हे जागतिक आव्हान असून  त्यामुळे आर्थिक विकासावर नकारात्मक परिणाम होतो याची आम्ही दखल घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कराराला  त्याचबरोबर संबंधित आंतरराष्ट्रीय करारांना अनुसरून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जागतिक कटिबद्धतेला आम्ही समर्थन देत  आहोत.

21.  आपण  डिजिटल व्यवस्थेच्या युगात राहत असून, जागतिक विकासात येणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी ही व्यवस्था पुरवत असलेल्या संधीचा उपयोग करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कल्पकता,भागीदारी,लवचिकता,ग्राहक हक्क संरक्षण,विश्वास आणि सुरक्षा या तत्वावर  आधारित कृती   करून, जागतिक आर्थिक विकासाला आणि प्रत्येकाला लाभदायी ठरणाऱ्या  डिजिटल अर्थव्यवस्थेची आम्ही खातरजमा करू.

22. पायाभूत सुविधा,उत्पादन,ऊर्जा,कृषी,वित्तीय सेवा, ई कॉमर्स, कौशल्य विकास यामध्ये आपले आर्थिक सहकार्य मजबूत करण्यात ब्रिक्स व्यापार परिषद आणि व्यापार मंचाचे प्रयत्न आणि योगदान यांची आम्ही प्रशंसा करतो.व्यापारी समुदायाने आणि संघटनांनी ब्रिक्स सहकार्यामध्ये सक्रिय सहभाग द्यावा यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. परस्पर लाभदायी सहकार्याला चालना देण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक सुलभ संस्था म्हणून भूमिका बजावण्यासाठी आम्ही वाव देत आहोत.

23. कामगार बाजारपेठेत होत असलेले परिवर्तन आणि त्यामुळे उपलब्ध संधी आणि आव्हाने यांचे महत्व आम्ही जाणले आहे.मनुष्य बळ विकास,रोजगार आणि सामाजिक सुरक्षा, ठोस कामगार बाजारपेठ माहिती यंत्रणा,ब्रिक्स कामगार संशोधन संस्था माहिती जाळे,ब्रिक्स सामाजिक सुरक्षा याविषयी ब्रिक्स  सहकार्य विषयीच्या   प्रगतीची  आम्ही  समाधानपूर्वक दखल घेत आहोत. संपूर्ण रोजगार साध्य करण्यासाठी, कौशल्य विकासातून  दारिद्र्य निर्मूलनासाठी,सार्वत्रिक आणि अविरत सामाजिक सुरक्षा व्यवस्थेसाठी सहकार्य आणखी दृढ करण्याला आम्ही संमती दिली आहे.

24. प्रभावी सामाजिक आणि आर्थिक विकास प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी, कल्पकतेला चालना देण्यासाठी, आमच्या ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पुरवण्यासाठी, स्पर्धात्मकता संरक्षणाचे महत्व आम्ही ओळखले आहे. आपल्या देशांच्या स्पर्धात्मकतेसंदर्भातल्या  प्राधिकरणांमधल्या संवादाला महत्व असल्याची दखल आम्ही घेतली आहे. 

25. ब्रिक्स जकात सहकार्य समिती आणि ब्रिक्स जकात कार्यकारी गट अशा यंत्रणांच्या माध्यमातून व्यापार सुरळीत करण्यासाठी सहकार्य, सुरक्षा आणि अंमल बजावणी, क्षमता उभारणी व परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर सीमा प्रशासनांनी केलेल्या प्रगतीबाबत आम्ही समाधान व्यक्त करत आहोत. वाढीला चालना आणि लोककल्याणास प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांकडे असलेल्या माहितीची देवाणघेवाण, परस्परांच्या सीमा नियंत्रणाला अधिकृत मान्यता आणि अंमलबजावणीमध्ये परस्परांना सहाय्य या मार्गदर्शक तत्वांतर्गत व्यापक सहकार्यास आम्ही प्रोत्साहन देतो. सीमा प्रकरणांत परस्परिक सहकार्य मजबूत करण्यासाठी ब्रिक्स कस्टम परस्पर सहाय्य कराराला त्वरित अंतिम स्वरुप देण्यास आम्ही कटिबध्द आहोत.

26. बाह्य अंतराळाचा उपयोग शांततापूर्ण उद्देश्यांसाठी करण्याच्या तत्वाचे आम्ही ठामपणे पालन करत असून मानवजातीला सामोरे जावे लागत असलेल्या जागतिक हवामानातील बदल, पर्यावरणाचे संरक्षण, आपत्ती निवारण तसेच मदत व इतर आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी  अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने अंतराळ क्रियाशीलतेत आन्तरराष्ट्रीय सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या गरजेवर आम्ही जोर देत आहोत.

27. आपत्ती व्यवस्थापनावरील ब्रिक्स मंत्र्यांच्या सेंट पीटर्सबर्ग आणि उदयपूर घोषणापत्र आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनावरील ब्रिक्स संयुक्त कृतीदल स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्मरण करतानाच ब्रिक्स देशांतील आपत्कालीन सेवांच्या सातत्यपूर्ण संयुक्त कार्याचे महत्व आम्ही अधोरेखित करीत आहोत ज्याचा उद्देश्य विद्यमान आपत्तीच्या जोखमी कमी करून सुरक्षित भविष्य निर्मिती आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित सर्वोत्कृष्ट पद्धतीवरील माहितीची देवाणघेवाण, हवामानाचा अंदाज वर्तवण्याच्या तसेच नैसर्गिक व मानवी चुकांमुळे आलेल्या आपत्तींचे परिणामकारक निवारण करण्यासाठी खूप अगोदर पूर्वसूचना देण्याच्या क्षेत्रात सहकार्य यांचा समावेश आहे.

28. अंकेक्षण, सांख्यिकी आणि निर्यात ऋण या क्षेत्रांत ब्रिक्स देशांनी सहकार्यात केलेल्या प्रगतीबाबत आम्ही समाधान व्यक्त करत असून या क्षेत्रांत सहकार्य आणखी पुढे नेण्याचे मान्य करत आहोत.

जागतिक आर्थिक प्रशासन

29. आम्ही जागतिक आर्थिक प्रशासनाचे असे स्थापत्य जोपासण्याचा निर्धार करत आहोत जे अधिक कार्यक्षम आणि विद्यमान जागतिक आर्थिक परीप्रेक्ष्याला प्रतिबिंबित करणारे असेल, उभरत्या बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा आवाज व प्रतिनिधित्व वाढवणारे असेल. आन्तरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कोटाविषयक १५ व्या  सर्वसाधारण आढावा नव्या कोटा सुत्रासह २०१९ मधील वसंत ऋतूतील बैठ्कांच्या अवधीपर्यंत पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता आम्ही पुन्हा ठासून सांगत आहोत. २०१९ च्या वार्षिक बैठकीनंतर याचा विचार केला जाणार नाही. जागतिक बँकेच्या गट भागधारक आढाव्याच्या अंमल बजावणीस प्रोत्साहन देणे आम्ही सुरूच ठेवू.

30. शाश्वत वृद्धी आणि विकासाकरता खुल्या व संवेदनशील आर्थिक व्यवस्थेच्या महत्वावर आम्ही जोर देत असून भांडवली ओघाचा अधिक चांगला फायदा करुन घेण्यास  तसेच परदेशी भांडवली स्रोत  व त्यातील चढउतार  यातील उद्‌भवणारे  धोके दूर करण्यास आमची प्राथमिकता राहिल.  ब्रिक्स सीआरए (आपत्कालीन राखीव व्यवस्था) ब्रिक्स देशांतील आर्थिक सहकार्य आणि विकासाच्या प्रवासातील मैलाचा दगड म्हणून प्रतिनिधित्व करते जी जागतिक आर्थिक स्थैर्यातही योगदान देत आहे. बृहत आर्थिक घटकांच्या माहितीमध्ये विनिमयाची सीआरए पद्धत सुरु करणे, सीआरएच्या संशोधन क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी करार व आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सीआरए यांच्यात निकटचे सहकार्य यास चालना देण्याचे आम्ही स्वागत करतो.

31.  दक्षिण आफ्रिकेत स्थापन करण्यात आलेल्या एनडीबी आफ्रिका प्रादेशिक केंद्राचे आम्ही स्वागत करतो जे बँकेचे पहिले प्रादेशिक कार्यालय आहे. प्रकल्प पूर्वतयारी निधी उभारणे आणि  प्रकल्पांच्या दुसर्या गटाचे आम्ही स्वागत करतो. बँकेच्या कायमस्वरूपी मुख्यालयाच्या इमारतीतील या अभूतपूर्व बदलासाठी आम्ही बँकेचे अभिनंदन करतो. देशांमधील निकटचे आर्थिक संबंध आणि भागीदारी यांना जोपासण्यासाठी एकमेकांना जोडणाऱ्या पायाभूत सुविधांच्या महत्वावर आम्ही जोर देतो. ब्रिक्स देशांतील शाश्वत विकास आणि पायाभूत सुविधा उभारणी यास चालना  देण्यासाठी व साधनसंपत्तीची जमवाजमव करण्यासाठी सांगड घालण्याकरता एनडीबीने जागतिक बँक आणि आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक त्याचप्रमाणे ब्रिक्स बिझिनेस कौन्सिल यासह बहुपक्षीय विकास संस्थांमधील सहकार्य वाढवावे आणि आपल्या भूमिकेचा लाभ द्यावा, यास आम्ही प्रोत्साहन देत आहोत.

32. सर्व देशांना सक्षम करणारी आणि जागतिकीकरणाचे लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यास समर्थ करणारी अशी खुली आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेच्या महत्वावर आम्ही भर देतो. जागतिक व्यापार संघटनेत अंतर्भूत असलेल्या नियमांवर आधारित, पारदर्शक, निष्पक्षपाती खुली व समावेशक बहुपक्षीय व्यापाराची पद्धत राबवण्यास आम्ही ठामपणे कटीबध्द आहोत. जागतिक व्यापार संघटनेचे विद्यमान नियमांचे संपूर्ण पालन आणि अंमलबजावणी यांची सुनिश्चिती करण्यासाठीची आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा ठासून सांगत असून जागतिक व्यापार संघटना आणखी मजबूत करण्यासाठीच्या कार्य  वृध्दीचा निर्धार आम्ही केला आहे. बाली आणि नैरोबी येथील मंत्रीस्तरीय परिषदेच्या बैठकीतील निष्पत्तीच्या अंमलबजावणीला वेग यावा आणि अर्जेन्टिना येथे या वर्षी होऊ घातलेल्या डब्लूटीएच्या मंत्रीस्तरीय परिषदेतून सकारात्मक परिणाम निघावेत असे आवाहन आम्ही करतो. संरक्षणवादाला आम्ही ठामपणे विरोध करणे सुरूच ठेवणार आहोत. संरक्षणवादाचे उपाय स्थगित ठेवावेत आणि रद्द करावेत या आमच्या विद्यमान संकल्पाप्रती आम्ही कटीबद्धता पुन्हा स्पष्ट करत असून या आमच्या कटीबद्धतेत इतरही देशांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करतो.

33. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी प्रमुख मंच म्हणून जी २० सातत्याने निभावत असलेल्या भूमिकेचे महत्व नमूद करतानाच हॅम्बुर्ग आणि हॅँगझोऊ परिषदेसह जी २० च्या शिखर परिषदांच्या निष्पत्तीची अंमलबजावणी करण्याच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. नकारात्मक भरमसाट वाढ आणि उभरत्या बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्थांना बसणारे  बाह्य धक्के कमीत कमी करण्यासाठी dhakkyan जी २० परिषदेस व्यापक आर्थिक धोरणातील समन्वय आणखी पुढे वाढवण्याचे आम्ही आवाहन करतो. जी २० प्रक्रिया आणि परिणामांमध्ये उभरत्या बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्थांचे (EMDE) हित आणि प्राधान्य प्रतिबिंबित व्हावे या उद्देश्याने अर्जेन्टिनामध्ये होणाऱ्या परिषदेत अंतर्गत समन्वय व सहकार्य वाढवण्याचे आम्ही एकमताने मान्य करतो.

34. अत्यंत चांगली आणि आधुनिक वैश्विक कर प्रणाली साध्य करण्यासाठीची आमची कटीबद्धता पुन्हा ठासून सांगत असतानाच विकसनशील देशांत क्षमता उभारणी सुधारणा आणि करविषयक माहितीची देवाणघेवाण यास प्रोत्साहन, बेस इरोजन आणि प्रॉफिट शिफ्टिंग (BEPS) अशा समस्या हाताळताना अधिक सखोल सहकार्य करण्यासह अधिक समन्यायी, वृद्धीस अनुकूल आणि पायाभूत  खंडन आणि लाभ स्थलांतर आंतरराष्ट्रीय कर पर्यावरणास कार्यक्षम चालना देण्याचीही कटीबद्धता पुन्हा स्पष्ट करत आहोत.

आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा

35. जगात होत असलेले तीव्र स्वरूपाचे बदल आणि आंतरराष्ट्रीय समुदायास तोंड दयावी लागत असलेली जागतिक सुरक्षेची आव्हाने व धोके यांची दखल घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसंबंधित मुद्यांवर आंतरराष्ट्रीय जनमानसात  संदेशवहन आणि सहकार्य वाढवण्यास कटीबध्द आहोत. जागतिक शांतता आणि सुरक्षेचे हितरक्षण व आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्राथमिक निकष कायम ठेवणे तसेच सार्वभौम समानता आणि इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे यासह संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेतील उद्देश्य व तत्वांप्रती आमची कटीबद्धता यांचा आम्ही पुनरुच्चार करतो.

36. बीजिंग येथे सुरक्षेच्या मुद्द्यांवर ब्रिक्स राष्ट्रांच्या उच्च स्तरीय प्रतिनिधींमध्ये २७-२८ जुलै २०१७ रोजी झालेल्या ७ व्या बैठकीचे आम्ही स्वागत करतो आणि जागतिक प्रशासन, दहशतवादाचा मुकाबला, आयसीटी वापरातील सुरक्षा, उर्जा सुरक्षा, प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संवेदनशील स्थळे आणि राष्ट्रीय सुरक्षा व विकास याबाबत चर्चा केल्याबद्दल व सामायिक अंतर्दृष्टी आणखी सखोल केल्याबद्दल आम्ही या बैठकीची प्रशंसा करतो. ब्रिक्स देशांचा गुप्तचर माहितीबद्दल मंच स्थापन करण्याच्या प्रस्तावाची आम्ही नोंद घेतली आहे. बैठकीच्या कार्यवाहीबाबत अध्यक्षांनी आम्हाला दिलेल्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो आणि पुढील अध्यक्ष देशानांही  हाच प्रयोग सुरु ठेवण्याबाबत प्रोत्साहन देणार आहोत. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांत एकमताने मान्य करण्यात आलेले प्रत्यक्षातील सुरक्षा सहकार्य आणखी वाढवले जाईल याकडे आम्ही उत्सुकतेने पाहत आहोत.

37. दि.१८-१९ जून २०१७ रोजी चीनच्या पुढाकाराने बीजिंग येथे चीनच्या यजमानत्वा खालील ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार/आंतरराष्ट्रीय संबंध मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीचे आम्ही स्वागत करतो. सामायिक चिंतेच्या प्रमुख जागतिक राजकीय, सुरक्षेविषयी, आर्थिक आणि वित्तीय मुद्यांवर तसेच ब्रिक्स देशांतील सहकार्य मजबूत करण्यावर मंत्र्यांनी आपापल्या मतांचे आदानप्रदान केले. युएनजीएच्या अनुषंगाने परराष्ट्र मंत्र्यांच्या  होणार्या आगामी बैठकीकडे आम्ही उत्सुकतेने पाहत आहोत. २०१८ मध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या पुढील बैठकीचे यजमानपद स्वीकारण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करतो.

38. विकास आणि सुरक्षा एकसंघता, पारस्पारिक मजबूत संघटन तसेच  शाश्वत शांततेच्या प्रस्थापनेसाठी आम्ही कटिबध्द आहोत. शाश्वत शांततेची प्रतिष्ठापना करण्यास परस्परातील विश्वास, परस्परांचा फायदा, समानता आणि सहकार्य जे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक आयामांसह संघर्षाच्या कारणांचे निवारण करेल यावर आधारित सर्वसमावेशक, सुनियोजित आणि निर्धारपूर्वक पवित्र्याची गरज असते, या आमच्या मताचा आम्ही पुनरुच्चार करतो. आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि सार्वत्रिक मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत निकषांचे उल्लंघन करून एकतर्फी लष्करी हस्तक्षेप, आर्थिक निर्बंध आणि एकतर्फी दाब उपायांचा मनमानी वापर याचा आम्ही निषेध करतो. इतर देशांच्या सुरक्षेचा बळी देऊन कोणत्याही देशाने आपली सुरक्षा वाढवू नये यावर आम्ही भर देतो.

39. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, जागतिक विकास प्रगतीपथावर नेणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण व चालना यासाठी सोपवलेल्या जबाबदारीसह संयुक्त राष्ट्रसंघही हा सार्वत्रिक बहुपक्षीय संघटना आहे याबाबत आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा जोर देऊन सांगतो.

40. २००५ मधील जागतिक शिखर परिषदेतील निष्पत्तीचे स्मरण करून सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रसंघात सर्वसमावेशक सुधारणा करण्याची गरज आम्ही पुन्हा ठासून व्यक्त करत आहोत ज्यामागे आमचा दृष्टीकोन तिला अधिक प्रातिनिधिक, परिणामकारक आणि कार्यक्षम बनवणे आहे जागतिक आव्हानांना हा दृष्टीकोन पुरेसा प्रतिसाद देईल.  यासाठी विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींत ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा दर्जा आणि भूमिकेला देत असलेल्या महत्वाचा चीन आणि रशिया पुनरुच्चार करत असून संयुक्त राष्ट्रसंघात अधिक महत्वाची भूमिका बजावण्याच्या त्यांच्या आकांक्षेला समर्थन देतात.

41. आम्ही याचाही पुनरुच्चार करतो की, सिरियातील पेचावर एकमेव कायमचा तोडगा हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील २२५४ क्रमांकाच्या (२०१५) ठरावाच्या अनुरोधाने समावेशक अशा सिरीया प्रणीत, सिरीया मालकीच्या समावेशक राजकीय प्रक्रियेच्या माध्यमातून निघणार आहे जी प्रक्रिया सिरियाचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक एकात्मकतेचे हितरक्षण करते तसेच सिरीयन लोकांच्या कायदेशीर आकांक्षांना चालना देते. जिनिव्हा शांतता बोलणी आणि अस्ताना प्रक्रियेला आम्ही जोरदार पाठिंबा देत असून सिरियात संघर्षरहित क्षेत्रे तयार करणे ज्यांचा हिंसाचाराचा स्तर कमी करून सकारात्मक गती आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आश्रयाखाली होणार्या शांतता चर्चेत अर्थपूर्ण प्रगतीसाठी अनुकूल  स्थिती निर्माण करण्यात योगदान राहिले आहे. कोणत्याही परिस्थितीत, कुणाकडूनही आणि कोणत्याही उद्देश्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यास आमचा ठाम विरोध आहे.

42. संयुक्त राष्ट्र संघांच्या ठरावांच्या संबंधांवर आधारित मध्य पूर्वेत शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर आम्ही जोर देतो. माद्रीत तत्वे अरब शांतता पुढाकार आणि इस्रायलच्या शेजारील स्वाय्यत्त, सुरक्षित  असे प्लॅस्टाईन राज्यांसारखे राष्ट्र निर्माण करणे त्यासाठी वाटाघाटी करणे आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही पक्षांमध्ये केलेल्या करारांवर आधारित न्याय तसेच कायमचा तोडगा काढण्याची गरज असल्याचा आम्ही पुनरुच्चार करीत आहोत. असा तोडगा काढत असताना आमचे योगदान वाढविण्यास आम्ही तयार आहोत.  आम्ही या प्रदेशांमध्ये शांतता व स्थैर्य वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे समर्थन करतो.

43. मोसुलवर पुन्हा ताबा मिळवल्याबद्दल आणि दहशतवादाविरोधातील लढ्यात साध्य केलेल्या प्रगतीबाबत आम्ही इराकी जनता आणि सरकारचे अभिनंदन करतो  आणि इराकचे सार्वभौमत्व, प्रादेशिक एकत्मिक्त व राजकीय स्वातंत्र्य याप्रती आमची कटीबद्धता आम्ही मान्य करतो. तसेच इराकी सरकार आणि इराकी जनतेला पाठिंबा देतो. येमेनमधील स्थितीबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो आणि सर्व संबंधित पक्षांनी वैरभाव थांबवून संयुक्त राष्ट्रसंघाने समर्थन दिलेल्या वाटाघाटी सुरु कराव्यात, असे आवाहन करतो. आखाती प्रदेशातील सध्याच्या राजनैतिक पेचप्रसंगात गुंतलेल्या देशांना चर्चेच्या माध्यमातून मतभेद दूर सारण्याचे आवाहन करतानाच आम्ही  या संदर्भात कुवैती मध्यस्थांच्या प्रयत्नांचे स्वागत करतो.

44.उत्तर कोरियाने (DPRK) घेतलेल्या अणुचाचण्यांबाबत आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. कोरियन द्विपकल्पात सध्या सुरु असलेला तणाव आणि दीर्घ काळ सुरु असलेल्या आण्विक पेचाबाबत आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो. सर्व संबंधित पक्षांमध्ये थेट चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानेच तो सोडवला जाऊ शकतो यावर जोर देतो.

45. इराणमधील आण्विक मुद्द्यावर संयुक्त सर्वसमावेशक कृती योजनेला (JCPOA) आम्ही ठामपणे पाठिंबा देतो आणि आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक शांतता तसेच स्थैर्याला चालना देण्यासाठी सर्व संबंधित देशांनी आपल्या कर्तव्याचे संपूर्णपणे पालन करावे आणि JCPOA ची संपूर्ण व परिणामकारक अंमलबजावणी होईल याची सुनिश्चिती करावी, असे आम्ही आवाहन करतो.

46. आफ्रिकन देश, आफ्रिकन युनियन आणि उपप्रादेशिक संघटना यांच्या प्रादेशिक मुद्द्यांचे निवारण करण्यासाठी प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी  केलेल्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेनुसार संयुक्त राष्ट्रसंघ व आफ्रिकन युनियन यांच्यातील सहयोगाचे महत्व यावर जोर देतो. कोंगो लोकशाही प्रजासत्ताक, लिबिया, दक्षिण सुदान, सोमालिया, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक आणि पश्चिम सहारा या देशांतील पेच सर्वसमावेशकरित्या सोडवण्याच्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांना आम्ही समर्थन देतो.

47. निरपराध अफगाण नागरिकांची हत्या होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही अत्यंत कडक  निषेध करतो. तेथील हिंसाचार ताबडतोब थांबण्याची गरज आहे. अफगाण प्रणीत आणि अफगाण मालकीची शांतता आणि राष्ट्रीय सलोखा साध्य करण्याचे अफगाणिस्थानच्या जनतेचे प्रयत्न, अफगाणिस्तानवर चर्चेचे मॉस्को प्रारूप आणि आशियाचे हृदय – इस्तंबूल प्रक्रिया यासह सध्या सुरु असलेले आंतरराष्ट्रीय प्रयत्न त्याचप्रमाणे शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यासाठी बहुविध जोडणी प्रकल्प, दहशतवाद आणि अंमली पदार्थांचा धोका याविरोधातील लढा आणि अफगाणिस्तानकडून राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी होत असलेल्या प्रयत्नांना आम्ही समर्थन देत असल्याचे  पुन्हा ठामपणे सांगतो. दहशतवादी संघटनांविरोधातील लढ्यात अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि फौजांच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो.

48. आम्ही यासंदर्भात प्रदेशातील सुरक्षा स्थितीवर आणि तालिबान, आयएसआयएल/ डीएआयएसएच , अल कायदा आणि इस्टर्न तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, हक्कानी नेटवर्क, लष्कर- ए- तैयबा, जैश- ए – मोहम्मद, टीटीपी आणि हिझ्ब उत तहरीर यासह त्याच्या संलग्न संघटनांकडून केला जात असलेल्या हिंसाचाराबदल आम्ही चिंता व्यक्त करतो.

49. जगभरामध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांविषयी आम्ही तीव्र नापसंती आणि दुःख व्यक्त करतो, त्यामध्ये ‘ब्रिक्स‘ देशांमध्ये होत असलेल्या हल्ल्यांचाही समावेश आहे. या सर्वप्रकारच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. कोणत्याही रूपामधून प्रकट होत असलेल्या दहशतवादाचे आणि तणाव निर्माण करीत असलेल्या दहशतवादी कृतीचे कदापि समर्थन केले जाणार नाही. जे कोणी दहशतवादी कृत्ये करीत असतील, त्यासाठी जबाबदार असणा-या संघटना, आणि दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणा-यांना पुन्हा एकदा अगदी निग्रहपूर्वक  सांगण्यात येते की, त्यांना अशा दहशतवादी कारवायांची जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि काही झाले तरी त्यांनाच जबाबदार धरले जाईल. यावेळी दहशतवादापासून सदस्य देशांचा बचाव करावयाचा त्याचबरोबर त्याला ठोस प्रत्युत्तरही द्यावयाचे, अशी महत्वपूर्ण  भूमिका ‘ब्रिक्स‘च्या निर्मितीच्यावेळी प्राधन्याने घेतली होती, याचा स्मरणपूर्वक उल्लेख करण्यात आला. दहशतवादासंबंधी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विचार करून आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आपल्याला भर देण्याची आवश्यकता आहे. यामध्ये त्या त्या राष्ट्रांचे सार्वभौमत्व अबाधित रहावे, त्यांच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये दखल दिली जावू नये, असाही विचार आहे. दृढ ऐक्याने आम्ही दहशतवादाविरूद्ध लढा देवू. यासाठी 18 मे 2017 रोजी बिजिंग येथे झालेल्या ब्रिक्स दहशतवादविरोधी कार्यकारी समुहाच्या व्दितीय बैठकीचे महत्व लक्षात घेवून आमच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यास आम्ही मान्यता देतो. 

50. सर्व देशांनी दहशतवादाविरूद्ध लढा पुकारताना सर्वंकष धोरण राबवावे. यामध्ये कोणत्याही जहाल धोरणाला विरोध केला जावा. दहशतवादी चळवळ उभी करण्याला त्यामध्ये भरती करणे, परकीय दहशतवादी, दहशतवादाला होणारा वित्त पुरवठा बंद करणेमोठ्या आर्थिक गैरव्यवहारांतून दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा केला जातो, तो बंद करणे. शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करणे, अंमली पदार्थांची होणारी तस्करी थांबवणे आणि इतर गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे हे आपण मान्य केले आहे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे, आणि दहशतवादी संघटनांकडून इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांचा वापर केला जातो, त्याला आळा घालणे. अत्याधुनिक माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा गैरवापर दहशतवादी करतात, त्यावर कडक निर्बंध घातले पाहिजेत. दहशतवाद्यांना पुरवली जाणारी आर्थिक रसद तोडण्याचा आपण निर्धार केला आहे. वित्तपुरवठ्याचे सर्व स्त्रोत आम्ही बंद करणार आहोत. यासाठी आपण ‘यूएनएससी‘ कराराची अंमलबजावणी करणार आहोत आणि ‘एफएटीएफ‘ आंतरराष्ट्रीय प्रामाणिकरणाप्रमाणे विचार करणार आहोत. यासाठी प्रादेशिक संस्थांमध्ये अधिक सामंजस्य दृढ करण्याची आपली जबाबदारी असणार आहे. सर्व देशांनी दशहतवादाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी त्यांना होणारा अर्थ पुरवठा कसा बंद होईल, हे पाहिले पाहिजे.

51.  दहशतवादाला विरोध करण्यासंबंधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपण अतिशय व्यापक धोरण राबवण्याची आवश्यकता आहे. यासाठी संयुक्त राष्ट्राच्या मध्यवर्ती सहकार्याच्या भूमिकेचाही पाठिंबा घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण दहशतवादाची लढाई करण्यावर भर दिला पाहिजे. यामध्ये आंतरराष्ट्रीय निर्वासित आणि मानवतावादासंबंधीचे संयुक्त राष्ट्राचे कायदे, मानव अधिकार आणि मुलभूत स्वातंत्र्यांचा हक्क यांचाही विचार केला पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादाविरोधाच्या  चौकटीमध्ये राहूनच आपण हे कार्य करणार असल्याचे येथे आग्रहपूर्वक नमूद करण्यात येत आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सहकार्याने आणि समन्वयाने या क्षेत्रात काम करण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधात संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत घेतलेल्या सर्वंकष धोरणांची अंतिम अंमलबजावणी करण्यासाठी संघाच्या सर्वसाधारण सभेने  निर्णय घ्यावा असा मी आग्रह करतो.

52. संयुक्त राष्ट्राच्या शांतता धोरण राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये ‘ब्रिक्स‘देशांच्या सहभागाचे असलेले महत्व आम्ही जाणून आहोत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी संयुक्त राष्ट्राचा शांतता कार्यक्रमही महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच शांतता प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेला ‘ब्रिक्स‘ देशांनी प्राधान्य दिले आहे. आणि त्यादृष्टीने व्यापक संवादावर भर दिला जात आहे.

53. अंमली पदार्थांचा वाढता व्यापार ही आमच्यासाठी मोठीच समस्या बनली आहे, याचा वारंवार पुनरूच्चार केला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ नियंत्रण नियमावलीला आधार मानून सर्वंकष आणि समतोल दृष्टीने तोडगा काढण्यात येईल. यामध्ये अंमली पदार्थांचा होणारा पुरवठा, त्यांना असलेली मागणी याचा विचार करण्यात येईल. यासंबंधी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या 30व्या विशेष सत्रामध्ये अंमली पदार्थाची जागतिक समस्या यावर चर्चा झाली आणि ती सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रीय पातळीवर सहकार्य आणि समन्वयाने दृढतेने प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. अंमली पदार्थांचे बेकायदा उत्पादन आणि चोरटा व्यापार यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर काही क्षेत्रांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यवसायातून निर्माण होणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरवला जातो, ही तर अधिकच चिंतेची, गंभीर बाब आहे.

54. मानवी अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या हक्काचे रक्षण तसेच समानता  आणि एकमेकांचा आदर करण्यासंबंधी तत्व कसोशीने पाळावे यासाठी सर्व देशांना प्रोत्साहन देणे त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचा आम्ही पुनरूच्चार करतो. सर्व मानव जातीला समानतेची वागणूक देण्याचे आम्ही मान्य करतो, त्याचबरोबर मानवी अधिकार त्याचबरोबर विकासाचा हक्कही सगळ्यांना समान प्रमाणात मिळाला पाहिजे, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, यावर भर देण्यात येत आहे. यासाठी ‘ब्रिक्स‘ देशांमध्ये सहकार्याचे बंध अधिक दृढ करण्यात येतील आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार मंडळाच्या धोरणांना प्रोत्साहन देण्याचा विचार करून विधायक कार्य करण्यात येईल. हे धोरण राबवताना कोणत्याही निवडक, राजकीय गोष्टीचा विचार केला जाणार नाही. तसेच दुट्टपी धोरण ठेवले जाणार नाही.

55. आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे जागतिक सुरक्षेच्या प्रश्नाचे आव्हान निर्माण झाले आहे. याचा विचार करून आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही आणि समाजाचाही योग्य विकास होईल, अशा पद्धतीने प्रभावी स्थलांतरण नियमावली महत्वपूर्ण भूमिका कशी पार पाडेल, यावर आम्ही भर देणार आहे.

56. संपूर्ण जगाचा विकास घडून येण्यासाठी संयुक्त राष्ट्राची मध्यवर्ती भूमिका आहे, असे आम्ही मानतो. माहिती आणि तंत्रज्ञानाचे नियमही याचसाठी स्वीकारण्यात आले आहेत. त्यामागे शांतता, सुरक्षितता, सहकार्य, स्थिरता, सुव्यवस्था, तसेच कोणालाही ते स्वीकारण्याची मुभा आणि समानता यांचा समन्वय साधण्याचा हेतू आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्व आम्ही जाणून आहोत. विशेषतः यामध्ये प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व जतन करून त्यांना समानतेचा दर्जा देणे, त्यांच्या अंतर्गत व्यवहारामध्ये हस्तक्षेप न करणे आणि इतर देशांमध्ये मानव अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर गदा येणार नाही, याकडे प्राधान्याने आमच्याकडून लक्ष दिले जाते. दहशतवादांकडून माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर होत आहे, याकडे लक्ष वेधून आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक व्यापक करण्यावर आम्ही भर देत आहोत. यासंबंधी इथेक्विनी, फोर्टलेझा, उफा आणि गोवा येथे करण्यात आलेल्या घोषणापत्राचा आम्ही पुनरूच्चार करीत आहोत. आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी, गुन्हेगारीसाठी होणारा वापर थांबवण्यासाठी एक वैश्विक नियामक अस्त्र तयार करण्याची गरज आहे. उफामध्ये यासंबंधी झालेल्या चर्चेविषयी आणि ‘ब्र्रिक्स‘मधील तज्ञांच्या कार्यकारी समुहाने केलेल्या प्रगतीमुळे  संयुक्त राष्ट्राने समाधान व्यक्त केले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी ‘ब्रिक्स‘ने जो पथदर्शी कार्यक्रम तयार केला आहे, त्याचे प्रात्यक्षिक सहकार्याच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी रशिया पुढाकार घेणार आहे. त्याचबरोबर ‘ब्रिक्स‘ आंतर-सरकार सहकार्य करार करून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वापराची सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे. 

57. महाजाल म्हणजेच इंटरनेट आणि त्यामुळे  प्रशासन कार्यात होत असलेली क्रांती पाहता, यामध्ये सर्व देशांचा समसमान सहभाग असेल, असा आमचा विश्वास आहे. मात्र यामधील सर्व घटकांनी आपली भूमिका, तिचे गांभिर्य  समजून घेवून त्याप्रमाणे आपआपली जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. महाजालाचे व्यवस्थापन आणि नियमन करणे अतिशय अवघड कार्य आहे. ‘ब्रिक्स‘च्या कार्यकारी समुहाने माहिती आणि तंत्रज्ञानाविषयी अतिशय समाधानकारक कार्य केले आहे. या क्षेत्रामध्ये आपण अधिक मजबूत सहकार्य करून दृढतेने वाटचाल करणार आहोत. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षा, मोकळेपणा, शांतता आणि सहकार्य साध्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय समाजाचे व्यवस्थापन करताना माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समानतेचा आधार बनणार आहे.

58. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बाहय अंतराळ क्षेत्र शांततापूर्ण संशोधनासाठी मुक्त आहेत. त्यांचा वापर करण्याचे अधिकार सर्व देशांना समान आहेत. याचा आम्ही पुनरूच्चार करीत आहोत. कोणत्याही शस्त्रांच्या, शक्तींच्या  उपयोगापासून अंतराळ मुक्त असणार आहे. हे वारंवार स्पष्ट करीत आहोत. निशस्त्रीकरण करून शस्त्रास्त्र स्पर्धेपासून लांब राहण्याचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्राचे आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी भरीव कार्य करण्यात आल्याचे येथे नमूद करण्यात येत आहे. यासाठी चीन आणि रशियाने अंतराळाचा उपयोग शस्त्रास्त्रांसाठी करायचा नाही असे आधीच स्पष्ट केले आहे. आम्हीही आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून आणि राजकीय गरज लक्षात घेवून आमच्याकडून अंतराळात प्रथम शस्त्रास्त्राचा वापर केला जाणार नाही, असे स्पष्ट करीत आहोत. 

59. आपल्या पुढील पिढ्यांसाठी बाहय अंतराळ क्षेत्राचे जतन केले पाहिजे, म्हणूनच अंतराळातील कार्यक्रमांची आखणी करताना दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांततापूर्ण बाहî अंतराळ समितीचा हा सध्याचा कृतिकार्यक्रम आहे, याची आम्हीही दखल घेतली आहे. आणि त्याचा आदर करून आम्हीही या कार्यक्रमाचे स्वागत करीत आहोत. या समितीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांच्या उपसमिती कार्यदलाने दीर्घकालीन शाश्वत विचार करून 2018 पर्यंत  पथदर्शक नियमावली तयार करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. योगायोगाने 2018 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेच्या पहिल्या बैठकीचे 50 वे वर्धापन वर्ष असणार आहे. त्याचवर्षी ‘‘युनिस्पेस प्लस 50‘‘ साजरे  होणार आहे.

आदान-प्रदान कार्यक्रमावर भर

60. आम्ही लोकांच्या एक्सचेंज कार्यक्रमाला महत्व आणि प्रोत्साहन देतो. एकमेकांच्या सामंजस्यातून विकासाला चालना मिळते, मित्रत्वाची भावना वाढीस लागते अणि ‘ब्रिक्स‘च्या समुहामध्ये सहकार्य वृद्धिंगत होते. सांस्कृती, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि आरोग्य त्याचबरोबर  तिसरा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम संघटना, आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये आम्ही सहकार्याचे  बंध अधिक दृढ केले ब्रिक्स देशांमध्ये अर्थपूर्ण भागिदारी निर्माण होणार आहे, असा आमचा विश्वास आहे. यामुळे ब्रिक्सच्या भागिदारीमध्ये त्या त्या देशांतील लोकांचाही सहभाग होणार आहे.

61.  सांस्कृतिक वैविध्यता हीच खरी ‘ब्रिक्स‘ सहकार्यामधली अतिशय अमूल्य मालमत्ता आहे, हे आम्ही जाणतो. शाश्वत विकासासाठी आणि ‘ब्रिक्स‘ समुहातील देशांना ‘एक्सचेंज‘ कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या संस्कृती आणि सांस्कृतिक वैविध्यतेवर अधिक भर देतो. एकमेकांची संस्कृती जाणून घेताना, त्यातील वैविध्य शिकून घेताना समान मूल्यांचे धागे हाती लागतात. त्यांची जोपासना केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये दुसरी व्यक्ती यामुळे सामावली जाते. अशा सामायिकरणासाठी आम्ही ‘ब्रिक्स कृती योजनेचे स्वागत करतो. सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी ‘ब्रिक्स अलायन्स‘ची स्थापना केली  आहे. त्याव्दारे ग्रंथालये, संग्रहालये, कला संग्रहालये आणि राष्ट्रीय कला दालने याशिवाय लहान मुले आणि युवावर्गासाठी नाटय क्षेत्रातही ‘अलायन्स‘ म्हणजे संयुक्त आघाडी सुरू करण्यात आली आहे. शियामेनमध्ये सप्टेंबरच्या मध्यात ‘ब्रिक्स‘चा एक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे, या यशस्वी आयोजनाबद्दल आम्हाला उत्सुकता आहे. ब्रिक्स देशांमध्ये सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक व्यासपीठ तयार करण्याचे काम सुरू आहे, त्याचबरोबर ‘ब्रिक्स सांस्कृतिक परिषद‘ स्थापन करण्यासाठी सातत्याने व्यापक स्तरावर काम सुरू आहे.

62. शाश्वत आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आम्ही शिक्षणाचे महत्व जाणून त्यावर भर देतो. ‘ब्रिक्स‘च्या भागिदारांनी आपल्या शैक्षणिक सहकार्यामध्ये सकारात्मक प्रगती केली आहे आणि शैक्षणिक क्षेत्राला बळकटीही दिली आहे. आता ‘ब्रिक्स विद्यापीठ संघ आणि ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठ यांच्या पाठिंब्याने शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यात येत आहे, त्याचे  स्वागत करा, असे आम्ही आर्वजुन नमूद करतो. यामध्ये युवकांसाठी उन्हाळी सुट्टीतील शिबिरे, अनेक प्रकारच्या जास्त शिष्यवृत्ती देवू केल्या जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील बुद्धिवंत या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत, हे आम्ही आग्रहपूर्वक सांगतो. ‘ब्रिक्स‘ देशांतील विद्यार्थ्यांना अनेक संधींची व्दारे उघडली आहेत. शाश्वत विकासाचे लक्ष्य समोर ठेवून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचा अनुभव देण्याची योजना आम्ही तयार केली आहे.

63. पारंपरिक खेळांची लोकप्रियता लक्षात घेवून ‘ब्रिक्स‘च्या लोकांमध्ये मित्रत्वाची भावना अधिक वाढीस लागावी यासाठी क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्यावर आमचा विश्वास आहे. गोवा येथे 2016 मध्ये, ब्रिक्स 17 वर्षाखालील क्रीडापटूंच्या  फूटबॉलच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते, त्याचे आम्ही  आज स्मरण करतो. अशा स्पर्धांमुळेच लोकांना ‘एक्सचेंज‘चे महत्व लक्षात येते. यानंतर आम्ही क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्याचा सामंजस्य करारही केलेए यामुळे या पाच देशांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यास मदत होत आहे.

64. जागतिक आरोग्य प्रशासनामध्ये ‘ब्रिक्स‘ची भूमिका अधिक व्यापक असावी असे आम्हाला वाटते. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेसंदर्भात तसेच नवसंकल्पनेतून उदयास आलेली वैद्यकीय उत्पादने अधिक कशी विकसित होतील त्यांच्यामध्ये सुधारणा कशी होवू शकेल याचा विचार आम्ही करीत आहोत. वैद्यकीय सुविधा सगळ्यांना परवडणारी असावी, त्यांचा दर्जा उत्तम असावा, तसेच प्रभावी,सुरक्षित औषधे, लसी उपलब्ध होण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन आम्ही देत आहोत. त्याचबरोबर रोगनिदान यंत्रणा, वैद्यकीय उत्पादने आणि तंत्रज्ञान यांचाही विचार आम्ही करीत आहोत. वैद्यकीय सेवा चांगली मिळण्यासाठी आरोग्य सेवा प्रणाली आणि आरोग्य वित्त पुरवठा म्हणजेच विमा यांचा विचार आम्ही करीत आहोत. संसर्गजन्य रोगांना आळा घालण्यासाठी आणि उपाय योजना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची क्षमता वाढवत आहोत. साथीच्या रोगांमध्ये इबोला, एचआयव्ही, एडस्, क्षयरोग, हिवताप यांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाची मदत घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या संदर्भात ब्रिक्सच्या आरोग्य मंत्र्यांचीही बैठक झाली. आणि उच्चस्तरीय बैठकीमध्ये पारंपरिक औषधांची देवाण-घेवाण करण्याच्या हेतूने एक दीर्घकालीन यंत्रणा स्थापन करण्यात आली. तसेच पारंपरिक औषधांविषयीचे शिक्षण एकमेकांना देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय झाला. पुढील पिढ्यांपर्यंत असे परंपरागत आलेले ज्ञान पोहोचवणे हा यामागे उद्देश आहे. क्षयरोग संशोधनासाठी एक जाळेच तयार करण्यात आले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. रशियामध्ये नोव्हेंबर 2016मध्ये वैद्यकीय परिषद झाली. यंदाही होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी 2018 मध्ये एक उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. अशा प्रकारची पहिल्यांदाच बैठक होत असून या बैठकीला ‘ब्रिक्स‘ने पाठिंबा दिला आहे. जी-20 मध्येही अशाप्रकारे वैद्यकीय कार्य करण्याचे आमच्या समुहाने निश्चित केले आहे.

65. दीर्घकालीन आणि समतोल भौगोलिक विकासाला आम्ही प्राधान्य आणि प्रोत्साहन देतो, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ब्रिक्सने लोकांना सहकार्य करण्याची कार्यपत्रिका तयार केली आहे. आणि या समुहाने 2015 ते 2020 सहकार्यातून विकासाचा कार्यक्रम  आखला आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

66. विविध क्षेत्रामध्ये ‘ब्रिक्स‘ समुहाने केलेली देवाण-घेवाण आणि केलेले सहकार्य त्यातून होत असलेली प्रगती समाधानकारक आहे, असे आम्ही नमूद करतो. यामध्ये प्रशासन, चित्रपट निर्मिती, प्रसार माध्यमे, बुद्धिवंतांचे विचार, संसद, स्थानिक प्रशासन, आणि व्यापारी संघटना अशा अनेकविध क्षेत्रांचा समावेश आहे. भविष्यामध्ये आणखी व्यापक सहकार्य करण्याचे आम्ही मान्य केले आहे. आम्ही पहिल्यांदाच‘ब्रिक्स‘देश संयुक्तपणे चित्रपट निर्मिती केली, त्याचे सर्व स्तरावर कौतुक झाले. तसेच ब्रिक्स देशांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजनही केले. ब्रिक्स चित्रपट महोत्सव, प्रसार माध्यम गट, शहरांशी आणि स्थानिक प्रशासनाशी मैत्री, सहकार्य फोरम, युथ फोरम, युथ डिप्लोमॅट फोरम आणि तरूण संशोधकांचा समूह या सगळ्यांची आम्ही प्रशंसा करतो. ‘ब्रिक्स‘च्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही कौतुक करतो. यामध्ये राजकीय पक्ष, बुद्धिजीवी, आणि नागरी संघटना अशा सर्व घटकांचा समावेश आहे. ब्रिक्स संशोधन आणि देवाण-घेवाण निधीबाबत  चीनने सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार आम्ही करणार  आहे.

67. ब्रिक्समध्ये संस्थात्मक विकासासाठी  प्रगती करणे महत्वपूर्ण असून तिचे आम्ही कौतुक करतो. अशाच पद्धतीने यापुढेही विकास व्हावा यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बदलत्या परिस्थितीमध्ये ‘ब्रिक्स‘, सदस्य देशांना अधिक सहकार्य करेल, सहयोग करेल, त्याचे आम्ही स्वागत करतो. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये चीनने शेरपाच्या वाढीसाठी जी चालना दिली, जे उपाय योजले त्याचे आम्ही स्वागत करतो. यापुढेही हे प्रयत्न असेच सुरू राहतील, अशी ग्वाही देतो. संस्थात्मक विकासाबद्दल ‘ब्रिक्स‘मध्ये आस्था दाखवली जात  आहे.

68. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये संयुक्त राष्ट्राची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी आम्ही बहुपक्षीय आणि मध्यवर्ती भूमिका घेणारे आहोत. ब्रिक्स देशांमध्ये अधिक चांगले सहकार्य आणि समन्वय राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. परस्परांच्या समान रस असलेल्या मुद्यांच्याबाबतीत आम्ही संयुक्त राष्ट्राकडे शिफारस करू शकतो. यासाठी नियमित बैठकांच्या माध्यमातून आम्ही आमचे विषय मांडणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी           न्यूयॉर्क, जिनिव्हा आणि व्हिएन्ना येथे पाठविणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, व्यापक स्तरावर ‘ब्रिक्स‘चा आवाज उठवला जाणार आहे.

69. दरबान येथे झालेल्या शिखर संमेलनापासून ‘ब्रिक्स‘ची व्याप्ती वाढली, असे म्हणतात. आता आम्ही उदयोन्मुख बाजारपेठा, विकसनशील देश यांच्याशी संवाद साधणार आहे. 2030 पर्यंत विकसनशील देशांनी शाश्वत प्रगती साधावी, आणि विकासाच्या इमारतीचे महत्वपूर्ण भागिदार बनावे यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. ब्रिक्स  प्लसने ‘‘ सर्वसामान्यांच्या विकासासाठी,परस्परांच्या फायद्यासाठी सहमतीने सहकार्य‘‘ करण्याचे त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

70.  चीन सरकारने  यजमानपद भूषवून शियामेन येथे नववे ब्रिक्स संमेलन भरवले होते. 2017चे ब्रिक्स संमेलन अतिशय यशस्वीरित्या पार पडले, याबद्दल दक्षिण अफ्रिका, ब्राझिल, रशिया आणि भारत चीनचे आभार मानत आहे.

71.  पुढाच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये दहाव्या ब्रिक्स संमेलनाचे यजमानपद दक्षिण अफ्रिकेने स्वीकारले आहे. त्याला चीन, ब्राझिल रशिया आणि भारत यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

 
PIB Release/DL/1434
बीजी -सुवर्णा -

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau