This Site Content Administered by
नीति आयोग

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या नागपूर येथे भीम-आधार प्लॅटफॉर्मचे उद्‌घाटन

 


नागपूर, 13-4-2017

डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या 126व्या जयंती निमित्त देशात डिजिटल भरणा क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी विविध महत्वपूर्ण उपक्रमांचे उद्‌घाटन करणार आहेत. यात व्यापाऱ्यांसाठी भीम-आधार मंच, भीमसाठी कॅश बॅक आणि रेफरल बोनस योजना तसेच 75 लेस कॅश वसाहतींची घोषणा यांचा समावेश आहे. डिजिटल भरणेला प्रोत्साहन देणाऱ्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेच्या मेगा ड्रॉ विजेत्यांनाही पंतप्रधान सन्मानित करतील. या उपक्रमांमुळे देशात डिजिटल चळवळीला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि वित्तीय समावेशनाच्या माध्यमातून सामाजिक सक्षमीकरणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय साध्य होईल.

भीम-आधार हा भीम ॲपवरील व्यापाऱ्यांसाठीचा विभाग आहे. त्या मार्फत आधारचा वापर करुन डिजिटल भरणा करणे शक्य होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याद्वारे स्मार्ट फोनमधील बायोमेट्रीक रीडरच्या माध्यमातून अंगठ्याच्या ठशासारख्या बायोमेट्रीक माहितीच्या सहाय्याने प्रत्येक भारतीय नागरीकाला डिजिटल प्रद्धतीने भरणा करणे शक्य होणार आहे. स्मार्ट फोन, इंटरनेट, तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर न करता भीम-आधारच्या माध्यमातून कोणत्याही नागरीकाला डिजिटल व्यवहार करणे शक्य होईल आणि त्याद्वारे सर्वांसाठी सामाजिक आणि वित्तीय सक्षमीकरणाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय साध्य होईल. सध्या 3 लाख व्यापाऱ्यांसह 27 महत्वपूर्ण बँका या उपक्रमात सहभागी असून, भीम-आधारचा वापर करुन त्या भरणा स्वीकारायला सुरुवात करु शकतील.

पंतप्रधानांच्या हस्ते भीमसाठी कॅश बॅक आणि रेफरल बोनस अशा दोन योजनांचेही उद्‌घाटन होणार असून, सहा महिन्यांच्या अवधीसाठी त्यावर 495 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. डिजिटल पेमेंटची संस्कृती तळागाळापर्यंत पोहोचेल, याची खातरजमा करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. रेफरल बोनस योजनेअंतर्गत भीम रेफर करणारा (भीमचा संदर्भ देणारा) आणि नवा वापरकर्ता दोघांच्याही खात्यात रोख बोनस जमा केला जाईल. कॅशबॅक योजनेअंतर्गत भीमचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅक प्राप्त होईल. MEITY मार्फत दोन्ही योजनांवर देखरेख ठेवली जाईल, तर NPCI मार्फत या योजना राबवल्या जातील.

भीम-आधार ॲप तसेच कॅश बॅक आणि रेफरल बोनस योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर देशातील डिजिटल भरणा क्रांतीला मोठे प्रोत्साहन मिळेल, असे नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.

भारतात डिजिटल भरणा ही लोकचळवळ घडवण्याच्या हेतूने नीति आयोगाने 100 दिवस राबवलेल्या माहिती, शिक्षण आणि संवाद अभियानांतर्गत लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना या दोन महत्वपूर्ण योजनांचे समापन झाले आहे. या योजनेअंतर्गत 16 लाख विजेत्यांना तब्बल 258 कोटी रुपयांची रक्कम बक्षिस स्वरुपात प्रदान करण्यात आली. देशभरातील विविध स्तरातील आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा विजेत्यांमध्ये समावेश होता.

मेगा ड्रॉच्या विजेत्यांना उद्या नागपूर येथे आयोजित समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. मेगा ड्रॉचे विजेते हे देशातील डिजिटल भरणा क्रांतीचा प्रसार करणारे खरे प्रेरक आहेत.

डिजिटल भरणा पद्धतींच्या वापरात वाढ होण्याच्या दृष्टीने नीति आयोगाने देशभरातील 100 शहरांमध्ये 100 दिवस राबवलेले डिजिधन मेळे परिणामकारक ठरले. 27 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 ग्रामीण आणि नागरी भागातील शहरांमधील किमान 15 हजार संस्था कॅशलेस झाल्या. शहरे, लहान नगरे आणि गावांमध्ये 15 लाखाच्या उलाढालीसह या मेळाव्यांच्या माध्यमातून लक्षावधी नागरीकांनी नवीन बँक खाती उघडली तसेच आधारकार्डासाठी नोंदणी केली.

डिसेंबर 2016 मध्ये भीम अॅप सुरु झाल्यापासून केवळ 4 महिन्यांच्या अवधीत 1.9 कोटी डाऊनलोडची नोंद करत, भीम ॲपने नवा विश्व विक्रम रचला आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे भारतातही सुलभ डिजिटल भरणा पद्धतींचा वापर करुन व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोव्हेंबर 2016 पर्यंत तब्बल 2,80,000 व्यवहारांच्या माध्यमातून 101 कोटी रुपये मूल्याचे आदान-प्रदान करण्यात आले. केवळ 4 महिन्यांच्या अवधीत, या वर्षात मार्च महिन्यापर्यंत डिजिटल भरणा पद्धतीच्या माध्यमातून तब्बल 63,80,000 इतके व्यवहार झाले असून, या प्रमाणात 23 टक्के वाढ झाली आहे. तब्बल 2,425 कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये 2.5 कोटी इतक्या आधार सक्षम भरणांची नोंद झाली होती. मार्च 2017 मध्ये या नोंदीने 5 कोटीचा टप्पा ओलांडला. याच अवधीत आय.एम.पी.एस. व्यवहारांचे प्रमाणही 3.6 कोटीवरुन 6.7 कोटी इतके वाढले.

चालू आर्थिक वर्षात 2500 कोटी डिजिटल व्यवहारांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने देशभरातील 75 वसाहतींना पंतप्रधान उद्या ‘लेस कॅश टाऊनशिप’ म्हणून घोषित करणार आहे. या ‘लेस कॅश टाऊनशिप’मध्ये तेथील सर्व कुटुंबांना भरणा स्वीकारसंबंधी पायाभूत सुविधेबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. PWCच्या तृतीय पक्ष निर्धारणानुसार या टाऊनशिपची निवड करण्यात आली. निर्धारणासाठीच्या आढाव्याच्या अवधीत डिजिटल भरणा पद्धतींचा वापर करुन 80 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या वसाहतींचाच या यादीत समावेश करण्यात आला आहे. या वसाहतींच्या माध्यमातून दररोज 1.5 लाख डिजिटल व्यवहार अपेक्षित असून, त्या अंदाजानुसार दरवर्षी देशात 5.5 कोटी डिजिटल व्यवहारांची नोंद होईल.

भारतातील या डिजिटल पराक्रमाची आघाडीच्या अर्थतज्ञांनी नोंद घेतली आहे. ‘प्रदान करणे, तसेच बँक किंवा मोबाईल अकाऊंटचा व्यवहारांसाठी वापर करण्यासाठी लागणाऱ्या काही दिवसांच्या अवधीची मर्यादा तात्काळ व्यवहारांवर आणण्याची क्षमता भारताने साध्य केली आहे. या क्रांतीकारी डिजिटल पायाभूत सुविधांच्या माध्यमातून बिटकॉइन्सच्या तुलनेत कितीतरी जास्त पट अब्जावधी व्यवहारांवर प्रक्रिया शक्य होणार आहे’, असे मत राऊल पाल यांनी व्यक्त केले आहे.

 
PIB Release//60
दे -माधुरी -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau