This Site Content Administered by
पंतप्रधान

वाराणसी इथल्या पशुधन मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 23-9-2017

इतक्या मोठ्या संख्येनं इथे आलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो.

इतक्या सकाळी सकाळी एवढा मोठा जनसमुदाय ! मी कल्पनाही नाही करु शकत! चारही बाजूंनी आज इथे लोकच लोक दिसताहेत. सर्वात आधी मी तुमची सर्वांची क्षमा मागतो कारण आम्ही जी व्यवस्था केली आहे ती कमी पडते आहे. आणि खूप लोक उन्हात उभे आहेत. त्यांना त्रास होतो आहे. तरीही ते आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. मी त्यांचेही आभार मानतो आणि त्यांची क्षमाही मागतो. मात्र त्याच वेळी जे आत्ता उन्हात उभे आहेत त्यांना मी खात्री देतो की आत्ता जे चटके तुम्ही सहन करताहात ही तुमची तपस्या आम्ही वाया जाऊ देणार नाही.

बंधू भगिनींनो, मी उत्तर प्रदेश सरकारला विशेषतः उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो कारण त्यांनी आज इथे या पशुधन आरोग्य मेळ्याचं आयोजन केलं. मी जेंव्हा त्या पशुधन  आरोग्य मेळ्यात गेलो तेंव्हा जवळपास १७०० जनावरं वेगवेगळ्या ठिकाणांहून तिथे आणली होती. त्या जनावरांच्या आरोग्य तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर्सही उपस्थित होते आणि ते सगळे डॉक्टर्स जबाबदारीनं त्यांची तपासणी करत होते. मला विश्वास आहे की उत्तर प्रदेश सरकार जाहीर केल्याप्रमाणे लवकरच ते राज्यभर सगळीकडे पशुधन आरोग्य मेळा आयोजित करतील. या मेळाव्यात गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांची तपासणी मोफत करता येईल. अनेक शेतकरी पैशाअभावी अशी तपासणी करू शकत नाहीत. आपल्या जनावरांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांना या मेळाव्यातून मोठा दिलासा मिळेल. आम्हाला कल्पना आहे की कृषी क्षेत्रात जर शेतकऱ्यांच उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यासाठी पशुपालन आणि दुग्ध उत्पादनातूनच मदत होऊ शकेल आणि म्हणूनच पशुपालन आणि दुग्धउत्पादनाच्या माध्यमातून तसच पशु आरोग्य मेळाव्याच्या मदतीनं येत्या काही काळात आम्ही गावातल्या गरीब शेतकऱ्यांना, पशुपालकांना मोठी मदत करू शकू. म्हणूनच मी हा उपक्रम सुरु केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो, ज्याचं मत सत्तेसाठी आवश्यक असत अशाच लोकांचं काम करणे हे राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. आपली मतपेटी मजबूत राखण्यासाठीच राजकारणी काम करतात, मात्र बंधू भगिनींनो, आम्ही वेगळ्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. आमचं चारित्र्य वेगळं आहे. आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे, आणि म्हणूनच आमचा प्राधान्यक्रम वोट बँकेच्या हिशेबानुसार ठरत नाही.

आज आम्ही हा पशुधन आरोग्य मेळा आयोजित केला आहे. आम्ही अशा जनावरांची सेवा करत आहोत ज्यांना कधी मतदानासाठी जायचे नाही. हे कोणाचेही मतदार नाहीत आणि म्हणूनच कदाचित गेल्या ७० वर्षात पशुधनासाठी अशा प्रकारचा उपक्रम कधी कोणी राबवला नाही. आरोग्य सेवा मिळाल्यामुळे पशुपालानासाठी शेतकऱ्यांना एक नवी सुविधा, नवी व्यवस्था मिळू शकेल.

आपला देश आज दुग्धउत्पादनात खूप पुढे गेला आहे. मात्र जगात प्रति जनावर जे दुध मिळते त्या तुलनेत आपल्या इथली दुभती जनावरं खूप कमी दुध देतात. आणि त्यामुळेच पशुपालन दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे. प्रत्येक जनावराची दुध उत्पादकता वाढविण्यात जर आपण यशस्वी झालो तर मला विश्वास आहे की आमचे शेतकरी पशुपालनात निश्चित रस घेतील आणि दुध उत्पादनातून त्यांच्या आयुष्यात एक नवी आर्थिक क्रांती घडू शकेल.

बंधू भगिनींनो, माझा जन्म गुजरातमध्ये झाला. माझं कार्यक्षेत्रही गुजरात होतं. सहकार चळवळीच्या माध्यमातून गुजरातमध्ये दुग्ध उत्पादनात जे काम झालं आहे त्या कामामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनाला नवी उर्जा मिळाल्याचं मी बघितलं आहे. लखनऊ कानपूर भागात गुजरातमधून आलेल्या बनास डेअरीनं इथल्या शेतकऱ्यांकडून दूध विकत घेण्यास सुरवात केली आहे, असं मला इथे सांगण्यात आलं. आणि या आधी शेतकऱ्यांना दुधाचा जो भाव मिळत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त भाव आज या डेअरी कडून मिळतो आहे. येत्या काही काळात काशी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचं दूधही बनास डेअरी विकत घेईल असेही मला सांगण्यात आलं.

मला खात्री आहे की जेंव्हा ही दुध खरेदी सुरु होईल, डेयरीच्या माध्यमातून सुरु होईल, दुधाच्या स्निग्धतेच्या आधारावर होईल, तेंव्हा ह्या काशी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळेल. त्यांच्या दुधाच्या विक्री मूल्यात मोठी वाढ होईल आणि त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. म्हणून शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी, दुग्ध उत्पादकांसाठी, गुजरात सरकारच्या मदतीने, बनास डेयरीच्या मदतीने उत्तर प्रदेश सरकारने जो उपक्रम हाती घेतला आहे, त्यासाठी मी उत्तर प्रदेश सरकारला आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन आणि पशु पालनात प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देतो. ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे.

बंधू आणि भगिनींनो, २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील आणि भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, तेंव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी स्वप्ने बघितली होती, त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांनी मिळून संकल्प केला पाहिजे. पाच वर्षांसाठी, त्या संकल्पासाठी, आपण आपली शक्ती आणि वेळ खर्ची घातला पाहीजे आणि ते संकल्प पूर्ण केलेच पाहिजे. जर देशातील सव्वाशे कोटी लोक एक एक संकल्प करतील तर पाच वर्षात देश सव्वाशे पाउले पुढे गेलेला असेल. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, २०२२, स्वातंत्र्याचा संकल्प पूर्ण करण्याचे वर्ष ठरेल.   

आमचा संकल्प आहे की २०२२ पर्यंत आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे. आणि त्यासाठी पशुपालन हा एक मार्ग आहे, आधुनिक शेती करणे हा एक मार्ग आहे, मृदा आरोग्य  कार्डाद्वारे जमिनीचे परीक्षण झाले पाहिजे, तपासणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळाली पाहिजे, ह्या कामाला गती आणि ताकद देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

उत्तर प्रदेशात नवीन सरकार आल्यापासून ज्या गतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वाटप करण्याचं काम सुरु आहे, ते येणाऱ्या काळात आमच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कमी येणार आहे.

त्याचप्रमाणे आपल्यापैकी कुणालाच अस्वच्छतेत राहायला आवडत नाही. अशी कुणीच व्यक्ती नसेल जिला घाणीचा तिटकारा येत नाही. प्रत्येकाला घाणीचा तिटकारा असतो. पण तरीही स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे, अशी मानसिकताच आपल्या देशात दुर्दैवाने  तयार झाली नाही. आपण अस्वच्छता  करतो, कुणी तरी दुसरा माणूस ती साफ करेल, आमच्या ह्याच मानसिकतेमुळे आज भारत देश, आपली खेडी, आपली महानगरे आपण पाहिजे तितकी स्वच्छ करू शकत नाही. आसपासच्या परिसराची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे आपल्यापैकी कुणीही नाकारू शकत नाही. स्वच्छता ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे आणि म्हणून ही स्वच्छता फक्त आपला परिसर, आपलं गाव चांगलं दिसावं म्हणून करणं हे पुरेसं नाही. स्वच्छता आपल्या आरोग्यासाठीही नितांत आवश्यक आहे. सध्या अनेक प्रकारचे जे आजार बळावत आहेत त्याचं मूळ कारण हे अस्वच्छता आहे.

अलीकडेच युनिसेफने भारतातील दहा हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले. स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. आणि काल मी एका वर्तमानपत्रात वाचलं, की युनिसेफने म्हटलं आहे की जर घरात स्वच्छतागृह असेल तर वर्षाला ५०,००० रुपयांची बचत होते. घरात स्वच्छतागृह नसेल तर हे पैसे वर्षभरात कुटुंबाच्या आजारपणावर खर्च होतात. आज मला येथे शेजारच्या गावात स्वच्छतागृहाच्या बांधणीत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. आणि त्या गावातील लोकांनी संकल्प सोडला आहे की २ ऑक्टोबर पर्यंत गाव हागणदारीमुक्त करायचाच. नवरात्राच्या ह्या पवित्र पर्वात स्वच्छतागृह बांधण्यात सहभागी होण्याचे सौभाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे. स्वच्छता, माझ्यासाठी देवपूजेसमान आहे, स्वच्छता माझ्या देशातील गरीब जनतेला रोगराई पासून मुक्त करेल. स्वच्छतेमुळे, माझ्या देशातील गरीब जनतेला रोगराईमुळे पडणाऱ्या आर्थिक ओझ्यापासून मुक्ती मिळेल. आणि म्हणून गरिबांचं भलं करण्याची ही माझी मोहीम आहे. आणि ह्यात जे माझ्या सोबत आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. 

आज मला आनंद आहे, सर्वसाधारणपणे आपल्या देशात शौचालय शब्द प्रचलित आहे. पण आज मी ज्या गावात स्वच्छतागृहाची पायाभरणी केली त्या गावात शौचालयांना ‘इज्जतघर’ असं लिहिलं आहे, ‘इज्जतघर’. हा शब्द मला इतका आवडला, शौचालय हे खरोखरच एक इज्जतघर आहे, विशेषकरून आपल्या बहिणी आणि मुलींसाठी इज्जतघर आहे. आणि हो, जिथे इज्जतघर आहे तिथे कुटुंबाची देखील इज्जत म्हणजे प्रतिष्ठा असते. जिथे इज्जतघर आहे तिथे, गावाची देखील प्रतिष्ठा असते. आणि म्हणून, शौचालयाला ‘इज्जतघर ही नवी ओळख देण्यासाठी, मी उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन करतो. त्यांनी शौचालयाची प्रतिष्ठा  वाढवली आहे. मला विश्वास आहे की येत्या काळात, जे लोक आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेविषयी जागृत असतील ते सर्व, हे इज्जतघर बनवतील.

बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशात आजही कोट्यवधी कुटुंबे अशी आहेत ज्यांना राहायला स्वतःचे घर नाही. हे लोक अगदी अमानुष  परिस्थितीत राहतात. बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला राहायला घर देणे, डोक्यावर छप्पर देणे ही आपली जबाबदारी आहे.

आणि म्हणून, बंधू आणि भगिनींनो, आम्ही विडा उचलला आहे. मला जाणीव आहे, जो संकल्प आम्ही सोडला आहे तो पूर्ण करणे अतिशय अवघड आहे. पण जर अवघड काम मोदी नाही करणार तर कोण करेल? आणि म्हणून बंधुंनो, आम्ही ठरवलं आहे की, २०२२ – भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत देशातील प्रत्येक गरिबाला त्याचं स्वतःच घर द्यायचं. आणि जेव्हा देशात कोट्यवधी घरे बनतील, एकप्रकारे भारतात इतकी घरं बनवायची आहेत, जणू काही युरोपचा एखादा छोटा देशच भारतात तयार होत आहे, इतक्या मोठ्या संख्येत आपल्याला घरे बनवावी लागतील. आणि जेव्हा नवी घरे बनतील तेंव्हा विटा लागतील, सिमेंट लागेल, लोखंड लागेल, लाकूड लागेल, नवनवीन लोकांना रोजगार मिळेल, मजुरांना काम मिळेल, आणि जेंव्हा कोट्यावधी घरे बनतील, तेंव्हा रोजगाराची एक नवी संधी निर्माण होईल.

उत्तर प्रदेशाच्या आधीच्या सरकारला आम्ही पत्रावर पत्र लिहित होतो. आम्ही म्हणायचो, स्वतःच घर नसलेल्या कुटुंबांची माहिती द्या, यादी तयार करा, भारत सरकार एक योजना तयार करत आहे. मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की आधीच्या सरकारला गरिबांसाठी घरे बांधण्यात काही रस नव्हता. आम्ही इतका दबाव टाकला, इतका दबाव टाकला, तेंव्हा कुठे मोठ्या मुश्किलीने १०,००० कुटुंबांची यादी त्यांनी तयार केली. पण जेंव्हा योगीजींचे सरकार आले, त्यांनी कामाचं धडाका लावला. आज ह्या योजनेत लाखो कुटुंबांची नोंदणी झाली आहे. इतकंच नाही तर, आज ज्यांची घरं बनणार आहेत, त्यांसाठी निधी मंजूर करण्याचे सद्‌भाग्य मला प्राप्त झाले. 

बंधू आणि भगिनींनो, स्वच्छतेचा मुद्दा असो, गावागावात वीज पोहोचविण्याचा मुद्दा असो, घराघरात शुद्ध पाणी पुरविण्याचा मुद्दा असो, ह्या सगळ्यांबाबत आधी देश,देशातली यंत्रणा अतिशय उदासीन होती.

जर माझी गावं, गरीब शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार असेल, आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबांचे आयुष्य बदलणार असेल, तर हा देश आपल्याला हवा तसा बनण्यापासून कुणी रोखू शकत नाही. आणि त्यासाठी सर्वप्रथम मध्यमवर्गाला मदत मिळाली पाहिजे. आमच्या गरीब कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन आले पाहिजे. आणि म्हणून आम्ही, आपल्या देशात असे परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या योजनांमध्ये बदल केले आहेत, त्या योजनांना आम्ही नवी ताकद दिली आहे.

बंधू आणि भगिनींनो, काल बनारसमध्ये स्वच्छतेशी निगडीत अनेक योजनांचं लोकार्पण करण्याचे सद्‌भाग्य मला प्राप्त झाले. जवळपास ६०० कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. ह्याची क्षमता इतकी आहे की पुढच्या २० वर्षानंतर बनारस शहर कितीही वाढलं तरी हे कमी पडणार नाही.

आम्ही कचऱ्यातून संपत्ती तयार करण्यावरही भर दिला आहे. आणि ह्या सोबतच आम्ही कचऱ्यातून वीज बनविण्याचे ठरविले आहे. कचऱ्यापासून तयार झालेल्या या विजेमुळे आम्ही देशातल्या ४० हजार घरात आम्ही वीज पोहोचवणार आहोत. आम्ही एलईडी बल्बचेही अभियान चालवले. एकट्या वाराणसी शहरात जितक्या लोकांच्या घरी एलईडी बल्ब लावले आहेत त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या विजेच्या खर्चात लक्षणीय घट झाली आहे. आणि जेंव्हा मी हिशेब केला, तेंव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितले एकट्या काशी शहरात एलईडी बल्ब मुळे वीज बिल जे कमी होईल, वर्षभरात प्रत्येक व्यक्तीचे जे पैसे वाचतील ते एकूण सव्वा कोटी रुपये असतील. आपण कल्पना करू शकता की, सामान्य माणसाचे पैसे वाचतील कुणाचे ५०० रुपये, कुणाचे १००० कुणाचे २५० वाचतील, पूर्ण शहराचे सव्वा कोटी रुपये वाचतील. गरीब आणि मध्यमवर्गाच्या कुटुंबांवरचा आर्थिक बोजा कमी करण्याचा हा आमचं एक उत्तम प्रयत्न आहे.

इतकंच नाही, वाराणसीमध्ये जे पथदिवे लागले आहेत ते देखील आता एलईडी बल्ब आहेत. आणि वाराणसी मध्ये पथदिवे लागल्याने, एलईडी लागल्याने, एकट्या कशी शहरात वीज बिलात जवळ जवळ १३ कोटी रुपयांची कपात झाली आहे. काशीवाराणसी नगरपालिकेचे १३ कोटी रुपये वाचले आहेत. हे १३ कोटी रुपये काशी शहराच्या विकास कामात उपयोगी पडतील. सोपा उपाय, फक्त जुना बल्ब बदलून एलईडी बल्ब लावला. आणि सव्वा कोटी रुपये नागरिकांचे आणि १३ कोटी नगरपालिकेचे, हे बचत होणे हे फार मोठे यश आहे.

बंधू आणि भगिनींनो, काळा पैसा असो, भ्रष्टाचार असो, अप्रामाणिकपणा असो, ह्यांच्या विरुद्ध मी खूप मोठे युध्द पुकारले आहे. अप्रामाणिक लोक प्रामाणिक लोकांचे हक्क हिरावून घेत आहेत म्हणून ह्या देशातील सर्वसामान्य प्रामाणिक माणसाला त्रास होतो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, प्रामाणिकपणाची ही मोहीम एक उत्सवाचं रूप घेत आहे. ज्या प्रकारे छोटे छोटे व्यापारी जीएसटीशी जोडले जात आहेत, ज्या प्रकारे आधार कार्डशी लोक जोडले जात आहेत आणि जो पैसा कुणीतरी हडप करत होतं, तो सगळा पैसा, जनतेची पै न पै जनतेच्या भल्यासाठी खर्च होईल, आम्ही हे काम सुरु केले आहे. आम्ही वेगाने पुढे जात आहोत, आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, इथली खेडी, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास, आमच्या शहरांचा विकास, हा आमचा एकमेव मंत्र आहे, आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण येऊन मला आशीर्वाद दिला, मी मनापासून आपले आभार मानतो.

आमचे महेंद्र पांडेजी यांचा हा मतदार संघ आहे आणि जी उर्जा, उत्साह आणि आनंद आपण दाखवला आहे त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. मी पुन्हा एकदा योगी सरकारने उचलेल्या महत्वपूर्ण पावलांसाठी शुभेच्छा देतो आणि ज्या प्रकारे सहा महिन्यात उत्तर प्रदेशात बदल घडवून आणण्याचा विडा उचलला आहे, आणि त्या दिशेने सफल वाटचाल सुरु केली आहे, मी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो, अनेक अनेक धन्यवाद देतो.

माझ्या सोबत जोरात म्हणा - भारत माता की – जय

पूर्ण ताकदीने म्हणा – भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

अनेक – अनेक धन्‍यवाद. 

 
PIB Release/DL/1530
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau