This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात उजीरे येथे सार्वजनिक सभेत केलेले भाषण

नवी दिल्ली, 29-10-2017

मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

भगवान मंजुनाथ यांच्या पायाशी येऊन तुम्हा सर्वांचे दर्शन करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. गेल्या आठवड्यात मी केदारनाथ येथे होतो. आदि शंकराचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी त्या जागेवर राष्ट्रीय एकतेसाठी केवढी भव्य साधना केली असेल. आज मला पुन्हा एकदा दक्षिणेकडे मंजुनाथेश्वरांच्या चरणी येण्याचे भाग्य लाभले आहे.

नरेंद्र मोदी नावाच्या कोणा व्यक्तीला डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांचा सन्मान करण्याचा अधिकार आहे की नाही? त्यांचा त्याग, त्यांची तपस्या, त्यांचे जीवन; 20 वर्षांच्या अतिशय कमी वयात ‘वन लाइफ, वन मिशन’, यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा  एका व्रतस्थ  जीवन असलेल्या व्यक्तीचा सन्मान करणारी व्यक्ती म्हणून मी खूपच सामान्य आहे. मात्र, सव्वाशे कोटी देशवासीयांचा प्रतिनिधी म्हणून ज्या पदावर तुम्ही बसवले आहे, त्या पदाच्या प्रतिष्ठेमुळे मला हे काम करावे लागत असल्याने मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो.

 

सार्वजनिक जीवनात आणि तेही आध्यात्मिक अधिष्ठानावर ईश्वराला साक्षी ठेवून, आचार विचारात एकसूत्रता, मन-वचन-कर्म यात तीच पवित्रता आणि जे लक्ष्य जीवनात निर्धारित केले, ते लक्ष्य साध्य करण्यासाठी, स्वः साठी नाही तर समष्टीसाठी, अहम साठी नव्हे तर वयम साठी, मी नाही तूच, असे जीवन जगण्यासाठी प्रत्येक पावलावर कसोटीतून जावे लागते. प्रत्येक कसोटीतून, प्रत्येक तराजूमध्ये आपल्या प्रत्येक कृतीला तोलले जाते आणि म्हणूनच 50 वर्षांची ही साधना

स्वतःच आपल्यासारख्या कोटी-कोटी जनांसाठी प्रेरणेचा एक स्रोत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आदराने वंदन करतो, नमन करतो.

आणि ज्यावेळी मला त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला अगदी सहजतेने मिळाले आहे आणि मी पाहिले आहे हेगडेजींना मी जितक्या वेळा भेटलो आहे, त्यांच्या चेहर्यावरचे हसू कधी कमी झालेले दिसले नाही. कोणत्याही अवजड कामाचा बोजा त्यांच्यावर असल्यासारखे वाटत नाही. सरळ-सहज-निस्पृह जसे गीतेमध्ये सांगितले आहे निष्काम कर्मयोग आणि सत्कार करत होतो, त्यावेळी त्यांनी अगदी सहज मला सांगितले की मोदीजी हा 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा सत्कार नाही, तुम्ही तर माझ्याकडून अशाच प्रकारचे काम पुढील 50 वर्षात मी करत राहीन याची हमी मागत आहात. इतका मान सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होत असेल, ईश्वराचा आशीर्वाद असेल, 800 वर्षांच्या महान तपश्चर्येचा वारसा मिळालेला असेल, तरीदेखील जीवनात प्रत्येक क्षणी कर्मपथावरच पुढे चालत राहणे हे केवळ हेगडे यांच्याकडूनच शिकता येईल, असे मला वाटते. विषय योगविद्येचा असो, शिक्षणाचा असो, गरीबांच्या कल्याणाचा असो, भावी पिढीच्या उत्थानासाठी असलेल्या योजनांचा असो, डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांनी आपल्या चिंतनाद्वारे, आपल्या कौशल्याद्वारे, या सर्व गोष्टींना येथील स्थळ, काळ यांच्या स्थितीनुसार बनवून पुढे नेले आहे आणि मला हे सांगताना अजिबात संकोच वाटत नाही, अनेक राज्यांमध्ये आणि देशात देखील कौशल्य विकासाबाबतची जितकी कामे सुरू आहेत, त्यांचे प्रकार, कामाची पद्धत कशी असावी, कोणत्या प्रकारे केली पाहिजेत याची बहुतेक मॉडेल डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांनी या ठिकाणी जे प्रयोग केले आहेत त्यातूनच मिळाली आहेत.

आज 21व्या शतकात जगातील समृद्धातील समृद्ध देशांकडून देखील कौशल्य विकासाची चर्चा केली जाते. कौशल्य विकास एक प्रमुख क्षेत्र मानले जाते. भारतासारखा एक देश, ज्या देशात 80 कोटी लोक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील, या लोकसंख्यात्मक लाभाचा आम्हाला अभिमान असेल, त्या देशात कौशल्य विकास हा केवळ पोटपूजा करण्यापुरता नाही. भारताच्या भव्य स्वप्नांना साकार करण्यासाठी कौशल्यात वाढ करणे, जगभरात येणा-या काळात मनुष्यबळाची जी गरज असेल त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या बाहुंमध्ये ते सामर्थ्य आणणे, आपल्या हातांमध्ये ते सामर्थ्य आणणे, ते कौशल्य प्राप्त करणे या गोष्टी वीरेन्द्र हेगडे यांनी अनेक वर्षांपूर्वी पाहिल्या होत्या आणि त्या कामाला त्यांनी पुढे नेले.

 

आणि मी हे काम, या महत्त्वपूर्ण कामाला गती देण्यासाठी, आपल्याकडे तीर्थक्षेत्रे कशी असली पाहिजेत, संप्रदाय, श्रद्धा, परंपरा, यांचे लक्ष्य काय असले पाहिजे? या विषयी जितके अध्ययन व्हायची गरज होती, दुर्दैवाने तितके झालेले नाही, आज जगात उत्तम प्रकाच्या बिझनेस मॅनेजमेंट स्कूल कशा चालतात, याची चर्चा होते, त्याचे मानांकन देखील होते, देशातील मोठ मोठी मॅगझिन्स देखील त्यांचे मानांकन करतात. पण आज जेव्हा मी धर्मस्थळ सारख्या पवित्र स्थानी आलो आहे तेव्हा, जेव्हापासून वीरेन्द्र हेगडे यांच्या श्रीचरणांजवळ पोहोचलो आहे, तेव्हा मी मोठ-मोठ्या विद्यापीठांना निमंत्रण देत आहे, भारताच्या मोठ-मोठ्या विद्यापीठांना निमंत्रण देत आहे की आपण रुग्णालयांचे सर्वेक्षण करतो, त्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करतो, आपण अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मानांकन करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मानांकनाची चर्चा देखील होते. पण काळाची ही मागणी आहे, अनेक शतकांपासून, आपल्या या ऋषी-मुनी परंपरांनी कशा प्रकारे संस्था निर्माण केल्या , कशा प्रकारे त्यांना पुढे चालवले, एका पिढीकडून दुस-या पिढीकडे या संस्कारांचे संक्रमण कसे केले, त्यांची निर्णय प्रक्रिया काय असते, त्यांचे आर्थिक व्यवस्थापन कसे असते. त्यांनी पारदर्शकता आणि एकात्मतेचा अंगिकार कशा प्रकारे केला आहे, युगानुरूप परिवर्तन कशा प्रकारे घडवले आहे. वेळ आणि काळ यानुसार, काळाच्या गरजेनुसार त्यांनी या संस्थांनी दिलेल्या प्रेरणा कशा प्रकारे कायम ठेवल्या आहेत आणि मला असे वाटते की भारतात अशा प्रकारच्या एक दोन नव्हे तर हजारो संस्था आहेत, हजारो चळवळी आहेत, हजारो संघटना आहेत ज्या आजही कोटी-कोटी जनतेच्या जीवनाला प्रेरणा देत आहेत, स्व पासून निघून समष्टी साठी जगण्याची प्रेरणा देत आहेत आणि त्यामध्ये धर्मस्थळ, 800 वर्षांचा हा वारसा स्वतःच एक उदाहरण आहे.

 

भारताच्या अशा चळवळींचा अभ्यास जगातील विद्यापीठांनी केला तर खूप बरे होईल. जगाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या व्यवस्था होत्या? या व्यवस्था कशा प्रकारे चालायच्या? समाजात आध्यात्मिक चैतन्य निर्माण करण्याच्या परंपरा कशा प्रकारे सुरू ठेवल्या जायच्या? आपल्यामध्ये अनेक शतकांपासून निर्माण झालेले सद्गुण आहेत या सद्गुणांविषयी अभिमान बाळगत काळानुकूल आणि चांगले बनण्यासाठी एक खूप मोठी संधी आपल्यासमोर असते आणि ती केवळ श्रद्धेपुरती मर्यादित न राहता त्यांच्या शास्त्रीय रीतींकडे देशाच्या तरुण पिढीला आकर्षित करण्याची गरज आहे.

 

आता ज्यावेळी या ठिकाणी मला महिला बचत गटांना , त्यांना रुपे कार्ड प्रदान करण्याची संधी मिळाली. ज्या लोकांनी संसदेत गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी च्या दरम्यान जी भाषणे केली आहेत त्यांना जर ऐकले असेल, ऐकली नसतील तर पटलावर आहेत ती वाचा. विद्वत्तेमध्ये स्वतःला एका मोठ्या शिखरावर असल्याचे मानणारे लोक, सदनात असे बोलायचे की भारतात तर निरक्षरता आहे, गरीबी आहे, हे डिजिटल व्यवहार कसे होणार? लोक रोकडरहित कसे बनणार? हे अशक्य आहे, लोकांकडे मोबाइल फोन नाहीत. कोण जाणे किती वाईट बोलू शकत होते, किती वाईट विचार करू शकत होते, त्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पण आज डॉक्टर वीरेन्द्र हेगडे महोदयांनी सदनात उठलेल्या आवाजांना उत्तर दिले आहे.

गावात राहणा-या माझ्या माता-भगिनी शिक्षित आहेत की नाहीत, त्यांनी शिक्षण घेतलेले आहे की नाही; आज त्यांनी संकल्प केला आहे आणि 12 लाख लोक, थोडथोडके नाहीत, 12 लाख लोकांनी हा संकल्प केला आहे की ते आपल्या बचत गटांचा संपूर्ण कारभार रोकडरहित पद्धतीने करणारे, रोख रकमेविना करणार आहेत, डिजिटल व्यवहार करणार आहेत, रुपे कार्डाने करणार आहेत. भीमऍपने करणार आहेत. जर करायची इच्छा असेल तर कधी कधी अडथळेही जलद गती प्राप्त करण्याच्या संधी देतात आणि आज डॉक्टर वीरेन्द्र हेगडे महोदयांनी हे दाखवून दिले आहे.

 

मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देत आहे की तुम्ही भावी भारताचे बीज पेरण्याचा एक उत्तम प्रयत्न डिजिटल इंडिया, रोकडरहित समाज या दिशेने देशाला नेण्यासाठी  आणि या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांच्या पर्यंत कदाचित सरकारला ही बँकिंग प्रणाली घेऊन जाण्यासाठी कोणास ठाऊक, किती दशके लागली असती.

 

पण तुम्ही निम्न स्तरावरून या व्यवस्थेची सुरुवात केली आहे आणि आज ती करून दाखवली आहे. मी बचतगटांच्या त्या भगिनींचे अभिनंदन करतो, डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांचे अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाला उपयुक्त असणा-या एका फार मोठ्या मोहिमेची सुरुवात केली आहे. आता काळ बदलला आहे आणि हे जे चलन आहे, जी रोकड आहे, प्रत्येक युगात ते बदलत राहिले आहे. कधी दगडांच्या मुद्रा असायच्या, कधी चामड्याच्या मुद्रा असायच्या, कधी सोन्या-चांदीच्या देखील असायच्या, कधी हिरे जवाहि-यांच्या रुपातही चलन असायचे, कधी कागदाच्या नोटा आल्या, कधी प्लॅस्टिकच्या आल्या. बदल होत गेले, काळानुरूप बदल झाले आहेत. आता, आता डिजिटल चलनाच्या युगाचा प्रारंभ झाला आहे, भारताला उशीर करून चालणार नाही.

 

आणि मी पाहिले आहे की जास्त रोख रक्कम वाईट प्रवृत्तींना आकर्षित करत असते. कुटुंबात देखील जर मुलगा मोठा झाला असेल, मुलगी मोठी झाली असेल, आई- वडील सुखी असतील, संपन्न असतील, पैशाची कोणत्याही प्रकारे कमतरता नसेल तरी देखील एका मर्यादेपर्यंतच पैसे देतात. पैसे खर्च होतील याची त्यांना भीती वाटत असते म्हणून नाही, पण त्यांना असे वाटत असते की जर जास्त पैसे आपल्या मुलांच्या खिशात असतील तर त्यांना वाईट सवयी लागतील आणि त्यामुळे थोडे थोडे पैसे देत राहतात आणि विचारत राहतात की बाबा रे काय केले पैशांचे, योग्य ठिकाणी खर्च केलेस की नाही? ज्या कुटुंबात मुलांची काळजी करणारे आई-वडील असतात त्यांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक असते की जर खिशात पैसे असतील तर कुठून कोणत्या मार्गावर आपली मुले भरकटतील ते सांगता येणार नाही आणि म्हणूनच हे खूप मोठे काम, समाजाचे स्वतःचे स्वतःबरोबरचे उत्तरदायित्व, ही खूप मोठी गोष्ट असते, स्वतःचे स्वतःबरोबरचे उत्तरदायित्व, ही खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल.

 

आज ज्या दिशेने डॉक्टर हेगडे जात आहेत ते पाहता मला असे वाटते की भविष्यासाठी ते एक मोठा महामार्ग खुला करत आहेत आणि आणखी एक काम झाले आहे. या बोधचिन्हाचे लोकार्पण झाले आहे आणि ते देखील पृथ्वीविषयी, या धरतीमातेचे आपल्यावर असलेले ऋण आपण चुकवले पाहिजे याची प्रेरणा देत आहे. आपल्याला असे वाटत असते की आपल्याला प्राणवायू देत राहणे ही वृक्षाची जबाबदारी आहे, या वृक्षाला वाचवणे ही आपली जबाबदारी नाही, आपण आपले हक्क घेऊन आलो आहोत आणि तो त्या ठिकाणी उभा राहील आणि आपल्याला प्राणवायू देत राहील. आपला तर जणू काही तो अधिकारच आहे, ही धरणी माता आहे तिची ही जबाबदारी आहे की तिच्या मुलांचे, तिची अपत्ये या नात्याने आपले देखील हे उत्तरदायित्व आहे . जर आपल्याला प्राणवायू देण्याची जबाबदारी वृक्षाची आहे तर माझे देखील हे कर्तव्य आहे की त्याची योग्य प्रकारे मी देखभाल करेन आणि जेव्हा हा व्यवहार, या जबाबदा-या असंतुलन निर्माण करतात, देणारा देत राहतो आणि घेणारा काहीही न करता त्याचा उपभोग घेत राहतो, तेव्हा समाजात असमानता निर्माण होते, व्यवस्थांमध्ये असंतुलन निर्माण होत राहते आणि त्यामुळेच जागतिक उष्मावाढीसारखी समस्या निर्माण होते.

 

आज सर्व जग हे सागंत आहे की पाण्याची समस्या सर्व मानव जमातीसाठी एक मोठे आव्हान बनणार आहे त्यासाठी  आपण हे कधीही विसरता कामा नये की एक ग्लास पाणी जरी आपण पीत असू किंवा बादलीभर पाण्यात अंघोळ करत असू तर तो आपल्या कष्टांचा परिणाम नाही किंवा ते आपल्या वाट्याचे देखील नाही. आपल्या पूर्वजांनी अतिशय समजुतदारपणे जे काम केले आणि आपल्यासाठी काही तरी ते सोडून गेले, त्यामुळे ते प्राप्त झाले आहे आणि हे आहे ते आपल्या भावी पिढीचे आहे आणि आज मी पिढीचे खात आहे. माझी देखील ही जबाबदारी आहे की माझे पूर्वज ज्या प्रकारे माझ्यासाठी काही सोडून गेले त्याच प्रकारे मला देखील माझ्या पुढच्या पिढीसाठी काही तरी मागे सोडून गेले पाहिजे. ही भावना जागृत करण्याचा प्रयत्न, पर्यावरणाच्या रक्षणाची एक खूप मोठी चळवळ धर्मस्थळापासून सुरू होत आहे. मला असे वाटते की हे संपूर्ण ब्रह्मांडाच्या सेवेचे कार्य आहे.

 

आपण कशा प्रकारे या निसर्गाशी एकरुप झाले पाहिजे. 2022, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत. धर्मस्थळापासून एवढी मोठी चळवळ सुरू झाली  आहे आणि एकदा का धर्मस्थळापासून चळवळ सुरू झाली असेल, डॉक्टर हेगडेजींचा आशीर्वाद असेल तर तिची यशस्विता निश्चित होते.

 

आज आपली बुद्धी, शक्ती आणि लोभ यांच्यामुळे आपण या धरतीमातेला जितके ओरबाडत आहोत, ओरबाडतच राहत आहोत, आपण कधीही या आईची पर्वा केली नाही की माझी आई आजारी तर पडली नाही ना? पूर्वी एक पीक घेतले जायचे, आता दोन घेऊ लागलो, तीन घेऊ लागलो, अधिकाधिक घेऊ लागलो. जास्त मिळवण्यासाठी औषधे टाकत राहिलो, रसायने टाकत राहिलो, खते टाकत राहिलो, तिचे काय होईल ते होईल, मला तात्काळ फायदा मिळाला पाहिजे, याच भावनेने आपण चालत राहिलो. जर हीच स्थिती राहिली तर आपण कुठे जाऊन थांबू हेच ठाऊक नाही.

 

डॉक्टर हेगडे यांच्या नेतृत्वाखाली धर्मस्थळ येथे आपण एक संकल्प करू शकतो का?

आपल्या या सर्व क्षेत्रातील शेतकरी हा संकल्प करू शकतील का? की 2022 पर्यंत, जेव्हा देशाच्या  स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत तेव्हा आपण जो युरियाचा वापर करतो त्या वापराला 50 टक्क्यांवर आणू. आज जितके करत आहोत, त्याच्या निम्मे करू. तुम्ही पाहा धरती मातेच्या रक्षणासाठी केवढी मोठी सेवा होईल. शेतक-याच्या पैशाची बचत होईल, त्याचा खर्च वाचेल, उत्पादनात कोणतीही घट होणार नाही आणि त्यानंतरही त्याचे शेत आणि आजूबाजूचा परिसर, ती धरती माता आपल्याला आशीर्वाद देईल, ते जास्त अतिरिक्त नफ्याचे कारण बनेल.

त्याच प्रकारे पाणी, आपल्याला माहीत आहेच कर्नाटकात दुष्काळामुळे कशा प्रकारची स्थिती निर्माण होते, पाण्याशिवाय कसे संकट येते आणि मी तर पाहिले आहे, येदुरप्पाजी, सुपारीचे भाव कोसळले तर, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला येऊन गळ घालायचे मोदीजी तुम्ही खरेदी करा पण आमच्या मंगलोर भागाला वाचवा, धावत यायचे माझ्याकडे.

 पाणी, आपले शेतकरी सूक्ष्म जलसिंचनाच्या दिशेने, ठिबक सिंचन, ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’, हा संकल्प सोबत घेऊन पुढे जाऊ शकतात काथेंब थेंब पाणी, एका मोत्याप्रमाणे याचा उपयोग कसा होईल, मोत्यासारखे मूल्य असलेले थेंब थेंब पाण्याचे मोल समजून कशा प्रकारे काम करू, जर या गोष्टींना विचारात घेऊन आपण वाटचाल केली तर मला विश्वास आहे की आपण एक खूप मोठा बदल घडवू शकतो.

जेव्हा मी डिजिटल इंडिया विषयी बोलत होतो, भारत सरकारने आताच एक नवा उपक्रम सुरू केला आहे –जेईएम. ही एक अशी व्यवस्था आहे जी विशेष करून आपले जे बचत गट आहेत त्यांना मी निमंत्रण देत आहे, जो कोणी उत्पादन करतो, ज्याला आपले उत्पादन विकायचे आहे, त्याला भारत सरकारचे हे जे जेईएम पोर्टल आहे त्यावर आपली नोंदणी करू शकतो ऑनलाइन आणि भारत सरकारला ज्या गोष्टींची गरज आहे, राज्य सरकारांना ज्या गोष्टीची गरज आहे ते देखील यावर जात असतात, सांगतात की आम्हाला इतक्या खुर्च्या पाहिजेत, इतकी टेबल्स हवी आहेत, इतके ग्लास हवे आहेत, इतके रेफ्रीजरेटर हवे आहेत, जी काही त्यांची गरज आहे त्याची मागणी ते यावर टाकत असतात आणि जे जेईएमवर नोंदणीकृत असतात, गावातील लोक देखील येतात बघा आमचा माल आहे, माझ्याकडे पाच वस्तू आहेत मला विकायच्या आहेत, पूर्णपणे पारदर्शक व्यवस्था आहे.

 

गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी मी याची सुरुवात केली, नवीन गोष्ट होती, पण पाहता पाहता देशातील सुमारे 40 हजार अशी उत्पादने बनवणारे लोक या जेईएममध्ये समाविष्ट झाले. देशातील 15 राज्ये, त्यांनी सामंजस्य करार केला आणि हजारो कोटी रुपयांचा व्यवहार, सरकारला जे खरेदी करायचे असते ते जेईएमच्या माध्यमातून येते. निविदा नसतात, पडद्यामागे काहीही होत नाही, सर्व गोष्टी संगणकावर समोर असतात. जी वस्तू पूर्वी 100 रुपयात मिळायची, आज अशी स्थिती आहे ती सरकारला 50 आणि 60 रुपयात मिळायला लागली आहे.

निवडीसाठी वाव मिळतो आणि पूर्वी मोठमोठे लोक पुरवठा करायचे. आज गावातील एक गरीब व्यक्ती देखील एखादी वस्तू बनवत असेल; तर तो देखील सरकारला पुरवठा करू शकतो. ही सखी, आपले हे जे महिला बचत गट आहेत, ते आपली उत्पादने त्यात विकू शकतात. मी त्यांना निमंत्रण देत आहे.

 

आणि मी कर्नाटक सरकारला देखील आग्रह करत आहे, भारतातील 15 राज्ये, यांनी भारत सरकारसोबत जेईएम चा सामंजस्य करार केला आहे. कर्नाटक सरकारने देखील उशीर करू नये. पुढे यावे. यामुळे कर्नाटक मध्ये जी सामान्य व्यक्ती उत्पादन तयार करते तिला एक खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. सरकार एक मोठा खरेदीदार असतो. ज्याचा फायदा येथील गरीबातील गरीब व्यक्ती जी काही वस्तू बनवत असेल तिला एक चांगली हमी असलेली बाजारपेठ मिळेल आणि हमी रक्कम देखील मिळेल.

 

मला असे वाटते की कर्नाटक सरकार या निमंत्रणाचा स्वीकार करेल आणि कर्नाटकचे जे सामान्य लोक आहेत, त्यांच्या फायद्यात जे काही आहे त्याचा त्यांना लाभ मिळेल.

 

आम्ही आधार, आज तुम्ही पाहिले, रुपे कार्डाला आधारने जोडले आहे, मोबाईल फोनला जोडले आहे, बँकेच्या सेवा मिळत आहेत. आपल्या देशात गरीबांना फायदा मिळावा अशा अनेक योजना सुरू असतात. पण हेच कळत नाही की ज्यांच्यासाठी या योजना आहेत, त्यांना त्याचे फायदे मिळतात की  कोणा दुस-याला दिले जातात हेच कळत नाही? मध्येच कुठे गळती तर होत नाही आहे ना?

आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कधी काळी म्हटले होते दिल्लीतून एक रुपया निघतो, गावात पोहोचेपर्यंत त्याचे 15 पैसे होतात. या रुपयांना घासणारा पंजा कोणाचा असतो? हा कोणता पंजा आहे जो रुपया घासून घासून 15 पैसे बनवतो? आम्ही निर्धार केला की दिल्लीतून एक रुपया निघाला तर गरीबाच्या हातात 100 च्या 100 पैसे पडतील, 99 नाही आणि त्याच गरीबाच्या हातात पोहोचतील, ज्याच्यावर त्याचा अधिकार आहे. आम्ही थेट लाभ हस्तांतरण योजना चालवली आहे. नोंदणी केली आणि मी या पवित्र स्थानावर बसलो आहे, डॉक्टर वीरेंद्र हेगडेजींच्या बाजूला बसलो आहे, येथील पावित्र्याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रामाणिकपणाचा पूर्ण अंदाज आहे आणि या पवित्र स्थानावरून मी सांगत आहे; आमच्या या एका प्रयत्नामुळे आतापर्यंत, आता तरी सर्व राज्ये आमच्याशी संलग्न नाहीत. काही राज्यांनी पुढाकार घेतला आहे, भारत सरकारने अनेक प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. आतापर्यंत 57 हजार कोटी रुपये, 57 हजार कोटी रुपये जे आतापर्यंत कोणत्या तरी बेकायदेशीर लोकांच्या हातात जात होते, चोरी होत होते ते सर्व बंद झाले आणि योग्य लोकांच्या हाती योग्य पैसा जात आहे.

 

आता मला सांगा ज्यांच्या खिशात दर वर्षी 50-60 हजार कोटी जात होते, त्यांच्या खिशात जाणे बंद झाले, त्या लोकांना मोदी आवडू शकतील का? त्यांना मोदी यांचा राग येणार की नाही? मोदींचे केस उपटतील की नाही उपटणार?

तुम्ही पाहत आहात मित्रांनो, पण मी एका अशा पवित्र स्थानावर उभा राहून हे सांगत आहे की मी असेन वा नसेन, पण या देशाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आम्ही स्वतःसाठी जगणे कधी शिकलोच नाही. आम्ही बालपणापासूनच इतरांसाठी जगण्याचे शिक्षण घेऊन आलो आहे.

आणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, माझ्यासाठी हे भाग्याचे आहे- एक विचार माझ्या मनात आला आहे आणि तो देखील डॉक्टर वीरेंद्रजींच्या समोर मांडण्याची हिंमत करत आहे. मी त्यातील शास्त्रीय गोष्टींचा जाणकार नाही. पण एक सर्वसामान्य माणूस या नात्याने सांगतो आणि असे मानतो की तुम्ही ते करून दाखवाल. आपले जे सागर किनारे आहेत, मंगलोरच्या बाजूला काही सागर किनारे आहेत. समुद्र किना-यावर जे मच्छिमार बंधू-भगिनी काम करतात, त्यांना वर्षातील काही महिनेच काम मिळते. नंतर पावसाळा सुरू झाला की रजेचा काळ सुरू होतो.  या सागर किना-यावर आणखी एक काम आपण करू शकतो. खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ते आहे सी वीड म्हणजेच सागरी शैवालाची शेती.

 

लाकडाचा एक तराफा बनवावा लागतो आणि त्यामध्ये काही सागरी शैवाल टाकून समुद्र किना-याच्या काठाशी सोडून द्यायचे पाण्यात. तो तराफा तरंगत राहतो आणि 45 दिवसात शेती तयार होते. दिसायला खूप सुंदर असतात, खूपच सुंदर दिसतात आणि भरपूर पाण्याने भरलेली असतात.

 

आज औषधनिर्मिती जगतामध्ये ही वनस्पती अतिशय सामर्थ्यशाली मानले जाते. मात्र मी आणखी एक काम सुचवत आहे. आपल्या येथे समुद्र किना-यावर महिला बचत गटांमार्फत अशा प्रकारची सागरी शैवालाची शेती झाली पाहिजे. 45 दिवसात पीक यायला सुरुवात होईल, 12 महिने पीक मिळत राहील आणि या ही जी रोपे असतील , त्यांचा उपयोग शेतकरी जेव्हा जमीन नांगरतील तेव्हा जमिनीमध्ये मिसळायला होईल. त्यामध्ये भरपूर पाणी असते आणि त्यात पोषण मूल्ये देखील मोठ्या प्रमाणात असतात. एकदा या धर्मस्थळाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये हा प्रयोग करून बघा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सागरी शैवालाची ही रोपे खूपच उपयुक्त ठरतील, अशी मला खात्री वाटते. बरीच मोफत तयार होतात. त्यामुळे आमच्या मच्छिमार बांधवांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यात जे पाण्याचे प्रमाण आहे त्यामुळे जमीनीमध्ये पाण्याचा अंश वाढतो. खूपच ताकदवान बनवतात. हा प्रयोग धर्मस्थळापासून सुरू व्हावा अशी माझी इच्छा आहे. जर या ठिकाणी काही प्रयोग करायचे असतील तर तुमचे शास्त्रज्ञ आहेत, तुमच्या शिक्षण क्षेत्रातील लोक आहेत, त्याचा जो अभ्यास करण्यात येईल, त्याचा अहवाल मला नक्की पाठवा. सरकारला हे काम मी कधीही सांगितलेले नाही. मी पहिल्यांदा या ठिकाणी हे सांगत आहे. कारण हे ठिकाण असे आहे की तुम्ही प्रयोग कराल असे मला वाटत आहे आणि सरकारच्या कामांमध्ये वेगवेगळ्या नियमांच्या आदेशांच्या मर्यादा येत असतात. पण तुम्ही ते काम मोकळेपणाने करू शकाल आणि जमिनीमध्ये इतका बदल होईल, उत्पादन इतके वाढेल, कधीही दुष्काळाच्या स्थितीतही आपल्या शेतक-याला त्रास होणार नाही. तर धरती मातेच्या रक्षणासाठी आपल्याकडे अनेक प्रकल्प आहेत, त्या सर्वांना घेऊन वाटचाल करुया.

 

मी आज पुन्हा एकदा या ठिकाणी आलो आहेडॉक्‍टर वीरेन्‍द्रजींचे मला आशीर्वाद मिळाले. मंजुनाथेश्‍वराचे  आशीर्वाद मिळाले. एक नवीन प्रेरणा मिळाली, नवा उत्‍साह मिळाला. जर या भागातील सर्वसामान्य  सुशिक्षित माता-भगिनी, 12 लाख भगिनी, जर रोकडरहित व्यवहारासाठी पुढाकार घेत आहेत, तर मी या संपूर्ण जिल्ह्याला आवाहन करेन की आपल्याला या भगिनींच्या वाटचालीमध्ये मागे पडून चालणार नाही.  या महिला बचत गटांकडून आपणही भीमऍपचा वापर करायला शिकले पाहिजे. आपणही रोखरहित व्यवहार शिकले पाहिजे. प्रामाणिक लोकांना आपण जेवढे बळ देऊ तेवढीच अप्रामाणिक लोकांची संख्या कमी होईल. एक काळ होता जेव्हा अप्रामाणिक लोकांना खूप बळ मिळाले होते, आताच्या काळात प्रामाणिक लोकांना बळ मिळेल आणि हेच बळ आहे. जर आपण दिवा लावला तर अंधकार दूर होणार हे निश्चित आहे. अगर आपण प्रामाणिकपणाला बळ दिले तर अप्रामाणिकपणाचे उच्चाटन होणार हे नक्की. हाच एक संकल्प करून पुढे गेले पाहिजे. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.डॉक्‍टर वीरेन्‍द्र हेगड़े यांना माझ्या शुभेच्छा आणि त्यांना मी प्रणाम करतो 50 वर्षांचा सुदीर्घकाळ आणि येणा-या 50 वर्षांपर्यंत ते अशाच प्रकारे देशाची सेवा करत राहोत.

 

खूप खूप धन्यवाद !

 
PIB Release/DL/1747
बीजी -शै.पा. -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau