This Site Content Administered by
पंतप्रधान

थंती या दैनिकाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे केलेल्या भाषणामधील अंश

नवी दिल्ली, 6-11-2017

चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागामध्ये अलिकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या परिवारांवर संकट आले आहे, त्यांच्याविषयी मी सर्वप्रथम सहानुभूती व्यक्त करतो. अतिपावसामुळे त्यांना खूपच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. काही जणांना तर आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले. आपणा सर्वांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. तामिळनाडू राज्यसरकारला आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मी देतो. तसेच ज्येष्ठ पत्रकार आर. मोहन यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो.

द दिना थंतीम्हणजेच थंती दैनिकाने वैभवशाली 75 वर्षे पूर्ण केली आहेत. या दैनिकाच्या यशस्वी वाटचालीमध्ये एस.पी. आदिथनर, एस.टी. आदिथनर आणि. बालसुसब्रमण्यमजी यांचे खूप मोठे योगदान आहे. गेली साडेसात दशके थंतीदैनिकाने जे अविरत कार्य केले, त्यामुळे  हा एक मोठा ब्रँड बनला. आणि आज थंतीने केवळ तामिळनाडूमध्येच नाही तर संपूर्ण देशाच्या प्रसार माध्यमामध्ये एखाद्या ताऱ्‍यासारखे चमचमते राहून अढळस्थान प्राप्त केले आहे. या यशासाठी मी थंतीसमुहाच्या व्यवस्थापनाचे आणि कर्मचाऱ्‍यांचेही मनापासून अभिनंदन करतो.

कोट्यवधी भारतीयांसाठी आज 24 तास बातम्या देणाऱ्‍या वृत्त वाहिन्या उपलब्ध आहेत. तरीसुद्धा अजूनही असंख्य घरांमध्ये एका हातात चहा किंवा कॉफीचा कप आणि त्याबरोबर दुसऱ्‍या हातात ताजे वृतपत्र, असेच दृष्य आजच्या सकाळी दिसते. लोकांना अशी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावण्यामागे, दैनिक थंतीसारखी वर्तमानपत्रे आहेत, असं मला वाटतं. या दैनिकाच्या सतरा आवृत्ती निघतात. केवळ तामिळनाडूमध्येच नाही तर बंगलुरू, मुंबई अगदी दुबईमधूनही हे वर्तमानपत्रं प्रसिद्ध होते. 75 वर्षात या दैनिकाने केलेला विस्तार लक्षणीय आहे. आत्ताचा व्याप पाहता, एस.पी. आदिथनर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची कल्पना येते. 1942मध्ये त्यांनी या वृत्तपत्राच्या प्रकाशनाला प्रारंभ केला. त्याकाळात वर्तमानपत्रासाठी लागणारा कागद काही सहजपणाने मिळू शकत नव्हता. तरीही त्यांनी हार न पत्करता वाळलेल्या पेंढ्यांपासून, गवतापासून हाताने बनवला जाणार कागद वापरून त्यावर थंतीची छपाई केली. 

त्यावेळी छपाईसाठी वापरलेला सुटसुटीत टाईप आणि लोकांना सहज समजेल अशी सोपी भाषा यामुळे थंतीवाचकांमध्ये लोकप्रिय झाले. त्याकाळी जनतेमध्ये राजकीय जागृती निर्माण करणे, त्यांना माहिती देणे हे काम थंतीने केले. त्याकाळात चहाच्या दुकानांच्या बाहेर वर्तमानपत्राचं घोळक्यांमध्ये जाहीर वाचन होत असे. अशा पद्धतीने या वर्तमानपत्राच्या प्रवासाची वाटचाल सुरू झाली. ती आजही सुरूच आहे. आज हातावर पोट असणारा, रोजंदारी करून कमवणारा श्रमिक असो अथवा राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी पेलणारा असो सगळयांमध्ये दैनिक थंतीची लोकप्रियता विलक्षण आहे.

तमिळमधील थंती या शब्दाचा अर्थ मी जाणून घेतला, तर मला समजलं  थंतीम्हणजे तार- टेलिग्राम. दिना थंती म्हणजे दैनंदिन अर्थात रोज येणारा टेलिग्राम. गेल्या पंचाहत्तर वर्षांचा विचार केला तर, टपाल खात्यामार्फत चालवली जाणारी तारसेवा, काळाच्या ओघात कधीच बंद झाली. परंतु हा टेलिग्राम मात्र सुरू आहे. आणि तो सातत्याने वाढतोय, दरदिवशी मोठा होतोय. एखाद्या चांगल्या कल्पनेमध्ये किती प्रचंड शक्ती  असू शकते, याचे हे एक उदाहरण आहे. या कल्पनेमागे अथक परिश्रम आहेत, ध्यास आहे, त्यामुळेच  अशी प्रगती होत आहे.

थंती समुहाने तमिळ साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक आदिथनर यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाणून मला आनंद झाला. पारितोषिकप्राप्त साहित्यिक तामिळबन डॉ. इराई अंबू आणि व्ही.जी. संथोषम यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. काहीतरी चांगलं घडावं या हेतूने हातात लेखणी घेणाऱ्‍या या साहित्यिकांच्या कार्याची दखल अशा सन्मानानेच घेतली जाते आणि त्यांमुळे त्यांना खरोखरीच खूप प्रोत्साहन मिळते.

बंधू आणि भगिनींनो,  

मानवाच्या इतिहासाइतकीच त्याला असलेली ज्ञानाची तृष्णा प्राचीन काळापासून आहे. पत्रकारितेमुळे या जिज्ञासेची तृष्णा भागवण्यासाठी मदत होते. पत्रकार एखाद्या गोष्टीकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलवू शकतात, जगाकडे पाहण्यासाठी एक नवी खिडकी खुली करून देतात. याचाच थोडा व्यापक विचार करायचा झाला तर, प्रसार माध्यमे ही समाजाचे परिवर्तन घडवून आणणारी साधने आहेत, असं म्हणता येईल. म्हणूनच माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हणतो. समाजाचा विवेक जागृत ठेवण्यासाठी, लेखणीची शक्ती, प्रचंड ताकद  दाखवणाऱ्‍या लोकांमध्ये मी आज उपस्थित आहे, हे माझं भाग्य समजतो. 

वसाहतावादाच्या काळोख्या कालखंडामध्ये राजा राम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदीनावाचे प्रकाशन सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी केसरीचे प्रकाशन सुरू केले आणि महात्मा गांधींनी नवजीवनसुरू केले. स्वातंत्र्याच्या लढ्यात या सर्वच प्रकाशनांनी दीपस्तंभासारखे कार्य करून प्रोत्साहन दिले. संपूर्ण देशभरामध्ये पत्रकारितेचा पाया घालणारे महान लोक आहेत. त्यांनी आपलं सुखातलं आयुष्य पणाला लावलं. आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी जनजागरणाचा जणू स्वातंत्र्य चळवळीचा होम पेटवला. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली अनेक वर्तमानपत्रे आजही मोठ्या प्रमाणात खपत आहेत. वृत्तपत्र सुरू करताना त्यांनी घातलेला उच्च आदर्शाचा पाया हेच कदाचित त्यामागे कारण असावे. 

मित्रांनो,

आपल्या आधीच्या पिढीने या देशासाठी या समाजासाठी केलेलं कार्य, त्यांनी पार पाडलेली कर्तव्ये यांचे आपण कधीच विस्मरण होवू देता कामा नये. त्यांच्या बलिदानामुळे, कार्यामुळेच तर आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो आणि स्वातंत्र्यानंतरच खऱ्‍या अर्थाने मोकळा श्वास आपण घेवू शकलो. मोकळेपणाने संभाषणाचं किती महत्व आहे हे समजलं. परंतु दुर्दैवाने काळ जसजसा लोटला, तसतसे आपण व्यक्तिगत आणि सामुहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. आणि त्यामुळेच आजच्या समाजावर या दूषित जळमटांची पूटं चढली आहेत, असं वाटतं. त्यामुळं आजच्या घटकेची सर्वात महत्वाची गरज कोणती असेल तर ती म्हणजे, जबाबदार, कार्यशील आणि जागरूक नागरिक बनण्याची, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरूकता घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सामाजिक भान असणारे, पात्र आणि कृतिशील जबाबदार नागरिकांचे सामाजिक भान, यांच्यामध्ये आज योग्य तो समतोल साधण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपली शैक्षणिक पद्धती माध्यम म्हणून वापर करण्याची गरज आहे. तसेच आपल्या राजकीय नेत्यांच्या वर्तवणुकीत असा बदल होणे अपेक्षित आहे. आणि यामध्ये प्रसार माध्यमे अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात.

भगिनी आणि बंधुंनो,

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्‍या अर्थानं धार चढली, आकार मिळाला तो असंख्य वर्तमानपत्रांच्या जागरणामुळे, विशेषतः प्रादेशिक भाषांतील वर्तमानपत्रांनी हे काम अतिशय चोख बजावलं. ब्रिटिश सरकारला तर भारतीय प्रादेशिक वर्तमान पत्रांची धडकीच भरली  होती. 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्टलागू करण्यात आला, ती एकप्रकारे मुस्कटदाबी होती.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये प्रादेशिक वृत्तपत्रांचे, विविध भाषांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या वर्तमानपत्रांचे स्थान आजही पूर्वीइतकेच महत्वपूर्ण आहे. या वर्तमानपत्रांमध्ये स्थानिक नागरिकांना सहज समजेल अशा भाषेमध्ये माहिती देतात, बातम्या देतात. अर्थात यामध्ये काहीजण गैरमार्गाचा अवलंब  करून, असामाजिक कार्य करून, प्रसिद्धी माध्यमाचा गैरफायदा घेणारेही  आहेत. प्रसार माध्यमाची शक्ती, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी यांना कमी लेखून चालणार नाही सरकारच्या ध्येयधोरणाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचवण्याचे म्हणजेच एकप्रकारे सरकारचे संदेशवाहकाचे काम ते करतात. त्याचबरोबर जनमत, जनतेच्या भावना, त्यांचे विचार राज्य करणा-यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वर्तमानपत्रे करतात. आणि यामध्ये प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित होत असलेल्या  वर्तमानपत्रांचे योगदान खूप मोठे आहे. सर्वाधिक खपाच्या भाषिक वर्तमानपत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या द दिना थंतीवृत्तपत्राचाही यामध्ये अर्थात समावेश आहे.

मित्रांनो,

जगभरामध्ये असंख्य ठिकाणी घडलेल्या घटनांच्या बातम्या, इतक्या तातडीने तुम्ही जशाच्या तशा, कशा देता, याबविषयी लोक आश्चर्य करतात, हे मी ऐकलं आहे. जगाच्या पाठीवर कुठंतरी काहीतरी दररोजअगदी सतत घडत असतं. त्यापैकी कोणत्या बातमीला पहिल्या पानावर स्थान द्यायचं, त्या वृत्ताची निवड करण्याचं काम संपादकाचं असतं. कोणत्या बातमीला जास्त जागा द्यायची, कोणत्या बातमीकडे दुर्लक्ष करायचं, याचाही विचार त्यालाच करावा लागतो. अर्थात बातम्यांची निवड करण्याचं कामही खूप जबाबदारीचं आहे. संपादकीय स्वातंत्र्याचा योग्यप्रकारे, तारतम्याने वापर करावा लागतो. यामध्ये सार्वजनिक हिताचा प्राधान्याने विचार करावा लागतो. त्याचबरोबर लेखन स्वातंत्र्य घेताना, काय आणि का लिहायचे याच्या कल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत. ‘‘अचूकतेपेक्षा कमी’’ किंवा ‘‘वास्तवापेक्षा अयोग्य’’असं लेखन स्वातंत्र्य असता कामा नये. महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे की, ‘‘ प्रसार माध्यम म्हणजे चौथी इस्टेट-मालमत्ता आहे. त्यामध्ये निश्चितच शक्ती आहे. परंतु या शक्तीचा गैरवापर करणे म्हणजे तो एक गुन्हा असणार आहे.’’ आता अगदी खाजगी मालकीची प्रसार माध्यमे असली तरीही या क्षेत्रात कार्यरत असणा-यांनी सार्वजनिक हित जपलेच पाहिजे. याविषयी बुद्धिजीवींनी म्हटलं आहे की, प्रसार माध्यमे म्हणजे जबरदस्तीने नाही तर शांततापूर्ण मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचे महत्वाचे साधन आहे. आणि म्हणूनच या माध्यमांनी निवडून आलेल्या सरकारइतकेच किंवा न्यायसंस्थांइतकेच  सामाजिक दायित्व ओळखून आपले व्यवहार केले पाहिजेत. याठिकाणी महान संत तिरूवल्लूवर यांच्या वचनाचे मला स्मरण होत आहे, ते  वचन नमूद करतो, ‘‘ या जगामध्ये नैतिकता याच्याशिवाय काहीच नाही. नैतिकता असेल तर तुम्हाला नावलौकिक मिळेल आणि संपत्तीही मिळेल.’’

मित्रांनो,

नवीन तंत्रज्ञानामुळे प्रसार माध्यमामध्ये प्रचंड बदल झाला आहे. पूर्वीच्या काळी खेड्यांमध्ये एका फलकावर ताज्या बातम्या लिहिल्या जात होत्या. त्यावर लोकांचा विश्वास असायचा. आज आता  प्रसार माध्यमांनी  खूप मोठी झेप घेतली आहे. त्या वृत्तफलकापासून ते  ऑनलाईन बातमीपत्रापर्यंत आज अनेक प्रसार माध्यमं आहेत.

शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना, त्यापासून काय मिळणार आहे हे प्रामुख्यानं आता आधी तपासलं जातं. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा उपभोग घेता यावा, असा आपला दृष्टीकोन बदलला आहे. आज, प्रत्येक नागरिक त्याच्यापर्यंत येणारी कोणतीही बातमी अनेकविध मार्गांनी तपासू शकतो, तिचं विश्लेषण करू शकतो, त्या बातमीवर चर्चा करू शकतो. त्या बातमीची सत्यता पडताळून पाहू शकतो. आणि म्हणूनच प्रसार माध्यमांना आपली विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी, जपण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विश्वासाहर्तेच्या व्यासपीठावर प्रसार माध्यमांमध्ये असणारी निकोप स्पर्धा आपल्या लोकशाहीसाठी आरोग्यदायी ठरणार आहे.

विश्वासार्हतेवर दिला जाणार भर आपल्या दृष्टीने आत्मनिरीक्षण करण्यास भाग पाडतो. माध्यमांमध्ये होत असलेल्या सुधारणांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणूनच ज्या ज्यावेळी गरज भासेल, त्या त्यावेळी मला ही एक आत्मपरीक्षणाची संधी वाटते. असं स्वयंनिरीक्षण आपण काही प्रसंगामुळे करू शकलो, हेही येथे नमूद करावे लागेल. 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचे पडसाद आणि प्रसार माध्यमांची भूमिका, त्यांनी दिलेली वृत्ते, अहवाल, मते यांचा विचार केला तर त्यावेळी ज्या प्रकारे माध्यमांनी साकल्याने भूमिका बजावली, याविषयी वरचेवर विचार केला गेला पाहिजे.

मित्रांनो,

आपले  प्रिय दिवंगत राष्ट्रपती, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विधानाचे मला आज स्मरण होत आहे. ते म्हणाले होते, ‘‘भारत एक महान देश आहे. आपल्याकडे यशोगाथा म्हणता येतील आणि जितके कौतुक करावे  तितके कमीच आहेअशा अनेक कथा आहेत. परंतु आपण हे स्वीकारतच नाही, असे का?’’

मी निरीक्षण केलंय. आपल्या देशातल्या प्रसार माध्यमांना आज फक्त राजकारण आणि त्या संदर्भातल्या बातम्यांमध्ये भरपूर रस असतो. वास्तविक भारतामध्ये  राजकारणाशिवायही खूप काही घडतं. देशात वास्तव्य करीत असलेल्‍या 125 कोटी भारतीयांमुळे भारत देश बनला आहे. त्यांच्यामध्येही माध्यमांनी लक्ष घातले, तर अनेक नवनव्या बातम्या प्रसार माध्यमांना मिळतील. माध्यमांनी या लोकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या सुखदुःखाबरोबरच त्यांच्या कर्तृत्वाला प्रसिद्धी दिली तर मला खूप आनंद होईल. 

यासारख्या कार्यात मोबाईल फोन वापरणारा प्रत्येक नागरिक  तुमचा एक चांगला सहकारी बनू शकेल. एखाद्याने काही साध्य केले तर त्याच्या यशाची माहिती सर्वदूर पसरवण्यासाठी प्रत्येक नागरिकाजवळ असणारा मोबाईल फोन एक उपयुक्त साधन म्हणून वापरता येईल. अगदी एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा काही  समस्या निर्माण झाली तर अशा संकटप्रसंगी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शनाची सुविधाही होऊ शकते.

कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर प्रसार माध्यमांकडून त्या संकटाविषयी तातडीने आणि सर्व दृष्टीकोनातून इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते, अशावेळी सर्वोकृष्ट भूमिका माध्यमांकडून पार पाडली जाते, हे मला इथं आवर्जून नमूद करावं वाटतं. हवामानामध्ये होत असलेल्या बदलांमुळे आता आपल्या प्रत्येकासमोर एक नवे आव्हान निर्माण झाले आहे.  या लढाईचं नेतृत्व प्रसार माध्यमे स्वीकारू शकतात का? छापील प्रसार माध्यमांना आपल्या प्रकाशनामध्ये एखादे विशिष्ट स्थान निश्चित करून दररोज या गंभीर समस्येची जाणीव करून देणारा मजकूर प्रसिद्ध करता येईल का? दृक श्राव्य माध्यमांनाही एक विशिष्ट वेळ निश्चित करून या  समस्येविषयी जागरूकता निर्माण करता येईल का? हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानाशी सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार प्रसार माध्यमांकडून होईल का?

स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रसार माध्यमांनी जी महत्वपूर्ण भूमिका बजावली, त्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्याची संधी मला आज या कार्यक्रमामुळे मिळाली आहे. आपल्याला महात्मा गांधींच्या 75व्या जयंती वर्षापर्यंत, म्हणजे 2019 पर्यंत संपूर्ण देश अगदी स्वच्छ, चकचकीत करायचा आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच.  या मोहिमेमध्ये प्रसार माध्यमांकडून जी महत्वपूर्ण भूमिका बजावली जात आहे, यासाठी माध्यमांचे खूप कौतुक केले पाहिजे. स्वच्छता राखली जावी यासाठी आणि सार्वजनिक स्तरावर स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माध्यमांकडून जी विधायक भूमिका बजावली जात आहे, त्याची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. काही ठिकाणी एखादे कार्य अपूर्ण राहिले असेल किंवा करण्याची आवश्यकता असेल तर ते कसे केले पाहिजे, याचीही माहिती प्रसार माध्यमांकडून नजरेस आणून दिली जात आहे. त्यामुळे आम्हाला आमचे उद्दिष्ट साध्य करणे सोईचे जाणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

प्रसार माध्यमांना अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावता येईल, असे आणखी एक क्षेत्र आहे. ते म्हणजे एक भारत, श्रेष्ठ भारतयासाठी माध्यमांनी पुढाकार घेतला पाहिजे. हा विषय मी एका उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगू इच्छितो.

वर्तमानपत्रामधल्या एका स्तंभातला काही इंचाचा भाग दररोज केवळ यासाठी राखून ठेवला जावू शकेल? रोज त्या विशिष्ट स्थानी आपल्या स्थानिक भाषेमध्ये एक वाक्य प्रसिद्ध करायचे आणि त्याच्याच खाली त्याच वाक्याचे इतर प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध करायचा.

वर्षाच्या अखेरीस त्या वर्तमानपत्राच्या वाचकाला 365 वाक्ये भारतातल्या इतर प्रमुख  भाषांमध्ये कशी लिहिली जातात, याचे ज्ञान यामुळे मिळू शकेल. या एका साध्या प्रयत्नांमुळे किती सकारात्मक परिणाम होवू शकेल, याची कल्पना आपण करू शकतो. यापुढे जावून शाळांमध्ये अशा प्रयोगांना प्रोत्साहन दिले जावू शकते.वर्गामध्ये चर्चा करण्यासाठी रोज काही मिनिटे राखून ठेवता येतील.यामुळे मुलांनाही आपल्याकडे असलेल्या शक्तीशाली वैविध्यतेच्या श्रीमंतीची, वैभवाची  माहिती होवू शकणार आहे. असा उपक्रम राबवणं म्हणजे काही फक्त एक चांगलं काम केलं असं होणार नाही, तर त्या प्रकाशनालाही स्वतःची अशी बळकटी प्राप्त होणार आहे. 

बंधू आणि भगिनींनो,

माणसाच्या जीवनात 75 वर्षे म्हणजे अतिशय मोठा, महत्वपूर्ण कालखंड असू शकतो. मात्र एखाद्या देशासाठी किंवा एका संस्थेसाठी तो एक महत्वपूर्ण मैलाचा दगड असतो. साधारण तीन महिन्यापूर्वीच आपण छोडो भारत चळवळीचा 75 वा वर्धापनदिन साजरा केला. दिना थंती वृत्तपत्राने तर भारताचा उदय आणि त्‍याचबरोबर  उज्ज्वल युवा देशही पाहिला आहे.

या विशेष दिवशी संसदेमध्ये भाषण करताना मी 2022पर्यंत नवभारताच्या निर्माणामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार, जातीवाद, जातीयवाद, गरिबी, निरक्षरता आणि रोगराई या सर्व वाईट गोष्टीपासून पूर्णपणे मुक्त होवून भारत देश संपन्न झाला पाहिजे. आणि म्हणूनच आगामी पाच वर्षे संकल्प ते सिद्धीसाठी असली पाहिजेत. आता यासाठी कार्य केले तरच आपण स्वातंत्र्य सेनानींच्या स्वप्नातला भारत निर्माण करू शकणार आहोत. भारत छोडो आंदोलनाच्या काळात जन्मलेल्या वर्तमानपत्रांवर तर ही एक मोठीच जबाबदारी आहे. दिना थंती वृत्तपत्राला मी खास सुचवू इच्छितो की, त्यांनी ही विशेष जबाबदारी उचलून महत्वपूर्ण भूमिका पार पाडावी. आगामी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आपण वाचकांसाठी आणि त्याचबरोबर देशासाठी विशेष काय करणार आहात, त्याचे प्रतिबिंब आपल्या कार्यात दिसणार आहेच, आपण या संधीचा लाभ घ्याल अशी मला आशा आहे.

आपण केवळ पाच वर्षे इतक्या अल्पकाळाचा विचार करण्याऐवजी, त्याही पुढे जावून या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आगामी 75 वर्षांचा विचारही दिना थंती करू शकते. भविष्यात पत्रकारिता कशी असू शकते, पत्रकारितेची उपयोगिता, प्रासंगिकता कशी असू शकणार आहे. आणि लोकांची त्याचबरोबर देशाची सेवा करताना सर्वोच्च व्यावसायिक नीतिमूल्यांचे पालन करून एक वेगळे स्थान निर्माण   केले जावू शकते, याचा विचार आज केला गेला पाहिजे.

अखेरीस, दिना थंती प्रकाशनाने केलेल्या कार्याचे आणि  तामिळनाडूतील जनतेसाठी केलेल्या सेवेबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून  कौतुक करतो. आपल्या देशाला महान बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिना थंती असेच कार्यरत राहील, सातत्याने भरीव प्रयत्न करेल, याविषयी मी आश्वस्त आहे.

धन्यवाद.

 
PIB Release/DL/1769
बीजी -सुवर्णा -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau