This Site Content Administered by
पंतप्रधान

माणेकशा सेंटर येथे बांग्लादेशाच्या मुक्ती संग्रामातील भारतीय शहीदांना गौरवण्यासाठी आयोजित सोमनोना समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 8-4-2017

महामहीम, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीनाजी , भारतीय शहीद सैनिकांचे कुटुंबिय,

बांग्लादेशाचे माननीय परराष्ट्र मंत्री,

आणि माननीय मुक्ती संग्राम मंत्री,

'माझे मंत्रिमंडळातील सहकारी- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजजी,

आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली,

आणि सभेमध्ये उपस्थित अति-विशिष्ट मान्यवर सदस्य,

विशेष अतिथि गण आणि माझ्या सर्व मित्रांनो,

आज एक विशेष दिवस आहे. आज भारत आणि बांग्लादेशाच्या शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावलेल्या योध्दयांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. बांग्लादेशाचा  स्वाभिमान जपण्यासाठी लढणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूर वीरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हा दिवस बांग्लादेशावर करण्यात आलेल्या क्रूर प्रहाराचे स्मरण करण्याचाही आहे, ज्याने लाखो लोकांचे आयुष्य हिरावून घेतले. त्याचबरोबर इतिहासातील छळ जो बांगलादेशाला सहन करावा, त्यामागची विकृत मानसिकता झुगारण्याचाही आहे. आजचा दिवस भारत आणि बांग्लादेशाच्या १४० कोटींहून अधिक नागरिकांमधील अतूट विश्वासाचे सामर्थ्य जाणण्याचा देखील आहे. आपण आपल्या समाजांना कशा प्रकारे सशक्त आणि समृध्द  भविष्य देऊ यावर चिंतन करण्याची देखील ही योग्य संधी आहे.

महामहीम,

तसेच सहकाऱ्यांनो, अनेक कारणांमुळे आजचा दिवस ऐतिहासिक आहे. बांग्‍लादेशाच्‍या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांच्या कुटुंबांसाठी देखील हा कधी विसरता न येणारा क्षण आहे. आज बांगलादेश त्या १६६१ भारतीय जवानांचा गौरव करत आहे, ज्यांनी १९७१ मध्ये बांग्‍लादेशाच्‍या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. मी भारताच्या सव्वाशे कोटी जनतेच्या वतीने बांग्‍लादेशाच्‍या पंतप्रधान शेख हसीनाजी यांचे, तेथील सरकार आणि बांगलादेशाच्या जनतेचे, या भावोत्कट उपक्रमासाठी आभार मानतो. भारताचे शूर जवान  तसेच आमचे गौरवशाली सैन्य केवळ बांगलादेशवर होत असलेल्या अन्याय आणि नरसंहाराविरोधात लढले नव्हते, ते  शूर वीर भारतीय संस्कृतीतील निहित मानवी मूल्यांसाठी देखील लढले होते. हे माझे परम सौभाग्य आहे कि याप्रसंगी ७ भारतीय शहीदांचे कुटुंबीय इथे उपस्थित आहेत. संपूर्ण भारत तुमची व्यथा, तुमचे दुःख आणि तुमच्या वेदनेत सहभागी आहे. तुमचा त्याग आणि तपश्चर्या अतुलनीय आहे. भारतीय जवानांच्या बलिदानासाठी मी आणि संपूर्ण देश सर्व शहीदांना कोटी-कोटी वंदन करतो.

मित्रांनो,

बांगलादेशाचा जन्म एका नवीन आशेचा उदय होता, त्याचबरोबर १९७१ चा इतिहास आपल्याला अनेक दुःखद क्षणांची आठवणही करून देतो. १९७१ मध्ये एप्रिलचाच महिना होता, जेव्हा बांग्लादेशात नरसंहाराने अत्युच्च पातळी गाठली होती. बांग्लादेशातील एक संपूर्ण पिढी संपवण्यासाठी संहार केला जात होता. ती प्रत्येक व्यक्ती जी बांग्‍लादेशाच्‍या गौरवाशी जोडलेली होती, प्रत्येक व्यक्ती जी भावी पिढीला बांग्‍लादेशाच्‍या भूतकाळाबाबत अवगत करू शकत होती, तिला मार्गातून हटवले गेले. या नरसंहाराचा उद्देश केवळ निर्दोषांची हत्या करणे नव्हता, तर बांग्लादेशाची संपूर्ण विचारसरणी मुळापासून मिटवणे हा होता. मात्र अखेरीस अत्याचाराचा विजय झाला नाही. मानवी मूल्यांचा विजय झाला, कोट्यवधी बांग्लादेशवासियांच्या इच्छाशक्तीचा विजय झाला.

मित्रांनो,

बांग्लादेशाची जन्मगाथा अमर्याद बलिदानांची गाथा आहे. आणि या सर्व बलिदानाच्या कथांमध्ये एक सूत्र, एक विचार समान आहे. आणि तो आहे, राष्ट्र तसेच मानवी मूल्यांप्रति अगाध प्रेमाचा. मुक्ती योध्दयांचे बलिदान देशप्रेमाने प्रेरित होते. मुक्ती योद्धा केवळ एक मानव शरीर आणि आत्मा नव्हते, तर एक अदम्य आणि अविनाशी विचार होते. मला आनंद वाटतो कि मुक्ती योद्धयांसाठी भारताच्या वतीनेही काही प्रयत्न केले जात आहेत. मुक्ती योद्धा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुक्ती योद्धयांच्या कुटुंबातील १० हजारांहून अधिक मुलांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आज या निमित्ताने मी आणखी तीन घोषणा करतो. पुढील पाच वर्षांमध्ये  मुक्ती योद्धा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आणखी दहा हजार मुलांपर्यंत पोहोचवला जाईल. मुक्ती योद्धयांना ५ वर्षांसाठी बहु प्रवेश व्हिसा सुविधा दिली जाईल आणि भारतात मोफत उपचारासाठी दरवर्षी १०० मुक्ती योद्धयांना एका विशेष वैद्यकीय योजनेअंतर्गत सहाय्य पुरवले जाईल. मुक्ती योद्धयांबरोबरच बांग्लादेशासाठी भारतीय सैन्याने केलेला संघर्ष आणि बलिदान देखील कुणी विसरू शकणार नाही. असे करण्यात त्यांची एकमेव प्रेरणा होती, बांग्‍लादेशाच्‍या जनतेप्रति त्यांचे प्रेम आणि बांग्‍लादेशाच्‍या लोकांच्या स्वप्नांप्रति त्यांचा सन्मान. आणि हे देखील लक्षात ठेवायला हवे कि युद्धाच्या क्रूरपणातही भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावत राहिले आणि युद्धाच्या नियमांचे पालन करून संपूर्ण जगासमोर एक उदाहरण ठेवले. भारतीय सैन्याचे हे चारित्र्य होते कि ९० हजार युद्ध कैद्यांना सुरक्षित जाऊ दिले. १९७१ मध्ये भारताने दाखवलेला ही माणुसकी गेल्या शतकातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे. मित्रांनो, भारत आणि बांग्लादेश, केवळ क्रूरता संपवणारेच देश नाहीत तर क्रूरतेचा मूलभूत विचार नाकारणारे देश आहेत.

मित्रांनो,

बांग्लादेशाबाबतची  चर्चा बंगबंधूंशिवाय अपूर्ण आहे. दोघांचे अस्तित्व परस्परांशी जोडलेलं आहे. दोघेही एकमेकांच्या विचाराला पूरक आहेत. बंगबंधू बांग्‍लादेशाच्‍या स्वातंत्र्याचे प्रमुख सूत्रधार होते. ते काळाच्या पुढचा विचार करणारे होते. त्यांचा आवाज जनतेचा आवाज होता. आधुनिक, मुक्त आणि पुरोगामी बांग्लादेशाचे त्यांचे स्वप्न आजही बांग्‍लादेशाच्‍या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करत आहे. १९७१ नंतर बंगबंधू शेख मुजिबुर्रेहमान यांचेच नेतृत्व होते ज्याने बांग्लादेशाला अशांतता आणि अस्थिरतेच्या स्थितीतून बाहेर काढले होते. समाजातील द्वेष आणि आक्रोश संपवून महान बंगबंधुनी बांग्लादेशाला शांतता आणि विकासाचा एक मार्ग दाखवला. सोनार बांगलाचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग दाखवला. भारताची तेव्हाची तरुण पिढी तर त्यांच्यामुळे विशेष प्रभावित झाली होती. आणि हे माझे सौभाग्य होते कि मी स्वतः त्यांच्या विचारांच्या ज्ञानाचा लाभ घेऊ शकलो. आज बंगबंधुना केवळ दक्षिण आशियातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शांतता आणि सहअस्तित्व स्थापन करणारा नेता म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. त्यांची मुलगी महामहीम शेख हसीना आज बांग्‍लादेशाच्‍या पंतप्रधान म्हणून इथे उपस्थित आहेत. याप्रसंगी, मी त्यांच्या साहसाचे कौतुक करू इच्छितो. ज्या कठीण परिस्थितीतून त्यांनी स्वतःला बाहेर काढले, आपल्या देशाला बाहेर काढले, ते साहस प्रत्येकात नसते. मात्र आजही त्या  एखाद्या खडकाप्रमाणे उभ्या आहेत आणि आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी काम करत आहेत.

मित्रांनो,

आज आपल्या क्षेत्राला, जगातील या प्राचीन भूभागाला प्रामुख्याने तीन विचारसरणी परिभाषित करतात. या विचारसरणी आपला समाज आणि सरकारी यंत्रणेच्या प्राधान्यक्रमांचा आरसा आहे. यात एक विचार आहे जो आर्थिक विकासावर केंद्रित आहे, देशाला समृद्ध आणि सामर्थ्यवान बनवण्यावर केंद्रित आहे, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालण्यावर आधारित आहे. या विचाराचे एक साक्षात उदाहरण आहे बांग्लादेशाची प्रगती आणि उन्नती. १९७१ मध्ये बांग्लादेशामधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कमी होते. आज बांग्‍लादेशाच्‍या नागरिकांचे सरासरी वय भारतापेक्षाही अधिक आहे. गेल्या ४५ वर्षात, बांग्लादेशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन ३१ पटीने वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात १३ पटीने वाढ झाली आहे. नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण २२२ वरून ३८ इतके कमी झाले आहे. प्रत्येक व्यक्तीमागे डॉक्टरांची संख्या तिपटीने वाढली आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत बांग्लादेशाची निर्यात १२५ पटीने वाढली आहे. परिवर्तनाचे हे काही मापदंड खूप काही सांगत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या दूरदृष्टीनुसार वाटचाल करताना बांगलादेश आर्थिक प्रगतीच्या नवीन सीमा पार करत आहे.

मित्रांनो,

त्याचबरोबर दुसरा विचार आहे, सर्वांची साथ, सर्वांचा विकास. माझे हे स्पष्ट मत आहे कि माझ्या देशाबरोबरच भारताचा प्रत्येक शेजारी देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर असावा, एकट्या भारताचा विकास अपूर्ण आहे आणि केवळ आमची समृद्धी संपूर्ण असू शकत नाही. आम्हाला हे देखील माहित आहे कि सर्वांची साथ, सर्वांचा विकास हे केवळ शांततेचा  पाया असेल तर शक्य आहे. म्हणूनच प्रत्येक देशाबरोबर आम्ही नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. प्रत्येक देशाला आमच्या समृद्धीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. स्वार्थी न बनता आम्हाला संपूर्ण  प्रांताचे भले व्हावे असे वाटते. या विचाराचे प्रत्यक्ष उदाहरण आहे भारत-बांगलादेश संबंधाचा सशक्त आलेख आणि यातून दोन्ही समाजांसाठी आर्थिक लाभ. प्रत्येक क्षेत्रात, मग ते आर्थिक, राजकीय, पायाभूत सुविधा निर्माण, आर्थिक संबंध, ऊर्जा सुरक्षा किंवा संरक्षण असो किंवा अनेक दशकांपासून प्रलंबित भूमी सीमा आणि सागरी सीमेचा वाद सोडवण्याचा मुद्दा असो, प्रत्येक क्षेत्रात आमचे सहकार्य, परस्पर शांतता, सामायिक विकास, परस्पर विश्वास तसेच क्षेत्रीय विकासाच्या विचाराच्या यशाचे मूर्त रूप आहे.

मित्रांनो,

मात्र खेदाची बाब आहे कि या दोन विचारप्रवाहांच्या विरुद्ध देखील दक्षिण आशियात एक मानसिकता आहे. असा विचार जो दहशतवादाची प्रेरणा आणि त्याला पोषक आहे. असा विचार ज्याचे मूल्यांकन मानवतेवर नाही तर हिंसा, दहशतवाद यावर आधारित आहे. ज्याचा मूळ उद्देश आहे दहशतवाद्यांकडून दहशतवाद पसरवणे.

एक असा विचार ज्याच्या धोरणकर्त्यांना :

मानवतावादापेक्षा मोठा दहशतवाद वाटतो.

विकासापेक्षा मोठा विनाश वाटतो.

सृजनापेक्षा मोठा संहार वाटतो.

विश्वासापेक्षा मोठा विश्वासघात वाटतो.

हे विचार आपल्या समाजाच्या शांतता, संतुलन, आणि त्याच्या मानसिक आणि आर्थिक विकासासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. हे विचार संपूर्ण प्रांत आणि जागतिक शांतता व विकासात बाधा आणणारे आहेत. जिथे भारत आणि बांगलादेश समाजाच्या आर्थिक विकासाच्या विचार प्रवाहात सहभागी आहेत, तिथेच आपण या तिसऱ्या नकारात्मक विचारप्रवाहाचे बळी देखील आहोत

मित्रांनो,

आमची आर्थिक इच्छा आहे कि या क्षेत्रातील सर्व देशांचे नागरिक यश आणि समृद्धीच्या दिशेने पुढे जावेत. आणि यासाठी आमच्या सहकार्याची दारे सदैव खुली आहेत. मात्र यासाठी दहशतवाद आणि दहशतवादी विचारांचा त्याग बंधनकारक आहे.

मित्रांनो,

 भारत-बांगलादेश संबंध ना सरकारवर अवलंबून आहेत, ना सत्तेवर. भारत आणि बांग्लादेश एकत्र आहेत कारण दोन्ही देशांचे १४० कोटी लोक एकत्र आहेत. आम्ही सुख-दुःखाचे साथीदार आहोत.

मी नेहमीच म्हटले आहे कि जे स्वप्न मी भारतासाठी पाहतो, तीच इच्छा माझी बांग्लादेशसाठी देखील असते. आणि भारताच्या प्रत्येक शेजारी देशासाठी देखील आहे. मी बांग्‍लादेशाच्‍या उज्वल भविष्याची प्रार्थना करतो. एक मित्र या नात्याने भारत जेवढी मदत करू शकतो, तो करेल. शेवटी, मी पुन्हा एकदा मुक्ती योद्धयांना, भारताच्या वीर जवानांना वंदन करतो. आणि या कार्यक्रमाचे आयोजन आणि उपस्थितीसाठी पंतप्रधान शेख हसीनाजी यांचे विशेष अभिनंदन करतो. भारत नेहमीच एक घनिष्ट आणि विश्वासार्ह मित्राप्रमाणे बांग्लादेशबरोबर प्रत्येक क्षणाला कुठल्याही मदतीसाठी तयार आहे आणि राहील.

जय हिंद . जॉय बांग्ला !!!

 
PIB Release/DL/559
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau