This Site Content Administered by
पंतप्रधान

दुसऱ्या आयुर्वेद दिनानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 17-10-2017

इथे उपस्थित सर्व आयुर्वेदप्रेमी आणि मान्यवर व्यक्ती,

धन्वंतरी जयंती आणि आयुर्वेद दिनाच्या तुम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला खूप-खूप शुभेच्छा.

खरे तर दिवाळी साजरी करायला सुरुवात झाली आहे. माझ्या देशबांधवांना तसेच जगभरात विखुरलेल्या भारतीय समुदायाला ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो अशा मी शुभेच्छा देतो.

मला सांगण्यात आले आहे कि देशातील आयुर्वेदिक महाविद्यालये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडण्यात आली आहेत आणि मी त्या सर्वांचे स्वागत करतो. देशातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेसाठीही तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.

धन्वंतरी जयंती आयुर्वेद दिन म्हणून साजरी केल्याबद्दल आणि या संस्थेच्या स्थापनेसाठी मी आयुष मंत्रालयाचेही अभिनंदन करतो.

मित्रांनो, कोणताही देश विकासाचा कितीही प्रयत्न करत असेल मात्र तो जोपर्यंत आपला इतिहास, आपला वारसा याचा अभिमान बाळगणे त्याला समजत नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ शकणार नाही.

मित्रानो, जर आपल्या देशाचा इतिहास आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल कि तो काळ इतका शक्तिशाली होता, इतका समृद्ध होता कि जेव्हा जगातील इतरांनी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना वाटले कि भारताचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांच्याशी लढणे शक्य नाही. म्हणून त्यांनी दुसरा मार्ग अवलंबला. आपल्याकडे जे श्रेष्ठ होते ते उध्वस्त करणे त्यांना अधिक सोपे वाटले.

गुलामीच्या राजवटीत, आपली ऋषी परंपरा, आपले गुरु, शेतकरी, आपले वैज्ञानिक, आपला योगाभ्यास, आपला आयुर्वेद या सर्वांच्या सामर्थ्याची चेष्टा केली गेली, ते कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला आणि इथपर्यंत कि या शक्तीबाबत आपल्याच जनतेमधील आस्था कमी करण्याचा प्रयत्न देखील झाला.

जेव्हा गुलामगिरीपासून मुक्तता मिळाली, तेव्हा एक आशा होती कि जे वाचले आहे, त्याचे संरक्षण करायचे, काळानुरूप बदल करायचा. मात्र याला देखील प्राधान्य दिले गेले नाही. जे होते त्याला त्याच अवस्थेत सोडून देण्यात आले.

गुलामगिरीच्या काळात आपल्या शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि स्वातंत्र्यानंतर एक मोठा काळ असा आला जेव्हा या शक्ती विसरण्याचा प्रयत्न झाला. एक प्रकारे आपल्याच वारशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच कारणांमुळे अशा अनेक माहितीचे स्वामित्व हक्क दुसऱ्या देशांकडे गेले, जे कधी काळी आपण आजीबाईचा बटवा म्हणून घराघरात उपयोग करायचो.

आज मला अभिमान वाटतो आहे कि गेल्या तीन वर्षात या स्थितीत बराच बदल झाला आहे. जो आपला वारसा आहे, जे सर्वोत्तम आहे, त्याबाबतचा आदर जनामनात आढळत आहे.

आज आपण आयुर्वेद दिनानिमीत्त एकत्र जमलो आहोत, किंवा २१ जून रोजी लाखोंच्या संख्येने बाहेर पडून योगदिन साजरा करतो, तेव्हा आपल्या वारसाप्रती हीच भावना असते. जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये त्या दिवशी लाखो लोक योगासने करतात, तेव्हा ती छायाचित्रे पाहताना वाटते कि हो, लाखो लोंकाना जोडणारा हा योग भारताने त्यांना दिला आहे.

बंधू-भगिनींनो, जी योगासने भारताचा वारसा आहेत ती आता विस्तारून संपूर्ण मानव जातीचा वारसा बनत आहेत.

हा बदल केवळ तीन वर्षांमुळे झाला आहे आणि निश्चितपणे यात आयुष मंत्रालयाचे खूप मोठे योगदान आहे.

मित्रानो, आयुर्वेद केवळ एक चिकित्सा पद्धती नाही. याच्या कक्षेत सामाजिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आरोग्य यांसारखे अनेक विषय देखील येतात. हीच गरज ओळखून हे सरकार आयुर्वेद, योग आणि अन्य आयुष पद्धतींच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एकात्मीकरणावर भर देत आहे. आयुषला सरकारने आपल्या चार प्राधान्य क्षेत्रात ठेवले आहे. एक स्वतंत्र मंत्रालय बनवण्याबरोबरच आम्ही राष्ट्रीय आरोग्य धोरण आखताना आरोग्य सेवा आणि आयुष प्रणालीच्या एकात्मिकरणासाठी व्यापक नियम बनवले आहेत, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

मित्रांनो, सरकार असे मानून आणि असा निर्धार करून चालत आहे कि आयुषचे आरोग्य सेवेत एकात्मिकरण पूर्वीप्रमाणे केवळ फायलींपर्यंत मर्यादित राहणार नाही. ते मुळापर्यंत पोहचवले जाईल. या दिशेने आयुष मंत्रालयाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आयुष अभियान सुरु करणे, आरोग्य संरक्षण कार्यक्रम राबवणे, मिशन मधुमेह, आयुष ग्रामची संकल्पना असे अनेक विषय आहेत ज्याबाबत आता इथे श्रीपाद नाईक यांनी चर्चा केली आहे.

मित्रांनो, आयुर्वेदाच्या विस्तारासाठी हे खूप आवश्यक आहे कि देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात याच्यांशी निगडित एक चांगले, सर्व सुविधायुक्त रुग्णालय असावे. या दिशेने आयुष मंत्रालय वेगाने काम करत आहे आणि तीन वर्षातच 65 हून अधिक आयुष रुग्णालये विकसित करण्यात आली आहेत.

आज दिल्लीमध्ये एम्सप्रमाणेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उदघाटन देखील याचाच एक भाग आहे. आता सुरुवातीला इथे दररोज साडेसातशेहून अधिक रुग्ण येत आहेत. आगामी काळात रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. आधुनिक पायाभूत सुविधांनी युक्त अशी ही संस्था आहे. याच्या मदतीने अनेक गंभीर आजारांच्या आयुर्वेदिक उपचारात मदत मिळेल. मला आनंद आहे कि आज आयुर्वेद संस्थेच्या स्थापनेमुळे आयुर्वेदाची विद्या, आयुर्वेदाच्या ज्ञान संपदेला नव्याने बळ मिळाले आहे.

ही देखील खूप आशादायक स्थिती आहे कि ही आयुर्वेदिक संस्था एम्स, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि अन्य काही आंतरराष्ट्रीय संस्थांसह एकत्रितपणे काम करेल. मला आशा आहे कि या मार्गावर चालताना अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आंतर-शाखीय आणि एकात्मिक आरोग्य पद्धतीचे मुख्य केंद्र बनेल.

मित्रांनो, आयुर्वेदाच्या गुणांची मोठी यादी आहे. जगाला आता केवळ निरोगीच राहायचे नाही तर मनःशांती देखील हवी आहे आणि ही गोष्ट त्याला आयुर्वेद आणि योगाद्वारे मिळू शकते. आज जगातील सर्व देशांमध्ये बँक टू नेचर म्हणजेच 'पुन्हा निसर्गाकडे' हे सूत्र लोकप्रिय होत आहे. अशा पद्धतींकडे लोकांचा कल वाढत आहे, जो थेट निसर्गावर आधारित आहे. अशा स्थितीत आयुर्वेदासाठी अनुकूल वातावरण बनणे कठीण नाही. आपल्याला केवळ आजच्या गरजांमध्ये आयुर्वेदाची उपयुक्तता अधिकाधिक वाढवावी लागेल.

आयुर्वेदाशी निगडित तज्ज्ञांनी आयुर्वेदाच्या सेवांचा विस्तार करण्याची आज गरज आहे. त्यांना अशा क्षेत्रांबाबत देखील विचार करावा लागेल ज्यात आयुर्वेद आणखी प्रभावी होऊ शकेल. असेच एक क्षेत्र आहे -क्रीडा. तुम्ही पाहिले असेल कि अलिकडच्या काही वर्षात फिजियोथेरपी करणाऱ्या डॉक्टरांची भूमिका किती वाढली आहे. मोठमोठे खेळाडू आपले वैयक्तिक फिजिओथेरपिस्ट ठेवत आहेत. मोठं-मोठे खेळाडू कळत नकळत वेदनाशामक औषधांच्या फेऱ्यातही फसतात. तुम्हाला मला सर्वाना माहित आहे कि आयुर्वेद आणि  योग आधारित फिजिओथेरपीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित औषधाचे चुकून सेवन होण्याचा कुठलाही धोका राहत नाही.

खेळाप्रमाणेच आपल्या सुरक्षादलासाठी देखील योग आणि आयुर्वेद खूप महत्वपूर्ण आहेत. आपले जवान अतिशय खडतर परिस्थितीत देशाचे संरक्षण करतात. पोस्टिंग कधी पर्वतीय प्रदेशात, कधी वाळवंटात, कधी समुद्रकिनाऱ्यावर, कधी घनदाट जंगलात. वेगेवेगळे ऋतू, वेगवेगळी परिस्थिती. अशात योग आणि आयुर्वेद त्यांना अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवू शकतो. मानसिक तणाव दूर करणे, एकाग्रता वाढवणे, आपल्या जवानांची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात योग आणि आयुर्वेद खूप उपयुक्त ठरू शकतात.

दर्जेदार आयुर्वेदिक शिक्षणावर देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. उलट त्याची व्याप्ती आणखी वाढवायला हवी. पंचकर्म थेरपिस्ट, आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ, पराकृती अनॅलिस्ट , आयुर्वेद फार्मासिस्ट, आयुर्वेदाची संपूर्ण सहाय्यक साखळी देखील विकसित करायला हवी.

याशिवाय, माझी एक सूचना अशीही आहे कि आयुर्वेदिक शिक्षणात शिकवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या स्तराबाबत पुन्हा एकदा विचार व्हायला हवा. जेव्हा एखादा विद्यार्थी बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसीन आणि सर्जरी-बीएएमएसचा अभ्यासक्रम निवडतो, तेव्हा पराकृति, आयुर्वेदिक आहार-विहार, आयुर्वेदिक फार्मासुटिक्लस विषयी शिकतच असतो. पाच-साडेपाच वर्षे शिकल्यानंतर त्याला पदवी मिळते आणि मग तो आपली स्वतःची प्रॅक्टिस किंवा नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करतो.

मित्रानो, बीएएमएस अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करता येईल का जेणेकरून प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण झाल्यांनंतर विद्यार्थ्याला काही ना काही प्रमाणपत्र मिळेल. असे झाल्यास दोन फायदे होतील. ज्या विद्यार्थ्यांना पुढल्या शिक्षणाबरोबरच स्वतःची प्रॅक्टिस सुरु करायची आहे, त्यांना सोयीचे होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण काही कारणामुळे मध्येच थांबले असेल, त्यांच्याकडेही आयुर्वेदाच्या कुठल्या ना कुठल्या स्तरावरचे प्रमाणपत्र असेल. एवढेच नाही, जे विद्यार्थी पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडतील, त्यांच्याकडेही रोजगाराचे अधिक चांगले पर्याय असतील.

आताच थोड्या वेळापूर्वी, श्रीपाद नाईक यांनी स्पॉल्डिंग रिहॅब रुग्णालय आणि हार्वर्ड मेडिकल स्कुल बरोबर सहकार्याचा उल्लेख केला होता. मला हे ऐकून खूप आनंद झाला आहे आणि मी दोन्ही पक्षांचे खूप-खूप अभिनंदन करतो. मला आशा आहे कि या सहकार्यामुळे क्रीडा औषधी, पुनर्वसन औषधी, वेदनाशामक आयुर्वेदिक उपचारांच्या संधी शोधण्यात मदत मिळेल.

बंधू आणि भगिनींनो, मी आता काही वेळापूर्वीच आयुर्वेदाच्या उपचारासाठी मानक मार्गदर्शक तत्वे आणि मानक टर्मिनॉलॉजी पोर्टल सुरु केले. या दोन्ही उपक्रमातून मोठ्या प्रमाणात माहिती गोळा होईल ज्याचा वापर आयुर्वेदाला आधुनिक पद्धतीनुसार वैज्ञानिक मान्यता मिळवून देण्यात केला जाऊ शकेल. मला वाटते कि हा उपक्रम आयुष विज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड सिद्ध होईल.. याच्या सहकार्याने आयुर्वेदाची जागतिक मान्यता देखील वाढेल. 

आयुर्वेदात मानक मार्गदर्शक तत्वे आणि मानक टर्मिनॉलॉजी असणे यासाठी आवश्यक आहे कारण हे नसल्यामुळे ऍलोपॅथीचे जग आणि त्याच्या प्रक्रिया सहजपणे आयुर्वेदावर वरचढ ठरत होत्या. काही वर्षांपूर्वी भारत सरकारच्या एका आयोगाने देखील आपल्या अहवालात स्पष्ट म्हटले होते कि आपल्याकडे आयुर्वेद इतक्या लोकांच्या घरांपासून दूर आहे कारण त्याची पद्धत आजच्या काळानुसार अनुकूल नाही.

एका बाजूला ऍलोपॅथिक औषधे आहेत, जी पटकन उघडली आणि खाल्ली. तर दुसरीकडे आयुर्वेद यासाठी मागे पडत आहे कारण औषधे बनवण्याची आणि खायची प्रक्रिया एवढी मोठी आहे कि सामान्य व्यक्ती विचार करतो, कोण एवढा वेळ फुकट घालवेल. फास्ट फूडच्या या काळात आयुर्वेदिक औषधांच्या जुन्या जमान्यातील वेष्टनाने काम चालायचे नाही. जसजसे आयुर्वेदिक औषधांचे वेष्टन आधुनिक होत जाईल, उपचारांच्या प्रक्रियांचे मानक निश्चित होईल. टर्मिनॉलॉजी सामान्य होईल, तुम्ही बघाल किती वेगाने फरक जाणवायला लागेल.

आजच्या काळात लोकांना तात्काळ परिणाम हवे असतात. तात्काळ परिणाम मिळत असल्यामुळे लोक दुष्परिणामांची पर्वा करत नाहीत. असा विचार करणे चुकीचे आहे मात्र चहूबाजूला तेच आढळते. म्हणूनच आयुर्वेदाच्या जाणकारांनी तात्काळ परिणाम देणाऱ्या आणि दुष्परिणामांपासून वाचविणाऱ्या औषधांवर संशोधन करावे, अशा औषधांबाबत विचार करावा, ती तयार करावीत.

बंधू आणि भगिनींनो, मला सांगण्यात आले आहे कि आयुष मंत्रालयाअंतर्गत ६०० हून अधिक आयुर्वेदिक औषधांची  फार्मसी मानके प्रसिद्ध केली आहेत. याचा जेवढा जास्त प्रचार-प्रसार होईल, तेवढीच आयुर्वेदिक औषधांची बाजारपेठ वाढेल. वनौषधींची आज जगात खूप मोठी बाजारपेठ तयार होत आहे. भारताला यात देखील आपल्या पूर्ण क्षमतांचा वापर करावा लागेल. वनौषधी आणि आयुर्वेदिक औषधी कमाईचे खूप मोठे माध्यम बनत आहेत.

आयुर्वेदात तर अशा अनेक वनस्पतींपासून औषधे बनतात ज्यांना जास्त पाणी लागत नाही आणि सुपीक जमीनही लागत नाही. अनेक वनौषधी तर अशाच उगवतात. मात्र त्या वनौषधींचे खरे महत्व माहित नसल्यामुळे त्यांना रानटी वनस्पती समजून उखडून फेकले जाते. जागरूकतेच्या अभावामुळे होणाऱ्या या नुकसानापासून कसे वाचता येईल यावर देखील विचार करण्याची आवश्यकता आहे.

औषधी वनस्पतींच्या शेतीमुळे रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. आयुष मंत्रालयाने कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने या दिशेने शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी काही अल्पकालीन अभ्यासक्रम देखील विकसित करावेत अशी माझी इच्छा आहे. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकरी जेव्हा शेताच्या कडेच्या  वापरात नसलेल्या जमिनीचा वापर औषधी वनस्पतींसाठी करायला सुरुवात करेल, तेव्हा त्याचे उत्पन्न देखील वाढेल.

बंधू आणि भगिनींनो, या क्षेत्राला विकास आणि विस्तारासाठी अजून बरीच गुंतवणूक होण्याची गरज आहे. सरकारने आरोग्य सेवा प्रणालीत शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात एफडीआयचा फायदा आयुर्वेद आणि योग याना कसा मिळेल याबाबतही प्रयत्न करायला हवेत.

मी देशातील तमाम कंपन्या आणि खासगी क्षेत्राला आवाहन करेन कि ज्याप्रकारे ते ऍलोपॅथिक आधारित मोठ-मोठ्या रुग्णालयांसाठी पुढे येतात, त्याचप्रकारे योग आणि आयुर्वेदासाठीही पुढे यावे. आपल्या कंपनी सामाजिक दायित्व म्हणजेच सीएसआर निधीचा काही भाग आयुर्वेद आणि योगावर देखील खर्च करावा. 

आपल्याला हे देखील लक्षात घ्यावे लागेल कि हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान प्राप्त केले होते, त्यामागे अथक परिश्रम होते, मानवजातीच्या कल्याणाची प्रेरणा होती. काही नवीन प्रयोग करण्याच्या, काही नाविन्यपूर्ण करण्याच्या विचारातूनच योग आणि आयुर्वेद यांसारख्या चमत्कारांना जन्म दिला आहे. मात्र ज्याक्षणी आपण नाविन्यपूर्ण प्रयोगापासून मागे हटलो, परिस्थिती बदलायला लागली, आपला प्रभाव कमी व्हायला लागला.

ही परिस्थिती आता पूर्णपणे पुन्हा बदलण्याची गरज आहे. आज वेळेचीच नाही तर समग्र मानवतेची मागणी आहे कि भारताने आपली परिस्थिती बदलावी. मित्रांनो, आज जग समग्र आरोग्य सेवेचा मार्ग शोधत आहे, मात्र त्याला मार्ग सापडत नाही. ते मोठ्या आशेने भारताच्या आयुर्वेदिक आणि यौगिक शक्तीकडे पाहत आहे. त्यालाही विश्वास वाटत आहे कि योग आणि आयुर्वेदातील भारताचा अनुभव संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी उपयोगी पडू शकतो. म्हणूनच आपल्यासाठी देखील हा महत्वपूर्ण काळ आहे आणि आता एक क्षणही दवडायचा नाही. संकल्प घेऊन पुढे जायचे, ते सिद्ध करायचे.

मित्रांनो, भारताचा  एकम शत विप्रा बहुधा वदंतिविचार सर्व प्रकारच्या औषध प्रणालींना आणि आरोग्य प्रणालींना देखील लागू आहे. आपण सर्व प्रकारच्या आरोग्य प्रणालीचा आदर करतो आणि सर्वांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करतो. भारतात अध्यात्मिक लोकशाहीप्रमाणे उपचार प्रणालींची देखील लोकशाही आहे. सर्वांना आपल्या प्रगतीचा अधिकार आहे, सर्वांचा आदर आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य प्रणाली विकसित करण्यामागे सरकारचे उद्दिष्ट आहे कि गरीबांना स्वस्तात इलाज, सहजपणे उपचार उपलब्ध व्हावेत.

यामुळे आरोग्य क्षेत्रात आम्ही कायम दोन प्रमुख गोष्टींवर भर दिला आहे-एक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि दुसरे म्हणजे आरोग्य क्षेत्रात परवडणारी औषधे आणि सुगम्यता वाढीस लागणे

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर भर देतानाच आम्ही मिशन इंद्रधनुषचा शुभारंभ केला होता जेणेकरून 2020 पर्यंत लसीकरण मोहिमेत सहभागी न झालेल्या सर्व मुलांचे लसीकरण केले जाईल. सरकारने ठरवले कि अशा मुलांचे संपूर्ण लसीकरण करून त्यांना 12 प्रकारच्या आजारांपासून वाचवता येईल. मिशन इंद्रधनुष अंतर्गत आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक मुले आणि सुमारे 70 लाख गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

हा सरकारच्या प्रयत्नांचाच परिणाम आहे कि देशात लसीकरणाचा वेग जो वार्षिक एक टक्क्याने वाढत होता, आम्ही गेल्या तीन वर्षात हे अभियान राबवले आणि आज तो जवळपास साडे सहा टक्क्यांवर पोहोचला आहे. कुठे एक टक्के वाढ आणि कुठे साडेसहा टक्के वाढ. तीच यंत्रणा जर उद्दिष्ट निश्चित करून जोमाने राबवली तर परिणाम दिसून येतो आणि हे परिणाम दिसून येत आहेत. आता याच महिन्यात सरकारने या अभियानावर आणखी लक्ष केंद्रित केले आहे. मिशन इंद्रधनुष अधिक तीव्र करण्यात आले असून या अंतर्गत असे जिल्हे-शहरे- गांवे यावर भर दिला जाणार आहे जिथे लसीकरणाची व्याप्ती मागे आहे, कमी आहे. पुढील एका वर्षात देशातील 173 जिल्ह्यांमध्ये दर महिन्याला आठवड्याचे सात दिवस नियमितपणे लसीकरण अभियान राबवले जाईल, डिसेंबर 2018 पर्यंत देशभरात संपूर्ण लसीकरणाची व्याप्ती साध्य करणे. हे सरकारचे उद्दिष्ट आहे .

मित्रांनो, आधी असा समज होता कि आरोग्य सेवेची जबाबदारी केवळ आरोग्य मंत्रालयाची आहे. मात्र आमचे विचार वेगळे आहेत. इंटेंसिफाईड मिशन इंद्रधनुषमध्ये आता संरक्षण मंत्रालयासह सरकारच्या 12 वेगवेगळ्या मंत्रालयांना आम्ही या अभियानाशी जोडलेले आहे.

बंधू आणि भगिनींनो, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा ,आणखी एक स्वस्त आणि सुरक्षित पद्धत आहे आणि ती आहे स्वच्छता. या सरकारने स्वच्छतेला लोकचळवळीप्रमाणे घरा-घरापर्यंत लोका-लोकांपर्यंत पोहोचवले आहे. सरकारने 3 वर्षात 5 कोटींहून अधिक शौचालयांचे बांधकाम करून घेतले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत लोकांचे विचार कशा प्रकारे बदलले आहेत याचे उदाहरण आहे म्हणजे आता शौचालयांना काही लोकांनी इज्जतघर म्हणायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी युनिसेफचा अहवाल आला आहे. बहुधा तुम्ही वाचला असेल. या अहवालात म्हटले आहे कि जे कुटुंब गावात राहते आणि त्यांनी जर एक शौचालय बांधले, तर युनिसेफचे म्हणणे आहे कि एका कुटुंबाने शौचालय बांधले तर त्याच्या घरी विविध आजारांवर जो वार्षिक 50 हजार रुपये खर्च होतो, तो खर्च वाचेल. तुम्ही विचार करा, एका गरीबाच्या आयुष्यात शौचालय बांधल्यामुळे जर 50 हजार रुपयांची बचत होत असेल, तर त्या गरीबाची किती सेवा होईल.

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्याबरोबरच सरकार आरोग्य क्षेत्रात परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी सेवा पुरवण्यासाठी सुरुवातीपासूनच सर्वांगीण दृष्टिकोन घेऊन चालत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. याचा थेट लाभ आपल्या तरुणांना तर मिळेलच, त्याचबरोबर गरीबांना उपचारासाठी देखील डॉक्टर सहजपणे उपलब्ध होतील. देशभरातील लोकांना उत्तम उपचार आणि आरोग्य उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये नवनवीन एम्स रुग्णालये देखील सुरु करण्यात येत आहेत. स्टेंटच्या किंमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे, आम्हाला माहित आहे कि हृदयात स्टेंट बसवायचा असेल तर कुठे गेलात तर कुणी सांगतात ५० हजार, कुणी सांगते की एक लाख, कुणी सांगते दोन लाख, कुणी सांगते अडीच लाख रुपये. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जर कुणाला हृदयविकार असेल आणि जर त्याला उपचारासाठी जावे लागले, एवढे रुपये, पूर्ण घर गहाण ठेवले तरी त्याला मिळणार नाहीत. सरकारने संबंधितांशी चर्चा केली, त्यांना बोलावले, एवढे महाग का आहे, चर्चा करता-करता आधी जी किंमत होती अंदाजे तीस चाळीस टक्के कमी केली. काही गोष्टी तर तीस टक्के कमी दरात विकणे सुरु झाले. आज बहुतांश वयस्कर लोक ज्येष्ठ नागरिक गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतात, गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या किमतीतही आम्ही कपात केली. जनऔषधि केंद्रांच्या माध्यमातून देखील गरीबांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी रुग्णालयांमध्ये देखील जन औषधी केंद्रे उघडण्यात आली. तीच उत्तम दर्जाची औषधे, जी कधी १२ रुपयांमध्ये मिळायची ती दीड रुपयांत मिळण्याची सोय सरकारने केली आहे.

मित्रानो, मला सांगण्यात आले आहे कि या वर्षी सुमारे २४ देशांमध्ये आपले परदेशातील मिशन देखील आयुर्वेद दिन साजरा करत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून जगभरात माहिती तंत्रज्ञान क्रांती दिसून येत आहे. आता आयुर्वेदाच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्रांती व्हायला हवी. चला, आपण या शुभ दिनी शपथ घेऊया "आम्ही आयुर्वेदाचा अभ्यास करू, आम्ही आयुर्वेद जिवंत ठेवू आणि आम्ही आयुर्वेदासाठी जगू."

मित्रानो तुम्हा सर्वांना आयुर्वेद दिनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या खूप-खूप शुभेच्छांसह मी भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

खूप-खूप धन्यवाद !!!

 
PIB Release/DL/1667
बीजी -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau