This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 फेब्रुवारी 2017)

 


नवी दिल्ली, 26-2-2017

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. हिवाळा आता संपतो आहे. वसंत ऋतूने आपल्या सर्वांच्या जीवनात प्रवेश केला आहे. पानगळीनंतर झाडांना नवी पालवी फुटते, फूले फुलतात, बागा बहरून येतात, पक्षांचा किलबिलाट मन मोहून टाकतो, उन्हामुळे  केवळ फूलेच नव्हे तर फळेसुद्धा झाडांच्या फांद्यांवर चमकताना  दिसतात.  ग्रीष्म ऋतूचे फळ असणाऱ्‍या आंब्याचा मोहोर वसंतातच दिसू लागतो. त्याचवेळी शेतात मोहोरीची पिवळी फुले, शेतकऱ्‍यांच्या मनाला नवी उभारी देतात. पळसाची वाळलेली फूले होळी आल्याचा संकेत देतात. निसर्गात होणाऱ्‍या या बदलाच्या क्षणाचे अमिर  खुसरो यांनी  मोठे  मजेदार वर्णन केले आहे. अमीर खुसरो लिहितात,

"फूल रही सरसों सकल बन,

अंबवा फूटे, टेसू फूले,

कोयल बोले, डार-डार."

जेव्हा निसर्ग प्रसन्न असतो, वातावरण आनंदी असते, तेव्हा मनुष्यही या ऋतूचा पूर्ण आनंद घेतो. वसंत पंचमी, महाशिवरात्र आणि होळीचा सण मानवी जीवनात आनंदाचे रंग भरतो. प्रेम, बंधुभाव आणि मानवता यांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात आपण फाल्गुन या शेवटच्या महिन्याला निरोप देणार आहोत  आणि येणाऱ्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज  झालो आहोत. वसंत ऋतू म्हणजे या दोन महिन्यांचा संगम आहे.

सर्वात आधी मी देशातील लाखो नागरिकांचे यासाठी आभार मानतो की, 'मन की बात' आधी जेव्हा मी आपल्याकडून मते मागवतो, सूचना मागवतो, तेव्हा माझ्याकडे मोठ्या प्रमाणात सूचना येतात. नरेंद्र मोदी ऍप वर, ट्विटरवर, फेसबुकवर, पोस्टाने येतात. यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.

शोभा जालान यांनी नरेंद्र मोदी ऍपवर मला असे लिहून पाठवले आहे की, बहुतांश जनता इस्रोने  केलेल्या कामगिरीबद्दल अनभिज्ञ आहे आणि म्हणून त्या म्हणतात की, १०४ उपग्रह आणि लक्ष्यवेधी वेगवान क्षेपणास्त्र याबद्दल मी माहिती द्यावी. शोभाजी, भारताच्या या अभिमानस्पद कामगिरीचे आपण स्मरण केले, याबद्दल आपले आभार. गरिबीनिर्मूलन असो, रोगांपासून बचाव असो, जगाबरोबर जोडून घेणे असो, ज्ञान, माहिती  पोचवणे असो. तंत्रज्ञानाने, विज्ञानाने आपले महत्व अधोरेखित केले आहे. १५ फेब्रुवारी २०१७, भारताच्या जीवनातला गौरवास्पद दिवस आहे. आपल्या वैज्ञानिकांनी साऱ्‍या जगासमोर भारताचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोने अनेक मोहीमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मंगळ ग्रहावर मार्स मिशनअंतर्गत मंगळयान पाठवण्याच्या यशस्वी कामगिरीनंतर, गेल्या काही दिवसात इस्रोने अंतराळ क्षेत्रात एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इस्रोने ह्या मेगा मिशनच्या माध्यमातून एकाच वेळी वेगवेगळ्या देशांचे, ज्यात अमेरिका, इस्राईल, कझागिस्तान, नेदरलँड, स्वित्झरलँड, यू.ए.ई. आणि भारताचाही समावेश आहे, या देशांचे १०४ उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात पाठवून इतिहास रचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे आणि ही सुद्धा आनंदाची बाब आहे की हे ३८वं यशस्वी PSLV  प्रक्षेपण आहे. हे यश केवळ  इस्रोसाठी नव्हे तर साऱ्‍या देशासाठी ऐतिहासिक म्हणावे लागेल. इस्रोचा हा कॉस्ट इफेक्टिव्ह इफिशियंट स्पेस प्रोग्राम साऱ्‍या जगासाठी एक आश्चर्य ठरला आहे आणि जगानेही मोकळ्या मनाने भारतीय वैज्ञानिकांच्या या यशाचे कौतुक केले आहे.

बंधु आणि भगिनींनो, ह्या १०४ उपग्रहांमध्ये एक अत्यंत महत्वाचा आहे कार्टोसॅट २ डी, हा भारताचा उपग्रह आहे आणि ह्या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्‍या छायाचित्रांचा, माहितीचा, मॅपिंग, पायाभूत विकास सुविधा, विकासाची माहिती, नागरी विकास नियोजन ह्यासाठी मोलाचा उपयोग होणार आहे. विशेषतः माझ्या शेतकरी बंधु भगिनींना, देशभरात जेवढे जलस्रोत आहेत, ते किती आहेत? त्यांचा उपयोग कसा करता येईल? कशा-कशावर लक्ष द्यावं लागेल? ह्या साऱ्‍या  बाबींमध्ये आपला हा नवा उपग्रह कार्टोसॅट २ डी मोलाची मदत करेल. आपल्या ह्या उपग्रहाने  तिथे पोचताच काही छायाचित्रे पाठवली आहेत. त्याने त्याचे काम सुरु केले आहे. आपल्यासाठी ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की ह्या साऱ्‍या मोहिमेचे नेतृत्व आपले तरुण वैज्ञानिक, आपल्या महिला वैज्ञानिक ह्यांनी केले. तरुण आणि महिलांचा इतका मोठा सहभाग हा इस्रोच्या यशातील एक मोठ्या गौरवाचा पैलू आहे. साऱ्‍या देशवासीयांच्या वतीने मी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो. सामान्य जनतेसाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी अंतराळ विज्ञान वापरण्याचा हेतू ह्या वैज्ञानिकांनी कायम ठेवला आहे आणि नव-नव्या विक्रमांची ते नोंद  करत आहेत. आपल्या ह्या वैज्ञानिकांचे, त्यांच्या साऱ्‍या चमूचे आपण कितीही अभिनंदन केले तरीही ते कमीच ठरेल.

शोभाजींनी आणखीही एक प्रश्न विचारला आहे आणि तो आहे भारताच्या संरक्षणाबाबत, भारताने एक मोठे यश मिळवले आहे, त्याबाबत अजून फार चर्चा झाली नाही, पण शोभाजीचे लक्ष ह्या महत्वाच्या विषयाकडे गेले आहे. भारताने संरक्षण क्षेत्रातसुद्धा बॅलेस्टिक इंटरसेप्टर मिसाईल म्हणजे बॅलेस्टिक लक्ष्यवेधी प्रक्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. लक्ष्यवेधी तंत्रज्ञान असणाऱ्‍या ह्या क्षेपणास्त्राने चाचणीच्या काळात जमिनीपासून सुमारे शंभर किलोमीटर उंचीवर असलेल्या शत्रू राष्ट्राच्या क्षेपणास्त्राचा अचूक वेध घेण्यात यश मिळवले आहे. संरक्षण क्षेत्रात हा एक मोलाचा शोध  आहे आणि आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, जगभरात केवळ चार किंवा पाच देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे. भारताच्या वैज्ञानिकांनी हे करून दाखवले आहे. ह्या क्षेपणास्त्राची क्षमता अशी आहे की,  २००० किलोमीटर दूरुनही, भारतावर आक्रमण करण्यासाठी एखादे क्षेपणास्त्र आले, तरी आपले हे क्षेपणास्त्र त्याला अंतराळातच नष्ट करेल.

जेव्हा आपण एखादे नवीन तंत्रज्ञान बघतो, एखादा नवा वैज्ञानिक शोध लागतो, तेव्हा आपल्याला आनंद होतो. मानवी उत्क्रान्तीच्या प्रवासात कुतूहल, जिज्ञासा यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आणि ज्यांना बुद्धीमत्तेचे वरदान मिळाले आहे, ते कुतूहल, जिज्ञासा यांना त्याच अवस्थेत न ठेवता, त्यात नवीन प्रश्न निर्माण करतात, नवे कुतूहल निर्माण करतात. आणि हीच जिज्ञासा नव्या शोधाचे कारण ठरते. जोवर त्याच उत्तर मिळत नाही, तोवर ते स्वस्थ बसत नाहीत. आणि हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रान्तीच्या प्रवासाचे आपण अवलोकन केले, तर आपण हे सांगू शकतो की, ह्या विकास यात्रेला कुठेही पूर्णविराम नाही. पूर्णविराम अशक्य आहे, ब्रह्मांडाला, सृष्टीच्या नियमांना, मानवी मनाला जाणून घेण्याचा प्रयत्न सतत सुरु असतो. नवीन विज्ञान, नवीन तंत्रज्ञान त्यातूनच निर्माण होते आणि प्रत्येक तंत्रज्ञान, प्रत्येक नव्या विज्ञानाचे रूप, एका नव्या युगाला जन्म देतात.

माझ्या प्रिय युवकांनो, जेव्हा आपण विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कठीण परिश्रमाबद्दल बोलतो, तेव्हा अनेक वेळा मी 'मन की बात' मधून हे सांगितले आहे की आपल्या तरुण पिढीला विज्ञानाबद्दलचे  आकर्षण वाढायला हवे. देशाला अनेक वैज्ञानिकांची  आवश्यकता आहे. आजचा वैज्ञानिक आगामी काळातील येणाऱ्‍या पिढ्यांच्या जीवनात एका शाश्वत बदलाचे कारण ठरू शकतो.

महात्मा गांधीजी म्हणत,"नो सायन्स हॅज ड्रॉप्ड फ्रॉम द स्काईज इन अ पर्फेक्ट फॉर्म. ऑल सायन्सेस डेव्हलप अँड आर बिल्ट अप थ्रू एक्सपिरीअन्सेस". म्हणजे,"कोणतेही विज्ञान किंवा शास्त्र  परिपूर्ण अवस्थेत आकाशातून पडलेले नाही. सर्व शास्त्रांची प्रगती आणि बांधणी अनुभवातूनच झाली आहे."

पूज्य बापूं असेही म्हणत असत,"आय हॅव्ह नथिंग बट प्रेज फॉर द झील, इंडस्ट्री अँड सक्रिफाईस दॅट हॅव्ह ऍनिमेटेड द मॉडर्न सायन्टीस्ट्स इन द परसूट आफ्टर ट्रूथ." म्हणजे,"सत्याच्या शोधासाठी, सातत्य, परिश्रम आणि त्याग यातून आकाराला आलेल्या आधुनिक वैज्ञानिकांचा मी गौरवच करतो."

 सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानातील सिद्धांतांचा सोपा वापर कसा करता येईल? त्यासाठी माध्यम कोणते असावे? तंत्रज्ञान कोणते असावे? कारण सामान्य माणसासाठी तेच विज्ञानाचे बहुमूल्य योगदान मानले जाते. काही दिवसांपूर्वी नीती आयोग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १४ व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या वेळी एक मोठी वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती. समाज उपयोगी शोधांना आमंत्रित केले गेले. अशा शोधांना ओळखणे, प्रदर्शित करणे, लोकांना माहिती देणे आणि असे शोध सामान्य जनतेसाठी कसे वापरता येतील? मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे घेता येईल? त्याचा व्यावसायिक वापर कसा करता येईल? आणि जेव्हा मी हे बघितले, तेव्हा मी पाहिले की, किती मोठी अनेक महत्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत. एक नवे तंत्र  मी पाहिले, जे आपल्या गरीब मच्छीमार बांधवांसाठी तयार करण्यात आले आहे. एक सामान्य मोबाईल ऍप तयार केले गेले आहे. पण त्याची शक्ती अशी आहे की, मच्छीमार जेव्हा मासेमारीसाठी जातात, तेव्हा कुठे जावे, सर्वात जास्त मत्स्य क्षेत्र कुठे आहे, वाऱ्याची दिशा  कोणती आहे, वेग किती आहे, लाटांची उंची किती आहे, म्हणजे एका मोबाईल ऍपवर सगळी माहिती उपलब्ध आणि यामुळे आपले मच्छीमार बांधव, जिथे अधिक प्रमाणात मासे आहेत, तिथे अत्यंत कमी वेळात पोहोचतील आणि चांगली कमाई करू शकतील.

कधी कधी उत्तर शोधण्यासाठी, समस्याच विज्ञानाचे महत्व अधोरेखित करते. मुंबईत २००५ साली अतिवृष्टी झाली, महापूर आला, समुद्रातही भरती आली आणि अनेक अडचणी निर्माण झाल्या. जेव्हा कोणतेही नैसर्गिक संकट येते, तेव्हा सर्वात पाहिले संकट येते ते गरीबांवर. दोन जणांनी अगदी  मन लावून याबद्दल काम केले आणि घरबांधणीची अशी पध्दत विकसित केली, जी अशा संकटाच्या वेळी घर वाचवेल, घरात राहणाऱ्‍यांना वाचवेल, पाणी घरात येण्यापासून वाचवेल आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्‍या आजारांपासून वाचवेल. असो, अनेक नवे शोध होते.

सांगण्याचे तात्पर्य हे की समाजात, देशात अशा प्रकारची भूमिका असणारे अनेक लोक असतात आणि आपला समाजही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, म्हणजे तंत्रचलित होत आहे. यंत्रणाही तंत्रचलित होत आहेत. एका प्रकारे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होत आहे. गेल्या काही दिवसात डीजी-धन वर जोर वाढल्याचे दिसत आहे. हळूहळू लोक रोख व्यवहारांकडून डिजिटल चलनाकडे जात आहेत. भारतातही डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहे. विशेषतः तरुण पिढीला  त्यांच्या मोबाईल फोनवरून डिजिटल पेमेंट करण्याची सवय लागते आहे. हे चांगले लक्षण आहे असे मी मानतो.

आपल्या देशात गेल्या काही दिवसात 'भाग्यवान ग्राहक योजना', 'डिजि-धन व्यापारी योजना' यांना चांगला पाठिंबा मिळाला आहे. जवळजवळ दोन महिने झाले, दर दिवशी १५ हजार लोकांना, एक हजार रुपये बक्षीस मिळत आहे. या दोन योजनांच्या माध्यमातून भारतात डिजिटल पद्धतीने पैसे देण्याच्या पद्धतीला लोकचळवळ बनवण्याच्या उद्दिष्टाचे साऱ्‍या देशभरात स्वागत झाले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे की, आजवर डीजी-धन योजनेअंतर्गत दहा लाख लोकांना बक्षीस मिळाले आहे, पन्नास हजारापेक्षा अधिक व्यापाऱ्‍यांना पारितोषिक मिळाले आहे आणि जवळ-जवळ दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बक्षीसाच्या रूपात, हे महान कार्य पुढे नेणाऱ्‍या लोकांना मिळाली आहे. या योजनेत शंभराहून अधिक ग्राहक असे आहेत, ज्यांना एक-एक लाख रुपये पारितोषिकाच्या स्वरूपात मिळाले आहेत. चार हजारावर असे व्यापारी आहेत ज्यांना पन्नास-पन्नास हजार रुपये बक्षीस मिळाले आहेत. शेतकरी असो, व्यापारी असो, लघुउद्योजक असो, व्यावसायिक असो, गृहिणी असोत, विद्यार्थी असोत, प्रत्येक जण यात चढाओढीने भाग घेत आहेत. त्याचे फायदे त्यांना मिळत आहेत. त्यांचे पृथक्करण करण्यासाठी जेव्हा मी विचारले की पारितोषिक मिळवणाऱ्‍यांमध्ये फक्त तरुणच आहेत की मोठ्या वयाचे लोकही आहेत? तेव्हा हे कळल्यावर मला आनंद झाला की हे पारितोषिक मिळवणाऱ्‍यांमध्ये १५ वर्षाचे युवकही आहेत आणि पासष्ट-सत्तर वयाचे ज्येष्ठ नागरिकही आहेत.

मैसूरहून श्रीमान संतोष यांनी आनंद व्यक्त करत नरेंद्र मोदी ऍपवर लिहिले आहे की त्यांना भाग्यवान ग्राहक योजनेत एक हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. पण एक महत्वाची गोष्ट त्यांनी लिहिली आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावी असे मला  वाटते. त्यांनी लिहिले आहे कि एक हजार रुपयांचे बक्षीस त्यांना मिळाले, त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की एका गरीब महिलेच्या घराला आग लागली होती आणि त्या आगीत सगळे सामान जळून गेले. तेव्हा मला असे वाटले की जे ईनाम मला मिळाले आहे त्यावर बहुधा ह्या गरीब वृद्ध आईचा अधिकार आहे. मी ते हजार रुपये तिला  दिले. मला फार संतोष वाटला. संतोषजी, आपले नांव आणि आपले काम आम्हाला सगळ्यांना संतोष देत आहे. आपण एक फार मोठे प्रेरक काम केले आहे.

दिल्लीतले बावीस वर्षाचे कारचालक भाई सबीर, नोटबंदीनंतर आता ते डिजिटल व्यवहाराशी जोडले गेले आहेत. सरकारची जी भाग्यवान ग्राहक योजना होती, त्यात त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. आता आज ते कार चालवतात. पण एका प्रकारे ह्या योजनेचे ते अम्बॅसेडर झाले आहेत. सर्व प्रवाशांना सर्वकाळ ते डिजिटल ज्ञान देत असतात. अशा उत्साहाने सांगतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात.

महाराष्ट्रातली एक युवा विद्यार्थिनी पूजा नेमाडे, पदव्युत्तर अभ्यासक्रम करते आहे. त्याही  रूपेकार्ड, ई-वॉलेट यांचा वापर त्यांच्या कुटुंबात कसा होतो आहे आणि तो करण्यात किती आनंद मिळतो याबद्दलचे अनुभव इतरांपर्यंत पोचवत असतात. एक लाख रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे, पण हे काम एक व्रत म्हणून त्यांनी हातात घेतले आहे आणि इतरांनाही याच्याशी त्या जोडून घेत आहेत.

मी देशवासियांना, विशेषतः देशातले युवकांना ज्यांना ह्या भाग्यवान ग्राहक योजनेत किंवा डिजिधन व्यापार योजनेत बक्षीस मिळाले आहे, त्याने मी विनंती करेन की आपण स्वतः ह्या योजनेचे अम्बॅसेडर व्हा. ह्या चळवळीचे आपण नेतृत्व करा. ही चळवळ पुढे न्या, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध जी लढाई आहे त्यात याची फार मोलाची भूमिका आहे. ह्या कामाशी जोडला गेलेला प्रत्येक जण, माझ्या दृष्टीने, देशातील अँटी करप्शन कॅडर, भ्रष्टाचार विरोधी पथक आहे. एका प्रकारे आपण शुचितेचे सैनिक आहात. आपल्याला ठाऊक आहे की, भाग्यवान ग्राहक योजना या मोहिमेला जेव्हा शंभर दिवस पूर्ण होतील, त्या दिवशी १४ एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. स्मरणीय दिवस आहे. १४ एप्रिल रोजी एक मोठी, कोटी रुपयांची बक्षीसे असणारी सोडत काढली जाईल. अजून सुमारे चाळीस-पंचेचाळीस दिवस शिल्लक आहेत. बाबासाहेबांचे स्मरण ठेवून आपण एक काम कराल का? नुकतीच बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती झाली. त्यांचे स्मरण करून आपण किमान १२५ जणांना भीम ऍप डाउनलोड करायला शिकवा. त्यातून देवाण-घेवाण कशी होते हे शिकवा. विशेषतः आपल्या आजूबाजूला जे छोटे, किरकोळ व्यापारी असतील त्यांना शिकवा. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि भीम ऍप, ह्याला विशेष महत्व द्या. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेला पाया आपल्याला भक्कम करायचा आहे. घरोघरी जाऊन, सर्वांना जोडून घेऊन, १२५ करोड हातांपर्यंत भीम ऍप पोचवायचं आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, ही जी चळवळ सुरु झाली आहे, त्याचा परिणाम असा झाला आहे की, अनेक नागरी वस्त्या, अनेक खेडी आणि अनेक शहरांमध्ये भरपूर यश मिळाले आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी कृषी क्षेत्राचे फार मोठे योगदान आहे. गावाची आर्थिक शक्ती, देशाच्या आर्थिक गतीला बळ देते. मी आज एक अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या शेतकरी  बंधु-भगिनींनी, कठोर मेहनत करून धान्याची गोदामे भरली आहेत. आपल्या देशातल्या शेतकऱ्‍यांच्या कष्टामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन झालं आहे. साऱ्‍या नोंदी हेच सांगत आहेत की आपल्या शेतकऱ्‍यांनी सगळे आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. शेतात ह्या वर्षी असे पीक आले आहे की, रोजच असे वाटतेय की पोंगल आणि बैसाखी आजच साजरी केली आहे. यावर्षी देशात जवळजवळ दोन हजार, सातशे लाख टनापेक्षा अधिक अन्नधान्याचे उत्पादन झाले आहे. आपल्या शेतकऱ्‍यांच्या नावावर असलेल्या आधीच्या विक्रमापेक्षा हे आठ टक्यांनी अधिक आहे. हे स्वतः एक अभूतपूर्व यश आहे. मी खास करून देशातल्या शेतकऱ्‍यांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठीही देतो की परंपरागत पिकांबरोबरच देशातल्या गरीबाचा विचार करून डाळीचे उत्पादन घ्यावे. कारण डाळीतूनच सर्वाधिक प्रथिने गरीबांना  मिळतात. मला आनंद झाला की माझ्या देशातल्या शेतकऱ्‍यांनी गरीबांचा आवाज ऐकला आणि जवळजवळ दोनशे नव्वद लाख हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या डाळींची लागवड केली. हे केवळ डाळीचे उत्पादन नाही, शेतकऱ्‍यांनी केलेली माझ्या देशातल्या गरीबाची फार मोठी सेवा आहे. माझी एक विनंती आहे, एक प्रार्थना आहे, माझ्या शेतकऱ्‍यांनी ज्या प्रकारे काबाडकष्ट केले आणि डाळीचे विक्रमी उत्पादन घेतले, त्यासाठी माझे शेतकरी बंधु-भगिनी विशेष धन्यवादासाठी पात्र आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, या आपल्या देशात, सरकारकडून समाजाकडून, संस्थांकडून, संघटनांकडून, प्रत्येकाकडून स्वच्छतेच्या बाबतीत काहीना काही उपक्रम सुरु असतातच. एका प्रकारे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसत आहे. सरकारही सतत प्रयत्न करीत आहे. गेल्या  काही दिवसांपूर्वी जल आणि मलनिःसारण ह्या विभागाचे आपल्या भारत सरकारचे जे पेयजल आणि स्वच्छता खातं आहे आपल्या सचिवांच्या नेतृत्वाखाली २३ राज्य सरकारांच्या वरिष्ठ आधिकाऱ्‍यांचा एक कार्यक्रम तेलंगण इथे झाला. तेलंगण राज्याच्या वारंगळ इथे बंद खोलीत परिसंवाद नाही तर, प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाचे महत्व काय आहे? त्याबद्दल प्रयोग करून १७ आणि १८ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये टॉयलेट पिट एम्पटिंग एक्सरसाइजचे आयोजन केले गेले. सहा घरांची टॉयलेट पिट्स रिकामी करून त्यांची स्वच्छता केली गेली आणि अधिकाऱ्‍यांनी स्वतः हे दाखवले की, ट्वीन पिट टॉयलेटच्या वापरल्या गेलेल्या खड्ड्याला, रिकामे करून त्याचा पुन्हा वापर करता येतो. त्यांनी हेही दाखवले की ह्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेली शौचालये किती सुविधाजनक आहेत आणि ती  रिकामी करताना स्वच्छतेच्या बाबतीत काहीही अडचण येत नाही, संकोच वाटत नाही. मानसिकदृष्ट्या असणारा अडथळा सुद्धा आड येत नाही. आपण जशी इतर सफाई करतो तसेच एक शौचालयाचा खड्डा साफ करू शकतो. या प्रयत्नाचा परिणाम झाला. देशातल्या माध्यमांनी ह्या गोष्टीला भरपूर प्रसिद्धी दिली, महत्व दिले. आणि हे साहजिकच आहे की जेव्हा एक आय.ए.एस. अधिकारी स्वतः शौचालयाचा खड्डा साफ करतो, तेव्हा देशाचे लक्ष त्याकडे जाणारच. आणि ही शौचालयाच्या खड्ड्याची स्वच्छता आहे त्यात आपण ज्याला केरकचरा मानतो, ते खत म्हणून बघितले तर एक प्रकारे काळे सोने आहे. वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचऱ्यातून संपत्ती कशी निर्माण होते, हे आपण बघू शकतो आणि हे सिद्ध झाले आहे. सहा जणांच्या कुटुंबासाठी एक स्टॅंडर्ड ट्वीन पिट टॉयलेट. हे मॉडेल जवळजवळ पाच वर्षात भरते. त्यानंतर त्या कचऱ्याला सहजगत्या दूर करून, दुसऱ्‍या खड्ड्यात सोडता येते. सहा ते बारा महिन्यात खड्ड्यात जमा झालेल्या कचऱ्याचे  विघटन होते. आणि हा विघटन झालेला कचरा हाताळण्यासाठी अत्यंत सुरक्षित असतो. खताच्या नजरेतून अत्यंत महत्वाचे खत म्हणजे NPK. आपल्या शेतकऱ्‍यांना NPK म्हणजे काय हे चांगलेच माहीत आहे. नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅशियम- हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असते आणि हे शेती क्षेत्रात फारच उत्तम खत मानले जाते.

ज्या प्रकारे सरकारने हा पुढाकार घेतला आहे, इतरांनीही पुढाकार घेऊन असे प्रयोग केले आहेत. आता तर दूरदर्शनवर स्वच्छता वार्तापत्र हा विशेष कार्यक्रम सुरु झाला आहे. त्यात अशा गोष्टी जेवढ्या प्रसारित होतील, तेवढा त्याचा लाभ मिळेल. सरकारचे वेगवेगळे विभाग स्वच्छता पंधरवडा नियमितपणे आयोजित करतात. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात महिला आणि बालविकास मंत्रालय, त्याच्या जोडीला आदिवासी विकास मंत्रालय. हे विभाग स्वच्छता अभियानाला शक्ती देणार आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्‍या पंधरवड्यात नौवहन मंत्रालय आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, हे आणखी दोन विभाग स्वच्छता अभियान पुढे नेणार आहेत.

आपल्याला ठाऊक आहे की आपल्या देशातील कुणीही नागरिक जेव्हा काही चांगले करतो, तेव्हा सारा देश एका नव्या ऊर्जेचा अनुभव घेतो, आत्मविश्वास वाढीला लागतो. रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये आपल्या दिव्यांग खेळाडूंनी जी कामगिरी केली, त्याचे आपण स्वागत केले. याच महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अंध खेळाडूंच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत, सलग दुसऱ्‍यांदा विश्वविजेता ठरत देशाचा गौरव वाढवला. मी पुन्हा एकदा या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. या दिव्यांग सहकाऱ्‍यांच्या यशाबद्दल देशाला त्यांचा अभिमान वाटतो. मी नेहमी हे मानतो की दिव्यांग बंधु-भगिनी सामर्थ्यवान असतात, दृढनिश्चयी असतात, धाडसी असतात, संकल्पवान असतात. प्रत्येक क्षणी आपल्याला त्यांच्याकडून काही-ना-काही शिकायला मिळू शकते.

मुद्दा खेळाचा असो की अंतराळ विज्ञानाचा, आपल्या देशातील महिला कुणाच्याही मागे नाहीत. पावलाशी पाऊल जोडत त्या पुढे चालल्या आहेत आणि आपल्या यशाने देशाचे नाव उज्वल करत आहेत, काही दिवसांपूर्वीच आशियाई रग्बी सेव्हन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या महिला संघाने रजत पदक पटकावले. या सगळ्या खेळाडूंना मी अनेक शुभेच्छा देतो.

8 मार्च साऱ्‍या जगात महिला दिन साजरा केला जातो. भारतातही मुलींना महत्व देण्याबद्दल, कुटुंबात आणि समाजात त्यांच्याविषयी जागरूकता वाढायला हवी, संवेदनशीलता वाढायला हवी. 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' ही मोहीम वेगाने पुढे जात आहे. आज हा केवळ  सरकारी कार्यक्रम राहिला नाही. सामाजिक संवेदना आणि लोकशिक्षणाची एक चळवळ असे आज त्याचे रूप झाले आहे. गेल्या दोन वर्षात ह्या उपक्रमाशी सामान्य माणूस जोडला गेला आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात ह्या ज्वलंत मुद्याविषयी विचार करायला या उपक्रमाने भाग पाडले आहे. वर्षानुवर्षं चालत आलेल्या जुन्या रिती-रिवाजांबद्दल लोकांच्या विचारात बदल घडवून आणला आहे. मुलीच्या जन्मानंतर उत्सव साजरा केला गेला अशी बातमी जेव्हा मिळते, तेव्हा फार आनंद होतो. एका प्रकारे मुलींबद्दल सकारात्मक विचार सामाजिक स्वीकृतीचे कारण ठरत आहे. मी असे ऐकले आहे की, तामिळनाडू राज्यात कुड्डलोर जिल्ह्याने एका विशेष अभियानांर्तगत बालविवाह प्रथेवर बंदी आणली. आतापर्यंत सुमारे एकशे पंचाहत्तर पेक्षा अधिक बालविवाह थांबवण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सुकन्या समृद्धी योजनेत जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार बँक खाती उघडण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात कन्व्हर्जन्स  मॉडेल अंतर्गत सगळ्या विभागांना 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' योजनेशी जोडण्यात आले आहे. ग्राम  सभांच्या आयोजनाबरोबरच अनाथ मुलींना दत्तक घेणे, त्यांना शिक्षण मिळेल याची खात्री करणे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न होत आहेत. मध्य प्रदेशात 'हर घर दस्तक' ह्या उपक्रमात, गावागावात, घरो-घरी मुलींसाठी शिक्षण मोहीम सुरु आहे. राजस्थानात 'अपना  बच्चा, अपना विद्यालय' अभियान चालवून शाळा सोडून गेलेल्या मुलींना पुन्हा शाळेत आणण्यासाठी, शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी उपक्रम सुरु आहे. सांगायचे तात्पर्य हे की 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' ह्या चळवळीने आता अनेक वेगळी रूपे घेतली आहेत. ही चळवळ आता लोकचळवळ झाली आहे. नव्या नव्या कल्पना त्याच्याशी जोडल्या जात आहेत. स्थानिक गरजेनुसार त्यात बदल झाले आहेत. मी हे एक चांगले लक्षण मानतो. जेव्हा आपण 8 मार्च या दिवशी महिला दिवस साजरा करू तेव्हा आमची एकच भावना असेल-

"महिला, वो शक्ती हैं, सशक्तहैं, वो भारत की नारी हैं,

न ज्यादा में, न काम में, वो सब में बरोबर की अधिकारी हैं"

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना मन की बात मधून काहीना काही संवाद साधण्याची संधी मिळते. आपणही सक्रियपणे सहभागी होत असता. आपल्याकडून मला खूप माहिती करून घेता येते. जमीनीवर काय चालले आहे? गावात, गरिबाच्या मनात काय चालले आहे? ते माझ्यापर्यंत पोचत असते. आपल्या सहभागासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. अनेक अनेक धन्यवाद.

 
/DL/1
सप्रे --दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau