This Site Content Administered by
पंतप्रधान

जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद २०१७, मध्ये पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 28-11-2017

अमेरिकेच्या सहकार्याने, भारतात जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद, २०१७ आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पहिल्यांदाच ही परिषद दक्षिण आशियात होत आहे.जागतिक उद्यमशीलता व्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने, ही शिखर परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे. या ठिकाणी, बिनीचे गुंतवणूकदार, स्वयंउद्योजक, अभ्यासक, विचारवंत आणि इतर हितसंबंधी गट एकत्र येऊन चर्चा-विचारविनिमय करु शकतात.

ही परिषद केवळ सिलिकॉन व्हैलीला हैदराबादशी जोडणारी नाही, तर भारतात या परिषदेचे आयोजन झाल्यामुळे, अमेरिका आणि भारतातील संबध दृढ असल्याचेही सिद्ध झाले आहे. उद्यमशीलता आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याविषयी आमची एकत्रित कटिबद्धता पण यातून अधोरेखित झाली.   

यंदाच्या परिषदेसाठी ज्या विषयांची निवड करण्यात आली आहे, त्यात आरोग्य आणि सजीव विज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था आणि वित्तीय तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा, माध्यमे आणि मनोरंजन, यांचा समावेश आहे. हे सगळे महत्वाचे विषय असून त्यांचा मानवतेचे कल्याण आणि समृद्धीशी निकटचा संबंध आहे.

यंदाच्या जागतिक उद्यामशीलतेची संकल्पना आहे महिला अग्रस्थानी, समृद्धी सर्वांसाठी! भारतीय पौराणिकशास्त्रात, स्त्रीला ‘शक्तीचे’ प्रतिक मानले जाते- ती शक्तीची देवता आहे. आमच्या विकासासाठी सर्वात आधी महिला सक्षम होणे गरजेचे आहे, यावर आमचा विश्वास आहे.

आमच्या इतिहासात अत्यंत बुद्धीमान आणि दृढनिश्चयी महिलांची अनेक उदाहरणे आणि घटना तुम्हाला सापडतील. भारतात इसवी सन पूर्व सातव्या शतकात होऊन गेलेली एक प्राचीन तत्ववेत्त्ती विदुषी गार्गीने, तत्वज्ञानावरील चर्चेसाठी पुरुष विद्वानांना आव्हान दिलं होतं. त्याकाळच्या मानाने हे अतिशय धारिष्ट्याचे पाऊल होते. अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाईसारख्या आमच्या लढवय्या राण्यांनी आपली राज्ये राखण्यासाठी मोठा लढा दिला. भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासातही महिलांच्या कर्तृत्वाचे असे अनेक किस्से तुम्हाला सापडतील. 

आजही जीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय महिला नेतृत्व करत आपला ठसा उमटवत आहेत. मंगळावरची आमची अवकाश मोहीम, मंगळयान, यशस्वी करण्यात महिला शास्त्रज्ञाचा मोठा सहभाग होता. अमेरिकेच्या अवकाश मोहिमेतही कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स या, दोन भारतीय वंशाच्या महिलांचा सहभाग होता.

आमच्या सर्वात जुन्या चार उच्च न्यायालयांपैकी तीन ठिकाणी आज प्रमुख न्यायाधीशपदी महिला आहेत. आमच्या महिला खेळाडूंच्या कामगिरीमुळे तर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ह्याच हैदराबाद शहराच्या कन्या, सायना नेहवाल,पी व्ही सिंधू आणि सानिया मिर्झाने भारताचा गौरव वाढवला आहे.

भारतात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण आणि नागरी भागात महिलांचे प्रतिनिधित्व एक तृतीयांशपेक्षा कमी असणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. अगदी ग्रामपंचायत स्तरापासून निर्णयप्रक्रियेत महिलांचा सह्भाग असेल याची आम्ही काळजी घेतो.

कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्रातल्या व्यवसायात ६० टक्के महिला आहेत. गुजरातमधील अमूल सहकारी दुग्धव्यवसाय संघटना आणि महिला गृहउद्योग लिज्जत पापड संघटना या महिला नेतृत्वाखालील यशस्वी आणि जागतिक मान्यताप्राप्त सहकारी संस्थांचे आदर्श उदाहरण आहे.

मित्रांनो,

आज या जागतिक उद्यमशीलता परिषदेत, ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला प्रतिनिधी आहेत. येत्या दोन दिवसात तुम्ही अशा अनेक महिलांना भेटाल, ज्यांनी समाजाचा सरळधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळे करण्याचे धाडस केले आहे. या महिला आता नव्या पिढीतल्या युवतींचे प्रेरणास्थान ठरल्या आहेत. या परिषदेत, उद्यमशील महिलांना आपल्याला आणखी काय मदत करता येईल यावर ठोस चर्चा आणि उपाययोजना होतील, अशी आशा आहे.

माझ्या बंधू-भगिनीनो,

नवनवीन संशोधन आणि उदयमशीलतेचा, भारत नेहमीच पोषणकर्ता राहिलेला आहे. प्राचीन भारतीय अभ्यासग्रंथ, चरकसंहितेमुळेच जगाला आयुर्वेदाची देणगी मिळाली. योग हे देखील प्राचीन भारतातील एक महत्वाचे संशोधन आहे.आता दरवर्षी सगळे जग एकत्र येऊन २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहे.योग, अध्यात्म,आणि प्राचीन आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रचार करण्यात आज अनेक स्वयंउद्योजक अग्रेसर आहेत.

आज आपण ज्या डिजिटल जगात आपण जगतो, ती द्वीअंगी व्यवस्थांवर आधारित आहे. या द्विअंगी व्यवस्थेचा आधार असलेल्या शून्याचा शोध भारतातील आर्यभट्टानी  लावला. त्याशिवाय,आजच्या आधुनिक वित्तीय धोरणात असलेल्या अनेक गोष्टी, जसे कररचना आणि सार्वजनिक वित्त धोरणे या सगळ्याची मूळ संकल्पना कौटिल्याचे अर्थशास्त्र या आमच्या प्राचीन ग्रंथात स्पष्ट केलेली आहे.

धातू शुद्ध करण्याची प्राचीन भारतीय विद्याही सर्वश्रुत आहे. आमची अनेक जुनी बंदरे आणि धक्के, तसेच जगातल्या सर्वात जुन्या गोदीपैकी एक असलेली लोथलची गोदी ही भारताच्या प्राचीन समृद्ध व्यापाऱ्याचीच उदाहरणे आहेत. व्यापारासाठी परदेशात जाणाऱ्या आमच्या प्राचीन उद्योजकांच्या कथा, त्यांचे उद्यमशील व्यक्तिमत्व आणि परदेशी व्यापार वाढविण्याची त्यांची वृत्तीच अधोरेखित करतात.

स्वयंउद्योजक असल्याचे सिद्ध करणारी वैशिष्ट्ये कोणती?

एखादा स्वयंउद्योजक आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपले ज्ञान आणि कौशल्य वापरतो. स्वयंउद्योजक विपरीत परिस्थितीतही संधी शोधून काढतो. त्याच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तो, त्यानुसार आपल्या उद्योगव्यासायात बदल करतो, जेणेकरून त्याचे ग्राहक खुश होतील. त्यांच्यात भरपूर संयम आणि दृढनिश्चय असतो. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, की प्रत्येक नव्या कामाला तीन टप्प्यातून जावे लागते. चेष्टा, विरोध आणि मग स्वीकार! जे काळापुढचा विचार करतात,त्यांच्याविषयी, सर्वसामान्याचा गैरसमज होणं साहजिक आहे. अनेक स्वयंउद्योजकांना याचा अनुभव आलाच असेल.

मानवतेच्या कल्याणासाठी वेगळा आणि काळाच्या पुढचा विचार करणे, हेच स्वयंउद्योजकाचे वेगळेपण आहे. हीच शक्ती मी आजच्या भारतीय युवकांमध्ये बघतोय. आज मी ८० कोटी उद्यमशील युवक बघतोय, ज्यांच्यात हे जग अधिक उत्तम बनवण्याची क्षमता आहे.

उद्यमशीलतेमध्ये विकास करण्याची क्षमता मला दिसते. मग ते अधिकाधिक लोकांपर्यत पोहचणे असो, किंवा रोजगार निर्मिती असो.

आमची स्टार्ट अप इंडिया ही योजना एकाच वेळी उद्यमशीलता आणि नवनवीन  संशोधनांना बळ देणारी, प्रोत्साहन देणारी सर्वसमावेशक योजना आहे. नव्या उद्यमशील तरुणांना नियमांच्या कचाट्यातून वाचवणे, त्यांच्यावरचे नियमांचे ओझे कमी करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच या योजनेचा उद्देश आहे. आम्ही आतापर्यत 1200 हून अधिक कालबाह्य कायदे रद्द केले आहेत, 21 क्षेत्रांसाठी थेट परदेशी गुंतवणुकीसाठी असलेले 87 नियम शिथिल केलेत. तसेच अनेक सरकारी कामकाज प्रक्रिया ऑनलाइन केल्या आहेत.

देशात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे , या दृष्टीने आम्ही अनेक पावलं उचललीत. याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात देशात उद्योगस्नेही वातावरण असण्याच्या जागतिक क्रमवारीत भारताने 142 व्या स्थानापासून 100 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

त्याशिवाय बांधकाम परवाने, पतपुरवठा व्यवस्था, अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे संरक्षण, करभरणा, करार आणि नादारी-दिवाळखोरी ह्या विषयांवर आम्ही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत.

मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. उद्योगस्नेही वातावरणाच्या क्षेत्रात आम्ही १०० व्या स्थानावर पोचलो असलो, तरी आम्ही त्यावर समाधानी नाही. ५०व्या स्थानावर पोहचण्याचे आमचे लक्ष्य आहे. 

दहा लाख रुपयांपर्यतची गुंतवणूक असलेल्या छोट्या कंपन्याना अर्थसहाय करण्यासाठी आम्ही मुद्रा योजना सुरु केली आहे. २०१५ साली ही योजना सुरु झाली आणि तेव्हापासून आतापर्यत ९० दशलक्ष कर्जवाटप झालं आहे, या अंतर्गत, ४.२८ ट्रिलीयन रुपये कर्जाला मंजुरी मिळाली आहे. यापैकी ७० दशलक्ष कर्जांचे वितरण महिला उद्योजकांना करण्यात आले आहे.

आमच्या सरकारने अटल संशोधन अभियान सुरु केलं आहे. शालेय विद्यार्थ्यामध्ये संशोधकवृत्ती आणि उद्यमशीलता वाढावी, यासाठी आम्ही या अभियानाअंतर्गत, ९०० पेक्षा अधिक शाळांमध्ये  छोट्या प्रयोगशाळा उभारतो आहोत. आमच्या ‘मेंटर इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही तज्ञांची नेमणूक केली जाते. त्याशिवाय,विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संशोधनासाठी १९ इंक्यूबेशन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सगळ्या प्रयत्नातून संशोधक वृत्ती आणि स्टार्ट अप व्यवसायाला निश्चितच मदत मिळेल.

आम्ही आधार क्रमांक तयार केला आहे. बायोमेट्रिक ओळखीवर आधारित जगातला हा सर्वात मोठा डिजिटल माहितीचा साठा आहे. आतापर्यत भारतात, १.१५ दशलक्ष नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे.तसेच,या आधार क्रमांकावरून दररोज सुमारे ४० दशलक्ष व्यवहार होत असतात. आता आम्ही या डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचे लाभ आम्ही लाभार्थ्यांपर्यत थेट पोहोचवू शकतो. त्यासाठी आम्ही थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या आधाराशी सांगड घातली आहे.

जन धन योजनेअंतर्गत देशात ३० कोटी खाती उघडली गेली आहेत ज्यात ६८५ अब्ज रुपयांपेक्षा म्हणजेच, १० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक पैसे जमा झाले आहेत. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबाना बँकिंग व्यवस्थेत येता आले, एका औपचारिक वित्तीय व्यवस्थेत त्याना प्रवेश मिळाला. विशेष म्हणजे, यापैकी ५३ टक्के बँक खाती महिलांची आहेत.

आम्ही हळूहळू कमी रोकड व्यवहार असलेल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो आहोत. त्यासाठी आम्ही भीम हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ॲप सुरु केलं आहे. एका वर्षाच्या आता या ॲप वरून दररोज सुमारे २८० हजार व्यवहार होत आहेत. 

देशातल्या प्रत्येक गावात वीज पुरवठा करण्याचा आमचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आम्ही सौभाग्य योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत, देशातल्या प्रत्येक कुटुंबाला डिसेंबर २०१८ पर्यंत वीज उपलब्ध होईल.

देशातल्या सर्व ग्रामीण भागात मार्च २०१९ पर्यंत उच्च वेगाची ब्रॉड बँड इंटरनेट सेवा देण्याची योजना आम्ही हाती घेतली आहे.

आमच्या स्वच्छ ऊर्जा योजनेअंतर्गत केवळ तीन वर्षात आम्ही अक्षय उर्जेची क्षमता ३०००० मेगा वॅट वरून ६०००० मेगा वॅट अशी दुप्पट केली आहे. सौर उर्जा निर्मितीही गेल्या एकाच वर्षात ८० टक्क्यांनी वाढली आहे. आम्ही राष्ट्रीय गॅस ग्रीड विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याशिवाय एक सर्वसमावेशक राष्ट्रीय उर्जा धोरण आखण्याचे कामही सुरु आहे.

आमच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य मोहिम राबवली जाते आहे. तसेच, ग्रामीण आणि शहरी गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचे साधन आम्ही निर्माण करून देतो आहोत. 

सागरमाला आणि भारतमाला सारखे आमचे पायाभूत आणि दळणवळण सुविधा प्रकल्प नवउद्योजकांसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करत आहेत.

अलीकडेच भारतात झालेल्या जागतिक अन्न परिषदेमुळे आम्हाला अन्नप्रक्रिया आणि कृषीसंलग्न क्षेत्रातील स्वयंउद्योजकांना भेटण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

पारदर्शक धोरणे आणि कायद्याचे राज्य याची प्रभावी अंमलबजावणी, यातून देशात स्वयंउद्योजकतेला,उद्यमशीलतेला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते, याची आमच्या सरकारला जाणीव आहे. 

आम्ही काही दिवसांपूर्वी देशात वस्तू आणि सेवा कर लागू करून देशाच्या कररचनेत ऐतिहासिक परिवर्तन केले. २०१६ साली आम्ही आणलेल्या नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या प्रलंबित समस्या वेळेत आणि सहज सुटण्यास मदत झाली आहे. यातच आणखी एक पाउल पुढे जात, आम्ही जाणूनबुजून करबुडवेगिरी करणाऱ्या उद्योजकांना बुडीत मालमत्तांच्या लिलावप्रक्रियेत भाग घेण्यास बंदी घातली आहे.

समांतर अर्थव्यवस्थेला आळा घालण्यासाठी, करचुकवेगिरी आणि काळ्या पैशांचे व्यवहार रोखण्यासाठी आम्ही अनेक कठोर पावले उचललीत.

आमच्या या प्रयत्नांची दखल घेत मूडीज या आंतरराष्ट्रीय वित्तीय पतमानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात सुधारणा केली आहे, सुमारे १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही सुधारणा झाली आहे.

जागतिक बँकेच्या प्रत्यक्ष कामागिरी निर्देशांकात (लॉजीस्टीक परफॉर्ममन्स इंडेक्स) भारत २०१४ साली ५४ व्या स्थानावर होता, तो २०१६ साली ३५ व्या स्थानावर पोचला आहे. यातून एखादे उत्पादन भारतात आणण्याची अथवा भारताबाहेर नेण्याची प्रक्रिया आता तुलनेने सहज आणि प्रभावी झाल्याचेच निदर्शनास येते. 

स्थूल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी गुंतवणूक स्नेही वातावरण टिकून राहणे, स्थिर राहणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने, वित्तीय आणि चालू खात्यावरची तूट कमी करणे, भ्रष्टाचाराला आळा बसवणे, यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरलो आहोत. आमच्या परकीय गंगाजळीत ४०० अब्ज डॉलर्सपर्यत वाढ झाली आहे. अजूनही भारतात थेट परदेशी गुंतवणूक ,परदेशी निधीचा ओघ वाढतोच आहे.

भारतातील माझ्या युवा उद्योजकांना मला एक सल्ला द्यायचा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे असे काहीतरी विशेष नैपुण्य आहे, जे २०२२ पर्यंतचा नवा भारत घडवण्यासाठी मोलाचे ठरेल. तुम्ही बदलाचे शिल्पकार आहात आणि भारताच्या परिवर्तनाचे साधन आहात.

जागतिक पातळीवरच्या माझ्या उद्यमशील युवामित्रांना मला आवाहन करायचे आहे, की भारतात या, मेक इन इंडिया मध्ये गुंतवणूक करा. भारताच्या या विकासायात्रेत भागीदार बनण्यासाठी मी तुम्हा सर्वाना आमंत्रित करतो आहोत. तुम्हाला इथे सर्व प्रकारची मदत मिळेल, याची मी ग्वाही देतो.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर २०१७ हा महिना राष्ट्रीय उद्यमशील महिना म्हणून जारी केला आहे, असे मला आज सांगण्यात आले. तसेच २१ नोव्हेंबर हा दिवस अमेरिकेने राष्ट्रीय उद्यमशील दिवस म्हणून साजरा केला, अशी माहितीही मला मिळाली. या परिषदेत, या संकल्पनेशी सुसंगत चर्चा आणि काम होईल, अशी मला खात्री आहे. या परिषदेतील चर्चा, परिसंवाद फलदायी आणि महत्वपूर्ण ठरोत अशा शुभेच्छा देत मी माझे भाषण संपवतो.

धन्यवाद !

 
PIB Release/DL/1888
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau