This Site Content Administered by
पंतप्रधान

बंगळुरु येथे दशम: सौंदर्य लहरी पारायणोत्सव महासमर्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 29-10-2017

वेदांत भारतीशी निगडित सर्व महान व्यक्ती, स्त्री आणि पुरुष गण,

एक जुनी श्रद्धा आहे कि जेव्हा एकाच जागी, एकाच सुरात मंत्र म्हटले जातात, तेव्हा त्या एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण होते जी मन ,शरीर आणि आत्म्या यावर ताबा मिळवते. त्याच संदर्भात आपल्याकडे नाद-ब्रह्म ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. आधुनिक विज्ञानानेही मंत्रोच्चारांचे सामर्थ्य नाकारलेले नाही. आज दक्षिणामूर्ती आणि सौंदर्य लहरींच्या या अदभुत मंत्रांतून वातावरणात त्याच ऊर्जेची अनुभूती मला येत आहे. या दिव्य अनुभूतीत केवळ रसच नाही तर रहस्य आणि ईश्वराबरोबर रममाण होण्याची अदम्य इच्छा देखील आहे.

सौंदर्य लहरीच्या प्रत्येक मंत्रात एक वेगळीच शक्ती आणि एक वेगळीच भावना आहे. ती भावना, ती शक्ती या क्षणी आपल्याला सर्वांना एक नवीन चेतना, नवीन ऊर्जेने भारावून टाकत आहे. मी सुदैवी आहे कि गेली कित्येक वर्षे मी नवरात्रीशी जोडलेला आहे आणि माझ्या नवरात्रीच्या आराधनेत सौंदर्य लहरीला देखील स्थान आहे.

मी परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांना वंदन करतानाच वेदांत भारतीचेही आभार मानतो. त्यांनी मला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आणि या भावविश्वात काही क्षण व्यतीत करण्याची संधी मला दिली. हे माझे सौभाग्य आहे कि श्री श्री शंकर भारती महास्वामी यांच्या सान्निध्यात सौंदर्य लहरीच्या पठणाचा साक्षात अनुभव आज मला मिळाला. स्वामीजींच्या आशीर्वादाने सौंदर्य लहरीच्या पठणाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत.

तुम्हा सर्वांचे  माझ्याकडून खूप-खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. आणि मला वाटते कि तुम्ही नशीबवान आहात ,या पवित्र कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकलात. बंधू-भगिनींनो, आठ दहा दिवसांपूर्वी मी केदारनाथला गेलो होतो. मंदिराची दारे बंद होणार होती. मी सुदैवी होतो, महादेवाचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. जेव्हा जेव्हा मी केदारनाथला जातो, माझ्या मनात वारंवार एक विचार येतो. हजारो वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य या दुर्गम ठिकाणी कसे पोहोचले असतील?

आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात आजही जिथे जाणे सोपे नाही, तिथे हजार वर्षांपूर्वी आदि शंकर कसे पोहचले असतील ? अशी कोणती अंतर्यामी ऊर्जा आणि  सामर्थ्य असेल, ज्याच्या शक्तीमुळे केवळ 32 व्या वर्षी शंकराचार्यजींना संपूर्ण भारताची तीनदा पायी परिक्रमा करण्याची आणि देशाच्या चार कोपऱ्यात चार मठ स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली असेल. भारताला सांस्कृतिक दृष्ट्या  एका माळेत गुंफण्याचा अदभुत यशस्वी प्रयत्न त्यांनी केला.

आदि शंकराचार्यजीनी त्यांचे आयुष्य आपल्या आध्यात्मिक परंपरा मजबूत करण्यासाठी समर्पित केले. आपल्या संस्कृतीत ज्या चुकीच्या परंपरा हळू-हळू समाविष्ट झाल्या  होत्या, त्यांचे आदि शंकराचार्यजीनी अतिशय बारकाईने विश्लेषण केले आणि त्या वयात आपल्या अंतर्मनातील वाईट प्रवृत्तींवर टीका करण्याची हिंमत त्यांनी दाखवली. योग्य युक्तिवाद करून त्यांनी भावी पिढीला त्या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न केले. शिव-शक्ति-विष्णू-गणपती आणि कुमार यांची पूजा एकाच वेळी करण्याच्या परंपरेला त्यांनी बळ दिले. भारतीय परंपरा त्यांनी पुन्हा एकदा पुनर्स्थापित केली. आदि शंकराचार्य यांनी वेद आणि उपनिषदांच्या ज्ञानाद्वारे संपूर्ण भारताला एकत्र आणले, एकतेच्या भावनेने जोडले. शास्त्राला त्यांनी साधन बनवले, शस्त्र बनू दिले नाही. वेगवेगळ्या विचारसरणी आणि तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केले आणि लोकांना ज्ञान आणि भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. भावी पिढ्यांसाठी त्यांनी सौंदर्य लहरीची रचना केली. एक अशी रचना जिच्याशी देशाचा सामान्य नागरिक जोडून घेऊ शकला. देवाची स्तुती करताना सौंदर्य लहरीमध्ये यावर विशेष भर देण्यात आला कि ईश्वराच्या विभिन्न रूपांमध्ये कोणताही भेद केला जाऊ नये.

एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति

सौंदर्य लहरीतून मिळालेला आशीर्वाद भक्तांमध्येही कुठल्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला समान मिळतो. असे म्हणतात कि सौंदर्य लहरीच्या पठणाने ज्ञान, धन, आरोग्य सर्वकाही प्राप्त होते. आदि शंकराचार्य यांनी केलेली तपश्चर्या भारतीय संस्कृतीच्या विद्यमान रूपात आजही कायम आहे. एक अशी संस्कृती  जी सर्वाना सामावून घेते , सर्वाना एकत्र आणते. आणि हीच संस्कृती नवीन भारताचाही आधार आहे. अशी संस्कृती जी सर्वांची साथ, सर्वांचा विकास मंत्रावर विश्वास ठेवते.

बंधू आणि भगिनींनो, आदि शंकराचार्य यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी श्री श्री शंकरभारती महास्वामीजी यांनी आपले आयुष्य वेचले. संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून एकात्मतेच्या भावनेचा आदि शंकराचार्य यांचा संदेश ते वेदांत भारतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत आहेत. विविध भाषांमधील वेद, उपनिषद आणि अनेक प्रकाशने आणि पुस्तकांशी ते जोडलेले आहेत. आणि हे काम त्यांनी  पुढे चालू ठेवले आहे. 

मित्रांनो, भारताचा आध्यात्मिक महिमा आणि प्राचीन संदेश जितके जास्त लोक वाचतील, तितका अधिक जगाला याचा लाभ होईल. श्रेष्ठ कोण, मोक्ष मिळवण्याचा मार्ग कुठला अशा संकटात गोंधळलेली मानवजात सापडली आहे. आदि शंकराचार्य यांनी अद्वैत किंवा एकात्मचा सिद्धांत दिला ज्यात द्वैतचे अस्तित्वच नाही. आणि जिथे द्वैत नाही, तिथे संघर्षाची शक्यता नाही. जगातील विविध भागांमध्ये जेव्हा जेव्हा जीवनाच्या मार्गात अडचणी येतात, तेव्हा त्या देशांची नजर भारताकडे वळते. अशा प्रकारे, जगातील सर्व समस्यांचे निराकरण आपल्या परंपरांद्वारे होऊ शकते. आपल्या आयुष्यात आपल्याला या परंपरा वारशाने मिळाल्या आहेत.

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु ।

सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

सर्वांचा विकास होवो आणि  सर्वांना शक्ती मिळो. आपण असे कधीही म्हणत नाही कि माझा विकास होऊ दे किंवा मलाच शक्ती मिळूदे. मंदिरांमध्ये आपण प्रार्थना करतो कि प्रत्येकाचा विकास होऊ दे आणि प्रत्येकजण सामर्थ्यवान बनू दे. ही आपली परंपरा आहे. कुणीही कुणाचा द्वेष करू नये.

आज या प्रसंगी, मी वेदांत भारतीच्या एका विशेष कार्यक्रमाचा उल्लेख करू इच्छितो, तो आहे - विवेकदीपनी आणि विवेक उत्कर्षानी स्पर्धा. खूप कमी लोकांना माहित असेल कि आदि शंकराचार्य, आपल्या आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृतीची ओळख होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. हे सर्व नष्ट करण्याचे प्रयत्न झाले मात्र हजारो वर्षे चालत आलेला हा आपला वारसा कुणीही संपवू शकलेले नाही.

दीन-ए-इलाही का बेबाक बेड़ा,

नक्शा जिसका अक्स-ए-आलम में पहुंचा।

किए पांच सौ पार सातों समुंद्र,

न अमन में ठिठका न कोई गुलजाम में झिझका।

वो डूबा दोहाब-ए में गंगा के अंदर।।

प्रदीर्घ काळ चाललेल्या गुलामगिरीमुळे आपल्या आध्यात्मिक ज्ञानावर परिणाम झाला आणि ते बहुतांशी पुस्तकांपर्यंतच सीमित राहिले. काही धर्मगुरुंकडे ते सुरक्षित आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न व्हायला हवे होते तसे केले गेले नाहीत. जर आजचा युवक मोबाईल फोनवरच सगळे काही वाचत असेल तर पुस्तकात दडलेल्या पारंपरिक ज्ञानाबाबत त्याला कशी माहिती कळणार? आपल्या या महान वारशाची ओळख त्याला कोण करून देईल? म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांना विवेकदीपनी कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृती आणि मूल्यांबाबत सांगणे हा स्वामीजींचा खूप छान उपक्रम आहे. भावी पिढ्यांसाठी देखील ही खूप मोठी सेवा आहे.

भारतीय तत्वज्ञानात कोणत्याही व्यक्तीचे अंतिम ध्येय मोक्ष प्राप्त करणे हे आहे. वेद आणि उपनिषदांतील तत्वज्ञान असे मानते कि 'व्यक्ती ' किंवा माणूस, 'समष्टी ' किंवा समाज आणि 'सृष्टी  ' किंवा ब्रह्माण्ड किंवा निर्मिती आणि 'परमेष्टि' किंवा 'ईश्वर' एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण त्यांना स्वतंत्रपणे पाहत नाही तर अखंड रूपात पाहतो. हे तत्वज्ञान या धरतीला 'धरतीमाता ' म्हणून ओळखते. यात म्हटले आहे कि पृथ्वी सर्वांची आहे आणि पृथ्वी ही आपली माता आहे. याच तत्त्वज्ञानाने 'वसुधैव-कुटुंबकम ' या संकल्पनेला जन्म दिला.

त्याचप्रमाणे, सौंदर्य लहरीमध्ये देखील मंत्र आहे-"फल: अपिवान्छा समाधिकम  म्हणजेच आपण मागतो त्यापेक्षा जास्त धरती आपल्याला देते. किती मोठे सत्य ता साध्या सोप्या शब्दांत सांगितले आहे. आपल्याला निसर्गाकडून पुरेसे पाणी, हवा, नद्या, खनिजे, झाडे-वृक्ष सगळे काही मिळालेले आहे. हे वरदान जतन करणे गरजेचे आहे.

या संकल्पना हीच आपली परंपरा आहे. निसर्गाचे शोषण करू नये मात्र नैसर्गिक साधनसंपत्तीचा संतुलित वापर करण्यावर आपल्याकडे भर देण्यात येतो. 'निसर्गाप्रती सहृदयता ' हाच केवळ मानवाचा अधिकार आहे. आपल्या परंपरेने आपल्याला हे शिकवले आहे. आणि हेच विचार नेहमी आपल्या शासनात आणि प्रशासनात तुम्हाला दिसून येतात.

बंधू आणि भगिनींनो,भारत हा असा देश आहे जो केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगाला न्याय, आदर, संधी आणि समृद्धी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. तुम्हाला माहितच असेल गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर उर्जेला चालना देण्याचा सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आजही, केंद्र सरकारच्या योजनांमध्येही तुम्हाला निसर्गाचे संरक्षण करण्याच्या इच्छेची झलक दिसेल. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा क्षेत्रात आज जितके काम सुरु आहे, तितके यापूर्वी कधी झाले नाही.

सौंदर्य लहरीच्या या देशात आज जगातील सर्वात मोठा नवीकरणीय क्षमता विस्तार कार्यक्रम सुरु आहे.

2030 पर्यंत देशाची 40 टक्के ऊर्जेची गरज बिगर-जीवाश्म इंधन आधारित नवीकरणीय उर्जेमार्फत पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने सरकार काम करत आहे. सरकारचे उद्दिष्ट 2022, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असेल, तोपर्यंत 175  गिगावॅटचे उद्दिष्ट साध्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मी मेगावॅट म्हणत नाहीये, मेगावॅट तर जुन्या जमान्यातील झाले. आता भारत गिगावॅटचा विचार करतो. गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीचे आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षात 22 हजार मेगावॅटहून अधिक नवीकरणीय ऊर्जेची  क्षमता  वाढवण्यात आली आणि पॉवर ग्रीडशी जोडण्यात आली. यापूर्वीच्या सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात केवळ 12 हजार मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा जोडण्यात आली होती. तसेच पूर्वीच्या सरकारने त्यांच्या शेवटच्या तीन वर्षात नवीकरणीय उर्जेवर 4 हजार कोटी रुपये खर्च केले होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन वर्षाच्या आत या क्षेत्रात अंदाजे 11 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे.

सध्या आपल्या देशात सुमारे 300 गिगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे. यात कोळसा, पाणी, सौर आणि पवन उर्जेसह सर्व प्रकारच्या स्रोतांपासून निर्माण करण्यात येणाऱ्या  विजेचा समावेश आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि जर देशात उपलब्ध साधनसंपत्तीचा पूर्ण वापर झाला तर 750 गिगावॅट वीज केवळ सौर ऊर्जेद्वारे तयार करता येईल. आपण आपल्या क्षमतेचा परिणामकारक वापर करायला हवा.

सरकारच्या वतीने या दिशेने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी देशभरात सौर पार्क उभारण्यात येत आहेत. छतावरील सौर कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी इमारतीच्या पोट-नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, सरकारी इमारतींच्या सौर प्रकल्पासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जात आहे, सौर प्रकल्पाना पायाभूत दर्जा देण्यात आला आहे आणि त्यांना दीर्घ कालावधीसाठी कर्ज देखील दिले जात आहे. आणि बंगळुरूची भूमी तर एक प्रकारे स्टार्ट-अपची भूमी आहे. इथले तरुण संशोधन करतात. नवीन शोध लावतात. मी बंगळुरूच्या स्टार्ट-अपच्या जगाशी निगडित तरुणांना आज निमंत्रण देऊ इच्छितो. या, आपण सर्व मिळून स्वच्छ स्वयंपाकाची चळवळ सुरु करूया. गरीबाच्या घरात देखील सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपाक बनवण्याच्या स्वस्त चुली आपण कशा बनवू शकतो. जुने सौर कुकर आहेत, परंतु आजच्या कुटुंबांसाठी ते सोयीचे नाही. त्यांना तशीच शेगडी हवी आहे जशी गॅसची असते. आणि आज ते शक्य आहे. बंगळुरूचे तरुण, स्टार्ट-अपच्या जगातील तरुणांसाठी भारताची एक खूप मोठी बाजारपेठ आहे. स्वच्छ स्वयंपाक वृद्ध मातांसाठी वरदान ठरेल. जंगलात राहणाऱ्या लोकांनाही कधी जंगल तोडावे लागणार नाही, लाकूड तोडावे लागणार नाही. सौर ऊर्जेद्वारे त्याच्या घरची चूल पेटेल. ते स्वयंपाक बनवून मुलांना कमी वेळेत जेवण बनवून देऊ शकतील. आपल्याला असे संशोधन करायचे आहे जे देशाच्या नव्या पिढीला उपयोगी पडेल. ज्या दिवशी देशातील बहुतांश संस्था आपल्या ऊर्जेची गरज स्वतः भागवतील तेव्हा तुम्ही पाहाल कि समाजाच्या प्रत्येक स्तरावर याचा कसा परिणाम व्हायला लागेल.

मित्रांनो, नव्या दृष्टिकोनासह, पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच जनतेच्या आणि देशाच्या पैशांची बचत होत आहे याचे उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. बंधू-भगिनींनो, एलईडीचा दिवा जो पूर्वी 350 रुपयांपेक्षा अधिक किमतीला होता, तो आता उजाला योजनेअंतर्गत केवळ 40-45 रुपयात उपलब्ध आहे. आमचे सरकार आल्यानंतर आतापर्यंत देशभरात 27 कोटींहून अधिक एलईडी दिवे वितरित करण्यात आले आहेत. इथे कर्नाटकातही सुमारे पावणे दोन कोटी एलईडी दिवे वितरित करण्यात आले आहेत. जर एका दिव्याच्या किंमतीमागे सरासरी 250 रुपयांची बचत जरी धरली तरी देशातील मध्यम वर्गाची यातून 7 हजार कोटी रुपयांची बचत झालेली आहे. एवढेच नाही, हे दिवे प्रत्येक घरात विजेचे बिल देखील कमी करत आहे. ज्याच्या घरी एलईडी दिवा असेल, त्याचे विजेचे बिल नक्की कमी येत असेल. आणि त्यामुळे एलईडी दिव्यांच्या वापरामुळे ऊर्जेची गरज कमी झाली, बिल कमी आले. आणि भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये केवळ एका वर्षात अंदाजे 14 हजार कोटी रुपयांहून अधिक बचत झाली आहे. स्वाभाविक आहे कि एलईडीच्या अधिक वापरामुळे विजेची मागणी देखील कमी झाली. विजेची मागणी कमी होणे म्हणजे स्थापित क्षमतेत अंदाजे ७ हजार मेगावॅट कमी गरज भासेल. 7 हजार मेगावॅट विजेची बचत, जर 7 हजार मेगावॅटचा प्रकल्प उभारायचा झाला तर किमान 35 ते 40 हजार कोटी रुपये खर्च येतो. केवळ वीज वाचवून आम्ही देशाचे 35-40 हजार कोटी रुपये वाचवले आहेत. म्हणजेच केवळ दृष्टिकोन बदलून काम केल्यामुळे केवळ एका योजनेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खिशातील पैसे वाचले, दिवे विकत घेण्यात बचत झाली, विजेत बचत झाली, असे अंदाजे 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा लाभ या देशाला, या देशातील मध्यमवर्गीय कुटुंबाला झाला आहे.

सरकारच्या प्रयत्नांमुळे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी एलईडी दिवे बसवत आहेत, तिथे देखील त्यांना आर्थिक लाभ होत आहे. मी वाराणसीचा खासदार आहे आणि माझ्या वाराणसी मतदारसंघात हे करून घेतले, त्यांची अंदाजे 15 कोटी रुपयांची बचत होत आहे आणि ते अन्य कामांसाठी वापरले जात आहेत. आणि असे आढळून आले आहे कि दुसऱ्या वर्गातील शहरांमध्ये 10 ते 15 कोटी रुपयांची बचत यामुळे होत आहे.

हे पैसे आता शहराच्या विकासासाठी खर्च केले जात आहेत. सरकारच्या या प्रयत्नांमुळे भारत परदेशातून पेट्रोल-डिझेल आयातीवर जेवढा निधी खर्च करतो, तो देखील वाचण्याची शक्यता आहे.

बंधू-भगिनींनो, पेट्रोल आणि डिझेलला भवितव्य नाही. एक ना एक दिवस ही नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होणार आहे. भवितव्य सौर उर्जेला आहे, पवन उर्जेला आहे,.जलविद्युत उर्जेला आहे. आपल्या देशात हे काम सहज होऊ शकते कारण आपण निसर्गाचे रक्षण करणारे, निसर्गाची पूजा करणारे लोक आहोत. आपल्याकडे वृक्षांसाठी आपले प्राण देण्याची परंपरा आहे, फांदी तोडण्यापूर्वी देखील प्रार्थना केली जाते. प्राणी, वनस्पती यांच्याप्रती संवेदना आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते. आपण दररोज आरतीनंतर शांतीमंत्रात वनस्पतय: शांति आप: शांति म्हणतो.

मात्र हे देखील सत्य आहे कि काळानुरूप ही परंपरा देखील खंडित झाली आहे. आज संत समाजालाही या दिशेने आपले प्रयत्न वाढवावे लागतील. जे आपल्या ग्रंथांमध्ये आहे, आपल्या परंपरांचा भाग आहेत, ते आचरणात आणूनच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करता येऊ शकेल. आपले संपूर्ण ऋग्वेद यालाच समर्पित आहे.

बंधू आणि भगिनींनो, मी आज तुम्हाला उज्वला योजनेचे उदाहरण देखील देऊ इच्छितो. या योजनेच्या माध्यमातून सरकारने आतापर्यंत तीन कोटींहून अधिक गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी दिली आहे. जेव्हा या महिलांकडे गॅस जोडणी नव्हती, तेव्हा त्या लाकडांवर किंवा केरोसिनवर अवलंबून होत्या. सरकारच्या योजनेने केवळ त्यांचे जगणेच सोपे बनवले नाही तर त्यांना सुरक्षित पर्यावरण देखील दिले.

आपल्या देशात काळानुरूप अनेक बदल होत गेले.-व्यक्तीमध्ये परिवर्तन, समाजात परिवर्तन. मात्र काळानुरूप अनेकदा काही वाईट गोष्टी देखील समाजात भिनल्या. मात्र हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे कि जेव्हा अशा दुष्प्रवृत्ती आल्या, तेव्हा त्या सुधारण्याचे काम समाजातीलच कुणी ना कुणी सुरु केले. आपल्या महान संत महापुरुषांनी आपल्या समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आजीवन आपल्याला शिक्षित केले. एक काळ असा देखील होता जेव्हा याचे नेतृत्व केवळ आपल्या देशातील साधू-संत समाजाच्या हातात होते.

भारतीय समाजाचे अनोखे वैशिष्ट्य आहे कि वेळो-वेळी आपल्याला आदि शंकराचार्य, महान संत बसवेश्वर यांच्यासारखे देवतुल्य महापुरुष लाभले ज्यांनी या दुष्प्रवृत्ती ओळखल्या, त्याच्यापासून मुक्तीचा मार्ग दाखवला.

आज काळाची गरज आहे, पूजेच्या देवाबरोबरच राष्ट्रदेवतेचीही चर्चा व्हावी, पूजेत आपल्या ईष्ट-देवांबरोबरच भारतमातेचाही उल्लेख असावा. निरक्षरता, अज्ञानता, कुपोषण, काळा पैसा, भ्रष्टाचार यांसारख्या दुष्प्रवृत्तींनी भारतमातेला घेरलं आहे, त्यापासून देशाला मुक्त करण्यासाठी संत आणि आध्यात्मिक समाजानेही आपले प्रयत्न वाढवावेत आणि देशाला मार्ग दाखवावा.

प्रत्येकाचा सहभाग आणि एकत्रित प्रयत्नांतूनच नवीन भारत निर्माण होईल. प्रत्येकाच्या मदतीनेच प्रत्येकाचा विकास होईल.

मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाचे  सौंदर्य लहरीच्या पारायणाबद्दल आणि या अखंड साधनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो. गेली दहा वर्षे हि साधना करणाऱ्या आध्यात्मिक नेत्यांना मी वंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.

श्री श्री शंकर भारती महास्वामीजी याना नमन करून मी माझे भाषण संपवतो.

या पवित्र प्रसंगी उपस्थित राहताना मला अतिशय आनंद झाला आहे. माझ्यासाठी हा धन्यतेचा क्षण आहे. तुमचे आशीर्वाद घेऊन माता भारतीसाठी काही चांगले काम यापुढेही मला करायचे आहे.

खूप-खूप आभार !

 
PIB Release/DL/1757
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau