This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 एप्रिल 2017)

 


नवी दिल्ली, 30-4-2017

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! प्रत्येक 'मन की बात' भागाच्या पूर्वी देशातल्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक वयोगटातल्या लोकांकडून, 'मन की बात' संबंधी अनेक सूचना येतात. आकाशवाणीवर येतात, NarendraModiApp वर येतात, मायगव्हच्या माध्यमातून येतात, दूरध्वनीद्वारे येतात, ध्वनिमुद्रित संदेशांच्या माध्यमातून येतात आणि जेव्हा कधी-कधी मी वेळ काढून पाहतो तेव्हा माझ्यासाठी तो एक सुखद अनुभव असतो. एवढी वैविध्यपूर्ण माहिती मिळते. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शक्तीचे भांडार आहे. साधकाप्रमाणे समाजासाठी झटलेल्या लोकांचे अगणित योगदान, दुसरीकडे बहुधा सरकारची नजरच जात नसावी, अशा समस्यांचे भांडार देखील नजरेस पडते. बहुधा यंत्रणेलाही सवय झाली असावी, लोकं देखील सरावली असतील आणि मला आढळून आले कि मुलांचे कुतूहल, तरुणांची महत्वाकांक्षा, थोरा-मोठ्यांच्या अनुभवाची शिदोरी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येतात. दरवेळी जेवढ्या सूचना 'मन की बात' साठी येतात, सरकारमध्ये त्यांचे सविस्तर विश्लेषण होते. सूचना कशा प्रकारच्या आहेत, तक्रारी काय आहेत, लोकांचे अनुभव काय आहेत. साधारणपणे असे आढळून आले आहे कि मनुष्याचा स्वभाव असतो दुसऱ्यांना सल्ला देण्याचा. रेल्वेमध्ये, बसमध्ये जाताना, कुणाला खोकला आला तर लगेच दुसरा येऊन सांगतो कि असे करा. सल्ला देणे, सूचना देणे, हे जणू काही आपल्याकडे स्वभावातच आहे. सुरुवातीला 'मन की बात' संबंधी जेव्हा सूचना यायच्या, सल्लारूपी शब्द ऐकू येत होते, वाचायला मिळत होते, त्यामुळे आमच्या टीमलाही असेच वाटायचे कि अनेक लोकांना बहुधा ही सवय असावी, मात्र जेव्हा आम्ही त्याकडे बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खरोखरच भारावून गेलो. बहुतांश सूचना देणारे ते लोक आहेत, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे ते लोक आहेत, जे खरोखरच आपल्या आयुष्यात काही-ना-काही करतात. काही तरी चांगले व्हावे यासाठी ते आपली बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, परिस्थिती नुसार प्रयत्न करत असतात आणि या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या, तेव्हा मला वाटले कि या सामान्य सूचना नाहीत. हे अनुभवाचे बोल आहेत. काही लोक सूचना अशासाठीही करतात कारण त्यांना वाटते जर हेच विचार तिथे, जिथे काम करत आहेत, ते विचार जर अन्य लोकांनी ऐकले आणि त्याला एक व्यापक स्वरूप मिळाले तर अनेक लोकांना लाभ होऊ शकतो. आणि म्हणूनच, त्यांची स्वाभाविक इच्छा असते कि 'मन की बात' मध्ये याचा उल्लेख व्हावा. या सर्व गोष्टी माझ्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहेत. मी सर्वप्रथम, बहुतांश सूचना ज्या कर्मयोग्यांच्या आहेत, समाजासाठी काही-ना-काही तरी करणाऱ्या लोकांच्या आहेत, त्यांच्याप्रति मी आभार व्यक्त करतो. एवढेच नाही, एखाद्या गोष्टीचा मी जेव्हा उल्लेख करतो, तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात येतात, तेव्हा खूपच आनंद होतो. गेल्या वेळी 'मन की बात' मध्ये काही लोकांनी मला सूचना केली होती, अन्न वाया जात आहे, त्यासंबंधी चिंता व्यक्त केली होती, आणि मी त्याचा उल्लेख केला होता. आणि जेव्हा उल्लेख केला, त्यांनंतर NarendraModiApp वर, माय गव्ह वर देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांनीवाया जाणारे अन्न टाळण्यासाठी अभिनव कल्पनांसह काय-काय प्रयोग केले. मी देखील कधी विचार केला नव्हता, आज आपल्या देशात विशेषतः तरुण पिढी अनेक वर्षांपासून हे काम करत आहे. काही सामाजिक संस्था करत आहेत, हे तर आपण गेली काही वर्षं ऐकून आहोत, मात्र माझ्या देशातले तरुण या कामात सहभागी आहेत, हे तर मला नंतर समजले. अनेकांनी मला विडिओ पाठवले आहेत. अनेक ठिकाणे आहेत जिथे पोळ्यांची बँक सुरु आहे. या पोळ्यांच्या बँकेत लोक आपल्याकडच्या पोळ्या जमा करतात, भाजी जमा करतात आणि जे गरजू लोक आहेत ते तिथून घेऊन जातात. देणाऱ्यालाही समाधान मिळते, घेणाऱ्यालाही अपमानित वाटत नाही. समाजाच्या सहकार्याने कशी कामे होतात, त्याचे हे उदाहरण आहे. 

आज एप्रिल महिना पूर्ण होत आहे, शेवटचा दिवस आहे. 1 मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा स्थापना दिन आहे. या निमित्त दोन्ही राज्यांच्या नागरिकांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. दोन्ही राज्यांनी विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये महापुरुषांची अखंड मालिका आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देत राहते आणि या महापुरुषांचे स्मरण करतानाच राज्याच्या स्थापना दिनी, 2022, स्वातंत्र्याची 75 वर्षं, आपण आपल्या राज्याला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला, आपल्या शहराला, आपल्या कुटुंबाला कुठवर घेऊन जाणार याचा संकल्प करायला हवा. तो संकल्प तडीस नेण्यासाठी योजना बनवायला हव्यात आणि सर्व नागरिकांच्या सहभागाने पुढे जायला हवे. माझ्या या दोन्ही राज्यांना खूप-खूप शुभेच्छा.

एक काळ होता, जेव्हा हवामान बदल हा शैक्षणिक जगताचा विषय असायचा, चर्चासत्राचा विषय असायचा. मात्र आज, आपणा लोकांच्या दैनंदिन आयुष्यात, आपण अनुभवही घेतो, आश्चर्यही व्यक्त करतो. निसर्गानेही खेळाचे सर्व नियम बदलून टाकले आहेत. आपल्या देशात मे-जून मध्ये जो उन्हाळा असतो, तो यंदा मार्च-एप्रिल मध्ये अनुभवण्याची नामुष्की ओढवली आहे. आणि मला 'मन की बात' वर जेव्हा मी लोकांच्या सूचना घेत होतो, तर बहुतांश सूचना या उन्हाळ्याच्या दिवसांत काय करायला हवे, याबाबत लोकांनी सूचना केल्या आहेत. तसे या सर्व गोष्टी प्रचलित आहेत. नवीन काही नसते, मात्र तरीही त्यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करणे खूप उपयोगी पडते.

श्रीयुत प्रशांत कुमार मिश्र, टी .एस. कार्तिक अशा अनेक मित्रांनी पक्ष्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि व्हरांड्यात, गच्चीवर, पाणी ठेवायला हवे आणि मी पाहिले आहे कि कुटुंबातली लहान-लहान मुले हे काम आवडीने करतात. एकदा का त्यांना कळले कि हे पाणी का भरायचे कि ते दिवसभरात 10 वेळा डोकावून पाहतात कि जे भांडे ठेवलेले आहे त्यात पाणी आहे कि नाही आणि पाहत राहतात कि पक्षी आले कि नाही. आपल्याला वाटते कि हा त्यांचा खेळ चालला आहे, मात्र खरोखरच लहान मुलांच्या मनात या संवेदना जागवण्याचा एक अदभुत अनुभव असतो. तुम्ही देखील कधी बघा पशु-पक्ष्यांचा थोडासा लळा एका नव्या आनंदाची अनुभूती करून देतो.

काही दिवसांपूर्वी मला गुजरात इथून श्रीयुत जगत भाई यांनी एक पुस्तक पाठवले आहे, 'Save The Sparrows’ आणि यात त्यांनी चिमण्यांची संख्या जी कमी होत आहे त्याबाबत चिंता तर व्यक्त केली आहेच, मात्र त्यांनी स्वतः अभियान स्वरूपात त्यांच्या संरक्षणासाठी काय प्रयोग केले, काय प्रयत्न केले, खूप छान वर्णन या पुस्तकात केले आहे. तसे आपल्या देशात, पशु-पक्षी, निसर्ग त्यांच्यासोबत सह-जीवन या रंगाने आपण रंगलेलो आहोत, मात्र तरीही हे आवश्यक आहे कि सामूहिकपणे अशा प्रयत्नांना बळ द्यायला हवे. जेव्हा मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हा 'दाऊदी बोहरा समाज'चे धर्मगुरू सैय्यदना साहेब यांना शंभर वर्ष पूर्ण झाली होती. ते 103 वर्ष जगले. आणि त्यांच्या शंभरीनिमित्त बोहरा समाजाने बुरहानी प्रतिष्ठानद्वारा चिमण्या वाचवण्यासाठी एक खूप मोठे अभियान राबवले होते. त्याचा शुभारंभ करण्याची मला संधी मिळाली होती. सुमारे 52 हजार बर्ड फीडर्स त्यांनी जगातल्या कानाकोपऱ्यात वितरित केली होती. जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकमध्ये त्याला स्थान मिळाले आहे.

कधी-कधी आपण इतके व्यस्त असतो, वृत्तपत्र टाकणारा, दूध देणारा, भाजीवाला, पोस्टमन, कुणीही आपल्या घराच्या दारी येते, मात्र आपण विसरून जातो कि उन्हाळ्याचे दिवस आहेत, जरा त्याला पाणी हवे का ते विचारू या.

तरुण मित्रांनो, तुमच्याबरोबर देखील मला काही गप्पा मारायच्या आहेत. मला कधी-कधी काळजी वाटते कि आपल्या तरुण पिढीतल्या अनेकांना आरामदायी आयुष्य व्यतीत करायला मजा वाटते. आई-वडीलही एका बचावात्मक अवस्थेत त्यांचे संगोपन करत असतात. अन्य काही दुसऱ्या टोकाचेही असतात, मात्र बहुतांश आरामदायी अवस्था वाले नजरेस पडतात. आता परीक्षा संपल्या आहेत. सुटीची मजा घेण्याच्या योजना बनल्या असतील. उन्हाळी सुट्टी, उष्मा असूनही जरा बरे वाटते. मात्र मी एक मित्र या नात्याने तुमची सुट्टी कशी जावी, यासंबंधी काही बोलायचे आहे. मला खात्री आहे काही लोक नक्की प्रयोग करतील आणि मला सांगतिलही. तुम्ही या सुट्टीचा उपयोग, मी तीन प्रस्ताव देतो, त्यापैकी तिन्ही केलेत तर खूपच चांगली गोष्ट आहे, मात्र तीनापैकी एखादा करण्याचा प्रयत्न करा. हे पहा कि नवा अनुभव असेल, प्रयत्न करा कि नवीन कौशल्याची संधी साधा, प्रयत्न करा कि ज्या विषयाबाबत ना कधी ऐकले आहे, ना पाहिले आहे, ना कधी विचार केला आहे, ना माहिती आहे, मात्र तरीही तिथे जाण्याची इच्छा आहे आणि जा तिथे. नवीन जागा, नवा अनुभव, नवीन कौशल्य. कधी-कधी एखादी गोष्ट टीव्हीवर पाहणे किंवा पुस्तकात वाचणे किंवा परिचितांकडून ऐकणे आणि ती गोष्ट स्वतः अनुभवणे, दोन्हींमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. मी तुम्हाला विनंती करेन कि या सुट्टीत तुम्हाला जे काही कुतूहल आहे त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करा, नवीन प्रयोग करा. प्रयोग सकारात्मक असावा, आरामदायी वृत्तीच्या बाहेर नेणारा असावा. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत, सुखी कुटुंबातले आहोत. काय मित्रांनो, कधी इच्छा होते का आरक्षणाशिवाय रेल्वेच्या द्वितीय श्रेणीतून तिकीट काढून चढण्याची, किमान 24 तासांचा प्रवास करण्याची, काय अनुभव येतो. त्या प्रवाशांच्या गप्पा काय आहेत, ते स्थानकावर उतरल्यावर काय करतात, बहुधा वर्षभर जे शिकू शकणार नाही ते 24 तासांच्या आरक्षणाशिवाय, गर्दीने तुडुंब भरलेल्या गाडीत झोपायलाही न मिळणे, उभ्या-उभ्या प्रवास करणे. कधी तरी अनुभव घ्या. मी असे नाही म्हणत पुन्हा पुन्हा करा, एकदा तर करा. संध्याकाळची वेळ, आपला फुटबॉल घेऊन, व्हॉलीबॉल घेऊन किंवा कोणतेही खेळाचे साहित्य घेऊन तद्दन गरीब वस्तीत जा. त्या गरीब मुलांबरोबर स्वतः खेळा, तुम्ही बघा, बहुधा आयुष्यात खेळाचा आनंद यापूर्वी कधी मिळाला नसेल, असा तुम्हाला मिळेल. समाजात अशा प्रकारचे आयुष्य जगणाऱ्या मुलांना जेव्हा तुमच्याबरोबर खेळण्याची संधी मिळेल, तुम्ही कधी विचार केला आहे, त्यांच्या आयुष्यात किती मोठा बदल होईल. आणि मला खात्री आहे एकदा गेलात, पुन्हा-पुन्हा जावंसे वाटेल. हा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवेल. अनेक स्वयंसेवी संस्था सेवादायी काम करत असतात. तुम्ही तर गुगल गुरूशी जोडलेले आहात, त्यावर शोधा. अशाच एखाद्या संघटनेबरोबर 15 दिवस, 20 दिवसांसाठी सहभागी व्हा, जा, जंगलांमध्ये जा. कधी-कधी खूप उन्हाळी शिबिरे असतात. व्यक्तिमत्व विकासाची असतात, अनेक प्रकारच्या विकासाची असतात, त्यात सहभागी होऊ शकता. मात्र त्याचबरोबर कधी तुम्हाला वाटते कि तुम्ही असे उन्हाळी शिबीर केले आहे, व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यासक्रम केला आहे. तुम्ही कोणताही मोबदला न घेता समाजातल्या त्या लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना अशी संधी मिळाली नाही आणि जे तुम्ही शिकला आहात, त्यांना शिकवा. कसे करायचे असते, तुम्ही त्यांना शिकवू शकता. मला या गोष्टींचीही चिंता सतावतेय कि तंत्रज्ञान अंतर कमी करण्यासाठी आले, तंत्रज्ञान सीमा संपवण्यासाठी आले. मात्र त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे कि एकाच घरात सहा लोक एकाच खोलीत बसलेले आहेत मात्र अंतर इतके कि कल्पनाच करू शकत नाही. का? प्रत्येक जण तंत्रज्ञानामुळे दुसरीकडे व्यस्त झाला आहे. सामूहिकता हा देखील एक संस्कार आहे. सामूहिकता एक शक्ती आहे. दुसरे मी म्हटले कि कौशल्य. तुम्हाला वाटत नाही का कि नवीन काहीतरी शिकावे. आज स्पर्धेचं युग आहे. परीक्षेमध्ये एवढे बुडालेले असता. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मेहनत करता, गुंतून जाता. सुट्ट्यांमध्येही कुठला ना कुठला प्रशिक्षण वर्ग सुरूच असतो, पुढच्या परीक्षेची चिंता असते. कधी-कधी भीती वाटते कि आपली तरुण पिढी रोबो तर होत नाही ना. यंत्राप्रमाणे तर जगत नाही ना.

मित्रांनो, आयुष्यात खूप-काही बनण्याचे स्वप्न, चांगली गोष्ट आहे, काही तरी करून दाखवण्याचा विचार चांगली गोष्ट आहे, आणि करायलाही हवे. मात्र हे देखील पहा कि आपल्या आत जो मानवी घटक आहे, तो कुठे कंटाळत तर नाही ना, आपण मानवी गुणांपासून कुठे दूर तर जात नाही ना. कौशल्य विकासात या पैलूवर थोडा भर देता येऊ शकेल का. तंत्रज्ञानापासून दूर, स्वतःबरोबर वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न. संगीतातले एखादे वाद्य शिका, कुठल्या नवीन भाषेतली 5-50 वाक्य शिका, तामिळ असेल, तेलगू असेल, आसामी असेल, बांगला असेल, मल्याळम असेल, गुजराती असेल, मराठी असेल, पंजाबी असेल. किती वैविध्याने नटलेला देश आहे आणि नीट पाहिले तर आपल्याच आजूबाजूला कुणी ना कुणी शिकवणारा मिळू शकतो. पोहता येत नसेल तर पोहणे शिका, चित्रे काढा, भले उत्तम चित्र येणार नाही मात्र काहीतरी कागदावर उमटवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आत जी संवेदना आहे ती प्रकट व्हायला लागेल. कधी कधी छोटी छोटी कामे ज्याला आपण म्हणतो- आपल्याला, का नाही इच्छा होत, आपण शिकायचे. तुम्हाला गाडी चालवायला शिकावंस  वाटते. कधी ऑटो रिक्षा शिकावी असे वाटते का. तुम्ही सायकल तर चालवता, मात्र तीन चाकी सायकल जी लोकांना घेऊन जाते- कधी चालवायचा प्रयत्न केला आहे का. तुम्ही बघा हे सर्व नवीन प्रयोग, हे कौशल्य असे आहे तुम्हाला आनंदही देईल आणि आयुष्याला एका चौकटीत जे बांधले आहे ना त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. चाकोरीबाहेरचे काहीतरी करा मित्रांनो. आयुष्य बनवायची हीच तर संधी असते. आणि तुम्ही विचार करत असाल कि सर्व परीक्षा संपल्या, कारकीर्दीच्या नव्या वळणावर जाईन तेव्हा शिकेन तर ती संधी तर येणार नाही. मग तुम्ही दुसऱ्या गडबडीत अडकाल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जादू शिकण्याचा छंद आहे तर पत्त्यांची जादू शिका. आपल्या मित्र-मंडळींना जादू दाखवत राहा. काही ना काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या आतील मानवी शक्तीला चेतना मिळेल. विकासासाठी खूप चांगली संधी बनेल. मी माझ्या अनुभवातून सांगतो जगाकडे पाहून जितके आपल्याला शिकायला समजून घ्यायला मिळते ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. नवीन नवीन जागा, नवनवीन शहरे, नवनवीन नगर, नवीन गावे, नवीन परिसर. मात्र जाण्यापूर्वी कुठे जात आहात त्याचा अभ्यास आणि गेल्यानंतर एखाद्या जिज्ञासूप्रमाणे ते पाहणे, समजून घेणे, लोकांशी चर्चा करणे, त्यांना विचारणे हे जर प्रयत्न केले तर ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असेल. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि ठरवा, प्रवास जास्त करू नका. एका ठिकाणी गेल्यांनंतर तीन दिवस, चार दिवस राहा. नंतर दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे तीन दिवस, चार दिवस राहा. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुम्ही जेव्हा जाल  तेव्हा मला नक्की तिथला फोटो पाठवा. काय नवीन पाहिले? कुठे गेला होतात? तुम्ही हॅश टॅग इनक्रेडिबल इंडिया याचा वापर करून आपले अनुभव सांगू शकता.

मित्रांनो, यावेळी भारत सरकारनेही तुमच्यासाठी खूप छान संधी दिली आहे. नवीन पिढी तर रोख व्यवहारांतून जवळजवळ मुक्त होत आहे. त्यांना रोखीची गरज नाही. ते डिजिटल चलनावर विश्वास ठेवू लागले आहेत. तुम्हीही करता मात्र या योजनेतून तुम्ही कमाई देखील करू शकता- तुम्ही विचार केला आहे. भारत सरकारची एक योजना आहे. जर भीम ऍप जे तुम्ही डाऊनलोड करत असाल, तुम्ही वापरत देखील असाल. मात्र दुसऱ्या कुणालातरी वापरायला सांगा. दुसऱ्या कुणालाही याच्याशी जोडा आणि त्या नवीन व्यक्तीने जर तीन व्यवहार केले, आर्थिक व्यवहार तीन वेळा केले, तर हे काम केल्याबद्दल तुम्हाला 10 रुपये मिळू शकतात. तुमच्या खात्यात सरकारकडून 10 रुपये जमा होतील. जर दिवसभरात तुम्ही 20 लोकांकडून करवून घेतले तर संध्याकाळपर्यंत 200 रुपये कमवू शकता. व्यापाऱ्यांचीही कमाई होऊ शकते, विद्यार्थ्यांचीही कमाई होऊ शकते. आणि ही योजना 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. डिजिटल भारत घडवण्यात तुमचे योगदान असेल. नवीन भारताचे तुम्ही एक पहारेकरी बनाल, तर सुट्टीही आणि त्याचबरोबर कमाई देखील. रिफर अँड अर्न.

सर्वसाधारणपणे आपल्या देशात व्हीआयपी संस्कृतीप्रति एक तिरस्काराचे वातावरण आहे मात्र ते इतके खोलवर आहे-हे मला अलिकडेच अनुभवायला मिळाले. जेव्हा सरकारने ठरवले कि आता भारतात कितीही मोठी व्यक्ती का असेना, ती आपल्या गाडीवर लाल दिवा लावून फिरणार नाही. ते एक प्रकारे व्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक बनले होते, मात्र अनुभव हे सांगत होता कि लाल दिवा तर वाहनावर लागत होता, गाडीवर लागत होता, मात्र हळूहळू तो डोक्यात घुसायचा आणि डोक्यात ही व्हीआयपी संस्कृती खोलवर रुजली आहे. आता केवळ लाल दिवाच गेला आहे, त्यामुळे कुणी हा दावा करू शकणार नाही कि डोक्यात जो लाल दिवा घुसला आहे तो बाहेर आला असेल. मला एक खूप रोचक दूरध्वनी आला आहे. या दूरध्वनीत त्यांनी धास्तीदेखील व्यक्त केली आहे मात्र यावेळी या दूरध्वनीतून एवढा अंदाज येतो कि सामान्य माणसाला या गोष्टी आवडत नाहीत. त्याला यात एक प्रकारचा अलिप्तपणा वाटतो.

"नमस्कार पंतप्रधानजी, मी शिवा चौबे बोलते आहे, जबलपूर मध्य प्रदेश इथून. मला सरकारच्या लाल दिव्यावरील बंदीबाबत थोडे बोलायचे आहे. मी वृत्तपत्रात एक ओळ वाचली, ज्यात लिहिले होत  every Indian is a VIP on a road हे ऐकून मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही झाला कि आज माझा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मला वाहतूक कोंडीत अडकायचे नाही आणि मला कुणासाठी थांबायचेही नाही. म्हणून या निर्णयासाठी मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. आणि हे जे तुम्ही स्वच्छ भारत अभियान राबवले आहे, यातून आपला देशच केवळ स्वच्छ होत नाहीये तर आपल्या रस्त्यावरून अतिमहत्वाच्या व्यक्तींची दादागिरीही नाहीशी होत आहे-यासाठी धन्यवाद."

सरकारी निर्णयाद्वारे लाल दिव्याचे जाणे हा तर व्यवस्थेचा एक भाग आहे. मात्र मनातूनही आपल्याला प्रयत्नपूर्वक ते काढून टाकायचे आहे. आपण सर्वानी मिळून जागरूक प्रयत्न केले तर काढता येईल. नवीन भारताची आपली संकल्पना हीच आहे कि देशात व्हीआयपीच्या ऐवजी ईपीआयचे महत्व वाढावे आणि जेव्हा मी व्हीआयपीच्या जागी ईपीआय म्हणतो तेव्हा माझी भावना स्पष्ट आहे- एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टन्ट. प्रत्येक व्यक्तीचे महत्व आहे, प्रत्येक व्यक्तीचे माहात्म्य आहे. सव्वाशे कोटी देशबांधवांचे महत्व स्वीकारले, सव्वाशे कोटी देशबांधवांचे माहात्म्य आपण स्वीकारले तर महान स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किती मोठी शक्ती एकवटेल. आपण सर्वानी मिळून करायचे आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणत असतो कि आपण इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करावे. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. यावर्षी आपण सव्वाशे कोटी देशबांधव संत रामानुजाचार्य यांची एक हजारावी जयंती साजरी करत आहोत. काही ना काही कारणामुळे आपण इतके अडकले गेलो, एवढे छोटे झालो कि जास्तीत जास्त शताब्दीपर्यंतचाच विचार करत राहिलो. जगभरातल्या अन्य देशांसाठी तर शताब्दीचे खूप महत्व असेल. मात्र भारत इतका प्राचीन देश आहे कि त्याच्या नशिबात हजार वर्ष आणि हजार वर्षांहूनही जुन्या आठवणी साजऱ्या करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. एक हजार वर्षांपूर्वीचा समाज कसा होता? त्यांची विचारसरणी कशी होती? थोडी कल्पना तर करा. आजही सामाजिक रूढी प्रथा तोडायच्या म्हटले तर किती अडचणी येतात. एक हजार वर्षांपूर्वी कसे होत असेल? खूप कमी लोकांना माहित असेल कि रामानुजाचार्यजी यांनी समाजात ज्या कुप्रथा होत्या, उच्च-नीच असा भेदभाव होता, स्पृश्य-अस्पृश्यचा भेदभाव होता, जातीवादाची भावना होती त्याविरोधात खूप मोठा लढा दिला होता. स्वतः त्यांनी आपल्या आचरणातून समाज ज्यांना अस्पृश्य मानायचा त्यांना आपलेसे केले होते. हजार वर्षांपूर्वी त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केले होते आणि यशस्वीपणे मंदिर प्रवेश करवला होता. आपण किती भाग्यवान आहोत कि प्रत्येक युगात आपल्या समाजातल्या वाईट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपल्या समाजातूनच महापुरुष जन्माला आले आहेत. संत रामानुजाचार्यजी यांची एक हजारावी जयंती साजरी करत असताना, सामाजिक ऐक्यासाठी, संघटनेत ताकद आहे- ही भावना जागवण्यासाठी त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी.

भारत सरकार देखील 1 मे रोजी संत रामानुजाचार्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपालतिकीट प्रकाशित करणार आहे. मी संत रामानुजाचार्यजी यांना आदरपूर्वक वंदन करतो, आदरांजली वाहतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्याच्या 1 मे चे आणखी एक महत्व आहे. जगभरातल्या अनेक भागांमध्ये तो कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. आणि जेव्हा कामगार दिनाचा विषय निघतो, श्रमाची चर्चा होते, कामगारांची चर्चा होते, तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. आणि खूप कमी लोकांना माहित असेल कि आज कामगारांना ज्या सवलती मिळाल्या आहेत, जो आदर मिळाला आहे, त्यासाठी आपण बाबासाहेबांचे आभारी आहोत. कामगारांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. आज जेव्हा मी बाबासाहेब यांच्याबद्दल बोलतोय, संत रामानुजाचार्यजी यांच्याबाबत बोलतोय, तर 12व्या शतकातले कर्नाटकचे महान संत आणि सामाजिक सुधारक जगत गुरु बस्वेश्वरजी यांचीही आठवण येते. कालच मला एका समारंभात जायची संधी मिळाली. त्यांच्या वचनामृत संग्रहाचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम होता. 12व्या शतकात कन्नड भाषेत त्यांनी श्रम, श्रमिक यावर सखोल विचार मांडले आहेत. कन्नड भाषेत त्यांनी म्हटले होते - "काय कवे कैलास", त्याचा अर्थ असा आहे- तुम्ही तुमच्या मेहनतीनेच भगवान शंकराच्या घराची कैलाशची प्राप्ती करू शकता, म्हणजेच कर्म केल्यानेच स्वर्ग प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर श्रम हेच शिव आहे. मी पुन्हा-पुन्हा  'श्रमेव जयते' बाबत बोलत असतो. श्रम प्रतिष्ठेबाबत बोलतो. मला चांगले आठवतेय भारतीय मजदूर संघाचे जनक आणि चिंतक ज्यांनी कामगारांसाठी खूप चिंतन केले असे श्रीयुत दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे - एकीकडे माओवादाने प्रेरित विचार होते कि जगातल्या मजुरांनी एक व्हावे. आणि दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे कामगारांनो या, जगाला एकत्र आणा. एका बाजूला म्हटले जात होते - जगातल्या कामगारांनी एकत्र यायला हवे. भारतीय चिंतनातून निघालेल्या विचारप्रवाहाला अनुसरून दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे- कामगारांनो जगाला एक करा. आज जेव्हा कामगारांबद्दल बोलतो, तेव्हा दत्तोपंत ठेंगडी यांची आठवण येणे खूप स्वाभाविक आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांनंतर आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करू. जगभरात भगवान बुद्ध यांच्याशी जोडलेले लोक उत्सव साजरा करतात. जग आज ज्या समस्यांचा सामना करत आहे, हिंसा, युद्ध, विनाश, शस्त्रांची स्पर्धा, जेव्हा असे वातावरण पाहतो तेव्हा बुद्धांचे विचार खूपच प्रासंगिक वाटतात. आणि भारतात तर अशोकचे जीवन युद्ध ते बुद्ध या प्रवासाचे उत्तम प्रतीक आहे. माझे सौभाग्य आहे कि बुद्ध पौर्णिमेच्या या महान पर्वानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने वेसक दिन साजरा केला जातो. यावर्षी तो श्रीलंकेत साजरा होणार आहे. या पवित्र पर्वानिमित्त मला श्रीलंकेत भगवान बुद्ध यांना आदरांजली वाहण्याची एक संधी मिळेल. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची संधी मिळेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतात नेहमी 'सबका साथ-सबका विकास' हा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा आम्ही 'सबका साथ-सबका विकासम्हणतो तेव्हा तो केवळ भारतात नाही जागतिक संदर्भातही असतो. अनेक प्रकल्प सुरु असतात. 5 मे रोजी भारत दक्षिण-आशिया उपग्रह प्रक्षेपित करेल. या उपग्रहाची क्षमता आणि त्याच्याशी संबंधित सुविधा दक्षिण आशियाचे आर्थिक तसेच विकास विषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात खूप सहाय्य्यभूत ठरतील. मग ते नैसर्गिक साधनसंपत्तीचं मॅपिंग करणे असेल, दूर-औषध क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा अधिक सखोल माहिती तंत्रज्ञान जोडणी असेल, लोकांमधील संपर्काचा प्रयत्न असेल. दक्षिण आशियाच्या या उपग्रहामुळे आपल्या संपूर्ण प्रदेशाला पुढे जाण्यासाठी मदत होईल. संपूर्ण दक्षिण आशियाबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे - अमूल्य भेट आहे. दक्षिण अशियाप्रती आपल्या कटिबद्धतेचे हे एक उपयुक्त उदाहरण आहे. दक्षिण आशियाई देश, जे या दक्षिण आशिया उपग्रहाशी जोडलेले आहेत त्या सर्वांचे या महत्वपूर्ण प्रयत्नासाठी स्वागत करतो, शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, उष्मा खूप वाढला आहे, आपल्या माणसांनाही जपा, स्वतःलाही जपा. खूप-खूप शुभेच्छा, धन्यवाद.

 
/DL/1
दे --दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau