This Site Content Administered by
पंतप्रधान

आदीयोगी शिवशंकराच्या 112 फूट उंच पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 24-2-2017

सर्वांना माझ्या सप्रेम शुभेच्छा.

या भव्य समारंभासाठी उपस्थित राहणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

ते सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आणखी विशेष आहे.

तसे तर अनेक सण आहेत, मात्र महा म्हणवला जाणारा हा एकमेव सण आहे.

त्याचप्रमाणे देव अनेक आहेत, महा-देव मात्र एकच आहेत.

मंत्रही अनेक आहेत, मात्र भगवान शिवशंकरामुळे ओळखला जाणारा एकमेव मंत्र म्हणजे महा-मृत्युंजय मंत्र.

हा शिवशंकराचा महिमा आहे.

महा-शिवरात्री हे अंधार आणि अन्यायावर मात करण्याच्या उद्देशासह दैवी भावनांचे एक संयुक्त प्रतीक आहे.

ते आपल्याला धाडसी होण्याची आणि चांगल्या बाबींसाठी लढा देण्याची प्रेरणा देते.

गारठ्यापासून चैतन्याने सळसळता वसंत ऋतु आणि तेजस्वीता अशा ऋतुबदलाचे ते प्रतीक आहे.

महाशिवरात्रीचा उत्सव रात्रभर सुरू राहतो. हे दक्षतेच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. आपण निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे आणि आपल्या सर्व कृती सभोवतालच्या वातावरणाशी मिळत्या-जुळत्या राहतील याची काळजी घेतली पाहिजे, असे यातून स्पष्ट होते.

माझे राज्य गुजरात, ही सोमनाथची भूमी आहे. लोकांचे आवाहन आणि सेवा करण्याच्या उर्मीमुळे मी भगवान विश्वेश्वराच्या भूमीत काशीमध्ये पोहोचलो.

सोमनाथपासून विश्वनाथापर्यंत, केदारनाथपासून रामेश्वरमपर्यंत आणि काशीपासून कोईंबतूरपर्यंत भगवान शंकर सगळीकडे आहेत.

देशभरातील कोट्यवधी भारतीयांप्रमाणेच महाशिवरात्रीच्या या उत्सवात सहभागी होताना मला अतिशय आनंद होतो आहे.

आणि आपण विशाल सागरातील थेंबाप्रमाणे आहोत.

शतकानुशतके प्रत्येक काळात आणि युगात असंख्य भक्त होऊन गेले आहेत.

ते विविध ठिकाणांहून येतात.

त्यांच्या भाषा कदाचित वेगवेगळ्या असू शकतील, मात्र दैवी शक्तीप्रती त्यांची भावना ही नेहमीच सारखीच तीव्र राहिली आहे.

ही तीव्र भावना प्रत्येक मानवी हृदयात, अंतरंगात धडधडते आहे. त्यांच्या कविता, त्यांचे संगीत, त्यांच्या प्रेमात पृथ्वी चिंब झाली आहे.

आदीयोगी आणि योगेश्वर लिंगाच्या या 112 फूट उंच चेहऱ्यासमोर उभे असताना आम्हाला प्रत्येकाला या जागी व्यापणारी एक प्रचंड उपस्थिती जाणवते आहे.

आज आम्ही ज्या ठिकाणी जमलो आहोत, ते ठिकाण आगामी काळात सर्वांसाठी प्रेरणास्थान होणार आहे, आत्ममग्न होऊन सत्याचा शोध घेण्याचे स्थान होणार आहे

हे स्थान सर्वांना शिवमय होण्याची प्रेरणा देत राहिल. हे भगवान शिवाच्या समावेशक चैतन्याचे स्मरण आपल्याला करून देत राहील.

आज योगाने एक दीर्घ मार्गक्रमण केले आहे.

योगाच्या विविध व्याख्या, प्रकार आणि शाळा आहेत तसेच योग सरावाच्या अनेक मार्गांचाही उदय झाला आहे.

हे योगाचे सौंदर्य आहे, तो प्राचीन आहे, पण आधुनिक आहे, त्यात सातत्य आहे, पण तो विकसितही होत आहे.

योगाचे सार बदललेले नाही.

मी असे म्हणतो आहे कारण हे सार जतन करणे अत्यंत महत्वाचे आहे.  

अन्यथा, आम्हाला आत्म्याचा नव्याने शोध घेण्यासाठी आणि योगाचे सार शोधण्यासाठी नवीन योगाचा शोध घ्यावा  लागेल.

योग म्हणजे जीवाचे शिवात परिवर्तन घडवून आणणारा, संगम घडविणारा उत्प्रेरकी घटक आहे.

यत्र जीव: तत्र शिव:, असे आमच्याकडे म्हटले जाते.

जीवापासून शिवापर्यंतचा प्रवास घडविणारा असा हा योग आहे.

योगाचा सराव केल्यामुळे एकात्मतेचे, मन, शरीर आणि बुद्धी यांच्यातील एकतेचे चैतन्य निर्माण होते.

आपल्या कुटुंबाशी एकात्मता, जेथे आम्ही राहतो त्या समाजाशी एकात्मता, सहमानवांबद्दल, सर्व पक्षी, प्राणी आणि झाडे ज्यांच्यासोबत आपण या आमच्या सुंदर ग्रहावर राहतो, त्या सगळ्यांबद्दलची एकात्मता, हा योग आहे.

योग म्हणजे मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास आहे.

हा व्यक्तीपासून समस्तीपर्यतचा प्रवास आहे. मी पासून आम्ही पर्यंतच्या प्रवासाची ही अनुभूती, अहम पासून वयम पर्यंतचा हे भावविस्तार म्हणजेच योग आहे. 

भारत ही अजोड वैविध्याची भूमी आहे. भारताची ही विविधता पाहता येते, ऐकता येते, अनुभवता येते, स्पर्शता येते आणि तिचा आस्वादही घेता येतो.

विविधता ही भारताची मोठी शक्ती आहे आणि तिनेच भारताला एकत्र आणले आहे.

शिवशंकराचा विचार मनात आला की, अवाढव्य हिमालयात कैलास पर्वतावर त्यांच्या उपस्थितीचे  चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.  देवी पार्वतींचा विचार मनात आला की सागराने वेढलेल्या सुंदर कन्याकुमारीची आठवण येते. शिव आणि पार्वतीचे मिलन म्हणजे हिमालय आणि महासागराचेच मिलन आहे.

शिव आणि पार्वती ... यांच्यातच एकात्मतेचा संदेश आहे.

आणि एकात्मतेचा हा संदेश अधिक प्रकटपणे कसा व्यक्त होतो, ते पाहू :

भगवान शंकराच्या गळ्याभोवती एक साप आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे. साप आणि उंदीर यांच्यातील संबंधांची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे. तरीही ते एकत्र राहतात.

तसेच कार्तिकेयाचे वाहन मोर आहे. मोर आणि साप यांच्यातील वैरही सर्वज्ञात आहे. तरीही ते एकत्र राहतात.

भगवान शंकराच्या कुटुंबात वैविध्य आहे पण सुसंवाद आणि ऐक्याचा त्यात उत्तम ताळमेळ आहे.

विविधता हे आमच्यासाठी संघर्षाचे कारण नाही. आम्ही त्याचा स्वीकार करतो आणि मनापासून स्वीकारही करतो. 

आपल्या संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे की देव असो किंवा देवी, एखादा प्राणी, पक्षी किंवा वृक्ष त्यांच्याशी जोडला गेला आहे.

प्राणी, पक्षी किंवा झाडाची सुद्धा देव किंवा देवीइतक्याच आत्मियतेने पूजा केली जाते. निसर्गाच्या ओढीची प्रेरणा बाणविण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. निसर्ग आणि देवाची सांगड घालणे, यामागे आमच्या पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते.

आमचे पवित्र शास्त्र सांगते, एकमसत, विप्रा: बहुधा वदन्ति

सत्य एकच आहे, साधू त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. 

आम्ही आमच्या लहानपणापासून ह्या मूल्यांसह जगत आलो आहोत आणि त्याचमुळे कारुण्य, दयाळूपणा, बंधुता आणि सुसंवाद हे नैसर्गिकरित्या आमच्या स्वभावाचाच एक भाग आहेत.

आमचे पूर्वज याच मूल्यांसाठी जगले आणि त्यांनी मरणही पत्करले, हे आम्ही पाहिले आहे.

याच मूल्यांनी कित्येक शतके भारतीय संस्कृती जीवंत ठेवली आहे.

आपले मन नेहमी सर्व बाजूंनी नवीन विचार आणि कल्पना स्वीकारण्यास खुले असले पाहिजे. दुर्दैवाने स्वत:चे अज्ञान लपविण्यासाठी अतिशय कठोर भूमिका स्वीकारून नवीन विचार आणि अनुभवांचे स्वागत करण्याच्या कोणत्याही संधीचा नाश करणारेही काही निवडक लोक आहेत.

केवळ प्राचीन आहे या एका कारणामुळे एखादी कल्पना फेटाळून लावणे हानीकारक असू शकते. त्याचे विश्लेषण करणे, समजून घेणे आणि नवीन पिढी ते उत्तम प्रकारे समजून घेईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महिला सक्षमीकरणाशिवाय माणुसकीची प्रगती अशक्य आहे. महिलांचा विकास ही समस्या नाही तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आवश्यक आहे.

आमच्या संस्कृतीत महिलांच्या मध्यवर्ती भूमिकेचा मला अभिमान आहे.

आमच्या संस्कृतीत अनेक देवतांची उपासना केली जाते.

भारत हा अनेक महिला संतांचा देश आहे, ज्यांनी पूर्व असो वा पश्चिम, उत्तर असो वा दक्षिण, सगळीकडेच सामाजिक सुधारणांसाठी चळवळी राबविल्या.

त्यांनी परंपरा झुगारल्या, अडथळे मागे सारले आणि एक नवी दिशा दिली.

आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की आम्ही भारतात नारी तू नारायणी नारी तू नारायणी असे म्हणतो. स्त्री हे एक दैवी प्रकटीकरण आहे.

मग पुरूषासाठी काय म्हणतात, तर पुरूषासाठी म्हणतात की  नर तू करनी करे तो नारायण हो जाए अर्थात, पुरूषा, तू चांगली कर्मे केलीस तर नराचा नारायण होशील.

तुम्हाला यातील फरक लक्षात आला का -  स्त्रीची दैवी स्थिती बिनशर्त नारायणी अशी आहे. पुरूषाला मात्र ते स्थान हवे असल्यास ते सशर्त आहे. तो चांगली कामे करूनच हा सन्मान प्राप्त करू शकतो.

कदाचित म्हणूनच साधुगुरूही जगासाठी माता होण्याची शपथ घेण्यासाठी आग्रही असतो.  निरपेक्ष भावनेने एकात्मता साधणारी माताच असते.

21 व्या शतकातील बदलत्या जीवनशैलीमुळे नवी आव्हाने समोर आली आहेत.

जीवनशैलीशी संबंधित आजार, ताणाशी संबंधित आजार हे सार्वत्रिक होऊ लागले आहेत. संसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवता येतात पण संसर्गजन्य नसणाऱ्या आजारांचे काय?

लोक स्वत:बद्दल समाधानी नसल्यामुळे चुकीचे वागतात आणि मद्यपान करतात, हे वाचल्यानंतर मला अतिव दु:खं होते. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही.

आज संपूर्ण जगाला शांतता हवी आहे, फक्त लढाया आणि संघर्षापासून मुक्ती नाही तर त्यांना मन:शांती हवी आहे.

ताणाची मोठी किंमत मोजावी लागते आणि तणावावर मात करण्यासाठी योग हे प्रभावी शस्त्र आहे.

योगाच्या सरावाने ताणावर मात करणे आणि तीव्र तणावातून बाहेर पडणे शक्य असल्याचे ठाम पुरावे उपलब्ध आहेत . शरीर हे मनाचे मंदिर असले तर योग एक सुंदर मंदिर निर्माण करतो.

म्हणूनच मी योग म्हणजे आरोग्याची हमी देणारा पासपोर्ट आहे, असे म्हणतो. आजार बरा करण्यापेक्षा ते निरोगीपणाचे एक साधन आहे.

रोग मुक्ती बरोबरच तसेच भोग मुक्ती साठीही योगाकडे पाहिले पाहिजे.

वैयक्तिक स्तरावर योग एखाद्याला विचार, कृती, ज्ञान आणि भक्तीच्या दृष्टीने अधिक चांगली व्यक्ती बनवितो.

फक्त शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम म्हणून योगाकडे पाहणे फारच अयोग्य होईल.

तुम्ही लोकांना त्यांचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे पिळताना आणि फिरवताना पाहिले असेल पण ते सर्व योगी नाहीत.

योग ही शारीरिक व्यायामा पलीकडची गोष्ट आहे

योगाच्या माध्यमातून एकता आणि एकोप्याचे एक नवे युग आपण निर्माण करू शकतो.

जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना मांडलीतेव्हा त्या संकल्पनेचे खुल्या मनाने स्वागत करण्यात आले. 

जगाने 21 जून 2015 आणि 2016 रोजी मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा केला.

कोरिया असो किंवा कॅनडा, स्वीडन असो किंवा दक्षिण आफ्रिका, जगाच्या सर्व भागात त्या दिवशी योग सरावात मग्न योगींनी सूर्य किरणांचे स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी अनेक राष्ट्रांनी एकत्र येणे, यातच योग - एकतेचे वास्तविक सार स्पष्ट होते.

शांतता, करुणा, बंधुता आणि मानववंशाच्या सर्वांगीण प्रगतीचे युग निर्माण करण्याची क्षमता योगामध्ये आहे.

सद्‌गुरूंनी सामान्य लोकांमधून योगी घडविले आहेत, हे खरोखर उल्लेखनीय आहे. हे लोक जगात त्यांच्या कुटुंबियांबरोबर राहतात आणि कामही करतात. मात्र त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून रोजच्यारोज प्रखर आणि आश्चर्यकारक अनुभव प्राप्त करत साधनेची नवी शिखरे गाठतात. स्थान किंवा परिस्थिती कोणतीही असो, योगी हा कायम एक योगीच राहू शकतो.

मला येथे अनेक तेजस्वी आणि आनंदी चेहरे दिसत आहेत. अत्यंत प्रेम आणि काळजीने, लहान सहान तपशील पाहून काम करणारे लोक मला येथे दिसत आहेत. एका मोठ्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करणारे ऊर्जा आणि उत्साहाने  परिपूर्ण लोक मला येथे दिसत आहेत.

आदीयोगी अनेक पिढ्यांना योग शिकण्याची प्रेरणा देत राहिल. आम्हाला हे सर्व देणाऱ्या साधुगुरूंप्रती मी कृतज्ञ आहे.

धन्यवाद. खूप खूप आभार. प्रणाम, वणक्कम...!!!

 
PIB Release/DL/291
बीजी -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau