This Site Content Administered by
पंतप्रधान

चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त संवादात्मक डिजीटल प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 10-4-2017

आज आपण २०व्या शतकातील एका महान घटनेच्या समारंभाचा शुभारंभ करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गांधीजींनी पाटणा येथून आपल्या चंपारण्याच्या प्रवासाला सुरवात केली होती. चंपारण्याच्या ज्या भूमीला भगवान बुद्धांच्या प्रवचनाचा आशिर्वाद मिळाला होता, जी भूमी सीता मातेचे पिता जनक यांच्या राज्याचा भाग होती; तिथले शेतकरी कठोर परिस्थितीचा सामना करत होते. गांधीजींनी केवळ चंपारण्यातील शेतकऱ्यांना, शोषितांना, पीडितांनाच मार्ग दाखविला नाही तर संपूर्ण देशाला हे दाखवून दिले की शांतीपूर्ण सत्याग्रामध्ये किती ताकत आहे.

मित्रांनो आपल्या देशाचा इतिहास हा केवळ काही व्यक्तींपुरताच किंवा काही कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहिला नसून  आपल्या देशाचा इतिहास खूपच व्यापक असून एक असा इतिहास आहे जो  नेहमी नवीन रुपात आणि नवीन संदर्भ घेऊन समोर येतो आणि आपल्याला विवश करतो की आपण आपले डोळे निट उघडून आपल्या देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक परंपरेला समजून घेऊ. इतिहासाच्या पुस्तकातील काही पाने अशी असतात की जेव्हा कधी ती पाने तुम्हाला किंवा तुम्ही त्यांना स्पर्श करता तेव्हा ती तुमच्यामध्ये काही तरी नवीन बदल घडवून आणतात. यालाच परीस स्पर्श म्हणतात, इतिहासाचा परीस स्पर्श. चंपारण्याचा सत्याग्रह असाच परीस स्पर्श आहे. म्हणूनच अशा ऐतिहासिक प्रसंगाबद्दल जाणून घेणे,त्यांच्याशी जोडले जाणे खूप आवश्यक आहे आणि वेळप्रसंगी त्यांना जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आता इथे एका प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले, ऑनलाईन संवादात्मक प्रश्नमंजुषेला सुरुवात झाली आहे, नृत्य नाटिका सादर केली गेली. चंपारण्य सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाली म्हणून असे कार्यक्रम आयोजित करणे ही केवळ औपचारिकता नाही. ही आपल्यासाठी एक पवित्र संधी आहे. बापूंच्या आदर्शांनी प्रेरित होऊन देशहितासाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी आहे.

मित्रांनो, आता आपल्याला महात्मा गांधींना श्रद्धांजली सोबतच कार्यांजली देखील अर्पण करायची आहे. आपल्या कार्यांना त्यांना अर्पण कार्याचे आहे, आणि त्याचा सर्वात मोठा मध्यम आहे स्वच्छाग्रह. सत्याच्या प्रति आग्रहाप्रमाणे स्वच्छतेच्या प्रति देखील आग्रह.

मित्रांनो, १९१७ मध्ये गांधीजी जेव्हा चंपारण्य येथे गेले तेव्हा त्यांचा तिथे दीर्घकाळ  थांबण्याचा कोणताही उद्देश नव्हता. त्यांना चंपारण्यातील स्थितीची जास्त माहिती देखील नव्हती. परंतु गांधीजी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ते तिथे काही आठवडे नाही तर कित्येक महिने राहिले. चंपारण्यानेच त्यांना मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी बनविले. चंपारण्य येथे पोहोचण्यापूर्वी त्यांना सत्याग्रहाच्या ताकतीची माहिती होती. परंतु त्यांना माहित होते की, फक्त ते सत्याग्रही बनून त्यांना इच्छित परिणाम प्राप्त होणार नाही. त्यांना देशातील जनसमुदायाला सत्याग्रहाच्या ताकत लक्षात आणून द्यायची होती.

जेव्हा मॅजिस्ट्रेटने त्यांना चम्पारण्यातून निघून जायचे आदेश दिले तेव्हा ते म्हणाले की, न्यायालयाचा अवमान करण्यासाठी ते हा आदेश धुडकावून लावत नाहीत तर ते असं आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून आणि आपल्या अस्तित्वाचा सम्मान करण्यासाठी करत आहेत. संपूर्ण ब्रिटीश प्रशासन त्यांच्या या निर्णयामुळे मागे फिरले जेव्हा गांधीजी म्हणाले की मी या कारागृहात जाण्यासाठी तयार आहे, इंग्रजांनी या गोष्टीचा विचार देखील केला नव्हता. लोकं बघत होती की, दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक वकील येथे चम्पारण्यात येवून कशाप्रकारे तुरुंगात जायला तयार झाला. एवढ्या ऊनात संपूर्ण परिसरात धुळीमध्ये फिरत आहे. ऊन्हामध्ये कधी बैलगाडीतून, कधी पायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गांधी जात होते.

तुम्ही हे लक्षात घ्या की, गांधीजी यावेळी लोकांच्या विचार प्रक्रियेला चालना देत होते. नीळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले  जात होते, तपास करत होते. परंतु या प्रक्रियेमध्ये गांधीजी स्वतःला लोकांशी जोडून ठेवत होते, स्वःताला लोकांसाठी खर्ची करत होते, स्वःताचे उदाहरण देवून लोकांची शक्ती एकमेकांशी जोडत होते.

गांधीजी सांगायचे,माझे जीवनच माझे दर्शन आहे. आणि हेच आपण चम्पारण्यात पाहिले. गांधीजींनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे की, कशाप्रकारे लोकांना आपली शक्ती समजली आणि हे देखील समजले की परिवर्तन होऊ शकते, बदल घडू शकतात. त्यांनी लिहिले आहे की, १०० वर्षांपासून सुरु तीन काठिया कायदा रद्द होताच नील शेती करायला भाग पाडणाऱ्या इंग्रजांच्या सत्तेचा अस्त झाला. जनतेमधील जो समुदाय नेहमी दबावाखालीच राहायचा त्याला आपल्या शक्तीची थोडीफार जाणीव झाली आणि लोकांना असे वाटू लागले की, निळेचा डाग धुवू शकत नाही.

म्हणजेच, लोकांना जेव्हा वाटत होते काहीच होऊ शकत नाही, काही परिवर्तन घडू शकत नाही, या सगळ्याला गांधीजींनी लोकांचा भ्रम सांगितले आहे. हा भ्रम त्यांनी दूर केला आणि लोकांना त्यांच्या ताकतीची जाणीव करून दिली.

बंधू भगिनींनो, गांधीजी मूलतः स्वच्छाग्रही होते. ते सांगायचे- स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. गावांमध्ये लोकं अज्ञान आणि निष्काळजीपणामुळे घाणीत आणि अस्वच्छ परिस्थितीमध्ये राहतात हे बघून गांधीजींना खूप त्रास व्हायचा. १९१७ मध्ये आदरणीय बापूंनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, जो पर्यंत आपण आपल्या गावांमधील आणि शहरांमधील स्थिती बदलत नाही, स्वतःला वाईट सवयींपासून मुक्त नाही करत आणि चांगली शौचालये बांधत नाही तोपर्यंत आपल्यासाठी स्वराज्याचे काही महत्व नाही.

एकप्रकारे पहिले तर देशामध्ये स्वच्छता आंदोलनाचे मूळ स्थान देखील चंपारण्याला मानू शकतो. त्यांनी स्वच्छतेला गांधीवादी जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक बनविले. त्यांचे स्वप्न होते सर्वांसाठी संपूर्ण स्वच्छता.

मित्रांनो, चंपारण्यात जे मंथन झाले, जे प्रयत्न झाले, त्यातून आपल्याला पंचामृत मिळाले. जनसामान्यांना एकत्र आणून, मंथन करून, कार्य करून, संघर्ष करून या पंचामृतामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन दिशा मिळाली.

जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर लक्षात येईल की, चंपारण्यात गांधीजींनी जे काही केले, त्यामुळे ५ वेगवेगळे अमृत देशासमोर आले.हे पंचामृत आज देखील देशासाठी तितकेच महत्तवपूर्ण आहेत -

पहिले अमृत – लोकांना सत्याग्रहाची ताकत कळली,

दुसरे पंचामृत – लोकांना जनशक्तीची ताकत कळली,

तिसरे पंचामृत – स्वच्छता आणि शिक्षणाबद्दल भारतीय जनसामान्यांमध्ये नवीन जागृती निर्माण झाली,

चौथे अमृत – महिलांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न होऊ लागले,

आणि पाचवे अमृत – आपण स्वतःहून कातलेले वस्त्र घालण्याचे नवीन विचार निर्माण झाले. हे पंचामृत चंपारण्य आंदोलनाचे सार आहे.

मित्रांनो जेव्हा मी चंपारण्याविषयी बोलतो, तेव्हा मला बालमोहन म्हणजेच बाळ कृष्णाची आठवण येते. मोहन पासून मोहन पर्यंत कशी यात्रा सुरु आहे; एक सुदर्शन चक्रधारी मोहन तर दुसरा चरखाधारी मोहन. आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा बाळ कृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा माता यशोदा खूप चिंतीत होती. याच चिंतेमध्ये जेहा यशोदा मातेने बाळकृष्णाला तोंड उघडायला सांगितले, तेव्हा त्यांनी मातेला संपूर्ण ब्रम्हांडाचे दर्शन घडविले. असे करून बाल मोहनने आपल्या मातेला चिंता मुक्त केले. 

जेव्हा मी चंपारण्याविषयी बोलतो तेव्हा मला किशोर वयीन मोहन आठवतो. तो चक्रधारी मोहन जेव्हा किशोर वयीन होता, ज्याला आपण कृष्ण म्हणून ओळखतो, जो रासलीला करायचा, बासुरी वाजवायचा. मुसळधार पावसापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी जेव्हा किशोर वयीन मोहनने गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गावकऱ्यांना सांगितले की तुम्ही देखील काठी घेऊन उभे रहा तेव्हाच गोवर्धन पर्वत उचलला जाईल. जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा प्रत्येकाला वाटत होते की, तो माझ्या ताकतीमुळे उचलला आहे, माझ्या काठीमुळे उचलला आहे. आणि अशाप्रकारे किशोर मोहनने लोकांना स्वतःच्या आणि सामुयिक ताकदीची ओळख करून दिली होती.  

अशाच प्रकारे आपल्या मोहन, महात्मा गांधींनी लोकांना गुलामीच्या चिंतेपासून मुक्त केले, त्यांना स्वातंत्र्याचा रस्ता दाखविला. आपल्या मोहनने लोकांमधील जनशक्तीला जागृत केले आणि त्यांना सत्याग्रह ते स्वच्छाग्रहाच्या ताकतीची ओळख करून दिली होती.

जनशक्ती जागरणाच्या या अभियानात बापूंनी महिलांना देखील बरोबरीने सहभागी करून घेतले. चंपारण्यातील महिलांची स्थिती पाहून त्यांना विचार करायला भाग पाडले की, लोकांनी स्वतः सूत कातून त्याचे कपडे बनवून घालावे.ते याला सशक्तीकरणाचा देखील एक मार्ग समजत होते. खादीच्या विकासामध्ये महात्मा गांधीजींचा चंपारण्याचा प्रवास देखील कारणीभूत आहे.

मित्रांनो, सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतू स्वातंत्र्य नंतर गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. सात दशकांनतरही आपल्याला या वाईट वृत्तीपासून मुक्ती मिळालेली नाही. म्हणूनच २०१४ मध्ये जेव्हा मी लालाकिल्यावरून प्रत्येक घरात शौचालय असावे असे म्हणालो तेव्हा लोकं हैराण झाले की मी हे काय बोलत आहे.

मित्रांनो, स्वच्छ भारत मिशन हे बापूंच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्वाला नेण्याचे अभियान आहे. हे स्वप्न जवळजवळ १०० वर्षांपासून अपूर्ण आहे आणि आपल्याला सर्वांना मिळून ते पूर्ण करायचे आहे. मला आनंद होत आहे की, देशातील लोकं बापूंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाला खऱ्या अर्थाने एका जनआंदोलनाचे स्वरूप येत आहे. समाजातील प्रत्येक वर्ग या स्वच्छाग्रहाशी जोडला जात आहे. जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरु झाले होते तेव्हा केवळ ४२ टक्के ग्रामीण लोकसंख्याच शौचालयाचा वापर करत होती. आता यामध्ये वाढ होऊन हा आकडा ६३ टक्क्यांवर गेला आहे.

मागील अडीच वर्षात १ लाख ८० हजारांहून अधिक गाव आणि १३० जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. आता राज्यांमध्ये देखील एक स्पर्धा सुरु झाली आहे, की सर्वात आधी हागणदारीमुक्त राज्य म्हणून कोणाचे नाव जाहीर होते.

आजच्या स्थिती मध्ये सिक्कीम, हिमाचलप्रदेश आणि केरळने स्वतःला पूर्णतः हगणदारीमुक्त राज्य म्हणून घीषित केले आहे. गुजरात, हरयाणा, उत्तराखंड आणि इतर अनेक राज्य स्वतःला हगणदारीमुक्त घोषित करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहेत. आपल्याला लवकरच त्याच्या बातम्या ऐकायला मिळतील.

गंगा किनाऱ्यावरील गावांना प्राधान्याने हगणदारीमुक्त बनवले जात आहे. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, गंगा नदी ज्या ५ राज्यांमधून वाहते, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल तेथे गंगा किनाऱ्यावरील ७५ टक्के गावांनी स्वतःला हगणदारीमुक्त घोषित केले आहे. गंगा किनारी वसलेल्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या योजना लागू करण्यात येत आहेत जेणेकरून गावांमधील कचरा नदीत टाकला जाणार नाही. मला आशा आहे की, लवकरच गंगा किनारा हगणदारीमुक्त होईल. 

बंधू आणि भगिनींनो, आता सगळ्या सरकारी शाळांमध्ये मुले आणि मुलींसाठी वेगवेगळी शौचालये आहेत. आता मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये स्वच्छतेशी निगडीत धड्यांचा समावेश केला जात आहेत जेणेकरून त्यांना सुरवातीपासूनच त्याच्या फायद्या तोट्याची माहिती मिळेल आणि ते स्वच्छतेला आपल्या आयुष्याचा, आपल्या सवयीचा एक हिस्सा बनवतील.

मित्रांनो, स्वच्छ भारत मिशननेच आम्हाला कार्यांजलीचा अजून एक नवीन मंत्र दिला आहे. हा मंत्र आहे टाकाऊ पासून संपत्ती पर्यंतचा. घरांमधील कचरा, इमारत बांधताना जो कचरा होतो, ते देखील उत्पन्नाचे एक साधन बनू शकते. त्यापासून वीजनिर्मिती केली जाऊ शकते, खत तयार केले जाऊ शकते, त्यावर पुनर्प्रक्रिया करून बांधकामाशी निगडीत कामांमध्ये त्याचा पुनर्वापर होऊ शकतो, आणि म्हणूनच टाकाऊ पासून संपत्ती पर्यंत या विषयावर जोर दिला जात आहे आणि यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे.

विविध सरकारी विभाग स्वच्छतेला चालना देण्यासाठी, लोकांच्या सोयीनुसार नवीन नवीन उपक्रम राबवीत आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जात आहे. तुम्ही पाहिलेच असेल रेल्वे मधील घाणी संदर्भात जेव्हा ट्विट झाले तेव्हा तातडीने त्यावर उपययोजना करण्यात आली. नाहीतर तुम्हाला आठवतच असेल की कशाप्रकारे पूर्वी रेल्वेच्या डब्यांमध्ये, फलाटावरील घाणीला आपण आपल्या व्यवस्थेचाच एक हिस्सा मानलं होत.

नुकतेच, पेट्रोलियम मंत्रालायाने swachhta @ petrol pump या नावाने एक मोबाईल एप सुरु केले आहे. पेट्रोलपंपांवरील शौचालये जर अस्वच्छ असतील तर त्याची तक्रार तुम्ही लगेचच या एपच्या माध्यमातून यासंदर्भात तक्रार करू शकता. देशातील अंदाजे ५५ हजार पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध आहे.

याच शृंखलेमध्ये दिल्ली मध्ये एक राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची देखील स्थापना करण्यात येत आहे. हे केंद्र स्वच्छता अभियानाशी निगडीत सर्व माहिती, आधुनिक तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मित्रांनो, वेगवेगळ्या स्तरावर, सरकार पासून गावांपर्यंत संपूर्ण देशात या घडीला स्वच्छाग्रह अभियान सुरु आहे, आणि हे खूपच अभूतपूर्व आहे. आता लोकांच्या हे लक्षात येत आहे की, स्वच्छता ठेवली पाहिजे, मुलं मोठ्यांना घाण करण्यापासून थांबवत आहेत, तक्रार करत आहेत. आणि म्हणूनच, स्वच्छता, स्वच्छाग्रह हे अभियान पुढे नेण्यासाठी तक्रारींसोबतच, घाणीच साम्राज्य पसरू नये, आपल्या आजूबाजूला घर, कार्यालये, रस्ते, शहर साफ ठेवली पाहिजेत ही भावना देखील वाढत आहे. स्वच्छ्तेप्रती हा भावच स्वच्छाग्रह आहे, स्वच्छतेसाठी केलेलं कार्यच बापूंना कार्यांजली आहे.

मित्रांनो, गांधीजींना फक्त व्यवस्था परिवर्तन नाही तर मूल्य परिवर्तन हवे होते. त्यांनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे की, मला असे वाटते की, भारताने हे ओळखावे की, भारत हे एक शरीर नाही तर एक आत्मा आहे जो प्रत्येक शारीरिक व्याधीपासून वाचू शकते. 

आपल्याला देशाचा आत्मा ओळखता आला पाहिजे. बदल घडू शकतात या विचाराने पुढे गेले पाहिजे. जेवढा हा विचार पक्का असेल, तेवढीच नवीन भारताची मूळ मजबूत होतील. आपल्याला स्वच्छतेशी निगडीत आपली उद्दिष्टे निश्चित करायला हवीत आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. कोणतेच कारण नाही की, भारताची ओळख एक अस्वच्च्छ देश म्हणून व्हावी, कोणतेच कारण नाही की, आपला देश स्वच्छ होऊ शकत नाही. कोणतेच कारण नाही की, आपण स्वछाग्रहाचे हे अभियान पूर्ण करू शकत नाही. महात्मा गांधींचे स्वच्छ, आरोग्यदायी आणि समृद्ध भारताचे स्वप्न हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न झाले पाहिजे. या अभियानाचे यशच बापूंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, खरी कार्यांजली ठरेल.

मी खरंच तुम्हा सर्वांना विनंती करतो, २०१९ मध्ये जेव्हा १५० वर्ष होतील, १९१५ मध्ये गांधीजे जेव्हा भारतात परत आले होते, २ वर्षांमध्येच १९१७ ला चंपारण्यात मोहनदास करमचंद गांधी महात्मा झाले होते. बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये वल्लभभाई पटेल, सरदार पटेल झाले होते. देश त्यांच्या पाठी होता. आमच्यासाठी चंपारण्य सत्याग्रह हा स्वातंत्र्य चळवळीला मजबूत करणारा एक आरंभ बिंदू होता. आज जेव्हा त्या सत्याग्रहाची शताब्दी आपण साजरी करत आहोत तेव्हा, स्वच्छाग्रहाचा आपला संकल्प, सत्याग्रह ते स्वच्छाग्राची यात्रा, या दोन्ही बाबी गांधीजींची देण आहेत. त्यावेळी सत्याग्रह स्वातंत्र्यासाठी आवश्यक होता, आज स्वच्छाग्रह देशातील घाणीचे साम्राज्य मिटवण्यासाठी गरजेचे आहे. आणि घाणी पासून मुक्ती म्हणजे गरिबांचे कल्याण. जर खऱ्या अर्थाने गरिबांची सेवा करायची असेल तर त्यांना आजारांपासून लांब ठेवले पाहिजे, त्यांच्या आयुष्यात काही बदल घडवून आणायचे असतील  तर आपल्या सर्वांना घाणी पासून मुक्तीच्या या मंत्राचे पालन करायला हवे.

मी पुन्हा एकदा चंपारण्या सत्याग्रहाच्या शताब्दीच्या निमित्ताने संपूर्ण वर्ष चंपारण्य शताब्दी साजरी करण्याचे आवाहन करतो. साबरमती आश्रमाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत, माझ्या मते तिथे गांधीजींनी तपस्या केली होती. आणि १५० गांधीजीच्या २०१९ आपल्या समोर आहे. हा असा कालखंड आहे जो २० व्या शतकातील गांधीजींना २१ व्या शतकात जगण्याचा, आधुनिक पद्धतीने जगण्याची एक नवीन संधी जर आपल्याला मिळत असेल तर आपण तसे केले पाहिजे, मला विश्वास आहे की, तिचं खरी कार्यांजली ठरेल. श्रद्धांजली आपण बऱ्याचदा दिली आहे, यापुढेही देतच राहू, पण आज खरी गरज आहे ती कार्यांजलीची. आपला संकल्प, आपले कष्ट हे त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी खर्ची केले पाहिजेत. आमचे निरंतर हे प्रयत्न राहतील की त्या कार्यांजलीच्या माध्यमातून बापूंच्या स्वप्नातील भारताला आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. याच भावनेसह, या महान संधीला देशवासीयांनी प्रत्यक्षात जगावे, याच एक अपेक्षेसह मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

वंदे मातरम, भारत माता की जय |

 
PIB Release/DL/613
बीजी -म्हात्रे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau