This Site Content Administered by
पंतप्रधान

गुजरातमध्ये ओखा ते बेट व्दारका या दरम्यान बांधण्यात येणा-या सेतुच्या शिलान्यासप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

नवी दिल्ली, 7-10-2017

मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मला व्दारकेचा नूर  काही वेगळाच दिसतोय. चारही दिशांना उत्साह, आनंद ओसंडून वाहत आहे. अशा नवचैतन्याने भारलेल्या व्दारकेचा मी अनुभव घेत आहे. व्दारकावासियांचे मी अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. त्यांना मी धन्यवाद देतो. आज व्दारका नगरीमध्ये ज्या कामाचा आरंभ होत आहे, तो फक्त बेट व्दारकेला पोहोचवणारा एक सेतू नाही. फक्त विटा, दगडं, लोखंडी सळयांची ती एक स्थापत्य रचनेची व्यवस्था आहे, असं अजिबात नाही. हा सेतू बेट व्दारकेच्या सांस्कृतिक वारशाबरोबर हजारो वर्षांपूर्वीचं नातं आहे, हे नातं एका कडीच्या रुपाने जोडण्याचं कार्य या सेतूमुळे होणार आहे.

ज्या ज्यावेळी मी बेट व्दारकेला येत होतो आणि इथंल्‍या पुलाला पाहत होतो. निर्मळ पाणी पाहत होतो. पर्यटनाच्या दृष्टीने इथं उपलब्ध असलेल्या अनेक संधी मला दिसत होत्या. परंतु भारत सरकारच्यावतीने, भूतकाळामध्ये भारत सरकारला गुजरातविषयी किती प्रेम होते, हे तर आपल्याला माहीत आहेच. आपण किती कठीण परिस्थितीतून दिवस कंठले आहेत. माझ्या सगळं काही चांगलं स्मरणामध्ये आहे. बेटावरच्या सगळ्या लोकांची स्थिती मी पाहिली आहे. सूर्यास्ताच्या आधी त्यांना सगळी कामं पूर्ण करावी लागत होती. कारण रात्रीच्या वेळी बेटावर येणं-जाणं पूर्ण बंद करावे  लागायचे. बेटावरच्या रहिवाशांना केवळ जलमार्गाने येणं-जाणं करावं लागत होतं. त्यांना अतिशय नाइलाजानं सगळी कामं सूर्यास्ताच्या आत करून त्रासदायक जीवन कंठावं लागत होतं. आणि जर कोणी अचानक आजारी पडलं, त्याला रुग्णालयामध्ये घेवून जायची वेळ आली आणि जर ती वेळ रात्रीची असेल तर किती मोठा प्रश्न निर्माण होत असे, हे माझ्या बेट व्दारकेच्या बंधू, भगिनींना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच या पुलाची सुविधा निर्माण करण्याची अतिशय आवश्यकता आहे. यामुळे देशभरातून इथे येत असलेल्या यात्रेकरूंना ही एक मोठी, महत्वपूर्ण-उपयोगी भेट ठरणार आहे.

या एका सुविधेमुळे बेट व्दारकेच्या नागरिकांना त्यांच्या अगदी सामान्य, रोजच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. या एका सुविधेमुळे बेट व्दारकेला लागून असलेल्या सागरी किना-यांचा पर्यटन स्थाने, केंद्र म्हणून मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकणार आहे. विकासाच्या अनेक संधी केवळ या एका पुलामुळे निर्माण होणार आहेत. कोणीही यात्रेकरू इथं एकदा आला, त्यानं ठाकूरजीच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतलं, की झाली आपली यात्रा, असं म्हणून तो निघून गेला तर त्याचा अर्थव्यवस्थेला फारसा काही लाभ होत नाही. परंतु जर त्याच यात्रेकरूने एक रात्र जरी इथं मुक्काम केला, दोन दिवस इथं राहिला तर, तो यात्रेकरू हजार, दोन हजार रूपये खर्च करतो. यामुळेच  व्दारकेच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये हे पैसे येतात. परिणामी इथल्या गरीबातल्या गरीबालाही रोजगार मिळतो. लोक व्दारकेला येतात, ते भगवान व्दारकाधीशाच्या कृपेमुळे. परंतु यात्रेकरूंनी व्दारकेला मुक्काम करावा असे वाटत असेल तर आपण तशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, तरच यात्रेकरू व्दारकेत मुक्कामासाठी थांबतील. आणि म्हणूनच आम्ही विकासाला प्राधान्य दिले आहे. इथं यात्रेकरूंनी यावं इथं मुक्काम करावा, असं त्यांना मनापासून वाटलं पाहिजे. या ठाकुरजीच्या व्दारका नगरीत एक-दोन दिवस मुक्काम करावं, असं त्यांना वाटलं पाहिजे. या सागराच्या लाटांचा अनुभव घेण्यासाठी एक संध्याकाळ इथं घालावावी असं मनानं त्यांना वाटलं पाहिजे. अस्ताला जाणारा सूर्य पाहून मन प्रफुल्लित होईल, आनंदीत होईल. असं वातावरण तयार करण्यासाठी आपले हे सरकार सातत्याने प्रयत्नशिल आहे.

साधारण आठ-दहा वर्षांपूर्वीची व्दारका कशी होती, ते थोडं आठवून पाहा. आणि आजची व्दारका कशी आहे, हेही पाहून घ्या. किती परिवर्तन आले आहे. पर्यटन व्यवसाय काही एका कोप-याचा , छोट्या भागाचा विकास करून होत नाही. त्यासाठी ‘कनेक्टिव्हिटी’ पाहिजे. एकाशी दुसरा आणि दुस-याशी तिसरा घटक तसेच तिस-याशी चौथा घटक जोडला गेला पाहिजे. संपूर्ण दुनियेमधून गीर अभयारण्यातील सिंह पाहण्यासाठी लोक येत असतात. परंतु गीरचे सिंह पाहून झाल्यानंतर त्यांना पोरबंदर आणि व्दारकेला जाण्यासाठी जर सहा पदरी, चौपदरी, दुपदरी चांगला मोठा, प्रशस्त रस्ता असेल तर पर्यटाकांची सोय होईल आणि पर्यटकांच्या मनात या भागातल्या आणखी काही गोष्टी पाहव्यात, काही स्थानांना भेट द्यावी, असे विचार येतील.जो कोणी गीर अभयारण्य पाहण्यासाठी येईल तो व्दारकाधिशाच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठीही जाईल. अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आणि एखादा व्दारकाधिशाचा भक्त त्याच्या दर्शनाला येईल, तोही गीरचे वनराज पाहण्यासाठी जाण्याचा विचार करेल. त्याच्यासाठीही सुविधा झाली पाहिजे. आणि म्हणूनच भारत सरकारने या राष्ट्रीय महामार्गाचं जाळं तयार करताना काही सुधारणा केल्या आहेत. रस्ता झाला पाहिजे, सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. परंतु त्याच्याच जोडीने आर्थिक व्यवहारांशी त्याचा थेट संबंधही असला पाहिजे. या व्यवस्थेमुळे आर्थिक व्यवहारांना बळकटी मिळाली पाहिजे.

आज राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाला प्रारंभ झाला आहे, तो मार्ग घणूपर्यंत जाणार आहे. ज्यावेळी माझ्या मनात घणूविषयी आठवणी येतात, त्या त्यावेळी मला लहान, लहान, पोरवयातील मुलं डोळ्यासमोर येतात. आमचे खूप जुने, कार्यकर्ता आहेत. व्यवसायाने शेतकरी आहेत परंतु त्यांच्या मनात अनेक गोष्टींविषयी स्पष्टता आहे. एखादी गोष्ट कशाप्रकारे केली तर अधिक चांगली, उपयोगी ठरू शकते, याचा त्यांनी साकल्याने विचार केलेला असतो. ते सातत्याने विचार करीत असायचे. आज त्या घणूपर्यंत आम्ही मोठा, विस्तारित रस्ता नेत आहोत. रस्त्याच्या रूंदीकरणासाठी, या राष्ट्रीय महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही खर्च करणार आहोत. आज या एका कार्यक्रमामध्ये आणखी एक जिल्हा मुख्यमार्गाला जोडला जाणार आहे. तसं पाहिलं तर जामनगर, जुनागढ जिल्‍ह्याला जोडून पोरबंदर जिल्हा जोडला जात आहे जवळ जवळ सहा हजार कोटी रुपयांच्‍या  गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. यावरून या प्रकल्पाची व्याप्ती किती जास्त आहे, याची तुम्हाला कल्पना येईल. माधवसिंह सोलंकिया गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्या काळच्या दिवसांचे स्मरण आता होत आहे. त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते, मला अजूनही ते चांगलेच आठवतेय. त्यावेळी तर मी राजकारणामध्येही  नव्हतो. मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. जामनगरमध्ये की जामनगर अथवा जामनगर जिल्‍ह्यामध्ये एका पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी त्याकाळी मुख्यमंत्री माधवसिंह आले होते. आता ही त्याकाळच्या सरकारची कल्पना आणि आजच्या सरकारची कल्पना तुमच्या लक्षात येईल. आज मोठ मोठाले पूल कसे बनत आहेत, रस्ते कसे बनवले जात आहेत. एका पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करून वर्तमानपत्रामध्ये आतल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात दिली जात होती, आणि पहिल्या पानावर उद्घाटनाचे छायाचित्र प्रसिद्ध केले जात होते. असे काम करत असलेल्या लोकांसाठी ‘विकास’ या विषयावर विचार करण्याची सीमाही तेवढीच मर्यादित होती.

जग बदलले आहे. या बदलत्या जगामध्ये विकासाला नवीन उंचीवर घेवून जाण्याचं काम प्रत्येक भारतीयाचं आहे. दुनियेसमोर ताठ मानेनं भारतीयांनी उभं राहिलं पाहिजे. असा हिंदुस्तान बनवण्याचं स्वप्न प्रत्येक भारतीयाचं आहे. हे स्वप्न काही फक्त नरेंद्र मोदी यांचचं नाही. सव्वाशे कोटी देशवासियांचं हे स्वप्न आहे. मी तर केवळ या स्वप्नांमध्ये रंग भरण्याचा, ती स्वप्ने सत्यात कशी उतरतील यासाठी प्रयत्न करीत आहे. परिश्रम करत आहे. आत्ताच नितीनजी सांगत होते; नील अर्थव्यवस्था याविषयी माहिती देत होते. हे एक वेगळे क्षेत्र आहे. सागरी संपदा गुजरात आणि उर्वरित देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी ताकद देण्याचं सामर्थ्य या नीलक्रांतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. गुजरातला 1600 किलोमिटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. आमचे मच्छीमार बंधू-भगिनी या सागरी किना-यांवर वास्तव्य करतात. नीलक्रांती घडवून आणण्याची संपूर्ण संधी आणि शक्यता आपल्या सागरी किनारे देत आहेत. म्हणूनच आम्ही बंदरांचा विकास करू इच्छितो. परंतु याचबरोबर आम्हाला बंदरावर आधारित विकासही करायचा आहे. आम्हाला पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करायचे आहे. यामुळे बंदरे महामार्गांना जोडले जावू शकतील, रेल मार्गांना जोडले जातील आणि बंदरे थेट हवाई मार्गांशीही जोडले जातील. अशा पायाभूत सुविधांमध्ये गोदामे, शीतगृहे बनवण्याची गरज आहे. संपूर्ण जगाच्या बाजारपेठेमध्ये भारतातल्या शेतकरी वर्गाने पिकवलेला माल कमीतकमी कालावधीमध्ये कसा पोहोचेल. आणि माझ्या देशाच्या बळीराजाच्या मालाला जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल, याचा विचार आम्ही करीत आहोत. आणि म्हणूनच ही सगळी व्यवस्था विकसित करण्यासाठी आम्ही एका पाठोपाठ एक पावले उचलत आहोत. आम्ही एक योजना बनवली आहे. ही योजना आमच्या मच्छिमार बंधू-भगिनींनीसाठी नीलक्रांती अर्थव्यवस्था दृष्टीसमोर ठेवून बनवली आहे. आज आमचे मच्छिमार, ज्यांच्याजवळ लहान लहान बोटी आहेत. ते बोटी घेवून समुद्रामध्ये मासेमारीसाठी जातात. हे मच्छिमार साधारणपणे दहा ते बारा सागरी मैलांपेक्षा जास्त आत समुद्रामध्ये जावू शकत नाहीत. आणि या मर्यादित क्षेत्रामध्ये अपेक्षेइतके भरपूर मासेही मिळत नाहीत. अनेक तास ते परिश्रम करतात. परंतु अर्धी-मुर्धी नाव भरून ते परत येतात. माझ्या मच्छिमार बंधू-भगिनींना असं जीवन नाइलाजाने कंठावं लागत आहे. त्यांना मी असंच नशिबाच्या हवाली सोडून देवू ? माझ्या मच्छिमार बंधू- भगिनींना चांगले शिक्षण देण्याची इच्छा मला होत नसेल? माझ्या मच्छिमार बंधू- भगिनींना झोपडपट्टीतल्या आयुष्यातून बाहेर काढून, त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मिळावे, असं माझ्या मनाला वाटत नसेल? आणि हे सगळं करायचं असेल तर त्यांची आर्थिक क्षमता वाढवली पाहिजे. त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. त्यांचं सशक्तीकरण केलं पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्यांचा विचार करून आम्ही एक योजना आणली आहे. काही मच्छिमार बंधू-भगिनींनी एकत्र यावं. सरकार त्यांना कर्ज देईल. अगदी कमी व्याजदराने कर्ज देईल. आणि या कर्जातून ते दीड कोटी, दोन कोटींची मोठी बोट विकत घेऊ शकतील. त्या बोटीचे सगळे मिळून व्यवस्थापन करतील. आणि हे मच्छिमार जर दीड कोटी, दोन कोटीची मोठी बोट वापरतील तर त्यांना दहा-बारा सागरी मैलापेक्षाही जास्त आत समुद्रामध्ये जाता येईल आणि समुद्राच्या आत तर माशांचा जणू सागरच असतो. अगदी खोल समुद्रात मासेमारी केली तरी खूप मासे मिळतील. जे काम माझ्या या बांधवांना तीन दिवस करावे लागते, तेच काम त्यांचे अर्धा-एक दिवसात पूर्ण होईल. त्यांना तिप्पट, चौपट कमाई करण्याचं साधन कमावून ते आपल्या किना-याला परत येवू शकतील. आणि या मोठ्या बोटीमध्ये शीतगृहासहीत सगळी सुविधा असेल. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही आमच्या मच्छिमार बंधू- भगिनींना देवू इच्छितो. प्रत्येक मच्छिमार बंधू या व्यवस्थेचा लाभ घेवू शकेल, अशा पद्धतीने आम्ही ही योजना पुढे नेत आहोत. या योजनेमुळे माझ्या मच्छिमार बंधू- भगिनींचे जीवन बदलून जाणार आहे. कांडला बंदराचा ज्या पद्धतीने विकास झाला, याचाही विचार करावा.

ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही कांडला बंदर होते. आणि त्याची अवस्था काय होती, याची मला पूर्ण कल्पना आहे. आपण  भारत सरकारला त्यावेळी सारखं सांगत होतो की, या बंदराच्या कामाला प्राधान्य द्यावं. ही एक संधी आहे. परंतु कांडला बंदर त्यांच्या कामाच्या सूचीमध्ये नव्हते. आता ज्यावेळी भारत सरकारमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे, त्या संधीचा लाभ घेवून गुजरातमधल्या बंदरांचा विकास करण्यावर आपण लक्ष दिले आहे. आणि यामुळेच कांडला बंदराचा आज जो विकास झाला आहे, तितका आणि तसा विकास गेल्या 25 वर्षांत झालेला नाही, इतक्या वेगाने आज कांडला बंदराचा विकास होत आहे. आणि या कारणामुळे लोकांना रोजी-रोटी मिळत आहे. आमच्या अलंगविषयी गेली कित्येक वर्षे तक्रारी केल्या जात आहेत. ‘अलंगचा’ विकास केला पाहिजे अशी चर्चा सातत्याने केली जाते. अलंगमधील स्वच्छतेविषयी सगळीकडे चर्चाच चर्चा केली जाते. भावनगर जिल्‍ह्यामध्ये असलेल्या अलंग या गावानं  तिथं चालत असलेल्या बोटी तोडण्याच्या व्यवसायामुळे संपूर्ण जगामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचबरोबर पर्यावरणाच्या नावाखाली शेकडो प्रश्न उपस्थित केले जात होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था सातत्याने नवे नवे प्रश्न निर्माण करीत होत्या. त्यामुळे भारत सरकारची जबाबदारी होती की, याविषयी चिंता करून काहीतरी मदत केली जाईल, याकडे लक्ष दिले पाहिजे होते. अलंगमध्ये कार्यरत असलेल्या श्रमिकांच्या आयुष्यामध्ये काही परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांना काही मदत करण्याची आवश्यकता होती. अलंगच्या कामगारांसाठी त्याकाळी सातत्याने प्रयत्न करूनही तत्कालीन भारत सरकारची मी झोप उडवू शकलो नाही. परंतु आज आता आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आम्हीही जपानच्या मदतीने अलंगसाठी काही करणार आहोत. लोकांना जपान म्हटले की फक्त बुलेट ट्रेनच आठवते. परंतु लोक हे विसरतात की, जपानच्या मदतीने आम्ही अलंगच्या विकासासाठीही एक खूप मोठी योजना तयार करून पुढे जाण्याची तयारी केली आहे. आणि यामुळेच अलंगच्या माझ्या बंधू-भगिनींच्या आयुष्यामध्ये खूप मोठे परिवर्तन लवकरच येणार आहे.

ही परिवर्तनाची दिशा आम्ही पकडली आहे. विकास कामं करताना नवनवीन क्षेत्रांमध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडून यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे खूप चांगले परिणाम दिसून येणार आहेत. मांगरोल आणि वेरावल ही दोन्ही ठिकाणे म्हणजे आमची परंपरागत मासेमारीची मोठी, महत्वाची स्थाने आहेत. अलिकडेच आपले राष्ट्रपतीजी आले होते. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी मांगरोलमध्ये हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी, एका खूप मोठ्या योजनेचा शिलान्यास केला. हे मासेमारी केंद्र आगामी काळात या संपूर्ण बेटाच्या दृष्टीने, आमच्या मत्स्य उद्योगासाठी खूप मोठी ताकद देणारे ठरणार आहे. हे मासेमारी केंद्र एक नवी शक्ती म्हणून उभे राहणार आहे. हा संपूर्ण किनारी भूप्रदेश नीलक्रांतीतून होत असलेल्या अर्थविकासाच्या दृष्टीने, त्याचबरोबर पर्यटनातून अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. पायाभूत सुविधा चांगल्या केल्या तर त्याच्या मदतीने प्रदेशाची प्रगती होऊ शकणार आहे. त्याच्याबरोबरच मनुष्यबळ विकास होणार आहे.

मी गुजरातवासियांसाठी एका भेटीची घोषणा आज करू इच्छितो. ही गोष्ट केवळ गुजरातसाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्तानच्या उपयोगी ठरणारी आहे. परंतु आमच्या सागरी किना-यावर हे होईल आणि देवभूमी व्दारका इथं होईल. आपल्या सागरी किना-यांच्या संरक्षणासाठी सागरी पोलिस हे एक असं क्षेत्र आहे की, या क्षेत्राला भारत अत्याधुनिक बनवण्यासाठी काम करीत आहे. सामान्य पोलिस दलापेक्षा सागरी पोलिसांचे प्रशिक्षण खूप वेगळे असणार आहे. कारण समुद्रामध्ये सागरी किना-यावर पाच किलामीटर परिघामध्ये संपूर्ण सुरक्षा असावी लागते. अशी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे काम करावयाचे आहे. यामुळे देशभरामध्ये सागरी पोलिस प्रशिक्षण संशोधन संस्था या देवभूमी व्दारकेमध्ये स्थापन करण्यात येईल. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी देशातली पहिली आणि सर्वात मोठी संस्था असणार आहे. व्दारकेमध्ये मोजपजवळ या संस्थेची उभारणी करण्यात येणार आहे.  देशात ज्याप्रमाणे जामनगरच्या आत हवाई स्थानकावर आमची एक प्रशिक्षण संस्था आहे. हवाई दलामध्ये कार्यरत असणारे देशभरातील लोक या हवाई प्रशिक्षण संस्थेचा लाभ घेतात. अगदी त्याचप्रमाणे देवभूमी व्दारका इथल्याही सागरी पोलिस प्रशिक्षण संस्थेचा लाभ घेतील. हिंदुस्तानातील पोलिस विभागातील लोक या प्रशिक्षण केंद्राचा फायदा घेतील. या प्रशिक्षण संस्थेमुळे हजारो लोकांचे येणे-जाणे होत राहील. आणि देवभूमीच्या अर्थव्यवस्थेला कितीतरी वेगाने चालना मिळेल. याचा आपण नक्कीच अंदाज बांधू शकता.

बंधू-भगिनींनो, आपण सगळेजण दिवाळीची तयारी करीत आहात. आणि गुजरातमध्ये दिवाळीचा उत्सव खूप विशेष असतो. व्यापारी वर्गाला तर या दिवाळी पर्वाचे विशेष महत्व वाटत असते. आणि मी आज देशभरातील वर्तमानपत्रांचे मुख्य मथळे, शीर्षके पाहिली. त्यामध्ये म्हटले आहे की, दिवाळी यंदा पंधरा दिवस लवकरच आली आहे. चोहो दिशांना दिवाळीचे वातावरण निर्माण झाले आहे, दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली आहे. याचे कारण म्हणजे काल आम्ही जीएसटीविषयी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले. याविषयी आम्ही आधीच जाहीर केले होते. जीएसटी, एकदा लागू केले जावू दे. यानंतर तीन महिने त्याविषयी अभ्यास केला जाईल. आणि या तीन महिन्यांमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये समस्या निर्माण होतात, व्यवस्थेमधील त्रुटी लक्षात येतात, तंत्रज्ञानातील कमतरता जाणवतात, नियम राबवणे अवघड जाते, करांचे दर समजणे कठीण वाटते आणि करदराविषयी तक्रारी आल्या, व्यापारी वर्गाला प्रत्यक्ष काम करताना त्रास वाटत असेल. कारण देशातला व्यापारी वर्ग लालफितीच्‍या  कारभारामध्ये अडकून पडावा, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. फायलींच्या जंजाळामध्ये त्याने फसून, कारकून आणि साहेब यांच्यामध्ये अडकावे, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. असा गोंधळाचा कारभार हिंदुस्तानमध्ये व्हावा, असे आपल्याला वाटत नाही. आणि म्हणूनच तीन महिन्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी लक्षात आल्या आहेत, त्याच्या आधारे काल आमच्या वित्तमंत्र्यांनी जीएसटी परिषदेच्या सर्व सदस्यांचे मन वळवून खूप मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय काल घेतला. देशाच्या कानाकोप-यांतून या निर्णयाचे खूप उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले, याचा मला खूप आनंद झाला आहे. आणि हीच खरी देशाची ताकद आहे. ज्यावेळी एका सरकारवर विश्वास असतो. नियमांच्यामागे विश्वासार्हता नजरेस पडते, त्यावेळी देशासमोर कितीही, कोणतीही अडचण निर्माण झाली तरी सगळे अगदी मनापासून एकजूट होतात. याचा अनुभव मी सध्या घेत आहे. आणि म्हणूनच मी देशवासियांचे आभार मानतो. जीएसटीमध्ये आणखी सुलभता, सुकरता आणण्‍यात आली आहे. जीएसटी करभार कमी करून त्यामध्ये सुलभतेने व्यवहार व्हावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत. या नवीन बदलाचे जे सर्व स्तरातून स्वागत केले गेले, त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि  अभिनंदन व्यक्त करतो.

 
PIB Release/DL/1612

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau