This Site Content Administered by
पंतप्रधान

सायबर स्पेस विषयावरील जागतिक परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 23-11-2017

श्रीलंकेचे पंतप्रधान, मान्यवर श्री रानिल विक्रमसिंघे,

भारत आणि परदेशातील मंत्री,

आयटीयु चे सरचिटणीस,

उपस्थित इतर मान्यवर,

120 देशातून आले प्रतिनिधी आणि विद्यार्थी,

माझ्या बंधू-भगिनीनो

सायबर स्पेस या विषयावर आज नवी दिल्लीत आयोजित केलेल्या या जागतिक परिषदेत मी आपणा सर्वांचे खूप स्वागत करतो. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून या परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो.

मित्रांनो,

गेल्या काही दशकात सायबर स्पेस मुळे जगात कसे मोठे परिवर्तन झाले आहे, याची आपणा सर्वाना कल्पना आहेच. इथे आज आलेल्या काही वरिष्ठ पत्रकारांना सत्तर –ऐंशीच्या दशकातील बोजड, मोठमोठे संगणक आणि त्याची सगळी किचकट प्रणाली आठवत असेलच. तेव्हापासून आजपर्यत बरेच काही बदलले आहे. इमेल आणि व्यक्तिगत संगणकांमुळे नव्वदच्या दशकात या क्षेत्रात एक मोठी क्रांतीच झाली. त्याच्याच पाठोपाठ सर्व आधुनिक सोयीसुविधा, समाज माध्यमे, मोबाईल फोनवर इंटरनेटची सुविधा, अशा गोष्टीनी झपाट्याने शिरकाव केला. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ किंवा आर्टिफ़िशियल इंटेलिजन्स या संकल्पना आता सर्वसामान्यांना परिचित झाल्या आहेत. यावरूनच हे स्पष्ट होतेय की हे बदल आता असेच घडत राहतील. कदाचित आपल्या कल्पनेपेक्षा अधिक वेगाने!

डिजिटल क्षेत्रात झपाट्याने झालेल्या या बदलांचे पडसाद भारतातही उमटले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं भारताचं ज्ञान आणि कौशल्य आजकाल जगभरात वाखाणले जाते. भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी जगभरात आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे.

आज डिजिटल तंत्रज्ञान हे सर्वांसाठी एक महत्वाचे सामर्थ्यच बनले आहे.त्यामुळे आज सेवा सुविधा आणि प्रशासनाचे काम जलद गतीने होण्यास मदतच झाली आहे. शिक्षण ते आरोग्य अशा विविध क्षेत्रात त्यांचा विस्तार वाढतो आहे. उद्योग व्यवसायाला, अर्थव्यवस्थेला नवा आकार देण्यात डिजिटल तंत्रज्ञान उपयुक्त ठरते आहे. या सर्व माध्यमातून, डिजिटल तंत्रज्ञान हे समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचे ठरते आहे. मोठ्या पातळीवर या तंत्रज्ञानाने सगळे जग एकाच पातळीवर आणले आहे. भारतासारखे विकसनशील राष्ट्र, विकसित देशांसोबत समानतेने स्पर्धा करू शकते आहे.

मित्रांनो,

तंत्रज्ञान अडथळ्यांना दूर सारते, जगाला जवळ आणते. ‘वसुधैव कुटुंबकम’- म्हणजेच सगळे जग माझे घर आहे, या भारतीय तत्वज्ञानाला प्रत्यक्षात आणण्याचे काम या डिजिटल तंत्रज्ञानातून झाले आहे. या सुभाषितातून आमची प्राचीन, सर्वसमावेशक परंपरा व्यक्त होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने, या भावनेला आणि अर्थातच, देशातील लोकशाही मूल्यांना मूर्त स्वरूप देण्यास मदत होते आहे .

आम्ही भारतात तंत्रज्ञानाच्या मानवी चेहऱ्याला प्राधान्य देतो आहोत आणि माणसाचे जगणे अधिक सुकर करायला त्याचा वापर करतो आहोत. डिजिटल तंत्रज्ञानाची सुविधा सर्वसामान्यांपर्यत पोचवून त्यांना सक्षम करणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ‘डिजिटल इंडिया’ जगातील सर्वात मोठा तंत्रज्ञानाधारित सुधारणांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमातून आमच्या नागरिकांना डिजिटल सेवा दिली जात आहे. आम्ही आमच्या नागरिकांना सक्षम करण्यासाठी मोबाईल शक्तीचा किंवा ‘एम शक्तीचा’ उपयोग करतो आहोत.

मला खात्री आहे की तुम्हा सर्वाना ‘आधार’ या आमच्या एकल बायोमेट्रिक ओळखपत्राची माहिती मिळाली असावी. आमच्या जनतेची लांबलचक रांगा आणि दीर्घकाळ चालणाऱ्या किचकट सरकारी प्रक्रियांपासून सुटका करण्यासाठी आम्ही या ओळखक्रमांकाचा वापर करतो आहोत.  तीन घटक, पहिला: जन धन बँक खात्यांच्या आधारे वित्तीय समावेशन, दुसरे, आधार क्रमांक आणि तिसरा मोबाईल फोन, या तिन्हीच्या आधारे आम्ही भ्रष्टाचाराला मोठा पायबंद बसवला आहे. याला आम्ही ‘जेएएम’ (जाम) त्रिशक्ती असे म्हणतो.अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यासाठी जाम त्रिशक्तीची मदत घेऊन, आम्ही या अनुदान वाटपात होणाऱ्या गळतीला रोखून आतापर्यत 10 अब्ज डॉलर्स वाचवले आहेत.

भारतात आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे आयुष्य कसे सुकर झाले आहे, हे सांगण्यासाठी मी काही उदाहरणे देतो.

आज एखादा शेतकरी, विविध प्रकारच्या सेवा, जसे जमिनीचा पोत तपासणाऱ्या चाचण्या, तज्ञांचा सल्ला, त्याच्या पिकाला मिळणारी उत्तम किंमत या सगळ्याची माहिती केवळ एका क्लिकवर मिळवू शकता. डिजिटल तंत्रज्ञान हे म्हणूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.

एखादा छोटा स्वयंउद्योजकही आज सरकारच्या ई-मार्केटप्लेस मध्ये नोंदणी करू शकतो या पोर्टलवर सरकारी विभागांना हव्या असलेल्या वस्तू आणि पदार्थांची लिलाव पद्धतीने खरेदी-विक्री होते, त्यात ते भाग घेऊ शकतात. सरकारला आपला माल पुरवण्याची त्यांना संधी मिळू शकते. त्यांचा उद्योग जसजसा वाढतो, तसतशी ते सरकारची खरेदी किंमत कमी करु शकतात. यामुळे कार्यक्षमता तर वाढतेच,त्याशिवाय सार्वजनिक निधीचा योग्य वापर होतो.

आता निवृत्त नागरिकांना जिवंत असल्याचा दाखला देण्यासाठी, स्वतः बँक अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही ते आता आधार बायोमेट्रिक व्यवस्थेचा वापर करून,  प्रत्यक्ष कष्ट न घेता, हा दाखला बँकेत देऊ शकतात.

महिला आज माहिती तंत्रज्ञान मनुष्यबळाचा महत्वाचा घटक आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज महिला चालवत असलेल्या अनेक स्वयंउद्योगांना मोठी मदत मिळाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महिलांच्या या प्रगतीमुळे एकप्रकारे लैंगिक भेदभाव कमी होण्यास मदत झाली आहे.

भारतीय नागरिक आज अतिशय वेगाने रोकडरहित व्यवहारांकडे वळले आहेत. त्यासाठी आम्ही भीम, म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनी हे ॲप सुरु केले आहे. या ॲप मुळे देश कमी रोख व्यवहार असलेल्या भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

या उदाहरणांवरून तंत्रज्ञानामुळे प्रशासनात सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मित्रांनो,

जनतेचा प्रशासनात सहभाग वाढावा यासाठी आम्ही आमच्या जन भागीदारी संकल्पनेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करतो आहोत. मी 2014 साली ज्यावेळी पहिल्यांदा कार्यभार हाती घेतला, त्यावेळी अनेकांनी, विशेषतः अनेक युवकांनी आपल्या कल्पना सरकारपर्यंत पोचवण्याची आणि देशासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्हाला दृढ विश्वास आहे की लक्षावधी भारतीयांकडे, विशेषतः आजही अशा कल्पना आहेत, ज्या भारताला नव्या उंचीवर घेऊन जातील.

याच प्रेरणेतून आम्ही नागरीकांच्या समावेशासाठी ‘माय गव्ह’ पोर्टल तयार केले. या पोर्टलवर नागरिक त्यांचे विचार आणि कल्पना मांडू शकतात, त्यांच्या महत्वाच्या सूचना देऊ शकतात. आमच्या अनेक धोरणात्मक निर्णयामध्ये आम्हाला महत्वाच्या सूचनांची खूप मदत झाली आहे. सरकारच्या अनेक उपक्रमाचे मानचिन्ह आणि लोगो करण्याचे काम आम्ही या माय गोव्ह वर घेतलेल्या स्पर्धातूनच झाले आहे. पंतप्रधानानाचे अधिकृत पोर्टल, तयार करण्यासाठी सुध्दा आम्ही ‘माय गव्ह’ वर स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत कशी करता येईल, याचे महत्वाचे उदाहरण म्हणजे ‘माय गोव्ह’ आहे.

याशिवाय आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो.मी कार्यभार स्वीकारल्यानंतर, मला लक्षात आले की अनेक सरकारी प्रकल्प आणि योजना राबवण्यात प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचे आणि ठराविक गोष्टीवर भर देऊन निर्णय टाळणे असे अडथळे आहेत. त्यामुळेच आम्ही, सायबर स्पेस तंत्रज्ञानावर आधारित एक कार्यक्रम तयार केला- प्रगती! म्हणजेच, वेळेत अंमलबजावणी होण्यासाठीची कार्यक्षम प्रशासन व्यवस्था. प्रगतीचा हिंदीतील अर्थ ‘विकास’ असा होतो. 

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी, मी या प्रगती सत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, तंत्रज्ञानानाने या अनावश्यक भिंती मोडून टाकल्या आहेत. आम्ही आपापल्या कार्यालयात बसून अनेक प्रकल्पांवर चर्चा करतो, समस्यांवर बोलतो आणि तिथल्या तिथे त्यांच्यावर तोडगाही काढतो.मला इथे सांगायला आवडेल, की प्रगतीमुळे आम्ही चर्चा करुन, एकमताने आणि जलद गतीने निर्णय घेऊ शकतो आहोत, त्यामुळे देशाची प्रगती होण्यास मदत झाली आहे. प्रगतीमुळेच अनेक प्रलंबित पायाभूत प्रकल्पांचे काम मार्गी लागले असून, कोट्यवधी डॉलर्सच्या किमतीचे प्रकल्पांचे कामा आता सुरु झाले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने मी माझे स्वतःचे नरेंद्र मोदी ॲप देखील तयार केले आहे. या ॲपमुळे मी थेट जनतेशी संवाद साधू शकतो. या ॲपवर मला मिळणाऱ्या सूचना, सल्ले अतिशय मोलाचे असतात.

आज आम्ही ‘उमंग’ या मोबाईल ॲपचे उद्घाटन केले. या ॲपमुळे जनतेला त्यांच्यासाठी असलेल्या अनेक सेवा मिळू शकतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांद्वारे या सेवा पुरवल्या जातील. सेवा देण्याच्या या एकात्मिक दृष्टिकोनामुळे सरकारच्या सर्व विभागांवर कार्यक्षमतेने काम करून जनतेला सेवा देण्याचे बंधन कायम राहते, प्रशासनाची कार्यक्षमता वाढते.

मित्रानो,

आमचे अनुभव आणि यशोगाथा जागतिक समुदायासमोर मांडण्यात आम्हाला विशेष आनंद होईल, यात शंका नाही. तर दुसरीकडे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या शिक्षण आणि आरोग्य सेवेत येणारे अडथळे दूर करण्यात, आणि चांगले उपक्रम राबवण्यास भारत अतिशय उत्सुक आहे. दिव्यांग व्यक्तींनाही सायबरस्पेस तंत्रज्ञान वापरता यावे, अशीही आमची इच्छा आहे. अलीकडेच सुमारे 36 तास झालेल्या हॅकेथॉनमध्ये आमच्या मंत्र्यांनी मांडलेल्या अनेक जुन्या किचकट समस्यांवर सहभागी महाविद्यालीन तरुणांनी प्रभावी उपाययोजना सुचवल्या. जगाचे अनुभव आणि त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या उत्तमोत्तम पद्धती शिकण्याची आमची इच्छा आहे. जेव्हा आपल्या सगळ्यांचा विकास होतो, तेव्हाच तो खरा विकास, यावर आमचा विश्वास आहे. नवनवीन संशोधनांसाठी सायबर स्पेस महात्वाचा भाग आहे. आज आमच्या देशातील स्टार्ट अप कंपन्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर तोडगा काढण्यास सज्ज आहेत. भारताच्या स्टार्ट अप कंपन्यांच्या अफाट क्षमतेचा, जगातील गुंतुवणूक समूह नक्कीच फायदा घेईल, असा मला विश्वास आहे. ह्या क्षेत्रात गुंतुवणूक करून भारतात उलगडणाऱ्या स्टार्ट अप व्यवसायाचा भाग बनण्याचे मी आपल्याला आमंत्रण देतो.

मित्रांनो,

इंटरनेट मुळात सर्वसमावेशक आहे, कुणीही त्याचा वापर करू शकतो. ह्यात सर्वांना समान संधी उपलब्ध आहेत. आज फेसबुक, ट्विटर आणि इंस्ताग्रम ह्या सारख्या समाजमाध्यम वापरकर्ते अनेक विषयांत समाजाचे मत तयार करतात, समाज माध्यमांमुळे सायबर स्पेस मध्ये जनतेचा सहभाग वाढला आहे. विविध स्टुडिओ मधून दिल्या जाणाऱ्या बातम्यांना आता समाजमाध्यमांवर सांगितल्या जाणाऱ्या अनुभवांची जोड दिली जाते. अनुभव आणि कौशल्याची जोड असलेल्या ह्या अनुभवाकडे जाण्याचा हा प्रवास, ही सायबर जगाची देण आहे.

या परिषदेत होणारी चर्चा फलदायी होऊन त्यातून जनहिताचे निर्णय होवोत, या शुभेच्छांसह मी माझे भाषण संपवतो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि या परिषदेला शुभेच्छा देतो.

धन्यवाद !

 
PIB Release/DL/1858

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau