This Site Content Administered by
पंतप्रधान

सर्वांनी शांतता आणि सुसंवादाने राहण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बात मध्ये प्रतिपादन

 


मुंबई, 29-10-2017

सर्वांनी शांतता आणि सुसंवादाने राहण्याची गरज आहे. भारताने जगाला नेहमीच शांतता, एकात्मता आणि सुसंवादाचा संदेश दिला असून, अधिक चांगल्या आणि शांततामय भविष्य निर्मितीसाठी वाटचाल करणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

आकाशवाणीवरुन आज प्रसारित झालेल्या 37 व्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, भारतीय सुरक्षा दलातील जवान केवळ भारतीय सीमेवरच महत्वपूर्ण भूमिका बजावत नाहीत तर जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यामध्येही त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलातील सैनिक म्हणून भारतीय जवान देशासाठी गौरवशाली कार्य करत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

जगभरात शांतता स्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न आणि विधायक भूमिकेबद्दल सर्वजण अवगत आहेतच आणि संयुक्त राष्ट्राने हाती घेतलेल्या विविध महत्वपूर्ण पुढाकारांमध्ये वसुधैव कुटुंबकम् या श्रद्धेतून भारताने नेहमीच सहकार्य केले आहे असे ते म्हणाले.

भारतीय घटना आणि संयुक्त राष्ट्रांची सनद या दोन्हींची सुरुवात We the people या शब्दांनीच होते असे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानांमध्ये भारतीय सुरक्षा दलातल्या 18,000 हून अधिक सैनिकांनी आपली सेवा दिली आहे असे ते म्हणाले. सध्या सुमारे 7,000 भारतीय सैनिक या अभियानांमध्ये सहभागी झाले आहेत. जगभरात संयुक्त राष्ट्रांनी हाती घेतलेल्या 71 शांतता अभियानांपैकी 50 अभियानांत भारतीय सैनिकांनी आपली सेवा बजावली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

काँगो आणि दक्षिण सुदानमध्ये भारतीय लष्कराच्या रुग्णालयांमध्ये 20,000 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून अनेक आयुष्य वाचवण्यात आली आहेत असे ते म्हणाले. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलांनी आघाडीची भूमिका बजावली असून लायबेरियातल्या संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत महिला पोलिस दल पाठवणारा भारत हा पहिलाच देश असल्याचे ते म्हणाले.  शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमांपर्यंतच भारताचे योगदान मर्यादित नसून 85 देशातील शांतता सैनिकांना भारताने प्रशिक्षणही दिले आहे. महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या भूमीतील या शांतता सैनिकांनी जगभरात शांतता आणि सौहार्दाचा संदेश पोहोचवला आहे असे मोदी यांनी सांगितले.

आफ्रिकेतील काँगो इथल्या लढाईत शहीद झालेले कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया तसेच लेफ्टनंट जनरल प्रेम चंद आणि सायप्रसमधील संयुक्त राष्ट्र शांतता दलाचे नेतृत्व करणारे जनरल थिम्मया यांनी स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले आहे असे या वीरांचे स्मरण करताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

जम्मू काश्मीरमधल्या गुरेज क्षेत्रात सुरक्षा दलांबरोबर साजऱ्या केलेल्या दिवाळीचा उल्लेख करुन या स्मृती दिर्घकाळ हृदयात राहतील असे ते म्हणाले.

महिलांसाठी समानता याच्या महत्वावर भारताने नेहमीच भर दिला असून संयुक्त राष्ट्रांचे मानवी हक्कांबाबतचे घोषणापत्र याबाबतचे जीवंत उदाहरण आहे असे ते म्हणाले. या घोषणापत्रात सुरुवातीला ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल  असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव होता मात्र भारताच्या प्रतिनिधी हंसा मेहता यांच्या प्रयत्नांमुळे त्यात ऑल ह्युमन बिईंग्ज आर बॉन फ्री अँड इक्वल असा बदल करण्यात आला.

गांधी जयंतीच्या दिनी नेहमीच खादी आणि हातमाग कापडाच्या वापराला प्रोत्साहन द्यावे असे मी सांगितले असून या महिन्याच्या 17 तारखेला, धनतेरसच्या दिवशी दिल्लीतल्या खादी ग्रामोद्योग भवन दुकानात, 1 कोटी 20 लाख रुपयांची विक्रमी विक्री झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या काळात खादीच्या गिफ्ट कुपनच्या विक्रीत 680 टक्के एवढी प्रचंड वाढ दिसून आली आणि गेल्या वर्षीच्या खादी आणि हस्तकला वस्तूंच्या एकूण विक्रीच्या तुलनेत यंदा 90 टक्के वाढ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामुळे अनेक विणकर कुटुंब, गरीब कुटुंब आणि हातमागावर काम करणारी कुटुंब यांना निश्चितच लाभ झाला आहे. सुरुवातीला खादी फॉर नेशन आणि खादी फॉर फॅशन अशी संकल्पना होती. मात्र आता परिवर्तनासाठी खादी अशी संकल्पना आहे.

मुलांवर मधुमेहासारख्या आजारांच्या होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करुन पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी वृद्धावस्थेत किंवा आयुष्याच्या अखेरच्या टप्यात आढळून येणारे रोग आता मुलांमध्येही दिसून येऊ लागले आहेत. शारिरिक हालचालींची कमतरता आणि खाण्यापिण्याच्या सवयीत झालेले बदल यामुळे हे घडत आहे. आरोग्यदायी जीवनशैली कायम राखण्यात तसेच मुलांना जीवनशैलीतील दुष्परिणांमापासून वाचवण्यात योग महत्वपूर्ण ठरेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

आशिया चषक विजेतेपद पटकवल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचे तसेच डेन्मार्क खुली स्पर्धा जिंकल्याबद्दल किदांबी श्रीकांत याचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले की, या स्पर्धेचे आयोजन यशस्वी झाले असून सर्व संघांनी आपला उत्तम खेळ सादर केला.

स्वच्छतेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर किल्ल्याच्या कायापालटाचा उल्लेख केला. या ठिकाणी इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेने स्वच्छता मोहीम सुरु केली . 200 दिवस चाललेल्या या मोहिमेत लोकांनी संघभावनेतून अविरत न थकता, किल्ला स्वच्छ करण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.

गुरुनानक देव यांना आदरांजली अर्पण करताना ते केवळ शिखांचेच पहिले गुरु नव्हते तर संपूर्ण जगाचे गुरु होते असे पंतप्रधानांनी सांगितले. येत्या मंगळवारी सरदार पटेल यांची जयंती  साजरी होत असून पंतप्रधानांनी त्यांनाही आदरांजली अर्पण केली. विचारांना सत्यात उतरवणे हा सरदार पटेल यांचा विशेष गुण होता आणि एकत्रित भारताच्या निर्मितीची सूत्र त्यांनी हाती घेतली होती असे मोदी यांनी सांगितले.

रन फॉर युनिटी या परस्पर सुसंवादाच्या पर्वात लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेही स्मरण केले.

 
PIB Release/MH/202
दे -जयश्री -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau