This Site Content Administered by
पंतप्रधान

म्यानमारच्या यांगोन (रंगून) येथे भारतीय समुदायासमोर 6 सप्टेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 6-9-2017

म्यानमार येथे राहणारे माझे प्रिय भारतीय आणि भारतीय वंशाच्या बंधू-भगिनींनो , नमस्कार !

काही दिवसांपूर्वीच तुम्हा सगळ्यांनी इथे गणेश चतुर्थीचा सण साजरा केला, ईद साजरी केली, या सगळ्या उत्सवानिमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! हे उत्सव तुमच्या आयुष्यात खूप सुख-समृद्धी आणि शांतता निर्माण करणारे ठरोत अशी आशा मी व्यक्त करतो.

इथे तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शहराला भेट द्यावी, अशी माझी खूप इच्छा होती. यांगोन शहर, त्याच्या वारशासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचे भारतासोबत पिढ्यान पिढ्याचे नाते आहे. आणि पूर्वेकडच्या या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शहरात, ज्यांनी, भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांना आपल्या हृदयात स्थान दिलं आहे, अशा भारतीय नागरिकांना भेटणं, माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे. आणि इथे तुमच्या रूपाने मला एका लघु भारताचेच चित्र दिसते आहे. भारताच्या विविध भागातून आलेले तुम्ही सगळे लोक एका महान राष्ट्राच्या हृदयात दुसऱ्या महान राष्ट्राचा श्वास म्हणून अस्तित्वात आहात. तुम्हा सगळ्यांना भेटून मला अतिशय आनंद झाला आहे कारण आपल्या देशात गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, ब्रह्मपुत्रा आणि इरावती सारख्या नद्यांच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांच्या सहवासात तुम्ही सगळे मोठे झाला आहात, आणि तो वारसा इकडे घेऊन आलो आहात.

भारत आणि म्यानमार यांच्यात वर्षानुवर्षे असलेली एकत्रित संस्कृती आणि नागर समाज, भूगोल आणि इतिहास, दोन्ही देशातील सुपुत्र आणि सुकन्यांचे यश आणि इच्छा-आकांक्षा या सगळ्यांचे तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात. गेल्या हजारो वर्षांपासून भारत आणि म्यानमारच्या केवळ सीमाच नाही तर भावनाही एकमेकांशी जोडलेल्या आहेत. भारतात म्यानमारला ब्रह्मदेश म्हणजेच ब्रह्मदेवाची भूमी असेही म्हंटले जाते. मित्रांनो, ही तीच पवित्र भूमी आहे, जिने बुद्ध आणि त्यांची शिकवण मनात जतन करून ठेवली आहे. इथल्या बौद्ध धर्मग्रंथांनी आणि भिक्षूनी भारताच्या सराव राज्यातल्या नागरिकांशी शेकडो वर्षात अतूट संबंध निर्माण केले आहेत. ज्यात केवळ धर्म नाही तर भाषा, साहित्य आणि शिक्षण यांचाही समावेश आहे. म्यानमारच्या या पवित्र भूमीने, श्री गोयंका यांच्या माध्यमातून, विपश्यनेची भेट आम्हाला दिली आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांचे सुपुत्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. 

म्यानमार मध्ये आजही रामायण यामा या नावाने ओळखले जाते, विद्येची देवता सरस्वतीला तुम्ही थरुथरी या नावाने पूजता. आणि शिवला परविजवा, विष्णूला विथानो ह्या नावांनी ओळखता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास म्यानमारला वंदन केल्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ही तीच पवित्र भूमी आहे, जिथे सुभाषचंद्र बोस यांनी गर्जना केली होती, तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा! त्यांचा हा नारा ऐकून भारतावर आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करणारे हजारो, लाखो युवक – युवती आपल्या जीवाची पर्वा न करता भारतात आणि भारताबाहेर आझाद हिंद फौजेत सामील व्हायला निघाले होते. आणि या आझाद हिंद फौजेत तरुणपणी सहभागी झालेल्या काही वृद्धांचे आज दर्शन आणि आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला लाभले. जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची इथे घोषणा केली, तेव्हा भारतात इंग्रज राजवटीची पाळेमुळे हलली होती. ही तीच पवित्र भूमी आहे जिथल्या मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहिले होते. महात्मा गांधी, लाला लजपतराय, गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांच्यासारख्या कितीतरी महामानवांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र आहे.         

जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जेव्हा देशाच्या सुपुत्रांना या चळवळीत सामील होताना घरादाराचा त्याग करावा लागे, तेव्हा म्यानमार हेच त्यांचे दुसरे घर बनत असे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर मोगल सम्राट बहादूरशहा जफर यांना याच भूमीत जागा मिळाली होती. 

मी जेव्हाही कुठल्या देशात जातो, तेव्हा भारतीय समुदायाच्या नागरिकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळते, काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यादरम्यान मी जाफना येथे गेलो होतो. भारतीय पंतप्रधान जाफनाला जाण्याची ती पहिलीच वेळ होती. तिथे मी तामिळ वंशाच्या लोकांना भेटलो. भारताच्या मदतीने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली घरे त्याना देण्याची संधी मला मिळाली. यावर्षी मे महिन्यात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मला पुन्हा एकदा श्रीलंकेला जाण्याची संधी मिळाली. एका अंतरराष्ट्रीय समारंभात सहभाग घेण्याचे निमंत्रण मला मिळाले होते. तेव्हा मी मध्य श्रीलंकेतल्या तामिळ बांधवाना भेटलो होतो. भारताच्या सहाय्याने तिथे बांधण्यात आलेल्या एका रुग्णालयाचे उद्घाटन त्यावेळी झाले. त्यावेळी तिथल्या नागरिकांनी जो स्नेह आणि आत्मीयता दाखवली, ती मी कधीही विसरू शकणार नाही. तिथल्या तामिळ बांधवांकडून मला हा स्नेह मिळाला. मी दक्षिण अरेबिया मध्ये गेलो होतो. मग बांधकाम क्षेत्रातले लोक असोत, केनियातले शेतकरी आणि व्यापारी असोत, सिलीकौन व्हलीमधले सियोद असोत, भारतीय वंशाच्या या सगळ्या लोकाना भेटून त्यांच्याशी संवाद साधताना मला खूप आपलेसे वाटते. एकाप्रकारे, तुम्ही आमचे राष्ट्रदूतच आहात. जिथे तुम्ही राहत आहात तिथे विकास आणि सौहार्द जपले आहेच, पण त्यासोबत आपले भारतीय संस्कार आणि मूल्ये पण जपून ठेवली आहेत. ही खरच खूप मोठी गोष्ट आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने तीन वर्षांपूर्वी भारताच्या विनंतीवरून आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव अतिशय कमी वेळात संमत केला. गेल्या तीन वर्षापासून जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि जेव्हा योगाची चर्चा होते तेव्हा भारताचे स्मरण होणे अगदी स्वाभाविक आहे. योगाला जागतिक दर्जावर मिळालेली ही मान्यता हे तुमचेही यश आहे, कारण जगाच्या विविध कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीय नागरिकांनीही योगविदयेचा जगभरात प्रसार करण्यात मदत केली आहे.

भारताशी असलेले आपले सबंध केवळ भावनिक नाहीत, तुम्ही भारताच्या विकासातही मोठे योगदान दिले आहे, देत आहात. अनेक अनिवासी भारतीय आता देशाच्या विकासात हातभार लावत आहेत. ते त्यांच्या मूळ गावी सुरु असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये मदत करत आहेत. युवक तर यात अधिकच जोमाने कार्यरत आहेत. केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाही तर नियामित कामेही करत आहेत. भारताविषयी जाणून घेण्याची त्यांची इच्छा दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्यावर्षी आम्ही अनिवासी भारतीय युवकांसाठी भारताला जाणून घ्या (know India) या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि ही स्पर्धा आता नियमित स्वरूपात भरवली जाणार आहे. मला हे एकून आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसला, की या स्पर्धेत सुमारे १०० देशांच्या अनिवासी भारतीय युवकांनी भाग घेतला होता, म्हणजे परदेशात असलेल्या अनिवासी भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीच्या मुलांनी भाग घेतला होता. जेव्हा मी तुम्हाला भेटलो, तेव्हा मला हे ही लक्षात आले की परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा सरकारी अधिकाऱ्यांशी होणारा संवाद हा आता एकतर्फी होत नाही.

इथे येण्यापूर्वी मी तुम्हाला नरेंद्र मोदी app वर काही सूचना मांडायचे आवाहन केले होते. तुम्ही त्याला प्रतिसाद देत अतिशय उत्तम सुधारणा पाठवल्या, याचा मला अतिशय आनंद झाला आणि मी त्यासाठी तुमचे आभार मानतो. पहिल्या दिवशीपासूनच आमच्या सरकारने अनिवासी भारतीयांच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे. ओसीआय आणि पीआयओ ही कार्डे विलीन करणे, दीर्घमुदतीच्या विसा धारकांना पोलीस पडताळणीच्या चक्रातून मुक्त करणे, पारपत्र मिळवण्याची प्रकिया अधिका सुलभ करणे, भारतीय समुदाय कल्याण निधीचा योग्य आणि प्रभावी वापर, अनिवासी भारतीय दिवस उत्साहाने साजरा करणे, आणि जगाच्या विविध भागात प्रादेशिक अनिवासी भारतीय दिवसाचे आयोजन, अशी अनेक पावलं आम्ही उचलली आहेत. दुसऱ्या देशात अडकलेल्या संकटात असलेल्या, भारतीयांचे दुःख समजून घेत, त्याना तत्परतेने मदत करणे, त्यांची सुटका करणे हे काम आपल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज जितक्या आत्मीयतेने करतात, तितक्या आत्मीयतेने आणखी कोणी करत असेल असे मला वाटत नाही.

आज जगाच्या कुठल्याही भागात कोणत्याही भारतीय नागरिकांना काहीही समस्या आली तर ते सरळ ट्विटरवर सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधतात. आणि त्यांची समस्या सोडवली जाते. मी तुम्हाला देखील हेच सांगेन की जर तुम्हाला विसा, पारपत्र किंवा परदेशात कुठलीही कायदेशीर मदत लागली तर भारतीय दूतावास २४ तास तुमच्या मदतीसाठी तयार असेल.  

मित्रांनो, आज भारताकडे जगात आदराने पहिले जाते, आणि त्याचे कारण तुम्ही सगळे आहात. तुम्ही भारताचे खरे राष्ट्रदूत आहात. आज भारत अतिशय वेगाने बदलतो आहे, प्रगती करतो आहे. 

आम्ही केवळ भारतात बदल घडवत नाही आहोत तर आमूलाग्र परिवर्तन करतो आहोत. आम्ही नव्या भारताची उभारणी करतो आहोत. गेल्या महिन्यात आम्ही स्वातंत्र्याची ७० वर्षे साजरी केली. पाच वर्षानी, २०२२ साली, आपण स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करणार आहोत. तोपर्यंत नव्या भारताची उभारणी करण्याचा आमचा संकल्प आहे.

गरीबी-मुक्त, दहशतवाद-मुक्त, जातीभेदमुक्त, धर्मभेद मुक्त, स्वच्छ अशा नव्या भारताची उभारणी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा संकल्प पूर्ण करणारच! मी तुम्हाला आवाहन करेन की नव्या भारताच्या निर्मितीच्या या यज्ञात तुम्ही सगळे सहभागी व्हा. न्यू इंडिया वेबसाईटवर तुम्ही आपल्या कल्पना, सूचना द्या.

मित्रांनो, १९व्या शतकातल्या पायाभूत सुविधांच्या आधारावर २१ व्या शतकात प्रगतीची वाटचाल केली जाऊ शकत नाही. आणि पायाभूत सुविधांचा अर्थ, केवळ रस्ते आणि रेल्वेचे जाळे उभारणे हा नाही. २१ व्या शतकाच्या पायाभूत सुविधा अशा हव्या, ज्या सर्व जनतेला आधुनिक जगाशी जोडू शकतील, त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकतील, जीवनमान उंचावू शकतील. संपूर्ण जगात सौर उर्जा वाढवण्याचे काम आज भारतात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

आज भारतात लोहमार्ग, रस्ते, विमानतळ यांवर जितकी गुंतवणूक केली जाते, तितकी या आधी कधीच केली गेली नाही. देशातील प्रत्येक ग्रामपंचायत optical fiber  ज्या जाळ्याने जोडण्याचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे. समुद्र किनारी असलेली शहरे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी सागरमाला योजना अतिशय वेगाने राबविण्याचे काम सुरु आहे. मला असं वाटतं, की ह्या प्रयत्नांनी देशात अस्तित्वात असलेल्यांसोबतच नवीन पायाभूत सुविधा तयार होतील. आणि शेती हा त्याचा एक महत्वाचा आणि अभिन्न भाग असेल. आमचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयाने काम करत आहे. यासाठी, बियाणांच्या उपलाब्धतेपासून तर पासून तर शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक पावले उचलली गेली आहेत. यात मृदा आरोग्य कार्ड, कडू लिंबाचे आवरण असलेला युरिया, सूक्ष्म सिंचन, पीक विमा, खाद्यपदार्थ प्रक्रिया केंद्र, शीतगृहांची उभारणी, अश्या अनेक गोष्टी मी सांगू शकतो. हरित आणि धवल क्रांतीप्रमाणेच, आपल्या सगळ्यांना हरित क्रांती आणी धवल क्रांती माहित आहे. पण आता आणखी दोन क्रांतींवर देखील आमचा भर राहणार आहे. एक आहे नील क्रांती आणि दुसरी आहे मधुर क्रांती. जेंव्हा मी नील क्रांती म्हणतो, तेंव्हा फक्त मच्छिमार समाजाचंच भलं होईल असं नाही. सामुद्रिक सामर्थ्य वाढविण्याच्या नव्या युगाची देखील सुरवात होईल. त्याचप्रमाणे मधुर क्रांती, म्हणजे मधमाशी पालन आणि त्यातून उत्पादित होणाऱ्या मधापासून कमाईचे अनेक मार्ग निघू शकतात. असे मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

या सोबतच, देश हितासाठी अनेक मोठे आणि कठोर निर्णय, देश हितासाठी मोठे आणि कठोर निर्णय घ्यायला आम्ही अजिबात घाबरत नाही. आणि आम्हे हे करू शकतो कारण आमच्या साठी पक्षापेक्षा देश मोठा आहे. आमच्या साठी राष्ट्र सर्व काही आहे. सर्जिकल स्ट्राईक असो, नोटबंदी असो किंवा वस्तू आणि सेवा कर. देश हिताचा प्रत्येक मोठा निर्णय आम्ही निर्भयपणे घेतला आहे.

जेव्हा अर्थव्यवस्थेतील काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपविण्याची आवश्यकता निर्माण झाली, तेंव्हा, आम्ही १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुठभर भ्रष्टाचारी लोकांच्या पापाची शिक्षा सव्वाशे कोटी लोक भोगत होते, आणि हे आम्हाला मंजूर नव्हतं. बेइमानीच्या पैशाची ही ताकद होती. हा पैसा कुठून येत होता, कुठे जात होता, कुणाकडे जात होता, हे समजत नव्हतं, कागदोपत्री याची काहीच नोंद नव्हती. काळ्या पैशाची कुठेच नोंद नसते.

मित्रांनो, नोटबंदी नंतर आता अश्या लाखो लोकांची माहिती मिळाली आहे, ज्यांच्या खात्यात कोट्यावधी – अब्जावधी रुपये जमा आहेत. पण त्यांनी कधीच आयकर भरला नाही. केवळ काळा पैसा फिरविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लाखो कंपन्याची माहिती सरकारला मिळाली आहे. तुम्हाला हे ऐकून समाधान वाटेल, फक्त तीन महिन्यात, माझ्या प्रिय देशबांधावांनो, फक्त तीन महिन्यात दोन लाखापेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे आणि त्यांची बँक खाती देखील गोठविण्यात आली आहेत.

आत्ता दोन महिन्यांपूर्वी देशात वस्तू आणी सेवा कर लागू करण्यात आला आहे. सोप्या भाषेत मी जीएसटी ला गुड अंड सिंपल टॅक्स म्हणतो. जीएसटीने देशात प्रामाणिकपणे व्यापार करण्याची संस्कृती आणली आहे. गेल्या सहा वर्षांत जितके व्यापारी कर प्रणालीशी जोडले गेले नव्हते, तितके जी एस टी लागू झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात जोडले गेले आहेत. जे काम गेल्या सहा वर्षांत झालं नाहे ते केवळ ६० दिवसात होणं, हे सरकारच्या कामाचं उत्तम उदाहरण आहे.

गेल्या तीन वर्षांत भारतात बदलाचं एक पर्व सुरु झालं आहे. किमान सरकारी हस्तक्षेप, कमाल शासन ह्या तत्ववर काम करत अनेक प्रक्रियांचे सुलभीकरण केले जात आहे. त्या सोप्या केल्या जात आहेत, कायदे बदलले जात आहेत, उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी उद्योगांचे नियम सोपे केले जात आहेत, देशाच्या नागरिकांना परत एकदा हा विश्वास वाटू लागला आहे की भारत बदलू शकतो, प्रगती करू शकतो, दशकानुदशके ज्या वाईट गोष्टी प्रगतीच्या आड येत होत्या त्यातून आता भारत मुक्त होऊ शकतो.

मित्रांनो, भारतात होत असलेल्या विकासाचे फायदे भारतासोबतच इतर छोट्या देशांना देखील मिळावेत अशी आमची इच्छा आहे. आपल्या जवळ असलेले आपण वाटून खाल्ले तर आनंद अनेक पटींनी वाढतो. आफ्रिका असो व दक्षिण आशिया, किंवा पॅसिफिक आयलंड, आमचा अनुभव आमच्या क्षमता यांचा फायदा खुल्या दिलाने प्रगतीशील देशांना दिला जात होता. २०१४ मधे मी दक्षिण आशियातील देशांसाठी उपग्रह सोडण्याचे आश्वासन दिले होते. आणि ह्या वर्षी आम्ही तो प्रक्षेपित देखील केला. ह्या उपग्रहाशी  भारतच नव्हे तर शेजारी देश देखील जोडले गेले आहेत. त्यांना देखील ह्या उपग्रहाचा लाभ मिळत आहे.

नैसर्गिक आपत्तीत किंवा इतर कुठल्याही संकटकाळी आम्ही सर्वप्रथम धावून जातो. फक्त भारतीय नागरिकांसाठीच नाही तर, प्रत्येकासाठी, ज्याला कुणाला मदतीची गरज असेल, त्याची मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेंव्हा आम्ही अशी मदत करतो तेंव्हा कधीच त्या लोकांच्या पासपोर्टचा रंग कुठला हा विचार करत नाही. नेपाळमध्ये भूकंप आला, मालदीवमध्ये अचानक पाण्याची समस्या निर्माण झाली, फिजीमध्ये वादळ आलं, पश्चिम आशियामध्ये हिंसाचार उसळला त्यादरम्यान हजारो भारतीय आणि विदेशी नागरिकांना तेथून सुखरूप बाहेर काढलं. म्यानमार मधे वादळानंतर मदत आणि पुनर्वसन कार्यात मदत करून एका चांगल्या शेजाऱ्याचं कर्तव्य पार पडलं.

मित्रांनो, वसुधैव कुटुंबकम, म्हणजे हे जग एक कुटुंब आहे, ही विचारधारा आमची परंपरा आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. ही आमच्या रक्तात आहे. आज साऱ्या जगणे भारताला तिसरा नेता म्हणून ओळखणं सुरु केलं आहे. अंतरराष्ट्रीय योग दिवसचा प्रस्ताव असो, किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरवात असो, किंवा BRICS च्या पुढच्या स्वर्णीम दशकासाठीची संकल्पना असो, आज भारताचा आवाज जगात घुमतो आहे. जगाला भारताविषयी हा नवीन विश्वास वाटू लागला आहे. भारताविषयी नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आम्ही भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांना दक्षिण पूर्व आशियाचे प्रवेशद्वार मानतो. आणि ह्याचा दरवाजा म्यानमारच्या दिशेनेच उघडतो. आणि म्हणूनच ह्या प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम युध्द स्तरावर सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी इम्फाल-मोरेह भागात रस्ते दुरुस्ती आणि बांधकाम करण्यासाठी १६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोरेह मधे एक सामायिक चेकपोस्ट देखील बनविले जात आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मणिपूर आणि म्यानमार दरम्यान व्यापार आणि दळणवळण अतिशय सोपं होईल. आम्ही स्वीत्ती बंदर आणि पालेत्वा अंतर्गत जल टर्मिनलचे काम पूर्ण करून कालादन योजनेतही समाधानकारक प्रगती केली आहे. रोड कम्‍पोटेंट वर देखील काम सरू झाले आहे. ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर हा दळणवळण कॉरीडोर आसपासच्या परिसराचा विकास देखील घडवून आणेल, असा मला विश्वास आहे. म्यानमारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतातून हाय स्पीड डीझेलचा ट्रकद्वारे पुरवठा सुरु झाला आहे. सीमा ओलांडण्यासाठीचा करार आणि वाहन करार, तसेच उर्जा व्यापाराला प्रोत्साहन देऊन परस्पर सहकार्य अनेक पटींनी वाढवू इच्छितो. आम्ही आपल्या विकास सहकार्य आणि क्षमता विकास सहकार्याच्या माध्यमातून जे काही मिळवलं आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

भारताची लोकशाहीच्या अनुभवाचा फायदा आम्ही म्यानमारला करून देतो आहोत. म्यानमार आणी भारतातील व्यक्ती आणि सामाजिक सांस्कृतिक संबंध खूप मोठा ठेवा आहे. आणि हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारतातून म्यानमारमधे जाणाऱ्या लोकांसाठी आणि म्यानमारमधून भारतात येणाऱ्या लोकांसाठी ग्रातीस विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही, भारताच्या तुरुंगात असलेल्या, म्यानमारच्या ४० मच्छीमारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे के ते लवकरच आपल्या घरी परत जातील आणि कुटुंबियांना भेटू शकतील.

आज मी बागान आणि आनंदा मंदिरात गेलो होतो. मागील वर्षी आलेल्या भूकंपाने आनंदा मंदिर आणि इतर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक इमारतींचे मोठे नूकसान झाले होते. ह्या इमारती भारताच्या मदतीने पुनर्स्थापित करण्यात येत आहेत. भारत आणी म्यानमार दरम्यान ऐतिहासिक संबंध आहेत. मला असं वाटतं की ही अतिमहत्वाची ऐतिहासिक माहिती पुढच्या पिढ्यांना मिळाली पाहिजे. ह्या विषयी दोन्ही देशांनी मिळून संशोधन केले पाहिजे.

मी चर्चा करतांना सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. आयएनए स्मारकाचे सर्वेक्षण दोन्ही देश एकत्रितपणे करू शकतात. एक संयुक्त इतिहास संशोधन योजना देखील सुरु केली जाऊ शकते, ह्यामुळे दोन्ही देशातील व्यक्तींमधील संपर्क बळकट होण्यास मदत होईल. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आम्ही राष्ट्रीय नोंदणी कार्डच्या धर्तीवर ओसीआय देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी सांस्कृतिक संबंधासाठीच्या भारतीय परिषदेच्या माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, मी एकदा कुठेतरी वाचले होते की भारत आणि म्यानमारच्या संबंधाचा आधार ५B म्हणजे, बुद्धिझम, बिझिनेस, बॉलीवूड, भरतनाट्यम आणि बर्मा टिक आहेत. पण मला वाटते के ह्यातून सर्वात महत्वाचा B सुटला आहे. आणि हा B आहे भरोसा, भारत आणि म्यानमारचा एकमेकांवरचा भरोसा, विश्वास. ह्या ह्या विश्वासाचा पाया शेकडो वर्षांत मजबूत झाला आहे आणि दिवसेनदिवस मजबूत होत जात आहे.

बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याच्या ज्या मंत्रावर आमचे सरकार चालत आहे तो सीमांमध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. सर्वांना सोबत घेणे म्हणजे प्रत्येक देश, सगळ्यांचा विकास म्हणजे प्रत्येक देशाचा विकास. विकास कार्यात म्यानमारला संपूर्ण सहकार्य करण्यास भारत पूर्ण कटिबद्ध आहे.

आपण ह्यात आम्हाला आशीवार्द दिलेत त्याबद्दल मी पुनः एकदा आपल्याला प्रणाम करतो. आपल्या दर्शनाचे सौभाग्य मला प्राप्त झाले, आपले अनेक अनेक धन्यवाद. देशावर असलेल्या प्रेमापोटी, परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याच्या इराद्याने, देश विदेशातील गोष्टी ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात. मी पुनः एकदा आपले मनःपूर्वक आभार मानतो. ह्या धरतीला प्रणाम करतो, आपल्या सर्वांना प्रणाम करतो. अनेक अनेक धन्यवाद!

 
PIB Release/DL/1473
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau