This Site Content Administered by
पंतप्रधान

जागतिक अन्नपरिषद २०१७ मध्ये पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 3-11-2017

मान्यवर,

उद्योग आणि व्यापार क्षेत्रातले प्रतिनिधी,

आणि माझ्या बंधू-भगिनीनो,

अन्नप्रक्रिया क्षेत्रातले जागतिक नेते आणि दिग्गज मंडळीच्या या संमेलनात सहभागी होण्यात मला विशेष आनंद होतो आहे. जागतिक अन्न परिषद, 2017मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.

या संमेलनादरम्यान, तुमच्या लक्षात येईल की भारतात अन्नप्रक्रिया क्षेत्रात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत. अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या आमच्या साखळीमध्ये किती मोठी क्षमता आहे याचेही दर्शन तुम्हाला या कार्यक्रमात होईल.या कार्यक्रमात तुम्हाला अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या हितसंबंधी भागधारकांना भेटण्याची आणि त्यातून या उद्योगात भरभराट करण्याची संधी मिळेल. त्याशिवाय भारतातील विविध पदार्थ, ज्यांनी जगभरातल्या खाद्यरसिकांची रसना तृप्त केली आहे, जिभेचे चोचले पुरवले आहेत, असे अनेक पदार्थ तुम्हाला या संमेलनात चाखायला मिळतील.

बंधू-भगिनीनो,

कृषी क्षेत्रात भारताची ताकद विविधांगी आणि अपार आहे. जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लागवडयोग्य जमीन आणि सुमारे 127 विविध कृषी-हवामान क्षेत्रे यामुळे अनेक पिके, जशी केळी, आंबा, पेरू, पपई आणि भेंडीसारख्या कृषीउत्पादनामध्ये भारत आज पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय तांदूळ, गहू, मासे, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात आमही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. भारत आज जगातला सर्वाधिक मोठा दुग्धउत्पादक देश आहे. भारतीय भाज्या  -फुलउत्पादक क्षेत्राने गेल्या दहा वर्षात सरासरी वार्षिक 5.5. टक्के विकासदर कायम राखला आहे.

गेल्या अनेक शतकांपासून भारताने विविध मसाल्यांच्या शोधात देशात येणाऱ्या दूरवरच्या व्यापाऱ्यांचे स्वागत करण्याची परंपरा कायम राखली आहे.भारताकडे झालेल्या त्यांच्या प्रवासामुळे अनेकदा इतिहासात मोठे बदल झालेले आहेत. युरोप आणि दक्षिण पूर्व आशियासोबत ‘स्पाईस रूट’ म्हणजेच मसाल्यांच्या मार्गाने भारताचा कित्येक वर्षांपासून सुरु असलेला व्यापार तर सर्वपरिचितच आहे. ख्रिस्तोफर कोलंबस देखील भारतीय मसाल्यांमुळे आकर्षित होऊन भारतात येण्याचा पर्यायी मार्ग शोधत असताना अमेरिकेला पोचला होता.

अन्नप्रक्रिया या भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. अन्नप्रक्रिया ही आमच्या देशातल्या अगदी साध्यासुध्या घरात गेल्या कित्येक वर्षांपासून वापरली जाणारी पध्दत आहे. साध्या घरगुती तंत्राने, जसे आंबवण्याच्या क्रियेतून आम्ही आमची विख्यात लोणची बनवतो, त्याशिवाय पापड, चटण्या, मुरांबे असे पदार्थ, जे आज उच्चभ्रू  आणि सर्वसामान्य अशा दोन्ही वर्गात लोकप्रिय आहेत, ते आम्ही अन्नप्रक्रीयेतूनच बनवले आहेत.

बंधू आणि भगिनीनो,

आपण आता, थोडा वेळ,एका मोठ्या, विस्तृत चित्राकडे नजर टाकूया.

भारत आज जगातल्या सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जीएसटी म्हणजेच, वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यामुळे, गुंतागुंतीची बहुस्तरीय कररचना सोपी झाली आहे. व्यापारपूरक देशांच्या जागतिक बँकेच्या यादीत यावर्षी भारत 30व्या स्थानावर पोहचला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भारताच्या उद्योगस्नेही वातावरणात झालेली ही सर्वात मोठी सुधारणा आहे. कोणत्याही देशाने केलेली ही मोठी कामगिरी आहे. 2014 साली आपण या यादीत 142 व्या स्थानावर होतो, आज आपण पहिल्या 100 देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

2016 साली ग्रीनफिल्ड गुंतवणूकीच्या यादीत भारत पहिल्या स्थानी होता. जागतिक संशोधन निर्देशांक, जागतिक कार्य निर्देशांक, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक अशा सर्व निर्देशांकात भारत वेगाने प्रगती करतो आहे.

भारतात एखादा नवा उद्योग-व्यवसाय सुरु करणं आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. विविध यंत्रणाकडून परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. जुने कालबाह्य कायदे रद्दबातल करण्यात आले आहेत. उद्योगांसाठीच्या परवान्यांचे ओझे कमी करण्यात आले आहे.

 आता मी विशेषत्वाने अन्नप्रक्रिया उद्योगांविषयी बोलणार आहे.  

सरकारने आतापर्यंत या क्षेत्रात सुधारणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. आज अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी जगाची भारताला पहिली पसंती आहे. सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमात ह्या क्षेत्राला प्राधान्य आहे. या क्षेत्रात व्यापारासाठी आणि 100 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. यात भारतात तयार झालेल्या उत्पादनांच्या ई –कॉमर्स च्या माध्यमातून व्यापार करण्याचाही समावेश होतो. परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपे जावे, यासाठी एकल खिडकी सुविधा तयार करण्यात आली आहे. या गुंतवणुकीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकर्षक वार्षिक सवलती आणि योजनाही दिल्या जातात. अन्न आणि कृषी- आधारित प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी, शीतगृह साखळी अशा योजनांसाठीचे कर्ज त्वरित आणि सहज मिळावे यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नुकतेच आपण उद्‌घाटन केलेले पोर्टल निवेश बंधू – म्हणजेच गुंतवणूक मित्र यावर केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे तसेच, अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, या क्षेत्राविषयीची माहिती, सगळं तुम्हाला यावर उपलब्ध असेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरचे स्त्रोत, प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक बाबी हे सगळे देखील या पोर्टलवर उपलब्ध असेल. एवढंच नाही, तर शेतकरी, प्रकिया करणारे, व्यापारी आणि इतर सुविधा पुरवणाऱ्या अशा या उद्योगातल्या सर्व भागधारकांसाठी हे पोर्टल एक उत्तम व्यासपीठ असेल.

मित्रांनो,

मूल्यसाखळीच्या अनेक घटकात खाजगी क्षेत्रांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, काराराधारित शेती, कच्चा माल पुरवठा, आणि कृषी उद्योगांशी सांगड घालण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक होणे गरजेचे आहे. भारत हा एक मोठा पुरवठादार देश असल्याने जागतिक सुपर- मार्केट साखळीसाठी ही एक मोठी संधीच आहे.

तर दुसरीकडे, देशात पिक तयार झाल्यावर, त्याचे व्यवस्थापन, म्हणजेच प्राथमिक प्रक्रिया आणि साठवण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शीतगृह साखळी आणि शीतगृहांचे व्यवस्थापन, अशा संलग्न उद्योगातही मोठ्या संधी आहेत. अन्नप्रक्रिया आणि मूल्यवर्धन, विशेषतः सेंद्रिय आणि पोषक द्रव्ये यात तर मोठाच वाव आहे.

शहरीकरण आणि त्यासोबत मध्यमवर्गाची वाढती संख्या, यामुळे सर्वंकष आणि प्रक्रियाकृत अन्नाची मागणी वाढते आहे. मी तुम्हाला केवळ एक आकडेवारी सांगतो. भारतात, दररोज रेल्वेगाड्यांमध्ये दहा लाखपेक्षा अधिक लोक आपले जेवण घेतात.यातली प्रत्येक व्यक्ती अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी ग्राहक आहे. अशा प्रकारच्या अनेक मोठ्या संधी तुमच्यासमोर वाट बघत आहेत.

बंधू आणि भगिनीनो,   

जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण आता वाढत चालले आहे. त्यामुळेच जगभरात अन्नसेवन आणि त्याच्या दर्जाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. कृत्रिम रंग, रसायने आणि अन्न टिकवणारे घटक घालण्याविषयी आता लोक उत्सुक नसतात. अशा स्थितीत भारत यावर तोडगा सुचवू शकतो, परदेशी आणि  भारतीय उद्योजकांमध्ये एक उत्तम भागीदारी होऊ शकते.

पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ, आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, प्रक्रिया आणि बांधणी अशा सगळ्याची सांगड घातली तर, त्यातून जगाला आरोग्यदायी अन्न आणि भारतातील रुचकर चव यांचे अभिनव पदार्थ मिळू शकतील. स्वच्छ, आरोग्यदायी, पोषक आणि चविष्ट अशा सर्व मागण्या पूर्ण करणारे खाद्यपदार्थ आपल्याला बाजारात आणता येतील. त्यात आरोग्यासाठी उत्तम  असे रोगप्रतिबंधक घटक घालून आपण अगदी माफक किमतींत असे पदार्थ तयार करू शकतो.

भारतात तयार होणारे प्रक्रियाकृत अन्न, जागतिक दर्जाविषयी प्रमाणित पातळीला पोहचतील, यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणन प्राधिकरण प्रयत्न करत आहे. पदार्थांमध्ये टाकले जाणारे घटक, कोडेक्सच्या प्रमाणित दर्जाशी सुसंगत असावेत, तसेच चाचणीसाठी एक उत्तम अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, अशा प्रयत्नातून आम्ही देशात अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.

बंधू आणि भगिनीनो,

आपले शेतकरी, ज्यांना आपण आदराने अन्नदाता म्हणतो, ते या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या केंद्रस्थानी आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठरवले आहे. यासाठीच आम्ही नुकतेच ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना हे एक राष्ट्रीय अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत आम्ही भारतात जागतिक दर्जाच्या अन्नप्रक्रिया पायाभूत सुविधा राबवणार आहोत. या योजनेत पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होणे अपेक्षित असून त्याचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना होईल. यातून पुढच्या तीन वर्षात देशात 5 लाख रोजगार निर्मिती होण्याचीही क्षमता आहे. 

‘मेगा फूड पार्क’ ची निर्मिती ह्या योजनेचा महत्वाचा घटक आहे. या फूड पार्क्सच्या माध्यमातून मुख्य उत्पादक केंद्रांशी कृषी प्रक्रिया उद्योग जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे बटाटे, अननस, संत्री आणि सफरचंद यासारख्या पिकांना उत्तम किंमत मिळू शकेल. अशा फूड पार्क मध्ये शेतकऱ्यांच्या गटांनी आपले विभाग तयार करावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. त्यामुळे शेतमालाची नासाडी टळेल, वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि नवे रोजगारही निर्माण होतील. असे नऊ फूड पार्क आधीच सुरु झाले असून आणखी 30 फूड पार्क सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.

शेवटच्या घटकापर्यंत माल पोहोचविण्यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रशासनात सुधारणा करतो आहे. ठराविक कालमर्यादेत सर्व गावे ब्रॉडबँडने जोडण्याची योजना आहे. जमिनीसंबंधीची सर्व माहिती संगणकीकृत करण्यात येत आहे आणि जनतेला अनेक सुविधा मोबाईल फोनवर पुरविण्यात येत आहेत. ह्या उपायांमुळे शेतकऱ्यांना माहिती, ज्ञान आणि कौशल्याविषयी त्वरित माहिती मिळू शकेल. ई-नाम या आमच्या राष्ट्रीय कृषी ई-बाजारपेठेमुळे देशभरातल्या कृषी बाजारपेठांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळाले आहे. यातून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक किंमत आणि माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते.

सहकार्य आणि स्पर्धात्मक संघराज्याचा खरा आत्मा आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत बघायला मिळतो. अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून राज्य सरकारेही काम करत आहेत. गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी तर आकर्षक अन्नप्रक्रिया धोरण बनवले आहे. प्रत्येक राज्याने आपली विशेषता म्हणून किमान एक तरी अन्न उत्पादन निवडावे हा माझा आग्रह आहे.

बंधू भगिनींनो,

आपला शेतीचा मजबूत पाया आज आपल्यासाठी सशक्त अन्न प्रक्रिया क्षेत्र तयार करण्यासाठी एक सक्षम लाँचपॅड आहे. आपली विशाल बाजारपेठ, जनतेचे वाढते उत्पन्न, गुंतुवणूकीला अनुकूल वातावरण आणि उद्योग स्नेही सरकार या सर्वांमुळे जागतिक अन्नप्रक्रिया उद्योगासाठी भारत सर्वात योग्य ठिकाण आहे. 

भारताच्या अन्नप्रक्रिया उद्योगाशी संलग्न असलेल्या प्रत्येक क्षेत्रात अपार संधी आहेत. मी आपल्याला थोडी कल्पना देतो.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय एक महत्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. दुग्ध उत्पादनांची संख्या वाढवून ह्या व्यवसायाला वरच्या पायरीवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मध हे निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान आहे. त्यातून मेणासारखी अनेक मूल्यवान सह उत्पादने घेता येतात. शेतकऱ्यांचे उत्पादन अनेक पटींनी वाढविण्याची क्षमता यात आहे. सध्या जगात मध उत्पादन आणि निर्यातीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. आता भारत एका मधुर क्रांतीसाठी पूर्णपणे तयार आहे.

जागतिक मत्स्योत्पादनात भारताचे योगदान सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोळंबी निर्यातीत जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतातून जगातील 95 टक्के देशांना मत्स्योत्पादनाची निर्यात होते. नील क्रांती द्वारे सागरी अर्थव्यवस्थेत मोठे पाऊल टाकण्याचे आमचे ध्येय आहे. आजवर अपरिचित असलेल्या क्षेत्रांमध्ये विकास करण्यावर आमचा भर आहे. उदाहरणार्थ शोभिवंत मासे आणि गोड्या पाण्यातील ट्राउट माशाची शेती. मोत्यांची शेती करण्याच्या क्षेत्रातही संशोधन करण्याचा आमचा मानस आहे. शाश्वत विकास करण्याविषयीची आमची कटिबद्धता ही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्रस्थानी आहे. ईशान्य भारतातील राज्य सिक्कीम हे भारतातलं पहिलं संपूर्ण सेंद्रीय राज्य बनलं आहे. किंबहुना, संपूर्ण ईशान्य भारतातच सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संधी आहेत.

मित्रांनो,

भारतीय बाजारपेठांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर, भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चवी यांची माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास दुग्धजन्य पदार्थ आणि फळांचे रस घालून तयार केलेले पेय भारतीय खानपान पद्धतीतला अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांना मी नेहमीच आवाहन करत असतो की त्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये पाच टक्के तरी फळांचे रस घालावेत.

अन्नप्रक्रिया क्षेत्रात पोषक द्रव्यांच्या सुरक्षेविषयी देखील उत्तर आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास आमची भरड धान्ये आणि बाजरी यामध्ये भरपूर पोषक मुल्ये आहेत. अत्यंत विपरीत हवामानाच्या स्थितीतही ही धान्ये तग धरु शकतात. अशा पिकांना पोषणयुक्त आणि विपरीत हवामानात तग धरणारी असंच म्हटलं पाहिजे. या धान्यांवर प्रक्रिया करण्याचा काही उद्योग आपण संयुक्तरीत्या हाती घेऊ शकत नाही का? असे झाले तर, आमच्या देशातल्या अत्यंत गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि दुसरीकडे आपल्याला पोषक खाद्य पदार्थ उपलब्ध होतील. अशा खाद्यपदार्थांना संपूर्ण जगात मान्यता मिळायला हवी.

आपण आपल्या क्षमता आणि जागतिक गरजा यांची सांगड घालू शकतो का? भारतीय खाद्यपरंपरा आणि मानवजातीचे भविष्य यांना आपण जोडू शकतो काभारतातील शेतकरी आणि जागतिक बाजारपेठ यांच्यात आपण समन्वय घडवून आणू शकतो का? अशा काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही या संमेलनात शोधावी, अशी माझी इच्छा आहे.

मला विश्वास आहे की जागतिक अन्न परिषदेत या दिशेने काही ठोस पावले उचलली जातील, असे झाल्यास भारतीय पाककलेची विविधता आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील आमचे प्राचीन ज्ञान याचीही जगाला माहिती मिळेल.

या परिषदेच्या निमित्तानं भारतीय खाद्यपदार्थांची वैशिष्ट्ये दाखविणाऱ्या चोवीस टपाल तिकिटांचे अनावरण भारतीय टपाल खात्याने केले आहे याचा मला विशेष आनंद आहे. 

बंधू भगिनींनो, भारतीय अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या विकासाच्या या रोमांचक प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आमंत्रण मी यावेळी तुम्हाला देतो. तुम्हा सर्वांना आवश्यक असेल त्या प्रत्येक वेळी संपूर्ण पाठिंबा आणि मदत मिळेल अशी ग्वाहीही मी देतो.

या, आणि भारतात गुंतुवणूक करा.

शेतापासून ताटापर्यंत अमर्याद संधी असलेल्या या देशात,भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी उत्पादन, प्रक्रिया आणि समृद्धी असलेल्या या देशात, तुम्ही नक्की या.

धन्यवाद.

 
PIB Release/DL/1754
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau