This Site Content Administered by
पंतप्रधान

नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयएआरआय, नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण,११ ऑक्टोबर २०१७

नवी दिल्ली, 11-10-2017

आज लोकनायक जयप्रकाश यांची जयंती आहे आणि आजच लोकनायक जयप्रकाश यांचे स्नेही नानाजी देशमुख यांची जन्मशताब्दी देखील साजरी केली जात आहे.या दोन्ही महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यकाळात एक असा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्यामध्ये वाहून घेतले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा एक एक क्षण मातृभूमीसाठी, देशवासियांच्या कल्याणासाठी तसेच आपल्या संकल्प सिद्धीसाठी खर्ची केला. स्वातंत्र्य चळवळीत लोकनायक जयप्रकाश हे युवकांचे प्रेरणास्थान होते. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन आपल्या चरण सीमेवर पोहोचले होते. महात्मा गांधी, सरदार पटेलसह सर्व राष्ट्रपुरुषांना ब्रिटीश सरकारने कारागृहात बंदी केले होते आणि अशावेळी जयप्रकाशजी, लोहीयाजी, यासारख्या युवकांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यावेळच्या युवापिढीसाठी हे सर्व प्रेरणादायी ठरले. स्वातंत्र्याच्या त्या कालखंडात युवापिढीच्या मनात ते प्रेरणास्थान बनले होते परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर खूप मोठे मोठे लोक सत्तेमध्ये आपल्यासाठी स्थान शोधताना दिसत होते. परंतु जयप्रकाश नारायण यांनी स्वतःला सत्तेच्या राजकारणापासून दूर ठेवले आणि स्वातंत्र्यानंतर जयप्रकाशजी आणि त्यांची पत्नी श्रीमती प्रभादेवी यांनी ग्रामोत्थानाचा, लोककल्याणाचा मार्ग निवडला.

नानाजी देशमख, यांचा देशाला जास्त परिचय नव्हता. देशासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले, परंतु जयप्रकाशजी जेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढत होते, आणीबाणीच्याआधी जयप्रकाशजी यांनी पुन्हा एकदा देशात फोफावत असलेला भ्रष्टाचार, उच्च पदांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराने दुःखी झलेल्या विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले होते. गुजरातच्या युवक आंदोलनापासून प्रेरणा घेवून जयप्रकाशजी पुन्हा एकदा मैदानात उतरले आणि जयप्रकाशजींच्या पुनरागमनानंतर दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली होती. जयप्रकाशजींना थोपवण्यासाठी काय करता येईल यासंबंधी कट रचण्यात येत होते. पटनामध्ये एकदा तर एका सार्वजनिक कार्यक्रमातल्या रॅलीमध्ये जयप्रकाश यांच्यावर खूप मोठा हल्ला करण्यात आला होता. आणि त्यावेळी त्यांचा शेजारी नानाजी देशमुख उभे होते. जयप्रकाशजी यांच्यावरील तो मृत्यूचा प्रहार नानाजींनी आपल्या हातावर झेलला होता. त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली त्यांची हाडे तुटली, परंतु त्यांनी जयप्रकाशजींना त्या हल्ल्यापासून वाचवले; या एकाच घटनेमुळे सर्व देशाचे लक्ष नानाजी देशमुख यांच्याकडे गेले. नानाजी देशमुखांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले. त्यांनी अशी जोडपी तयार केली, ज्यांना दीनदयाळ संशोधन संस्थेच्या तरुणांना देशासाठी जगायला, देशासाठी काहीतरी विधायक करण्याचा मंत्र दिला. या मंत्रासोबत तरुण जोडप्यांना त्यांनी आमंत्रित केले. शेकडो तरुण जोडपी यासाठी पुढे आली आणि या जोडप्यांना त्यांनी ग्रामविकासाचे कार्य सोपिवले. जेव्हा मोरारजी भाई पंतप्रधान होते, तेव्हा जनता पार्टीचे सरकार होते. नानाजी देशमुख यांना मंत्रिमंडळात आमंत्रित करण्यात आले होते. जयप्रकाशजींच्या पावलावर पाउल टाकत त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी त्यांनी नकार दिला आणि स्वतःला वयाच्या ६०व्या वर्षी राजकारणातून निवृत्त केले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जवळजवळ साधे तीन दशक त्यांनी चित्रकुट इथे आपले जीवन घालवले, गोंडाला आपल्या कार्याचे केंद्रस्थान करून ग्रामीण विकासाचे कार्य केले.

मला आज खूप आनंद होत आहे, नानाजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकार या महापुरुषांच्या स्वप्नांच्या आधारावर आणि महात्मा गांधींनी दाखवलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत, ग्रामीण विकासाच्या दिशेने पुढे पावले टाकत, आपली गावं स्वावलंबी कशी होतील, आपले गावं गरीबीमुक्त कशी होतील, आपले गावं सगळ्या आजारांपासून मुक्त कसे होतील, याचे त्यांनी निरीक्षण केले. अजूनही जातीवादाचे विष आपल्या गावांना उध्वस्त करत आहेत, गावाच्या स्वप्नांची राखरांगोळी करतात, या जातीवादाच्या बेड्यांपासून मुक्त होऊन गावांची समृद्धी व्हावी, सर्वांना एकत्रित पुढे घेऊन जाणाऱ्या गावाची निर्मिती व्हावी आणि सर्व एकत्रित येवून गावाच्या कल्याणाचा संकल्प करावा. अशा गावांच्या विकासासाठी जनभागीदारीतून विकास करण्याच्या दिशेने भारत सरकार अनेक पावले उचलत आहे.

आज मला इथे देशाच्या ग्रामीण जीवनाचा विचार करणारे, ग्रामीण जीवनात योगदान देणारे, ग्रामीण अर्थकारण, ग्रामीण कृषिजीवन यासारख्या विविध विषयांवर ज्यांचे प्रभुत्व आहे,अश्या देशातील तीनशेहून अधिक लोकांनी काल पूर्ण दिवस विविध बैठका केल्या, आधुनिकतेच्या मार्गाने देशाचा विकास कशाप्रकारे केला जाईल, याविषयी विचारविनिमय केला आणि काल संपूर्ण दिवस या अनुभवी लोकांनी जे विचार मंथन केले, त्यातून जे अमृत बाहेर आले त्याचे सादरीकरण इथे थोड्या वेळापूर्वी करण्यात आले. परंतु मी या सर्व  महान लोकांना विश्वासाने सांगतो की, तुम्ही विचारविनिमय करून, मंथन करून जे मुद्दे मांडले आहेत, भारत सरकार नक्कीच त्यावर गंभीरतेने विचार करेल आणि त्यातील ज्या मुद्यांची अंमलबजावणी करणे शक्य त्या मुद्यांचा समावेश भारत सरकारच्या योजनांमध्ये करण्यात येईल. कित्येक वर्षांनंतर इतक्या मोठ्या मंचावर भारताच्या ग्रामीण जीवनावर चिंतन आणि चर्चा झाली आहे. देशातल्या कानाकोपऱ्यातून लोकं आली आहेत. वेगवेगळ्या विभागांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, तिथले स्रोत वेगळे आहेत,तिथल्या गरजा वेगळ्या आहेत. आवड,प्रवृत्ती,प्रकृतीनुसार गावांचा विकास होणे गरजेचे आहे. विकास जर अगदी मुळापासून केला तर तो नक्कीच शाश्वत होईल. गावांवर लादलेल्या गोष्टी अंगीकारण्यासाठी गावांना बराच काळ संघर्ष करावा लागतो आणि बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते की या गोष्टी स्वीकारण्याचे साहस देखील गावांमध्ये येत नाही; आणि त्याचसाठी आमचा हा प्रयत्न आहे की, गावाची जी स्वयं शक्ती आहे, त्यांचे जे सामर्थ्य आहे त्यालाच एकत्र करून विकास मॉडेल तयार केले जाईल जे गावकऱ्यांसाठी अनुकूल असेल, त्यांच्या परिचयाचे असेल. त्यामध्ये थोड्या बदलांची आवश्यकता असते. त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने, आर्थिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या एका समर्थन प्रणालीची गरज असते. त्याला जर आपण पाठिंबा देत राहिलो तर गावं खूप सहजतेने हे सर्व आत्मसाद करतात. गावं त्या विकास यात्रेला उचलून धरतात आणि शाश्वत विकासाची हमी मिळते. तुम्ही जो विचारविनिमय केला आहे तो तुमच्या जमिनीशी असलेल्या अनुभवांच्या आधारे केला आहे आणि अनुभवाच्या आधारे केलेल्या गोष्टी.....मला विश्वास आहे की, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हव्या त्या वेगाने ग्रामीण विकास होणार आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आपल्याला विकास करायचा आहे फक्त एवढीच गोष्ट पुरेशी नाही, आपल्याला चांगला विकास करायचा आहे एवढीही बाब पुरेशी नाही, आपल्याला हे सर्व ठरलेल्या कालवधीत पूर्ण करायचे आहे. आपल्या योजना ह्या लाभार्थ्यांना शंभर टक्के लागू होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. योजना ज्याप्रकारे सुरु केली, ज्या भूमीवर सुरु केली, त्यामध्ये कोणताही भ्रम, फेरफार होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच ही योजना नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो ही परिणाम आधारित असला पाहिजे. आम्ही केवळ इतका निधी खर्च केला असे न सांगता हा निधी या ठराविक कामासाठी खर्च करायचा होता आणि ते उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अशाप्रकारचा जर सर्वसमावेशक प्रयत्न आपण केला आणि नियोजित वेळेत केला तर मला विश्वास आहे की, ७० वर्षात ज्या वेगाने ग्रामीण विकास झाला आहे त्यापेक्षा तो अधिक वेगाने होईल. २०२२ ला स्वातंत्र्याची ७० वर्ष पूर्ण होत आहेत, तेव्हा आपला विकास इतक्या जलद गतीने होईल की, ७० वर्षांपासून स्वप्न बघत असलेली माझा ग्रामीण व्यक्ती, त्याच्या आयुष्यात देखील सकारात्मक बदल घडून येणे शक्य होईल. आज गावातील व्यक्ती देखील शहरासारखे जीवन जगू इच्छिते, ज्या सुविधा शहरात उपलब्ध आहेत त्या गावात देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत. जर शहरात विजेचा लखलखाट असेल तर गाव देखील विजेने उजळून निघाले पाहिजे. जर शहरातील लोकं पाहिजे तेव्हा टिव्ही बघू शकतात तर गावातील लोकं देखील बघू शकली पाहिजेत, जर शहरातील मुले शाळेतल्या प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करू शकतात तर गावातील मुलांना देखील शाळेतल्या प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करण्याची संधी मिळाली पाहिजे. जर शहरातील मुल आधुनिक संगणकाच्या सहाय्याने तांत्रिक शिक्षण घेत असतील तर गावातल्या मुलांना देखील त्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशिक्षित होण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. त्याला देखील तंत्रज्ञानात पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे.

आज शिक्षक गावांमध्ये रहायला तयार नसतात,डॉक्टर रात्री निघून जातात, परंतु शहरात ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, त्या सोयी सुविधा जर ग्रामीण भागात दिल्या जसे की,  नळाला पाणी, ऑप्टिकल फाइबर नेटवर्क, इंटरनेट सुविधा,चोवीस तास विज,स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध असेल.या प्राथमिक सोयी सुविधा जर गावांमध्ये पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो तर दर्जात्मक आयुष्य जगणे शक्य होईल आणि मग त्यानंतर लोकं गावामध्ये रहायला प्रेरित होतील.जर शिक्षक गावात राहतील,डॉक्टर गावात राहतील,सरकारी अधिकारी गावात राहतील,तर ग्रामीण जीवनातील त्यांच्या उपस्थितिमुळे खुप मोठे बदल घडून येतील; आणि म्हणूनच महात्मा गांधीजींनी जे स्वप्न बघितले होते,दीनदयाल उपाध्याय यांनी जे चिंतन केले होते.नानाजी आणि जयप्रकाशजी ज्या विचारांसह संपूर्ण आयुष्य जगले त्याच आदर्शांना पुढे नेत आम्ही ग्रामीण जीवनात बदल घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलत आहोत.

आपल्या देशात स्रोतांच्या अभावामुळे शेवटच्या व्यक्तिपर्यंत आपण पोहोचु शकत नाही.आज सरकारमध्ये आल्यानंतर मी ह्या गोष्टींशी बिल्कुल सहमत नाही.देशातील शेवटच्या टोकापर्यंतच्या व्यक्तिपर्यंत देखील त्याच्या हक्काचे काही पोहचावयाचे असेल तर आपल्याकडे स्रोतांची कमतरता नाही. जी कमतरता आहे ती सुप्रशासनात आहे, सुशासनात नाही. ज्या ज्या राज्यात सुप्रशासन आहे,सरकारी व्यवस्थेला  निर्धारित वेळेत आपले लक्ष्य पूर्ण करण्याची सवय लागली असल्याने तिथे बदल दिसून येत आहेत. तुम्ही मनरेगाच बघा, मनरेगाची एक विशेषता आहे, त्याची स्थापना झाली आहे गावासाठी,गरीब लोकांना रोजगार देण्यासाठी. परंतु अनुभव असा आला आहे की, ज्या राज्यांमध्ये जास्त गरीब आहेत,तिथे मनरेगाचे काम कमी होत आहे,परंतु जिथे सुप्रशासन आहे तिथे राज्य सक्रिय आहे.जास्तीत जास्त योजना तयार करतात,जास्तीत जास्त लोकांना त्यात सहभागी करून घेतात आणि जास्त काम करतात. आणि म्हणूनच ग्रामीण विकासासाठी  सुप्रशासन यावे यासाठी आमचे सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. आज जो DISHA नावाचा डिजिटल डॅशबोर्ड तुमच्या समोर सादर करण्यात आला ते एकप्रकारे सुप्रशासनाच्या दिशेने उचललेले एक महत्वपूर्ण पाउल आहे. ज्यामुळे सर्व गोष्टी मॉनिटर केल्या जातील,निर्धारित वेळेत आढावा घेतला जाईल,जर त्यामध्ये कमतरता असेल तर त्या सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,जर एखाद्या व्यक्तिमध्ये काही कमी असेल तर त्या व्यक्तिमधे सुधारणा केली जाऊ शकेल, परंतु DISHA यासारख्या डॅशबोर्डमुळे अशा प्रकारच्या मॉनिटरिंगच्या व्यवस्थे अंतर्गत देशातल्या सर्व गावांना एकत्रित जोडण्यात येईल. भारत सरकारचे दूसरे उद्दिष्ट आहे, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत आणि आपले जे संसद सदस्य आहेत आणि जिल्हा परिषदा आहेत हे सर्व एकत्रित येवून जर एकसूत्री विकास करण्याला प्राधान्य देतील तर आपल्याला इच्छित परिणाम नक्की मिळतील; आणि याच अनुषंगाने लोकप्रतिनिधींना एकत्रित करण्याचे महत्वपूर्ण काम भारत सरकारने केले आहे. संसद सदस्य जिल्हापरिषदांच्या सदस्यांसोबत बैठक घेवून या सर्व योजनांचा आढावा घेतो. तिथल्या गरजांनुसार प्रधान्यक्रम ठरवला जातो.कोणतीही गोष्ट त्यांच्यावर लादली जात नाही आणि त्यामुळे त्या कार्याला गति देण्याच्या दिशेने खुप मोठे यश मिळते. लोकशाहीचे यश हे केवळ किती लोक मतदान करण्यासाठी येतात यावरून ठरत नाही. पाच वर्षातून एकदा मत देण्यासाठी बाहेर पडणे आणि बटन दाबून परत घरी जाणे,दुर्भाग्याने कित्येक वर्षांपासून आपण लोकशाहिला एवढ्यावरच मर्यादित ठेवले आहे.त्यानंतर जे सरकार निवडून येईल, जी बॉडी निवडून येईल, जी पंचायत निवडून येईल ते पुढील पाच वर्षांसाठी आपले नशीब ठरवतील. मला असे वाटते की, लोकशाहीसाठी इतका मर्यादित विचार योग्य नाही. आपल्या आवडीचे सरकार निवडून देणे हे लोकशाहीतले एक महत्वपूर्ण काम आहे परंतु हे सरकार जेव्हा जनभागीदारीतून चालवले जाईल ते लोकशाहीचे खरे यश आहे. जनभागीदारीतून गावाची विकास यात्रा सुरु राहिल,जनभागीदारीतून शहराची विकास यात्रा सुरु राहिल आणि यासाठीच जनतेसोबत सरकारचा संवाद होणे आवश्यक आहे. जीवनाचा संवाद झाला पाहिजे. वरील पातळीपासून खालच्या पातळी पर्यंत योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे तसेच खालून वरपर्यंत योग्य माहिती गेली पाहिजे. जर ही दुतर्फा देवाणघेवाण योग्य प्रकारे झाली तर योजना, प्रकल्प आणि निधी वाटप योग्य लोकांपर्यंत योग्य प्रकारे होईल आणि म्हणूनच आज एका मोबाईल अँपच्या माध्यमातून, ग्रामीण संवादाच्या माध्यमातून गावातील व्यक्ती आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून योग्य माहिती वरपर्यंत पोहचवू शकतो आणि योग्य मार्गदर्शन थेट शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचवले जाऊ शकते; आणि यामुळे   तिच्यावर तिथे स्थानिक पातळीवर जी सरकारी व्यवस्था कार्यरत आहे  त्याचा देखील दबाव निर्माण होतो कारण मग गावकरी बोलतील की, साहेब तुम्ही सांगताय की ही योजना आहे, परंतु माझ्या मोबाईल मध्ये तर दुसरीच योजना दाखवत आहे, तर मग आपल्या इथे ही योजना अजून का लागू झाली नाही? लोकांना जागरूक करण्याचे एक खूप मोठे काम ह्या मोबाईल अँपने केले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून, जनतेसोबत संवाद वाढवून, त्याच्या गरजा लक्षात घेत कामाची दिशा ठरवून, त्याला गती देण्याचे महत्वपूर्ण काम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

आज देशभरात अनेक ठिकाणी उद्‌घाटन झाले आहे. याचठिकाणी कृषी विभागाच्या फोनेमिक केंद्राच्या एका महत्वपूर्ण प्रकल्पाचे देखील आज उद्‌घाटन झाले. आपल्या देशात कृषी क्षेत्र आणि पशुपालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू आहेत. परंतु यासोबतच आपल्या ग्रामीण क्षेत्रात जे कलाकार आहेत त्यांचे देखील ग्रामीण अर्थकारणात खूप मोठे योगदान आहे आणि यासाठीच मग ते पशुपालन असो, शेती असो, हातमागाचे काम असो, हस्तकलेशी निगडीत आपले लोकं असू देत, या सर्वांना एकत्र करून आपल्या अर्थव्यवस्थेचे खांब मजबूत करण्याच्या दिशेने आम्ही कार्य करत आहोत.२०२२ ला भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील,तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आम्ही एक संकल्प केला असून आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. एकीकडे पिकं घेण्यासाठी शेतकऱ्याचा जो खर्च होतो तो कमी करायचा आहे तर दुसरीकडे त्याचे उत्पादन वाढवायचे आहे. जर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. आपल्याला आधुनिकतेची कास धरायला हवी. पशुपालनात भले जनावरांची संख्या कमी असेल परंतु दुधाचे उत्पादन जास्त झाले पाहिजे. प्रती पशु दुधाचे उत्पादन वाढेल त्या दिशेने जेवढ्या वेगाने पुढे जाऊ तेवढ्याच वेगाने ग्रामीण अर्थ जीवनाचा विकास होईल. आज जगात रासायनिक मेणा ऐवजी मधाच्या मेणाला जास्त मागणी आहे. लोक रासायनिक मेणाचा त्याग करून मधमाशी पासूनचे जे मेण बनते त्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. आपण जर गावांमध्ये मधमाशी पालनाला चालना दिली, वैज्ञानिक पद्धतीने जर मधमाशी पालन सुरु केले तर पशुपालनासोबतच हा जोडधंदा सुरु होईल आणि अतिरिक्त उत्पनाच्या शक्यता वाढतील. आज मधमाशीच्या मेणाची खूप मोठी बाजारपेठ आहे. जगातील खूप मोठी बाजारपेठ काबीज करण्याचे सामर्थ्य भारतात आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आपल्याकडे मत्स्य उद्योग असूदे, आपल्याकडे कुक्कुटपालन असुदे, आपल्याकडे शेती असुदे, त्यातही यासगळ्यासोबत बांबूची शेती केली तर देशात आज जो बांबू आयात केला जातो तो थांबेल; आणि देशातील शेतकरी बांबूपासून इतके उत्पन्न घेऊ शकेल की त्याच्या कुटुंबाला कधी आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. ५ ते १० वर्ष मेहनत करावी लागेल त्यानंतर त्याचे फळ मिळायला सुरुवात होईल. तर अशाप्रकारे एका सर्वसमावेशक एकात्मिक दृष्टीकोनासह ग्रामीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत.आपण काही काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने करतो. याआधी ग्रामीण जीवनासोबत एक घाणीचे साम्राज्य ग्रामीण जीवनाचा एक घटक बनले होते. लोक सहन करत होती,आपल्या नशिबात हेच आहे हे काही जणू त्यांनी मान्यच केले होते; आणि हळूहळू अशी काही जनजागृती झाली की, लोकांमध्ये बदल घडू लागले. हागणदारीमुक्त गावांची, माता भगिनींच्या सन्मानासाठी एक अभियान सुरु करण्यात आले. शौचालय बांधण्याचे एक अभियान सुरु झाले, निर्धारित वेळेत शौचालय बांधण्याचे काम सुरु झाले आणि आज हळूहळू अशी स्थिती निर्माण झाली आहे की, कालपर्यंत आपण ज्याला शौचालय बोलत होतो, भारतात उत्तरप्रदेश सारख्या राज्यांमध्ये त्याला इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. शौचालयावर लिहिले आहे इज्जतघर. खरच माता भगिनींच्या सन्मानासाठी याहून मोठी भेट वस्तू अजून कोणतीच असू शकत नाही. आपल्या माता भगिनींना शौचासाठी उघड्यावर जावे लागावे, सूर्यास्त होईपर्यंत वाट बघायला लागावी आणि सूर्योदय होण्याआधी शौचाला जाऊन यावे लागायचे आणि दिवसभरात कधीच शौचास जाणे शक्य होत नसे तुम्ही विचार करा त्या माता भगिनीला किती त्रास सहन करावा लागत असेल. आपण जोपर्यंत ती पिडा समजून घेत नाही तोपर्यंत देशाला हगणदारीमुक्त करण्याचे आंदोलन यशस्वी होणार नाही आणि म्हणूनच जेव्हा कधी शौचालय बांधण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही त्या माता भगिनींच्या सन्मानाचा विचार करा, त्यांच्या पीडेचा विचार करा तेव्हा तुम्हालाही वाटेल की बाकी सर्व काम सोडून भारत सरकारच्या योजनेंतर्गत मी शौचालय बांधले पाहिजे आणि त्याच्या वापराची सवय लावून घेतली पाहिजे

अडीच लाखांहून अधिक गाव हागणदारीमुक्त झाले आहेत.त्यांनी हे करून दाखवले आहे. मी त्या गावांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी माता भागिनिंच्या सन्मानासाठी एक मोठे पाउल उचलले आहे; आणि माता भगिनिंचा सन्मान करणारे गाव माझ्यासाठी एक पूण्य गाव आहे.मी त्या गावाला प्रणाम करतो.ज्या गावकऱ्यांनी हे महत्वपूर्ण काम केले आहे त्यांना नमन करतो. 

आज गावाला स्वच्छतेची सवय होत आहे. गाव देखील जबाबदारी घेऊ लागला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशात १८ हजार असे गाव आहेत जे अजूनही १८व्या शतकात जगत आहेत. गावात विजेचा खांब नाही की गावकऱ्यांनी अजून कधीही‍ वीज पहिली नाही. आम्ही विडा उचलला, लालकिल्यावरुन सांगितले की एक हजार दिवसांमध्ये १८ हजार गावांना वीजपुरवठा करणार आणि मला आनंद वाटतो की, राज्य सरकारांनी देखील यात सहकार्य केले, भारत सरकारने देखील या कामाला गती दिली आणि आज वेगाने १८ हजार गावांचे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत आहोत, अंदाजे १५ हजार गावांपर्यंत विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. आता गावांमध्ये वीज पोहोचली आहे तर आम्ही तिथेच थांबणार नाही. गाव असो किंवा शहर, घर असो किंवा झोपडी प्रत्येकाच्या घरात आता वीज असलीच पाहिजे हे आता आमचे हे स्वप्न आहे. २४ तास वीज असली पाहिजे हा मोठा संकल्प केला आहे.याआधी विदुयत जोडणी घेण्यासाठी गरीब कुटुंबांना पैसे भरावे लागत होते. आम्ही ही जोडणी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की, एकदा त्यांच्याकडे विज आली की, त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात देखील बदल घडून येतील, मुलांना शिक्षणात मदत होईल. घराचे जीवन बदलेल, २४ तास विज देण्याचा निर्धार केला आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.  भारतातील ग्रामीण जीवन जर बदलायचे असेल तर आपले ग्रामीण लोकं जे उत्पादन घेतात, त्याला शहरात फॅशनेबल पद्धतीने सादर करून त्याचा प्रचार करण्याची गरज आहे. सामान्य व्यक्तीने आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तू जर मोठ्या मोठ्या घरात वापरल्या जाऊ लागल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फायदा होईल. गावातल्या कुंभाराने बनवलेल्या पणत्या जर आपण विकत घेवून त्या दिवाळीत लावल्या तर त्याच पणत्यांमुळे त्याच्या घरात देखील दिवाळी साजरी होईल; आणि आपल्यासाठी हे काही कठीण नाही. आपण शहरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या गरजांना जर ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टीकोनातून बघितल्या तर आपण नक्कीच एक नाविन्य अनभवु शकू. जीवनात एक आनंदाचा भाव देखील येईल आणि म्हणुनच शहर गावासाठी एक बाजारपेठ झाली पाहिजे. फक्त गावातून येणाऱ्या अन्नधान्यासाठी शहरात बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे अस नाही तर गावात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी शहरात बाजारपेठ विकसित झाली पाहिजे. असे झाले तरच माझ्या देशातील कुठलेही गाव आणि गावातील कोणतेही कुटुंब गरीब राहणार नाही; आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जे अन्त्योदयाचे स्वप्न पहिले होते त्याला आपण साकार करू शकू. नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारतर्फे आज एका टपाल तिकिटाचे देखील अनावरण करण्यात आले. मला विश्वास आहे जेव्हा कधी हे टपाल तिकीट लावलेले एखादे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा नक्कीच नानाजीबद्दल तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल. देशासाठी जगायचे एवढेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते. ग्रामीण जीवनात बदल घडवून आणणे, दुसऱ्यासाठी स्वतः जाऊन काहीतरी नवीन करणे. देशात आतापर्यंत जितके राष्ट्रपती होऊन गेले ते सर्व नेहमीच नानाजींच्या कामात सहभागी झाले आहेत. नानाजींच्या कामाची प्रशंसा करतात. नानाजींनी राबवलेले प्रकल्प पाहण्यासाठी स्वतः जायचे आणि नानाजींच्या कामाचे हेच खरे कौशल्य होते. आज नानाजींच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातील ग्रामीण भागातील लोकं आली आहेत. भारत सरकार सह एकत्र येवून सगळ्यांनी ग्रामीण जीवनात बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. २०२२ ला स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली जाणार आहे. मला विश्वास आहे की, प्रत्येक गावकरी देखील आता संकल्प करेल की,  २०२२ पर्यंत मला माझ्या गावाला हे द्यायचे आहे आणि माझा गाव आम्ही सगळे एकत्र येवून देशाला हे देवू. मला विश्वास आहे की, हा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आपण कार्य सुरु केले तर, ग्रामोदयाचे जे स्वप्न घेवून आपण चालत आहोत ते नक्कीच साकार होईल. इथे जे प्रदर्शन लागले आहे मी आता थोड्यावेळापूर्वी ते बघून आलो, जे लोकं आले आहेत त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे, त्यांच्या यशाच्या गाथा त्यांच्याकडे आहेत. मला देखील सारखे वाटत होते, मी सारखा सारखा थांबत होतो. ते सर्व बघत होतो ते सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मन आनंदित होत होते की, गावागावांमध्ये कसे नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रत्येक राज्यात कशाप्रकारे नवनवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. गावांमध्ये तंत्रज्ञानाने कशाप्रकारे आपले स्थान निर्माण केले आहे. या सर्व गोष्टी बघून मन प्रसन्न झाले. मला तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की, तुम्ही कितीही व्यस्त असलात, तुम्हाला इथून जायची कितीही घाई असली तरीही या प्रदर्शनातील प्रत्येक गोष्ट नीट बघा. तुमच्या गावात यापैकी काय लागू होऊ शकेल याचे टिपण काढा. यासाठी कोणाला संपर्क करावा लागेल याची देखील माहिती घ्या. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या गावी जाऊन लागू करू शकता. आपण जेव्हा एखादी गोष्ट प्रत्यक्षात बघतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचे सामर्थ्य कळते आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही २-४ तास काढून तुम्ही हे प्रदर्शन नक्की बघा. प्रत्येक गोष्ट बघा आणि चांगल्या गोष्टींना आपल्या गावी घेऊन जा. मी पुन्हा एकदा नानाजींना प्रणाम करतो, बाबू जयप्रकाशजींना वंदन करतो आणि गावातून आलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना प्रणाम करतो आणि त्यांचे आभार मानतो.

 
PIB Release/DL/1654
बीजी -म्हात्रे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau