This Site Content Administered by
पंतप्रधान

नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या एनसीसी मेळाव्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 28-1-2017

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्‍या सर्व तरुण मित्रांनो,

प्रजासत्ताकाच्या पवित्र पर्वानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या एनसीसीच्या छात्रसैनिकांनी लोकशाही प्रति आपली श्रद्धा, भारताच्या एकतेप्रति आपली कटिबद्धता, विविधतेतील एकतेच्या सामर्थ्याची अनुभूति, देशाने आणि जगाने तुमच्या माध्यमातून अनुभवली आहे. मी तुम्हा सर्वांना मनापासून खूप-खूप शुभेच्छा देतो  आणि भारताचे उत्तम नागरिक या नात्याने आगामी काळात देखील तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात देखील, सामान्य जीवनात देखील, राष्ट्र जीवनात देखील आणि मानवतेच्या उच्च आदर्शांप्रतीही तशाच प्रकारचे समर्पणाचे उदाहरण कायम देत राहाल. जे भारताची जगात एक वेगळी ओळख बनवण्याचे कारण बनू शकते.

एनसीसीचे छात्रसैनिक म्हणून केवळ गणवेश नसतो, केवळ संचलन नसते, केवळ शिबिरे नसतात, तर एनसीसीच्या माध्यमातून एक प्रकारे मोहिमेच्या भावनेचे बीजारोपण होते. आपल्या अंतर्मनात आयुष्य जगण्याचा उद्देश, त्याच्यावरील संस्काराचा आणि तो देखील सामूहिक संस्काराचा हा कालखंड असतो. एनसीसीमुळे, आपल्या शिक्षणाव्यतिरिक्त, भारताच्या वैविध्याचे, भारताच्या आंतरिक ऊर्जेचे ,भारताच्या विराट सामर्थ्याचे आपल्याला दर्शन घडते. जगभरातील लोकांना आश्चर्य वाटते कि हा कसा देश आहे, १५०० पेक्षा अधिक बोली भाषा, १०० हुन अधिक भाषा, दर २० कोसांनंतर बोलीभाषा बदलते, वेशभूषा वेगळी असते, खाणे-पिणे वेगळे असते, तरीही एकतेच्या सूत्रात बांधलेले असतात आणि हिमालयात दुखापत झाली तर कन्याकुमारीत अश्रू ढाळले जातात. हि भावना, राष्ट्रीय एकात्मतेची भावना. भारताच्या कोणत्याही भागात चांगले घडते आणि देशवासीयांच्या आनंदाला पारावार राहत नाही आणि जेव्हा भारताच्या कोणत्याही भागात कुठे तरी काही अयोग्य घडते तेव्हा आपल्याला तेवढ्याच वेदना होतात, जणू काही आपल्यासमोर एखादी घटना घडली आहे. देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती आली असताना देशाने एकतेच्या भावनेने त्या वेदना वाटून घेतल्या, दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. देशासमोर एखादे आव्हान उभे ठाकले असेल तर सव्वाशे कोटी देशबांधवांनी त्या आव्हानाला आपले मानले आहे. आपल्या पुरुषार्थाने आणि पराक्रमाने ते पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न केला आहे.

ही आपल्या देशाची स्वतःची ताकद आहे. कोणताही देश राजा-महाराजांमुळे बनत नाही. देश शासकांमुळे बनत नाही. देश सरकारांमुळे बनत नाही. देश बनतो सामान्य नागरिकांमुळे, शिक्षकांमुळे, शेतकऱ्यांमुळे, कामगारांमुळे, वैज्ञानिकांमुळे, विद्वानांमुळे, आचाऱ्यांमुळे, भगवंतांमुळे. एक अखंड तपश्चर्या असते जी राष्ट्राचे हे विराट रूप प्राप्त करते आणि आपण नशीबवान लोक आहोत कारण हजारो वर्षांच्या या महान वारशाचा आपण देखील एक जिवंत अंश आहोत आणि आपल्यावर देखील त्यात काही योगदान देण्याची जबाबदारी आली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जे संस्कार हवेत, जे प्रशिक्षण हवे, जो अनुभव हवा तो एनसीसीच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे.

मला देखील सौभाग्य लाभले आहे. लहानपणी एनसीसीचा छात्रसैनिक म्हणून ही अभियानाची भावना, ही अनुभूती त्याची समज विकसित झाली. मी तुमच्यासारखा हुशार नव्हतो, तेवढा तेजस्वी छात्रसैनिक नव्हतो आणि म्हणूनच दिल्लीमधील संचलनात कधी माझी निवड झाली नाही. मात्र तुम्हाला पाहून मला अभिमान वाटतो कि लहानपणी माझ्याकडे जी शक्ती होती, अनुभूती होती, अनुभव होता त्यापेक्षा तुम्ही अनेक पटीने पुढे आहात, हे पाहून मला आणखी आनंद होतो. म्हणूनच मग असा विश्वास वाटायला लागतो कि तुमच्यात पुढे जाण्याचे सामर्थ्य देखील माझ्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. या युवा शक्तीमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचे सामर्थ्य देखील माझ्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. आणि तेव्हा कुठे देशाच्या उज्वल भविष्यासाठी आश्वस्त होतो, निश्चिन्त होतो.

एनसीसीने, त्यांच्या छात्रसैनिकांनी स्वच्छतेचे अभियान आपलेसे केले. देशात कुठेही जाण्याची संधी मिळाली, एनसीसीकडून योजनाबद्ध पद्धतीने स्वच्छतेचे अभियान राबवण्यात आले आहे. ज्या संघटनेकडे १३ लाखांहून अधिक छात्रसैनिक आहेत, ते छात्रसैनिक स्वतः नियोजनबद्ध मार्गाने  स्वच्छतेचे अभियान राबवतात, इतरांना प्रेरणा देतात. मात्र, एक नागरिक म्हणून, स्वतःच्या आयुष्यात, आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात, आपल्या मित्रमंडळींमध्ये,त्यांच्या कुटुंबांमध्ये, स्वच्छता, हा स्वभाव बनावा, यासाठी प्रेरणादायी संस्थेच्या रुपात एनसीसीचा प्रत्येक छात्रसैनिक काम करू शकतो. एनसीसीच्या व्यवस्थेअंतर्गत, स्वच्छता एक प्रेरणा आहे, मात्र, एक छात्रसैनिक नागरिक म्हणून, समाजात स्वच्छता हा स्वभाव बनवण्यासाठी, स्वच्छता हे भारताचे चारित्र्य  बनावे, आणि २०१९ मध्ये महात्मा गांधींची १५० वि जयंती जेव्हा साजरी करू, तेव्हा देशात अस्वच्छतेप्रति भरपूर तिटकारा निर्माण व्हावा, स्वच्छतेप्रति प्रेम वाटावे, स्वच्छता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जबाबदारी बनावी, यासाठी प्रत्येकाने खूप काही करण्याची आवश्यकता आहे. एनसीसीचे छात्रसैनिक इतक्या मोठ्या संख्येने आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले तरुण आहेत, ऊर्जा आहे, उमेद आहे, उत्साह आहे, प्रशिक्षण आहे, ते तर सर्वात मोठी ताकद बनून ही स्वच्छतेची चळवळ पुढे नेऊ शकतात.

तरुण मने आणि त्यातही भारतीय मने तंत्रज्ञान लवकर आत्मसात करून घेतात. या देशातील १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जवळ-जवळ सर्व नागरिकांचे 'आधार' कार्ड असणे, 'आधार' क्रमांक असणे, बायोमेट्रिक द्वारे त्याची ओळख पटणे, हे ही कोणत्याही देशाची खूप मोठी संपत्ती आहे , जी आज भारताकडे आहे. ही विशिष्ट ओळख आपल्या सर्व योजनांचा आधार बनू शकते.

सध्या लोक डिजिटल चलनाकडे कसे वळतील, याचे एक अभियान सुरु आहे. एनसीसीच्या छात्रसैनिकांनी ते पुढे नेले आहे. नोटा; नोटांची छपाई, छपाईनंतर नोटा गावोगावी पोहोचवणे, अब्जावधी रुपयांचा खर्च येतो. एकेक एटीएम सांभाळण्यासाठी पाच-पाच पोलिसवाले लागतात. जर आपण डिजिटल मार्गाने चाललो तर देशाचे किती पैसे वाचवू शकतो आणि ते पैसे गरीबाला घर देण्यासाठी, गरीबाला शिक्षण देण्यासाठी, गरीबाला औषधे देण्यासाठी, गरीबाच्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी त्या पैशांचा उपयोग होऊ शकतो. आपल्या खिशातून काहीही न देता, स्वतःच्या पाकिटातून काही वेगळे खर्च न करता, जर आपण देशात डिजिटल देयकांची सवय लावली.

भीम ऍप्प , बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करत भीम अँप आपल्या मोबाईल फोनवर डाऊनलोड करा आणि भीम ऍप्प द्वारे लोकांना व्यवहार करण्याची सवय लावा, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सवय लावा, जिथून आपण खरेदी-विक्री करतो, त्या दुकानदाराला सवय लावू, तुम्हाला कल्पना नाही येणार, इतकी मोठी देशसेवा करू शकाल आणि भारतातील प्रत्येक नागरिक हे काम करू शकतो.

बदलत्या युगात, बदलणाऱ्या व्यवस्थांमध्ये आणि जेव्हा तंत्रज्ञान प्रेरित समाज असेल,तेव्हा भारत जगात कुठेही मागे राहू शकत नाही. ज्या देशाकडे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा खालील वयोगटातील आहे, सर्वाधिक तरुण लोकसंख्या म्हणून जगात आपण छाती फुलवून, डोळ्याला डोळा भिडवून बोलतो, त्या देशाच्या ८० कोटी युवकांनी जर ठरवले कि अर्थव्यवस्थेमध्ये एवढे मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचे आहे, कुणी कल्पनाही करू शकत नाही कि पंतप्रधांनापेक्षा अधिक किंवा अर्थमंत्र्यांपेक्षाही अधिक खूप मोठे काम भारताचा तरुण करू शकतो , परिवर्तन घडवून आणू शकतो. एनसीसी ने देखील हि जबाबदारी उचलली आहे. मला विश्वास आहे की ते हि जबाबदारी पार पाडतील.

एनसीसीच्या छात्रसैनिकां मध्ये देशभक्ती ठासून भरली आहे. शिस्त हे त्यांचे वैशिष्ट्य असते. एकत्रितपणे काम करणे हा त्यांचा स्वभाव असतो. एकमेकांच्या बरोबरीने चालणे, खांद्याला खांदा लावून चालणे , मात्र बरोबरीने विचार करणे, विचार करून चालणे, आणि उद्दिष्ट साध्य करणे हे एनसीसीचे वैशिष्ट्य असते. म्हणूनच आज जेव्हा जग दहशतवादाचे आव्हान झेलत आहे, तेव्हा आपल्या तरुण पिढीमध्ये समाजाप्रति, देशाप्रति आपलेपणाची भावना निरंतर जागवत ठेवावी लागते. आपल्याकडे म्हण आहे,  ‘राष्‍ट्रम जाग्रयाम व्‍यं’. निरंतर जागरूकता. यासाठी जागरूक राहावे लागते. आपल्या आजूबाजूचा कोणताही युवक कुठे चुकीच्या मार्गावर तर चालत नाही ना, त्याला रोखायला हवे. आयुष्यात अशा कोणत्या वाईट गोष्टी तर घडत नाहीत ना ज्या त्याला उध्वस्त करतील, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करतील आणि समाजासाठी तो भार बनून राहील. जर आपण जागरूक राहिलो तर आपल्या आजूबाजूच्या परिसराला, आपल्या सहकार्यांना, भले ते एनसीसीत असतील किंवा नसतील, आपण त्यांनाही , जी अभियानाची भावना आपण मिळवली आहे, आयुष्याचा उद्देश जो आपण जाणला आहे, त्यांच्यापर्यंत देखील ते पोहोचावे आणि ते देखील आपल्या मार्गावर चालू शकतील.

आज प्रजासत्ताकाच्या या संचलनात इतके दिवस तुम्ही सर्वांनी अनेक गोष्टी शिकल्या आहेत, अनेक नवीन मित्र मिळवले आहेत, भारताचा कानाकोपरा जाणून घेण्याची समजून घेण्याची संधी मिळाली आहे. अतिशय आशावादी आठवणी बरोबर घेऊन तुम्ही तुमच्या घरी परत जाणार आहात. तुमच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, तुमचे सहकारी या गोष्टीची वाट पाहत असतील कि तुम्ही कधी पोहोचाल आणि आपले अनुभव सांगाल. तुम्ही त्यांना तुमचा फोटो देखील मोबाईल फोनमधून पाठवला असेल. सगळ्यांना पाठवला असेल कि मी संचलनात इथे होतो आणि तुमच्या मित्रांनीही संचलन बारकाईने पाहिले असेल ,संपूर्ण संचलन दिसेल न दिसेल , आपल्या गावातील मुलगा दिसतोय कि नाही .आपल्या शाळेतील मुलगा दिसतोय कि नाही दिसत. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाची नजर तुमच्यावर होती. हा काही छोटा सन्मान नाही. हा किती मोठा आनंदाचा क्षण असतो. त्या आठवणी घेऊन जेव्हा तुम्ही परत जात आहात , तेव्हा हा अनमोल खजिना तुमच्याजवळ आहे. तो कधी बिखरू देऊ नका, विसरू देऊ नका, तो सांभाळून ठेवा आणि पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा. या चांगल्या गोष्टीना जितका उजाळा द्याल, आयुष्य तितके फुलून येईल. त्याचा संपूर्ण सुवास तुमच्या आयुष्यातील अंतरंगात दरवळत राहील जो आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला प्रफुल्लित करत राहील.

माझ्याकडून  तुम्हा सर्वांना मनापासून खूप-खूप शुभेच्छा. आज विजयी झालेल्या छात्रसैनिकांना देखील मनापासून खूप-खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. एनसीसीला खूप-खूप शुभेच्छा देतोखूप-खूप धन्यवाद.

 

 
PIB Release/DL/184
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau