This Site Content Administered by
पंतप्रधान

तिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 3-1-2017

आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन,

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू,

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन,

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी

भारतीय विज्ञान काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष प्रा.डी.नारायण राव

श्री. वेंकटेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. दामोदरम

मान्यवर प्रतिनिधी

स्त्री आणि पुरुष गण

तिरुपतीच्या पावन नगरीत देशातील आणि परदेशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर नवीन वर्षाचा प्रारंभ करताना मला अतिशय आनंद होत आहे.

श्री वेंकटेश्वर विद्यापीठाच्या सुंदर संकुलात भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०४ व्या सत्राचे उदघाटन करताना मला आनंद होत आहे.

या वर्षीच्या सत्रासाठी 'राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' ही योग्य संकल्पना निवडल्याबद्दल मी भारतीय विज्ञान काँग्रेस संघटनेची प्रशंसा करतो.

 

मान्यवर प्रतिनिधी,

आपली स्वप्ने, परिश्रम आणि नेतृत्वाने आपल्या समाजाचे सशक्तीकरण करण्यासाठी अथक मेहनत घेतलेल्या वैज्ञानिकांप्रति देश नेहमीच ऋणी राहील.

नोव्हेंबर २०१६ मध्ये देशाने डॉ. एम.जी.के. मेनन यांच्या रूपात असाच एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि संस्थापक गमावला. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी तुमच्या बरोबर सहभागी होतो.

 

मान्यवर प्रतिनिधी,

आज आपल्याला आढळणाऱ्या बदलांचा वेग आणि व्याप्ती अभूतपूर्व आहे.

अशी आव्हाने उद्भवू शकतात हेच आपल्याला माहीत नसताना ,या आव्हानांना आपण कसे सामोरे जाणार आहोत? ही खोलवर रुजलेली कुतूहल-मिश्रित वैज्ञानिक परंपरा आहे ज्यामुळे नवीन वास्तवाशी चटकन जुळवून घेता येते.

 

मान्यवर प्रतिनिधी,

विज्ञान काँग्रेसच्या मागील दोन सत्रांमध्ये मी देशासमोरील अनेक महत्वपूर्ण आव्हाने आणि संधी तुमच्यासमोर सादर केली.

या महत्वपूर्ण आव्हानांपैकी काही स्वच्छ जल आणि ऊर्जा, अन्न, पर्यावरण, हवामान, सुरक्षा आणि आरोग्य या प्रमुख क्षेत्रांमध्ये आहेत.

त्याचबरोबर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या उदयावर आपण नजर ठेवायला हवी आणि त्याचा विकासासाठी लाभ करून घेण्यासाठी तयार रहायला हवे. आपल्या तंत्रज्ञान सज्जता आणि स्पर्धात्मकतेसाठी आव्हाने आणि संधी यांचे योग्य मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

मला असे सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षीच्या विज्ञान काँग्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या 'तंत्रज्ञान दृष्टी २०३५ ' दस्तावेजाचा  आता १२ प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी सविस्तर दिशादर्शक म्हणून विकास केला जात आहे. तसेच, नीति आयोग देशासाठी सर्वांगीण विज्ञान आणि तंत्रज्ञान व्हिजन तयार करत आहे.

एका महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे , ती म्हणजे जागतिक स्तरावर वेगाने होत असलेला सायबर-फिजिकल प्रणालीचा उदय . आपल्याकडील युवा लोकसंख्येसमोर अभूतपूर्व आव्हाने आणि अडचणी निर्माण करण्याची त्यात क्षमता आहे. मात्र, आपण रोबोटिक्स मधील संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्य, डिजिटल निर्मिती, माहितीचे विश्लेषण , सखोल अभ्यास, संवाद आणि इंटरनेट द्वारे त्याचे मोठ्या संधीत रूपांतर करू शकतो.

या तंत्रज्ञानांचा विकास करून त्याचा वापर सेवा आणि निर्मिती क्षेत्रात, कृषी, जल, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत विकास, भू-माहिती प्रणाली, सुरक्षा, आर्थिक प्रणाली आणि गुन्हे रोखणे यासाठी करण्याची गरज आहे.

मूलभूत संशोधन आणि विकास , मनुष्यबळ आणि कौशल्य निर्माण करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी सायबर-फिजिकल प्रणालीत आंतरमंत्रीय राष्ट्रीय मोहीम आपण विकसित करण्याची गरज आहे.

 

मान्यवर प्रतिनिधी,

भारतीय द्वीपकल्पाला वेढलेल्या महासागरात आपली तेराशे बेटे आहेत. ते आपल्याला साडेसात हजार किलोमीटरची किनारपट्टी आणि २.४दशलक्ष चौरस किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र देखील देतात.

ऊर्जा, अन्न, औषध आणि अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये अमाप संधी आहेत. महासागर अर्थव्यवस्था आपल्या शाश्वत भविष्याचा महत्वपूर्ण घटक असायला हवा.

मला सांगण्यात आले आहे कि भूविज्ञान मंत्रालय या साधनसंपत्तीचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी खोल समुद्रात अभियान राबवण्यावर काम करत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी हे परिवर्तनीय पाऊल ठरू शकेल.

आपल्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांनी आघाडीच्या जागतिक दर्जानुसार त्यांचे मूलभूत संशोधन अधिक बळकट करायला हवे. या मूलभूत ज्ञानाचे रूपांतर नावीन्यता ,स्टार्ट-अप्स आणि उद्योगात केल्यास आपल्याला सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधायला मदत होईल.

स्कोपस आकडेवारीनुसार वैज्ञानिक प्रकाशनात भारत सध्या जगात सहाव्या क्रमांकावर आहे, जगाच्या अंदाजे चार टक्के सरासरी वाढीच्या तुलनेत भारताचा वृद्धी दर अंदाजे १४ टक्के आहे. मला विश्वास आहे कि आपले वैज्ञानिक मूलभूत संशोधनाचा दर्जा वाढवणे, तंत्रज्ञानाचे रूपांतर आदी आव्हाने नक्की पूर्ण करतील.

२०३० पर्यंत भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल तीन देशांमध्ये स्थान मिळवेल आणि जगातील सर्वोत्तम गुणवत्तेसाठी सर्वात आकर्षक केंद्रांपैकी एक बनेल. आज आपण चाकांना दिलेली गती हे उद्दिष्ट साध्य करेल.

 

मान्यवर प्रतिनिधी,

आपल्या जनतेच्या वाढत्या आकांक्षा विज्ञानाने पूर्ण करायला हव्यात. सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान पार पाडत असलेल्या ठोस भूमिकेची भारत मुक्तकंठाने प्रशंसा करत आहे. शहरी-ग्रामीण तफावतीची समस्या आपण सोडवायला हवी आणि सर्वसमावेशक विकास, आर्थिक वृद्धी आणि रोजगार निर्मितीसाठी काम करायला हवे. यासाठी, सर्व संबंधित हितधारकांशी समन्वय साधणाऱ्या नवीन सर्वसमावेशक आराखड्याची गरज आहे.

मोठ्या, परिवर्तन घडवणाऱ्या राष्ट्रीय मोहिमांची अमलबजावणी करण्याच्या आपल्या क्षमतेला हितधारकांशी समन्वय साधणाऱ्या प्रभावी भागीदारीची गरज आहे. या मोहिमांचा प्रभावीपणा तेव्हाच सुनिश्चित होईल जेव्हा आपण आपल्या संकुचित विचारसरणीतून बाहेर पडू आणि सहकार्यात्मक दृष्टिकोन बाळगू. आपल्या बहुविध विकास आव्हानांवर वेगाने आणि प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे. आपली मंत्रालये, आपले वैज्ञानिक, संशोधन आणि विकास संस्था, उद्योग, स्टार्ट-अप्स, विद्यापीठे आणि आयआयटी संस्था, सर्वानी एकत्रित आणि अखंडपणे काम करायला हवे. विशेषतः आपल्या पायाभूत विकास आणि सामाजिक-आर्थिक मंत्रालयांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा.

दीर्घकालीन संशोधन कार्यासाठी अनिवासी भारतीयांसह परदेशातील हुशार वैज्ञानिकांना निमंत्रित करण्याबाबत आपल्या संस्थांनी विचार करावा. आपल्या प्रकल्पांमध्ये पोस्ट-डॉक्टरल संशोधनामध्ये परदेशी आणि अनिवासी भारतीय अशा पीएचडी विद्यार्थ्यांना आपण सहभागी करून घ्यायला हवे.

वैज्ञानिक रुची अधिक सक्षम करणारी दुसरी बाब म्हणजे विज्ञान वापरातील सुलभता होय. जर आपल्याला विज्ञान विकसित करायचे असेल तर त्यावर आपण मर्यादा घालू नये.

शैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप्स, उद्योग आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांना सहज उपलब्ध होईल अशा मजबूत विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. आपल्या वैज्ञानिक संस्थांमधील महागड्या उपकरणांचा सहज वापर, देखभाल,अनावश्यक सामग्री आणि त्याचे दुहेरीकरण आदी समस्या आपण सोडवायला हव्यात. उच्च मूल्याची वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून  व्यावसायिक व्यवस्थापन असलेली मोठी प्रादेशिक केंद्रे उभारण्याबाबत चाचपणी व्हायला हवी.

आपल्या आघाडीच्या संस्थांना शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व हितधारकांशी जोडण्यासाठी कंपनी सामाजिक जबाबदारीच्या धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक जबाबदारीची संकल्पना रुजवणे गरजेचे आहे. संकल्पना आणि संसाधनांच्या आदान-प्रदानासाठी आपण वातावरण निर्माण करायला हवे.

भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील उज्वल आणि सर्वोत्तम प्रतिभेला विज्ञानात सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावण्याची संधी मिळायला हवी. यामुळे आपल्या युवकांना उच्च दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळून स्पर्धात्मक जगात नोकरी मिळवण्यासाठी त्यांना तयार करता येईल.

यासाठी, योग्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांनी शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधावा असे मी आवाहन करतो. यामुळे आपल्या प्रचंड वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संबंधी पायाभूत सुविधांचा वापर आणि देखभाल करण्यास मदत मिळेल.

प्रत्येक प्रमुख शहरातील प्रयोगशाळा, संशोधन संस्था आणि विद्यापीठांची अंतरजोडणी केली जावी, जेणेकरून एक केंद्र म्हणून त्या काम करू शकतील. हे केंद्र प्रमुख पायाभूत सुविधा पुरवतील, आपल्या राष्ट्रीय विज्ञान मोहिमांची अंमलबजावणी करतील आणि संशोधन प्रत्यक्षात साकारण्यासाठी इंजिन बनतील.

संशोधनातील पार्श्वभूमी असलेल्या महाविद्यालयीन शिक्षकांना शेजारच्या विद्यापीठे आणि संशोधन आणि विकास संस्थांशी जोडता येईल. प्रसिद्ध संस्थांमधील उपक्रम शाळा, महाविद्यालये आणि पॉलिटेक्निक संस्थांपर्यंत पोहोचले तर तुमच्या शेजारच्या शैक्षणिक संस्थांमधील सुप्त विज्ञान आणि तंत्रज्ञान मनुष्यबळ पुन्हा कार्यान्वित होईल.

 

मान्यवर प्रतिनिधी,

शालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पना आणि अभिनवतेच्या सामर्थ्याचे बीज पेरले तर आपल्या नाविन्यपूर्ण पिरॅमिडचा पाया भक्कम होईल आणि आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित राहील. या दिशेने एक पाऊल म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय ६ वी ते १० वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून एक कार्यक्रम सुरु करत आहे.

५ लाख शाळांमधून आलेल्या स्थानिक गरजांवर आधारित १० लाख सर्वोत्तम अभिनव कल्पनांना या कार्यक्रमात मार्गदर्शन पुरवले जाईल, पुरस्कार दिला जाईल आणि सर्वांसमोर सादरीकरण केले जाईल.

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी आणि राष्ट्राच्या बांधणीत प्रशिक्षित महिला वैज्ञानिकांचा सातत्यपूर्ण सहभाग कायम रहावा यासाठी आपण त्यांना समान संधी द्यायला हव्यात.

भारतासारख्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशात, प्रगत अंतराळ, अण्वस्त्र आणि सुरक्षा तंत्रज्ञानासह स्वच्छ पाणी, स्वच्छता, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य यासारख्या ग्रामीण विकासाच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत तंत्रज्ञानाची व्याप्ती असायला हवी.   

जागतिक स्तरावर प्रगती करताना स्थानिक समस्यांवर देखील तोडगा शोधायला हवा.

ग्रामीण भागातील स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी स्थानिक साधनसंपत्ती आणि कौशल्य यांचा वापर करणारे योग्य सूक्ष्म-उद्योग मॉडेल विकसित करण्याची गरज आहे.

उदाहरणार्थ, गांवे आणि निम-शहरी भागांच्या समूहासाठी प्रभावी सह-निर्मितीवर आधारित तंत्रज्ञान आपण विकसित करायला हवे. कृषी आणि जैव-कचऱ्याचे रूपांतर करताना  वीज, पाणी पुरवठा, पीक-प्रक्रिया आणि शीत गृहांसारख्या गरजा पूर्ण करणे हे उद्दिष्ट असायला हवे. 

 

मान्यवर प्रतिनिधी,

नियोजन, निर्णय प्रक्रिया आणि प्रशासन यामध्ये विज्ञानाची भूमिका कधीही महत्वपूर्ण नव्हती.

आपले नागरिक, ग्रामपंचायती, जिल्हे आणि राज्यांची विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भू-माहिती प्रणाली विकसित करण्याची आणि राबवण्याची गरज आहे. भारतीय सर्वेक्षण, इसरो आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सामूहिक प्रयत्न परिवर्तन घडवू शकतील.

शाश्वत विकासासाठी,इलेक्ट्रॉनिक कचरा, बायोमेडिकल आणि प्लॅस्टिक कचरा आणि घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात कचऱ्यातून संपत्तीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यासाठी आपण ठोस उपाययोजना करायला हव्यात.

 

स्वच्छ कार्बन तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणारे तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्याबाबत आपण संशोधन आणि विकास कार्याला गती दिली आहे.

शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि हवामान यावर भर देण्याला आपले प्राधान्य राहिले आहे. आपला सामर्थ्यवान वैज्ञानिक समुदाय देखील आपल्या विशिष्ट आव्हानांचा प्रभावीपणे सामना करू शकतात. शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि हवामान यावर भर देण्याला आपले प्राधान्य राहिले आहे. आपला सामर्थ्यवान वैज्ञानिक समुदाय देखील आपल्या विशिष्ट आव्हानांचा प्रभावीपणे सामना करू शकतात. उदाहरणार्थपिकांच्या जळण्याच्या  समस्येवर आपण शेतकरी-केंद्रीय तोडगा काढू शकतो का? आपण आपल्या वीट -भट्टीची कमी उत्सर्जन आणि अधिक ऊर्जा कार्यक्षमतेनुसार पुनर्रचना करू शकतो का?

जानेवारी २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या स्टार्ट-अप कार्यक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान हा प्रमुख घटक होता. अन्य दोन ठोस उपाययोजनांमध्ये अटल इनोव्हेशन मिशन आणि निधी- द नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपमेंट अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्सयांचा समावेश आहे. नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योग परिसंस्था निर्माण करण्यावर या कार्यक्रमांचा भर आहे. तसेच, नावीन्यपूर्ण  परिसंस्था मजबूत करण्यासाठी सीआयआय, फिक्की आणि उच्चतंत्रज्ञानाच्या खासगी कंपन्यांबरोबर सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

मान्यवर प्रतिनिधी,

देशाच्या धोरणात्मक दूरदृष्टीसाठी आपल्या वैज्ञानिकांनी मोठे योगदान दिले आहे.

भारतीय अंतराळ कार्यक्रमाने भारताला अंतराळात प्रक्षेपण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. आपण अंतराळ तंत्रज्ञानात विशेषतः प्रक्षेपण यान विकास, उपग्रह तयार करणे, क्षमता निर्मिती या क्षेत्रात उच्च दर्जाची स्वयंपूर्णता साध्य केली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने आपल्या प्रणाली आणि तंत्रज्ञानासह सशस्त्र दलांसाठी शक्तिवर्धकाची भूमिका पार पाडली आहे.

भारतीय विज्ञान जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी परस्पर सहकार्य, समानता आणि आदान-प्रदान या तत्वांवर आधारित धोरणात्मक आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सहकार्याचा लाभ मिळवत आहोत. आपले शेजारी देश आणि ब्रिक्स सारख्या बहुदेशीय मंचांबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करण्यावर आपण विशेष भर देत आहोत. सर्वोत्तम जागतिक विज्ञान आम्हाला उत्पत्तीचे गूढ उकलण्यात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत करत आहे. गेल्या वर्षी, आम्ही इंडो-बेल्जीयन सहकार्याने तयार करण्यात आलेला ३.६ मीटर ऑप्टिकल टेलिस्कोप उत्तराखंड येथील देवस्थल येथे कार्यान्वित केला. अलीकडेच, भारतात अद्ययावत डिटेक्टर प्रणाली निर्माण करण्यासाठी अमेरिकेबरोबरच्या लायगो प्रकल्पाला मंजुरी दिली.

शेवटी, मी पुन्हा एकदा सांगतो की आपले वैज्ञानिक आणि  वैज्ञानिक संस्था यांना सर्वोत्तम सहकार्य पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

 

मान्यवर प्रतिनिधी,

मला विश्वास आहे की आपले वैज्ञानिक मूलभूत विज्ञानाचा दर्जा, तंत्रज्ञान विकास आणि नावीन्य या क्षेत्रात त्यांचे प्रयत्न जोमाने पुढे नेतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सर्वसमावेशक विकास आणि आपल्या समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांच्या उन्नतीचे सामर्थ्यवान साधन बनवू या.

एकत्रितपणे, आपण समान, न्यायसंगत आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करूया.

जय हिंद .

 
PIB Release/DL/21
बीजी -काणे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau