This Site Content Administered by
पंतप्रधान

तिरुवेल्ला ,केरळ येथील श्री रामकृष्ण वचनामृत सतराम येथे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या) माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले उद्‌घाटनपर भाषण

नवी दिल्ली, 21-2-2017

नमस्कारम, सर्वाना नमस्कार,

स्वामी निर्विणानंदजी आणि आज इथे जमलेले श्री श्री ठाकूर रामकृष्ण परमहंस यांचे सर्व भक्त, नमस्कार.

 श्री रामकृष्ण वचनामृत सतरामच्या सात दिवसीय सत्राच्या प्रारंभी तुमच्याबरोबर उपस्थित राहण्याचा बहुमान मला मिळाला.

मी जेव्हा  विचार करतो कि बंगालमधील थोर विचारवंतांच्या शब्दांचा मल्याळम भाषेत अनुवाद करून केरळमध्ये वाचले आणि चर्चिले जात आहेत, तेव्हा मला अचंबा वाटतो कि कशा प्रकारे हे विचार आपल्या देशात सर्वांपर्यंत पोचले आणि स्वीकारले गेले.

एक भारत... श्रेष्ठ भारतचे याहून उत्तम उदाहरण कोणते असू शकेल?

महान गुरूंचे पवित्र ग्रंथ आणि त्यांचे विचार सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याची जी प्रथा तुम्ही सुरु केली ती दीर्घ परंपरा बनली आहे.

शाश्वत मूल्ये अबाधित ठेवून बदलता काळ आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या  भारताच्या दीर्घकालीन मौखिक परंपरेचा हा एक भाग आहे.

ही परंपरा श्रुतींपासून स्मृतींपर्यंत विकसित होत गेली.

श्रुती, चार वेद आणि उपनिषद हे धर्माचे स्रोत आहेत: महान भारतीय ऋषीमुनींनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे पवित्र ज्ञान संक्रमित केले आहे.

श्रुती हे दैवी ज्ञान आहे, जे मौखिक स्वरूपात संक्रमित केले जाते.

स्मृती हा आठवणी आणि स्पष्टीकरण यावर आधारित ग्रंथ आहे.

सामान्य माणसाला वेद आणि उपनिषद समजायला कठीण असल्यामुळे कथा आणि नैतिक धड्यांच्या माध्यमातून प्राथमिक प्रकटीकरण समजावून सांगण्यासाठी, अर्थ स्पष्ट करण्यासाठी स्मृती लिहिण्यात आल्या.

अशा प्रकारे हे स्पष्ट होते कि महाकाव्य, पुराण आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र या सर्व स्मृती आहेत.

प्रत्येक व्यक्तीला अनुरूप अशा माध्यमांतून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून सुरु आहेत.

सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी धर्म किंवा योग्य जीवन पद्धती अधिक सुगम्य, त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या जवळ जाणारी बनवण्याची गरज होती.

भागवतात देवर्षि नारद ईश्वराचे गुणगान करत असल्याचे वर्णन आहे.

अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्तिं शांर्गधन्वन:।

गायन्माद्यन्निदं तन्त्रया रमयत्यातुरं जगत्।।

'अहो, हे देवर्षि नारद धन्य आहेत जे वीणा वाजवत, हरिगुण गात आणि रममाण होत या दुःखी विश्वाला आनंदित करत असतात.'

भक्ती संतांनी ईश्वराला सामान्य माणसाच्या जवळ आणण्यासाठी संगीत, कविता, स्थानिक भाषेचा वापर केला- त्यांनी जात, वर्ग, धर्म, आणि लिंगाचे अडथळे झुगारून दिले.

संतांचा संदेश लोकगायक,कथा-वाचक , दस्तांगोई यांनी पुढे नेला.

कबीराचे दोहे, मीरेची भजने गायकांनी गावा -गावांमध्ये पोहोचवली.

भारत ही एक अशी भूमी आहे जिला समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक वातावरण लाभले आहे.

आपला देश अशा लेखक, विद्वान, साधू-संत, यांचे घर आहे, ज्यांनी मुक्तपणे आणि निर्भीडपणे स्वतःला व्यक्त केले.

आणि जेव्हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाने ज्ञानाच्या युगात प्रवेश केला, भारताने मार्ग दाखवला आहे.

भारताबाबत गैरसमज निर्माण करण्यात आले कि भारताला बाहेरील लोकांनी सुरु केलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांची आवश्यकता आहे.

हे देखील वसाहतवादाचे समर्थन करण्याचे कारण बनले.

अशा प्रकारचे विचार अतिशय चुकीचे आहेत कारण भारताची भूमी अशी भूमी आहे जिथे परिवर्तनाला सुरवात होते.

आणि या परिवर्तनाचे मूळ आपल्या अंतर्मनात आहे, ज्याचे संचलन आपल्या साधू-संतांकडून होत आहे, ज्यांनी समाज परिवर्तनाचे अभियान छेडले आणि आपल्या समाजात येणाऱ्या दुष्प्रवृत्ती समूळ नष्ट करण्यासाठी सामाजिक चळवळ हाती घेतली.

आपल्या संतांनी समाज सुधारणेसाठी प्रत्येक नागरिकाला आपल्या अभियानात सामील करून घेतले.

कुणालाही त्या परीघाबाहेर ठेवले गेले नाही.

यामुळेच आपली संस्कृती प्रदीर्घ काळ अडचणींचा सामना करत सर्वोच्च स्थानी आहे .

ज्या संस्कृतींनी काळाबरोबर स्वतःला बदलले नाही त्या नाहीशा झाल्या.

उलटपक्षी, आपण आपल्या प्रथा शतकानुशतके बदलत आहोत.

काही प्रथा काही शतकांपूर्वी प्रचलित असतील, मात्र जेव्हा वाटले कि त्या अनावश्यक आहेत तेव्हा त्यात बदल केले गेले.

आपण नेहमीच नवीन कल्पनांचे स्वागत केले आहे.

आपल्या इतिहासात, आपल्या संतांनी केलेले कार्य भले छोटे दिसत असेल, मात्र त्याचा प्रभाव मोठा होता आणि त्याने आपल्या इतिहासाचा प्रवाह बदलला.

कुठलाही धर्म, कुठल्याही संस्कृतीच्या खूप आधी भारतात अशा महिला संत झाल्या ज्यांनी लैंगिक समानतेचा मुद्दा उठवला होता.

त्यांनी निर्भीडपणे लेखन केले, आणि आपल्या सामर्थ्यवान लिखाणातून स्वतःला व्यक्त केले.

हिंदू तत्वज्ञानात वेळ आणि स्थानाच्या निरपेक्ष स्थितीला अत्यंत महत्वाचा घटक म्हणून स्वीकारण्यात आले आहे.आणि आपण दिक-काळ-बाधित आहोत.

वेळेच्या संदर्भात, गुरुची भूमिका शाश्वत मूल्यांचा अर्थ स्पष्ट करणे ही आहे, जेणेकरून नदीच्या प्रवाहाप्रमाणे ज्ञानाचा प्रवाह नेहमी ताजा आणि जिवंत राहील.

शास्त्रात म्हटले आहे कि:

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा ।

शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

 जे तुम्हाला प्रेरित करतात, जे तुम्हाला माहिती देतात, जे तुम्हाला सत्य सांगतात, जे तुम्हाला शिकवतात, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि तुम्हाला जागरूक बनवतात, ते सर्व तुमचे गुरु आहेत.

केरळमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या श्री नारायण गुरु यांची भूमिका आपल्या स्मरणात आहे.

मागास जातीतील एका संत आणि समाज सुधारकाने जातीची जोखडे झुगारून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन दिले.

जेव्हा शिवगिरीची तीर्थयात्रा सुरु झाली, तेव्हा त्यांनी शिक्षण, स्वच्छता, ईश्वराप्रती समर्पण, संघटना, कृषी, व्यापार, हस्तकला आणि तांत्रिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या उद्दिष्टांची घोषणा केली होती.

समाजाच्या उन्नतीसाठी एका शिक्षकाने स्थापन केलेली मानके यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे काय असू शकते?

या सभेत श्री रामकृष्ण यांच्याबाबत बोलणे म्हणजे न्यूकॅसल पर्यंत कोळसा घेऊन जाण्यासारखे वाटेल, मात्र मी त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही,ज्यामुळे ते आजच्या काळातही एवढे प्रासंगिक आहेत.

ते भक्ती संतांच्या परंपरेतील होते,आणि कथामृतमध्ये आपल्याला चैतन्य महाप्रभू यांचे अनेक संदर्भ - त्यांची समाधी, त्यांची गाणी, त्यांची भक्ती आढळतात.

मात्र त्यांनी या परंपरेचे नूतनीकरण केले आणि ती अधिक मजबूत बनवली.

त्यांनी मानसिक पाश झुगारून दिले जे आपल्याला धर्म आणि जातींमधील पाशापासून दूर ठेवतात.

ते सामाजिक सामंजस्याचे संत होते.

त्यांचा संदेश सहिष्णुता, समर्पण आणि ज्ञानी, योगी आणि भक्त अशा विविध नावांनी दैवी ईश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित करणे हा आहे. ज्ञानी ज्याला निरपेक्ष ब्रह्म म्हणतात, योगी त्याला आत्मा म्हणतात आणि भक्त त्याला दैवी गुणांनी संपन्न ईश्वर म्हणतात.

ते मुस्लिम जीवनशैलीत जगले, ते ख्रिस्ती जीवनशैली जगले, त्यांनी तंत्र साधना केली.

त्यांना असे आढळून आले कि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत, मात्र भक्तीच्या मार्ग अनुसरला तर ते सर्व एकाच उद्दिष्टापर्यंत पोहोचतात.

ते म्हणाले,  " सत्य एक आणि समान आहे," " केवळ नाव आणि स्वरूप यात फरक आहे."

"हे पाण्यासारखे आहे, ज्याचा विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या नावानी उल्लेख केला जातो, उदा. जल, नीर, पाणी वगैरे.

त्याचप्रमाणे, जर्मन भाषेत त्याला 'वास्सेर', फ्रेंच भाषेत 'इओ', इटालियन भाषेत 'एक्वा', जपानी भाषेत 'मिझु' म्हटले जाते.

केरळमध्ये तुम्ही त्याला 'वेल्लम' म्हणता.

या सर्व शब्दांमधून एकच गोष्ट निरुपित होते, फक्त त्यांची नावे निरनिराळी आहेत.

त्याचप्रकारे, काही लोक सत्याला 'अल्लाह' म्हणतात, काही 'गॉड' म्हणतात, काही 'ब्रह्म' म्हणतात, काही 'काली' म्हणतात आणि काही जण 'राम', 'जिसस', 'दुर्गा', 'हरी' आदी नावाने उल्लेखतात.

त्यांची शिकवण आपल्याला आजही उपयुक्त आहे , विशेषकरून अशा वेळी जेव्हा आपण पाहतो कि लोक जाति,धर्माच्या नावाखाली विभाजन आणि शत्रुत्व निर्माण करत आहेत.

महात्मा गांधी म्हणाले होते: रामकृष्ण यांचे जीवन आपल्याला ईश्वराला प्रत्यक्ष पाहण्यासाठी सक्षम बनवते.

केवळ ईश्वर हेच सत्य आहे आणि इतर सर्व आभास आहे हे समजून घेतल्याशिवाय कुणीही त्यांच्या जीवनाची गाथा वाचू शकणार नाही.

श्री रामकृष्ण हे प्राचीन आणि आधुनिक यातील दुवा आहेत. त्यांनी दाखवून दिले कि कशा प्रकारे, प्राचीन मूल्ये आणि अनुभवांना आधुनिक शैलीत बदलता येऊ शकते.

त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने उपाख्यान आणि संदेशातून प्रसार केला.

अतिशय सोप्या स्वरूपात असल्यामुळे ते श्रोत्यांच्या मनात ठसले गेले.

जर आपल्याकडे त्यांच्यासारखा गुरु नसता तर स्वामी विवेकानंद यांच्यासारखे शिष्य झाले असते का?

या महान कर्मयोगीने त्यांच्या गुरुचे विचार पुढे नेले-

यत्र जीव, तत्र शिव- म्हणजेच जिथे जीव आहे तिथे शिव आहे.

आणि

जीवे दया नोय, शिव ज्ञाने जीव सेबा- म्हणजे सजीवांना दया दाखवू नका तर स्वतः शिव म्हणून त्यांची सेवा करा.-

दरिद्र नारायणाच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्य वेचले.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे - ईश्वराचा शोध घेण्यासाठी तुम्ही कुठे जायला हवे?

हे सगळे गरीब, लाचार, दुर्बल ईश्वर नाहीत का? सर्वप्रथम त्यांची पूजा का नाही करत? या सर्वांना तुमचा ईश्वर बनवा.

त्यांनी आवाहन केले-" हृदयात अदम्य साहस आणि शक्तीसह तीव्र कर्म-योग करण्याची गरज आहे. त्यानंतरच देशातील जनतेला जागृत करता येईल."

- यातून आपल्याला नियमितपणे कृतीसाठी प्रोत्साहन आणि उत्साह मिळतो. .

रामकृष्ण मिशनची सेवा या कटिबध्दतेचा पुरावा आहे.

गरीबी असलेल्या भागात, आदिवासी भागात, आपत्तीग्रस्त लोकांच्या वेदना कमी करण्याचे कार्य मिशन करत असल्याचे आपल्याला दिसून येते.

ती व्यक्ती कुठल्या जमातीतील आहे, तिची जात कोणती , धर्म कोणता हे महत्वाचे नाही.

सर्वात महत्वाचे आहे ते निःस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करणे .

मिशनच्या संकेतस्थळावर,

आपल्याला हे ब्रह्मवाक्य आढळते-  आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च

स्वतःचा उद्धार आणि जगाच्या कल्याणासाठी

सेवा परमो धर्म:

पृथिवीं धर्मणा धृतां शिवां स्योनामनु चरेम विश्वहा।

(धर्माच्या माध्यमातून धारण करण्यात आलेल्या या मातृभूमीची सेवा आम्ही सदैव करत राहू)

मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां। सुख दु:ख पुण्यापुण्य विषयाणां। वनातश्चित्तप्रासादनम्।

( दुसऱ्याचे दुःख पाहून मनात करुणा, दुसऱ्याचे पुण्य (समाज सेवा वगैरे ) पाहून आनंदाची भावना, तर कुणी पाप कर्म केले तर मनात उपेक्षेची भावना 'केले असेल जाऊ दे ' प्रतिक्रिया उपन्न व्हायला हव्यात )

आज जी  ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे - या सत्राचा प्रारंभ झाला आहे- तिने आपली मने उजळावीत.- एक दीप से जले दूसरा, जलते दीप हज़ार।

आमचे प्रिय अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे:

आओ फिर से दीया जलाएं

भरी दुपहरी में अंधियारा

सूरज परछाई से हारा

अंतरतम का नेह निचोड़ें

बुझी हुई बाती सुलगाएं।

आओ फिर से दीया जलाएं

श्री श्री ठाकूर यांचे शब्द आपल्याला सर्व गोष्टींमध्ये ईश्वर पाहण्यासाठी आणि सर्वात गरीब आणि दुर्बल लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला आणि अहंकाराला प्रेरित करो, जेणेकरून आपण जास्तीत जास्त सत्य जाणून घेऊ शकू जे सर्व धर्मांचे सार आहे.

पुन्हा एकदा मी त्या महान शिष्याचे शब्द माझे मार्गदर्शक म्हणून सांगतो. चला काम करूया, जे काही घडत आहे ते आपले कर्तव्य समजून काम करत राहू आणि भार उचलण्यासाठी आपले खांदे सदैव तयार ठेवू.

तेव्हाच आपल्याला निश्चितपणे तो प्रकाश दिसेल!

धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद.

 

(Release ID :158591)

 
PIB Release/DL/289
सप्रे -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau