This Site Content Administered by
पंतप्रधान

गुजरातमधील गांधीनगर येथे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान योजनेचा शुभारंभ आणि आयआयटी-गांधीनगर राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 7-10-2017

प्रिय तरुण मित्रांनो,

तुम्ही आयआयटीअन्स आहात. मात्र मी असा माणूस आहे ज्याला ते दोन आय जोडलेले नाहीत. तुम्ही सर्व आयआयटीअन्स आहात, मी लहानपणापासून केवळ टीएन राहिलो. टीईए वाला टीएन चहावाला. मी विचार करत होतो कि महाविद्यालयातील तरुण खूप हुशार असतात, एवढा उशीर करत नाहीत. पुन्हा तेच झाले. आज  7 ऑक्टोबर आहे. 2001 मध्ये  26 जानेवारी रोजी भीषण भूकंप आला होता. आणि त्यानंतर अशी परिस्थिती बनली कि जो माझ्या आयुष्याचा कधी मार्गच नव्हता. आणि अचानक मला  7 ऑक्टोबर 2001 रोजी याच गांधीनगरमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आणि एका नव्या जबाबदारीला सुरुवात झाली. ना  शासन व्यवस्था माहित होती ना  कधी विधानसभा पाहिली होती. मात्र एक नवी जबाबदारी आली होती. मात्र मनात ठरवले होते कि मेहनत करण्यात कुठलीही कमतरता ठेवणार नाही आणि आज देशाने मला दरवेळी कोणती ना कोणती नवी जबाबदारी दिली आहे. आणि या नव्या जबाबदारीमुळे आज तुमच्या मध्ये उपस्थित आहे.

आज इथे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले ग्रामीण भागातील तरुण-तरुणी आहेत, काही वयस्करही आहेत. ज्यांना मी सर्वप्रथम प्रमाणपत्रे दिली, त्यांना मी सगळ्या गोष्टी विचारत होतो आणि मी आश्चर्यचकित झालो होतो. त्यांना सगळे माहित होते. त्या गावात काय करत आहेत, लोकांना कशा प्रकारे मदत करत आहेत, त्यांनी कुठले प्रशिक्षण घेतले आहे. त्या प्रशिक्षणाचा कसा उपयोग करणार. सगळ्या प्रश्नांची त्या मला उत्तरे देत होत्या. मला वाटते हीच क्रांती आहे. देश आणि जग, बहुधा गेल्या तीनशे वर्षात जेवढी तंत्रज्ञानाची क्रांती पाहिली नाही. गेल्या ५० वर्षात तंत्रज्ञानाची क्रांती आली. तंत्रज्ञान आयुष्याचा भाग बनले आहे. तंत्रज्ञान स्वतः एक चालक शक्ती बनली आहे. आणि अशा वेळी कोणत्याही देशाला जर प्रगती करायची असेल तर भारताच्या सर्व स्तरातील लोकांना, शहर असो किंवा गाव, शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, वृद्ध असो किंवा तरुण असो, या तंत्रज्ञानाबरोबर त्याचे जोडले जाणे एका उज्वल भविष्यासाठी अनिवार्य आहे.

स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी ज्याप्रकारे साक्षरतेवर भर देत होते, जर स्वराज्याच्या आंदोलनात साक्षरतेची एक ताकद होती, तर सुराज्याच्या आंदोलनात डिजिटल साक्षरता एक खूप मोठी महत्वपूर्ण ताकद आहे. आणि म्हणूनच भारत सरकारचा प्रयत्न आहे की भारतातील प्रत्येक गाव, तिथली प्रत्येक पिढी त्यांना डिजिटल साक्षर करण्याच्या दिशेने पावले उचलली जावीत. आज हा जो कार्यक्रम आहे भारताच्या ग्रामीण भागात सहा कोटी कुटुंबे राहतात.  या सहा कोटी कुटुंबांना, कुटुंबातील किमान एका व्यक्तीला डिजिटल साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. वीस तासांचा कार्यक्रम आहे तो शिकवला जातो. ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर बसून त्याला परीक्षा द्यायची असते. आणि तिथून त्याला प्रमाणित केले जाते. आणि अनुभव असा आला आहे कि डिजिटल साक्षरतेसाठी तुम्ही किती शिकलेले आहात, तुमचे वय काय आहे, ते गौण ठरते, ते महत्वाचे नसते.

एक काळ होता, जेव्हा कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान चालायचे. जगात लोक कार्ल मार्क्सच्या विचारांचा उल्लेख करायचे हॅव अँड हॅव नॉट, असे लोक ज्यांच्याकडे आहे आणि असे लोक ज्यांच्याकडे काही नाही. या विभाजनानुसार त्यांनी आपली राजकीय विचारसरणी विकसित केली होती. ते उपयुक्त ठरले कि नाही याबाबत विद्वान लोक चर्चा करतील. आता ते विचार हळू हळू नष्ट होत कुठेही नजरेस पडत नाहीत. नाममात्र फलक लागलेले आहेत. मात्र तंत्रज्ञानाबाबत भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपणा सर्वांना सतर्क राहून प्रयत्न करावे लागतील जेणेकरून देशात डिजिटल दरी निर्माण होऊ नये. काही लोक डिजिटल तंत्रज्ञानात कुशल असतील आणि काही जण पूर्णपणे अज्ञानी असतील तर आगामी युगात ज्या प्रकारे बदल नजरेस पडत आहे, हि डिजिटल दरी सामाजिक व्यवस्थेसाठी खूप मोठे संकट निर्माण करू शकते. आणि म्हणूनच सामाजिक समरसतेसाठी विकासाच्या मूलभूत बाबी अंतर्निहित करून या डिजिटल दरीपासून मुक्ती मिळवण्याच्या दिशेने ग्रामीण भारतात डिजिटल साक्षरतेचे अभियान सुरु केले. आपल्याला माहित आहे घरात कितीही चांगला टीव्ही आला, रिमोटने चालणारा असेल. सुरुवातीला सर्वाना वाटते काय आहे. मात्र घरात जेव्हा दोन-तीन वर्षांचा मुलगा स्वतः हवे ते चॅनेल बदलतो, व्हीसीआर चालू करतो, बंद कधी करायचा, चालू कसा करायचा शिकून घेतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना देखील वाटायला लागते कि आपल्याला देखील शिकायला हवे. आणि मग ते देखील चालू करणे बंद करणे शिकतात. व्हाट्सअँप कसे फॉरवर्ड करायचे याची वर्गशाळा कुणी पाहिली आहे का? व्हाट्सअँप फॉरवर्ड करण्यासाठी भारतात कुठली संस्था आहे का? मात्र तुम्ही पाहत आहात लोकांना व्हाट्सअँप फॉरवर्ड आले  कि नाही . सांगायचे तात्पर्य हे कि जर वापरण्यास सुलभ तंत्रज्ञानाच्या मार्गाने जर आपण गेलो तर आपण सहजपणे डिजिटल साक्षरतेच्या दिशेने देशाला घेऊन जाऊ. डिजिटल साक्षरता, डिजिटल तंत्रज्ञान, डिजिटल भारत एका सुशासनाची हमी आहेत. पारदर्शकतेची हमी आहेत.

भारत सरकारने जेएएम ट्रिनिटीच्या माध्यमातून विकासाची एक कल्पना आखली आहे. जेएएम जे-जनधन खाते, ए-आधार, एम-मोबाईल फोन या तिघांना जोडून सामान्य माणसाच्या गरजेनुसार सरकार त्याच्या मोबाईलवर उपलब्ध असेल अशा प्रकारे आमच्या विकास प्रवासाची पावले चालत आहेत. देशात एक खूप मोठे अभियान सुरु आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्क खूप वेगाने लाखो गावांमध्ये पोहचवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. आणि आज सुदूर भागातील आमच्या भावी पिढीला आमच्या गरीब मुलांना चांगले शिक्षण दूरशिक्षण डिजिटलच्या माध्यमातून देणे शक्य झाले आहे. आणि जसजसे ऑप्टिकल फायबर नेटवर्क भारतातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल, त्या गावातील शिक्षणात, त्या गावातील आरोग्य व्यवस्थेत, त्या गावातील सरकारच्या जनसुविधा सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडणार आहे. आणि ती रचना घेऊन आम्ही चालत आहोत. त्याचाच भाग आहे की, आज देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले समाज सेवा केंद्राचे लोक ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. आणि काहीजण घेणार आहेत आणि आगामी काळात सहा कोटी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे शिक्षण दिले जाईल, ते त्याच्या उदरनिर्वाहाचे एक साधन बनणार आहे. कारण आता सेवा त्याच्या मार्फत होत आहेत. आणि त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायला हवेत. कधी-कधी असा अनुभव येतो, खूप लोक तुम्ही पाहिले असतील, चांगल्यातील चांगल्या मोबाईलचे जर मॉडेल आले, टीव्हीवर जाहिरात पाहिली, वर्तमानपत्रात मासिकात वाचले किंवा गुगल गुरूने सांगितले , तर सर्वप्रथम तो काम करतो तो मोबाईल विकत घेण्याचे. तुम्हाला ८० टक्के लोक असे आढळतील ज्यांच्या मोबाइलमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, मात्र त्याला त्या माहित नाहीत किंवा त्यांचा वापर करण्याची सवय नाही. बहुधा इथे आयआयटीमध्ये देखील काही लोक भेटतील ज्यांना पूर्णपणे मोबाईल उपयोग करण्याची सवय नसेल  चांगल्यातील चांगल्या मोबाईलचे मॉडेल बाळगत असतील आणि म्हणूनच जर डिजिटल साक्षरता असेल तर जो खर्च आपण केला आहे त्याचा सर्वाधिक वापर करू शकू. आणि आपण एक प्रकारे मूल्यवर्धन करू शकतो. आणि म्हणूनच हे डिजिटल साक्षरतेचे, डिजिटल भारताचे अभियान सुरु केले आहे. कमी रोकड समाज निर्माण करण्यात देखील हे डिजिटल साक्षरतेचे काम खूप मोठी भूमिका पार पाडेल.

भारत सरकारने जे भीम ऍप बनवले आहे, जगभरातील देशांना आश्चर्य वाटत आहे. आपल्याकडे भारतात आधार डिजिटली बायोमेट्रिक सिस्टिमच्या माध्यमातून जो माहितीचा साठा आहे त्याबाबत जगाला आश्चर्य वाटत आहे. ती संलग्न करून आपण विकासाला सक्षमीकरणाला जोडण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहोत. आणि मला वाटते त्याचा एक खूप मोठा उपयोग होणार आहे. आज माझ्यासाठी सौभाग्याचा विषय आहे कि आज इथे आयआयटीच्या नव्या संकुलाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. जर निवडणुकांचे दिवस असते आणि मी त्यावेळी ही जमीन देण्याचा निर्णय घेतला असता.. सुमारे ४०० एकर जमीन आणि ती देखील गांधीनगरमध्ये आणि तीही साबरमती नदीच्या किनाऱ्यावरील हि जमीन किती महाग असेल त्याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. आणि ज्या दिवशी ही ४०० एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जर निवडणुका असत्या तर काही जण तुटून पडले असते. जसे सध्या बुलेट ट्रेन विरोधात बोलत आहेत. त्यावेळीही बोलले असते की मोदी, अहो, गुजरातमधील गावात प्राथमिक शिक्षणाची जी इमारत आहे ती मोडकळीला आली आहे, आणि तुम्ही आयआयटी बांधण्यात पैसे खर्च करत आहात. नक्की टीका केली असती. मात्र बरे झाले, ज्यावेळी मी जमिनीचा निर्णय घेतला त्यावेळी निवडणुकांचे वातावरण नव्हते. मात्र आता तुम्हाला समजले असेल कि हा किती दूरदृष्टीने घेतलेला निर्णय होता. आणि मी त्यावेळी म्हटले होते कि सुधीर जैन आणि आमच्या विभागातील लोकांना आठवत असेल, मी म्हटले होते आयआयटी हा एक ब्रँड आहे. भारतात आयआयटी हा एक ब्रँड बनला आहे. मात्र आयआयटीमध्ये कॅम्पस ब्रँड जास्त ताकदवान मानला जाईल. कोणत्या आयआयटीचे कॅम्पस कसे आहे हा आगामी काळात चर्चेचा विषय असेल. आणि म्हणूनच मी म्हटले होते कि मला गुजरातमध्ये असे कॅम्पस हवे जे भारतातील अव्वल आयआयटी कॅम्पस मध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाईल. आणि आज मला ते पाहून आनंद झाला कि कॅम्पस भारतातील प्रमुख आयआयटीच्या बरोबरीने आज उभे ठाकले आहे. कॅम्पसची स्वतःची एक ताकद असते. दुसरी ताकद असते फॅकल्टी अर्थात विषय शिकवणारे. मला आनंद झाला आहे , मला सांगण्यात आले आहे की आज गांधीनगर आयआयटीमध्ये ७५ टक्के फॅकल्टी असे आहेत जे परदेशात प्रशिक्षण घेऊन आले आहेत, तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आपला वेळ ,शक्ती या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र भारत सरकारने देशातील शिक्षण संस्थांना आव्हान दिले आहे. माझी इच्छा आहे कि आयआयटी गांधीनगरने या आव्हानासाठी मैदानात उतरावे. याल , काय झाले सगळ्या आयआयटीअन्सना, आवाज तर तिथून येतो आहे. प्रथमच भारतात शिक्षण संस्था क्षेत्रात अशी क्रांती झाली आहे. ज्याची वर्षानुवर्षे अपेक्षा होती मात्र कुणी हिम्मत करत नव्हते. 

आज जगातील ५० अव्वल विद्यापीठांमध्ये, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांनंतरही या ५० अव्वल विद्यापीठांमध्ये आपण कुठेच दिसत नाही. हा कलंक मिटायला हवा कि नको मिटायला.. २०२२ भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना आपण आपल्या विद्यापीठांना त्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकू का जेणेकरून आपण देखील जगाला  सांगू शकू कि आम्ही देखील काही कमी नाही. करू शकतो कि नाही करू शकत. भारत सरकारने पहिल्यांदाच निर्णय घेतला आहे कि दहा खासगी विद्यापीठे आणि दहा सरकारी विद्यापीठे, आव्हान मार्गाने त्यांची निवड केली जाईल. अंदाजे एक हजार कोटी रुपये खर्च केले जातील. आणि जी अशी दहा विद्यापीठे आहेत, दहा खासगी आणि दहा सरकारी विद्यापीठे, ती आव्हान मार्गे जिंकता जिंकता वर येतील आणि जागतिक दर्जा प्राप्त करतील, तर आज भारत सरकारचे आणि राज्य सरकारांचे जितके नियम आहेत त्या नियमांतून त्यांना मुक्त करून तेच त्यांचे जग, तोच त्यांचा देश, त्यांनी सामर्थ्य दाखवावे आणि काही करून दाखवावे एवढे स्वातंत्र्य त्यांना दिले जाईल. अभ्यासक्रम,कॅम्पस, फॅकल्टीमध्ये खर्च करण्याबाबत त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा, सरकार हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हाला साध्य करून दाखवावे लागेल. या २० विद्यापीठांसाठी सरकार एक हजार कोटी रुपये खर्च करायला तयार झाले आहे. गांधीनगर आयआयटीकडे एव्हढा  मोठा  ४०० एकरचा कॅम्पस आहे, १७०० कोटी रुपये खर्चून संपूर्ण यंत्रणा उभारलेली आहे. मला खात्री आहे कि सुधीर जैन आणि त्यांची टीम आणि हे आमचे सगळे तरुण यांनी एकत्र येऊन विडा उचलावा आणि पुढे यावे. कोणत्याही देशात विकास करण्यासाठी वेळोवेळी आपण जितक्या संस्था निर्माण करू ते आवश्यक आहे. गुजरात यासाठी अभिमान बाळगू शकतो. गेल्या दहा वर्षात गुजरातने जागतिक दर्जाच्या संस्था देशाला दिल्या आहेत. आजही जगात कुठेही न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ नाही. जगात कुठेही नाही. केवळ गुजरातमध्ये आहे. त्याचे  स्वतःचे  न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ आहे. जगातील एकमेव विद्यापीठ आहे. आजही भारतात भारतीय शिक्षक शिक्षण संस्था आयआयटीई सारखे कोणतेही विद्यापीठ नाही जे सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षक तयार करेल. शिक्षण क्षेत्रात त्यांनी पदवी संपादन करावी, पदव्युत्तर शिक्षण घ्यावे. आणि सर्वोत्कृष्ट शिक्षक तिथे घडावेत. गुजरात देशातील पहिले राज्य आहे, ज्याने भारतीय शिक्षक शिक्षण संस्था सारखे एक विद्यापीठ उभारले आहे. गुजरात पहिले राज्य आहे, ज्याने लहान मुलांचे विद्यापीठ स्थापन केले आहे. जगात कुठेही लहान मुलांचे विद्यापीठ नाही. आज छोट्या कुटुंबाच्या दिशेने जग पुढे जात आहे. आई देखील आपल्या कामात व्यस्त आहे, वडील देखील कामात व्यस्त आहेत. घरी काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या भरवशावर मुलांना सोडून दिले जात आहे. काळाची गरज आहे कि आपण अशी संस्थात्मक व्यवस्था उभारायला हवी, जिथे आपल्या लहान मुलांचा योग्य विकास होईल त्यांचे योग्य संगोपन होईल. त्यांचा विकास, एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी जो पाया मजबूत असायला हवा तो लहानपणीच व्हावा. आणि यासाठी संशोधनाचे कार्य या मुलांच्या विद्यापीठाने करावे. मुलांची खेळणी कशी असावी, मुले ज्या खोलीत असतात तिच्या भिंतींना रंग कुठला असायला हवा, मुलांना कुठल्या प्रकारची गाणी ऐकवायला हवीत, मुलांचा पोषक आहार कसा असायला हवा, मुलांसाठी अभ्यासाचे आधुनिक तंत्रज्ञान कसे असायला हवे जेणेकरून ते सहज हातात धरू शकतील या सर्व बाबींचे  संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

यापूर्वी एकत्र कुटुंब  पद्धती होती.  कुटुंब हेच एक विद्यापीठ असे. लहान मुले एखादी गोष्ट आजीकडून, दुसरी एखादी आजोबांकडून तर तिसरी गोष्ट काकांकडून शिकत  असे. आईकडून एक तर आत्याकडून एक गोष्ट शिकत असे. आज कुटूंबे लहान असतात त्यामुळे आपोआप होणाऱ्या या शिक्षणाचा मार्ग बंद झाला आहे. त्यातून हा विचार आला की जगात भावी पिढ्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी,त्यातून बाल विद्यापीठांची कल्पना प्रत्यक्षात अवतरली. जे या गुजरातच्या धर्तीवर निर्माण झाले.गुन्हेगारी विश्वात तीन महत्वाची क्षेत्रे आहेत. विधी शाखा, दुसरी पोलीस आणि तिसरी गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी, न्यायवैद्यक. गुजरातने या तिन्ही शाखांवर काम केले. राष्ट्रीय विधी विद्यापीठ निर्माण केले. ज्यातून उत्तमोत्तम वकील घडतील. उत्तम न्यायाधीश तयार होतील  आणि न्यायविषयक धुरा सांभाळतील. पोलीस अकादमी विद्यापीठ निर्माण केले, हिंदुस्तानमध्येपोलीस घडवणारी जी मोजकी विद्यापीठे आहेत त्यांच्यापैकी एक गुजरात आहे.गुजरात  हे देशातले दुसरे राज्य होते ज्याने हे पोलीस विद्यापीठ स्थापन केले. संरक्षण शक्ती विद्यापीठ जिथून लष्कराच्या तिन्ही दलापैकी कोणत्याही दलात जायचे असेल तर  दहावी, बारावी नंतर त्याला ज्या  शाखेत जायचे असेल सारे शिक्षण  तिथेच  पूर्ण होईल.संवाद कौशल्य, गर्दीचे व्यवस्थापन, गर्दीचे मानसशास्त्र व्यवस्थापन, त्याला अवगत होईल. भारतीय दंड संहितेच्या कलमांची त्याला माहिती होईल. हे शिक्षण घेऊन पोलिसात भरती होता येईल. भारताच्या सुरक्षा क्षेत्रात दर्जात्मक परिवर्तन घडवण्यासाठी गुजरातने हा पुढाकार घेतला आहे.न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ, आजकालच्या साऱ्या गुन्हेगारी घटना आपण पाहत असालच.तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगार पकडले जात आहेत. न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठातून विद्यार्थी तयार होतील. सायबर गुन्हेगारी असो,दुसरा कुठलाही गुन्हा असो, त्यापासून रक्षण करण्यासाठी, गुन्हेगार शोधण्यासाठी, त्याला सजा देण्यासाठी न्यायवैद्यक जगत सर्वात मोठी भूमिका निभावणार आहे. अशा तिन्ही शाखा गुजरातच्या भूमीवर एकत्र विकसित करण्यात आल्या आहेत, ज्या आगामी काळात हिंदुस्तानसाठी मोठे योगदान देणार आहेत. आज मी आयआयटीयन्स समवेत आहे. आपला बराच वेळ प्रयोगशाळेत जातो हे मी जाणतो. आपण काही ना काही नाविन्यपूर्ण करत असता. मात्र जास्त करून परीक्षा केंद्री कल्पकता, परीक्षा केंद्री प्रकल्प, माझ्या देशाचा युवा केवळ यातच अडकून पडावा असे मला वाटत नाही. आपण नावीन्य, कल्पकतेवर भर द्यायला हवा, ही काळाची गरज आहे.

भारत सरकारने नीती आयोगामध्ये, ए आय एम नावाची संस्था विकसित केली आहे. अटल इनोव्हेशन मिशन, ए आय एम, ज्याद्वारे आव्हानात्मक मार्गाने निवड झालेल्या शाळांमध्ये  प्रयोगशाळांसाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी, निधी दिला जातो.पाचवी, सातवी,आठवी, दहावी आणि बारावीतल्या मुलांना नाविन्याचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. हिंदुस्तानचे भाग्य बदलण्यासाठी, आपल्या जवळ जी नैसर्गिक प्रतिभा आहे, त्या प्रतिभेला आपण कल्पकतेकडे वळवले पाहिजे.ज्या देशात माहिती तंत्रज्ञानातले महारथी आहेत मात्र गुगलची निर्मिती दुसऱ्या कोणत्यातरी देशात व्हावी, ज्या देशात माहिती तंत्रज्ञानातले महारथी आहेत मात्र फेसबुक दुसऱ्याच  देशात तयार व्हावे, ज्या देशात माहिती तंत्रज्ञानातले महारथी आहेत मात्र यु ट्यूब दुसरीकडे तयार व्हावे. माझी इच्छा आहे, मी देशाच्या युवा वर्गाला आव्हान देतो, दुनियेचे भाग्य बदलण्यासाठी, भारताचे भाग्य घडवण्यासाठी, नावीन्यतेची कास धरा. बुद्धी कोणा एकाची मक्तेदारी असते असे नाही. एकदा गोडी लागली की आपण पण नव्या गोष्टींचा शोध नक्कीच घ्याल. देश आणि जगाला बरेच काही देऊन जाल. मात्र कधी कधी आपल्याला नावीन्यतेचा ध्यास लागतो. उत्तम नाविन्याची दुसरी आणखी  एक पद्धत आहे. आपल्याला आज मी मार्गदर्शन करू इच्छितो आणि मला आशा आहे की आपण यावर नक्कीच विचार कराल. आपण अभ्यासक्रमात सर्किट विषयी अभ्यास केला असेल. आपण मूलभूत संरचनात्मक अभियांत्रिकीचा नक्कीच अभ्यास केला असाल. त्यावर आधारित नावीन्यतेचा शोध घेण्याची एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे आपण आपल्या आजूबाजूला समस्यांकडे पाहता, अडचणींकडे पाहता आणि विचार करता, की मी यावर  तोडगा देऊ शकतो काय ? एखाद्या व्यक्तीला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मी आयआयटीयन्स आहे, मी काही केले तर त्याच्या आयुष्यात बदल घडेल आणि तोच नाविन्यपूर्ण तोडगा ठरेल. तोही कधी कधी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.ते एक मोठे व्यापार मॉडेल ठरू शकते. आपल्या देशात अशा अनेक समस्या आहेत. आता जसे स्वच्छता अभियान सुरु आहे. नावीन्यतेचा ध्यास घेतलेले माझे युवा, कचऱ्यातून अर्थार्जन करण्यासाठी कल्पक नवे नवे प्रकल्प का नाही करू शकत? आज सौर उर्जेवर काम सुरु आहे.

 आज सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, आपल्या उपयोगी पडत आहे.भारताच्या स्वभावधर्माला अनुसरून आपण अशी कोणती नाविन्यता आणू शकतो ज्यामुळे प्रत्येक घरात सहजपणे वीज पोहोचवू शकू. भारतात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत आपण त्याचा वापर करून स्वयंपाकासाठीच्या खर्चातून प्रत्येक कुटुंबाला मुक्त करू शकतो का, सौर उर्जेवर चालणारी उपकरणे आपण का नाही बनवू शकत, त्याच्यावरच स्वयंपाक होईल, ना त्यासाठी स्वयंपाकाचा गॅस लागेल ना चूल पेटवावी लागेल.स्वतःचाच सौर ऊर्जा प्रकल्प असेल, छतावर दोन सौर पॅनल लावलेली असतील. घरासाठी आवश्यक स्वयंपाक त्यावर होईल. गरीब घराचा, मध्यम वर्गाचा, स्वयंपाकासाठी होणाऱ्या इंधनाच्या खर्चात कपात होईल की नाही छोट्या-छोट्या गोष्टी आपण पाहतो आहोत. त्यातच नाविन्यता, कल्पकता आपण का आणू शकत  नाही त्यावर तोडगा का काढू शकत नाहीमला विश्वास आहे की गांधीनगर एक संस्कृती विकसित करेल, नावीन्यतेची एक संस्कृती विकसित करेल. ही संस्कृती गरजेवर आधारित हवी. केवळ ज्ञानाधारित नव्हे तर गरजेवर आधारित असेल तर ती नाविन्यता टिकून राहते. त्यासाठी व्यापारविषयक संधी मिळते. अनेक मोठ्या कंपन्या याच्या खरेदीसाठी पुढे येतात. म्हणूनच मला वाटते की आयआयटीयन्सनी या दिशेने काम करावे.

आय आय टी युवकांना मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. हिंदुस्तानमध्ये कदाचित गुजरात पहिलेच राज्य असेल ज्यामध्ये आय क्रिएट नावाची एक संस्था निर्माण करण्यात आलेली आहे.फारच कमी लोकांनी हे नाव ऐकले असेल.माझ्या अंदाजाने या संस्थेला साधारणतः तीन-चार वर्षे झाली असतील.अजून त्या भवनाचे लोकार्पण बाकी आहे.मला वेळ देता येऊ शकत नाही. मात्र नक्कीच वेळ देईन. राज्यातल्या, देशातल्या ज्यांना-ज्यांना नावीन्यतेमध्ये, कल्पकतेमध्ये रुची आहे त्यांना पोषक वातावरण देण्याचे काम  ही संस्था करते. तिथे राहण्याची व्यवस्था आहे, प्रयोगशाळा आहे, आपल्या कल्पनांना, सरकार संधी द्यायला सज्ज आहे. आपण असे नाविन्यपूर्ण शोध घ्या ज्यामुळे भारताच्या नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सुलभपणे व्यवस्था विकसित करता येईल. आय क्रिएट हिंदुस्तानमध्ये अशी एक संस्था आहे, जगभरातल्या  उत्तम उत्तम शोध घेणाऱ्या संस्थांशी या संस्थेचे सहकार्य आहे. मी अशी माहिती आपल्याला देत आहे जी साधारणतः वर्तमानपत्राच्या ठळक चर्चेत राहणारी नाही. मात्र देशाचे भविष्य घडवणाऱ्या युवा पिढीसाठी महत्वपूर्ण आहे. म्हणूनच मित्रहो मी आपल्याकडून अपेक्षा करतो की, 2022 , भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे. आपल्याकडे पाच वर्षे आहेत.

1942 मध्ये महात्मा गांधीजींनी म्हटले होते, हिंद छोडो, म्हणजेच भारत छोडो. पाच वर्षात देशात या आंदोलनाने असा जोर पकडला की इंग्रजांना देशातून गाशा गुंडाळावा लागला. माझ्या देशबंधूंनो, देशातून गरिबी हद्दपार झाली पाहिजे, देशातून जातीयवादाचे उच्चाटन झाले पाहिजे, देशातून भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे यासाठी आपणही पाच वर्षात यासाठी प्रयत्न करुन उभे राहिलात तर देशात हे सर्व घडू शकते. मित्रहो, या, खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करुया. हे सर्व घडवण्याचा संकल्प करुन निघालो आहोत.

आय आय टी च्या युवकांना मी आणखीही एक गोष्ट सांगू इच्छितो. दीक्षांत समारंभाच्या वेळी आपल्याला अनेक सल्ले दिले जात असतील,अनेक गोष्टी सांगितल्या जात असतील. इतक्या भव्य भवनात आपण रहात आहात. भव्य भवनात शिक्षण घेत आहात. हे त्यामुळे शक्य झाले आहे का, की आपल्यापाशी कुशाग्र बुद्दीमत्ता आहे, हे त्यामुळे शक्य झाले आहे का, की आपल्या आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती संपन्न होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला इथवर आणले आहे. हे सर्व खरे असले तरी माझ्या युवा मित्रांनो, आपण या भव्य परिसरात यामुळे आहात, की इतके उत्तमोत्तम शिक्षण घेण्याचे भाग्य आपल्याला मिळाले कारण कोणत्या ना कोणत्या गरिबाने त्यासाठी योगदान दिले आहे.एखाद्या गरिबाच्या हक्काचे आपल्याला मिळाले आहे. ही जमीन विकून सरकारने त्या पैशातून गावात प्राथमिक शिक्षणासाठी इमारत उभी केली असती तर किती इमारती उभ्या राहिल्या असत्या. पी एस ई केंद्र बनवली असती तर किती केंद्रे बनली असती. मात्र देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ही चारशे एकर भूमी, माझ्या देशाच्या भविष्यासाठी उपयोगात आणली गेली आहे. समाजातल्या एका गरीब वर्गाने आपल्यासाठी काही त्यागले आहे तेव्हा आपल्याला ते मिळाले आहे. हा भाव मनात जागृत ठेवला तर आयआयटीयन्स असूनही समाजाप्रती असलेली संवेदनशीलता कधी कमी होणार नाही. समाजासाठी  उपयुक्त काहीतरी  करण्याच्या निश्चयात उणीव राहणार नाही. जगेन तर माझ्या देशाच्या सर्व सामान्य  जनतेसाठी जगेन,त्यांच्यासाठी आयुष्य कारणी लावेन,काही करायचे असेल तर माझ्या देशाच्या सर्व सामान्य  जनतेसाठी करेन हा भाव बाळगण्याचा  संकल्प, या नव्या भवनाच्या लोकार्पण प्रसंगी  आपण कराल, या अपेक्षेसह आपण सर्वांना माझ्या खूप  - खूप शुभेच्छा. अनेक- अनेक धन्यवाद.

 
PIB Release/DL/1622
बीजी -काणे -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau