This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईच्या “तुघलक” नियतकालिकाच्या  47 व्या वार्षिक कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे साधलेला संवाद : ‘‘ चो रामस्वामी यांना वाहिलेली आदरांजली’’

नवी दिल्ली, 14-1-2017

प्रियडॉ. पद्मा सुब्रहमण्यमजी,

श्री. एन. रवी,

श्री. जी. विश्वनाथन,

श्री. एस. रजनीकांत,

श्री. गुरुमूर्ती,

तुघलकचे वाचक

कैलासवासी चो. रामस्वामी यांचे प्रशंसक

आणि तामिळनाडूचे रहिवासी

पोंगल सणानिमित्त आपले स्वागत आहे.

आपण अतिशय मंगलप्रसंगी एकत्र जमलो आहोत.

कालच माझ्या तेलुगू बंधू आणि भगिनींनी भोगीचा सण साजरा केला.

उत्तर भारतातील विशेषतः पंजाबातील मित्रांनी लोहरी साजरी केली.

आज मकर संक्राती आहे.

गुजरातमध्ये सध्याच्या दिवसात संपूर्ण आकाश पतंगांनी भरलेले दिसून येते. यालाच उत्तरायण असेही म्हणतात.

आणि आपण आहात त्या तामिळनाडूमध्ये पोंगल आहे.

पोंगल हा सण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. सूर्यदेवाचे आभार मानण्याचा आहे, कृषीकार्ये करताना शेतकऱ्यांना मदत करणा-या पशू-प्राण्यांचे आभार मानण्याचा आहे, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता करून देणाऱ्या निसर्गाचे आभार मानण्याचा सण आहे.

निसर्गाशी संवाद साधल्यामुळे आपली संस्कृती, आपल्या परंपरांना अधिक मजबुती प्राप्त होते.

अगदी उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम  अगदी संपूर्ण देशभर आपण सण-उत्सवांचे उत्साही वातावरण अनुभवत आहोत.

आयुष्य- जीवन साजरं करण्यासाठी हे सण आहेत.

सण येतात ते एकतेची भावना घेवून.

सण, उत्सवांमुळे एकात्मता अतिसुंदर धागा गुंफला जातो.

देशभर साजरे होत असलेल्या विविध सणांसाठी सगळ्यांना माझ्या शुभेच्छा.

मकर संक्रात म्हणजे सूर्याचे मकर राशीमध्ये होणारे संक्रमण. बऱ्याच लोकांना  त्रासदायक कडाक्याच्या थंडीतून सुटका होऊन आता गरम दिवस सुरू होणार याचा आनंद आहे. अधिक लख्ख दिवस आता येणार याचा आनंद आहे.

काहीजण हा हंगामाचा काळ असल्याने सुगीचा सण म्हणूनही साजरा करतात.

संपूर्ण देशाला अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या, त्यासाठी  प्रचंड कष्ट घेणाऱ्या  बळीराजाच्या- शेतकऱ्याच्या जीवनात वैभवाचे, आनंदाचे दिवस यावेत म्हणून आपण या सणाला प्रार्थना करतो.

मित्रहो,

वास्तविक या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती, परंतु आवश्यक कामांमुळे येता आले नाही. तुघलकच्या 47 व्या वर्धापनदिनी माझे परममित्र श्री. चो रामस्वामी यांना मी आदरांजली अर्पण करतो.

चो यांच्या जाण्याने एक प्रज्ञावंत स्नेही आम्ही गमावला आहे, त्यांच्या जाण्याने चो यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे झालेल्या नुकसानाचे मूल्य करता येणार नाही. असे चो मित्रांच्या दृष्टीने अमूल्य होते.

चो आणि माझा गेल्या चार दशकांपासून परिचय होता, मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने तर माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे.

इतके बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी असणा-या व्यक्ती, आयुष्यात मी फार कमी  पाहिल्या आहेत, त्यापैकी एक चो रामस्वामी होते. ते अभिनेते होते, दिग्दर्शक होते, पत्रकार होते, संपादक, लेखक, नाट्यलेखक, राजकारणी, राजकीय भाष्यकार, सांस्कृतिक समीक्षक होते, अतिशय बुद्धिजीवी लेखक होते, धार्मिक आणि सामाजिक समीक्षक होते, विधिज्ञ होते आणि आणखी बरेच काही होते.

या सगळ्या भूमिकांमध्ये तुघलक मासिकाचे संपादक ही त्यांची भूमिका म्हणजे रत्नजडित मुकुटातील मौल्यवान रत्नासारखी होती. देशाचं हित आणि लोकशाहीची मूल्ये यांच्या रक्षणासाठी तुघलक मासिकाने 47 वर्षे बजावलेली भूमिका, केलेले कार्य हे चमकत्या ताऱ्यासारखे आहे.

तुघलक आणि चो यांचा वेगवेगळा विचार करणेच अवघड आहे. दोघे वेगळे असल्याची कल्पनाही करणं कठीण आहे. जवळपास पाच दशके तुघलकचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. उद्या जर कोणी भारताचा राजकीय इतिहास लिहिला तर, त्याला चो रामस्वामी आणि त्यांनी केलेले राजकीय भाष्य यांची नोंद घेतल्याशिवाय पुढे लिहिता येणार  नाही.

चो यांचे कौतुक करणं, प्रशंसा करणं सोपं आहे, परंतु चो समजणं फार कठीण आहे. चो यांना समजून घ्यायचं असेल तर एखाद्याला त्यांच्यातील धाडस, त्यांची ठाम मतं, त्यांच्या राष्ट्रवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यांचा राष्ट्रवाद भाषा, प्रांत आणि इतर कोणत्याही वर्गवारीच्या पलिकडे जाणारा होता.

तुघलकला त्यांनी फुटिरतावादी दलाच्या विरोधातलं शस्त्र बनवलं, ही त्यांची सर्वात मोठी आणि महत्वाची उपलब्धी होती. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण राजकीय प्रणाली यासाठी ते अखंड झगडत राहिले. या लढाईत त्यांनी कधीच कोणाचीही गय केली नाही.

ज्यांच्याबरोबर त्यांनी अनेक दशके काम केलेले, ज्यांच्याबरोबर त्यांचे अनेक दशके मैत्रीपूर्ण संबंध होते, जे लोक त्यांना पितृतुल्य मानत होते, अशा लोकांवरही त्यांनी टीकेची झोड उठवली, त्यांची गय केली नाही. त्यांनी नेहमीच मुद्दा, विषय महत्वाचा मानला, व्यक्ती  कोण आहे, याकडे लक्ष दिले नाही.

कोणत्याही माध्यमातून संदेश देताना राष्ट्र  हा मध्यवर्ती विषय  त्यांच्या लेखनातून डोकावत असे. मग मुद्रित लेखन असेल, अथवा चित्रपट, नाट्य असेल, त्यांनी दूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शित केली, चित्रपटासाठी पटकथालेखन केलं, मात्र संदेश देण्यामागची त्यांची भूमिका बदलली नाही.

त्यांची टीकाटिपण्णी, उपरोधिक लेखनही व्यंगात्मक असूनही खूप छान वाटायचे. याचे कारण म्हणजे उपहास करतानाही उच्च अभिरूची जपली होती. एखाद्या गोष्टीत व्यंग दिसण्याची त्यांना जणू दैवी देणगी होती. या देणगीचा वापर त्यांनी फक्त सार्वजनिक हितासाठी केला. जी कल्पना एखाद्या पुस्तकातून नाही, तर अनेक पुस्तकांचे खंड लिहूनही पोहोचवू शकणार नाही, तीच कल्पना एकाच व्यंगचित्राच्या माध्यमातून पोहोचवण्याची दैवी देणगी त्यांच्याकडे होती.

मला चो यांनी माझ्याविषयी काढलेल्या एका व्यंगचित्राचं आज स्मरण होतेयं.  काहीजण माझ्यावर बंदुका रोखून धरल्या आहेत. त्यांच्या बंदुकींनी माझ्यावर नेम धरलाय. आणि सामान्य माणूस माझ्या पुढ्यात उभा आहे; चो विचारताहेत, खरं लक्ष्य कोणं आहे? मी की, सामान्य माणूस ? आजच्या घडीचा विचार केला तर हे व्यंगचित्र चपखल बसणारं ठरेल !

चो यांच्यासंबंधातील एका प्रसंगाची मला आज आठवण येतेय. एकदा काही लोक चो यांच्यावर चांगलेच संतापले होते. त्यांनी अंडी फेकून मारायला सुरुवात केली. यावेळी चो म्हणाले,‘‘ अय्या, माझ्यावर कच्ची अंडी का फेकताय, त्यापेक्षा त्याचं तुम्ही माझ्यासाठी ऑम्लेट बनवू शकता.’’ अंडी फेकणारे लोक हसायला लागले. या माणसाकडे कोणत्याही स्थितीत ती वेळ आपल्या बाजूने करून घेण्याची विलक्षण, अद्भूत  क्षमता  होती.

तुघलक सगळ्यांसाठी व्यासपीठ होतं. चो यांनी आपल्याविरोधातील विचारांनाही त्यामध्ये स्थान दिलं. एवढंच नाही, तर स्वतःच्या मासिकामध्ये आपल्या लाखोली मोजणा-या मजकुरालाही त्यांनी स्थान दिलं. यामुळे तुघलकला काही वर्ज्य आहे, असं राहिलंच नाही. चो यांच्या मजकुराला तुघलकमध्ये जितकं महत्वाचं स्थान होतं, तितकंच महत्व टीकाकार वाचकाच्या मजकुरालाही तिथं होतं. माध्यमांमध्ये आणि सार्वजनिक जीवनात लोकशाही तत्वांचा खऱ्या अर्थानं पुरस्कार तुघलकमध्ये केला गेला.

चो यांचे विचार आणि त्यांचे योगदान तमिळ जनता आणि तमिळी समाज यांच्यापुरतेच मर्यादित आहेत, असं मला वाटत नाही. पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.

आणि तुघलक मासिक केवळ राजकीय भाष्य करणारे मासिक नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ते तमिळ लोकांचे कान आणि डोळे होते. तुघलक च्या माध्यमातून चो यांनी आम जनता आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये एक सेतू निर्माण केला होता.

चो यांनी ज्या उद्देशाने पत्रकारितेचा प्रवास सुरू केला, त्याच मार्गावरून तुघलक ची यापुढेही वाटचाल सुरू राहणार आहे, याचा मला आनंद आहे. तुघलकच्या महान परंपरेची धुरा  खांद्यावरून अशीच पुढे वाहण्याची जबाबदारीही खूप मोठी आहे. चो यांची समर्पणाची भावना आणि दूरदृष्टीचा स्वीकारलेला मार्ग याचे मोठे आव्हान समोर आहे. त्यांच्या या मार्गावर निष्ठेने वाटचाल करणे म्हणजेच तामिळनाडूच्या जनतेची महान सेवा केल्यासारखे आहे.

श्री. गुरूमूर्ती आणि त्यांच्या सहकारी समुहाला या महान प्रयासाला मी शुभेच्छा देतो. मी गुरूमुर्तींना चांगलंच ओळखतो, त्यामुळे या कार्यात ते नक्कीच यशस्वी होतील, अशी मला खात्री आहे.

अर्थातच व्यंग, उपहास, विडंबन कला आणि उपरोध यांचे चो सर्वार्थाने गुरू होते, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

मला वाटतं, आपल्याला उपहास आणि व्यंगाची खरंच गरज आहे. उपहास आपल्या जीवनात आनंद आणतो. व्यंग उत्तम औषध म्हणून काम करत असते. 

विडंबनामुळे निर्माण होणारा विनोद आणि चेह-यावर उमटणारे हास्य इतर कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त शक्तीशाली ठरते. उपहासामध्ये बंध तोडण्यापेक्षा सेतू बांधण्याची ताकद नक्कीच असते.

आणि आजच्या घडीला आपल्याला नेमके हेच हवे आहे. लोकांलोकांमधील सेतू बांधण्याची आवश्यकता आहे. जातींमधील, समाजातील पूल बांधण्याची गरज आहे.

उपहासामुळे माणसांतील रचनात्मकता बाहेर येते. एखादे भाषण, एखादी घटना घडली तर ते लगेच अनेकापर्यंत पोहोचवलं जातं, लगेच पुढं पाठवण्याचं अनुकरण केलं जातं, आज आपण अशाच युगात राहतोय.

मित्रांनो,

मी यापूर्वी चेन्नइमध्ये तुघलकच्या वार्षिक वाचक सभेमध्ये सहभागी झालो होतो.

अशा कार्यक्रमांमध्ये चो यांच्या स्वरातील श्री मद्‌भगवत गीतेमधील श्लोक म्हणण्याची तुमची परंपरा आहे. आज चो यांच्या सन्मानार्थ मी त्याच श्लोकांनी या संवादाची समाप्ती करत आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।

(जे शाश्वत, अनंत, अनादि आहे ते कधीच या स्थानावरून त्या स्थानावर जात नाही, परंतु जे काही राहिलेले आहे, ते स्थानांतर करत राहते.)

चो यांनी विविध क्षे़त्रांमध्ये दिलेल्या योगदानाचे स्मरण राहणार आहेच. मात्र त्यापुढे या सगळ्यांमधून एक चो रामस्वामी नावाचे एक वेगळेच, अद्वितीय, अद्भूत रसायन तयार झाले, त्याबद्दल आपण सगळेच त्याचे ऋणी राहणार आहोत. चो- एकमेवाव्दितीय.

 
PIB Release/DL/69
बीजी -सुवर्णा -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau