This Site Content Administered by
पंतप्रधान

केंद्र, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन, संस्कृती आणि क्रीडा मंत्री तसेच सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 20-1-2017

तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील जे कदाचित या कच्छच्या भूमीत पहिल्यांदाच आले असतील. याआधी कधी कच्छ मध्ये आले असतील तरी इतक्या दूर पाकिस्तानच्या सीमारेषेवर वाळवंटात आले नसतील. सीमेजवळ कोण आलं असेल? पण आज आपल्याला तिथे जाण्याची संधी मिळाली. जे हिमालयाच्या जवळच्या राज्यातून आले असतील त्यांच्यासाठी वाळवंटाचा एक वेगळाच अनुभव असेल. पूर्वोत्तर राज्यांमध्ये, ज्यांनी हिरव्यागार झाडं आणि वृक्षांच्या सानिध्यात आयुष्य घालवले त्यांच्यासाठीही वाळवंटाचा एक वेगळाच अनुभव असतो. आणि मला विश्वास आहे की हा परिसर देखील आपल्या ह्या चिंतन शिबिरात एक सकारात्मक प्रभाव निर्माण करेल.

शासकीय कामात, आपण सर्वांनी एकत्र बसून आपले काम समजून घेणे आणि आपल्या कामाची रचना समजून घेणे हे अतिशय महत्वाचे असते. जग कशा प्रकारे बदलत आहे, ह्या बदलत्या जगात आपण कुठे उभे आहोत आणि आपल्याला नेमके कुठे पोहोचायचे आहे आणि आपण कुठे पोहोचू शकतो. ह्या गोष्टींचे सतत मूल्यांकन करत राहिले पाहिजे. दुर्दैवाने सरकारांचा एक स्वभाव बनला आहे आणि तो म्हणजे आपापल्या कोशात काम करणे. कधी कधी तर एकाच विभागात अनेक कोश असतात. एका टेबलवर काय काम सुरु आहे हे, दुसऱ्या टेबलवरच्या कर्मचाऱ्याला समजत नाही, किंबहुना ते समजु नये अशीच इच्छा असत.

एका विभागाचा दुसऱ्या विभागाशी ताळमेळ नसतो आणि त्यामुळे होतं काय की एक विभाग जसा विचार करतो, दुसरा विभाग, बरोबर त्याच्या उलटा विचार करतो. कधी कधी तर आश्चर्य वाटते, सरकारचे दोन वेगवेगळे विभाग न्यायालयात वकिलांना पैसे देऊन एकमेकांविरुद्ध लढत असतात. आता ही जी परिस्थिती आहे, ती ही काही चांगली नाही. ह्यात बदल घडवून आणला पाहिजे. आणि बदल घडवून आणण्याचा मार्ग म्हणजे आपण सर्वांनी एकत्र बसून व्यापक दृष्टीने सविस्तर चर्चा करून आपली अंतर्गत धोरणे कशी असतील, आपल्या विविध विभागांची भूमिका काय असेल, आपण काय साध्य करू शकतो, हा विचार केला तर चांगलं होईल. काही विभाग असतात, तसे काही विभाग वेगळे असूनही समविचारी असतात. त्यांचा एकमेकांशी काही ना काही समन्वय असतो.

इथे मुख्यतः चार मंत्रालयातील लोक एकत्र आले आहेत. एक प्रकारे या मंत्रालयांचा एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध येत असतो. त्यामुळे जर आपण एकत्र बसून आपले अनुभव एकमेकांना सांगावे. तज्ञ मंडळी आहेत, त्यांचे अनुभव ऐकावे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी कुणी कुणी काय काय उपाय शोधले, कुठले प्रयोग केले हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. या तीन दिवसाच्या वास्तव्यात जे औपचारिक सत्र होतील त्याशिवाय जितका वेळ आपण एकमेकांसोबत घालवू शकाल, मोकळेपणाने बोलू शकाल, जेवताना, येता जाता, आणि तंबूत राहण्याची अनेकांची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. आता उकडत असेल, पण संध्याकाळी तिथे फार थंडी पडते.  अशाही वातावरणात तुमचे एकमेकांशी संबंध संदेशवहनाच्या पातळीवर चांगले राहतील. अशा परिस्थितीत देखील एकत्र राहण्याची मजा काही औरच आहे. औपचारिक सत्रांव्यतीरिक्त आपापल्या राज्यांची माहिती एकमेकांना द्या. आपले अनुभव आपल्या मित्रांना सांगा, त्यांचे अनुभव जाणून घ्या. ही एक प्रकारची खूप मोठी मिळकत असेल, हे अनुभव भविष्यात आपल्या विकासाच्या प्रवासात अतिशय उपयोगी सिध्द होऊ शकतात. 

काही कामे अशी असतात जी विभाग, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या लाल फितीच्या परिघाच्या बाहेर जाऊन करायची असतात. आज ज्या चार मंत्रालयाचे अधिकारी इथे जमलेले आहेत, त्यांच्या कामाचे एकंदर स्वरूप असे आहे, की ज्यात काश्मीर मधले लोक जो निर्णय घेतील, कन्याकुमारीचे अधिकारी जो निर्णय घेतील, त्यात एक मध्यवर्ती विचार असेल. हे काम परिस्थितीनुसार, कुठे कमी, कुठे जास्त असू शकते. आता, उदाहरणार्थ, आपले तरुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावेत असे कुठल्या राज्य सरकारला वाटत नसेल? तात्पर्य हे की, हिंदुस्तानातील सगळ्या राज्यांची ही इच्छा आहे. जर सगळ्या राज्यांची हीच इच्छा असेल तर, सगळ्यांनी एकत्र बसून आपल्याला मिळालेल्या भौगोलिक लाभांशाचाही विचार करायला हवा.

आज जगाला आपण ठणकावून सांगू शकतो की आमचे ८० कोटी नागरिक ३५ वर्षांखालील तरुण वर्ग आहे. हिंदुस्तान तरुण आहे. ६५% लोक ३५ वर्षांखालील आहेत. आता, केंद्र आणि राज्य सरकारांची ही जाबाबदारी नाही, की ज्या देशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात युवा शक्ती आहे, तो जगाला काय काय देऊ शकतो. आपण आपल्या युवा शक्तीचा कशा प्रकारे उपयोग करायचा. आपल्या राज्य सरकारांची धोरणे कशी असावीत , कसा आराखडा बनवावा, जेणेकरून आपल्या युवा शक्तीचा देशाला आणि जगाला जास्तीत जास्त उपयोग होईल. जर आपण आतापासून विचार केला तर उत्तम, खरं म्हणजे गेल्या शतकात ह्या विषयांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज होती. पण आता ही आपण सुरुवात केली तर स्थिती बदलू शकते आणि सुखद परिणाम दिसू शकतात. आपला मनुष्यबळ विकास कसा असेल आपल्या युवा शक्तीची जगापुढे काय ओळख असेल ? आपल्या युवा शक्तीला आपण कसे वळण लावू शकतो, युवा शक्ती कुठल्या स्वरुपात आपलाल्या हवी आहे, आपण कुठल्या स्वरुपात पुढे जाऊ इच्छितो. जेंव्हा एखादी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होते, आणि त्यात पुरस्कार मिळतो, तेंव्हा आपल्याला अतिशय आनंद होतो. नाही मिळाला तर वाटतं की नाही, नाही पुढच्या वेळी वेगळा विचार करावाच लागेल, जास्त तयारी करावी लागेल.

आपण सर्वानी विद्यार्थीदशेत पाहिले असेल आपला नैसर्गिक स्वभाव असतो की जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा आपण विचार करतो, की पुढच्या वर्षी शाळा-कॉलेज सुरु झाल्या झाल्या आभ्यासाला सुरुवात करूया. हळू हळू ते सत्र संपू लागते. सुट्ट्यांमध्ये आपण पुन्हा निश्चय करतो की यावेळी नाही तर निदान सुट्ट्या संपल्या संपल्या आपण आभ्यासाला सुरुवात करू. मात्र जसजशी परीक्षा जवळ येते, तसतसे आपण विचार करतो की आता रात्री जागून अभ्यास करावाच लागेल. रात्री झोप आली की वाटते पहाटे लवकर उठून अभ्यास करुया. आईला सागतो , की आई मला पहाटे लवकर उठव, अभ्यास करायचा आहे. आपण सतत आपला टाईम टेबल बदलत राहतो आणि त्यानुसार स्वतःला adjust करत राहतो. रस्ते शोधत राहतो. मग क्रीडा स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी आपण अशी एक संस्थात्मक व्यवस्था करणे आवश्यक नाही का ज्या व्यवस्थेतून आपण निरंतर असे खेळाडू घडवू शकू ज्यांना  स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. मग तालुका असो किंवा जिल्हा स्तर , शाळा कॉलेजेस मधल्या स्पर्धा असोत जोवर सतत क्रीडा स्पर्धा होत राहणार नाहीत, तोवर खेळाडू तयार होणार नाहीत. आपण जर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी एखादे पालक जागृत होऊन आपल्या मुलांना त्या खेळासाठी पाठवतील. सध्या एखादाच खेळाडू असतो, जो ध्येयनिष्ठेने स्वतःची जिद्द आणि मेहनत या भरवशावर पुढे जातो. मात्र जोपर्यंत आपण खेळाचे वातावरण बनवत नाही, खेळाडू तयार होणार नाहीत. काही प्रमाणात क्रिकेटचे वातावरण आहे. प्रत्येक गल्ली वेटाळात मुले  क्रिकेट खेळत असतात. त्यांच्या छोट्या छोट्या स्पर्धाही सुरु असतात. त्यातूनच काही उत्तम खेळाडू चमकतात. क्रिकेटची मोठी यंत्रणा आज देशात तयार झाली आहे. मात्र क्रिकेटपेक्षा अधिक कर्तृत्व आणि क्षमता असलेले अनेक खेळाडू आपल्या देशात आहेत. शारीरिक क्षमतेसोबतच अशा गुणवत्तेला जगभरात अतिशय महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जे नियम असतात, त्यांच्या अंतर्गत खेळाडूना प्रशिक्षित केले तर आपण त्या दर्जाचे खेळाडू निर्माण करू शकू. आपण जितक्या लवकर आणि जितकी उत्तम योजना बनवून त्यावर अंमलबजावणी करू, तितकेच जास्त परिणाम आपल्याला मिळतील. 

आज जगभरात सरकार पुरस्कृत क्रीडा कार्यक्रम अतिशय कमी आहेत. सर्वासामन्य लोक, कार्पोरेट क्षेत्र यांच्याशी ते अधिक जोडले गेले आहेत. जर एकेका खेळासोबत एकेका राज्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली तर त्याचा लाभ मिळू शकेल. आपण याचा कधी एक आराखडा आपल्या राज्यासाठी तयार केला आहे का? एखाद्या जिल्ह्यात फुटबॉलचा खेळ लोकप्रिय असेल, एखाद्या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळणारे खेळाडू असतील, कुठे नेमबाजी तर कुठे तीरकमठा लोकप्रिय असेल. जोवर जिल्हा स्तरावर आपण आपल्या खेळाडूच्या गुणांचे मूल्यांकन करत नाही, तसेच त्या खेळासाठी आपल्याकडे काय पायाभूत सुविधा आहेत, याचा विचार करत नाही, त्यासाठी प्रशिक्षक आणि साधने यांच्यावर भर देत नाही, तोवर देशातल्या कानाकोपऱ्यात विविध खेळ खेळले जातील, मात्र त्यांना योग्य दिशा मिळणार नाही. त्या खेळातून आपल्या हाती काही लागणार नाही.जिल्हा स्तरावर पायाभूत सुविधा, प्रशिक्षक दिले तर आपण उत्तम युवा खेळाडू घडवू शकू. मात्र त्यासाठी बदल घडवून आणायला हवा.

आपल्या युवा शक्तीचा राष्ट्र निर्मिती मध्ये कसा उपयोग करून घेता येईल. आपण ह्या विषयी कधी विचार केला आहे का? चांगले वादविवाद, चांगले नेतृत्व कौशल्य, गावाच्या समस्या समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न यात युवा शक्तीचा कसा उपयोग होईल. आज देशात डिजिटल चळवळ सुरु आहे. युवक अश्या बदलांना अतिशय वेगाने आत्मसात करतात. आपले युवकांशी संबंधीत जितके विभाग आहेत, संघटना आहेत, यंत्रणा आहेत. आपण युवकांना ह्या कामात लावू शकतो का? आपण बघितलं असेल स्वच्छ भारत अभियान. अनेक राज्यातील युवक संघटनांनी पुढाकार घेऊन स्वच्छ भारत अभियान मजबूत केलं आहे, त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. यातून त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन मार्ग दाखविण्याची संधी मिळाली आहे.

आपण बघितलं असेल मागील काही दिवस रेल्वे स्थानके स्थानिक कलाकार युवकांनी सुशोभित केली आहेत. आता आधीची रेल्वे स्थानक आणि आत्ताची लोकांनी सुशोभित केलेली स्थानके. रेल्वे ने ह्यावर काहीच खर्च केला नाही. ते लोक आपला रंग ब्रश घेऊन आले. त्यांच्याकडे गुणवत्ता होती. त्यांनी आपल्या रेल्वे स्टेशनला आपल्या गावाची ओळख दिली. आता जे प्रवासी येतात ते पूर्ण स्टेशन बघून जातात. आपण आपल्या युवा शक्तीला सर्जनशील कामात कसे लावावे. त्यांच्या शक्तीचा उपयोग कसा करून घ्यावा. आपण सदैव ह्या विषयी विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी नवनवीन योजना तयार केल्या पाहिजेत.

आपल्या कडे NSS आणि NCC सारख्या यंत्रणा आहेत. तरीसुद्धा साहसी कामात आपल्या देशातील युवक मागे का आहे? त्यांना साहसी जीवन जगण्याची इच्छा का होत नाही. ते आपला काही वेळ, सुट्टीचा देखील, अशा ठिकाणी का घालवत नाही. आपल्या देशात श्रमाविषयी एक धारणा बनली आहे. पांढरपेशा नोकरी सगळ्यात उत्तम, बाकी सर्व बेकार. जेंव्हा आपली मुलं विदेशात जातात, तिथे शनिवार रविवार हॉटेल मध्ये काम करतात तिथे त्यांना काही वाटत नाही. कारण तिथली संस्कृती तशी आहे. ती संस्कृती आपली मुलं बघतात. आपल्या युवकांच्या मनात श्रमाविषयी आदर निर्माण करायला हवा. हाताने करावी लागणारी कामे वाईट नसतात. स्वतः साठी पाणी घेऊन पिणं हे देखील वाईट नसतं. हे संस्कार, परंपरा आपण कसे विकसित कारू शकतो. आपल्या ज्या अनेक छोट्या मोठ्या युवक संघटना काम करत आहेत, त्या बदल घडवून आणू शकतात का. ह्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपली सांस्कृतिक परंपरा अनमोल आहे. संपूर्ण जगावर प्रभाव पाडू शकेल इतकी शक्ती आपल्या परंपरेत आहे. पण आपण आत्मविश्वास गमावल्यामुळे, ज्या प्रकारे आपण आपल्या परंपरा आणि संस्कृती जगापुढे आणायला हवी होती तशी आपण आणू शकलो नाही. असा कुठला देश असेल ज्याला आपल्या संस्कृती, परंपरांचा अभिमान नसेल. जर आपल्यालाच त्याचा अभिमान नसेल तर आपण जगाला काय दाखवणार? आपल्या जवळ जे आहे, त्याचा अभिमान बाळगणे हे आपल्या शिक्षणाचा भाग असला पाहिजे. हा आपल्या युवकांच्या विचारसरणीचा भाग असले पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीला एक उत्तम संस्कृती म्हणून जगापुढे मांडण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. फक्त काही नाटक मंडळी, हे त्याचं काम आहे असं मानून जर आपण वागत राहिलो तर ते चालणार नाही. हा समाजाचं भाग बनायला हवा. जर असं झालं तर त्याचे परिणाम अतिशय वेगळे असतील आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करायला हवेत.

जगातील ज्या देशांनी पर्यटन विकसित केले आहे, त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर केला आहे. विदेशातून येणाऱ्या पर्यटनासाठी त्यांना आधी मनोरंजनाच्या, तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक व्यवस्था विकसित कराव्या लागल्या. आपल्या कडे हजारो वर्ष जुनी व्यवस्था उपलब्ध आहे. आणि जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना यात रस असतो. आम्ही जर अभिमानाने आपला सांस्कृतिक वारसा जगाला सांगितला तरच विदेशी पर्यटकांना याबद्दल माहिती मिळेल आणि ते भारतात येतील. जितक्या अभिमानाने आपण ताजमहाल बद्दल बोलतो, तितक्याच अभिमानास्पद अनेक गोष्टी भारतात आहेत. आपलं संगीत, आपली वाद्य परंपरा, आपले संगीतातले अनेक राग हे सगळं जगासाठी एक आश्चर्य आहे. म्हणजे आपल्याला किती समृद्ध वारसा लाभला आहे, जसं खाद्यसंस्कृती, कुणी विचार करू शकतो का, भारतात किती प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जातात. आपण हिंदुस्तानात जन्माला आलो आहोत. जर आपण रोज प्रत्येक राज्यातील एक खाद्य पदार्थ खायचे ठरवले तर जीवन पुरणार नाही. ईतकी विविधता आहे. ही विविधता आपलाल्या जगभरात न्यायची आहे. आपला देश असा नाही एक एका कोपऱ्यात पिज्जा हट आहे आणि २००० किमी दूर, दुसऱ्या कोपऱ्यात देखील पिज्जा हटच आहे. एका कोपऱ्यात ज्या पद्धतीने पिज्जा बनत असेल त्याच पद्धतीने दुसऱ्या कोपऱ्यात देखील बनत असेल. त्याचे घटकही अगदी सारखेच असतात. इथे तर दक्षिणे कडून सुरु केलं तर तांदळाचे पदार्थ मिळतात, उत्तरेकडे जाता जाता तांदूळ संपतो आणी गहू सुरु होतो. ही विविधता आपलाल्या जगापुढे मांडायची आहे. आपल्यात ही शक्ती आहे. पण आपण कधी याकडे लक्ष दिले नाही, की आपल्याकडे काय आहे. आपल्या प्रत्येक राज्याची स्वतः ची एक ओळख का नसावी.

आपण आपल्या राज्याची विशेष ओळख निर्माण केली पाहिजे. प्रत्येक राज्यात असे काही खास भाग असतात , ज्यांचे स्वतःचे काही वैशिष्ट्य असते, त्यांतून त्यांची वेगळी ओळख निर्माण करता येऊ शकते. जर तुम्ही हिमाचल प्रदेशात गेलात आणि तुम्ही सोलन भागाकडे गेलात तर तुम्हाला जागोजागी पाट्या लावलेल्या दिसतील सोलनकडे जाण्याचा मार्ग! आणि ही मशरूम सिटी आहे. मी जेव्हा हिमाचल प्रदेशात काम करत होतो, तेव्हा मी पहिले की त्या लोकांनी सोलनला मशरूम सिटी म्हणून लोकप्रिय केले. जर तुम्ही सूरतला गेलात तर तुम्हाला दिसेल की लोकांनी त्याला सिल्क सिटी म्हणून लोकप्रिय केले आहे. आपला हा जो समृद्ध वारसा आहे, त्याचे नीट काळजीपूर्वक ब्रान्दिंग करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपण सगळ्यांनी याविषयी चर्चा केली तर या संदर्भात काही उपाय करता येतील.

आज जगात पर्यटन क्षेत्र जलदगतीने वाढणारे व्यावसायिक क्षेत्र आहे. सर्वात जास्त वेगाने त्याचा विकास होतो आहे.जगभरात मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्गाचे प्रमाण वाढते आहे. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आपला पैसा बाहेर काढून खर्च करायला तयार आहेत. जागतिक पातळीवर वाढत्या पर्यटन क्षेत्राचा भारतासाठी उपयोग करून घेण्याचा विचार आपण का करत नाही? जगाला काय बघण्यात रस आहे? आपल्या देशातल्या कोणत्या भागात काय आहे? याचा आपण विचार करायला हवा. पर्यटनाला महत्त्व देणाऱ्या जगातल्या ५० देशांमधील पर्यटकांच्या मानसिकतेचा , आवडीनिवडीचा आपण अभ्यास करायला हवा. त्यात युरोपातील पर्यटक असतील तर त्यांना अमुक तमुक गोष्टी बघण्यात रस असेल. भारताच्या कोपऱ्यात त्या गोष्टी असतील तर आपण त्याची जाहिरात करून युरोपातल्या पर्यटकांना तिकडे न्यायला हवे. आपण अद्याप भारताची पर्यटन क्षमता त्याची वैशिष्ट्ये यांचा योग्य अभ्यासच केलेला नाही. नं आपण जगातल्या पर्यटकांच्या आवडीनिवडींचा विचार केला आहे. जगात प्रत्येक वर्गाची आपापली आवड असते, त्यांना त्यांच्या आवडीची स्थळे बघायची असतात. जसे पक्षीमित्र ..पक्षीनिरीक्षक! जगात पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारे कोणी लोक असतील तर, ते हे पक्षीनिरीक्षक असतात. एखाद्या ठिकाणी जातात तिथेच महिना महिना एकेका पक्ष्यामागे कॅमेरा घेऊन त्यांचे निरीक्षण करत बसतात. एकेका चिमणीच्या मागे वेळ खर्च करतात. त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात. आपल्यापाशी अशा लोकांची माहिती आहे का ? जर असे पक्षी निरीक्षक भारतात आले , तर त्यांना अमुक राज्यात जा, या ठिकाणी जा, अमुक ऋतूमध्ये जा , असा सल्ला देऊ शकतो का ? जगात जे पक्षीनिरीक्षक आहेत, त्यांना माहीत आहे का की, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यात पक्षीनिरीक्षकांसाठी योग्य जागा आहेत. आणि जर त्याना कळले तर भारतात या चारशे जागा आहेत ,जिथे पक्षी निरीक्षण केले जाऊ शकते. या जागा पक्षनिरीक्षकांसाठी उत्तम पर्वणी ठरतील. आणि पक्षीनिरीक्षकांना काय सुविधा लागतात ?याचा विचार करून आपण त्या दृष्टीने विकास करण्याचे प्रयत्न आपण कधी केले आहेत का? जर आपण त्या दिशेने योग्य प्रयत्न केले तर खूप कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पर्यटन व्यवस्था आपण निर्माण करू शकू.

तुम्ही इथे पाहिले असेल. जे आत्ता आले आहेत त्यांनी कदाचित अजून पहिले नसेल, मात्र जे काल आले त्यांनी पहिले असेल की हे विशाल वाळवंट एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकेल. ही कार्यशाळा आज इथे कच्छच्या रणात आयोजित करण्यामागेही विशिष्ट उद्दिष्ट आहे. ते हे की आपण सर्वानी पाहावे की प्रयत्नपूर्वक आपण पर्यटकांना कुठे कुठे घेऊन जाऊ शकतो ? कच्छ मध्ये राहणाऱ्या अनेक लोकांनीही हे विशाल वाळवंट पहिले नव्हते . जेव्हापासून कच्छ रणोत्‍सव सुरु झाला ,तेव्हापासून या जिल्यात मोठा व्यापार सुरु झाला. आता सुमारे ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय या एकाच जिल्ह्यात होतो. हस्त व्यवसायाच्या वस्तू विकल्या जातात. तुम्ही बघू शकता, एक व्यवस्था उभी करून कशाप्रकारे देशभरातल्या पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते. त्याचे प्रत्यक्ष उदाहरणाच आपल्याला इथे बघायला मिळते आहे.

आपण नेहमीच पहिले आहे, की आपल्याकडे जी पर्यटन स्थळे आहेत तिथे दिशादर्शक फलक कोणत्या भाषेत असावेत याची काहीही निश्चित व्यवस्था नाही. जर गोव्यात सर्वाधिक रशियन पर्यटक येत असतील तर गोव्याच्या व्यापाऱ्यांना, छोट्या दुकानदारांना रशियन भाषा शिकायची इच्छा होते. का ? कारण त्यांना वाटते की जर आपल्याकडे सर्वाधिक ग्राहक रशियन बोलणारे असतील तर आपण त्यांची भाषा शिकलो तर आपल्याला फायदा होईल. जर कुलू मनाली इथे युरोपियन पर्यटक येत असतील तर महाग युरोपातल्या भाषांमधले माहिती आणि दिशाफलक तिथे नकोत का ? मात्र आम्ही असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण देशात पर्यटक स्नेही वातावरण निर्माण करू शकलो नाही. त्यामुळेच जे फायदे आपल्याला मिळायला हवे होते, ते मिळत नाही.

आपण आता कच्छ मध्ये बसलो आहोत. कच्छ पासून साधारण शंभर-दीडशे किलोमीटर दूर धौलाविरा नावाची जागा आहे. ही पाच हजार वर्षे जुनी नगररचना आहे. धौलवीरा , मोहेंजोदडो कालखंडातली . जरा तुम्ही तिथे जाण्याचा आपण नेहमीच पहिले आहे, की आपल्याकडे जी पर्यटन स्थळे आहेत तिथे दिशादर्शक फलक कोणत्या भाषेत असावेत याची काहीही निश्चित व्यवस्था नाही. जर गोव्यात सर्वाधिक रशियन पर्यटक येत असतील तर गोव्याच्या व्यापाऱ्यांना, छोट्या दुकानदारांना रशियन भाषा शिकायची इच्छा होते. का? कारण त्यांना वाटते की जर आपल्याकडे सर्वाधिक ग्राहक रशियन बोलणारे असतील तर आपण त्यांची भाषा शिकलो तर आपल्याला फायदा होईल. जर कुलू मनाली इथे युरोपियन पर्यटक येत असतील तर महाग युरोपातल्या भाषांमधले माहिती आणि दिशाफलक तिथे नकोत का ? मात्र आम्ही असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण देशात पर्यटक स्नेही वातावरण निर्माण करू शकलो नाही. त्यामुळेच जे फायदे आपल्याला मिळायला हवे होते, ते मिळत नाही.

आपण आता कच्छ मध्ये बसलो आहोत. कच्छ पासून साधारण शंभर दीडशे किलोमीटर दूर धौलाविरा नावाची जागा आहे. ही पाच हजार वर्षे जुनी नगररचना आहे. धौलवीरा , मोहेंजोदडो कालखंडातली . जरा तुम्ही तिथे जाण्याचा कार्यक्रम बनवला असेल तर तुम्ही बघाल की पाच हजार वर्षांपूर्वीच्या या शहरात सगळीकडे दिशादर्शक फलक लावलेले आहेत. इकडे जाण्याचा रस्ता, ५०० मीटर नंतर आमुक ठिकाण असे लिहिलेले आहे. याचा अर्थ असा की त्या काळात, म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी देखील धौलवीराचे रहिवासी नियमित बाहेर जात असत, त्यामुळेच अशा दिशादर्शक फलकांची गरज पडत असेल.दिशादर्शक फलकांचा वापर करणारी पहिली नागर व्यवस्था म्हणून धौलविरा जगभरात ओळखली जाते. आपण कधी हा विचार केला का की आपल्या पर्यटन स्थळांवर काही सामाईक दिशादर्शक माहितीचे फलक लावायला हवे.ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या सर्व पर्यटकांना नीट माहिती मिळेल

आपण शास्त्रीयदृष्ट्या पर्यटन व्यवसाय विकसित करावा हे सांगण्यासाठी मी हे छोटेसे उदाहरण दिले . आपण आपल्या पर्यटन स्थळांची माहिती देणारी पत्रके, पुस्तिका छापताना देखील त्याची भाषा कुठली असावी याचा विचार करायला हवा. जर त्या ठिकाणी इंग्रजी भाषक पर्यटक जास्त असतील तर तिथे प्रादेशिक किंवा हिंदी भाषेतली पुस्तिका छापुन काहीही उपयोग होणार नाही. आपल्या वेबसाईट , ज्या आपण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बनवल्या आहेत , त्या ही प्रादेशिक भाषांमध्ये किंवा हिंदीत असतील तर त्याचा उपयोग होणार नाही. जर आपल्याला जागतिक पातळीवर पर्यटकांना आकर्षित  करायचे असेल, तर आपली वेबसाईट त्या ही भाषेत विकसित केली पाहिजे, आणि त्यासाठी काही जास्तीचा खर्च येणार नाही.

आपण जर हे ठरवले की आपल्याला पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचे आहे, तर ते नक्कीच होऊ शकते. कधी कधी पर्यटक न येणे ही पर्यटन क्षेत्रासाठी मोठी चिंतेची बाब असते. पण पर्यटक का येत नाही, तर त्यांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत , आणि पर्यटक येत नसल्यामुळे पायाभूत सुविधांसाठी पैसा उभारता येत नाही. हे एक दुष्टचक्र झाले आहे, त्यातून आपल्यालाच क्षेत्राला हिमतीने बाहेर काढावे लागेल.

आज इथे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अधिकारीही बसले आहेत. राज्य सरकारे आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय मिळून या संदर्भात काही निर्णय घेऊ शकत नाही का? समजा तुमच्या राज्यातले अमुक वर्गाचे विद्यार्थी , ज्यांना वर्षातून एकदा सहल काढायची आहे, तर ते आपल्या गावाच्या आसपासच्या पर्यटन स्थळी जातील. थोड्या मोठ्या वर्गातले विद्यार्थी जिल्यात सहल काढतील. जर अशी आखणी आपण केली तर विद्यार्थ्यांनाही त्यांच्या गावाच्या आसपासची, तालुक्यातली किंवा जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांची माहिती कळेल. दहावीत पोहोचेपर्यंत त्यांना आपला परिसर नीट माहित झाला असेल. मात्र आपण असे करत नाही. आपल्याकडे तर पाचवीचा विद्यार्थी असेल, त्याच्या शिक्षकांनी जर उदयपूर पहिले नसेल तर शिक्षक उदयपूरची सहल काढतील. मात्र आपल्या आसपासच्या परिसरातले काहीच त्याने पहिले नसेल. म्हणूनच आपले मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयामध्ये हा समन्वय असायला हवा. कल्पना करा की, एका राज्यात १० अशा जागा आहेत ज्या पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करायच्या आहेत. आपणा सगळ्यांनी मिळून ठरवूया. तुम्हाला माहीत असेल , की या दहा जागा पर्यटनासाठी उत्तम आहेत मात्र तिथे ना होटेल आहे ना इतर कुठली खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मग अशी स्थळे विकसित करण्यासाठी आपल्याला स्त्रोत निर्माण करावे लागतील. त्यासाठी विद्यापीठांशी संपर्क साधून विद्यापीठांच्या सहली पुढची पाच वर्षे याच दहा जागांवर जातील, अशी व्यवस्था करावी लागेल. दोन रात्री त्यांनी तिथे मुक्काम करावा. त्यातून या पर्यटन स्थळांवर लोकांचा वावर वाढेल. महसूल वाढेल आणि पायाभूत सुविधा उभारता येतील.

जर दररोज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या साधारण दहा बसेस यायला लागल्या तर त्या गावातले लोक ते बघतील, की पर्यटक येत आहेत, चला छोटे मोठे दुकान  उघडू या. मग चहा नाश्ता, पाणी अशा गोष्टी आपोआप मिळायला लागतील. स्थानिकांना रोजगार मिळेल. हळूहळू या स्थळांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होईल. आपली पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी आपण आधी आपल्या लोकाना तिथे पाठवायला हवे. भारतातील प्रत्येक राज्याने जर अशी पाच स्थळे निश्चिंत केली, फक्त पाचच. आणि तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्याचे ठरवले. अशा ठिकाणी इतर कोणी येवो न येवो, त्या त्या राज्यातले विद्यार्थी दोन तीन वर्षे सलग जात राहिले तर आपोआप त्या जागेचा विकास होईल. देशी विदेशी पर्यटक यायला सुरुवात होईल.

या कच्छच्या वाळवंटात आज आपण बसलो आहोत. इथे सुरुवातीला फक्त गुजराती लोक यायचे. जास्तीत जास्त मुंबईचे लोक यायला लागले. पण आज ऑनलाईन बुकिंग वर्ष आधी संपतं. आपल्याला आधी असे खूप प्रयत्न करावे लागतात, तेंव्हा कुठे पर्यटन क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा काय असाव्यात ते ठरवता येतं. हे झालं कि तिथे मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. दुर्दैवाने आपल्या देशात जवळपास सगळे पर्यटन क्षेत्र ही धार्मिक स्थळ आहेत जिथे पर्यटक जातात. पण तिथे गाईड लोकांसाठी कौशल्य विकास , मनुष्याबळ विकास, प्रशिक्षणाचे कुठलेही अभ्यासक्रम नसतात. त्या त्या गावात गाईड म्हणून काम करायला तरुण तयार का नसावेत त्यांना विशेष प्रशिक्षण का दिले जाऊ नये? त्यांच्यात स्पर्धा का नसावी? त्यांच्यासाठी विशेष पोशाख किंवा गणवेश तयार असावे. गाईड त्याच युनीफॉर्म मध्ये असला पाहिजे. गाईड जवळ ओळखपत्र का असू नये? जोवर आपण ही व्यावसायिकता आणणार नाही, तोवर पर्यटन क्षेत्राचा विकास करू शकत नाही.

भारताने दोन प्रकारच्या पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायला हवे. एक परंपरागत यात्रास्थळे, प्रत्येक मुलाची इच्छा असते कधी ना कधी आई वडलांना गंगास्नान घडवावे, प्रत्येक मुलाला असं वाटतं कधी ना कधी आई वडलांना चार धाम यात्रेला न्यावं. प्रत्येक मुलाची इच्छा असते आई वडलांना एकदा तरी अष्टविनायक यात्रेला न्यावं, शिवाजी महाराजांच्या किल्यांवर न्यावं. हे स्वाभाविक आहे. परंपरागत धार्मिक यात्रा तर होतच राहतील. चांगली व्यवस्था असेल तरी जातील आणि कितीही त्रास झाला तरी जातील. सव्वाशे कोटी देशवासियांची ही देखील एक खूप मोठी बाजारपेठ आहे. आपण कधी याकडे लक्ष दिलं आहे? आणि ज्या धार्मिक स्थळांवर आपले सव्वाशे कोटी लोक सहज पोहोचतात, तिथे जर आपण शास्त्रीय पद्धतीने विचार करून पायाभूत सुविधा विकसित केल्या तर हीच धार्मिक ठिकाणं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतात.

भारतात पर्यटकांचा दुसरा प्रकार म्हणजे विदेशी पर्यटक. हे लोक अनेक देशांतून आलेले पर्यटक आपला देश बघायला येतात. त्यांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यात रस असेल, कुणाला साहसी पर्यटनात रस असेल, कुणाला क्रीडा पर्यटनाचा आनंद घायला आवडेल. काहीना हिमालयातल्या बर्फाळ ठिकाणी आईस हॉकी सारख्या पर्यटनात रस असेल. काही पर्यटकांना ताजमहाल किंवा कुतुबमिनार बघण्यात रस असेल. अशा विविध प्रकारच्या पर्यटकांसाठी आपण काय काय व्यवस्था करू शकतो, या दिशेने आपण जोवर विचार करत नाही, तोपर्यंत आपण पर्यटन क्षेत्र मजबूत करू शकत नाही.

आज या ठिकाणी एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाची चर्चा होत आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे काही अधिकारी देखील इथे बसले आहेत. भारतासारख्या देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करण्याची गरज आहे, खूप जोर लावायची आवश्यकता आहे. मात्र झालं काय की, आम्ही सवय लावून घेतलीय, ‘हे नाही तर ते सही’..एवढ्या मोठ्या देशात हे हे नाही तर ते सही दृष्टीकोन चालत नाही. आपल्या देशात कुठला मुलगा फ्रेंच भाषा शिकला असेल, तर आपण अगदी अभिमानाने सांगतो, हे आमचे शेजारी आहेत, यांचा मुलगा फ्रेंच शिकलाय, कोणाला स्पॅनिश येत असेल तर ते ही आपण खूप कौतुकाने सांगतो. मात्र आपल्या देशात आपण असे वातावरण तयार करत नाही की, हरयाणाचा मुलगा असेल तर तो तेलुगु बोलायला शिकला पाहिजे, गुजरातचा मुलगा मल्याळम बोलू शकला पाहिजे, त्याला त्याचा अभिमान वाटायला हवा.

आपल्या देशात जी समृद्ध परंपरा आहे तिचा आपल्याला अभिमान नाही. ज्या देशात १०० पेक्षा जास्त भाषा, १७०० पेक्षा अधिक भाषा प्रकार आहेत, तो देश किती श्रीमंत आहे! आपण कधीच आपल्या युवकांना आपल्या परंपरेबद्दल माहिती दिली नाही. त्यांना परंपरेशी जोडायचा विचार केला नाही. जगातील अमक्या देशात काय सुरु आहे, त्याची आम्हाला माहिती असते. पण माझ्या देशातील कुठलं राज्य देशाच्या कुठल्या कोपऱ्यात आहे त्याची आपल्याला माहिती नसते. भारत इतका विशाल देश आहे, आपण येणाऱ्या पिढ्यांना आपल्या देशाची पूर्ण ओळख करून द्यायला हवी. त्यांना देशाशी जोडलं पाहिजे. आणि त्यासाठीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाला सुरवात केली आहे. सुरुवातीला दोन राज्य एकमेकांशी सामंजस्य करार करतील. आणि परस्पर संबंध विकसित कसे करता येतील यासाठी प्रयत्न करतील. आम्ही जगातील अनेक राज्यांशी असे करार करतो, अनेक शहरांशी देखील असे परस्परमैत्री करार होत असतात. पण आपल्याच देशात आपण हे करत नाही. आता जसं हरियाणा ने तेलंगणाशी करार केला आहे. हरियाणाच्या तरुणांनी वर्षभर तेलंगणा मध्ये पर्यटनाला जायला काय हरकत आहे? आणि तेलंगणाच्या लोकांनी हरियाणामध्ये पर्यटनाला का येऊ नये? हरियाणाचे पारंपरिक खेळ, तेलंगणाचे पारंपरिक खेळ, या खेळांचे कार्यक्रम हरियाणा आणि तेलंगणामध्ये व्हायला काय हरकत आहे?

हरियाणामध्ये तेलगू फिल्म फेस्टिवल आणि तेलंगणामध्ये हरियाणवी फिल्म फेस्टिवल का होऊ नये? हरियाणा मध्ये तेलगू नाट्य महोत्सव का आयोजित केला जाऊ नये? तेलंगणामध्ये हरियाणवी नाट्य महोत्सव का होऊ नये? अशा रीतीने एक वर्षांत तेलुगु बोली भाषेतील १०० वाक्ये हरियाणातील लोक अगदी सहज शिकू शकतील. आणि तेलंगणाचे लोक हरियाणवी आणि हिंदी बोली भाषेतील १०० वाक्ये सहज शिकू शकतील.

आपण बघाल, देशात फार प्रयत्न न करता भारताच्या प्रत्येक राज्यात इतर राज्यातील भाषा बोलणारे अनेक लोक तयार होतील. दुसऱ्या राज्यातून कुणी आलं तर त्याची भाषा बोलणारा कुणी तरी भेटेल. अच्छा तामिळनाडूमधून आलात? या या वणक्कम. असं म्हणून स्वागत केलं तर संवाद लगेच सुरु होतो, आपुलकी तयार होते. म्हणून माझा आग्रह आहे की एक भारत श्रेष्ठ भारत ह्या कार्यक्रमात राज्यांनी सक्रीय पुढाकार घेतला पाहिजे. मनुष्यबळ विकास मंत्रालय असो, युवक सेवा आणि सांस्‍कृतिक क्षेत्र असो, सांस्कृतिक विभाग आणि पर्यटन विभाग असो, हे विभाग परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने खूप मोठं काम करू शकतात.

आता, समजा, प्रश्नमंजुषा स्पर्धा! अलीकडे आमच्या विदेश विभागाने जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांसाठी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरु केली आहे. आज विदेशात असलेया लोकांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला कमीत कमी हे तर माहित असेल की त्यांचे पूर्वज भारतीय आहेत. पण त्यांना भारताबद्दल काही माहिती नाही. तर त्यांनी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरु केली. गेल्या वर्षी विदेशात जन्मलेल्या, कधीही हिंदुस्तान नं बघितलेल्या पाच हजार मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि भारताबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि गेल्या २ ऑक्टोबरला ह्या स्पर्धेचा एक दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडला. 

आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांची अशी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा होऊ शकते का? जर गुजरात ने छत्तीसगड सोबत एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत सामंजस्य करार केला असेल तर छत्तीसगडचे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेत  गुजरात बद्दलच्या पाच हजार प्रश्नाची उत्तरे देतील, गुजरातचे विद्यार्थी छत्तीसगड बद्दलच्या पाच हजार प्रश्नांची उत्तरे देतील. किती जिल्हे आहेत, किती जाती आहेत, किती भाषा प्रकार आहेत, खाद्य संस्कृती कशी आहे, वेशभूषा किती प्रकारची आहे, कुठली गोष्ट कुठे आहे, ह्याची माहिती मिळेल. तुम्ही बघा, किती मोठी एकात्मता सहजतेने साध्य होईल. जर तो विद्यार्थी अशा दहा राज्यांच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत हळू हळू भाग घेईल तर त्याला भारताविषयी किती माहती मिळेल.

माझी इच्छा आहे के प्रत्येक राज्याने स्वतःची प्रश्नमंजुषा बँक बनवावी. दोन हजार, पाच हजार, सात हजार प्रश्नोत्तरे फोटोसकट तयार करून एक ऑनलाईन व्यासपीठ  तयार करावे आणि ज्या राज्याशी सामंजस्य करार केला असेल त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा घ्यावी. अलीकडे आम्ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या परेड साठी एका राज्यातील पोलिसांची तुकडी दुसऱ्या राज्यात पाठविण्याची सूचना केली. त्या राज्याच्या पोलीस संचलनात दुसऱ्या राज्यातील पोलिसांची देखील एक तुकडी असेल. अशाने आपण एकमेकांच्या आणखी जवळ येऊ. हे सहज करता येण्या जोगं आहे आणि आम्ही ह्यावर जोर देत आहोत. एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाच्या सफलतेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

 अलीकडे आम्ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या परेड साठी एका राज्यातील पोलिसांची तुकडी दुसऱ्या राज्यात पाठविण्याची सूचना केली. त्या राज्याच्या पोलीस संचलनात दुसऱ्या राज्यातील पोलिसांची देखील एक तुकडी असेल. अशाने आपण एकमेकांच्या आणखी जवळ येऊ. हे सहज करता येण्या जोगं आहे आणि आम्ही ह्यावर जोर देत आहोत. ही सहजसाध्य कामे आहेत आणि आम्ही त्यावर जोर देत आहोत. एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाच्या सफलतेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत इतका वैविध्यपूर्ण देश आहे, इतका मोठा देश आहे की जर आपण आपलाच संपूर्ण देश जाणून घेण्याचा विडा उचलला आणि त्या दिशेने काम सुरु केले तर एक आयुष्य कमी पडेल इतकी विशालता आणि विविधता आपल्या देशात आहे. आपण जेवढ्या नव नव्या गोष्टी जाणून घेऊ तेवढा आपल्याला अधिक आनंद मिळेल

मी जसे आधी म्हटले होते, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत अंतर्गत हरयाणा आणि तेलंगणा या राज्यांना जोडायचे आहे. मग हरयाणाच्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याला पाच तेलुगु गीते मुखोद्गत होतील का? पाच गीते म्हणता येतील का ? तेलंगणाच्या लोकांना हरयाणाची पाच गीते गाता येतील का? यात दोघांनाही मजा येईल. आणि विशेष काही मेहनत करावी लागणार नाही. स्वाभाविक पद्धतीने आपण देशाच्या विविधतांची ओळख करून घेतली , तर त्यातून पर्यटनालाही निश्चित चालना मिळेल.

यातून आपल्या युवाशाक्तीलाही प्रेरणा मिळेल.भारताला एकत्र करून नव्या उंचीवर नेण्याची ही संधी आहे. एक छोटीशीच गोष्ट किती मोठा बदल घडवू शकते हे आपण पाहिले आहे. आपणं आता पुढचे तीन दिवस इथे चिंतन मनन करणारा आहात. आपण सगळे इतक्या दूरवरून इथे आले आहात. मी अपेक्षा  करतो , विशेषतः मंत्रीमंडळाचे जे विविध प्रतिनिधी इथे आले आहेत, ते या बैठकांना उपस्थित राहून आपल्या अनुभवांचा लाभ आपल्या कामांमध्ये करून घेतील. त्या अनुभवाचा फायदा त्यांच्या राज्यांना मिळेल. दूरदृष्टीचा फायदा सर्वाना मिळेल. मला या मरुभूमीविषयी विशेष प्रेम आहे. संध्याकाळी तुम्ही सगळे जेव्हा या वाळवांटात फिरायला जाल, तर सुरक्षा रक्षक परवानगी देतील तिथपर्यत तुम्ही जा. तिथे तुमच्या मित्रांना बाजूला ठेवत २० २५ पावलांवर तुम्ही थोडावेळ एकटे उभे रहा. दहा मिनिटे तरी तुम्ही अगदी शांत तिथे उभे रहा असा माझा तुम्हाला सल्ला आहे. त्याचे विराट रूप बघा. निळ्याशार आकाशाला बघा.पांढऱ्याशुभ्र चादरीकडे बघा. जीवनात हा अनुभव तुम्हाला कदाचित पुन्हा मिळणार नाही. त्या अनुभूतीचा आनंद घ्या. तो अतिशय नवा आणि वेगळा अनुभव असेल. तो अनुभव तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना जरूर सांगा. ती अशी जागा आहे, जिथे दहा वर्षांपूवी जायला तीन तीन , चार चार तास लागत असत. आता तर आपण  ५० ते ६० मिनिटात तिथे पोहोचू शकतो. 

भूकंपानंतर किती बदल होतो , ते आपण पहिले आहे. आज आपण जिथे बसले आहात ते भारतातील शेवटचे गावं आहे. यापुढे कुठलीही लोकसंख्या नाही या शेवटच्या गावात बसून आपण सगळे भारताच्या भविष्याचे चिंतन करतो आहोत. भारताच्या पर्यटन क्षेत्राला विकसित करण्यासाठी विचार करतो आहोत. भारताच्या युवा शक्तीला प्रेरणा देण्यासाठी काहीतरी संकल्प करणार आहोत.

मला विश्वास आहे की तुम्ही लोक इथे जे विचारमंथन करणार आहात, ते आगामी काळात पर्यटन विषयक धोरणे ठरवतांना महत्वाची भूमिका निभावणार आहे. या प्रसंगी माझ्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा! तुम्ही पुढचे तीन दिवस इथे जी चर्चा करणार आहात, त्याकडे माझे बारीक लक्ष असेल कारण हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे.

या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे, त्यांचा विकास करण्याची गरज आहे. तुम्ही अतिशय मेहनती लोक आहात आणि तुमच्या मेहनतीचा मी पूर्ण फायदा घेणार आहे. देशासाठी तर तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग होणार आहेच, पण माझेही त्यात ज्ञानवर्धन व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. तर मी त्याची वाट बघणार आहे.

आता पुढच्या दोन तीन दिवसात इथे होणाऱ्या विचार मंथनातून जे अमृत निघणार आहे , ते अमृत सेवन करण्याची मी प्रतीक्षा करतो आहे. मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि त्यांच्या सगळ्या चमूचेही मी आभार मानतो. कारण या ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. अशा स्थितीत एक परिषद आयोजित करणे, त्यासाठी व्यवस्था करणे अतिशय कठीण होते, मात्र तरीही त्यांनी उत्तम व्यवस्था केली आहे. देशभरातून लोक इथे आले आहेत. तेही या रणोत्सवाचे साक्षीदार होतील , त्याचा आनंद घेतील. आणि त्याचा प्रचारही करतील. त्याच्या प्रचारामुळे भविष्यात इथे आणखी पर्यटक येण्याची शक्यता आहे. म्हणजे एकप्रकारे तुमची ही गुंतवणूकच आहे. त्यासाठी मी गुजरात सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो !

धन्‍यवाद।

 
 
PIB Release/DL/144
बीजी -राधिका -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau