This Site Content Administered by
पंतप्रधान

उत्तराखंड येथील केदारनाथ येथे केदारपुरी पुनर्बांधकाम प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 20-10-2017

माझ्या बरोबर संपूर्ण ताकदीनिशी बोला, जय जय केदार !

देवभूमी उत्तराखंडच्या सर्व बंधू-भगिनींना माझा नमस्कार. बाबा केदार यांचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना.

कालच देशभरात आणि जगभरात दीपावलीचा पवित्र सण साजरा करण्यात आला. दीपावलीच्या या पवित्र सणानिमित्त देशातील आणि जगभरातील आमच्या सर्व बंधू-भगिनींना केदारनाथच्या या पवित्र भूमीवरून मी अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

गुजरातसारखी काही राज्ये आहेत जिथे आज नववर्षाला प्रारंभ होत आहे. नूतन वर्ष अभिनंदन, साल मुबारक ! जगभरात विखुरलेली  सर्व कुटुंबे जी आज नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत, त्यांना देखील माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वाना  नूतन वर्ष अभिनंदन, साल मुबारक ! पुन्हा एकदा बाबांनी मला बोलावले आहे. पुन्हा एकदा बाबांच्या चरणी पाय वळले. आज पुन्हा मला जुने लोक भेटले. त्यांनी जे काही माझ्याबद्दल ऐकले आहे, ते आज मला पुन्हा स्मरण करून देत होते.

ही गरुड़ चट्टी, जिथे आयुष्यातील महत्वपूर्ण वर्षे व्यतित करण्याचे सौभाग्य मला लाभले होते. ते क्षण होते जेव्हा या मातीत मी रममाण झालो होतो. मात्र बहुधा बाबांची इच्छा नव्हती की मी त्यांच्या चरणी आयुष्य व्यतित करू आणि बाबांनी मला इथून परत पाठवले. आणि बहुधा बाबांनी ठरवले असेल एक बाबा काय, सव्वाशे कोटी बाबा आहेत देशात, कधी त्यांचीही सेवा करा. आणि आपल्याकडे तर म्हटलेच आहे- लोकसेवा ही ईश्वरसेवा आहे. आणि म्हणूनच आज माझ्यासाठी सव्वाशे कोटी देशबांधवांची सेवा हीच बाबांची सेवा आहे, हीच बद्री विशालची सेवा आहे, हीच मंदाकिनीची सेवा आहे, हीच गंगा मातेची सेवा आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा इथून संकल्प घेऊन, इथून नवी ऊर्जा घेऊन, भोले बाबाचा आशीर्वाद घेऊन पूर्ण पवित्र मनाने, दृढ संकल्पाने २०२२, भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे, प्रत्येक भारतीयाचा संकल्प, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जगात भारताला पोचविण्याचा निश्चय, बाबांच्या आशीर्वादाने प्रत्येक भारतीयामध्ये ती चेतना जागेल. प्रत्येक भारतीय तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

या संकल्पासह, मी सर्वप्रथम या पवित्र भूमीवर नैसर्गिक आपत्तीचे जे शिकार झाले, देशाच्या प्रत्येक राज्यातील कुणी ना कुणी आपला देह इथं त्यागला असेल आणि बाबाच्या भूमीमध्ये तो रममाण झाला असेल, अशा सर्व आत्म्यांना मी आज आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. देशातील सर्व राज्यांचे ते लोक होते. आणि त्यावेळी माझी स्वाभाविक संवेदनशीलता होती. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो, दुसऱ्या कुठल्या राज्यात हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही , आणि मी कधीही असा विचार करू शकत नाही. मात्र मी स्वतःला रोखू शकलो नव्हतो. चांगले केले, वाईट केले हे तर इतिहास ठरवेल. मात्र त्या पीडितांपर्यंत पोहोचणे, माझ्या मनाला मी रोखू शकलो नाही, मी आलो होतो.

आणि त्यावेळी मी तत्कालीन सरकारला विनंती केली की तुम्ही गुजरात सरकारला केदारनाथच्या पुनर्निर्माणाचे काम द्या, जसे देशवासियांचे स्वप्न असेल मी पूर्ण करेन..जेव्हा आम्ही खोलीत बसलो होतो, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सहमत झाले, सगळे अधिकारी सहमत झाले, ते म्हणाले ठीक आहे, मोदीजी, जर गुजरात जबाबदारी घेत असेल आणि मी आनंदाने बाहेर येऊन प्रसारमाध्यमांसमोर माझा संकल्प बोलून दाखवला होता. अचानक टीव्हीवर बातमी आली की मोदी आता केदारनाथच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी घेत आहेत. दिल्लीत वादळ उठले. त्यांना वाटले हा गुजरातचा मुख्यमंत्री जर केदारनाथलाही पोचेल, एका तासात असे वादळ उभे ठाकले की राज्य सरकारवर दबाव आला आणि राज्य सरकारला अतिरिक्त स्वरूपात घोषणा करावी लागली की आम्हाला गुजरातच्या मदतीची गरज नाही, आम्ही करू. ठीक आहे, जर दिल्लीत बसलेल्या लोकांना त्रास होत असेल तर मी का कुणाला त्रास देऊ? मी मागे हटलो. मात्र बहुधा बाबांनीच ठरवले असेल, हे काम या बाबाच्या मुलाच्या हातूनच व्हायचे होते. 

आणि जेव्हा इथे भारतीय जनता पार्टीचे सरकार आले,उत्तराखंडच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला, तेव्हा माझी खात्री पटली की बाबांनी ठरवले आहे की हे काम मला करावेच लागेल आणि म्हणून दारे उघडण्याच्या वेळी मी आलो होतो, मनात काही संकल्प करून गेलो होतो आणि  दारे बंद होण्यापूर्वी इथे पोहोचलो आहे आणि बाबांच्या श्रीचरणी पुन्हा एकदा सांगतो की केदारनाथच्या भूमीला साजेसे भव्य पुनर्निर्माण करण्यासाठी आज भूमिपूजन होत आहे. निर्धारित वेळेत तीर्थक्षेत्र कसे बनायला हवे, इथल्या पुजाऱ्यांसाठी व्यवस्था कशी असायला हवी, पंडितांच्या सर्व गरजा कशा प्रकारे लक्षात घ्याव्यात, त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या आहेत, त्यापेक्षा उत्तम जगणे त्यांना जगता यावे यासाठी कशा प्रकारे व्यवस्था करावी हे केंद्रस्थानी ठेवून याच्या विकासाचा, पुनर्निर्माणाचा आराखडा तयार आहे. मी नियमितपणे बैठका घेत होतो, प्रत्येक गोष्ट पाहत होतो, रचना कशी असेल, वास्तु रचना कशी असेल? आपल्याकडे जी धार्मिक वास्तुशिल्पे आहेत, मंदिरांची जी बांधकाम शैली आहे हे सगळे लक्षात घेऊन नियमांचे पालन करत पुनर्निर्माणाचे कार्य कसे होईल? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला.

आता पुजाऱ्यांना जी घरे मिळतील, ती एक प्रकारे थ्री इन वन असतील. खालच्या बाजूला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सर्व सोयीसुविधा असतील. वरच्या मजल्यांवर ते स्वतः राहतील आणि त्याच्या वरच्या मजल्यांवर जे पुजारी आहेत, त्यांच्याकडे जे पाहुणे येतात, त्याच्यासाठी देखील राहण्याची व्यवस्था असेल. २४ तास वीज असेल, पाणी असेल, स्वच्छतेची पूर्ण व्यवस्था असेल, आणि हा संपूर्ण रस्ता अधिक रुंद केला जाईल आणि त्यानंतर पुजाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था उभारली जाईल.

खूप मोठ्या संख्येने आलेल्या यात्रेकरूंना जर पूजा-प्रसाद घ्यायचा असेल, इथे काही तीर्थयात्रेची खरेदी करायची असेल तर त्याची व्यवस्था केली जाईल. टपाल कार्यालय, बँक, दूरध्वनीची व्यवस्था असेल, संगणकाचा वापर करण्यासाठी व्यवस्था या सर्व गोष्टी असतील.

इथे आज एक प्रकारे पाच प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. एक, जसे मी म्हटले- या संपूर्ण मार्गाचे रुंदीकरण आरसीसीने केले जाईल आणि सर्व आधुनिक व्यवस्थांनी युक्त असेल. यात्रेकरूंनी चालणे सुरु केल्यावर, तेव्हा जो प्रहर असेल, त्या प्रहरचे मंद सूर मंदाकिनीच्या किनाऱ्यावरून ऐकत, भक्तिमय होत तो या दिशेने येईल.

मंदाकिनीच्या घाटाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम देखील, एक प्रकारे जे यात्रेकरू येतात, त्यांच्या बसण्याची सोय होईल, वाहत्या नदीचा आवाज ऐकू शकतील अशी व्यवस्था केली जाईल. जसे मी म्हटले संपर्क मार्ग, भव्य दिव्य संपर्क मार्ग बनेल. त्याची प्रकाश व्यवस्था देखील तशीच असेल जशी मंदाकिनीजवळ संरक्षक भिंत आणि घाटाचे बांधकाम होईल कारण दोन्ही बाजूला जलशक्तीचा अनुभव येतो, जलस्रोतांचा अनुभव येतो. तर एका बाजूला माता सरस्वती, तिचीही संरक्षक भिंत आणि तिच्याही घाटाचे बांधकाम केले जाईल. आणि यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जाईल.

आणि जो एक श्रद्धेचा विषय बनला आहे, अडीच हजार वर्षांपूर्वी करेलच्या कागडीत जन्मलेला एक बालक वयाच्या सातव्या वर्षी घर सोडून बाहेर पडतो. हिमाचल, काश्मीर ते कन्याकुमारी भारतमातेची भ्रमंती करतो. प्रत्येक प्रांताची माती आपल्या कपाळाला लावत या केदारला पोहोचतो आणि आयुष्याचा शेवटही इथेच समाहित करतो. ज्या आदी शंकराचार्यांची विचारसरणी भारतात शेकडो वर्षे प्रेरणा देत राहिली, प्रभावित करत राहिली, त्यांचे एक समाधीस्थळ, तेही या आपत्तीत उध्वस्त झाले. त्याच्या रचनेवर  अद्याप काम सुरु आहे. मी श्रद्धा आणि वास्तुशैलीला निमंत्रण देतो की असे भव्य दिव्य आदिशंकराचे स्थान बनावे, त्यांचे समाधीस्थळ बनावे आणि तेही असे बनावे की आदिशंकराचे स्थान केदारपेक्षा थोडे वेगळे आहे असे वाटू नये. मात्र यात्रेकरूला आदिशंकराजवळ गेल्यावर त्या महान तपस्व्याच्या परंपरेबरोबर एक अध्यात्मिक चेतनेची अनुभूती व्हावी अशी रचना असावी, या दिशेने काम सुरु आहे. आज त्याचेही भूमिपूजन होत आहे.

मला माहिती आहे, खर्च होईल, मात्र माझी खात्री आहे की जर एकदा भारतातील यात्रेकरूंनी श्रद्धेच्या भावनेने ठरवले तर ज्याप्रकारचे पुनर्निर्माण करायचे आहे तसे करण्यासाठी निधीची कमतरता हा देश कधीही भासू देणार नाही, हा माझा विश्वास आहे . आणि मी देशातील सरकारांनाही यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देईन. मी कंपनी सामाजिक दायित्वासाठी देखील, उद्योग जगतातील लोकांनाही, व्यापार जगतातील लोकांनाही यात योगदान देण्यासाठी निमंत्रण देईन.

मी जेएसडब्ल्यू चाही आभारी आहे, त्यांनी प्रारंभिक कामासाठी जबाबदारी घ्यायचे ठरवले आहे. मात्र जे माझ्या डोक्यात आहे आणि स्वप्ने येतच असतात, नवनवीन गोष्टी जोडल्या जातात आणि यासाठी मी आणखी सीएसआर साठी आवाहन करेन.

जेव्हा एवढा मोठा निधी खर्च होईल, एवढे पायाभूत विकासाचे काम होईल, त्यात पर्यावरणाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. इथली रुची, प्रकृती, प्रवृत्तीनुसार याचे पुनर्निर्माणाचे काम केले जाईल. त्यात आधुनिकता असेल मात्र त्याचा आत्मा तोच असेल जो शतकानुशतके केदारच्या  धरतीने आपल्या अंतरंगात जोपासला आहे, असे पुनर्निर्माण करण्याच्या दिशेने हे काम केले जाईल.

मी जेव्हा इथे आलो होतो दारे उघडल्यानंतर, तेव्हा माझ्या मनात विचार होता की मी देशाला एक संदेश देऊ इच्छितो की त्या संकटाच्या छायेतून आपण बाहेर पडावे. कधी घरून निघताना आधी विचार यायचा की माहित नाही तिथे आता व्यवस्था असेल की नाही. जाऊ शकू की नाही. त्यामुळे यात्रेकरूंची संख्या कमी झाली होती. मात्र मला आनंद झाला आहे की यावेळी सुमारे साडेचार लाखांहून अधिक यात्रेकरू इतक्या कमी वेळेत बाबांच्या चरणी आले. पुन्हा एकदा इथे यात्रा नव्याने सुरु होत आहे. आणि म्हणूनच पुढल्या वेळी दहा लाखांहून कमी नसतील, लिहून ठेवा. कारण लोकांना विश्वास वाटला, संदेश पोहचला, टीव्हीवर साऱ्या     देशाने पाहिले आणि आजच्या या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा संदेश पोहोचेल की जेव्हा दारे उघडतील, पुन्हा जेव्हा यात्रेला सुरुवात होईल, त्याच ताकदीनिशी पुन्हा एकदा यात्रांचा सुकाळ येईल. पुन्हा एकदा उत्तराखंड, जी आपली देवभूमी आहे, उत्तराखंड जी आपली वीरभूमी आहे, उत्तराखंड जी माझ्या वीर मातांची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी याहून चांगली जागा असू शकत नाही.

आपल्या देशातील हिमालयाचे मोठे वैशिष्ट्य आहे. विकासासाठी एवढ्या संधी आणि हिमालयाच्या प्रत्येक भूभागात त्याची एक वेगळीं चेतना आहे. जर श्रीनगरमध्ये गेलो, हिमालय परिसरात तर एक वेगळीच अनुभूती येते, माता वैष्णो देवी, आणि अमरनाथला गेलो, तर दुसरी अनुभूती येते. हिमाचल प्रदेशात तोच हिमालय, शिमला, कुल्लू मनालीला गेलो तर एक अनुभूती येते, मात्र त्याच हिमालयाच्या कुशीत उत्तराखंडच्या भूमीवर आलो तर एका दिव्य चेतनेची अनुभूती येते. तोच हिमालय जर दार्जिलिंगला गेलो तर अजून एक वेगळी अनुभूती असते, सिक्कीमला गेलो तर एक दुसरी अनुभूती असते. तुम्ही कल्पना करू शकता एकच हिमालय, तीच हवा, तोच पर्वत, तोच बर्फ, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चेतनेची अनुभूती येते.

मी हिमालयाच्या कुशीत बराच फिरलेला माणूस आहे. मी प्रत्येक परिसरातील चेतना वेगळ्या तऱ्हेने अनुभवली आहे. आणि म्हणूनच स्वतः माझ्या तोंडून सांगू शकतो. मला माहित नाही वैज्ञानिक प्रयोगशाळेत कोणत्या तराजूने याचे मोजमाप होईल मात्र मी ज्याप्रकारे हिमालय अनुभवला आहे, तो हिमालय जगासाठी, जर कुणाला इथल्या वनसंपदेत रुची असेल, तर आयुष्यभर संशोधनासाठी अवाढव्य क्षेत्र खुले आहे. कुणाला साहस करण्यात रुची असेल तर संपूर्ण हिमालय जगभरातील साहसी व्यक्तींना निमंत्रण देत आहे. कुणाला इथल्या जलस्रोतांमध्ये रुची आहे, जगातील प्रत्येक जलस्रोतांमध्ये रुची असलेल्या लोकांना निमंत्रण देतो. ज्यांना इथल्या वनौषधींमध्ये रुची आहे, हिमाचलच्या, हिमालयाच्या प्रत्येक कुशीत असा निसर्ग भरलेला आहे की तो एका नव्या चेतनेची अनुभूती देऊ शकतो. आणि वनौषधींचे जे उपयोग आहेत जे इथल्या गावातील लोकांना माहित आहेत, मी पाहिले आहे, जर  विंचवाने डंख मारला, चुकून चावला तर गावातील माणूस येऊन लगेच सांगतो अरे रडू नका, ही दुसरी वनौषधी आहे, इथे लावा, बरे वाटेल. पाल्याचा लेप लावतो, बरे होते. आणि दोन्ही जवळ जवळ असतात. काय ईश्वराने व्यवस्था ठेवली आहे. आणि म्हणूनच त्याच्या अंतरंगात जितके शिरता येईल, आणि म्हणूनच डेहरादूनमध्ये ही जी आपली नैसर्गिक संपत्ती आहे, भारत सरकारने त्याच्या संशोधनासाठी एक खूप मोठे काम सुरु केले आहे, जे पुढे विस्तृत रूप धारण करेल.

आपल्या हिमालयाच्या कुशीतील सेंद्रिय शेती संपूर्ण जगासाठी एक खूप मोठी क्षमता असलेली जागा आहे असे मला वाटते. सिक्कीम छोटासा प्रदेश आहे. 6-7 लाखाची लोकसंख्या आहे मात्र 12-15 लाख पर्यटक येतात आणि तिथे जाणारे-येणारे रस्ते देखील दुर्गम आहेत, विमानतळही नाही. आता मी बनवतोय. बनेल. काही दिवसांत. तरीही एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सिक्कीमने पूर्ण राज्य सेंद्रिय बनवले आहे.

10-12 वर्षे सातत्याने आंतरराष्ट्रीय मानकांच्या साधनांनी काम केले. संपूर्ण हिमालयाच्या कुशीत रासायनिक खतांपासून मुक्ती, सर्व हिमालयीन राज्यांमध्ये औषधांपासून मुक्ती- वनौषधी, शेतात औषध फवारणी बंद. जर 10-12 वर्षे धीराने काम केले तर ज्या आपल्या पिकासाठी एक रुपया मिळतो, जग तुम्हाला एक डॉलर देण्यासाठी तयार होईल, ही सेंद्रिय शेतीची ताकद आहे.

मी उत्तराखंडला निमंत्रण देतो. उत्तराखंड सरकारला विनंती करतो, मी उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की विडा उचला. उत्तराखंडला सेंद्रिय राज्य बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगा , २०२२ चे उद्दिष्ट ठेवा, आणि आतापासून कामाला लागा. प्रमाणीकरण करण्यात बहुधा दहा वर्षे जातील, त्याचे नियम असतात. मात्र एकदा का ठरवले, जशी जनजागृती करू, गोष्टी बदलतील. तुम्ही कल्पना करू शकता आज संपूर्ण जग सात्विक आरोग्य सेवेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आणि तेव्हा रसायनांच्या जगापासून दूर आपली कृषी उत्पादने घेऊन गेलो तर आपण मानवजातीची किती मोठी सेवा करू. हिमालयाचे हे सामर्थ्य, त्यालाही चालना देऊ.

पर्यटनासाठी अमाप संधी आहेत. याच्या अध्यात्मिक सामर्थ्याला जराही ठेच पोहोचता कामा नये. आणि त्याच्या बरोबरीने पर्यटनाचा विकास केला जाऊ शकतो. नवनवीन क्षेत्र विकसित केली जाऊ शकतात. निसर्गाचेही संरक्षण होईल, पर्यावरणाचेही रक्षण होईल आणि ईश्वराप्रती श्रद्धेची भावना कायम राहील.

आपल्याकडे पर्वतीय भागात एक जुना वाक्प्रचार आहे. पर्वताचा एक स्वभाव असतो. पर्वताचे तारुण्य आणि पर्वताचे पाणी कधी पर्वताच्या उपयोगी येत नाही. आम्ही विडा उचलला आहे, हा वाक्प्रचार बदलण्याचा. पर्वताचे तारुण्य पर्वताच्या उपयोगी पडायला हवे आणि पर्वताचे पाणी देखील त्याच्या उपयोगी पडायला हवे. त्याच पाण्यातून वीजनिर्मिती व्हायला हवी. त्याच पाण्यावर साहसी पर्यटन चालायला हवे. त्याच पाण्यावर जल क्रीडा चालायला हव्यात. त्याच पाण्यावर पर्यटनाची नवनवीन क्षेत्रे विकसित व्हायला हवीत आणि जगभरातील युवकांना निमंत्रण देण्याचे सामर्थ्य त्या पाण्यात असायला हवे आणि पाणी जे कधी पर्वतांच्या उपयोगी येत नव्हते, ते पाणी पर्वतांच्या उपयोगी पडावे. जे तारुण्य पर्वतावरून खाली येत मैदानी भागात जाते, रोजगाराच्या शोधात आपण पर्वतांमध्ये ती ताकद निर्माण करायला हवी जेणेकरून आपल्या युवकांना पर्वत सोडण्याची वेळ येणार नाही. पर्वताचे तारुण्य पर्वताच्या उपयोगी पडेल हे काम करण्याच्या दिशेने एकापाठोपाठ एक पावले भारत सरकार उचलत आहे.

उत्तराखंड सरकारने देखील इतक्या कमी वेळेत एवढे महत्वपूर्ण निर्णय घेतले, एवढे महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आणि त्याचाच परिणाम आहे की आज विकास एका नव्या उंचीच्या दिशेने पुढे जात आहे. एक नवीन आत्मविश्वास निर्माण होत आहे.

उत्तराखंडकडे खूप सामर्थ्य आहे. इथे शिस्त इथल्या नसानसात आहे. असा कुठलाही परिवार नाही ज्या परिवारात कुणी सैनिक नसेल. कुठलेही गाव असे नाही, जिथे २५०-३०० सेवानिवृत्त सैनिक नसतील आणि जिथे सैनिक एवढ्या मोठ्या संख्येने असतील तिथे कडक शिस्त पाळली जाते. यात्रेकरूं आणि  पर्यटकांसाठी ही शिस्त एक खूप मोठी ताकद असते. आपण तिची ओळख करून द्यायला हवी. यासाठी आपण योजना बनवायला हवी. निवृत्त सैनिकांच्या अनुभवाचा वापर करून पर्यटकांमध्ये एक नवीन विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एक अशी व्यवस्था उभारायला हवी, जी आपल्या इतरांसाठी एक उदाहरण बनू शकेल. खूप मोठ्या संधी आहेत. आणि त्या संधींचा वापर करून उत्तराखंडचा विकास, उत्तराखंड देशासाठी सर्वात मोठे आकर्षणाचा केंद्र बनावे, सर्वात आवडीचे पर्यटन स्थळ बनावे, पर्यटकांसाठी तर उत्तराखंड, यात्रेकरूंसाठी उत्तराखंड, साहसासाठी उत्तराखंड, उत्तम निसर्गासाठी, निसर्गाच्या कुशीत राहण्याच्या इच्छेसाठी उत्तराखंड, संशोधन, आविष्कार करणाऱ्यांसाठी उत्तराखंड.

हे सामर्थ्य ज्या भूमीमध्ये आहे, मी तुम्हा सर्वाना निमंत्रण देतो की या, आज दिवाळीच्या या दिवसांमध्ये आणि एक प्रकारे नववर्षाच्या प्रारंभी, आपल्याकडे संपूर्ण भारत दिवाळीच्या दिवशी जुने हिशोब पूर्ण करतात आणि नवीन हिशोब सुरु करतात. आज विकासाचा एक नवीन हिशोब सुरु होत आहे. या नवीन खात्यात आपण विकासाची गाथा सुरु करत आहोत. नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पुढे येऊया. मी आजही अन्य अनेक सूचना केल्या आहेत. राज्य सरकार पुन्हा ते पाहिल. पुन्हा एकदा महिन्याभराने मी पुन्हा भेटेन. माझ्या मनात या परिसरासाठी आणखी काही करायच्या योजना आहेत, त्यावरही भर देईन. मात्र आपणा सर्वांची जबाबदारी आहे पर्यावरणाचे रक्षण करणे. आपणा सर्वांची जबाबदारी आहे निसर्गाचे रक्षण करणे. जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर पर्यावरण आपले रक्षण करेल ही मी हमी देतो. जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल हा विश्वास मी तुम्हाला देतो.

शतकानुशतके इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा-जेव्हा निसर्गाचे रक्षण झाले आहे तिथे निसर्गाकडून कुठलेही संकट आलेले नाही. जिथे-जिथे पर्यावरणाचे रक्षण झाले आहे, पर्यावरणालाही कुठली हानी पोहचलेली नाही. आणि ही ती धरती आहे जिथून आपण लोकांना ती शक्ती देऊ शकतो.

आम्ही एक विडा उचलला होता लाकडाच्या चुलीपासून लोकांना मुक्ती देऊन जंगले कापणे बंद करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे गरीबातील गरीब कुटुंबात गॅसची चूल पोचवणे, गॅसचे सिलींडर पोहचवणे. पर्यावरणाच्या रक्षणाचे मोठे अभियान होते. उत्तराखंड आणि भारत सरकारने मिळून उत्तराखंडमध्ये हे काम खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेले आहे.

आता दुसरा विडा उचलला आहे . भारतात आज चार कोटी कुटुंबे अशी आहेत ज्यांच्या घरात वीज नाही. आजही १८ व्या, १९व्या शतकात जगत आहेत. हे २१वे शतक आहे, गरीबातील गरीब कुटुंबातही विजेचा दिवा जळायला हवा की नको जळायला? गरीब कुटुंबातही रात्री मुलांना अभ्यास करायचा असेल तर वीज मिळायला हवी की नको? गरीबालाही जर चक्कीवर पीठ दळून आणायचे असेल, गहू दळायचे असतील, धान्य दळून आणायची असतील, त्याला १० किलोमीटर जावे लागते, त्यापेक्षा आपल्याच गावात चक्की असेल, विजेवर चालणारी चक्की असेल, त्याचे गहू दळायचे काम, बाजरी दळायचे काम होईल की नाही होणार? गरीबाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून चार कोटी कुटुंबांमध्ये घरात विजेची जोडणी देण्याचा मी विडा उचलला आहे. उत्तराखंड मध्येही अजूनही हजारो कुटुंबे आहेत ज्यांच्या घरात मला वीज पोहचवायची आहे.

मी उत्तराखंड सरकारला निमंत्रण देतो, भारत सरकारचे हे अभियान तुम्ही राबवा. आणि राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असावी, कोणते राज्य सर्वप्रथम सौभाग्य योजना पूर्ण करते? कोणते राज्य सर्वप्रथम प्रधानमंत्री उज्वला योजना पोहचवते? कोणते राज्य सर्वात जास्त पर्यटनाला चालना देते? आगामी काळात जी विकासाची क्षेत्रे आहेत त्यासाठी राज्याराज्यांमध्ये एक निकोप स्पर्धा असावी. मी सर्व हिमालयीन राज्यांना स्पर्धेसाठी निमंत्रण देतो. मी देशातील सर्व राज्यांना निमंत्रण देतो. या, एक राज्य दुसऱ्या राज्याबरोबर निकोप स्पर्धा करेल. आणि विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल.

मला उत्तराखंडचे  यासाठी अभिनंदन करायचे आहे- शौचालय, उघड्यावर शौचापासून मुक्ती, काही दिवसांपूर्वी मला सांगण्यात आले की उत्तराखंडने ग्रामीण भागात शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. आता गावात कुणालाही उघड्यावर शौचाला जावे लागत नाही. शहरांमध्ये काम सुरु आहे. काही दिवसांतच शहरांसह पूर्ण उत्तराखंड उघड्यावर शौचापासून मुक्त होण्याची तयारी करत आहे.

आतापर्यंत कामात तुम्ही जी गती दिली आहे यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. मात्र माझा आग्रह असेल की हे तुम्ही मिशन मोड स्वरूपात चालवावे. शहरांमध्येही कुणाला उघड्यावर शौचाला जावे लागू नये.

काही दिवसांपूर्वी मी उत्तर प्रदेशात गेलो होतो. उत्तर प्रदेशात मोठा विडा उचलला योगीजींच्या सरकारने. आणि त्यांनी आता शौचालयाचे नावच बदलून टाकले आहे. आता ते शौचालयाला शौचालय नाही म्हणत. शौचालयाला संडास नाही म्हणत. त्यांनी शौचालयासाठी नाव ठेवले आहे इज्जतघर.

मी समजू शकतो, माता-भगिनींना उघड्यावर शौचाला जावे लागते, त्या चांगल्या प्रकारे समजू शकतात की इज्जतघराचा अर्थ काय असतो. आपणही हे इज्जतघराचे अभियान   राबवूया. माता-भगिनींना मान देण्यासाठी शौचालय ही एक खूप मोठी सुविधा असते. त्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगली सुविधा आहे. आणि आता युनिसेफने सर्वेक्षण केले आहे. भारतातील दहा हजार गावांचे सर्वेक्षण केले. ज्या घरांमध्ये शौचालये बांधली ती आणि ज्या घरांमध्ये शौचालये नव्हती ती. जी गावे शौचालयासंबंधी जागरूक होती ती आणि जी गावे शौचालयांच्या बाबतीत जागरूक नव्हती ती, त्या सर्वांचा त्यांनी युनिसेफने अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रांची ही संस्था आहे आणि त्यांना असे आढळले की शौचालय नसल्यामुळे विविध प्रकारचे आजार जे घरात येतात आणि आजारपणामुळे मूल आजारी पडले तर आई त्यात व्यस्त असते, वडील व्यस्त होतात, मूल शाळेत जात नाही. उदरनिर्वाहासाठी वडील जाऊ शकत नाहीत. आई आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी पडते. घरात कमावणारी व्यक्ती जर आजारी पडली तर उत्पन्न बंद होते. संपूर्ण कुटुंबाची उपासमार होते. आणि हे सर्व पाहून त्यांनी सर्वेक्षण केले की जर शौचालय नसेल तर आजारपणाचा जो खर्च होतो आणि शौचालय बांधल्यावर जो होतो तो, तर युनिसेफवाल्यानी सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढला आहे की गरीब कुटुंबाचा आजारपणामुळे 50 हजार रुपयांचा खर्च वाचतो, तुम्ही विचार करा जर एका कुटुंबाचे वर्षाचे 50  हजार रुपये वाचत असतील, त्या कुटुंबाच्या आयुष्यात किती मोठी ताकद येईल.

एक शौचालय आयुष्य बदलू शकते आणि म्हणूनच संपूर्ण देशात जितक्या भक्तिभावाने बाबा केदारनाथच्या धामची निर्मिती केली जाते त्याच श्रद्धेने मला भारतातील गरीबांसाठी शौचालय बांधण्याचे अभियान देखील चालवायचे आहे. माझा देश तेव्हाच पुढे जाईल. ती भावना घेऊन आपण चालायला हवे.

मी पुन्हा एकदा उत्तराखंड सरकारचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि देशभरातील चारधाम यात्रेसाठी येणारे लोक, ज्यांना माहित आहे आम्ही 12 हजार कोटी रुपये खर्चून चारधामला जोडणाऱ्या नव्या रस्त्याचे काम सुरु केले आहे. आधुनिक संपर्काची व्यवस्था सुरु केली आहे.

आता हे केदारनाथ अशा प्रकारे तयार होईल. माझे केदारनाथ भव्य असेल, दिव्य असेल. प्रेरणेसाठी उत्तम स्थान बनेल. हे सव्वाशे कोटी देशबांधवांच्या श्रद्धेचे केंद्र बनत आहे. प्रत्येक मुलाचे स्वप्न असते वयस्कर माता-पित्यांना कधी ना कधी चारधाम यात्रा घडवून आणेल.

आज हे सरकार ते काम करत आहे, जे सव्वाशे कोटी देशबांधवांचे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. काम उत्तराखंडच्या भूमीवर होत आहे मात्र काम भारताच्या प्रत्येक व्यक्तीसाठी होत आहे. त्या कामाला तुमच्यासमोर प्रारंभ करताना आयुष्यात एक अत्यंत दिव्य समाधानाची अनुभूती येत आहे.

माझ्या तुम्हा सर्वाना शुभेच्छा, पुन्हा एकदा भोले बाबाला वंदन करतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या बरोबर दोन्ही मुठी बंद करून पूर्ण ताकदीनिशी बोला-

जय जय बाबा भोले, जय जय बाबा भोले

जय जय बाबा भोले, जय जय बाबा भोले

खूप धन्यवाद !

 
PIB Release/DL/1692
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau