This Site Content Administered by
पंतप्रधान

फिलिपिन्समध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत सोहळयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 13-11-2017

नमस्‍ते,

जर तुम्हाला न भेटता मी निघून गेलो असतो तर माझा हा दौरा अपूर्ण राहिला असता. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेळात वेळ काढून तुम्ही लोक आला आहात, तो देखील कामाचा दिवस असूनही आला आहात. भारताविषयी तुम्हाला जे प्रेम आहे, भारताविषयी तुम्हाला जी आपुलकी आहे, त्याचाच हा परिणाम आहे ज्यामुळे एका छताखाली आपण एकत्र आलो आहोत. मी सर्वप्रथम तुमचे विशेषत्वाने अभिनंदन करत आहे, कारण मी भारताबाहेर जिथे जिथे जातो तिथे भारतीय समुदायाला भेटण्याचा प्रयत्न जरुर करत असतो. पण तुम्ही लोकांनी आज जी शिस्तबद्ध वृत्ती दाखवली त्याबद्दल माझ्याकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. हे एक अंतर्गत असे खूप मोठे सामर्थ्य असते, नाहीतर इतक्या मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय आणि त्या सर्वांना मी अगदी सहजपणे भेटू शकणे हा खरोखरच माझ्यासाठी एक आनंदाचा प्रसंग आहे आणि यासाठी तुम्ही सर्व अभिनंदनासाठी, शुभेच्छांसाठी पात्र आहात.

या देशात मी पहिल्यांदाच आलो आहे पण भारतासाठी हा भूभाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि जेव्हापासून पंतप्रधानाच्या रुपात काम करण्याची जबाबदारी तुम्ही लोकांनी माझ्यावर सोपवली आहे. सुरुवातीपासूनच आम्ही पूर्वाभिमुख कृती या धोरणावर भर दिला आहे. याचे कारण म्हणजे या देशांविषयी आम्हाला जवळीक वाटते, अतिशय सहजपणे जवळीकीची भावना निर्माण होते. काही ना काही कारणांमुळे, काही ना काही प्रमाणात, कोणत्या ना कोणत्या वारशामुळे आमच्या दरम्यान भावनिक बंध आहेत. या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत असे देश असतील ज्यांना रामायण माहित नसेल, राम माहित नसेल. असे अपवादात्मक देश असतील ज्यांना बुद्धाविषयी श्रद्धा नसेल. हा खरोखरच एक खूप मोठा वारसा आहे आणि या वारशाचे जतन करण्याचे आणि त्याला समृद्ध करण्याचे काम या ठिकाणी राहत असलेला भारतीय समाज अतिशय चांगल्या प्रकारे करु शकतो. एक काम  एक दुतावास करत असते. त्याच्या कैक पटीने जास्त काम एक सामान्य भारतीय करु शकतो आणि याचा मला अनुभव आला आहे की जगभरात आज प्रत्येक भारतीय मोठ्या अभिमानाने मान उंचावून इतरांच्या नजरेला नजर भिडवून अभिमानाने भारतीय असल्याचे सांगत आहे. कोणत्याही देशासाठी ही एक मोठी पूंजी असते आणि जगभरात पसरलेला भारतीय समुदाय आणि भारताचे लोक यांच्यामध्ये अनेक शतकांपासून देशाटन करण्याची वृत्ती पाहायला मिळते. अनेक शतकांपूर्वी आपले पूर्वज बाहेर पडले होते आणि भारताचे हे वैशिष्ट्य आहे. आम्ही जिथे कुठे गेलो ज्यांना भेटलो त्यांना आपलेसे केले. ही लहान गोष्ट नाही आहे. आपली ओळख कायम ठेवून प्रत्येकाला आपलेसे करणे तेव्हा शक्य होते जेव्हा आपल्या आतमध्ये एक दृढ आत्मविश्वास असतो आणि तुम्ही लोक जेथे गेला आहात तेथे त्या दृढ आत्मविश्वासाचा परिचय करून दिला आहे.  तुम्ही कोठेही असाल, कितीही वर्षांपासून बाहेर असाल, किती पिढ्यांपासून बाहेर राहात असाल, त्यावेळी असे होऊ शकते की भाषेपासून दुरावला असाल, पण भारतामध्ये काही वाईट घडले तर तुम्ही देखील सुखाने झोपू शकत नाही आणि काही चांगले घडले तर तुमच्या देखील आनंदाला पारावार उरत नाही. आणि म्हणूनच विद्यमान सरकारचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे की देशाला विकासाच्या त्या उंचीवर घेऊन जायचे ज्यामुळे आपण जगाची बरोबरी करू शकू आणि एकदा का ही बरोबरी करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले की मग भारताला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकेल असे मला वाटत नाही. बरोबरीच्या एका पातळीपर्यंत जाईपर्यंत अडचणी येत असतात आणि एकदा का त्या अडचणींवर आपण मात केली की मग अगदी सपाट मैदानासारखी जागा मिळते, आणि भारतीयाचे मन, मेंदू, बाहूंमध्ये ते सामर्थ्य आहे. मग त्यांना पुढे जाण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. यासाठीच गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून या सरकारचा हा सातत्याने प्रयत्न आहे की भारताचे जे सामर्थ्य आहे, सव्वाशे कोटी देशवासीयांची जी शक्ती आहे, भारताची जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, भारताचा जो सांस्कृतिक वारसा आहे. भारताचे लोक ज्यांनी कोणत्याही युगात, कोणतेही युग तपासून पाहा, शंभर वर्षांपूर्वी, पाचशे वर्षांपूर्वी, हजार वर्षांपूर्वी, पाच हजार वर्षांपूर्वी, इतिहासात अशी एकही घटना आढळणार नाही की आम्ही कोणाचे काही वाईट केले आहे.

ज्या देशाकडे, जेव्हा मी जगातील विविध देशातील लोकांना भेटतो आणि जेव्हा मी त्यांना सांगतो की पहिल्या महायुद्धात आणि दुस-या महायुद्धात आम्हाला ना कोणाची भूमी ताब्यात घ्यायची होती ना कुठे आमचा झेंडा फडकावायचा होता. पण शांततेच्या शोधात माझ्या देशाच्या दीड लाखांहून जास्त जवानांनी हौतात्म्य पत्करले. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात काही देणे-घेणे नव्हते तरीही शांततेसाठी दीड लाख भारतीयांनी हौतात्म्य पत्करले. कोणताही भारतीय अभिमानाने छाती फुगवून हे सांगू शकतो की आम्ही लोक जगाला काही तरी देणारे लोक आहोत आणि हिसकावून घेणारे लोक तर अजिबातच नाही आहोत.

आज जगभरात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेशी संबंधित असलेला प्रत्येक भारतीय अभिमान बाळगू शकतो की आज जगात प्रत्येक भागात कुठे अशांतता निर्माण झाली तर संयुक्त राष्ट्रांच्या द्वारे शांती सेना त्या ठिकाणी पाठवल्या जातात आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपली भूमिका पार पाडली जाते. संपूर्ण जगात शांती सेनांमध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे असेल तर ते भारतीय जवानांचे आहे. आजही जगातील अशा अनेक अशांत क्षेत्रांमध्ये भारताचे जवान तैनात आहेत. बुद्ध आणि गांधीजींच्या भूमीवर शांती हा त्यांच्यासाठी एखादा शब्द नाही. आम्ही ते लोक आहोत ज्यांनी शांततेने जगून दाखवले आहे. शांततेचा आम्ही अंगिकार केला आहे, शांतता आमच्या नसानसात आहे आणि म्हणूनच तर आमच्या पूर्वजांनी वसुधैव कुटुंबकम्- हे विश्व म्हणजे एक कुटुंब हा मंत्र आम्हाला दिला. जो मंत्र आम्ही जगून दाखवला आहे. मात्र, या सर्व गोष्टींचे सामर्थ्य जग तेव्हाच मान्य करेल जेव्हा भारत मजबूत असेल, सामर्थ्यशाली असेल, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठणारा गतिशील भारत असेल. तेव्हा कुठे जग हे मान्य करते. तत्वज्ञान कितीही श्रेष्ठ असू दे, इतिहास कितीही भव्य असू दे, वारसा कितीही महान असू दे, वर्तमान देखील तितकाच उज्वल, तेजस्वी आणि पराक्रमी असला पाहिजे तेव्हा कुठे जग मान्यता देते आणि म्हणूनच आपल्या भव्य भूतकाळापासून प्रेरणा घेणे, त्यापासून धडा घेणे जितके महत्त्वाचे आहे त्याप्रमाणेच 21वे शतक हे आशिया खंडाचे शतक मानले जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे 21वे शतक हे भारताचे शतक मानले जावे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि हे अवघड आहे असे मला वाटत नाही. गेल्या तीन वर्षांचा, साडेतीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर मी हे बोलत आहे. हे देखील शक्य आहे. गेल्या काही दिवसात तुम्ही पाहिले असेल भारतातून, जोपर्यंत सरकारचा संबंध विचारात घेतला तर सकारात्मक बातम्या येत राहतात. आता अशी भीती मनात राहत नाही की जर ऑफिसमध्ये गेलो आणि एखादी नकारात्मक बातमी आली, तर लोक काय विचारतील? आता घरातून बाहेर पडल्याबरोबर मनात एक विश्वास असतो की नाही नाही, भारतातून चांगल्या बातम्याच येत राहणार. सव्वाशे कोटीचा देश आहे. त्याचा मुख्य प्रवाह जो आहे, तो समाजाचा मुख्य प्रवाह असेल, सरकारचा मुख्य प्रवाह असेल, तो सकारात्मकतेच्या आजू बाजूनेच सुरू राहिला आहे. पॉझिटिव्हिटीच्या आस पास सुरू आहे. प्रत्येक वेळी देश हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जात आहेत, विकासाला विचारात घेऊन निर्णय घेतले जात आहेत. सव्वाशे कोटींच्या देशात स्वातंत्र्याला 70 वर्षे उलटून गेल्यावर जर 30 कोटी कुटूंबे बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर असतील तर देशाची अर्थव्यवस्था कशी चालू शकेल?

आम्ही हे आव्हान स्वीकारले, प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आणि झिरो बॅलन्स असला तरी बँकेत खाते उघडायचे आहे, बँकवाल्यांना त्रास होत होता आणि मनिलामध्ये तर बँकेचे काय विश्व आहे, सर्वांना माहित  आहे. बँकवाले माझ्याशी भांडत होते की साहेब कमीत कमी स्टेशनरीच्या खर्चाचे पैसे तरी घेऊ द्या. मात्र, मी सांगितले की हा देशातील गरिबांचा अधिकार आहे. त्यांना बँकेत सन्मानाने प्रवेश मिळाला पाहिजे. तो बिचारा विचार करत राहायचा की ही बँक तर वातानुकूलित आहे, बाहेर दोन उंच धिप्पाड बंदूकवाले उभे आहेत. मग गरीब जाऊ शकेल की नाही आणि शेवटी सावकाराकडे जायचा आणि सावकार काय करतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. 30 कोटी देशवासीयांचे झिरो बॅलन्सने खाते उघडले आणि कधी कधी तुम्ही श्रीमंताना पाहिले असेल. मी श्रीमंतांनाही पाहिले आहे, श्रीमंतांची गरिबी देखील पाहिली आहे. झिरो बॅलन्सने खाती उघडली होती पण आज मी अभिमानाने सांगेन की त्या जनधन खात्यांद्वारे आज त्या गरिबांना बचतीची सवय लागली आहे. पूर्वी बिचारे घरामध्ये गव्हाच्या पोत्यात पैसे लपवून ठेवत असायचे, गादीच्या खाली ठेवायचे आणि त्यातही पतीला वाईट सवयी असल्या तर तो इतर कुठे खर्च करून टाकायचा. त्या माता घाबरत राहायच्या. पण तुम्हाला ऐकून आनंद होईल की इतक्या कमी काळात त्या जनधन खात्यांमध्ये गरिबांनी 67हजार कोटी रुपयांची बचत जमा केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मूळ प्रवाहात गरीब सक्रिय भागीदार बनला आहे. हे परिवर्तन काही लहान म्हणता येणार नाही. जी शक्ती, जे सामर्थ्य व्यवस्थेच्या बाहेर रहोते ते आज व्यवस्थेचे केंद्र बिंदू झाले आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कधीही चर्चेमध्ये आल्या नव्हत्या, कोणी याचा विचार केला नव्हता, काही लोकांनी तर ही समस्या असेल तर यासाठी असे, काही करता येऊ शकते का? आपण लोकांनी तर ही धारणाच तयार केली होती आपला देश जसा आहे तसाच आहे. चालेल आपल्याला, पण का म्हणून चालेल. जर सिंगापूर स्वच्छ होऊ शकतो, फिलिपिन्स स्वच्छ होऊ शकतो, मनिला स्वच्छ होऊ शकतो तर भारत का म्हणून स्वच्छ होऊ शकत नाही. देशातील कोणता असा नागरिक असेल ज्याला अस्वच्छ वातावरणात राहायला आवडत असेल. कोणालाच आवडत नाही. पण कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो, कोणाला तरी जबाबदारी स्वीकारावी लागते. यश अपयश याची चिंता करत न राहता काम हाती घ्यावे लागते. महात्मा गांधीजींनी जिथे सोडले होते तिथूनच पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि मी म्हणतो की आज भारतात सुमारे सव्वा दोन लाखांहून अधिक गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. तर एका बाजूला सामान्य मानवाच्या जीवनाच्या दर्जात कशा प्रकारे बदल झाले आहेत.

आता आपल्या देशातून तुमच्यापैकी जे लोक गेल्या 20,25, 30 वर्षात भारतातून या ठिकाणी आले आहेत किंवा अजूनही भारताच्या संपर्कात असतील तर तुम्हाला माहित असेल की आमच्या इथे गॅस सिलेंडर घेणे, घरात गॅसचे कनेक्शन घेणे एक मोठे काम मानले जात होते आणि जर घरात गॅस कनेक्शन आले, सिलेंडर आले तर शेजारी पाजारी असे काही वातावरण तयार व्हायचे जणू काही मर्सिडिझ गाडी घरात आली आहे. म्हणजे ही एक मोठी कामगिरीच मानली जायची की आमच्या घरी आता गॅस कनेक्शन आले आहे आणि आमच्या देशात गॅस कनेक्शन इतकी मोठी गोष्ट मानली जायची की संसद सदस्याला 25 कूपन मिळायची. या गोष्टीसाठी म्हणजे आपण संसदीय क्षेत्रामध्ये तुम्ही वर्षाला 25 कुटुंबाना उपकृत करु शकत. नंतर त्याचे ते काय करायचे हे मला सांगायची इच्छा नाही, ते सर्व वर्तमानपत्रात छापून यायचे. म्हणजे गॅस सिलेंडरचे कनेक्शन तुम्हाला आठवत असेल 2014 मध्ये जेव्हा संसदेची निवडणूक झाली त्या वेळी एका बाजूला भाजपा होती आणि दुस-या बाजूला काँग्रेस पार्टी होती. भारतीय जनता पार्टीने मला या निवडणुकीत नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती आणि देश प्रतीक्षा करत होता की त्या ठिकाणी हे निश्चित केले जाईल की कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची ते. संध्याकाळी बैठकीनंतर काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत काय सांगितले गेले, तिथे हे सांगितले गेले की 2014 मध्ये जर आम्ही निवडणूक जिंकलो तर वर्षभरात आम्ही सध्या जे 9 सिलेंडर देत आहोत ते 12 सिलेंडर देऊ, लक्षात आहे की नाही तुमच्या म्हणजे 9 सिलेंडर की 12 सिलेंडकर या मुद्यावर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत होता. म्हणजे ही फार दूरची गोष्ट नाही आहे, 2014 पर्यंत देखील विचारांची कक्षा हीच होती आणि देश टाळ्या वाजवत होता, छान छान, खूपच छान 9 ऐवजी 12 मिळणार.

मोदींनी हे निर्धारित केले की, गॅस कनेक्शन मी गरिबांना देईन आणि 3 कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याच्या दिशेने आम्ही यशस्वीरित्या वाटचाल केली. 3 कोटी कुटुंबांना कनेक्शन देण्यात आली. माझे आश्वासन 5 कोटी कुटुंबांचे आहे. भारतात एकूण 25 कोटी कुटुंबे आहेत. 25 कोटी कुटुंबांमध्ये पाच कोटी कुटुंबांचे आश्वासन आहे त्यापैकी 3 कोटींचे पूर्ण झाले आहे. बरे यातही एक कमालीची बाब आहे बरं का, आपल्या घरचेच लोक आहेत तर एक गोष्ट सांगू शकतो. कधी कधी सरकारकडून अनुदान दिले जात असायचे तर वाटायचे की लोकांचे भले होत असेल. तर मी येऊन काय केले तर त्याला आधारशी जोडून टाकले. बायोमेट्रिक ओळख जोडली तर लक्षात आले की अशा लोकांच्या नावावर गॅसचे अनुदान दिले जायचे की जे जन्मालाही आले नव्हते. म्हणजे बघा कुठे जात होते अनुदान ते. मला सांगा कुठे जात असेल. कोणाच्या ना कोणाच्या खिशात ते जात असेलच ना. मी त्यावर काट मारली तर बंद झाले. केवळ अशा प्रकारचे अनुदान योग्य व्यक्तीला मिळाले पाहिजे, खोट्या, काल्पनिक व्यक्ती ज्यांचा जन्मच झालेला नाही त्यांना मिळू नये इतकेच लहानसे काम केले फार काही मोठे काम नाही केले. इतके लहान काम केले त्याचा परिणाम काय झाला ठाऊक आहे का ? 57 हजार कोटी रुपयांची बचत झाली आणि ही केवळ एकदाची बचत नाही झाली, दर वर्षी 57 हजार कोटी रुपये जायचे. आता सांगा पाहू हे पैसे जायचे कुठे? आता ज्यांच्या खिशात ते पैसे जायचे त्यांना मोदी कसे वाटतील, ते कधी फोटो काढायला येतील का? त्यांना मोदी कधी चांगले वाटतील का? मला सांगा काम केले पाहिजे की नाही? देशात बदल झाले पाहिजेत की नाही? कठोर निर्णय घेतले पाहिजेत की नाहीत? देशाला पुढे घेऊन गेले पाहिजे की नाही?

तुम्ही लोक येऊन मला आशीर्वाद देत आहात, मी तुम्हाला ही हमी देतो की ज्या उद्देशाने देशाने मला काम दिले आहे तो उद्देश पूर्ण करण्यामध्ये मी कोणतीही उणीव बाकी ठेवणार नाही. 2014 पूर्वी कोणत्या बातम्या यायच्या? किती गेले कोळशामध्ये किती गेले, टू जी मध्ये गेले, अशाच बातम्या असायच्या ना. 2014 नंतर मोदींना काय विचारले जाते, मोदीजी जरा सांगा किती आले ते? बघा हा बदल आहे. तो एक काळ होता जेव्हा देश हैराण झाला होता किती गेले त्याबद्दल आणि आजचा काळ आहे की देशात आनंदाच्या बातम्या ऐकण्यासाठी विचारले जाते मोदीजी सांगा ना किती आले.

आपल्या देशात कोणतीच कमतरता नाही मित्रांनो, देशाची आगेकूच होण्यासाठी सर्व प्रकारच्या संधी आहेत, सामर्थ्य आहे, हीच बाब घेऊन आम्ही अनेक महत्त्वपूर्ण धोरणे घेऊन वाटचाल करत आहोत. देश विकासाची नवी शिखरे सर करत आहे आणि लोकसहभागाने पुढे वाटचाल करत आहे. सामान्यातील सामान्य मानवाला सोबत घेऊन वाटचाल करत आहोत आणि त्याची फळे इतकी चांगली मिळणार आहेत ती तुम्हाला देखील जास्त काळ या ठिकाणी राहावेसे वाटणार नाही. तर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन मला आशीर्वाद दिल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.

खूप खूप धन्यवाद!

 
PIB Release/DL/1816
बीजी -शै.पा. -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau